मती गुंग करणारी तंत्रज्ञानातील गती

 विवेक मराठी  01-Nov-2018

** इंद्रनील पोळ***

तंत्रज्ञानातली झेप ही फक्त त्याच्यामुळे होणाऱ्या दृश्य बदलांद्वारे जोखता येत नाही. गेली कित्येक शतके तंत्रज्ञानातील बदल हा व्हर्टिकल असायचा. गेल्या काही शतकात तंत्रज्ञान फार वेगाने हॉरिझॉन्टली पसरले आहे. मोबाइल फोन आणि इंटरनेट हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण. जगातली मोठी निरक्षर जनसंख्यासुध्दा तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा भाग बनवून घेतेय आणि हा बदल मानवी इतिहासासाठी फार महत्त्वाचा आहे. येत्या काळात आपण फक्त व्यक्ती म्हणूनच नाही, तर समाज म्हणूनही तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त अवलंबून राहणार आहोत, हे सत्य नाकारता येणार नाही.

आम्ही शेवटचे हस्तलिखित कधी लिहिले होते?

विचित्र प्रश्न आहे ना? मलाही असेच वाटले होते, जेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला होता. पण हा विचार यायच्या मागे एक निश्चित थियरी होती. ती काय होती हे पुढे मांडेनच. पण ह्या विचारावरून निष्कर्ष काढण्यासाठी मी साधारण महिनाभरापूर्वी एक छोटासा प्रयोग केला. माझ्या मित्रमंडळींचे वय साधारण 25 ते 35च्या दरम्यान आहे. 40 ते 50 मित्रांना मी दोन प्रश्न असलेली एक प्रश्नावली ऑनलाइन पाठवली. त्यातला पहिला प्रश्न होता - तुम्ही किमान 100 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द असलेला मजकूर, मग तो कामानिमित्त असेल किंवा हौसेसाठी असेल, गेल्या 6 महिन्यांत लिहिला का? दुसरा प्रश्न होता - किमान 100 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द असलेला मजकूर तुम्ही टाइप न करता हाताने शेवटचा कधी लिहिला होता?

दोन्हीपैकी पहिल्या प्रश्नाला साधारण 90% लोकांनी 'हो' हे उत्तर दिले. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मला अनपेक्षित नसले, तरी काहीसे आश्चर्यचकित करणारे होते. 100% मित्रांनी 'कॉलेजची शेवटची परीक्षा' असे या प्रश्नाचे उत्तर दिले. म्हणजे बघा, शैक्षणिक आयुष्यातून बाहेर आल्यावर व्यावहारिक आयुष्यात माझ्या एकूण एक मित्र-मैत्रिणीला हाताने लिहायची गरज कधीही भासली नाही. ही कथा 25 ते 35 वयोगटातील समूहाची आहे. साधारण 10 वर्षांपूर्वी हा आकडा निश्चितच 100 टक्के नव्हता. 20 ते 25 वर्षांपूर्वी तर मला खात्री आहे की हा एकदा 50%हूनही कमी असेल. अर्थात वयोगटानुसार ही आकडेवारी बदलेल. पण ही येणाऱ्या भविष्याची चाहूल आहे हे नक्की.

हा एवढा खटाटोप कशासाठी? तर एवढेच सांगण्यासाठी की हस्तलिखित किंवा हाताने लिहिणे याचे प्रमाण समाजात झपाटयाने कमी होत चालले आहे. बरे, याचा अर्थ एकूण डॉक्युमेंटेशन कमी होतेय का? तर अजिबातच नाही. उलट जगात एकूणच डॉक्युमेंटेशन - मग ते टंकित असो, चित्रित असो किंवा वाचिक, कित्येक पटींनी वाढलेले आहे. पण ह्या डॉक्युमेंटेशनमध्ये मनुष्याला पिढयान्पिढया शिकवली गेलेली साधने फक्त 50 वर्षांच्या काळात पूर्णपणे बदललेली आहेत.

