विद्यापती - शृंगाररसाचा पुरस्कर्ता कवी

 विवेक मराठी  12-Nov-2018

 ***माधवी भट*

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

विद्यापती ठाकूर यांचं चरित्र अतिशय रंजक आहे. सुमारे नव्वद वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या कवीला राजाश्रय मिळाला होता. लोकप्रियता खूप होती. शिवाय टीकाकारही बरेच लाभले. ते तर साहजिकच आहे. मात्र त्यात अधिक महत्त्वाचं हे की, विद्यापती हे मूळचे कोण? बंगाली की मैथिल? यावरदेखील बरीच चर्चा आणि ऊहापोह झाला आहे. मात्र ते मूळ मैथिल कवी असून बिहारचे आहेत, हे कालांतराने सबळ पुराव्याने सिध्द झालं. विद्यापती यांच्या बहुतेक रचना राधा-कृष्ण यांच्या रासक्रीडेवर, प्रेम-विभ्रमांवर आधारित आहेत.

हिंदीचे प्रसिध्द लेखक फणीश्वरनाथ रेणू यांच्या कथा एकदा वाचल्या की त्या नंतर पुन्हा पुन्हा वेगवेगळया वळणांवर आठवत जातात. 'मारे गए गुलफाम', 'लाल पान की बेगम', 'ठेस' आणि सर्वात लाडकी ती 'रसपिरिया'! रसपिरिया प्रथम वाचली, त्याच वेळी एक नाव कथेतूनच वारंवार नजरेसमोर येत राहिलं, ते म्हणजे 'विद्यापती'! विद्यापतींचा या कथेतून सापडलेला संदर्भ म्हणजे ते एक प्राचीन कवी आणि गीतकार असावेत इतकाच होता. त्यानंतर कथावाचन सोडून, इतर कामात गुंतत गेले आणि मनावर आणखी वेगळया विचारांच्या घडया साचल्या आणि नंतर विद्यापती हे नाव माझ्या निद्रिस्त मेंदूत कुठेतरी दडलं असावं! पुढे अनेक वर्षांनी जेव्हा जगप्रसिध्द कवी, लेखक आणि विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या साहित्यात रमले, त्या वेळी पुन्हा विद्यापती हे नाव विहिरीतल्या कासवासारखं अलगद मनाच्या पृष्ठभागावर आलं. रवींद्रनाथ ठाकूर यांनी त्यांच्या किशोरवयात प्राचीन काव्य वाचून पदावली लेखनाचा प्रयत्न केला, त्या पदावली 'भानुसिंह' या नावाने त्यांनी प्रकाशित केल्या. आजही त्या पदावली बंगाल प्रांतात गायल्या जातात. प्राचीन मैथिल कवी विद्यापती यांच्या पदावलींनी ते प्रभावित झाले होते, असे उल्लेख त्यांच्या 'जीवनस्मृती' या पुस्तकात आढळतात. त्यामुळे रवींद्रनाथ ठाकूर यांच्या पदावली ज्या प्रभावातून रचल्या गेल्या, त्या स्रोताकडे वळून पाहणं अगदी स्वाभाविकच होतं. मात्र पुन्हा अडचण ही आली की पदावली सहज उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे पुन्हा त्या शोधयात्रेत थांबावं लागलं.

दरम्यानच्या काळात वेगवेगळया विषयांवर काहीबाही वाचन करत राहिले. एक दिवस ऋतुपर्ण घोष या बंगाली दिग्दर्शकाने अभिनय केलेला 'मेमरीज इन मार्च' हा एक अतिशय सुरेख चित्रपट पाहिला. त्यानंतर त्याच्या चित्रपटांची पारायणं झालीत हा भाग निराळा. मात्र 'मेमरीज इन मार्च' आणि 'रेनकोट' या दोन चित्रपटांतल्या गीतांनी लक्ष वेधून घेतलं. रेनकोटमधलं 'मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जात' हे गाणं ऐकून विसरून जायचं नाहीच. त्या गीतातले शब्द आणि त्याचा बंध प्राचीन ब्रिज किंवा अवधी रचनांसारखा वाटतो. मात्र त्याहून अधिक लक्ष वेधून घेते ते 'मेमरीज इन मार्च' या बंगाली चित्रपटातलं, ॠतुपर्ण घोष याने स्वत: रचलेलं 'सखी हम मोहन अभिसारी जाऊ' हे 'बहु मनरथ' या शीर्षकाचं मैथिली भाषामिश्रित गीत. या गीताचा माग काढत पुन्हा एकदा विद्यापतींच्या पदावली जवळ पोहोचले. मग मात्र अगदी वेगात शोध घेतला आणि 'मैथिल कवी कोकिल', 'अभिनव जयदेव' या उपाध्यांनी गौरवलेल्या चौदाव्या शतकातल्या मैथिली भाषेच्या विद्यापती ठाकूर यांच्या रचना आणि चरित्र सापडलं.

