सेवा कार्यांचा प्रभाव

 विवेक मराठी  09-Oct-2018

समस्त महाजन संस्था गेली 16 वर्षे सत्कार्याच्या आधारे विविध समाजकार्ये निरंतर करीत आहे. समाजकार्य करीत असताना आलेले अनुभव, चांगल्या कर्माचे फळ आणि सुसंगतीतून कसा चांगला परिणाम घडतो, याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गिरीशभाई  यांच्याशी विजय मराठे यांनी  साधलेला संवाद.

 माजात केलेल्या चांगल्या कामांचा परिणाम सकारात्मक होतो, याबद्दल आपले काय मत आहे?

अगदी खरे आहे. केलेल्या चांगल्या कामांचा परिणाम नेहमीच सकारात्मक असतो. समस्त महाजन संस्थेच्या 16 वर्षांच्या कार्यकाळात एक हजाराहून अधिक संस्थांना सहकार्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. आमच्या या छोटयाशा प्रयत्नामुळे त्या संस्थांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली, कार्य करण्याची पध्दती मिळाली, आपणही करू शकतो हा आत्मविश्वास मिळाला, स्वतःची ताकद, स्वतःची क्षमता ओळखण्यास मदत मिळाली. आर्थिक साहाय्य हे जरी महत्त्वाचे असले, तरी सकारात्मक दृष्टीकोन दूर पल्ल्याचा विषय आहे.

समाजात चांगल्या कामाचे नेहमीच अनुकरण होत असते, त्या कामांची प्रेरणा काय असली पाहिजे?

तसे पाहिले, तर काम छोटे असो वा मोठे, कामावर श्रध्दा असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि तो त्या त्या माध्यमातून आपले कर्म करीत असतो. एखाद्याला संधी मिळाली तर तो तिचा उपयोग कशा प्रकारे करेल, हे त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीकडून एखादे दुष्कृत्य झाले म्हणून ती व्यक्ती वाईट नसते, तर त्या व्यक्तीची परिस्थिती वाईट असते. म्हणून समाजात चांगल्या कर्माची संख्या अधिक व्हावी, जेणेकरून कुकर्माकडे जाणाऱ्या व्यक्ती आपसूकच सत्कर्माकडे वळतील. प्रत्येक व्यक्तीत ऊर्जा असते, फक्त ती ऊर्जा जागृत करण्याची गरज असते.

समस्त महाजन या संस्थेने कोणकोणती सामाजिक कार्ये केलीआहेत?

समस्त महाजन संस्थेने सत्कर्माच्या भावनेने अनेक प्रकारची सामाजिक कार्ये आतापर्यंत केली आहेत. सर्वप्रथम गोशाळेचे काम हाती घेतले. एक हजाराहून अधिक गोशाळांना आतापर्यंत संस्थेने सहकार्य केलेआहे. पूर्वी जेथे 40 ते 50 हजार गोमाता होत्या, तेथे आता 2 लाखांहून अधिक गोमातांचे आणि अन्य मूक जनावरांचे पालन होत आहे. गोमातांच्या पालनामुळे जैविक साखळीप्रमाणे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांनादेखील चालना मिळाली. तसेच संस्थेचे दुसरे ठोस काम हे शिक्षण क्षेत्रात झालेले आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या अशा एक हजाराहून अधिक गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली. 400 आदिवासी मुलांसाठी संस्थेमार्फत पंचमाला जिल्ह्यात एक वसतिगृह तयार केले. तसेच जेव्हा नैसर्गिक संकट येते, तेव्हा सर्वप्रथम समस्त महाजन संस्था मदतीचा हात घेऊन पुढे येत असते. शिवाय पीडित, निराधार, दुःखी अशा व्यक्तींसाठी उज्जैन येथे एक सेवाधाम सुरू केले आहे. त्यामुळे आज पाचशे निराधार व्यक्तींना समस्त महाजन संस्थेचा भक्कम आधार आहे. या सत्कार्यामुळे अनेक माणसांशी समस्त महाजन संस्था आतापर्यंत जोडली गेली आहे. या जोडलेल्या माणसांमुळे अन्य माणसेसुध्दा संस्थेशी जोडली जाऊन समाजहिताचे सत्कार्य घडत आहे, याचा आनंद आहेच, परंतु हे कार्य याहीपुढे निरंतर चालू राहावे हा संस्थेचा मानस आहे.

समाजकार्याच्या माध्यमातून लोकांशी जोडण्याचा जो आपला प्रयत्न आहे, त्याचा काय परिणाम दिसतो?

समस्त महाजन संस्थेद्वारे आम्ही बऱ्याच ठिकाणी समाजकार्ये केली आहेत. परंतु म्हणतात ना, सुसंगतीचा परिणाम लगेच दिसत नाही, त्यासाठी काही काळ जावा लागतो. समाजकार्यासाठी आम्ही संस्थेमार्फत भारतभर फिरलो. गावातील लोकांनी समाजकार्यात तर सहभाग घेतलाच, त्याचबरोबर दारू, गुटखा इत्यादी व्यसने स्वतःहून सोडण्याचा निर्धार केला. समाजकार्य करताना अनेक जणांशी जिव्हाळयाचे संबंध तयार झाले. आजही त्यांच्या घरच्या शुभकार्याप्रसंगी संस्थेला आग्रहाचे निमंत्रण येत असते.

आपण सत्कार्याच्या आधारावर करत असलेल्या या समाजकार्याची भविष्यात आपण काही मर्यादा ठरविली आहे का?

समाजकार्य करण्याची काही सीमारेषा नाही, आमच्याद्वारे ती निरंतर चालूच राहील. आज जे आम्ही समाजकार्याचे व्रत हाती घेतले आहे, ते आणखी कसे प्रभावी करता येईल हेच आमचे यापुढील लक्ष्य असेल. देश सुदृढ, सक्षम बनविणे ही केवळ सरकारची जबाबदारी आहे असा विचार न करता हा देश आपला आहे, या भावनेने प्रत्येकाने स्वतःहोऊन देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावायला पाहिजे.

आपल्या शेजारील देश भूतानने Gross National Happiness Index साध्य केलाय. असा भारताचा Index नाही, यासाठी दुःखी होण्याचे कारण नाही, तर त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पुढील पाच वर्षांसाठी समस्त महाजन संस्थेचे ध्येय काय आहे?

पुढील पाच वर्षांत भारतातील साडेसहा लाख गावांमध्ये सक्रिय होण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील. महाजन याचाच अर्थ चांगल्या लोकांचा समूह. संपूर्ण देश चांगल्या मार्गावरून चालला, तर थोडयाच कालावधीत देश प्रगतिपथावर आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा आपला भारत देश संपन्न होऊ शकतो. पुढील पाच वर्षांत Gross National Happiness Index साध्य करण्यासाठी संस्था नक्कीच प्रयत्नशील राहील.

अनुवाद - पूनम पवार