नणंदा भावजया दोघी  जणी

 विवेक मराठी  01-Nov-2018

***डॉ. यशस्विनी तुपकरी  ****
****डॉ. मधुश्री सावजी***

नवरात्रीच्या काळात होणाऱ्या भोंडल्यात म्हटले जाणारे एक प्रसिध्द गीत आहे. नणंद-भावजयीच्या नात्यातला आंबटगोडपणा त्या गीतात उतरला आहे. ते गाणे असे -

नणंदा भावजया दोघी जणी

घरात नव्हतं तिसरं कोणी

शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी

आता माझा दादा येईल गं

                        दादाच्या मांडीवर बसेन गं...

                        वहिनीची चहाडी सांगेन गं...

काळ बदलला, तसे बऱ्याच मध्यमवर्गीय घरांतून हे नातेही बदलत गेले. अनेक घरांतून नणंद-भावजयीपेक्षा मैत्रीचे नाते फुलत गेले. पण नणंद आणि भावजय दोघींनी एका छताखाली संसार करणे, तोही थोडीथोडकी नाही तर अडीच तपे ही गोष्ट कविकल्पना वाटावी इतकी अविश्वसनीय. पण हे घडले आहे. सावजी आणि तुपकरी या संभाजीनगरस्थित दोन कुटुंबांमध्ये. एक स्वयंपाकघर सासूबाईंबरोबर सुखाने शेअर करताना अनेकींसाठी सत्त्वपरीक्षा असते. इथे नणंद-भावजय आणि सासूबाई तिघीही गुण्यागोविंदाने स्वयंपाकघरात काम करताहेत. त्याच्यापल्याडही त्या तिघींचे एकमेकींशी घट्ट नाते आहे. एकमेकींना समृध्द करणारे, एकमेकींना सहकार्य करणारे - समजून घेणारे. याचे श्रेय त्या तिघींचेच नाही. ते कुटुंबातल्या सर्वच लहानमोठया सदस्यांचे आहे. या सगळयांमुळे सहजीवनाचे एक आगळेवेगळे उदाहरण समाजासमोर उभे राहिले. या उदाहरणाच्या केंद्रस्थानी आहे ती, नणंद-भावजयीची जोडी. त्या दोघींच्या शब्दांत या आगळया सहजीवनाची धावती कहाणी...

घर नावाचे  सहजीवन केंद्र

मी मूळची कोल्हापूरची. खरे तर कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरची. आई-वडील आणि आम्ही तिघी बहिणी. बारावीपर्यंतचे शिक्षण वारणानगरलाच झाले. त्यानंतर सोलापूर येथील डॉ. वैशंपायन मेमोरिअल मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. आणि एम.डी.पर्यंत शिक्षण झाले. एम.डी.च्या शेवटच्या परीक्षेला सहा महिने बाकी असताना रोहिणी मासिकाच्या मदतीने लग्न ठरले. लग्न ठरण्यामागची काही ठळक (?) कारणे म्हणजे लग्नाचा मुलगा व मुलगी दोघेही डॉक्टर, दोघांचेही वडील कॉलेजमध्ये प्रोफेसर, दोघांचेही वास्तव्य त्यामुळे प्रोफेसर्स क्वार्टर्समध्ये, दोघांच्याही आईचे नाव वैजयंती, दोघांनाही सात काका!

लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत जेव्हा आम्ही दोघे बोललो, तेव्हा या लग्नाळू मुलाचे पहिले वाक्य होते - ''माझे पहिले लग्न झाले आहे (???)!''  मी गारेगार! त्याने हळूच सांगितले - ''संघाशी!'' माझी संघाशी तोंडओळखसुध्दा नव्हती. आमची सर्व नातेवाईक मंडळी पश्चिम महाराष्ट्रात. मराठवाडा फक्त भूगोलापुरताच माहीत. नावालासुध्दा कोणी नातेवाईक इथे नसल्यामुळे मुलाची, घराची माहिती काढायचा मार्गच नव्हता. मी विभक्त कुटुंबात वाढलेली. तब्बल 8 वर्षे मेडिकलच्या शिक्षणाच्या निमित्ताने होस्टेलवर राहिलेली. पण लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहावे याचे सूतोवाचही या पहिल्या भेटीत झाले. पार्श्वभूमी अशा प्रकारे वेगळी असतानाही पुढे जाण्याचा आम्ही घेतलेला निर्णय म्हणजे निव्वळ गध्देपंचविशी असे म्हणण्यापेक्षा ही परमेश्वरी योजना होती असेच मी म्हणेन! 'लग्नाच्या गाठी वर स्वर्गातच बांधलेल्या असतात' याचाच हा पुरावा नाही का?

