पराक्रमाला माथ्यावरचे अथांग नभ अपुरे...

 विवेक मराठी  01-Nov-2018

'उत्तिष्ठत जाग्रत बंधुनो, उत्तिष्ठत जाग्रत....'

या ओळींनी संपूर्ण वातावरणात एक चैतन्य पसरले.....ती ऊर्जा मनात भरून घेऊन आम्ही संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. दुसऱ्या दिवशी 12 जानेवारी! स्वामीजींना अभिवादन म्हणून प्रत्येकी एक हजार सूर्यनमस्कार घातले. मा. एकनाथजी रानडे यांच्या समाधीच्या ठिकाणी हजारावा सूर्यनमस्कार घातला, तेव्हा 'ओम राष्ट्राय नम:' या मंत्रोच्चाराने खऱ्या अर्थाने आमच्या पराक्रम यज्ञाची सांगता झाली असे वाटून गेले.... पराक्रमाचे संकल्प करायचे असतात, असे संकल्प अनेकांना सोबत घेऊन पूर्ण करता येतात आणि केलेला पराक्रम अर्पणही करायचा असतो अशी शिकवण आम्हाला या सहलीने निश्चितच दिली. अजून बरेच अंतर जायचे आहे याचे भान आम्हा युवकांना या सहलीने दिले. हे अंतर पार करण्यासाठी आता 'पराक्रमाची भव्य कृती राष्ट्रार्थ स्फुरावी' ही प्रार्थना!

ज्ञान प्रबोधिनीच्या पंचकोशाधारित गुरुकुल प्रकल्पाला दोन दशके पूर्ण झाली. मनुष्याच्या दिसण्याबरोबरच 'असण्याचे' महत्त्व अधिक आहे, म्हणूनच त्याच्या जडणघडणीची जबाबदारी शिक्षणाची आहे असे आम्ही मानतो. एखाद्या व्यक्तीची घडण व्हायची म्हणजे ते व्यक्तिमत्त्व आतून घडायला हवे आणि त्यासाठी दैनंदिन आचरण योग्य असायला हवे, म्हणूनच योग्य प्रकारच्या दिनचर्येचा आग्रह गुरुकुलात आवर्जून धरला आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहावे, विविध प्रकारची कौशल्ये मुलांनी आत्मसात करावीत आणि स्वत:च्या कुटुंबापासून ते परिसरातील अनेक व्यक्ती, वस्तू, वास्तू अशा सर्वांबद्दल मनात आपुलकी-जिव्हाळयाचे नाते तयार व्हावे, बुध्दीच्या अनेकविध पैलूंचा विकास होत योग्य आणि अयोग्य यातला विवेक त्याला करता यावा अशी अपेक्षा आहे. अर्थातच मनुष्यत्व म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या या पैलूंना आणखी एक महत्त्वाचा आयाम आहे, तो म्हणजे स्वत:चे अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे अशा समस्त सृष्टीबद्दल मनात कृतज्ञता असणे आणि त्या कृतज्ञतेच्या भावनेतून जीवसेवेची प्रेरणा निर्माण होणे. व्यक्तिमत्त्वाच्या या पाच पैलूंना अनुक्रमे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश व आनंदमय कोश असे म्हटले जाते. पंचकोशांच्या विकसनाची ही कल्पना व्यवहारात यशस्वीपणे मांडून दाखविली ती प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते वाचस्पती वा.ना. अभ्यंकर यांनी.

द्विदशकपूर्तीचा आनंद गुरुकुलातल्या आम्हा सर्वांनाच होता. हा आनंद साजरा कसा करायचा, याच्या अनेकानेक कल्पना आम्ही मांडून पाहिल्या. विविध मेळाव्यांचे आणि संमेलनांचे आयोजन करावे असेही मनात येऊन गेले. आमच्या सर्वांच्या चर्चेतून वीस वर्षांतील आपली ताकद आपणच तपासून पाहू या आणि काहीतरी पराक्रम करून हा आनंद साजरा करू या असे ठरले. आजवर आमच्या आवाक्यातले अनेक पराक्रम केलेले होते. लाखो रुपयांचा विक्री उपक्रम किंवा 330-350 कि.मी.ची दुचाकी (सायकल) सहल! सहजच मनात येऊन गेले - जाऊ या का सायकलवर.... कन्याकुमारीला! 'जाऊ या काय, जाऊच या.' आमच्यातल्या एकाला नुसत्या कल्पनेने स्फुरण चढले! झालेच तर मग... गूगलने पटकन आमच्यासमोर नेमके अंतर टाकले - 1800 कि.मी.!

