नर्मदा परिक्रमेचे पारणे

 विवेक मराठी  12-Nov-2018

***वंदना अत्रे***

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

26 जुलै 2009 रोजी नाशिकहून मंडलेश्वरला निघालेल्या भारती ठाकूर. 2006 साली केलेल्या सहा महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेमध्ये तिला इथल्या माणसांमधील जिव्हाळा अनुभवता आला. हातात चिमूटभर असताना मूठभर देऊ  बघण्याची माणुसकी दिसली. 2006 साली मनात रुजलेल्या बीजाने अखेर 2009 साली, एकदम उचल घेत, नाशिकमधील मोठया स्नेही परिवाराचा निरोप घेत नर्मदेकडे पावले वळवली, ती नर्मदेच्या मुलांना शिक्षण देण्याच्या निर्धाराने. भारती ठाकूर नावाच्या एका साध्याशा दिसणाऱ्या, पण व्यक्तिमत्त्वात सात्त्वितेची असीम ताकद आणि त्यावर श्रध्दा असलेल्या स्त्रीच्या एका अमर्याद कुटुंबाची गजबज असलेला हा आश्रम बघताना त्या कुटुंबाचा, त्यातील परस्पर जिव्हाळयाचा एखाद्या क्षणी हेवा वाटल्यावाचून राहत नाही... कसा, ते प्रत्यक्ष अनुभवायलाच हवे...

भगवद्गीतेमधील बाराव्या अध्यायातील श्लोकांच्या पठणाचे कोवळे, सुरेल स्वर कानावर पडल्याने जाग आली, तेव्हा पुरते उजाडलेसुध्दा नव्हते. भगवद्गीतेपाठोपाठ शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र, भज गोविन्दम, मग नर्मदाष्टक... अतिशय शुध्द, स्पष्ट उच्चार आणि स्वरांचे अचूक चढउतार. एखाद्या संस्कृत पाठशालेतील मुलांचे असावे तसे. काल 'नर्मदालय' आश्रमात आल्यापासून ही मुले ह्या ना त्या निमित्ताने चकित करीत होती. कालच संध्याकाळी आम्ही आमच्या खोलीत शिरण्यासाठी दिवे लावताच तिथे सापाचे वळवळणारे एक पिल्लू कोणाला तरी दिसले आणि ते कळताच जीव मुठीत घेऊन आम्ही शहरी बाया अंगणाकडे धूम पळालो. मग दहा-बारा वर्षांच्या मुलांची फौज खराटे-झाडू घेऊन धावत आली आणि त्यांनी त्या पिल्लाला मजेत आधी खोलीबाहेर आणि मग आश्रमाच्या अंगणाबाहेर पिटाळून लावले. जेवण वगैरे होऊन मग निवांत रात्री अंगणात बसून गप्पा सुरू झाल्या. मुलांची घरे, त्यांची भावंडे ह्या वाटेने त्या गप्पांमध्ये आधी त्यांचा भूतकाळ डोकावू लागला. दूरवर असलेल्या शूलपाणीच्या जंगलात नर्मदा मैय्याच्या किनारी कुठेतरी असलेले त्यांचे चिमूटभर घर, मिरचीच्या शेतात मजुरी करणारे आई-वडील, त्या घरापासून दूरवरचा एक डोंगर ओलांडल्यावर येणारी त्यांची शाळा, कधीच पुस्तके-वह्या न मिळता तिथे होणारे शिक्षण असे बरेच काही अगदी सहजतेने सांगत होती ती....! आपले कुटुंब आणि ते आयुष्य असे सगळे मागे टाकून 300 कि.मी. अंतरावरील ह्या आश्रमात येताना इथे का यायचे? असा प्रश्न त्या मुलांना पडलाच नसावा. लेपा पुनर्वास क्षेत्रात कोणी एक दीदी शाळा चालवते आहे आणि तिथे राहण्यासाठी आश्रमसुध्दा आहे, एवढा तपशील सांगोवांगी त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या कानावर पडला आणि शूलपाणीच्या जंगलातून मुलांना घेऊन ते ह्या आश्रमात हजर झाले. अंग जेमतेम झाकेल एवढे कपडे, अंगभर खरूज, डोक्याला आजवर तेलाचा थेंबसुध्दा न मिळाल्याने कोरडेठक्क झालेले केस आणि पोटात अमर्याद भूक असलेली ही मुले त्या दीदीच्या स्वाधीन करताना घरातील खाणारे एक तोंड कमी झाल्याची कदाचित त्यांच्या आई-वडलांची भावना असणार... हे सगळे ऐकताना मला प्रश्न पडला तो वेगळाच - ज्या दीदीच्या खांद्यावर रोजच अशा मुलांची जबाबदारी येत होती, तिने कशी पेलली ती? तऱ्हेतऱ्हेचे संसर्ग आणि मैय्याच्या पाण्यात मिळणारी मासळी मारून खाण्याइतपतच जीवन कौशल्य असलेल्या ह्या मुलांचा सगळा सांभाळ करण्याची जबाबदारी येत असताना पहिल्या काही अवघड काळात कोणी साथ दिली? किती दमछाक झाली ह्या काळात? असे खूप प्रश्न घेऊन ह्या दीदीला भेटायला आलो होतो.. नर्मदाकिनारी शिक्षणाचे काम करणाऱ्या भारती ठाकूरला भेटण्यासाठी... गेल्या कितीतरी वर्षांपासून जिवाभावाची मैत्रीण असलेल्या, पुस्तकासाठी एकत्र काम केलेल्या भारती नावाच्या मैत्रिणीचे हे वेगळे रूप बघण्याचा हा अनुभव माझ्यासाठी अगदी अनोखा. ह्या भेटीत अनेक क्षण असे आले की वाटले, कुठून आले हे सारे ह्या साध्याशा दिसणाऱ्या स्त्रीमध्ये? इतका निग्रह आणि तेवढीच मुलांवरची जिवापासूनची माया, काम चालवण्यासाठी - मोठे करण्यासाठी लागणारी मानसिक गुंतवणूक आणि त्याच वेळी ते स्थानिक लोकांच्या हातात सोपवण्याची नि:संगता. अशा गोष्टी एकत्र बांधत बांधत केवढा मोठा पल्ला मारला!