तुपकरी कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे. नोकरीच्या निमित्ताने यवतमाळला स्थायिक झालेले. घर कट्टर  संघाचे. सासरे स्वत: दहावीत असताना गांधीवधाच्या वेळी सत्याग्रह करून आणि त्यानंतर आणीबाणीच्या काळात मिसाबंदीखाली कारावास अनुभवलेले. घरची परिस्थिती साधारण. तीन मुले. तिघेही गुणवत्तेच्या बळावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झाले. मोठी मुलगी माधुरी आणि तिच्या पाठीवरचा मुलगा अश्विनीकुमार यांच्या वयात जेमतेम एक वर्षाचा फरक. बालवाडीपासून एकाच वर्गात शिकले ते थेट नागपूरला एम.बी.बी.एस. होईपर्यंत! त्यानंतर मनोविकारतज्ज्ञ डॉ. संजीव सावजी यांच्याशी माधुरीचे लग्न झाले. व्यवसायाला योग्य असे ठिकाण म्हणून ते दोघे संभाजीनगरला स्थायिक झाले. माझ्या नवऱ्याचे मेडिकलचे शिक्षण नागपूर, मुंबई येथून पूर्ण झाल्यानंतर परत यवतमाळला स्थायिक होण्याचा विचार जेव्हा सुरू झाला, तेव्हा माधुरी व डॉ. सावजी यांनी ''यवतमाळऐवजी संभाजीनगरला ये आणि इथेच प्रॅक्टिस कर'' असा सल्लावजा आग्रह केला. माझा नवरा 1986 साली संभाजीनगरमध्ये आला. बहिणीचे घर लहान होते, पण मन मोठे होते. घरी ते दोघे, त्यांची मुलगी, बहिणीचे सासू-सासरे, शिकायला आलेला एक भाचा, एक चुलतभाऊ  हे सर्व जण होते. पण त्या भाऊगर्दीत माझा नवराही सामील झाला. 2-3 वर्षे तो तिच्याकडेच राहिला. 1988मध्ये आमचे लग्न ठरले. त्या वेळी त्याने वडिलांच्या मदतीने एक प्लॉट घेतला. या काळात त्यानेच बहिणीला विनंती केली की आपण भाडयाच्या घरात, गर्दीत, आनंदाने एकत्र राहिलो, आता तर आपले स्वत:चे घर झाले आहे. मग आपण सर्वच जण तिकडे स्थलांतरित होऊ. तिने व डॉ. सावजी यांनी या प्रस्तावाचा आनंदाने स्वीकार केला, कारण तोपर्यंत घरातील सर्वांचीच केमिस्ट्री जुळून गेली होती. बहीण आणि भाऊ लग्नानंतरही एकत्र राहण्याचा हा निर्णय मी प्रत्यक्ष घरी येण्यापूर्वीच अशा रितीने घेण्यात आला होता. मीही आनंदाने 'हो'मध्ये 'हो' मिळवला, इतकेच! मी आनंदाने होकार देण्यास दोन-तीन बाबी कारणीभूत होत्या, असे मला वाटते. माझे माहेर संघाचे नव्हते हे खरे असले, तरी 'जोडलेली प्रेमाची माणसे हीच खरी श्रीमंती' हा संस्कार आईने केला होता. लग्न ठरवताना आईने सासरच्या लोकांची जी पारख केली, तीसुध्दा महत्त्वाची होती. लग्न ठरले, तेव्हा ''कुठे दिले मुलीला?'' यावर ''संघाचे घर आहे ना! मग डोळे झाकून द्या!'' ही मिळालेली प्रतिक्रिया.

कालांतराने माझा दीरही बालरोगतज्ज्ञ होऊन या खटल्यात सामावला. 1991मध्ये त्याचे लग्न झाले. निवृत्त होऊन सासू-सासरेही इकडे आले. ते दोघे, दीर-जाऊ, नणंद व तिचे यजमान, तिच्या दोन मुली, तिचे सासू-सासरे असे आमचे दांडगे कुटुंब! (कालांतराने आमच्याही मुलांची भर पडली.)