जानेवारी 2016मध्ये चालेल्या आमच्या 'गप्पा' हळूहळू 'चर्चा' होऊ लागल्या. अशी सायकल सहल कोणी कोणी केलीये असा एकीकडे शोध सुरू झाला. भौगोलिक अंतर आणि आव्हाने गूगल सांगू लागला. थोडयाच कालावधीत प्रतिव्यक्ती खर्च किती येईल याचाही अंदाज येऊ लागला. ज्या ज्या लोकांना आमची ही 'साजरे करण्याची आयडिया' सांगत होतो, त्यातले बरेच लोक 'कशाला नसते उद्योग' असा सल्ला देत, पण काही मंडळी भरभरून पाठिंबा जाहीर करत. मी, श्रीराम आणि अवधूत अशी आमची छोटीशी टीम एकदा याच विषयावर चहाच्या अड्डयावर 'चर्चा' करत होतो. त्या चर्चेचे सार असे झाले की आपण एखादी 'पायलट टूर' करायला हवी. अवधूतला भारी उत्साह असल्याने 'सायकलवर पायलट टूर' त्याने जाहीर केली. पण माझा आणि श्रीरामचा उत्साह आणि प्रॅक्टिकल ऍप्रोच अशामुळे दुचाकीवरून स्वयंचलित दुचाकी आणि शेवटी 'चार चाकी'वर निर्णय येऊन थांबला.

 

एकीकडे मुलांना बातमी लागली की पुढच्या वर्षी कन्याकुमारीला सायकल सहल ठरतेय. मुलांच्या उत्साहाने आमच्या निर्णयाला खरी बळकटी मिळाली. अनेक 'लिंबूटिंबू' मंडळींनी सायकल शिकण्याचा संकल्प केला, तर सायकलपटूंनी सरावाचा संकल्प केला. आम्हीही उत्साहाने व्यायामतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ मंडळींचे सल्ले काळजीपूर्वक ऐकू लागलो. प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रशांत दिवेकर यांना आमची ही कल्पना आवडली. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सुचविली, ती म्हणजे ही सहल पराक्रमाची आणि मातृभूमी परिचयाची व्हायची असेल तर आयोजकांचा 'पूर्व अभ्यास' असला पाहिजे. सरांना विनंती केली, ''तुम्हीच आमचा अभ्यास करून घ्या.'' सरांनी नुसते मान्यच केले नाही, तर प्रत्यक्ष पूर्वतयारी सहलीला आमच्यासह 7 दिवस यायचेही मान्य केले.

मे महिन्यात निगडी ते कन्याकुमारी असा आमचा 'पूर्वतयारी' दौरा ठरला. प्रत्यक्ष सहलीतले मुक्काम, भोजन, न्याहारी आणि दुपारची विश्रांती अशा मूलभूत व्यवस्था शोधत आणि ठरवत आमचा हा प्रवास सुरू झाला. आपल्या देशात अतिथी म्हणजे आधी न सांगता, अचानक आलेल्याला देव मानून त्याचे स्वागत होणे हे परंपरेला साजेसेच आहे. कर्नाटकातल्या एका गावातल्या वाल्मिकी मठात सायकलस्वारांची काय व्यवस्था होऊ शकेल हे पाहायला गेलो होतो. रामराणा जन्मला ती टळटळीत दुपारची वेळ होती. डोक्यावर कडकडीत ऊन आणि पोटात कडकडीत भूक होती. चौकशी करून पटकन बाहेर पडू या असा विचार करून आत शिरलो. पण भाषेची इतकी अडचण होती की खाणाखुणा करून त्या माणसाला 'आम्ही कोण, कसली चौकशी करतोय' हे समजावून सांगणे अत्यंत कठीण काम होते. थोडया वेळाने तिथे आलेल्या आणि हिंदी समजू शकणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीने तिथल्या व्यवस्थापकाला आम्ही काय चौकशी करतोय ते सांगितले. मठाधिपती महाराजांचा क्रमांक घेऊन आम्ही निघालो. आमच्या मागे प्रवेशद्वाराजवळ येत त्या कानडी व्यवस्थापकाने जवळजवळ ओढूनच आम्हाला पुन्हा आत नेले. टेबल-खुर्चीची झटपट व्यवस्था केली आणि गरम गरम सांबार-भात वाढला. आम्ही सगळेच तुडुंब जेवलो. अचानक झालेले आमचे असे स्वागत आणि आम्हा सर्वांना मिळालेला हा 'प्रसाद' एका वेगळयाच तृप्तीचा आनंद देऊन गेला. कन्याकुमारीत विवेकानंद केंद्राच्या सर्वच मान्यवर आणि आदरणीय कार्यकर्त्यांनी आमच्या योजनेला भरभरून दिलेला पाठिंबा आणि शुभेच्छा हा आमच्या पूर्वतयारी दौऱ्यातला असाच समाधानाचा अनुभव होता.

