संवादिनीचा स्वर हरपला

 विवेक मराठी  08-Oct-2018

अभिजात भारतीय संगीत क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे ज्येष्ठ संवादिनीवादक पद्मश्री पं. तुळशीदास बोरकर. शनिवारी 29 सप्टेंबर 2018 रोजी त्यांचं निधन झालं. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते. मुंबई येथील नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. संवादिनी हा त्यांचा श्वास होता. हा श्वास त्यांनी शेवटपर्यंत जपला.

बोरकर गेले. गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतिअस्वास्थ्याच्या वार्ता येत होत्या. काळजी वाटत होती. वाढत होती. पण आतून असं वाटत होतं की बोरकर गुरुजी पुन्हा नेहमीसारखे वावरताना, वाजवताना दिसतील.

कारण आपलं अभिजात सौम्यपण घेऊन वावरणाऱ्या बोरकरांना आपली एकटयाचीच तीव्रपणे घेतलेली दखल वा एकटयावरच पडलेला झगझगीत प्रकाशझोत सोसणारा, मानवणारा नव्हता. आपल्या आवतीभोवती असलेल्या दृश्यात ते अतिकोमल स्वरासारखे अतिशय सौम्यपणे वावरत असत. वर्षानुवर्षं संगीत रंगभूमीवर ऑर्गन साथ करताना बसण्याची रंगमंचाच्या थेट समोरची प्रकाशाच्या अगदी निकटची पण केवळ स्वरतालानेच अस्तित्व दर्शविणारी साथसंगतकारांची काळोखी हौदातील जागा हीच बोरकरांनी आनंदाने स्वीकारलेली... भूषविलेली जागा होती.

पुढे काही वर्षांनी भारतरत्न पं. भीमसेनजींच्या अभंगवाणीच्या कार्यक्रमात बोरकर मंचस्थ झालेले दिसले. डोक्यावर संघाच्या गणवेशासारखी काळी लोकरीची, समोर टोक असलेली टोपी घातलेले बोरकर लोकांना दिसू लागले. अभंगवाणीच्या त्या श्रध्दाजागृतीत प्रत्यक्ष भीमसेनजी स्वत:सह केवळ मंचस्थच नव्हे, तर सभागृहातील रसिकांनाही 'व्यक्तित्वाच्या सीमा साऱ्या ओलांडुनी पुढती जाऊ' असा समर्पणाचा अनुभव देत असत. त्या तल्लीन गानपीठाच्या चित्रात बोरकर सहजपणे समाविष्ट होत...

वेगळी खूण न दाखवता.. ठेवता.

तीच त्यांची वृत्ती झाली होती ...ओळखही.

पुलं म्हणायचे, महाराष्ट्र गोव्याच्या कंठाने गातो. पं. तुळशीदास बोरकरांनी जणू या विधानाचा कृतिविस्तार केला. महाराष्ट्र गोव्याच्या बोटांनीही वाजू-गाऊ लागला.

बोरी गावच्या कविश्रेष्ठ बाकीबाब बोरकरांनी जीवन कळलेल्या महानुभावांचं प्रमुख लक्षण सांगताना सहजपणाची महती कवितेतून गायलेली सर्वांनीच ऐकली आहे, अनुभवली आहे. आपल्या वावरण्यातून, वाजवण्यातून तशाच सहजपणाचे दर्शन घडविणारे पंडितजीही त्याच बोरी गावचे.

तिथे भजनातून संगीताचा संस्कार घेत पुढे पुण्यात स्वरराज छोटा गंधर्वांच्या संगीत नाटकांना साथ करणाऱ्या ज्येष्ठ ऑर्गनवादक पं. विष्णुपंत वष्ट यांच्या सहवासात रंगभूमीवरील साथसंगतीकडे वळले. पन्नासच्या दशकात सुरू झालेली संगतयात्रा एेंशीच्या दशकापर्यंत निनादत राहिली. पुढे मुंबईत पं. देवेंद्र मुर्डेश्वरांशी झालेल्या परिचयातून आकाशवाणीवर वादन करण्याची संधी मिळाली. आणि त्याहूनही मोठा लाभ होता पं. मधुकर पेडणेकर अर्थात पं. पी. मधुकर या सिध्दहस्त कलावंताचा मिळालेला सहवास आणि मिळालेलं कलाशिक्षण.

बोरकरांनी अनेक प्रथितयश कलावंतांच्या शास्त्रोक्त संगीताच्या मैफलींत सुरेल साथ केली. सुधीर नायक, केदार नाफडे आणि असे कितीतरी गुणवान शिष्य तयार केले.

एक अगदी व्यक्तिगत आठवण सांगावीशी वाटते. माझे मामा आप्पा दाबके मुंबई महानगरपालिकेत होते. बोरकर गुरुजीही पालिकेच्या संगीत कला अकादमीत शिक्षक होते. माझ्या मामांनाही संगीतात रस होता. तबला वाजवीत असत आणि विशेष म्हणजे सावरकर साहित्य आणि अन्य राष्ट्रीय विषय मांडण्यासाठी ते कीर्तने करीत असत. दोघेही मालाडला राहत, त्यामुळे परिचय होता. मामांच्या घरी अनेकदा गाण्याच्या बैठका होत. मामीही उत्तम पेटी वाजवीत असे. कधी तिचे बंधू पं. रामभाऊ अभ्यंकर तिथे येत, गात असत. बोरकर गुरुजींचीही कधीमधी हजेरी लागे.