माझा नवरा हेडगेवार हॉस्पिटलच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. तो स्वतंत्र जनरल प्रॅक्टिस करायचा, पण त्याहीपेक्षा जास्त वेळ हेडगेवार हॉस्पिटलमध्ये असायचा. रात्री 12च्या आधी क्वचितच घरी आला असेल. ''कुठे होतास?'' असे विचारले, तर सांगायचा, ''बैठक होती.'' बैठक म्हणजे काय? मला प्रश्न पडायचा. (रागवायची तर सोय नव्हती, कारण मला सवत आहे, हे आधीच सांगितले होते.) सासरे रोज सकाळी न चुकता शाखेत जायचे. त्यांना मी विचारायचे, ''काका, संघ म्हणजे काय?'' ते हसायचे आणि म्हणायचे, ''अगं, संघाची अशी काही व्याख्या नाही. घरी प्रचारकांचे, स्वयंसेवकांचे येणे-जाणे होईल, तू उत्सवांना येशील, बौध्दिके ऐकशील, हळूहळू तुला संघ समजेल.'' मी माझ्या परीने संघ समजून घेण्याचा प्रयत्न करत होतेच. पण तेवढयात एक मोठे संकट आले. आमच्या घरावर 24 नोव्हेंबर 1992ला सशस्त्र दरोडा पडला. घरात तब्बल 14 माणसे असताना पडलेल्या या दरोडयाने आम्ही सटपटलो. पण या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच सासऱ्यांनी फर्मान काढले की माझ्या नवऱ्याने कारसेवेसाठी जावे. मी पाय ओढेन की काय असे वाटल्यामुळे ते म्हणाले, ''असं करा. नातीला आम्ही सगळे मिळून सांभाळतो. (आमची मोठी मुलगी तेव्हा दोन वर्षांची होती.) तुम्ही दोघंही कारसेवेला जा.'' प्रचंड मानसिक कसरतीनंतर मी या प्रस्तावाला मान्यता दिली. ही संधी मात्र संघ समजून घेण्यासाठी, माझ्यासाठी इष्टापत्ती ठरली. मला त्या 10 दिवसांत संघाचे 'विश्वरूप दर्शन' झाले. मोठमोठया वक्त्यांच्या सभा, चर्चा ऐकायला मिळाल्या. वैचारिकदृष्टया मी खूप समृध्द झाले. त्या काळात एक गंमत अशी झाली, की आमच्या घरी दरोडा पडला, म्हणून माझे आई-वडील आम्हाला भेटायला वारणानगरहून इथे आले, तर आम्ही दोघे अयोध्येमध्ये! (त्या काळी मोबाइल तर नव्हतेच, पण घरीही फोन नव्हता.) असो. घरी प्रचारकांचे, हेडगेवार हॉस्पिटलच्या पाहुण्यांचे सतत येणे-जाणे असायचे. प्रचारकांना मी खूप प्रश्न विचारायची. संघाच्या साहित्याचे वाचन करायची. त्यातच माझी मैत्रीण - डॉ. प्रेमा कुलकर्णी - ही मला राष्ट्र सेविका समितीच्या शाखेत घेऊन गेली. मग तिथेही जाणे वाढले. शहर बौध्दिक प्रमुख म्हणून काही काळ जबाबदारी होती. दुसरी मुलगी जेमेतेम वर्षाची असताना नवऱ्याने संघाचे द्वितीय आणि नंतर लगेचच तृतीय वर्ष केले. दोन्ही मुलींना घेऊन मी व सासूबाई तृतीय वर्षाच्या समारोपासाठी नागपूरला गेलो होतो. तिथे पुन्हा एकदा आसेतुहिमाचल पोहोचलेल्या संघाचे दर्शन झाले. पुढे आदरणीय सुदर्शनजी सरसंघचालक असताना आमच्या घरी झालेला त्यांचा 4 दिवसांचा मुक्काम, त्याच वर्षी मा. उषाताई चाटी यांचा मुक्काम यामुळे माझे क्षितिज विस्तारायला नक्कीच मदत झाली.

 

घरात गोकुळ! आम्हा सर्वांची मिळून एकूण 6 मुले (5 मुली आणि एक मुलगा.) आम्ही सर्व जण डॉक्टर असल्यामुळे नातेवाइकांचे आजारपणामुळे होणारे येणे-जाणे, संघपरिवारामुळे घरी राबता. मुलींना, घराला वेळ देता यावा, म्हणून माझे दीर व नणंदेचे यजमान यांनी मिळून नुकत्याच सुरू केलेल्या 'सावजी तुपकरी हॉस्पिटल'मध्ये 1992मध्ये मीही सामील झाले.