विद्यापती ठाकूर यांचं चरित्र अतिशय रंजक आहे. सुमारे नव्वद वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या कवीला राजाश्रय मिळाला होता. लोकप्रियता खूप होती. शिवाय टीकाकारही बरेच लाभले. ते तर साहजिकच आहे. मात्र त्यात अधिक महत्त्वाचं हे की, विद्यापती हे मूळचे कोण? बंगाली की मैथिल? यावरदेखील बरीच चर्चा आणि ऊहापोह झाला आहे. त्यांच्या रचनांचे वाचक आणि अभ्यासक त्यांना बंगाली समजत असत आणि तसे पुरावेदेखील अनेक लेखांतून प्रसिध्द झाले होते. मात्र ते मूळ मैथिल कवी असून बिहारचे आहेत, हे कालांतराने सबळ पुराव्याने सिध्द झालं. इतकी चर्चा आणि इतके वाद नशिबी आलेला हा कवी म्हणूनच आपलं लक्ष वेधून घेतो.

विद्यापती यांच्या बहुतेक रचना राधा-कृष्ण यांच्या रासक्रीडेवर, प्रेम-विभ्रमांवर आधारित आहेत. राधा आणि कृष्ण हे भारतीयांच्या प्रेमकाव्याची उपास्य दैवतं आहेत. त्याला विद्यापतीदेखील अपवाद नव्हतेच. असं म्हणतात की जेव्हा बंगालात चैतन्य महाप्रभू यांचं अवतारकार्य सुरू होतं, त्याच वेळी विद्यापतींची पदं मिथिलेत लोकप्रिय होत होती आणि ती मिथिलेच्या शेजारी बंगाल प्रांतातही कर्णोपकर्णी जाऊन पोहोचली. एक दिवस ती चैतन्य महाप्रभूंच्या कानी पडली आणि ते मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर मात्र चैतन्यप्रभू विद्यापतींच्या रचना शोधून शोधून गाऊ  लागले. असंही सांगतात की चैतन्य महाप्रभू विद्यापतींच्या रचना ऐकून प्रेमावेशाने मर्ूच्छित होत. त्याचबरोबर चैतन्यप्रभूंच्या शिष्यपरिवारातही विद्यापती लोकप्रिय झाले. सावकाश त्यांच्या रचनांचं अनुकरण होता होता त्यात बंगाली शब्दांचा सहज प्रवेश झाला आणि मग हाही समज पसरला की विद्यापती बंगाली आहेत. (संदर्भ - श्री. रामवृक्ष बेनीपुरी 'विद्यापती पदावली' विद्यापती का इतिहास पृ.क्र. 10, लोकभारती प्रकाशन, दिल्ली.)

हा समज होणं यात वावगं काहीही नाही. असं अगदी सहजच घडू शकतं. विशेष हे आहे की बंगालात त्या काळी चंडीदास आणि विद्यापती यांच्या रचनांचा गोविंददास वैष्णव आणि ज्ञानदास, प्रसिध्द लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि आधीच म्हटलं त्याप्रमाणे रवींद्रनाथ ठाकूर यांच्यावरही प्रभाव पडला होता.

विद्यापती नक्की कुठले या वादावर कालांतराने महामहोपाध्याय हरदास शास्त्री, जस्टिस सारदा चरण मित्र आणि बाबू नागेंद्रनाथ मित्र या सर्वांनी हे स्पष्ट रूपात सांगितलं की विद्यापती हे मैथिल कवी आहेत आणि मैथिली ही ब्रिजभाषेचीच एक बोली आहे.