भत्याण, छोटी खरगोन आणि लेपा पुनर्वास क्षेत्र अशा तीन ठिकाणी औपचारिक शिक्षण देणाऱ्या तीन शाळा आणि त्यात शिकत असलेली 350 मुले, 15 गावांमध्ये चालणारी अनौपचारिक शिक्षण देणारी नर्मदालय आणि त्यात शिक्षण घेत असलेली तब्बल सतराशे मुले, 45 निर्धन, आदिवासी मुलांना मायेचे छप्पर देत असलेले गुरुकुल, माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या मुलांसाठी व्यवसाय शिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव, गोशाला, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या सहकार्याने सुरू झालेले ग्रामीण तंत्रज्ञान विकास केंद्र, मुलांचा वाद्यवृंद, स्त्रियांना रोजगार देणारा मोठा शिवणकाम विभाग... यादी वाचतानासुध्दा आपण थकून जातो.

मनात कोणताही प्रश्न, शंका न घेता जशी शूलपाणीच्या जंगलातील मुले भारतीच्या आश्रमात आली, अगदी त्याच नि:शंकपणे भारती दहा वर्षांपूर्वी, नेमकेपणे सांगायचे तर 26 जुलै 2009 रोजी नाशिकहून मंडलेश्वरला निघाली. नर्मदेच्या सहवासात राहणे ही तिची भावनिक गरज होतीच, त्याचबरोबर ज्या नर्मदा परिक्रमेने तिला मैय्याच्या विश्वासावर जगणाऱ्या असीम परिवारांशी जोडून दिले, त्या परिवारांसाठी काही करण्याची तीव्र इच्छासुध्दा होती. 2006 साली केलेल्या ह्या सहा महिन्यांच्या परिक्रमेमध्ये तिला इथल्या माणसांमधील जिव्हाळा अनुभवता आला. हातात चिमूटभर असताना मूठभर देऊ बघण्याची माणुसकी दिसली, पण त्याचबरोबरीने दिसले अमाप दारिद्रय, मुलांच्या शिक्षणाची परवड, स्त्रियांच्या वाटयाला येणारे सततचे कष्ट, अस्वस्थ करणारे नर्मदेचे प्रदूषण आणि खूप काही. तेव्हाच मनात ह्या कामाचे बीज पडले होते. परिक्रमेनंतर तीन वर्षे पुन्हा नोकरी आणि त्याच्या अनुषंगाने येणारा जगणे नावाचा व्यवहार सुरू होता. पण मनातील बीज त्या व्यवहारातसुध्दा तेवढेच रसरशीत राहिले. बाहेरचा ऊन-पाऊस घेत आपले हिरवेपण सांभाळत राहिले. आणि मग 2009 साली, एकदम उचल घेत, नाशिकमधील मोठया स्नेही परिवाराचा निरोप घेत ती निघाली. नर्मदेच्या मुलांना शिक्षण देण्याच्या निर्धाराने. नर्मदा परिक्रमेला निघताना जी अनेक प्रकारची अनिश्चितता समोर होती, ती ह्या वेळीसुध्दा सोबतीला होतीच, पण तितकाच मनात दृढ निर्धार होता. आणि तेच तिचे त्या क्षणी तरी भांडवल होते. काम काय करायचे? निवडीला वाव कितीतरी होता, पण आपला मार्ग तिने पक्का केलेला होता. मुलांसाठी शिक्षण देण्याचा.