हस्तलिखित दस्तऐवजीकरणाच्या परंपरेचा इतिहास खरे तर काही हजार वर्षांचा आहे. पण टाइपरायटर, कॉम्प्युटर, इंटरनेट आणि आता सोशल मीडिया आल्याने साधारण 50 ते 60 वर्षांच्या काळात हा संपूर्ण इतिहास नामशेष व्हायला आलेला आहे. पुढच्या दोन ते तीन पिढयांमध्ये हस्तलेखन हे कामाचे उपयोगी साधन न राहता फक्त एक कला म्हणून उरेल असे कितीतरी लोकांचे भाकीत आहे. इतकेच नाही, तर कित्येक तत्त्वज्ञांचे असेही म्हणणे आहे की पुढच्या 20 ते 30 वर्षांत हस्तलेखन शाळेत शिकवण्याची गरजही उरणार नाही. अर्थात माझ्या पिढीतल्या लोकांची मुले, नातवंडे ह्यांना हातात पेन धरून काय करायचे याची पुसटशीही कल्पना नसेल. आणि याचे एकच कारण असेल - तंत्रज्ञानात होणारा वेगवान बदल.

पण या बदलाचा वेग खरेच एवढा आहे का?

एक फार इंटरेस्टिंग वैचारिक प्रयोग आहे. समजा, टाइम मशीनचा शोध लागला आणि ते टाइम मशीन घेऊन माणूस इतिहासात गेला, समजा सन 1750मध्ये. आणि तिथल्या एका माणसाला उचलून 100 वषर्े भविष्यात, म्हणजे 1850मध्ये आणून ठेवले, तर काय होईल? तो माणूस तंत्रज्ञानातले बदल बघून वेडा होईल. 1750मध्ये घोडा किंवा घोडागाडी किंवा समुद्री जहाज हे दळणवळणाचा मुख्य स्रोत होते. स्टीम इंजीनचा शोध साधारण 1760च्या सुमारास लागला आणि पुढची 100 वर्षे वाहतुकीच्या तंत्रज्ञानात झपाटयाने बदल घडला. 1850मधल्या एखाद्याला उचलून 1950मध्ये आणून ठेवले, तर त्यालाही तसाच झटका बसेल. 1950मध्ये रस्त्यांवर कार्स आलेल्या आहेत, घरात (किमान पाश्चात्त्य घरांमध्ये तरी) रेडियो, टेलिव्हिजन यांचा शिरकाव झालेला आहे. एकुणात दृश्य बदल फार मोठा आहे. 1950मधल्या माणसाला 2020मध्ये जर आणून सोडले, तर काय होईल? तंत्रज्ञानामुळे मानवाच्या दृश्य आयुष्यात 1950 ते 2020मध्ये किती मोठा बदल झालेला आहे? तसे बघितले तर फारसा नाही. गाडयांचा वेग वाढला आहे. पण कार आजही रस्त्यांवरूनच धावतात, हवेत उडत नाहीयेत. टीव्हीचा आकार कमी झाला आहे, मोबाइलच्या छोटया स्क्रीनवरही व्हिडिओ दिसतो, पण तरी तो स्क्रीन लागतोच. टोस्टर तसाच आहे, ओव्हन तोच आहे, त्यामुळे 1750चे घर ते 1850चे घर यात जो मोठा बदल होता, 1850चे घर ते 1950चे घर या जो मोठा बदल होता, तो मोठा दृश्य बदल 1950चे घर ते 2020चे घर यात दिसत नाही. आणि म्हणून काही तंत्रज्ञान क्षेत्रातले वैचारिक म्हणताना दिसतात की गेल्या 20-40 वर्षांत जरी आपल्याला वाटत असले, तरी आपण तंत्रज्ञानात फार काही मोठी झेप घेतलेली नाही. पण हा विचार फार एकांगी आहे. याची दोन कारणे आहेत.

तंत्रज्ञानातली झेप ही फक्त त्याच्यामुळे होणाऱ्या दृश्य बदलांद्वारे जोखता येत नाही. ती तशी जोखूही नये. गेल्या 100 वर्षांत एक मोठे परिवर्तन घडून आलेले आहे. गेली कित्येक शतके तंत्रज्ञानातील बदल हा 'व्हर्टिकल' असायचा. तंत्रज्ञान व्हर्टिकली झेप घेत होते. म्हणजे रेडियो जाऊन टीव्ही येत होता, घोडे जाऊन कार्स येत होत्या, पण जगाच्या फक्त दहा, पंधरा, वीस टक्के जनसंख्येसाठी. जगातल्या कोनाकोपऱ्यात तंत्रज्ञान पोहोचायला शतके लागायची. कधीकधी इतका वेळ लागायचा की तोपर्यंत त्या तंत्रज्ञानाचा उपयोग संपून गेला असायचा. गेल्या शतकात तंत्रज्ञान फार वेगाने 'हॉरिझॉन्टली' पसरले आहे. मोबाइल फोन आणि इंटरनेट हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण. जगातल्या कोनाकोपऱ्यातल्या माणसापर्यंत तंत्रज्ञान झपाटयाने पोहोचतेय. जगातली मोठी निरक्षर जनसंख्यासुध्दा तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा भाग बनवून घेतेय. आणि हा बदल मानवी इतिहासासाठी फार महत्त्वाचा आहे. ह्याची दोन उदाहरणे मी तुमच्या समोर मांडतो.