पूर्वतयारीतले असे भाग्याचे आणि समाधानाचे अनुभव घेतल्यानंतर आम्हाला सायकल सहलीचा आत्मविश्वास मिळाला. जोरदार तयारी करण्याची ऊर्जा आणि अनेक योजना मिळाल्या. परत येताना बंदिपूरच्या जंगलातून, घनघोर अंधारातून आणि जोरदार पाऊस-वाऱ्यातून प्रवास करताना 'पायलट टूर टीम'मध्ये प्रचंड उत्साह आणि प्रेरणा असल्याचा अनुभव आम्ही सगळेच घेत होतो. आता प्रत्यक्ष तयारीला सुरुवात झाल्याची जाणीवच प्रचंड आनंद देऊन गेली.

पुण्यात आल्यावर सहल जाहीर झाली. मुलांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पसरले. ही सहल केवळ 'गेलो आणि आलो'च्या पलीकडे व्हावी, म्हणून प्रशांत दिवेकर यांनी सुचविलेल्या 'नकाशे, मंदिरे आणि इतिहासाच्या कार्यशाळा' झाल्या. प्रवासात इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या राणी चेन्नमा, चित्रदुर्ग आणि अनेक मंदिरे आम्ही पाहणार होतो. महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू असा तीन राज्यांतून प्रवास होणार होता, त्या प्रवासात दिसणारा भूगोल अनुभवायचा होता. यासाठी या कार्यशाळांचा खूपच उपयोग झाला. मुलांनी सायकल दुरुस्तीच्या दुकानात तीन तीन तास काम करण्याची कल्पनाही प्रभावी ठरली. या निमित्ताने मुलांचे इतिहास-भूगोलाचे विशेष शिक्षण झाले हे खरे! सायकल दुरुस्त करताना हात काळे करून घेऊन शिकण्यातला आनंद तर मिळालाच, तसेच 'बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त केल्याचे वेगळे समाधान असते' याचे शिक्षणही नकळत झाले.

आमच्या सहलीतले सगळयात मोठे आवाहन होते मुलांची शारीरिक तयारी आणि पालकांची मानसिक तयारी! रोज किती किलोमीटर अंतर जायचे यावर खूप खल झाला. जास्तीत जास्त 70 ते 80 कि.मी. जावे असा एक मतप्रवाह होता, तर दुसरा दररोज 100 कि.मी. जावेच असा होता. आधीच्या सहलींचा अनुभव आणि काही क्रीडा मार्गदर्शकांशी चर्चा झाल्यावर 100 कि.मी. हरकत नाही, पण सलग 16 दिवस रोज 100 कि.मी. असे सातवी ते नववीच्या मुलामुलींनी अंतर कापणे आव्हानात्मक होते. त्यासाठी मुलामुलींची विशेष तयारी करून घ्यावी लागणार होती. केवळ व्यायामच नाही, तर आहार आणि विश्रांती याबाबतही 'किमान 3 महिन्यांचे वेळापत्रक' पाळणे बंधनकारक होते. दररोज नेहमीच्या व्यायामाबरोबरच नव्या व्यायामाचे वेळापत्रक व्यवस्थित बसले. पण एक दिवसाआड तीस कि.मी. सायकलिंग करणे गरजेचे होते. म्हणजे एक दिवसाआड किमान अडीच ते तीन तास द्यावे लागणार होते. काही पालकांना हा वेळ 'वाया' घालविणार असे वाटत होते. पालकांनाच काय, आमच्या काही अध्यापकांनाही वेळेचे कसे करणार हा गंभीर प्रश्न पडला! वेळेबरोबरच पौष्टिक आहार घरी करून द्यायला आयांना थोडे अधिक काम करावे लागणार, हेही आलेच!