बिहार राज्यातल्या दरभंगा जिल्ह्यातून पश्चिमोत्तर जाणाऱ्या रेल्वेच्या प्रवासात कमतौल नावाचं गाव आहे आणि तिथून चार ते पाच कोसावर गढ बिसपी नावाचं जे गाव आहे, ते गाव विद्यापती ठाकूर यांचं आहे. ते गाव विद्यापती यांना तत्कालीन राजे 'राजा शिवसिंह' यांनी भेट म्हणून दिलं होतं. संपूर्ण गाव बक्षीसस्वरूप दिल्यावर त्याच्याबरोबर या दानाचा उल्लेख असलेलं ताम्रपत्रदेखील विद्यापतींना प्रदान करण्यात आलं. त्यांना मिळालेल्या या राजाश्रयाच्या लाभामुळे त्यांचे टीकाकार पंडित केशव मिश्र हे बिसपी गावाच्या बक्षिसावर 'अतिलुब्ध नगरयाचक' असं उपहासाने म्हणाले होते.

याप्रमाणे विद्यापतींच्या संदर्भात अनेक रंजक किस्से असले, तरी त्यांच्या रचना त्याहून अधिक चर्चा निर्माण करणाऱ्या आहेत हे नक्की. विद्यापती यांचं दुर्गास्तवन सुरेख आहे. राजा शिवसिंह यांच्या राज्यकाळात ते रचलं असावं, कारण नामामुद्रेसह राजाचंही नाव अखेरच्या चरणात आहे -

कनक-भूधर-शिखर-बासिनी

चंद्रिका-चय-चारू-हासिनी

दशन-कोटी-विकास-बंकिम

तुलीत-चंद्रकले॥

जे देवी दुर्गे दुरिततारिणी ....!

सकल पाप्काला परीच्युती

सुकवि विद्यापति कृतस्तुति

तोषिते शिवसिंह भूपति

कामना फलदे॥

अल्पाक्षरी आणि आटोपशीर रचना लिहिणाऱ्या विद्यापती यांची संस्कृत, अवहट्ट (अपभ्रंशाची भाषा) आणि मैथिली या भाषांवर पकड होती. संस्कृत भाषेत त्यांनी सुमारे तेरा ग्रंथाचं लेखन केलं, तर अवहट्ट भाषेत 'कीर्तिलता' आणि 'कीर्तिपताका' या दोन ग्रंथांची निर्मिती केली, तर मैथिली भाषेत पदावली लेखन केलं.

 

विद्यापती यांच्या पदावली रचना वाचल्यावर त्यांना भक्तिरचना म्हणता येणार नाही, कारण त्यात शृंगाराची वर्णनं ओतप्रोत भरली आहेत. मैथिल भाषेचे अनेक लेखक, समीक्षक आणि वाचक हे म्हणतात की विद्यापती यांची रचना शृंगाररसात न्हाऊन निघाली आहे. ते शृंगाराचे कवी होते. इतकंच नाही, तर त्यांचा संस्कृत ग्रंथ 'पुरुष परीक्षा', ज्यात राजकीय आणि धार्मिक बोध कथारूपात सांगितला आहे, त्यातही विद्यापतींना शृंगाराचं विस्मरण झालं नाही, असं प्रसिध्द हिंदी लेखक रामवृक्ष बेनिपुरी म्हणतात.

एखाद्या कवीने नवरसांवर लिहिणं यात नवल ते काही नाही. मात्र सातत्याने एकाच रसावर लिहीत राहणं हे जरा वेगळं वाटतं, हे नक्की!

विद्यापती यांच्या काव्यात सृष्टिवर्णन, नवतरुणीच्या वळणदार देहघाटाचं वर्णन, प्रियकर भेटीची ओढ, मिलन आणि विरह यांचं सतत वर्णन दिसतं.