निमाड प्रांतात फिरताना नर्मदा प्रकल्पामुळे होणारे विस्थापन, त्या भागातील सुपीक जमीन आणि तरीही असलेले कमालीचे दारिद्रय, मिरचीच्या किंवा कापसाच्या शेतांमधून काम करणारे बालमजूर, लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी अकाली खांद्यावर पडल्याने शाळा सोडून घरी बसलेल्या लहान मुली हे सगळे दृश्य नक्कीच विषण्ण करणारे होते. भारतीचा विचार सुरू झाला, शाळा सोडून शेतात काम करणाऱ्या किंवा घरी बसलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाकडे कसे आणता येईल? तिथल्या गावांमध्ये शिक्षणाची सोय होती, पण त्या सोयीबरोबर गैरसोयी तेवढयाच होत्या - म्हणजे शाळेपर्यंत जाणारे रस्ते नव्हतेच, किंवा असले तर फारसे सुरक्षित नव्हते. शिवाय शाळेतील वर्ग जेमतेम आठवीपर्यंत आणि त्या आठ वर्गांना शिकवणारे शिक्षक एखाद-दोनच..! त्यामुळे शाळेत जाणे हे मुलांच्या फारसे आवडीचे कधीच नव्हते आणि मुलाला शाळेत पाठवून करायचे काय, पुढे जाऊन शेतात मजुरीच तर करायची आहे, असे म्हणत पालक त्यांना शाळेत जाण्याचा कधी आग्रह करीत नव्हते. जगण्याचे त्यांचे हिशोब इतके साधे-सोपे असताना शिक्षणाचा आग्रह का धरायचा? भारतीच्या मनात तिच्या शिक्षणाची संकल्पना स्पष्ट होती. पुस्तकातील विज्ञान, गणित आणि इतिहासाच्या सनावळया पाठ करायला लावून त्यांना बाबू बनवण्याचा आणि गावात घट्ट रुजलेली त्यांची मुळे उखडून त्यांना शहरात चाकरीला जुंपण्यासाठी पाठवण्याचा विचार ती कधीच करीत नव्हती. जीवन शिक्षण देत ह्या मुलांना जगण्यासाठी अधिक सक्षम करण्याची इच्छा होती. ह्या मुलांमध्ये असलेल्या क्षमतांचा शोध घेत त्या क्षमतांची ओळख त्यांना करून देण्यासाठी हे शिक्षण होते. आणि अशा शिक्षणासाठी मग मोठी इमारत, त्यातील वर्ग, वह्या-पुस्तके-गणवेश अशा अवडंबराची काहीच गरज नव्हती. मंडलेश्वरमध्ये भारतीने एक घर भाडयाने घेतले आणि आपल्या पायाची चाके घेऊन तिने प्रवास सुरू केला. रोज साधारण आठ किलोमीटर जायचे आणि तेवढेच परत, अशी किमान 16 किलोमीटरची पदयात्रा ठरलेली. लेपामधील एका धर्मशाळेत पहिले नर्मदालय सुरू झाले. पहिल्या दिवशी चौदा मुले ह्या 'शाळेत' आली. गणवेश, दप्तर, गृहपाठ काहीही नाही. इथे अभ्यास वाटावे असे काही नव्हतेच मुळी. गोष्टी ऐकायला मिळत होत्या, गाणी होती आणि खूप मस्ती-खेळ होता. ह्या शाळेत आधी भारतीचेच खूप 'शिक्षण' सुरू होते. तिला ह्या मुलांची अधिक ओळख होत होती - उदा., ह्या मुलांना त्यांच्या गरजेचे विज्ञान आणि पर्यावरण ठाऊक असते, जनावरांचे विज्ञान आणि शरीरशास्त्र त्यांना चांगले अवगत असते, त्यांच्या गरजेचे हिशोब ही मुले हाताच्या बोटांवर पटापट करू शकतात, प्रत्येक जण पट्टीचा पोहणारा, नाव चालवू शकणारा आणि मासेमारी करणारा.. ह्या शिक्षणाने तिला तिच्या कामाचे टप्पे ठरवण्यासाठी नक्कीच मदत केली. ही शाळा तिच्या-तिच्या वेगाने हळूहळू वाढत गेली असती सावकाश, पण एक गमतीची घटना घडली आणि गणवेश-गृहपाठ नसलेली शाळा एकदम प्रसिध्द झाली, आसपासच्या गावांसुध्दा दीदीकडे शाळेची मागणी सुरू केली.

 

झाले असे - माहितीपट बनवणारा मुंबईचा एक तरुण फिल्ममेकर त्याच्या कामासाठी त्या परिसरात आला होता. भारती शाळा सुटल्यावर घरी निघाली होती. मुलेही तिच्या मागे जात होती. पन्नाशीची एक स्त्री आणि तिच्या मागे जाणारा मुलांचा घोळका बघून त्याने जवळच्या दुकानदाराला विचारले, ''कोण आहेत ह्या मॅडम? आणि मुले अशी त्यांच्यामागे का जाताहेत?'' त्या दुकानदाराने त्याला गावातील धर्मशाळेत भरणाऱ्या शाळेची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला, तेव्हा शाळेतली मुले धर्मशाळेच्या छताच्या लोखंडी कांबी धरून कसरत करीत होती. त्याने पुढे होत भारतीला विचारले, ''मैने सुना था ये स्कूल है...'' भारती म्हणाली, ''आपने सही सुना है.. स्कूलही है यह।'' मग ही छताला उलटी लटकत असलेली ही भुते नेमकी काय करतायत? असा काहीसा आविर्भाव त्याच्या छताकडे बघणाऱ्या चेहऱ्यावर होता. भारतीशी झालेल्या गप्पांमध्ये त्याला ह्या शाळेची माहिती मिळाली, तेव्हा उत्स्फूर्तपणे त्याने तिला विचारले, ''उद्या तुमच्या शाळेचे थोडे शूटिंग केले तर चालेल का?'' भारतीने होकार देताच दुसऱ्या दिवशीची शूटिंगची वेळ ठरली आणि शाळेतून निघता-निघता मुलांना म्हणाली, ''उद्या आपल्या शाळेचे शूटिंग होणार आहे. अंगभर कपडे घालून या रे.'' मग मुलांचा प्रश्न, ''शूटिंग म्हणजे काय?'' भारती म्हणाली, ''तुम्ही नाही का सिनेमाच्या पडद्यावर सलमान खान-शाहरुख खानला बघता, तसे तुम्ही टीव्हीच्या पडद्यावर दिसणार आहात.'' मुलांना नेमके काय 'समजले'(!) ह्याचा प्रत्यय दुसऱ्या दिवशी लगेच आला. दुसऱ्या दिवशी भारती शाळेपाशी आली, तर तिथे केवळ मुलेच नाही, लहान-मोठे, बायाबापडया सगळयांची ही झुंबड तिथे जमा. ही कसली गर्दी? भारती बुचकळयात पडली, तेव्हा मुलांनी उलगडा केला, ''दीदी, आपनेही कहा था ना, सलमान खान-शाहरुख खान आनेवाले है।''आता दीदीला कपाळाला हात लावायची वेळ आली होती..! पण समजुतीच्या ह्या घोटाळयामुळे एक गोष्ट साधली - मुलांच्या आई-वडिलांनी, शेजार-पाजारच्या गावातील लोकांनी, सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी मुलांची स्वच्छ, नीटनेटकी शाळा बघितली, मुलांनी म्हटलेली प्रार्थना ऐकली... हे सगळे खूप प्रभावित करणारे होते. मग अनेकांनी आग्रह धरला, आमच्या गावातही शाळा सुरू करा. मग एका महिन्यात एकाच्या पाच शाळा झाल्या, मग आठ आणि त्यानंतर पंधरा! ह्या मुलांना शिकवणार कोण? बाहेरून शिक्षक आणणे परवडणे शक्य नव्हतेच. त्या-त्या गावातील स्त्रिया-मुलींना प्रशिक्षित करणे हा अधिक शहाणा पर्याय होता. त्या कारणाने गावातील मुलींना रोजगार मिळणार होता आणि स्थानिक लोकांची त्यांच्या प्रश्नांमध्ये गुंतवणूक वाढणार होती. मग हे शिक्षक प्रशिक्षण सुरू झाले. भारतीच्या कामाबद्दल कुणकुण असलेल्या आणि त्यामुळे तिची मैत्रीण झालेल्या गणिताच्या प्रोफेसर डॉ. ललिता देशपांडे ह्यांच्या सक्रिय मदतीने हे प्रशिक्षण सुरू झाले.

