मैला सफाई व्हावी फक्त यंत्राने

 विवेक मराठी  08-Oct-2018

महात्मा गांधी स्वेच्छेने सफाई कामगार बनले. सफाईकाम करणाऱ्या समाजाच्या विदारक वास्तवाकडे लक्ष वेधणे हाच त्यांचा हेतू होता. त्याचप्रमाणे आपल्या देशात घरे स्वच्छ असतात, पण सार्वजनिक परिसर मात्र घाण असतो. अंतर्बाह्य स्वच्छता हे आपले राष्ट्रीय चारित्र्य आपण बनवले पाहिजे. महात्मा गांधींच्या कल्पनेतील स्वच्छ भारत साकार करणे हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून मानवी सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टीना महत्त्व दिले पाहिजे.

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/


पला देश आता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करत आहे. महात्मा गांधींच्या जीवनाचे विविध पैलू आहेत. त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातून अनेक गोष्टी समाजाला समजावून सांगितल्या. अशा गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे स्वच्छता विषयात त्यांनी केलेले काम. महात्मा गांधींनी स्वतःला सफाई कामगार म्हणवून घेण्यात गौरव मानला होता. सेवाग्रामला असताना ते स्वतः मगनवाडी येथील स्वच्छता कामगारांच्या वस्तीत जाऊन राहत असत. महात्मा गांधींनी नेहमी आपल्या कार्यात स्वच्छता या विषयाला अग्रक्रम दिला होता. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातही स्वच्छतेचा आग्रह धरणारे महात्मा गांधी त्या काळातही अनेकांचे आदर्श होते आणि आजही सर्वांसाठी आदर्श आहेत. या स्वच्छतेच्या कामाचे साधारणपणे दोन विभाग होतात - मानवी व्यवहारातून निर्माण होणारा कचरा आणि दुसरा विभाग म्हणजे मानवी विष्ठेची विल्हेवाट लावणे. महात्मा गांधी स्वतः अनेक वेळा मानवी विष्ठेची विल्हेवाट लावण्याचे काम करत असत. अनेक वेळा त्यांनी विष्ठेने भरलेल्या टोपल्या डोक्यावरून वाहून नेल्या आहेत. मानवी विष्ठा वाहून नेताना होणाऱ्या यातना त्यांनी स्वतः अनुभवल्या. महात्मा गांधींबरोबर त्यांच्या काही अनुयायांनी हे काम करून गांधींच्या पावलावर पाऊल टाकले होते. गोपुरीच्या अप्पा पटवर्धनांची या कामात विशेष नोंद घ्यावी लागते.