सखी हम जीबन कोना कटबई? (सखी, आता मी कशी जगू? हे आयुष्य कसं जाईल?) या रचनेत खरं तर विरह दिसायला हवा. तो दिसतोही. मात्र त्या विरहातही नायिकेला प्रकर्षाने आठवण होतेय ती प्रणयाचीच. ती म्हणते -

जहन दिन-राति पलंगिया पर

पिया संग केलि हम केलयै

(केली - प्रणय, केलीसखी - प्रणयसंगिनी )

तहन बिरहा के बेदन में

पिया के नाम हम रटबई

सखी हम जीबन कोना कटबई ...!

विरहार्त नायिकेच्या मनाच्या एकटेपणाचं, तिच्या मन:स्थितीचं वर्णन ठळकपणे लिहिलेल्या उपरोक्त वर्णनापुढे जरा मागे पडू लागतं. कुणी म्हणेल, यात वावगं ते काय? तर अजिबात काहीही नाही. त्यांच्या इतर रचनादेखील पाहता येतीलच.

श्रीकृष्णासाठी लिहिलेल्या एका वंदनेत ते राधेला लिहितात, मात्र वाचताना वाटू लागतं की विद्यापतींनी स्वत: कृष्णवंदनेसाठी राधेची भूमिका घेतली आहे.

नंदक नंदन कदम्बेरि तरू तर,धिरे धिरे मुरली बोलाब

समय संकेत-निकेतन बइसल, बेरि बेरि बोली पाठाब

सामरि, तोरा लागि, अनुखन बिकल मुरारि

भनइ विद्यापती सुन बरजौवती बंदह नंद किसोरा!

हे राधे, नंदाचा मुलगा (तो कृष्ण) कदंबाच्या झाडाखाली कधीची तुझी वाट बघतो आहे. त्याने तुला भेटीचा संकेत पाठवला होता ना? तू यावीस म्हणून वारंवार तो बासरी वाजवून बोलावतो आहे. भेटीची वेळ आता सावकाश संपत जात आहे. हे सामरी, (श्यामा, सुंदरी), तुझ्यासाठी प्रतिक्षण तो मुरारी विकल होत आहे. (केवढं हे सौभाग्य!!!) म्हणून विद्यापती म्हणतात, 'हे युवती, या नंदकिशोराला (माझ्यासह) वंदन कर!'

ही कृष्णावंदना जितकी गोड आहे, त्याबरोबरच विद्यापती यांनी राधेलाही वंदन केलं आहे. हे वंदन तिच्या सौंदर्याला आहे हे विशेष. ती रचना अशी -

देख देख राधा रूप अपार

अपरूब हे बिहि आनि मेराओल खिति तल लावनि सार

अंगही अंग अनंग मुरछाएत हेरए पडए अधीर

मनमथ कोटी मथन करू जे जन से हरि महि मधि गीर!

कत कत लखिमी चरन तल नेओछए रंगिनी हेरी बिभोरी

करू अभिलाख मनही पदपंकज अहनिसी कोर अगोरि!

जे सौंदर्य पाहून (साक्षात कोटी कोटी कामदेव ज्याच्यापुढे निष्प्रभ ठरतात असा) श्रीकृष्णदेखील मर्ूच्छा येऊन भूमीवर पडतो, त्या सौदर्याच्या चरणाशी सगळी लक्ष्मी अर्पण (न्योछावर) होते, अशा राधेला पाहून मनात सारखं वाटतं की, तिच्या चरणकमलांना अहर्निश ओंजळीत धरून वारंवार नतमस्तक व्हावं!

प्रेमात आकंठ बुडालेल्या राधा-कृष्ण या आद्य जोडीचं आख्यान, काव्य किंवा त्या उभयतांवर पद्यरचना करण्यापूर्वी प्रारंभीच विद्यापती दोघांनाही वंदन करतात. या वंदनात केवळ नम्रता आणि दिपून जाणं नाही, तर त्याबरोबर अनेक सूक्ष्म छटा दिसतात. नकळत काही प्रमाद घडला किंवा एखादा शब्द जास्त टोकदार वा अनुचित रचला, तर अभय असू द्यावे ही भावनादेखील असावी. मात्र या सर्वांपेक्षा विद्यापती हे राजमान्यता प्राप्त झालेले राजकवी असल्याने दरबारात गायचं काव्य म्हणून त्यात सगळया गोष्टी क्रमवार असाव्या, यासाठीदेखील प्रथम वंदना रचली असावी, अशी शक्यता अधिक वाटते.