साधारण 1970च्या शेवटी आणि 80च्या सुरुवातीला पाश्चात्त्य जगात कॉम्प्युटर क्रांतीने शिरकाव केला. प्रत्येक ऑफिसमध्ये टाइपरायटर जाऊन कॉम्प्युटर दिसायला लागले होते. 80च्या शेवटी शेवटी ऍपलने मॅकद्वारा, तर मायक्रोसॉफ्टने डॉसद्वारा लोकांच्या घरात शिरकाव केला आणि 1995पर्यंत अमेरिकेसारख्या देशांमध्ये घरटी किमान एक कॉम्प्युटर दिसायचा. भारतात मात्र 95पर्यंत हे प्रमाण एक टक्कासुध्दा नव्हते. मोबाइल आणि इंटरनेट मात्र याच्या तुलनेने भारतात खूप वेगाने पसरले. पाश्चात्त्य देशांमध्ये मोठया प्रमाणात लोकसंख्या कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून आधीच इंटरनेटशी जोडली गेली होती. पण भारतात मात्र लोकसंख्येच्या एका मोठया गटाला मोबाइल फोन हेच इंटरनेट आणि त्याच्याद्वारे जगाशी जोडले जाण्याचे साधन आहे. त्यामुळे मोबाइलच्या बऱ्याच नवीन ऍप्सचा स्वीकृती दर हा भारत, चीन, आफ्रिका येथे कित्येक पाश्चात्त्य देशांपेक्षा जास्त असतो.

दुसरे उदाहरण कॅशलेस पेमेंटबाबतीत. मी जर्मनीत राहतो. इथे कार्ड सिस्टिम सर्वसाधारणपणे दुकानांमध्ये एवढी समाकलित अर्थात इंटिग्रेटेड आहे की अगदी 20 सेंटच्या खरेदीसाठीसुध्दा मी सुपरमार्केटमध्ये कार्डद्वारे पेमेंट करू शकतो. पण भारतात मात्र कार्डचा वापर एवढया मोठया प्रमाणावर व्हायचा नाही. लोकसंख्येच्या मोठया भागाकडे कार्डच नव्हते. त्यामुळे अशा प्रकारच्या पेमेंट सिस्टिमसाठीची पायाभूत सुविधा कधी फारशी उभी राहू शकली नाही. पण वर मांडलेल्या मोबाइल क्रांतीमुळे एकदम आपोआपच एक तंत्रज्ञान आधारित पायाभूत सुविधा उभी राहिली, जिचा वापर करून आज भारतात मोठया प्रमाणात डिजिटल पेमेंट सिस्टिम उभी राहते आहे. 'भीम'सारखी सुविधा ही माझ्या मते जगातल्या सर्वोत्तम डिजिटल पेमेंट सिस्टिम्सपैकी एक आहे.

मानवी समाज हा तंत्रज्ञानाधारित समाज होण्याकडे मार्गक्रमण करू लागला आहे आणि ही मानवी इतिहासातली मोठी घटना आहे. जसा जसा समाज जास्तीत जास्त तंत्रज्ञानाधारित होत जाईल, तसे तसे आपण उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्याच्या जवळ पोहोचू, असे युवल नोआह हरारीसारख्या बऱ्याच विचारवंतांचे म्हणणे आहे.