पूर्वतयारीचे तीन महिने या विषयावर पालक आणि अध्यापक यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. या तीन महिन्यांत आपली मुले शरीराने बळकट होतील, मनाने प्रसन्न होतील आणि या निमित्ताने स्वत:चे शरीर बळकट करण्याचा आत्मविश्वास मिळवतील हेसुध्दा महत्त्वाचे शिक्षण आहे, हे या बैठकांमधून सर्वांपर्यंत पोहोचविले. काही जणांशी पुन्हा व्यक्तिगत चर्चाही करावी लागली. पण या संवादामुळे पालक आणि शिक्षक अशा सर्वांचाच खूप मोठा आधार मिळाला. दहावी बोर्डाच्या परीक्षेला अन्य शाळांतले पालक जसे स्वत:च दहावीत असल्यासारखे भासू लागतात, तसे आमचे काही पालक इतके छान समरसून आमच्यात सामील झाले की बहुधा आता हेसुध्दा सहज 1800 कि.मी. सायकल चालवतील असे वाटू लागले!

 

पूर्वतयारीच्या शेवटच्या तीन महिन्यांत जोर धरला तो शारीरिक आणि मानसिक तयारीने. मुलांची शारीरिक तयारी करण्याची जबाबदारी अनुरागदादा, सायलीताई यांनी खूपच यशस्वीपणे हाताळली. आहारतज्ज्ञ म्हणतील तशा मुलांच्या प्रत्यक्ष प्रवासातील 'डाएट'ची काळजी सायलीताई आणि गायत्रीताई यांनी घेतली. आमचे पालक माधवराव मुसळे आणि वैद्य स्वातीताई मुसळे यांनी मुलांची वैद्यकीय काळजी घेण्याची जबाबदारी घेतली. अनेक स्नेही मंडळींनी मुलांसाठी पौष्टिक खाऊ देऊ केला. कोणी प्रथमोपचार साहित्य दिले, तर कोणी 'आमचा काका आहे बरे का तिकडे तामिळनाडूत, काहीही लागले तर हक्काने सांगा' असा प्रेमळ आधारही दिला. हळूहळू 'आमची' सहल 'अनेकांची' होत चालल्याचा अनुभव आम्ही घेत होतो.

भल्या पहाटे शाळेतल्या मातृभूमीच्या चित्रप्रतिमेला आणि  स्वामी विवेकानंदांच्या पुतळयाला पुष्पसमर्पण केले आणि 'गणपती बाप्पा मोरया'चा घोष करीत सबंध गट निघाला. सहलीच्या पहिल्याच दिवशीचे निगडी ते साताऱ्यापर्यंतचे आव्हान होते - 135 कि.मी.चे अंतर, कात्रज आणि खंबाटकी असे दोन घाट आणि 'आपण खरेच शालेय मुलांना घेऊन कन्याकुमारीला सायकलवर निघालोय' याचा आनंद, हुरहुर आणि एक अनामिक भीती! 'मनातल्या शंका' या विषयावर तर स्वतंत्र लेख होईल बहुधा! 'हाय वे' वरून जाताना प्रत्येक मुलगा-मुलगी ठरल्या गटात जातील ना? काही गडबड होणार नाही ना? अतिशय वेगात जाणारे एखादे वाहन त्याचा रस्ता सोडून जाणार नाही ना? म्हणजे समजा आम्ही रस्त्यावरची शिस्त पाळली, पण समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनाने नाही पाळली, तर? या शंकांचे काय करावे कळत नव्हते. मनातल्या या शंकांना चेहऱ्यावर अजिबात जागा मिळू द्यायची नव्हती. सगळे कसे छान चाललेय, मला कसे भारीच वाटतेय असा भाव टिकवीत, त्या त्या वेळच्या व्यवस्थापकीय अडचणी सोडवीत प्रसन्न दिसण्याची ही अजब कसरत सगळयाच ताई-दादांना - जबाबदार असणाऱ्या प्रत्येकालाच शेवटच्या दिवसापर्यंत करायची होती.