राधा-कृष्ण यांच्या प्रेमाच्या, शृंगाराच्या आणि विरहाच्या सर्व रचना वाचल्यावर आणखी एक गोष्ट स्पष्ट जाणवते ती अशी की विद्यापती सहज दोन्ही भूमिकांत शिरतात. ते राधा होऊन कृष्णासाठी व्याकूळ होतात, तर कृष्ण होऊन राधेचं चांदण्याचं रूप नयनांनीच प्राशन करतात. विद्यापती यांच्या काव्यावर आत्ता कुठे लेखन, चर्चा आणि समीक्षा होऊ लागली आहे. या संदर्भात झालंच तर त्यांच्या मनोभूमिकेवर आणि त्या निमित्ताने त्यांच्या गद्य आणि पद्य रचनांचा मानसशास्त्रीय दृष्टीनेही चिकित्सक अभ्यास व्हायला हवा, असं वाटतं. चित्र, संगीत, काव्य यांसारख्या समस्त कला मानवाच्या अभिव्यक्तीसाठी आहेत. बरेचदा प्रत्यक्ष आयुष्यातले अभाव कलावंताच्या कलेतून नकळत व्यक्त होतात. होऊ  शकतात. विद्यापती, त्यांचं घराणं, त्यांचे प्रकांडपंडित वडील, घरावर असलेला सरस्वतीचा आशीर्वाद आणि इतकंच नव्हे, तर संपूर्ण आयुष्य मिळालेला राजाश्रय आणि राजानेच ताम्रपात्रात नोंदवून बहाल केलेली बिसपी गावाची सनद या गोष्टींकडे पाहिलं, तर म्हणावं लागेल की यश म्हणजे आणखी काय असतं? मात्र या यशस्वी आयुष्यातही काही अभाव असतीलच. विद्यापती यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती असं म्हणतात. (याबाबत नक्की माहिती उपलब्ध नाही. काही पाठभेद आहेत.) त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी विस्ताराने लिहिलेलं आढळत नाही. कदाचित इतक्या विद्वान, पंडित व्यक्तीला आयुष्यात मिळायला हवी तशी आणि तितकीच समंजस साथ मिळाली नसेल का? कवी फँटसीत रमतात असा आरोप नेहमीच होतो. त्यांना वास्तव झेपलं नसेल का? अर्थात विवाह करणं आणि मूल जन्माला घालणं याचा मानसिक आरोग्याशी काहीही संबंध नाही, तसाच समाधानाशीही नाहीच. कारण ते मिळेलच किंवा मिळतंच याची कसलीही शाश्वती या दोन्हीत नाही. हां, तसं व्हावं ही कामना असते, म्हणूनच ही संस्था आहे हेदेखील सत्यच!

मनाच्या कोणत्या कप्प्यात काय दडवून असतं आणि ते कशा पध्दतीने व्यक्त होतं, हे एक कोडं आहेच. विद्यापती मात्र त्यांच्या पदावलीमुळे लोकप्रिय झाले हे खरं.

कृष्णाला पाहायला आतुर झालेल्या राधेची व्याकूळता लिहिताना विद्यापती एका पदात तिचे डोळे श्रावणातल्या मेघासारखे झरत आहेत असं लिहितात.

कानू हेरब छल मन बड साध! कानू हेरइत भेल एत परमाद

तबधरि अबधि मुगुधी हमे नारि, कि कही कि सुनी किछु बुझए न पारि

साओन घन सम झर दु नयान, अबिरत धकधक करए परान

ही व्याकूळता चाळिसाव्या पदात लिहिल्यावर पंचेचाळिसाव्या क्रमांकापासून विद्यापती 'कृष्ण की दूती' लिहू लागतात. दूती म्हणजे प्रेयसीला निरोप पोहोचवणारी स्त्री! त्या दूतीजवळ कृष्णाचा निरोपदेखील तसाच आहे. समग्र पदावलीत हा खेळ अगदी रंगून खेळलेला दिसू लागतो. एकदा कृष्ण, मग लगेच राधा. आणि दोहोंच्या मनोभूमिकेतून लिहिणारी व्यक्ती एक - 'विद्यापती'.