आता महत्त्वाचा मुद्दा आम्ही घर कसे चालवत होतो याविषयी! खरे सांगू का, याचा ताण कधी आलाच नाही. ठळक ठळक खर्च वाटून घेतले. कोणते काम कोणी करायचे यावरही कधी वाद झाला नाही. 'सकाळचा स्वयंपाक तू, संध्याकाळचा मी' अशा प्रकारची कामाची वाटणी गेल्या 29 वर्षांत एकदाही केली नाही. मनाची आणि विचारांची सरमिसळ इतकी सहज झाली होती की घरी नातेवाईक, पाहुणे, ओळखीचे आले, तरी ते कोणाकडे आले आहे, याने पाहुणचारात, आदरातिथ्यात कधीच फरक पडला नाही. आज कोणती भाजी करायची, ऐन वेळी पाहुणे आले तर कसे व्यवस्थापन करायचे यावरूनही कधी मोठी वादावादी झाली नाही. सासूबाई आणि माधुरी (नणंद) यांनी सुरुवातीच्या काळात मला बरेच समजून घेतले. मला सुरुवातीला कामाचा तितकासा उरक नव्हता. राबत्याची सवय नव्हती. पण सासूबाईंनी कधीही आवाज चढवल्याचे, एखादी गोष्ट करण्यासाठी मनाविरुध्द भाग पाडल्याचे मला आठवत नाही. उलट मी हॉस्पिटलमधून दुपारी 3च्या सुमारास जेवायला यायची, तर त्या सर्व पदार्थ गरम करून मला आईच्या मायेने वाढायच्या, वाढतात. त्यांनी आजपर्यंत कधीही मुलगी आणि सून असा फरक केला नाही. आणखी एक विशेष उल्लेख करायला हवा, तो म्हणजे नणंदेच्या सासऱ्यांचा. त्यांनी माधुरी व मी आम्हा दोघींमध्ये कधीही फरक केला नाही. माझे सासरे आणि नणंदेचे सासरे या दोघांनीही मला वडिलांचे प्रेम दिले. जसजसे माझे क्षितिज विस्तारले, माझी सामाजिक घडण होत गेली, मी हळूहळू स्वत:पलीकडे पाहायला शिकले, तसतशा तर छोटया छोटया गोष्टींमधल्या कधीतरी होणाऱ्या कुरबुरीसुध्दा आपोआप कमी झाल्या. या गोष्टी किती क्षुल्लक आहेत, याची जाणीव झाली. मी फिजिशियन म्हणून स्वतंत्र व्यवसाय करत असताना रात्री-अपरात्री सिरियस पेशंट यायचे. मला आहे तसे निघावे लागायचे. मुलींना सोडून जावे लागायचे. केवळ मला समजून घेणारे हे सर्व लोक घरी होते, म्हणून मी हे करू शकले याची मला पूर्ण जाणीव आहे. मुलांना वाढवण्याच्या पध्दतीत मुळात काही फरक होते. उदा., संध्याकाळी मुलांना बागेत न्यायला हवे असे मला वाटायचे, तर मी सर्व मुलींना स्कूटरवरून घेऊन जायची. रात्री झोपताना मुलींना नाइट ड्रेस घालण्याच्या बाबतीत आमचे मतभेद होते, पण आम्ही हे अपेक्षांपुरतेच मर्यादित ठेवले. अट्टाहास कधीच केला नाही. त्यामुळे मुलींनाही घरीच जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. कोणती मुलगी कोणाची यावरही बाहेरील लोकांचा गोंधळ व्हावा, इतकी सरमिसळ होती. माझ्या मोठया मुलीला तर सगळे माधुरीची मुलगीच म्हणायचे.

घरातील या सपोर्ट सिस्टिममुळे घरातील प्रत्येक जणच व्यवसायाव्यतिरिक्त सामाजिक कामात सहभाग देऊ  शकला. यात मानसिक आणि सामाजिक जडणघडणीची फार मोठी भूमिका आहे, असे मला नक्की वाटते.