पण एक ते पंधरा शाळा हा प्रवास कागदावर किंवा एखाद्या चित्रपटात दिसतो, तसा हा सोपा आणि झटपट मात्र नक्कीच नव्हता. तसा तो कधीच होऊच शकत नाही. परिस्थिती, माणसे, त्यांच्या वेगवेगळया वृत्ती आणि कधी-कधी व्यवस्था अडसर बनून मध्ये उभी राहते आणि त्यामुळे भोवताली असे झाकोळून येते की पुढचे काहीच दिसेनासे होते. असे अनेक क्षण भारतीच्या वाटयालाही आले आणि त्यातील काही मनात खोल रुतूनसुध्दा बसले. त्यातील एक लेपा क्षेत्रात तिथल्या स्थानिक लोकांनी तिच्या बसला घातलेल्या घेरावाची...

झाले असे - लेपा क्षेत्र हे महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या डूब क्षेत्रात येते. शासनातर्फे ह्या क्षेत्रातील नागरिकांना अनुदान आणि पुनर्वसनासाठी जागा दिल्यावरसुध्दा कोणीच जागा सोडून जाण्यास तयार नव्हते. पुनर्वसन आणि ह्या प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलन त्या वेळी तापलेलेच होते. ही कोंडी फोडण्यासाठी अखेर कायदेशीर पाऊल उचलण्यात आले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वांना जागा सोडून जाण्याचे आदेश आले. त्यात भारतीची शाळा ज्या जागेत भरत होती त्या जागेचासुध्दा समावेश होता. पण ह्याचा अर्थ शाळा बंद होणार नव्हती. लेपा पुनर्वास क्षेत्रात असलेल्या एका शाळेच्या दोन-तीन वर्गांमध्ये सकाळी दोन-तीन तास भारतीच्या शाळेसाठी देण्यात आले होते. शासकीय आदेश डावलण्याचा प्रश्नच नव्हता, शिवाय शासनाचा हा प्रस्ताव म्हणजे एका परीने संकटात लाभलेले वरदानच होते. आजपर्यंत लेपा गावात एकाच मोठया धर्मशाळेत एकाच वेळी वेगवेगळया वयाच्या शंभर मुलांना एकत्र शिकवण्यापेक्षा आता वेगवेगळया वयाच्या मुलांना वेगळया वर्गांमध्ये विभागून शिकवणे शक्य होणार होते, शिवाय मुलांना खेळायला मैदान मिळणार होते. शाळेचा सगळा संसार गाडीत भरून निघण्याची तयारी सुरू झाली आणि बघता-बघता गावातील माणसे गाडीभोवती जमू लागली. आधी दहा... पन्नास... शंभर... आणि मग जवळजवळ दोन अडीचशे माणसांचा जमाव जमला. ही गर्दी गावातील शाळेला निरोप देण्यासाठी नक्कीच नव्हती, हे त्यांची देहबोलीच सांगत होती. हळू-हळू दगडफेकीची भाषा सुरू केली आणि दोन-चार छोटे दगड गाडीवर येऊन पडलेसुध्दा. गाव सोडून पुनर्वास क्षेत्रात जाण्यास विरोध असणाऱ्या ह्या लोकांचा शाळा हलवण्याससुध्दा सक्त विरोध होता. जिल्हाधिकाऱ्यांचा, म्हणजेच सरकारचा आदेश इतका निमूटपणे स्वीकारणे गावकऱ्यांना मुळीच मान्य नव्हते. गावकऱ्यांचा हा पवित्रा अनपेक्षित होता आणि गाडीवर दगडफेक करण्याची भाषा तर धक्कादायक. दोन-तीन वर्षे मुलांना जीव तोडून शिकवणाऱ्या, त्या बदल्यात एका पैशाचीसुध्दा अपेक्षा न करणाऱ्या आणि ह्या शिक्षणाचे मुलांवर होणारे परिणाम बघणाऱ्या लोकांचे हे रूप समजणे शक्यच नव्हते. दगडफेकीची धमकी आणि गाडीवर लहान का होईना दगड येऊन पडले आणि मग मात्र भारतीने एकदम चंडीचे रूप धारण केले आणि तेवढयाच उग्रपणे सर्वांना सुनावले, ''गाडीला एक बारीक जरी ओरखडा गेला आणि ड्रायव्हरला नखभर जरी इजा, तरी सर्वांना तुरुंगात जावे लागेल.'' गावकरी काहीसे बिचकले. एरवी कमालीच्या सौम्य असणाऱ्या दीदीचे हे कठोर शब्द त्यांना परिणामांची जाणीव द्यायला पुरेसे असावे, कारण गावकरी हळूहळू काढता पाय घेऊ लागले. बघता बघता मुलांची शाळा त्यांच्या डोळयासमोरून निघून गेली. पुढचे दोन-तीन दिवस ह्या तणावपूर्ण अबोल्यातच गेले, पण आपल्या भाषेतील आणि कृतीतील चूक गावकऱ्यांना जाणवायला लागली होती आणि मुलांनी तर त्याच दिवशी त्यांच्या दीदीला फोन करून ''आज आपके साथ गाववालोंने जो बर्ताव किया, उसके लिये हम बच्चे आपकी क्षमा मांगते है'' अशा नि:संदिग्ध भाषेत दीदीची माफी मागितली होती! आता माफी मागण्याची गावकऱ्यांची पाळी होती, कारण त्यांच्या मुलांना दीदीची ही शाळा हवी होती. मुलांना लेपा पुनर्वासमधील शाळेत पाठवू आणि गाडीची काळजी घेऊ, असे लेखी निवेदन गावकऱ्यांनी दिल्यावर मुलांची शाळा परत सुरू झाली. गाई-म्हशी चरायला 7-8 कि.मी. सहज चालणारी ही मुले. त्यांना साडेतीन किलोमीटर चालून शाळेत येणे नक्कीच मंजूर होते, कारण तिथे येण्यात त्यांना आनंद होता.