पदावली वाचताना एक-दोनदा तर उगाचच घाबरायला झालं. चौदाव्या शतकातली ही गोष्ट आहे खरं तर, पण उगाच वाटलं की विद्यापती आत्ता सांप्रत आहेत, पदावली रचत आहेत. एकदा राधा होतात, कृष्णाची वाट बघतात, त्याच्यासाठी नटतात, रमतात, रत होतात, मग लगेच कृष्ण होतात, राधेची छेड काढतात, तिला न्याहाळतात, प्रेमाच्या आणाभाका घेतात. तिचं समर्पण स्वीकारतात. पुन्हा हे चक्र सुरू. एकदा थांबून जावं वाटलं. नको वाटलं. मात्र ठेवून दिलेलं पुस्तक पुन्हा हाती घ्यायला विद्यापती भाग पाडतात. कारण त्यांची भाषा, तीव्रता आणि उत्कटता!

हा त्यांचा सहजच केलेला परकाया प्रवेश उल्लेखनीय आहे. त्यांना दोन्ही भूमिकांमधून एकाच उत्कटतेने लिहिता येतं. त्यांना ही आर्जवं, ही तीव्रता आणि हे समर्पण इतक्याच अभिरुचिसंपन्न पध्दतीने आयुष्यात हवं असावं, जे त्यांनी रचनेतून मिळवलं. मनाचं शांतवन केलं. कृष्ण की दूतीमध्ये 46 क्रमांकाची दूती रंजक आहे. त्यात नाटय दिसतं. हा भाग एखाद्या संगीत नाटकासारखा रंगमंचावर घडतोय असंही वाटू लागतं.

राधेकडे ही 'दूती' आली आहे. तिच्यापाशी कृष्णाचा प्रेमसंदेश आहे. दूती सांगते -

सुन सुन ए सखि कहए न होए, राहि राहि कहे तन मन खोए

कहइत नाम पेम होअ भोर, पुलक कंप तनु ढारहि नोर

तुहू बिनु आन इथे नहि कोइ, बिसराये चाह बिसरी नहि होइ

भनइ विद्यापती नाहि बिखाद, पूरब तोहर सबही मन साध

(हे सखी, मला काही सांगताच येत नाहीय. राही राही (राधा ) म्हणत तन-मन विसरून कृष्ण व्याकूळ झाला आहे. तुझं नाव प्रेमभराने जपत आता त्याचे अश्रू वाहू लागलेत. तुझ्याशिवाय इथे त्याचं कोणी नाही राधे, तुला सोडून आणखी कुणावर तो प्रेम करू शकेल का? विद्यापती म्हणतात, जोवर कृष्णाची मनोकामना पूर्ण होत नाही, तोवर त्याच्या मनीचा विषाद संपणार नाही.)

विद्यापती ज्यासाठी अंमळ जरा अधिकच प्रसिध्द झाले, तो अभिसार त्यांच्या पदावलीचा एक भाग आहे. अभिसारात अनेक रचना आहेत. अभिसारिका झालेली राधा आणि तिचं आपल्या सखीजवळ स्पष्ट रूपाने केलेलं निवेदन या त्यांच्या उल्लेखनीय रचना म्हणाव्या लागतील.

अभिसार या भागातली 111 क्रमांकाची पदावली बघा -

आज मए हरि - समागम जाएब, कत मनोरथ भेल

घर गुरुजन निंद निरूपइते, चंदाए उदय देल!

या रचनेपाशी थांबायला होतं. अगदी प्रारंभीच म्हटलं त्याप्रमाणे बंगाली दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि गीतकार ॠतुपर्ण घोष याच्या 'मेमरीज इन मार्च' चित्रपटात शुभोमिता बॅनर्जीने गायलेलं 'बहु मनरथ' हे गीत अगदी याच गीताच्या प्रभावळीतलं वाटतं. ॠतुपर्णलादेखील 'सखी हम मोहन अभिसारी जाऊ। बोलो हम एतत सुख कहां पाऊ ?' अशी मैथिल रचना करायचा मोह झाला! त्याचं श्रेय अर्थातच विद्यापती ठाकूर यांना द्यायला हवं.