युवल नोआह हरारी हा आजच्या घडीला सर्वात जास्त चर्चिला जाणारा इतिहासकार, तत्त्वज्ञ आहे. हरारीच्या मते पुढचे दशक हे संपूर्णपणे तंत्रज्ञानाचे दशक असेल. हे मांडताना तो काही अतिशय इंटरेस्टिंग विचार मांडतो. त्याच्या मते संपूर्ण मानवी इतिहासातली निर्णयप्रक्रिया तीन भागांमध्ये विभागली जाऊ शकते. पहिली म्हणजे ऐतिहासिक अधिकारयुक्त निर्णयप्रक्रिया. अर्थात राजेशाही, घराणेशाही, धर्म, धार्मिक संस्था अर्थात चर्च, इस्लाम इत्यादींनी ठरवलेली जीवन पध्दती. पोप काय म्हणतो, धर्मग्रंथ काय म्हणतो, राजा काय म्हणतो यावरून आयुष्यातले निर्णय घ्यायचे. कुठल्या दिवशी काम करायचे, कोणी कुठले काम करायचे, काय खायचे काय नाही खायचे, किती लग्न करायची, कोणाशी करायची हे राजा, धर्मगुरू इत्यादी अधिकारयुक्त व्यक्ती ठरवणार. आणि मग समाजाने हे अधिकार प्रश्न न विचारात मान्य करायचे. मानवी इतिहासातला सर्वात मोठा काळ हा या अधिकारयुक्त निर्णयप्रक्रियेत गेला.

त्यानंतर आली मानवकेंद्रित निर्णयप्रक्रिया. याची सुरुवात झाली ती आधुनिक काळात लोकशाहीद्वारे. कोणी काय करावे, काय करू नये हे मानवी भावनांना केंद्रस्थानी ठेवून ठरवले जायला लागले. कोणी कोणाशी लग्न करावे, कोणी काय काम करावे, काय खावे, काय प्यावे हे निर्णय व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग झाले. व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा आणि त्याद्वारे समाजातील निर्णयप्रक्रियेचा सर्वात भक्कम खांब ठरला. लोकशाही मार्गातदेखील अधिकार दर्शवणारी संस्था असतेच, पण तिचा कल मानवकेंद्रित असतो. आपण ज्या काळात राहतो आहोत, तो हाच मानवकेंद्रित निर्णयप्रक्रियेचा भाग आहे. गेल्या दोन शतकातले जगभरातले मोठे निर्णय घेऊन बघा. त्यातला एकूण एक निर्णय हा अधिकारशाहीतून मानवकेंद्रित प्रक्रियेकडे वळलेला आहे. वर्णवाद, वंशवाद, स्त्रीवाद, सती, समलैंगिकता ही त्याची काही उदाहरणे. हा विचारातला बदल फक्त समाजाच्या निर्णयप्रक्रियेपुरता झालेला नाहीये, तर व्यक्तींचाही विचारप्रक्रियेत हा बदल घडून आलेला आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. 400 वर्षांपूर्वी समजा एक मशीद रस्त्याच्या मधोमध असेल, त्याने जनमानसाला, वाहतुकीला रोजच्या आयुष्यात त्रास होत असेल, आणि त्यामुळे राजाने ती मशीद रस्त्यावरून हटवायला सांगितली तर त्याला धर्ममार्तंडांकडून होणारा विरोध हा 'देव कोपेल' ह्या स्वरूपाचा असायचा. म्हणजेच अधिकारशाहीच्या विरोधात हा निर्णय आहे असा विरोधकांचा सूर असायचा. आज जर मशिदीतली लाउड स्पीकरवरची अझान सरकारने बंद करायची म्हटले किंवा गणपतीतले डीजे बंद करायचे म्हटले, तर विरोधाचा सूर हा 'देव कोपेल' असा नसून 'आमच्या भावना दुखावतील' असा असतो. अर्थात विरोधही कुठेतरी मानवकेंद्रित किंवा भावनाकेंद्रित झालेला आहे. पण हे आजचे आणि कालचे झाले. युवल नोआह हरारी याच्या पुढे जाऊन उद्याच्या जगात निर्णयप्रक्रिया कशावर आधारित असेल ह्यावर भाष्य करतो, आणि ते आहे तंत्रज्ञान. आणखी स्पष्टपणे सांगायचे झाल्यास डेटा आणि अल्गोरिथम्स. माझ्या मते ह्या बदलाचे सूतोवाच एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच झालेले आहे.