दीदीला आपल्या गावाने जी वागणूक दिली, त्याबद्दल फक्त मुलांनाच दु:ख नव्हते, गावातील प्रत्येक शहाण्या माणसाला ते होते. फक्त प्रत्येकाची व्यक्त करण्याची रीत निराळी आणि आपली अशी होती. लेपा गावाची सून असलेल्या आणि भारतीच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या तरुण स्वातीने अगदी छोटया पण अतिशय बोलक्या कृतीद्वारा आपली नाराजी व्यक्त केली.. कोणत्या? तर, तिचा एरवी कायम डोक्यावर असणारा पदर खांद्यावर आला. गावातील बुजुर्ग व्यक्तींबद्दल वाटणारा सन्मान व्यक्त करण्यासाठी सतत माथ्यावर राहणारा हा पदर, तो खांद्यावर कसा आला? भारतीने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, ''उन्होने आपके साथ जो किया वो उन्हे सम्मान देने लायक नही था।''

कसोटीच्या वेळी ठामपणे कोणीतरी मागे उभे राहणे ही भारतीच्या आयुष्याची एक मोठी कमाई, तिने स्वकष्टाने मिळवलेली. म्हणून तर एका परदेशी संस्थेने अगदी अनपेक्षितपणे, आधी स्वेच्छेने देऊ केलेले, भलेमोठे फंडिंग मागे घेतले तरी भारतीची एकही शाळा बंद पडली नाही. ही घटनाही अशीच धक्कादायक. हाँगकाँगमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या ह्या संस्थेने आपल्या भारतातील शाखेच्या माध्यमातून दिलेल्या आर्थिक मदतीतून भारतीने पाच गावात शाळा सुरू केल्या. एक-दीड वर्ष छान काम सुरू राहिले, तेव्हा ह्या कामाने प्रभावित झालेल्या ह्या संस्थेने आणखी शाळा उभ्या करण्यासाठी भलीमोठी मदत देऊ केली. ती मदत फक्त शाळांसाठी नव्हती, तर एकूणच त्या गावाच्या विकासासाठी जे काही आवश्यक आहे त्यासाठी होती. पहिली चर्चा सप्टेंबरमध्ये झाली, त्यात बजेट आखले गेले. नवे आव्हान स्वीकारण्यासाठी भारतीचे सहकारी सिध्द होत असतानाच ह्या संस्थेकडून डिसेंबरमध्ये भारतीला इंदोरमध्ये एका मीटिंगचे आमंत्रण आले. सर्वांनाच वाटले, बहुधा मदतीचा पहिला चेक मिळणार असावा. उत्साहाने मंडळी मीटिंगला गेली खरी, पण सर्व पदाधिकाऱ्यांचे खिन्न चेहरे बघून त्यांच्या मनात शंकेने फणा काढला. मीटिंगच्या प्रारंभी संस्थेच्या प्रतिनिधींनी प्रस्ताव मांडला, ''तुम्हाला तुमच्या कामाचे स्वरूप बदलता येईल?'' ''म्हणजे काय?'' भारतीला प्रश्न पडला. यावर ते घाईघाईने पुढे म्हणाले, ''तुम्ही अगदी शंभर गावांमध्ये काम सुरू केलेत तरी हरकत नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. फक्त...'' ''फक्त काय?'' ''आमची विनंती आहे की तुम्ही तुमच्या कामाचे स्वरूप बदला. म्हणजे मुलांचे शोषण, बालमजुरी, महिलांचे हक्क अशा कोणत्याही कामासाठी आम्ही हवे तेवढे फंडिंग द्यायला तयार आहोत, पण शिक्षणाच्या कामासाठी मदत देणे आता शक्य नाही.'' ''कारण?'' ''भारत सरकारने शिक्षण हा मूलभूत हक्क मान्य केल्यामुळे आता ग्रामीण भागातसुध्दा 90 टक्के मुले शाळेत जायला लागली आहेत. त्यांना गणवेश, माध्यान्ह भोजन मिळतेय. त्यामुळे भारतात आता शिक्षणासाठी फंडिंगची आवश्यकताच नाही असा सरकारी रिपोर्ट आमच्याकडे आलाय. म्हणून हाँगकाँगमधील आमच्या बोर्डाने हा निर्णय घेतलाय.'' अहवालाचा हवाला देताना वास्तव काय आहे हे कदाचित सर्वांना मनोमन ठाऊक होते, पण सरकारी आदेशामुळे हात बांधलेले होते! हे सगळेच अगदी अनपेक्षित आणि अगदी नाइलाजाने निरुत्तर करणारे. पण परिस्थिती तिच्या कामाला अशी टोकावर आणून करीत असतानासुध्दा भारतीची मान ताठ आणि निर्धार पक्का होता. आर्थिक मदत मिळावी ह्यासाठी कामाची वाट बदलायची नाही. कारण आपल्या संस्थेचे ध्येय आर्थिक मदत मिळवणे नाही, ह्या वंचित मुलांना शिक्षण देत सक्षम करणे हे आहे... तिने त्यांच्या प्रस्तावाला नम्रपणे नकार देत तब्बल फार मोठया रकमेच्या मदतीवर पाणी सोडले. हे करताना तिला मनोमन हे ठाऊक होते की आर्थिक मदत नाही म्हणून शाळा बंद करणे शक्य नाही. आता काय? तिची ही कोंडी नाशिकमधील तिच्या स्नेही परिवारात समजली. एकाकडून दुसऱ्याला आणि मग तिसऱ्याला... सगळया स्नेह्यांची एक उत्स्फूर्त बैठक झाली आणि सर्वांनी ठरवले की ह्या शाळेच्या किमान एका विद्यार्थ्याचा वर्षभराचा खर्च आपण एकेकाने उचलायचा. आणि मग भारतीच्या ह्या मुलांना असे कितीतरी सहृदय पालक मिळत गेले... मिळतच आहेत.

