पुनर्वसनाकडून प्रदेशविकसनाकडे

 विवेक मराठी  08-Oct-2018

ज्ञान प्रबोधिनी - हराळीचा पंचवीस वर्षांचा प्रवास

 1993च्या किल्लारी भूकंपामध्ये लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात जे नुकसान झाले ते कधीही भरून न येणारे आहे. पडझडीनंतरच्या पंचवीस वर्षांत काही गावे पुन्हा उभी राहिली, माणसे सावरली, पुन्हा उमेदीने कामाला लागली. ही उमेद निर्माण करण्यात हराळी गावच्या 'ज्ञान प्रबोधिनी' शाळेने महत्त्वाचा वाटा उचलला. पुनर्वसनाकडून प्रदेशविकसनाकडे अशी वाटचाल करणाऱ्या ज्ञान प्रबोधिनी - हराळीचा

चवीस वर्षांचा कालपट उलडगणारा लेख.

 29 सप्टेंबर 1993च्या अनंत चतुर्दशीला गावोगावच्या गणपतीबाप्पांना निरोप देत झोपी गेलेला दक्षिण मराठवाडा भूकंपाच्या क्रूर धक्क्याने 30 सप्टेंबरच्या पहाटे जागा झाला! किल्लारी परिसरात हाहाकार झाला होता! जनजीवन उद्ध्वस्त झालं होतं. त्या दिवसापासून ज्ञान प्रबोधिनी या शिक्षण आणि सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेचे कार्यकर्ते या भागात कामाला धावून गेले. नारंगवाडी, तावशीगड, हराळी आणि परिसरातील गावांमध्ये तात्पुरते निवारे बांधणं, जखमींवर औषधोपचार आणि लोकांना आपापले व्यवसाय पुन्हा सुरू करायला मदत करणं इथपासून कामाला सुरुवात झाली.

पुनर्वसनानंतरचं आव्हान

पुनर्वसनाचं काम पूर्ण झाल्यावर त्या भागात आलेल्या बहुतेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी परत गेले. परंतु पुनर्वसनानंतरचं आव्हान होतं दक्षिण मराठवाडयातल्या या गावांमध्ये उत्तम शिक्षणाची व्यवस्था करण्याचं, मरगळलेल्या शेतीला टवटवी आणण्याचं आणि तरुणांमध्ये विकासाच्या नव्या आकांक्षा जागवण्याचं! हराळी या गावातला विधायक प्रतिसाद लक्षात घेऊन, हे गाव केंद्रस्थानी ठेवून प्रबोधिनीचे ज्येष्ठ, अनुभवी कार्यकर्ते डॉ. वसंत सीताराम उर्फ आण्णा ताम्हनकर आणि डॉ. लताताई भिशीकर यांनी हराळीला राहून हे आव्हान स्वीकारलं.

मित्र-शुभचिंतकांच्या मदतीने त्यांनी हराळी येथे एक शिक्षणतीर्थ उभं केलं. परिसरातल्या शंभर गावांमधून मुलं तिथे शिकायला येऊ लागली. उत्तम शालेय शिक्षणाबरोबरच दक्षिण मराठवाडयाच्या विकासाची स्वप्नं पाहायला ही मुलं शिकू लागली. कमी पाण्यात पेरू, सीताफळ, आंबा, लिंबू यांची रसरशीत पिकं कशी घेता येतात याची प्रात्यक्षिकं पाहू लागली. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र निकेतन, संगणक केंद्र, महिलांसाठी फलप्रक्रिया उद्योग असे एकापाठोपाठ एक प्रकल्प उभे राहत गेले.