माझ्यासाठी अशा वेगळया प्रकारचे सहजीवन हा जरी खूप विचारपूर्वक, ठरवून घेतलेला निर्णय नव्हता, तरी आज त्याच्याकडे तटस्थतेने पाहताना त्याचे अनेक पदर माझ्या डोळयासमोर स्वच्छ उलगडले आहेत. मुलांच्या वाढीसाठी अशी विविध नाती फार पोषक आहेत, असे मला वाटते. मी श्रीगुरुजी जन्मशताब्दी वर्षापासून (2006) 'संवाद सेतू प्रतिष्ठान' या स्वयंसेवी संस्थेत काम करते. या संस्थेचे प्रमुख काम किशोरवयीन मुलामुलींबरोबर आहे. गेल्या दहा वर्षांत 13,600 मुलामुलींशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. यातून प्रकर्षाने जाणवले की मुलांना या वयात अनेक प्रश्न पडतात. मुले गोंधळलेली असतात, पण 'बोलू कुणाशी? भावना कोणाजवळ व्यक्त करू? मला कोण समजून घेईल?' या प्रश्नांची उत्तरे त्यांना सध्याच्या व्यग्र, विभक्त कुटुंबात मिळत नाहीत. त्यांची भावनिक घुसमट होते. एकत्र कुटुंब हे घरातील सर्वांचाच 'भावनांक' उत्तम ठेवायला मदत करते, असाच आमचा अनुभव आहे. उन्हाळयाच्या सुट्टीत शाळेला लागणाऱ्या विविध वस्तू - डबा, वॉटरबॅग, डब्याची पिशवी, दप्तरे, युनिफॉर्म यांची होलसेलने होणारी खरेदी तर आमच्याबरोबर सर्व मुले एन्जॉय करायचीच, तसेच रोज सायकलवर शाळेला मिळून जाणे, मग वेळेवर तयार होत नाही, म्हणून एकमेकींसाठी चिडचिड करत का होईना थांबणे, आजीला देवीला नेऊन आणणे यातून मुली सहकार्य, संयम आपोआप शिकत गेल्या. प्रत्येकीला स्वतःच्या मैत्रिणींशिवाय बहिणींच्या मैत्रिणीही मिळाल्या. घरात प्रचारक, नातेवाईक कोणत्याही वेळी हक्काने जेवायला, राहायला येताना त्यांनी पाहिले. घराचे दरवाजे आणि मने सर्वांसाठी 24 तास खुली असतात, हे अनुभवले. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या मित्रमैत्रिणींना अगदी सहज घरी जेवायला घेऊन येताना परवानगीची कधी गरज वाटली नाही. 'सेवांकुर'च्या माध्यमातून घरी वैद्यकीय विद्यार्थ्यांचेही येणे-जाणे असायचे. होस्टेलवर जर मुले आजारी पडली, तर त्यांचा आमच्या घरी मुक्काम असायचा. या सर्व अनुभवांमुळे त्यांच्या नकळत त्यांना स्वत:पलीकडे पाहायची सवय लागली. 'कुटुंब' ही संकल्पना केवळ आई-बाबा-मुले इतकीच मर्यादित नसून 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेचे एक बीज अशा तऱ्हेने लहानपणीच पेरले गेले, हे निश्चित. माझी मोठी मुलगी राधिका सध्या अमेरिकेत आहे. माधुरीची गायत्री लग्न होऊन सोलापूरला आहे. पण कितीही छोटी-मोठी गोष्ट असली, तरी आपापल्या आयांना सांगण्याआधी त्या एकमेकींना सांगतात. चर्चा करतात. बरेच प्रश्न परस्पर सोडवतात. संगीताची उपजतच उत्तम जाण असणारी आणि आवाजाची देणगी लाभलेली माझी लहान लेक कृत्तिका ही अतिशय संवेदनशील आहे आणि घरातील सर्वांच्याच (विशेषत: ज्येष्ठांच्या) गरजा न सांगता ओळखून त्या पूर्ण करण्यास नेहमीच तत्पर असते. तीसुध्दा मोठया बहिणींशी मनातल्या सर्व गोष्टी बोलते. त्यांनी सांगितले तरच तिला पटते. माधुरीची मोठी मुलगी लग्न होऊन आता संभाजीनगरलाच स्थायिक झाली आहे. तिची छोटी दोन मुले ही आमच्या सर्वांच्याच आनंदाचे निधान आहेत. त्यामुळे ताणतणावांचे व्यवस्थापन उत्तम होते. मुले अनुकरणातून शिकतात असे शास्त्र सांगते. दोन-तीन सुखद अनुभव सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. माझी मोठी मुलगी राधिका. ती आठवीत जाईपर्यंतचे तिचे वाढदिवस आम्ही चाकोरीपेक्षा वेगळया पध्दतीने साजरे केले होते. उदा. मेघालय वसतिगृहातील मुलांना घरी बोलावणे, भारतीय समाजसेवा केंद्रात घेऊन जाणे, त्या मुलांसाठी काही वस्तू देणे, इत्यादी. जेव्हा ती नववीत गेली, तेव्हा आम्ही तिला सांगितले, ''आता तू मोठी झाली आहेस. तू सांग तुझा वाढदिवस कसा साजरा करायचा?'' ती म्हणाली, ''बाबा, सध्या थंडी खूप आहे. प्रचारक रात्री-अपरात्री प्रवास करतात. आपण सर्व प्रचारकांना घरी जेवायला बोलवू आणि प्रत्येकाला स्वेटर आणि कानटोपी देऊ.'' तिची ही प्रगल्भ सहसंवेदनशील इच्छा पूर्ण करताना आम्हाला कोण आनंद झाला म्हणून सांगू! राधिका इंजीनिअर होऊन नोकरीला लागली, तेव्हा पहिल्या पगारातून तिने घरातील प्रत्येक जण जे सामाजिक काम करतो, त्या कामाला त्यातील खारीचा वाटा आवर्जून पाठवला. माझी भाची गायत्री नागपूरला आर्किटेक्ट होत असताना मुलाखतीसाठी एका ऑॅफिसमध्ये गेली होती. थोडा वेळ थांबावे लागणार होते. त्या वेळेत तिने परवानगी घेऊन तिथे असलेल्या सर्व चपला एका रांगेत लावल्या. मुलाखतीच्या वेळी पहिला प्रश्न विचारला गेला, ''तू संघाच्या घरातली आहेस का?'' सर्व बहिणींमध्ये मोठी गौरी. तिच्याशी इतर सर्व भावंडे हितगुज करतात. मनातले सर्व बोलतात. तिचे लग्न झाल्यानंतर जो पहिला मोठा सण आला, त्या दिवशी तिने सासू-सासऱ्यांच्या सहमतीने संघाच्या प्रचारकांना घरी जेवायला बोलावले. अशी अनेक उदाहरणे आहेत. 'बी' रुजले आहे, यथावकाश फुले-फळे येतील याची आम्हाला आता खात्री झाली आहे, त्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत.

भावनिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे हातात हात घालूनच येतात. घरातील ज्येष्ठांच्या बाबतीत आम्हाला हे वेळोवेळी जाणवले. माधुरीचे सासरे तर हॉलमध्येच असायचे. नातवंडे, येणारे-जाणारे यांच्याकडे पाहत त्यांचा दिवस आनंदात जायचा. घराला ना कधी कुलूप, ना कधी मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी. त्यामुळे मधल्या पिढीचेही ताणतणाव आपोआप कमी व्हायचे. माझे सासरे आणि माधुरीचे सासरे हे एकाच वेळी आजारी पडले आणि दोघेही हेडगेवार हॉस्पिटलमध्ये भरती होते. भेटायला येणाऱ्या नातेवाइकांचा राबता होता. पण आपआपल्या व्यवसायातून फारशी सुट्टी न घेता आम्ही अशा अनेक घटना हसतखेळत निभावू शकलो. अनेकांना हक्काचे घर, निरपेक्ष प्रेम, ओलावा देऊ  शकलो. अनेक जेवणावळी घालू शकलो. व्यवसायाव्यतिरिक्त सामाजिक काम करू शकलो.

आम्हा नणंदा-भावजयांबद्दल सांगायचे, तर आता आम्ही आमच्या गुणदोषांसहित एकमेकींना छान स्वीकारले आहे, त्यामुळे चांगल्या मैत्रिणी झालो आहोत. केळवणे, डोहाळजेवणे, आहेर, महालक्ष्मी, संक्रांतीची गावभरची हळदीकुंकू हे सर्व आम्ही मिळून करतो. आमच्या सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून आम्ही अनेक ठिकाणी विषय मांडायला वक्ता म्हणून जातो, विविध विषयांवर लेख लिहितो. तयारी करताना एकमेकींचा सल्ला घेतो. माझ्या लेखांचा किंवा भाषणांचा पहिला श्रोता किंवा वाचक माझा नवरा आणि माधुरीच असते. (निंदकाचे घर असावे शेजारी!)

हा प्रवास खूपच सोपा, सहज होता, असे मी म्हणणार नाही. भांडयाला भांडे लागले की आवाज होतोच. सर्वांचे दिसणे जसे भिन्न, तशी सर्वांची विचार करण्याची, जगण्याची, आहार-विहाराची पध्दत भिन्न हे बुध्दीने पटत असले, तरी कृतीत येण्यासाठी काही काळ जावा लागला. या काळात प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक, वेळ काढून, स्व-विकासासाठी काही विशेष प्रशिक्षण घेतले. त्यामुळे आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त झालो. स्वत:वर काम करण्याची संधी मिळाली. मनाचे कंगोरे घासले गेले. सामाजिक कामातील सहभागाने या विकासाला हातभार लावला, गती दिली.  प्रत्येकातले चांगले बघण्याची सवय लागली. सोडून दिले, जुळवून घेतले, तर किती आनंद, समाधान मिळू शकते, हा खरेच अनुभवण्याचा विषय. सर्वच पिढयांचे शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य उत्तम राखण्याचा याहून प्रभावी मार्ग कोणता?