जीवन शिक्षण देणाऱ्या पंधरा शाळा आणि त्यात शिकणारी मुले... भारतीचे स्वप्न ह्यापेक्षा मोठे होते का? कदाचित नसेल, पण परिस्थिती नावाच्या जादूगाराला मात्र हे मान्य नसावे. भारतीच्या नावाने खूप काही मोठे तिच्या पोतडीत होते. त्या वाटेने तिला नेण्यासाठी तिने पुन्हा एक छोटेसे निमित्त काढून तिच्या समोर धरले.

 

एका सरकारी शाळेत गणित शिकवत असलेले जे काही शिकवले जातेय ते चुकीचे आहे असे वर्गातील काही मुलांचे म्हणणे होते. मुलांच्या हा 'आगाऊपणा' गुरुजींना काही रुचला नाही. त्यामुळे रागावलेल्या गुरुजींनी मुलाना ठोकले व ''इतकी अक्कल आहे, तर उद्यापासून शाळेत येऊ नका'' म्हणाले. एरवी, शाळेत नाइलाजानेच येत असलेल्या मुलांना ह्या निर्णयाबद्दल क्षणभरसुध्दा वाईट वाटले नाही. ह्या घटनेने ही मुले त्या गुरुजींच्या तावडीतून सुटली, पण बाकीच्या मुलांचे काय? त्यांना असेच चुकीचे शिक्षण मिळणार? आणि त्याबद्दल गुरुजींना जाबही विचारण्याची सोय नाही. ह्यावर उत्तर काय? आता आपणच औपचारिक शिक्षण देणारीही शाळा सुरू करायची! भारतीने ठरवले आणि तिच्या कामाला आणखी एक वाट फुटली. लेपा पुनर्वास क्षेत्रात पहिली शाळा सुरू झाली, मग दुसरी आणि तिसरीसुध्दा. पण एकामागून एक वाढत गेलेल्या शाळांची आणि त्यात शिकणाऱ्या मुलांची आकडेवारी देऊन ह्या कामाचे मोठेपण सिध्द करण्यासाठी हे लिहीत नाहीये. तो ह्या शाळांचा हेतूही नव्हता. ह्या कामाचे मोठेपण कशात आहे? हे मोठेपण आहे ह्या शाळांमुळे त्या त्या गावांमध्ये बदलत गेलेल्या वातावरणात आणि मुलांच्या दृष्टीकोनात. ह्या शाळांनी आणि त्यात मुलांना भेटलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या माणसांनी मुलांसमोर कितीतरी नव्या खिडक्या उघडल्या, ज्यामधून त्यांना आजवर त्यांच्या नजरेच्या टप्प्यात न आलेले जग दिसू लागले. ह्या जगाने त्यांना वेगळया प्रकारचे शहाणपण दिले.

जीवन शिक्षण देणे हेच ह्या शिक्षणाचे उद्दिष्ट असल्याने ते हर मार्गाने जीवनाला भिडणे हे स्वाभाविक होते. जगण्याला आधार देणारा रोजगार हा फक्त शाळेच्या शिक्षणातून मिळणार नाही, हे जाणणाऱ्या भारतीने ह्या मुलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी आधी प्रयत्न सुरू केले. ह्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही मुलांना तिने पाबळच्या विज्ञान आश्रमात प्राथमिक ग्रामीण तंत्रज्ञान शिकवणाऱ्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले. ह्या आश्रमात शिकत असताना जे विद्यार्थी आश्रमाच्या कामात सहभाग देतात, त्यांच्या नावावर प्रत्येक कामाबद्दल एक विशिष्ट रक्कम जमा होत असते. पाबळमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या गोलूने आश्रमात पोळया करण्यापासून पाहुण्यांना मदत करण्यापर्यंत इतकी तऱ्हेतऱ्हेची कामे केली की त्याने त्या अभ्यासक्रमासाठी जी फी भरली, त्याच्यापेक्षा जास्त कमाई त्याने ह्या वर्षभरात केली. हा अभ्यासक्रम पूर्ण करताना एका मोठया कंपनीत त्याला नोकरीची संधी मिळाली! एरवी कोणत्याही शहरी मुलासाठी 'कंपनी'मधील नोकरी म्हणजे जणू आयुष्याच्या सार्थकतेचा क्षण. गोलूचा प्रतिसाद काय होता? त्याने नम्रपणे ह्या नोकरीला नकार दिला. ''क्या करेंगे वंदनाताई वहां नोकरी करके... रोज एकही काम करना पडता।'' गप्पा मारताना गोलू सांगत होता. उत्पादनाच्या एका मोठया प्रक्रियेचा एक छोटा हिस्सा होऊन रोज तेच काम करीत राहून फक्त पैसे कमावत राहण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आपल्या आयुष्यात आणि भूमीत परत जाऊन काम करणे हे त्याचे स्वप्न होते, सुख होते. हे त्यांना दीदीच्या शाळेत शिकता शिकता कळत गेले होते. डोळयाला झापड बांधून, घरापासून दूरवर एखाद्या शहरात नोकरीच्या चक्रात धावणे मान्य नसलेली गोलू-शिवमसारखी तरुण मुले हे भारतीच्या शाळेचे आणि वसतिगृहाचे एक आश्वासक भविष्य आहे. ही मुले काय काय करू शकतात? नर्मदालयाच्या तिन्ही शाळा आणि वसतिगृहासाठी लागणारे फर्निचर ह्या मुलांनी तयार केले आहे. नर्मदालयाच्या गोशाळेत असलेल्या तेवीस देशी गाईंची सगळी देखभाल, त्यात गाभण गाईच्या बाळंतपणापासून रोजचे दूध काढणे, गोवऱ्या, गोबर गॅस, शेणखत तयार करणे ही सगळी कामे मुले सफाईने करतात. शाळांच्या बांधकामात विजेचे वायरिंग आणि प्लंबिंग ही कामे ही मुले तज्ज्ञाच्या हाताखाली शिकली आणि दीदीच्या शाळेत येईपर्यंत कॉम्प्युटरसारख्या गोष्टी फक्त चित्रातच बघणाऱ्या अजयसारख्या मुलाने त्याच्या वसतिगृहातील सीसीटीव्ही बसवण्याचे काम एकहाती करताना तंत्रज्ञान शिकण्यात शहरी मुलांइतकाच 'स्मार्टनेस' ह्या मुलांमध्ये असल्याचे दाखवून दिले. आश्रमात आलेला संगणक आणि त्यावरील इंटरनेट नावाच्या अद्भुत अफाट जगाची ओळख झाल्यावर तर मुलांच्या जगण्याच्या कक्षा चहू दिशांनी जणू जगाला जाऊन भिडल्या. नर्मदा खोऱ्यातील मुलगा थेट पोर्तुगालमध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जाऊन पोहोचला आणि भाभा अणुसंशोधन केंद्र हे नर्मदालयाचे मध्य प्रदेशातील पहिले 'नॉलेज पार्टनर' बनले, ही सगळी कहाणी फारच रोमांचक...