विद्यापती त्यांच्या अभिसारात लिहिताना, भोवतालाचं भानही अचूक ठेवतात. चंद्रोदय झाल्यावर, घर, गुरुजन यांच्यावर निद्रेचा अंमल गाढ झाला की त्यानंतर ती कृष्णाच्या दिशेने जायला निघेल. मात्र आज ती अभिसारिका आहे, हे तिने अतिशय मोकळेपणे पहिल्याच ओळीत सांगितलं आहे.

विद्यापतींना वाचताना मला दोन-तीनदा कवी सुरेश भट यांचीही आठवण आली. अभिसार हा जसा विद्यापतींच्या पदावलीचा एक भाग आहे, तसाच भावोल्लास हादेखील आहे. त्या भावोल्लासात अनेक भावनांची कबुली आणि व्यक्तता आहे. त्यापैकी एक रचना वाचल्यावर सुरेश भट यांच्या 'सखी मी मज हरपून बसले गं' या गीताची आठवण होते. अभिसारिका बनून कान्हाला भेटायला गेलेल्या राधेला तिच्या सखी काय दुसऱ्या दिवशी सोडणार होत्या का? त्या तिच्या खोडया करतील, थट्टा करतील आणि भोचकपणा करून सारं जाणून घ्यायचा प्रयत्नही करतीलच. मात्र इथे त्यांनी काही विचारायच्या आतच, तृप्त निथळणारी राधा बोलू लागते -

सखी हे, कि पुछसि अनुभव मोए?

सेह पिरीती अनुराग बिखाएन तिल तिल नूतन होए

जनम अबधी हम रूप निहारील नयन न तिरपित भेल

कत मधु जामिनी रसभ गमाओली न बुझल कइसन केली

कत विदगध जन रस अनुमोदए अनुभव काहु न पेख

विद्यापती कह प्राण जुडाइते लाखे न मिल एक!

कत मधु जामिनी रसभ (कामक्रीडा) गमओली (उसवून श्वास माझा, फसवून रात गेली!)

या पदात अखेरीस विद्यापती वाचकांना म्हणतात की रसिकांनी या रसाचा उपभोग घ्यावा.

विद्यापती आयुष्यात अनेक चढ-उतार बघत जगले. राजे सिंहासनावर विराजमान झाले, गेले, मात्र विद्यापती कायम होते. राजा शिवसिंह याला युध्दभूमीतून पळून जावं लागलं. असं म्हणतात की शिवसिंह नेपाळात पळून गेला. कोणी म्हणतं की वाटेतच त्याला मृत्यू आला. मात्र त्यानंतर त्याची राणी लाखिमी देवी यांच्या काळातही विद्यापती होते आणि त्यानंतर तीन ते चार वर्षांनी त्यांचं निधन झालं, असं कळतं.

विद्यापती यांच्या रचना नेपाळातदेखील प्रसिध्द झाल्या होत्या. मैथिली भाषा उत्तर बिहारमध्ये आणि नेपाळच्या तराई क्षेत्रात बोलली जाते, त्यामुळे तिथेदेखील त्यांची लोकप्रियता होती आणि आहेही. नेपाळ सरकारने विद्यापतींचं चित्र असलेलं पोस्टाचं तिकीट प्रकाशित केलं आहे. भारत सरकारनेदेखील या मैथिल कवी कोकिल विद्यापतींना पोस्टाचं तिकीट समर्पित करून श्रध्दांजली दिलीच आहे.

अनेक विवादात अडकूनही साहित्य निर्मिती करतच राहणारे विद्यापती त्यांच्या अखेरच्या काळात मात्र या शृंगारिक रचनांपासून लांब झाले असल्याचं दिसतं. ते अतिशय साहजिक वाटतं. कदाचित कालांतराने त्यांना हा आनंद नको वाटला असेल किंवा बरेचदा शब्दातलं फोलपणदेखील लक्षात आला असू शकेल.

अशा वेळी शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी आठवतात-

शब्दांना शब्द भेटतीलच असे नाही

शब्दांनी शब्द पेटतीलच असेही नाही.