मानवी विष्ठेची विल्हेवाट लावण्याचे काम शतकानुशतके एका विशिष्ट समाजगटाकडूनच केले जाते. त्यांच्या या कामाचा सन्मान करणे दूरच, पण त्यांच्याशी सहज व्यवहार करण्याचीही सर्वसामान्य माणसांची तयारी नसते. या माणसांचे आरोग्याचे प्रश्न, व्यसनाधीनता अशा अनेक गोष्टींचा फारसा विचार होताना दिसत नाही. संसदेच्या कायद्याद्वारे प्रस्थापित नॅशनल कमिशन फॉर सफाई कर्मचारीज् (NKSK) या आयोगाने प्रकाशित केलेली आकडेवारी धक्कादायक आहे. 1 जानेवारी 2017पासून आजतागायत गटारांत व सेप्टिक टँकमध्ये उतरून सफाई करणाऱ्या 123 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वर्तमानपत्रातील बातम्यांच्या व काही राज्य सरकारांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे आहे. त्यामुळे खरा आकडा याहून अधिक असणार. हा आकडा जरी ग्राह्य धरला, तरी सरासरी पाच दिवसाआड एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो. 1993 सालच्या कायद्यानुसार उघडया गटारातून वाहणारे मलमूत्र, तसेच शुष्क संडास व टोपलीचे संडास, हाताने सफाई करण्यास व ती वाहून नेण्यास मनाई होती. त्या कायद्यात 2013 साली दुरुस्ती होऊन शहरातील गटार व्यवस्था व सेप्टिक टँक्स यांची हाताने मैला सफाई करण्यास बंदी घालण्यात आली. गटाराच्या किंवा सेप्टिक टँकच्या आत उतरून सफाई कर्मचाऱ्यांना सफाईचे काम करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात व त्यांचे एकूण आयुर्मान इतर व्यक्तींच्या तुलनेने लक्षणीयदृष्टया कमी होत असल्याचे आढळून आले आहे. हा केवळ सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न नसून या प्रश्नाकडे माणसाची प्रतिष्ठा या दृष्टीकोनातूनही पाहिले पाहिजे. मैला सफाईचे काम जातिव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये एकाच जातीचे लोक करतात. या कामातून त्या समाजाला मुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. या कुप्रथेचे समूळ उच्चाटन केले पाहिजे. हाताने सफाई करण्याला स्वयंचलित मैला सफाई यंत्र हाच एकमेव पर्याय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन 'स्वच्छ भारत' ही योजना अमलात आणली आहे. सार्वजनिक स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवत त्यांनी सर्व देशभर जागृती निर्माण केली. शौचालयाचे महत्त्व देवालयाएवढे अाहे. तसेच आमची गावे, शहरे स्वच्छ करण्याची देशव्यापी मोहीम कार्यरत केली आहे. मोदी सरकारने 2014 सालापासून फेब्रुवारी 2018पर्यंत सुमारे 6 कोटी शौचालयांची निर्मिती केली आहे. 'स्वच्छ भारत मिशन'च्या या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन आम्ही 'सेवा सहयोग' या संस्थेच्या माध्यमातून गेली चार वर्षे निर्मल वारी योजना राबवत आहोत. महाराष्ट्रात आषाढी वारीला खूप महत्त्व आहे. आळंदी आणि देहूपासून पायी वारी करत हजारो वारकरी पंढरपूरला जात असतात. अनेक शतकांची ही परंपरा आहे. पण लाखोच्या संख्येने सहभाग असणाऱ्या या वारीत शौचालयाची व्यवस्था नव्हती. वारीत सहभागी होणाऱ्या स्त्री-पुरुषांना उघडयावर विधी करावे लागत असत. यातून आरोग्याचे आणि पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण होत असत. ही समस्या लक्षात घेऊन निर्मल वारी हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामध्ये दर वर्षी दहा हजार कार्यकर्ते सहभागी होतात. निर्मल वारीचा हा उपक्रम हा नैमित्तिक असला, तरी या उपक्रमासारखे स्थायी स्वरूपाचे काम देशभर होणे गरजेचे आहे. देशभरातील महानगरापासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत जेथे जेथे मानवी विष्ठेच्या व्यवस्थापनासाठी माणसाचा वापर होतो, तेथे तेथे तातडीने आधुनिक यंत्रांची मदत घेतली पाहिजे आणि या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने काम केले पाहिजे. तरच आपण मानवी सन्मानाचा विषय प्रत्यक्षात आणला असे म्हणू शकू. याची सुरुवात झाली आहे, ही आनंदाची बाब म्हणायला हवी.

दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी यांत्रिक पध्दतीने मैला सफाईचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. हैदराबाद शहरामध्ये सत्तर स्वयंचलित जेटिंग मशीनद्वारे मैला उपसा व शुध्दी करण्यात येते. ज्याप्रमाणे मिलिंद कांबळे यांनी एक प्रयोग करून दाखवला आहे, त्याप्रमाणे सेवा सहयोग संस्थेने पंढरपूरची वारी पोर्टेबल टॉयलेटच्या वापरातून निर्मल करून दाखवली आहे. त्याचप्रमाणे ट्रकवर बसवलेल्या जेटिंग मशीनचा वापर करून शहरातील गटार व्यवस्था व सेप्टिक टँक्स स्वच्छ करावे लागतील. मैल्याची शास्त्रशुध्द व यांत्रिक पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा यशस्वी उद्योग करणारे पुण्याचे राजीव खेर यांचा या विषयातला अनुभव फार मोलाचा आहे. आधुनिक पध्दतीने सफाई व्यवस्था राबवून हाताने सफाई करण्याची प्रथा बंद करता येऊ शकते, हे राजीव खेर यांनी सप्रमाण सिध्द केले आहे.

महात्मा गांधी स्वेच्छेने सफाई कामगार बनले. सफाईकाम करणाऱ्या समाजाच्या विदारक वास्तवाकडे लक्ष वेधणे हाच त्यांचा हेतू होता. त्याचप्रमाणे आपल्या देशात घरे स्वच्छ असतात, पण सार्वजनिक परिसर मात्र घाण असतो. अंतर्बाह्य स्वच्छता हे आपले राष्ट्रीय चारित्र्य आपण बनवले पाहिजे. महात्मा गांधींच्या कल्पनेतील स्वच्छ भारत साकार करणे हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून मानवी सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे.

''सफाईकामाचं यांत्रिकीकरण यशस्वी'' - पद्मश्री मिलिंद कांबळे

 दोन वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये मॅनहोलमध्ये उतरून सफाई करताना दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मीडियामध्ये या विषयाची चर्चा झाली. त्यामुळे सरकारने या कामाचं यांत्रिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये हैदराबाद मेट्रो वॉटर वक्र्स डिपार्टमेंटने डिक्कीच्या लोकांना बोलावलं आणि त्यांना या प्रकल्पासाठी काम करण्याचं आवाहन केलं. डिक्कीने हे आव्हान स्वीकारलं आणि मग आमचं काम सुरू झालं.