समजा, तुम्ही पुण्यात राहता आणि रोज पर्वतीहून फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर कामानिमित्त जाता. तुमचा ठरलेला पेठेतून जाणारा रस्ता आहे. रोजचाच. मग एक दिवस गंमत म्हणून तुम्ही गूगल मॅप्सवर तुमच्या रोजच्या रस्त्याचे दिशानिर्देश बघता. आणि गूगल तुम्हाला सांगतो की पेठेतून आतून न जाता शास्त्री रस्त्याने गेल्यावर तुम्ही 10 मिनिटे लवकर पोहोचाल. तुम्ही गूगलला वेडयात काढता आणि तुमच्या नेहमीच्याच रस्त्याने जाता. पण आज तुम्हाला तुमच्या नेहमीच्या रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त टॅ्रफिक लागतो आणि मनात शंकेची पाल चुकचुकते की बहुधा गूगलचे ऐकले असते तर बरे झाले असते. आणि मग हळूहळू तुम्हाला कळायच्या आधी तुम्ही दिशानिर्देशासाठी गूगलला शरण गेलेले असता. म्हणजे आधी जो निर्णय तुम्ही स्वतःच्या मनाने घ्यायचात, तो आता तुम्ही तंत्रज्ञानाशिवाय तुम्ही घेत नाही. आणि हे फक्त दिशानिर्देशपुरते सीमित नाहीये. तुम्ही अलार्म लावायला आलेक्सावर अवलंबून असता, जेवणाच्या रेसिपीसाठी मोबाइलची मदत घेता, आई-वडिलांशी व्हॉट्स ऍपवरून बोलता, आणि आपल्या भावना फेसबुकवर मोकळया करता.

हे फक्त व्यक्तीपुरते सीमित आहे का? तर तसेही नाही. अमेरिकेत हॉस्पिटल्समध्ये रोगांचे निदान आजकाल डॉक्टर्सच्या क्षमतेवर सोडलेले नसून ते 70 ते 80 टक्के अल्गोरिथम्सच्या अधीन आहे. अल्गोरिथम्स तुमचा डेटा घेतात. तुमची शुगर, ब्लडप्रेशर, ऍलर्जी, तुमची पेशंट हिस्टरी आणि बाकीच्या हजार गोष्टी. आणि हा डेटा ऍनालाइज करून अल्गोरिथम्स डॉक्टर्सपेक्षा अचूक निदान देतात. पार्किन्सन्स आणि अल्झायमर्स यासारख्या आजारांच्या प्रारंभिक खुणा डेटा मॉडेल्स वापरून शोधता येतात आणि म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये डॉक्टर्स अशा आजारांसाठी कॉम्प्युटर्सवर आणि डेटा मॉडेल्सवर जास्तीत जास्त अवलंबून राहू लागले आहेत. वैद्यकीय संशोधकांचे असेही म्हणणे आहे की डेटा मॉडेलिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलेले रोगांचे निदान हे बरेचदा रुग्णांसाठीसुध्दा सोपे असते. Li-Fraumeni syndrome नावाचा एक आनुवंशिक रोग असतो, ज्यात 40 वर्षांच्या खालच्या वयोगटातल्या लोकांना कॅन्सर व्हायची शक्यता सामान्य माणसासाठी असणाऱ्या शक्यतेपेक्षा कैक पटींनी जास्त असते. या सिन्ड्रोमने पीडित असणाऱ्या लोकांना फुल बॉडी MRI स्कॅन नियमितपणे करावा लागतो. MRI स्कॅन करणे हे वयस्कांसाठी तर तणावपूर्ण असतेच आणि बरेचदा लहान मुलांना अशक्यच असते. अशा केसेसमध्ये डेटा मॉडेलिंग वापरून टोरोंटो युनिव्हर्सिटी आणि आणखी काही संस्थांनी MRI स्कॅनचा अगदी कमीत कमी वापर करण्यात यश मिळवलेले आहे.

अल्गोरिथम आणि डेटा आधारित निर्णय हे आज जवळजवळ प्रत्येक मानवी कार्यक्षेत्रात पोहोचलेले आहेत आणि हे येत्या काळात कैक पटींनी वाढणार आहे. याचे एक फार महत्त्वाचे उदाहरण
अलिकडेच BBC आफ्रिकाने सादर केलेले आहे.