मुलांनी हे अंतर लीलया पार केले. कोल्हापूर-बेळगावही पार झाले. ठिकठिकाणी मुलांचे स्वागत होत होते, कौतुक होत होते. पत्रकार मुलांचे 'बाइट्स' घेत होते. दोन-तीन दिवसांतच आमची मुले विविध लोकांना 'बाइट' देण्यात पटाईत झाली होती. या सगळयात एक अत्यंत विलोभनीय दृश्य आम्हाला रोज पाहायला मिळत असे. रोज रात्री सगळी मुले एकमेकांचे पाय-पाठ तेलाने मालिश करीत बसायची. 20-25 मिनिटे मालिश, मग आडवे पडून गप्पा आणि सकाळी 5 वाजताच्या शिट्टीला सगळेच्या सगळे पुन्हा 'चार्ज' होऊन कामाला तयार! मुलांमधला हा उत्साह व्यवस्थापनातल्या अनेक अडचणींना छोटे करून टाकत होता.

आता कर्नाटक आणि नंतर तामिळनाडू असा 'भाषा' अडचण होईल असे आम्हाला वाटणारा प्रांत सुरू होणार होता. हरवलात तर काय करायचे, मागे राहिलात तर काय करायचे वगैरे 'काळजी'च्या सूचना मुलांना दिल्या जात होत्या. 'आता भाषा कळणार नाही, नीट राहा, लोकांशी जपून बोला' असे काहीकाही आम्ही सांगत होतो. हुबळीत सकाळी नगराध्यक्षांनी स्वागत केले. संध्याकाळी मुले गप्पा मारत बसली होती, तेवढयात शेजारच्या घरातून एक आजीबाई हातात विस्तव ठेवलेले वाडगे घेऊन आल्या. त्या आजीबाईंना मराठी तर नाहीच, हिंदीही येत नव्हते. मुलांना समोर बसवून आजीबाईंनी सगळयांची दृष्ट काढली आणि पुढच्या सुखरूप प्रवासासाठी देवाकडे साकडे घातले. आपल्या देशात भाषा ही अडचण ठरत नसते, हा मोठा धडा आम्हा सगळयांनाच मिळाला.

एव्हाना मुले खाणाखुणा करत 'बाइट' द्यायला शिकली होती. कोणीही पहिला प्रश्न कानडी अथवा तामिळमध्ये विचारला, तर मुले म्हणायची, 'पुणे.... पुणे टू कन्याकुमारी'. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असायचे '25 डिसेंबर टू 10 जानेवारी'. तिसऱ्या प्रश्नाला 'फिफ्टी स्टुडंट्स' हे उत्तर असायचे. एका गाडीवाल्याने मागून येत आमच्याबरोबर असलेल्या टेंपोतल्या मुलांचा चालत्या गाडीतच 'बाइट' घेतला आणि चालत्या गाडीतच रजनीकांत स्टाइलने खिशात हात घालून येतील तेवढया नोटा टेंपोत भिरकावल्या आणि निघूनही गेला! अशी माणसे अनुभवत, रस्ते अनुभवत, इडली आणि रोस्ट डोश्याच्या चवी चाखत, कॉफीचा आस्वाद घेत सहलीने बरेच अंतर पार केले.