अशाच एका भाग्यवेळेला तिथेच माझा बोरकर गुरुजींशी परिचय झाला. मी मामांच्या आख्यानांसाठी आणि मामेभाऊ
डॉ. गिरीश दाबके यांच्या एकांकिका, चित्रकथांसाठी गीतं लिहिली होती. मी लिहितो, कविता, गीतं करतो अशीही माझी ओळख त्यांना करून देण्यात आली. गुरुजींनी तत्काळ पिशवीतून कागदांचं एक भेंडोळं मला दिलं आणि म्हणाले, ''वाचून पाहा. मला कळत नाही याचं काय करू. गीत आहे, पण गेयता नाही. कथा आहे, पण रंजकता नाही. पाहा. वाचून दुरुस्त करता येतं का पाहा.'' हे मला नवीन होते. मी स्वतंत्र लिहिलं होतं, पण दुसऱ्याच्या कवितेत दुरुस्ती कधी केली नव्हती. ते फार रुचतही नव्हतं. मी ते भेंडोळं वाचायला घेतलं. श्रावणबाळाच्या कथेवर आधारित ती गीतमालिका होती. काहीशी बाळबोध, बटबटीत, बोजडही. मी ते बाड मिटून ठेवलं आणि नव्याने लिहायचा विचार केला. तसं बोरकर गुरुजींना कळवलंही. ते अर्थातच आनंदून ''अवश्य करा'' म्हणाले. गतीने ती संगीतिका लिहून झाली. बोरकर गुरुजींना दिली. संगीतिका लिहिण्याचा माझा पहिलाच योग.. प्रयोगही. पुढच्या भेटीत ती आवडल्याचं सांगितलं आणि महापालिका संगीतोत्सवासाठी बसवता येईल असंही म्हणाले.

पुढे मात्र योगच असे आले की आमची दीर्घकाळ भेटच झाली नाही. त्यामुळे मला श्रावणबाळाच्या संगीतिकेचं वृत्त समजलं नाही. त्याची ती रंगयात्रा सुफळ संपूर्ण झाली की खऱ्या श्रावणबाळासारखी तो शराघाताने अकालीच संपली, तेही समजलं नाही. औत्सुक्य तर होतं, पण खूप लांबलचक बोगद्यातून बाहेर आल्यावर भवताल नवंनवखं होऊन जावं, तसं काहीसं होऊन आमचा संवाद होत राहिला, पण वेगळया सांगीतिक विषयांवर.

काही काळ बोरकर गुरुजींनी श्रावणबाळाची कावड मोठया विश्वासाने माझ्या खांद्यावर वाहायला दिली, याचंच समाधान मात्र लोण्यासारखं मनावर तरंगत राहिलं. तेव्हापासून आजवर.

आता तर बोरकर गेलेच.

तुलसीदासांच्या रामायणात आरंभीच श्रावणबाळाची भूमिका संपुष्टात यावी आणि त्या पुढच्या सुरम्य रामकथेतच मन रमून जावं... श्रावणबाळाला विसरून... तसंच काहीसं पं. तुळशीदास बोरकर गुरुजींच्या संवादिनी साथीने रंगलेल्या खूप सुंदर सुरेल मैफली, अभंगवाणी आणि संगीत नाटकांचे खेळ या त्रिवेणीने रंगविलेले काळाचे पट आजही सोबत करीत आहेत, राहावेत, राहतीलही.

पं. तुळशीदास बोरकरांचं मी अखेरचं वादन ऐकलं ते बरोबर एक वर्षापूर्वी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात. चतुरंग आयोजित मुक्त संध्या उपक्रमात. मोठा सुंदर योग होता. बोरकरांना वादनाबरोबरच बोलायचं होतं. त्यांना बोलतं करण्याचं अवघड काम करीत होते प्रख्यात सतारवादक आणि बंदिशकार पं. शंकरराव अभ्यंकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कमलताई अभ्यंकर. कार्यक्रम अर्थातच रंगला. बोरकरांनी गुरुवर्य पी. मधुकरांच्या आठवणी सांगितल्या. स्वत:च्या जडणघडणीविषयी सांगितलं. रंगतदार वादनही केलं.

अपवाद म्हणून ओठांनी आणि जीवनव्रत म्हणून बोटांनी बोलणाऱ्या पद्मश्री पं. तुळशीदास बोरकरांच्या स्मरणमैफलीचा रंग आज रंगभूमीवरच्या धूपासारखा दरवळतो आहे. स्वरांचे पंख लावून...

बोरकर गुरुजींना विनम्र श्रध्दांजली!!

प्रमोद बापट

9821979871