2018मध्ये मे-जूनच्या सुमारास टि्वटरवर एक व्हिडिओ अपलोड केला गेला. हा व्हिडिओ प्रेक्षकांना अतिशय अस्वस्थ करणारा होता. व्हिडिओमध्ये आर्मीतले साधारण 10-12 जवान दिसत होते. त्यांच्या एकूण वर्णावरून आणि आजूबाजूच्या पार्श्वभूमीवरून हा व्हिडिओ आफ्रिकेतल्या कुठल्या तरी देशात काढलेला वाटत होता. व्हिडिओ सुरू होतो तेव्हा हे जवान दोन बायकांना आणि दोन पोरांना रस्त्यावरून ओढत घेऊन जातात आणि रांगेत उभे करून दोन्ही महिलांना आणि लहान मुलांना तब्बल 22 वेळा गोळया मारून संपवून टाकतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला ती मुले, त्या बायका सेनेतल्या जवानांसमोर गयावया करताना दिसतात, पण जवान बधत नाहीत, आणि काही सेकंदांमध्ये स्त्रियांना आणि लहान मुलांना बावीस वेळा गोळया घालून त्यांचा खून करतात आणि व्हिडिओ तिथे संपतो. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवरून लक्षात येत होते की हा व्हिडिओ काहीसा शहराबाहेर काढलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच तो व्हायरल झाला. लोकांनी जवानांनी घातलेल्या युनिफर्ॉम्सवरून तर्क केले की हा व्हिडिओ कॅमरून किंवा मालीमधला असावा. पण माली आणि कॅमरून दोन्हीच्या सरकारांनी अधिकृतपणे हे जवान त्यांचे असल्याचे नाकारले आणि याला सरळ फेक न्यूज म्हणून घोषित केले. व्हिडिओ सोडला तर बाह्य जगाकडे या घटनेचा कुठलाही पुरावा नव्हता. आणि ज्या देशांच्या सेनेवर संशय होता ते दोन्हीही देश कुठल्याही प्रकारचे साहाय्य करत नव्हते. साहाय्य करणे तर दूर, दोन्ही संशयितांनी अशी कुठली घटना घडल्याचेच नाकारले होते. त्यामुळे यावर पुढे काही होईल याची शक्यता जवळजवळ शून्यच होती. आणि म्हणूनच UNसकट सगळयांनी काही काळानंतर या घटनेचा पाठपुरावा करणे सोडले.


बीबीसी आफ्रिकाच्या लोकांना मात्र या प्रकरणात शांत बसवत नव्हते. त्यांनी सॉफ्टवेअर इंजीनिअर्सची एक टीम घेतली आणि व्हिडिओची क्लिनिकल तपासणी सुरू केली. सर्वात आधी रडारवर होते ते त्या जवानांचे चेहरे आणि त्यांचे युनिफर्ॉम्स. पण आफ्रिकेत बऱ्याच देशांमध्ये सैन्याचे युनिफर्ॉम्स साधारण सारखेच असतात, त्यामुळे त्यावरून फारसे पुढे जाता येत नव्हते. आणि फेस रेकग्निशन आणि रिव्हर्स इमेज सर्चवरून फारसे काही हाती लागत नव्हते. मग त्यांच्या नजरेत व्हिडिओमध्ये चित्रित केलेली पार्श्वभूमी आली. व्हिडिओमध्ये पूर्णवेळ मागे एक पर्वतरांग दिसत होती. त्यांनी ह्या पर्वतरांगेचा आकार कापून गूगल अर्थ या गूगलच्या सॅटेलाइट इमेज सॉफ्टवेअरच्या साहाय्याने आफ्रिकेतल्या एकूण एक पर्वतरांगांवर मॉडेल करून बघितला. डेटा मॉडेलिंगवरून त्यांना कॅमरून-नायजेरियाच्या सीमेवर या पर्वतरांगेचे अचूक match सापडले. गूगल अर्थवर सापडलेली लोकेशन 'झालावेत' नावाच्या गावाच्या जवळ होती. हा सगळा भाग बोको हराम या दहशतवादी हल्लेखोरांकडून कॅमेरूनच्या सेनेने काही काळापूर्वीच हस्तगत केला होता. एकदा का साधारण स्थाननिश्चिती झाल्यावर बीबीसीच्या टीमने व्हिडिओमधली झाडे, काही घरे इत्यादींनी सॅटेलाइट इमेजचा वापर करत घटनेचे अगदी अचूक अक्षांश-रेशांश शोधून काढले. आता प्रश्न होता की हे कधी घडले? परत व्हिडिओमधल्या लोकेशन्सचा वापर करण्यात आला. व्हिडिओमध्ये एक बिल्डिंग दिसत होती. ह्या बिल्डिंगचा निर्माणकाळ सॅटेलाइट चित्रांद्वारे शोधल्यावर लक्षात आले की नोव्हेंबर 2014नंतर या बिल्डिंगच्या आजूबाजूला भिंत उभी केलेली आहे, जी व्हिडिओमध्ये पूर्ण बनलेली दिसते आहे. म्हणजेच व्हिडिओ नोव्हेंबर 2014नंतर काढलेला आहे. सॅटेलाइट इमेजेसमध्ये हेही लक्षात येत होते की 2016 फेब्रुवारीत बोको हरामच्या हल्ल्यात ही बिल्डिंग नष्ट झालेली आहे. म्हणजेच हा व्हिडिओ 2016 फेब्रुवारीच्या आधीचा आहे. व्हिडिओत वातावरण गरम आणि शुष्क दिसत होते, म्हणजेच आफ्रिकेतला जानेवारी ते एप्रिलमधला काळ. नोव्हेंबर 2014 ते फेब्रुवारी 2016च्या मधला काळ, जो गरम आणि शुष्क असेल. म्हणजेच जानेवारी ते एप्रिल 2015चा काळ असावा ह्याचीही खात्री पटली.