 

झाले असे - NCERT ह्या संस्थेतर्फे एक राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लेपा पुनर्वास क्षेत्रात असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या शंकर नावाच्या विद्यार्थ्याने तयार केलेला सौर ऊर्जेवर चालणारा ड्रायर ह्या स्पर्धेत सादर करण्यात आला. इंटरनेटवर भटकंती करीत त्याची मदत घेत तयार केलेला हा ड्रायर मोड आलेली कडधान्य किंवा विविध भाज्या सुकवण्यासाठी अतिशय उपयुक्त होता. ह्या स्पर्धेत इतर अनेक 'स्मार्ट' स्पर्धकांना मागे टाकीत शंकरने पहिले पारितोषिक पटकावले. ह्या एका बक्षिसाने मग ह्या कहाणीत अनेक नाटयपूर्ण वळणे आली. इंटरनेटच्या भटकंतीतच त्याला भाभा अणुसंशोधन केंद्राची साइट दिसली आणि त्यांच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाने अशाच प्रकारचा ड्रायर तयार केल्याचे त्यांना वाचायला मिळाले. शंकर आणि आश्रमातील एक दादा राघव हे दोघेही मुंबईत 'भाभा'मध्ये माहिती मिळवण्यासाठी थडकले. सुरक्षा रक्षकाने अडवले, ओळखपत्र मागितले, कोणाची अपॉइंटमेंट आहे का असे विचारले. ओळखपत्र बघितले तेव्हा दिसले, शंकर वयाने लहान, जेमतेम 17 वर्षांचा होता, त्याला आत प्रवेश मिळणे शक्यच नव्हते. पण खरगोन जिल्ह्यातून कोणी मुले केंद्रात भेटायला आली आहेत, ह्याची कुणकुण लागताच 'भाभा'चे संचालक असलेले डॉ. श्रीकृष्ण गुप्ता ह्यांनी त्यांना भेटायला बोलावले. नकाराचे सगळे अडसर सहज दूर झाले, कारण एकच - गुप्ता खरगोन जिल्ह्यातील एका खेडयात शिकलेले होते. आपल्या गावच्या ह्या मुलांनी 'भाभा'पर्यंत मजल मारलीच कशी अन कशासाठी, ह्या उत्सुकतेने त्यांनी मुलांना बोलावले आणि 'नर्मदालय' त्यांच्यापर्यंत पोहोचले. ह्या मुलांची धडपड, कोणतेही आधुनिक साधन हाताशी नसताना काही करून बघण्याची त्यांची जिद्द हे सगळे त्यांना नि:शब्द करणारे होते. मग गोष्टी झपाझप पुढे सरकल्या. इतक्या, की लेपा पुनर्वास क्षेत्रात असलेल्या ह्या आश्रमात भाभा अणुकेंद्राचे ग्रामीण तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्याचे नक्की झाले आणि त्याच्या उद्धाटनासाठी पाहुणे ठरले भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर. मध्य प्रदेशातील एका छोटयाशा गावात असलेल्या एका वसतिगृहात ह्या द्रष्टया माणसाचे पाय लागणार होते... कालपर्यंत मिरचीच्या शेतात काम करणारी, गुरे राखणारी ही मुले आज एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाला आपण तयार केलेल्या एका उपकरणाचे प्रात्यक्षिक दाखवत होती. आणि ते उपकरण कुठल्याही आधुनिक प्रयोगशाळेत तयार झालेले नव्हते...! एखादे सुंदर स्वप्न पडावे असेच सगळे घडत होते. आणि त्यानंतर मग इंटरनेटच्या भटकंतीतच ह्या मुलांना माहिती मिळाली ती पोर्तुगालमध्ये होणार असलेल्या 'कन्सोल फूड' नावाच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दल. तिथेही ह्या ड्रायरचे सादरीकरण करण्यासाठी शंकरला आमंत्रण मिळाले. हा प्रकल्प आता एकेक स्पर्धा जिंकत बाजारपेठेत येण्याच्या मार्गावर आहे.