दक्षिण मराठवाडयात  मुबलक असलेल्या सौर ऊर्जेची अनेक उपयोजनं हराळीला दिसू लागली. आंघोळीच्या गरम पाण्यापासून तर सौर चुलींवरचा स्वयंपाक, सर्वत्र - वर्गांत, रस्त्यांवर, सभागृहांत, निवासांमध्ये सौर दिव्यांचा उपयोग होऊ लागला. 48 KWची दोन सौर ऊर्जा निर्मिती केंद्रं उभी राहिली. शिवाय शेतीपंप चालवण्यासाठी 38 KWचं आणखी एक केंद्र उभं राहिलं. ऊर्जाविषयक आंतरराष्ट्रीय मासिकांनीही या नवलाईची नोंद घेतली.

2010मध्ये पुण्याच्या प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी दीपक कांबळे यांनी हराळीच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी घेतली. त्यापूर्वी अरुणाचल प्रदेशात त्यांनी 8 वर्षं अध्यापनाचा अनुभव घेतला होता. 1993 ते 2013 या काळात दक्षिण मराठवाडयाच्या विकासाच्या कोणकोणत्या दिशा असू शकतात, याचा जणू एक वस्तुपाठ हराळीला निर्माण झाला. देश-विदेशातले लोक कौतुकाने येथील शिक्षणाचे आणि कृषी व अन्य विकासाचे प्रयोग पाहायला येऊ लागले. परंतु हे काम हराळीपुरतं मर्यादित ठेवायचं नव्हतं. इथली स्फुरणं दिशांतराला जायला हवी होती. पण त्यासाठी आता नव्या ताकदीच्या आणि नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांची आवश्यकता होती.

नव्या उमेदीचा संच

ज्ञान प्रबोधिनीच्या मुशीतच घडलेल्या एका तरुण दांपत्याने 2013च्या मध्याला हे दायित्व स्वीकारलं. पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीच्या प्रशालेचे माजी विद्यार्थी कमांडर अभिजित कापरे हे वीस वर्षं नौदलात काम करून स्वेच्छानिवृत्ती घेणार होते. त्यांच्या पत्नी गौरीताई कापरे फळशेती या विषयातल्या एम.एससी. होत्या. या दोघांपुढे हराळीच्या कामाचा प्रस्ताव ठेवल्यावर त्यांनी विचारपूर्वक मान्यता दिली. प्रबोधिनीचे बीड भागात उत्तम गुरुकुल चालवणारे मित्र सुदाम भोंडवे यांचा मुलगा अश्विन संगणक अभियंता आहे. गडचिरोलीला डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्याबरोबर त्याने तीन वर्षं काम केलं होतं. तोही या दांपत्याबरोबर हराळीत कामाला आला. त्याची बहीण कल्याणी अभियांत्रिकीतील पदवीधर आहे. ती आली. जळगावचे तरुण इंजीनिअर अनिरुध्द पाटील आले. असा हराळीच्या तरुण कार्यकर्त्यांचा संच उभा राहत गेला. त्यांच्याजवळ परिसरातील गावांमध्ये जाऊन काम करण्याची उमेद होती.

इस्रायलहून हराळीला ग्रामविकासाच्या कामासाठी दर वर्षी नवनवे युवक-युवती येऊ लागले. हराळीच्या तरुण कार्यकर्त्यांबरोबर तेही उत्साहाने काम करू लागले. 2013मध्ये जपानमधील एक निवृत्त शिक्षक तोशिओ ताजिमा हराळीला येऊ लागले. येथील ग्रामीण तरुणांना ते एल.ई.डी. लँप आणि छोटे सौर दिवे बनवायला शिकवू लागले. आता तर प्रारंभीच्या प्रायोगिक वर्गांनंतर हराळीला युवकांसाठी सौरविद्या प्रशिक्षण केंद्रच सुरू करण्याची तयारी चालू आहे.