शेवटी ते शब्दच. त्यातून बोलून बोलून किती काळ सुख लाभेल? वयानुरूप ती असोशीदेखील मावळली असावी. दुसरं कारण हे की शिवसिंह गादीवर विराजमान झाल्यानंतर त्यांनी लगेचच विद्यापतींना बिसपी गावाची सनद दिली, तो राजकीय अस्थिरतेचा आणि आक्रमणांचा काळ होता. त्या काळात लेखन अशक्यही झालं असावं.

आयुष्यभर राधा-कृष्णाचं कवन गाणारे आणि अनेक वैष्णवांना आपल्या रचनांनी भुरळ पाडणारे विद्यापती मात्र शैव पंथाचे होते, हे विशेष. ते शिवभक्त होते आणि कट्टर शिवउपासक अशीच त्यांची प्रसिध्दी आहे. आजही उत्तर बिहारात विद्यापती यांची चित्रं शंकराची उपासना करणारे आणि थोर शिवभक्त अशीच उपलब्ध आहेत हे महत्त्वाचं.

विद्यापती लिखित एक प्रसिध्द आरती -

जय जय संकर जय त्रिपुरारी, जय अध पुरुष जयति अध नारि

आध धबल तनु आधा गोरा, आध सहज कूच आश कटोरा

आध हडमाल आध गजमोती, आध चानन सोह आध बिभूती!

शंकराच्या अर्धनारीश्वर रूपाची ही आरती, तिचा नाद आणि लय अतिशय सुरेख आहे. विद्यापती उत्तम गात, म्हणून त्यांना कवी कोकिल म्हटलं जायचं. पदावलीबरोबरच विद्यापती यांनी लिहिलेल्या रचना उत्तर बिहारात गावागावात लग्न, उपनयन इत्यादी शुभसंस्कारांना खास कलावंत बोलवून गायची पध्दत होती. फणीश्वर नाथ रेणू यांच्या रसपिरिया कथेचा संदर्भदेखील हाच तर आहे. डफावर थाप मारून विद्यापतींची पदावली गायची, त्यातलीच एक रसप्रिया! या रचनांना नाचारी अस्म नाव होतं आणि ती सादर करणारे ते नाचारीये!

कधीकधी वाटतं, कधीतरी कोणी एक भरभरून, देहाच्या प्रत्येक रंध्रातून उत्कटपणे जगतो, जगू इच्छितो आणि ते सारं तितक्याच तीव्रतेने लिहून ठेवतो आणि मग त्यानंतरच्या सर्व जनमानसात, साहित्यात त्याचं प्रतिबिंब उमटत जातं. आनंद पसरत जातो. विद्यापती आज नाहीत. मात्र त्यांच्यामुळे बिहारातलं लोकजीवन, बंगाल-ओडिशा प्रांतातलं संतजीवन, स्वातंत्र्यपूर्व काळातलं साहित्य आणि अगदी आत्ताचं चित्रपट संगीतदेखील समृध्द झालं.

कितीतरी देऊन जातात लोक, त्यांच्याही नकळत! विद्यापती वाचताना मनात आलं - आता त्यांच्या इतर रचनादेखील वाचकांना उपलब्ध व्हाव्यात. तसं काम सुरू आहे, असं काही चौकशीनंतर कळलं. अर्थातच आनंद झाला.

कवीने काय दिलं आहे हे बघावं, त्याला स्पर्श करू नये. केलाच तर मग सगळं स्वीकारायची तयारी पाहिजे. दि:क्कालातून आरपार पाहू शकणारी प्रतिभा कवीजवळ असली, तरी चिकित्सा करताना त्याचं निखळ माणूसपण मान्य करता आलं की अनेक स्वीकार सोपे होतात, हे विद्यापती ठाकूर यांनी शिकवलं. शिवाय मधासारख्या स्निग्ध आणि नैसर्गिक गोडवा असलेल्या मैथिल भाषेची आस्थेने चौकशी झाली, हे या कवीचं श्रेय!

आणखी काय? बाकी जगणं सुरूच असतं. त्यात अशी थांबवणारी, माझ्याकडे बघ म्हणून हक्काने हात धरून हनुवटी वळवणारी आणि खिळवून ठेवणारी वळणं आली की आयुष्य सुंदर आहे, याची खात्री पटू लागते!