पण बीबीसीची टीम नुसती तेवढयावरच थांबली नाही, तर त्यांनी व्हिडिओमध्ये सैनिकांच्या पडणाऱ्या सावलीवरून सूर्याची नेमकी स्थिती काढली आणि त्यावरून या घटनेचा काळ 20 मार्च ते 5 एप्रिल 2015मध्ये बंदिस्त केला. जागा कळली होती, काळ कळला होता. कॅमरून आर्मीनेच हे केले आहे याचे पुरावे होते, पण कॅमेरून आर्मीमधले कोण हे अजून हाती लागत नव्हते. पण ते शोधायला परत सॉफ्टवेअर इंजीनिअर्सची टीम आणि डेटा मॉडेलिंग, इमेज प्रोसेसिंग अल्गोरिथम्स कामी आल्या. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बंदुका कॅमरून आर्मीच्या एकाच प्लॅटूनकडे आहेत. त्यामुळे हे जवान त्याच प्लॅटूनमधले असतील हे निश्चित झाले.

आत्तापर्यंत कॅमेरूनच्या सरकारचे धाबे दणाणले होते. त्यांना असे वाटलेच नव्हते की एखादी वृत्तसंस्था तंत्रज्ञानाचा वापर करून इतक्या अचूकपणे अशा निर्दयी घटनेचे स्थळ-काळ-वेळ शोधून काढेल. अगदी महिन्याभरापूर्वी या व्हिडिओला फेक न्यूज म्हणणाऱ्या कॅमरून सरकारने ऑगस्टच्या सुरुवातीला एक दिवस त्या प्लॅटूनमधल्या सहा सैनिकांना गुपचुप बडतर्फ केले आणि घटनेचा तपास करायला एक समिती नेमली.

आजपासून 5 ते 10 वर्षांपूर्वी ह्या अशा गोष्टीची कल्पना करणेसुध्दा अशक्य होते. एखादी सिव्हिलियन संस्था, जिचे मुख्य काम तपास करणे नसून वृत्तांकन करणे आहे, ती संस्था तंत्रज्ञानाचा वापर करून एवढया अचूकपणे एखाद्या अशा मोठया व्यवस्थेने केलेल्या हिंसात्मक घटनेत काही प्रमाणात का होईना न्याय मिळवून देण्यात मदत करू शकली, हे येणाऱ्या काळाचे द्योतक आहे.

येत्या काळात आपण फक्त व्यक्ती म्हणूनच नाही, तर समाज म्हणूनही तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त अवलंबून राहणार आहोत. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या निर्णयप्रक्रिया तंत्रज्ञानाधीन होणार आहेत. आपले धर्म, आपल्या संस्कृती, आपले विचार, आपल्या कला या संपूर्णपणे तंत्रज्ञानाला शरण जाणार आहेत. हे अवलंबित्व चांगले का वाईट हा प्रश्नच नाहीये आणि नसेलही. प्रश्न असेल तो एवढाच की या बदलाचा वेग नेमका किती असेल आणि मानवी संस्कृती या वेगाची बरोबरी करू शकेल अथवा नाही.

(लेखक जर्मनीत वास्तव्यास असून नव-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करतात.)

 [email protected]