जलदूत आणि जलमित्र

2013मध्ये दुष्काळामुळे हराळीची लिबांची दोन हजार झाडं असलेली बाग जळून गेली! परिसरातील शेतकऱ्यांचेही हाल पाहवत नव्हते. त्यामुळे परिसरात जलसंधारणाची कामं कशी करता येतील यावर कार्यकर्त्यांनी अभ्यास - प्रयत्न सुरू केले. दोन कार्यकर्त्यांनी ऍटलास कॉप्को चॅरिटेबल फाउंडेशन आणि सेवा वर्धिनी यांनी योजलेला एक वर्षाचा 'जलदूत' अभ्यासक्रम पुरा केला. गावाच्या पाणी परिस्थितीचा अभ्यास करून त्या गावाचा विकास आराखडा कसा करायचा, ते शिक्षण त्यांनी घेतलं. हराळी गावाचा विकास आराखडा सादर करून त्यांनी सादरीकरण स्पर्धेत एक लाख रुपयांचं बक्षीसही मिळवलं.

पुढचा टप्पा म्हणजे लोहारा आणि उमरगा या तालुक्यांमधील दहा गावांमध्ये या संकल्पना समजून प्रत्यक्षात आणण्याची क्षमता आणि प्रेरणा असलेले 'जलमित्र' उभे करणं. प्रबोधिनीत अशा एकवीस जलमित्रांचं प्रशिक्षण झालं. पर्जन्यमापक तयार करणं, भूजलधारकांची ओळख, पाण्याचा ताळेबंद, जलसंधारणाच्या विविध पध्दती, पीक नियोजन हे विषय या प्रशिक्षणात होते. हे सर्व जलमित्र उत्तम काम करत आहेत.

आपल्या मित्रांच्या अर्थसाहाय्यातून पाच गावांमधील पन्नास विहिरींच्या पुनर्भरणाचं काम झालं. हराळीत आणि सालेगावमध्ये छोटया शेतनाल्यांची कामं झाली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने सास्तूर येथील ओढयाच्या खोलीकरणाचं काम प्रबोधिनीकडे दिलं. सुमारे सत्तर हजार घनमीटर गाळ लोकसहभागातून काढला गेला. 2018च्या उन्हाळयात अशी सुस्थिती आहे की या भागात जलाशयांमध्ये बारा कोटी लीटरपेक्षा जास्त साठवण क्षमता निर्माण झाली आहे.

शेती आणि फलप्रक्रिया

या वर्षी प्रथमच प्रबोधिनीने परिसरातील सात गावांमधील शेतकऱ्यांसाठी शेती विस्तार उपक्रम केला. या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या नियमित बैठकी घेऊन माती परीक्षण, बीजप्रक्रिया, सेंद्रिय शेतीचा वापर, कीड नियंत्रण हे शेतकऱ्यांचे जिव्हाळयाचे विषय घेऊन त्याबाबत काय करता येईल याचा एकत्र विचार आणि कृती झाली.

दुधी भोपळा, कारली, बीट, शेवगा, कोथिंबीर या भाज्या सौर पध्दतीने वाळवून टिकवण्याचे प्रयोग झाले. अशा भाज्यांना बाहेर मोठी मागणी आहे.

पूरक शिक्षण - परिसरातील शाळांसाठी

हराळी विद्यालयात उत्तम प्रयोगशाळा आहे. प्रयोगशील मुलांसाठी 'खटपट गृह' म्हणजे हॉबी वर्कशॉप आहे. आता तर अटल टिंकरिंग लॅब या योजनेत प्रबोधिनीच्या हराळीच्या शाळेचा सहभाग असल्याने विविध शास्त्रीय प्रयोगांसाठी विपुल साहित्य, पुस्तकं आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे. हे केवळ हराळीच्या मुलांपुरतंच राहू नये, परिसरातील शाळांमधल्या मुलांनाही त्याचा लाभ व्हावा, म्हणून 'पूरक शिक्षण' या नावाखाली काही प्रकल्प सुरू झाले.