एकत्र कुटुंबपध्दती म्हणजे...

मम सुख.. ममहित यापासून सुरू झालेला आमचा प्रवास क्रमाक्रमाने

ममजन सुख ममजन हित

बहुजन सुख बहुजन हित

सर्वजनसुख सर्वजनहित!

या दिशेने सुरू आहे.

- डॉ. यशस्विनी तुपकरी

(एम.डी. मेडिसिन)

9823020900

[email protected]

परस्परांमध्ये मिसळून गेलेली कुटुंबे

आमच्या घराशेजारी एक मॉल आहे. पोतनीसमावशी एक  दिवस म्हणाल्या, ''चला, तुम्हाला मला एक झाड दाखवायचे आहे.'' रिलायन्स मॉलच्या आवारात त्या सर्वांना घेऊन गेल्या. लांबून पाहिले तर ते पिंपळाचे झाड दिसत होते. जरा निरखून बघितले तर त्यात उंबराचेही पान दिसू लागले. बुंधा एकच, पण पान पिंपळाचेही आणि उंबराचेही. जरा दुसऱ्या बाजूने पाहिले, तर दोन वृक्ष इतक्या बेमालूमपणे एकत्र आले होते की बुंधा एकच आहे असे वाटावे. यशूच्या आईने 'सावजी-तुपकरी झाड' असे त्याचे नामकरण करून टाकले. त्यांना असेच म्हणावयाचे होते की सावजी-तुपकरी कुटुंबीय असेच एकरूप  झाले आहेत. खरेच आहे त्यांचे. सावजी व तुपकरी ही वेगवेगळी कुटुंबे आहेत हेही बऱ्याच वेळा सांगावे लागते. दोन्ही मुळात औरंगाबादचे नाहीत. लग्न झाल्यावर डॉ. सावजी प्रॅक्टिससाठी औरंगाबादला आले. नंतर माझा भाऊ डॉ. अश्विनीकुमार आला. एकटाच असल्याने वेगळे काय राहायचे? एकत्रच राहू, असे म्हणून सावजी कुटुंबात राहू लागला. त्या वेळी माझे पती, डॉ. सावजी, त्यांचे आईवडील, नणंदेचा मुलगा अतुल, माझा एक चुलत भाऊ, माझी छोटी गौरी आणि आशू असे तीन खोल्यांच्या एका घरात राहत होतो. आमचे-तुमचे हा भावच नव्हता. नंतर आशूचे लग्न झाले व त्यांनी मोठे घर बांधायचे ठरले. आतापर्यंत राहिलो तसेच तिथेही एकत्र राहावयास काय हरकत आहे, म्हणून एकत्रच राहायचे ठरले. माझ्या सासऱ्यांनीही विरोध केला नाही. मग येशूची भर पडली. नंतर लहान भाऊ डॉ. जयंत आणि डॉ. ज्योती आले. 1992मध्ये वडील गणित प्राध्यापक म्हणून यवतमाळहून सेवानिवृत्त झाले आणि तेही आईसह आले. व्याप वाढला, पण एकत्र राहणे तसेच सुरू राहिले. एकच स्वयंपाकघर. नंतर हॉस्पिटलही एकत्र मिळूनच झाले. स्वभावभिन्नता सगळीकडे असते, तशी होतीच. वादविवादही होत, पण ते विकोपाला गेले नाहीत यात सर्वांचाच समजूतदारपणा होता. हळूहळू दुसऱ्या पिढीची भर पडली. पाच कन्या आणि एक मुलगा. त्यानंतर लहानपणी हे वेगळे घर आहे असे कधी जाणवलेच नाही. आज सर्व जण वेगवेगळया ठिकणी आहेत, पण भावंडांचे नाते घट्ट आहे. आमच्या विवादाची सावली नाते तोडण्यात कधीही झाली नाही. मला आणि यशूला आता तब्बल 29 वर्षे झालीत एकत्र राहण्यास. अनेकांसाठी हा आश्चर्याचा विषय आहे.