बंगळुरूच्या पुढे काही अंतर गेल्यावर तामिळनाडू सुरू होते. अतिशय प्रशस्त रस्ते आणि वेगाने जाणारी वाहने ही या भागातील वैशिष्टये. शहरी अथवा निमशहरी भाग लागला की साधारण सगळीकडे असते तशीच गर्दी आणि गडबडीचे वातावरण. चेन्नईकडे जाणारा आणि कन्याकुमारीकडे जाणारा असा रस्त्याला जिथे फाटा फुटतो, तेथे अशीच वर्दळ होती. फाटा वळून काही अंतर गेल्यावर काळजी म्हणून मुले मोजली... एक मुलगा - वेद खोले, इ. 7वी गायब! पायाखालची जमीन सरकली. त्याच्या गटातल्या मुलांना विचारले. ''अरे दादा, तो होता आमच्याबरोबर, कुठे गेला काय माहीत!'' दुचाकीवर एक दादा फाटयापर्यंत जाऊन आला. थोडे अंतर चेन्नईच्या रस्त्यावरही जाऊन आला. कोठेच पत्ता नाही... पत्ता नाही म्हणजे आम्ही आत्ता कुठे उभे आहोत हे जिथे आम्हालाच समजत नव्हते (एवढेच कळत होते की कन्याकुमारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहोत) तिथे हरवलेला कुठे असेल आणि तो कुठे येईल हेच समजत नव्हते. ताई-दादा एकत्र आले. जोरदार चर्चा झाल्या. पोलिसात जायचे ठरवत होतो.

....तेवढयात ''दादा, वेद येतोय...'' मुलांनी एकच गलका केला. दूरवरून येणारा वेद सायकल आणि टी शर्टमुळे ओळखू आला. त्याच्यासोबत खास तामिळी रंग आणि ढंग असलेला तामिळी युवक दुचाकीवर होता. त्या युवकाने आम्हाला शुध्द तामिळी भाषेत घडलेली हकीकत सांगितली. आम्हाला त्या घटनेचे सार समजले. चुकून चेन्नईच्या दिशेला गेलेल्या वेदने या दादाकडे मदत मागितली होती आणि या दादाने 'शोर्ट कट' म्हणून थोडे आतल्या रस्त्याने त्याला आमच्यापर्यंत पोहोचविले होते. तामिळी दादाला वेदने अस्सल मराठीत 'धन्यवाद' दिले. त्यालाही ते समजले. वाट चुकलेल्या वेदला 'विठ्ठल' भेटला म्हणून निभावले, अन्यथा 'जवळचा आतला रस्ता दाखवतो' म्हणत त्याने भलतीकडे नेले असते, तर केवढा अनर्थ झाला असता. चांगल्या हेतूने काम करणाऱ्यांना असा 'विठ्ठल' भेटतोच, असा आम्हा सगळयांचाच विश्वास वाढला.

मुलांनी माणसांशी संवाद साधला, तसेच अनेकांना मावळत्या सूर्याने तर कधी गुडुप्प अंधाराने, कधी मृगजळाने तर कधी कधी हिरव्यागार शेताने, कधी अत्यंत रेखीव आणि भव्य गोपुराने तर कधी ओबडधोबड डोंगररांगांनी आतून हलवून टाकले. निसर्गाशी आपले काहीतरी जवळचे नाते असल्याचा अनुभव काही जण घेत होते. त्यातल्या काहींना ते शब्दातून व्यक्तही करता आले आणि आम्हाला आमच्या मुलांमधले अनेक लेखक आणि कवी सापडले!

ठिकठिकाणी जोरदार स्वागत स्वीकारत आम्ही ठरल्या दिवशी 9 जानेवारी 2017 रोजी कन्याकुमारीत दाखल झालो. तिथे आपले स्वागत कसे होईल याची उत्सुकता सगळयांनाच होती. पण आम्हा योजकांच्या मनात आदल्या दिवशी एक विचार येऊन गेला - ही स्वीकारण्याची जागा नव्हे, अर्पण करण्याची जागा! त्यामुळे इथे कसले स्वागत स्वीकारायचे? 'मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद' ही प्रेरणा देणाऱ्या योध्दा संन्याशाच्या चरणी केलेला पराक्रम अर्पण करायला हवा! म्हणूनच विवेकानंद केंद्रात पोहोचल्यावर स्वामी विवेकानंदांना सगळयांनी पुष्पसमर्पण केले. त्यानंतर केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. निवेदिता दीदी, मा. मामाजी, मंगलाताई आणि नंदनजी अशा सर्वांनी मुलाचे कौतुक केले आणि शुभाशीर्वाद दिले. खास आमच्यासाठी पुण्याहून आलेले आमचे मनोजराव, शिवराजदादा आणि पालक महासंघातील सदस्य यांनीही मुलांचे कौतुक केले. परिव्राजक स्वामीजींनी याच ठिकाणी भारतभूच्या भवितव्याचे भव्य स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नातली भव्यता आणि उदात्तता आम्हाला समजावी यासाठीच जणू ही आदरणीय मंडळी आम्हाला शुभेच्छा देत आहेत, असे वाटून गेले.