परिसरातील सहावीच्या आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'प्रज्ञा विकास प्रकल्प' सुरू झाला. मुलांच्या मन-बुध्दीला चालना देणारी सत्रं या मुलांना दर आठवडयाला हराळीला आणून त्यांच्यासाठी घेतली गेली. एकूण 250 मुलांना यात सहभाग आहे. त्यांच्या पालकांनाही आपण निमंत्रित करून मुलं नवं काय शिकताहेत ते दाखवत असतो.

गेल्या वर्षात परिसरातल्या 600 मुलामुलींनी 'छोटे सायंटिस्ट्स' या उपक्रमाचा लाभ घेतला. दैनंदिन जीवनातलं विज्ञान त्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून ओळखीचं झालं. त्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला आव्हान देणाऱ्या अनेक स्पर्धा झाल्या. त्या मुलांना फार आवडल्या. चार शाळांच्या दहावीच्या मुलांनी हराळीला येऊन अभ्यासक्रमातले प्रयोग केले.

'किशोरी विकास' हा उपक्रम आता हराळीच्या माजी विद्यार्थिनीच उत्तम प्रकारे चालवू लागल्या आहेत. या उपक्रमाचं चौथं वर्ष. भोवतीच्या सात गावांमधल्या नऊ शाळांमध्ये जाऊन आरोग्य, आहार, स्वच्छता, अभ्यासकौशल्यं याबाबत मुलींशी बोलणं, त्यांचे खेळ घेणं, संगीत, कथाकथन, स्त्रीजीवनाविषयीचे प्रश्न, कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रं सांगणं असे उपक्रम असतात. यात नऊ शाळांमधील 100 मुली सहभागी असतात.

या भागातल्या भटक्या विमुक्त समाजासाठीच्या चार शाळांमध्ये पूरक शिक्षणाचं काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालं आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये ते पुष्कळ वाढण्याची शक्यता आहे.

सध्या आपण महिलांचे पाच बचत गट आणि दोन उद्योजिका गट यांच्याबरोबर काम करतो.

रूप पालटू दक्षिण मराठवाडयाचं.....

1993ला हराळीपासून सुरुवात करून आता परिसरात बहुविध अंगांनी विस्तारत चाललेल्या प्रबोधिनीच्या कामाचं हे छोटंसं दर्शन. या कामामागे स्वामी विवेकानंद, ग्रामगीता लिहिणारे तुकडोजी महाराज, वंचितांपर्यंत विद्या पोहोचवण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आहे. दऱ्याखोऱ्यातल्या मावळयांना एकत्र करून स्वराज्याची उभारणी करणाऱ्या शिवछत्रपतींची प्रेरणा आहे.

उद्याचं दक्षिण मराठवाडयाचं तरुण नेतृत्व या मातीतून आलेलं, इथल्या प्रश्नांची जाण असणारं, त्यासाठी बुध्दिपूर्वक परिश्रम करणारं असलं पाहिजे अशी प्रबोधिनीची तळमळ आहे. व्यसनं आणि भ्रष्टाचार यांच्या शापांपासून ही भूमी मुक्त ठेवण्याची तळमळ आहे. इथल्या मुलांमुलीमध्ये खूप मोठया क्षमता लपलेल्या आहेत. प्रबोधिनीच्या शिक्षण पध्दतीतून त्या प्रकट होऊ लागतील.

येथे उद्योगांचे कल्पतरू फुलावेत, नीतिमंत श्रीमंती यावी, विविध क्षेत्रांत विकासाचे धुमारे फुटावेत यासाठी येथील सर्व विधायक शक्तींनी एकवटून काम करण्याची आवश्यकता आहे. ज्ञान प्रबोधिनीने गेल्या पंचवीस वर्षांत हेच आवाहन सदैव केलं आहे. त्याला प्रतिसाद देत देश-विदेशातल्या सर्व शुभशक्ती येथे साहाय्याला येवोत, हीच सृष्टीच्या निर्मात्याकडे आजच्या दिवशी प्रार्थना आहे.

 


डॉ. स्वर्णलता भिशीकर

8888802628