छोटया गल्ल्यांमध्ये जाण्यासाठी मिनी गेटिंग मशीनची आवश्यकता होती. जे सफाई कर्मचारी होते, आम्हाला त्यांनाच हे मिनी गेटिंग मशीन चालवण्यासाठी कंत्राटदार म्हणून नेमायचं होतं. जे लोक वर्षानुवर्षं सफाईच्या कामात आहेत, अशा मुलांना, तरुणांना आम्ही शोधलं. त्यांना प्रशिक्षण दिलं. त्याचबरोबर त्यांना कंत्राटदार म्हणून रजिस्टर केलं. त्यानंतर त्यांना टेंडर भरण्यासाठी सहकार्य केलं. अशा प्रकारे 136 सफाई कर्मचाऱ्यांना आम्ही कंत्राटदार म्हणून पुढे आणलं. याचा परिणाम असा झाला की गेल्या दोन वर्षांत या परिसरात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडलेली नाही आणि यापुढेही ती घडणार नाही. हैदराबाद हे पूर्णपणे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग फ्री केलं आहे. हा प्रकल्प अतिशय यशस्वीरित्या सुरू आहे.

मागच्या वर्षी या प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यामध्ये या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न 8000-12000 होतं, ते आता 30000-40000च्या घरात होऊ लागलं आहे. त्यामुळे त्यांची कुटुंबं आर्थिकदृष्टया, सामाजिकदृष्टया, शैक्षणिकदृष्टया सक्षम झाली आहेत. एक मोठा सकारात्मक बदल डिक्कीने घडवून आणला. पंतप्रधानांची स्टँड अप इंडिया योजना, अर्थसाहाय्य करणारी टाटा मोटर्स, जेटिंग मशीन बनवणारी पुण्याची अविदा कंपनी आणि भारत सरकारचे स्वच्छ भारत अभियान या सगळयांच्या समन्वयाने आम्ही हैदराबादमध्ये एक चांगलं उदाहरण निर्माण केलं आहे.

या 136 कंत्राटदारांसह सुमारे 500 लोकांना या प्रकल्पात प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे, तसंच अप्रत्यक्षरित्याही अनेकांना रोजगार मिळाला आहे. दिल्लीमध्येही आम्ही अशा प्रकारचा प्रयोग करीत आहोत. मागच्या वर्षभरात दिल्लीमध्ये ड्रेनेज सफाई करताना विविध घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्ली सरकारनेही आम्हाला बोलावून घेतलं होतं. मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही प्रेझेंटेशन केलं. तेथील प्रकल्पातही सुमारे 200 सफाई कामगार कंत्राटदार म्हणून तयार होतील.

आम्ही या लोकांना या कामाचं प्रात्यक्षिकासह संपूर्ण प्रशिक्षण देतो. त्याचबरोबर त्यांना जिवाणूमुक्त गणवेश, गमबूट, मोजे दिले जातात. विमा सुरक्षा आणि अन्य वैद्यकीय सुविधाही त्यांना दिल्या जातात. सफाई कामगार अतिशय दुर्गंधीत काम करतात. ते करताना ते व्यसनांचा आधार घेतात. मात्र आता त्यांची जीवनशैलीच बदलली आहे. त्यांच्या गणवेशामुळे तर ते एखाद्या सैनिकासारखे वाटतात आणि आता नागरिकही त्यांना चांगली वागणूक देतात. त्यामुळे व्यसनाधीनताही कमी होताना दिसतेय.

पंतप्रधान कार्यालयात आम्ही हैदराबादच्या प्रकल्पाचं सादरीकरण केलं. त्यामध्ये स्वच्छ भारत अभियानाचे आणि स्मार्ट सिटीज योजनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. आम्ही सरकारला प्रस्ताव दिला आहे की, देशात ज्या 100 स्मार्ट सिटीज होणार आहेत त्या मॅन्युअल स्केव्हेंजर फ्री असाव्यात, यासाठी डिक्की या स्मार्ट सिटीज योजनेत भागीदार म्हणून प्रयत्न करेल. या प्रस्तावावर विचार सुरू आहे. तसंच 65 कॅन्टोन्मेन्ट बोर्डमध्ये अशा प्रकारची पाच यंत्रं ठेवावीत, अशी विनंतीवजा सूचना आम्ही संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केली आहे.

जगभरात साफसफाईच्या कामाला सन्मान तसंच चांगले पैसे मिळतात. मात्र भारतात या कामाला सन्मानही नाही आणि आर्थिक मोबदलाही पुरेसा दिला जात नाही, हे चित्र आम्ही नक्की बदलू.

प्रदीप रावत 

पुणे