सायकल सहल पूर्ण झाली होती. पराक्रमाच्या पूर्ततेचा आनंद होता. हा आनंद आमच्या शालेय मुलांनी घेतला आणि जणू आयुष्यभराची ऊर्जा कमाविली. रात्री गप्पा मारताना मुले आणि ताई-दादा भरभरून बोलत होते. कोणाला काव्य पहिल्यांदाच स्फुरले होते, तर कोणाला स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांची नव्याने ओळख झाली. कोणाला नवे मित्र मिळाले, तर कोणाला स्वत:च स्वत:ची सोबत करता येऊ शकते हे समजले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना आणि आम्हा युवकांनाही पराक्रमाची, काम करण्याची आणखी नवी क्षितिजे दिसली.

कन्याकुमारीत पोहोचल्यापासून वेगवेगळया प्रदर्शनांतून आणि कथांतून विवेकानंद समजून घेत होतो. परिव्राजक पर्वातील स्वामीजी पाहताना, ऐकताना आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. विमुक्त संचार करताना त्यांना समजलेला, दिसलेला भारत, त्यांच्या लक्षात आलेले समाजमन, कन्याकुमारीच्या त्या गंभीर चिंतनातून निर्माण झालेले उद्याच्या भारताचे आश्वासक भवितव्य आमच्यासमोर उभे राहत होते.

कन्याकुमारीच्या शिलास्मारकावर उभे असताना ते आश्वासक भवितव्य निर्माण करण्याच्या दृढ संकल्पाचा वारसा आप्पा पेंडसे यांनी आम्हाला देऊ केल्याची जाणीव त्या धीरगंभीर वातावरणात अधिक प्रकाशमान झाली. आम्ही 60 जण समुद्राच्या लाटा आणि हिंद महासागराहून येणारा अफाट वारा यांच्या संगतीने गोलाकार उभे राहिलो. सर्वांनी अत्यंत उच्चस्वराने गायन केले -

'त्या तेजस्वी डोळयांमधली वीज अजुनी सांगते....

उत्तिष्ठत जाग्रत बंधूंनो, उत्तिष्ठत जाग्रत....'

या ओळींनी संपूर्ण वातावरणात एक चैतन्य पसरले. ती ऊर्जा मनात भरून घेऊन आम्ही संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. दुसऱ्या दिवशी 12 जानेवारी! स्वामीजींना अभिवादन म्हणून प्रत्येकी एक हजार सूर्यनमस्कार घातले. मा. एकनाथजी रानडे यांच्या समाधीच्या ठिकाणी हजारावा सूर्यनमस्कार घातला, तेव्हा 'ओम् राष्ट्राय नम:' या मंत्रोच्चाराने खऱ्या अर्थाने आमच्या पराक्रम यज्ञाची सांगता झाली असे वाटून गेले. पराक्रमाचे संकल्प करायचे असतात, असे संकल्प अनेकांना बरोबर घेऊन पूर्ण करता येतात आणि केलेला पराक्रम अर्पणही करायचा असतो, अशी शिकवण आम्हाला या सहलीने निश्चितच दिली. आणखी बरेच अंतर जायचे आहे, याचे भान आम्हा युवकांना या सहलीने दिले. हे अंतर पार करण्यासाठी आता 'पराक्रमाची भव्य कृती राष्ट्रार्थ स्फुरावी' ही प्रार्थना!

आदित्य शिंदे

9970633000

ज्ञान प्रबोधिनी, निगडी