एकत्र राहिलो तरी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. घरच्या जबाबदारीची कधी आडकाठी झाली नाही. घराबाहेसुध्दा त्यामुळेच आम्ही भरपूर काम करू शकलो. मुलींच्या शिक्षणाचा, सांभाळण्याचा, संस्काराचा कधी भर वाटला नाही. आजी-म्हणजे माझी आई घराचा आधारस्तंभ होती. घर हेच तिचे जग होते आणि आहे आणि त्यामुळेच आम्ही निर्धास्त काम करू शकतो. माझ्या आईचे आणि माझ्या सासऱ्यांचेसुध्दा वडील-मुलीचे नाते राहिले. तेही कधी असे म्हणाले नाही की आपण स्वतंत्र राहू. आज सासरे आणि वडील दोघेही नाहीत, पण वानप्रस्थाश्रमात कसे जगावे याचे त्यांनीच आम्हाला शिक्षण दिले आहे. घरात पूर्ण मोकळेपणा आहे. सतत पाहुणे येत असतात. पाहुणा नाही असा एकही दिवस जात नाही. आम्ही घरात नसताना ते अनेक कामेही मोकळेपणाने करतात आणि आनंदाने राहतात. या मुक्तपणामुळे प्रत्येक जण समाजात आपला वेगळा ठसा निर्माण करू शकला. आपआपल्या क्षेत्रात सर्वच आघाडीवर आहेत हे अभिमानाने सांगावसे वाटते. आता थोडे आमच्या नणंद-भावजयीच्या सहजीवनाबद्दल....

यशू आणि मी खरे तर अगदी विरुध्द स्वभावाच्या. यशूला सर्व पदार्थ गुळाचे, ताक बिनमिठाचे, चहा बिनसाखरेचा, भाजी अगदी कमी मसाल्याची आणि कमी तेलाची, तर याउलट आवड पतिराजांची. याचा सुरुवातीला जो ताण यावयाचा, तो आता व्यक्तीला आहे तसे स्वीकारल्याने नाहीसा झाला आहे. यशूला सर्व गोष्टी नीटनेटक्या, स्वच्छ आणि पूर्वनियोजित लागतात, तर मी पसाऱ्यात काम करणारी, अस्वच्छ आणि अनियोजित काम करणारी. पण यशूने मला या बाबतीत सांभाळून घेतले. चिवटपणे माझ्यात अनेक सवयींची रुजवात केली. सुरुवातीच्या काळात तर मी सहज निर्णय घ्यावयाची आणि त्याला सर्व हो म्हणायचे. यशू बोलायची नाही, पण तिला वाईट वाटायचे, हे मला कळायला बरीच वर्षे गेली. आजही बरेच वेळेला होते, पण आम्ही अगदी मोकळेपणाने बोलतो. आमच्या दोघींचा सकाळचा चहा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण 80% वेळेला एकत्र असते, तेव्हा आमचा वाद-संवाद-सुसंवाद यापैकी काहीतरी एक होते. मुलींनी शुभंकरोती म्हटलेच पाहिजे, उत्तम नाटक पाहण्यासाठी तू आग्रह करत नाही, पुरुष मंडळींची कामे उगाचच अंगावर घेतेस (उदा. दिवा बदलणे, नळ बघणे, सिलेंडर बदलणे इ.) मला तू सांगितले नाहीस आज लाडू करणार आहेस, असे आमचे वादाचे विषय असतात, जे आम्ही एकमेकींना पटवून थकलो. संवादाचे विषय हे गावातील घटना, घरातील वस्तूखरेदी, केळवणे, लग्न-आहेर इ. असतात, तर सुसंवादाचे विषय हे मोहनजींचे भाषण, माझे तंत्रज्ञान शिक्षण, माझ्या भाषणासाठीचे मुद्दे, शिवानीदीदी इ. असतात.

माझ्यासारखे भाग्य फार कमी भारतीय मुलींच्या वाटेला येते. मला माहेरी वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि सासरी नवऱ्याने स्वातंत्र्य, सहकार्य आणि आदर दिला. आम्ही सारे - म्हणजे माझे दोन भाऊ, आई-वडील तर एकाच घरातील 25 वर्षे सोबत राहिलेले आणि एकमेकास जीव लावणारे कुटुंब (जे कोणतेही भारतीय कुटुंब असते), त्यात बाहेरून आलेले नंदू-यशू-ज्योती म्हणजे एक जावई आणि दोन सुना यांना या कुटुंबात सामावताना अवघड झाले असणार. आम्ही सर्वांनीच यथाशक्ती प्रयत्न केला व सर्व अडचणींवर मात केली. यात माझ्या वडिलांनी दिलेली घरापेक्षा व्यापक अशी संघदृष्टी, आईचे समर्पण, वहिनींना माहेरकडून मिळालेली सुयोग्य जीवनदृष्टी, माझ्या सासऱ्यांचा आणि कुटुंबीयांचा माझ्यावर असलेला विश्वास या सर्व गोष्टींचे फलित म्हणजे आमचे आजचे गोकुळासारखे एकत्रित सुखाने नांदणारे घर होय.

- डॉ. मधुश्री सावजी

एमबीबीएस

9822029332