हे असे काही प्रयोग करून बघण्याचे कुतूहल आणि जिज्ञासा, हाताशी असलेली संसाधने वापरून नवे काही करण्याची ह्या मुलांची धडपड हे सगळे बघत-ऐकत असताना माझ्या डोळयापुढे येतात ते एखाद्या बीजाला फुटलेले, चहू अंगाने फोफावणारे रसरशीत पोपटी धुमारे. पावसाच्या दोन सरी आणि निगुतीने, प्रेमाने केलेली देखभाल असे काही मिळताच वाढण्यास उत्सुक असे धुमारे... ह्या बीजामध्ये सुप्त असलेले असे अनेक गुण भारतीने केलेल्या जिव्हाळयाच्या देखभालीने उजळत निघतायत. त्यातून जन्म झाला ह्या मुलांच्या वाद्यवृंदाचा. आदिशंकराचार्य आणि स्वामी वासुदेवानंद सरस्वती ह्यांनी रचलेली अतिशय अवघड अशी स्तोत्रे ह्या मुलांना मुखोद्गत आहेत. एका रागातून दुसऱ्या रागात सहज प्रवेश करीत अनेक नदी स्तोत्र ही मुले जेव्हा सुरू करतात, तेव्हा नर्मदेचा निर्मळ खळाळता प्रवाह डोळयापुढे येतो! बसमधून शाळेत निघालेली इतर मुले रडत असताना भारतीच्या शाळेतील मुले मात्र बसमध्ये त्यांच्या पाठयपुस्तकातील कविता गात असतात. शुभदा मराठेसारख्या जाणत्या कलाकाराने ह्या मुलांच्या कंठातील स्वरांमध्ये प्राण फुंकले. आता हा वाद्यवृंद पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये भल्या भल्यांना चकित करतो आहे. अगदी बुजऱ्या, किरकोळ दिसणाऱ्या ह्या मुली आणि मुले, ह्या कंठात हा स्वर आणि कानावर पडलेले घडाघडा पाठ करण्याची ही तेज बुध्दी हा नेमका कोणाचा आशीर्वाद? नर्मदेचा?

आणि शेवटी, सिनेमाच्या क्लायमॅक्सप्रमाणे भारतीच्या आश्रमाची कहाणी. भारतीच्या कामाला स्वत:चे, हक्काचे छप्पर मिळाले त्याची. ते अशा एका नागा साधूने, ज्याला भारतीचे नावसुध्दा ठाऊक नव्हते! ही गोष्ट विश्वास बसू नये अशीच. नर्मदा विस्थापनात नुकसानभरपाई म्हणून या साधूला 5400 चौ.फुटाची ही जागा व आश्रम बांधण्यासाठी मिळाली होती. 2012 साली सोमवती अमावस्येच्या दिवशी महाराज भारतीच्या एका शाळेत आले आणि तिथे शिकवणाऱ्या एका शिक्षिकेला म्हणाले, ''तुम्हारी दीदीको बुलाओ।'' दीदी नम्रपणे त्यांच्यासमोर गेली आणि म्हणाली, ''क्यो याद किया बाबा?'' तेव्हा हातात असलेला कागद आणि त्याबरोबर किल्ल्या तिच्या हातात देत बाबा म्हणाले, ''आजसे ये आश्रम तुम्हारे बच्चोंके लिये।'' कमरेला फक्त टॉवेल बांधलेला हा उग्र जटाधारी साधू आपल्या हातात कशाच्या किल्ल्या सोपवतो आहे, हेच भारतीला कळत नव्हते.. आणि समजले, तेव्हा आश्चर्य, आनंद, धक्का, अविश्वास अशा अनेक भावनांचा कल्लोळ तिच्या मनात होता. कडोसरीला असलेले चार आणेसुध्दा काढून देताना हात जड व्हावे अशा ह्या काळात आपल्या आश्रमाची भली थोरली जागा आणि त्यानंतर काही महिन्यांतच आपली गोशाला ह्या गोष्टी भारतीच्या स्वाधीन कराव्या, असे ह्या साधूला का वाटले असावे? किल्ल्या हातात मिळाल्या, तरी कधीतरी महाराजांचे मत बदलू शकेल असे कितीतरी दिवस तिला वाटत होते. पण रोज त्यांचा निरोप यायचा, ''कोर्टमे जाना है।'' त्याच्या निर्णयाची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी. आज ह्या आश्रमात दुर्गम आदिवासी भागातील 45 मुले राहतात. ह्याच महाराजांनी दिलेली आणि केवळ त्यांच्या हट्टापायी निरुपायाने भारतीला स्वीकारावी लागलेली गोशाला जवळच आहे. आज भारतीचे काम बघण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची ऊठबस आणि आतिथ्य ह्या आश्रमात होते. इथे मुले स्तोत्र शिकतात, गाणी म्हणतात, मस्ती करतात. शंकरचा ड्रायर इथल्या अंगणात काहीतरी सुकवत उभा आहे. गावातील बायकांना शिवणकाम शिकवून त्यातून एक मोठा उद्योग निर्माण झाला तो ह्याच जागेत. आणि आमच्यासारख्या पाहुण्यांबरोबर मुलांच्या पाणीपुरीच्या जंगी पाटर्या होतात त्या ह्याच आश्रमात!

तर ही कहाणी 'नर्मदा' हे नाव आणि तिच्या पाण्याचा आशीर्वाद घेऊन उभ्या असलेल्या एका मोठ्ठया कामाची. शब्दांच्या मर्यादेत न मावणारी आणि म्हणून खूप काही सांगायचे बाकी असलेली. पण अशा अर्थपूर्ण कोऱ्या जागा आपल्या मनातील कुतूहल नेहमीच जागे करतात आणि मग सुरू होतो शोध, त्यातील अर्थ शोधण्याचा. तो शोध प्रत्येकाने आपला-आपला करावा. त्या निमित्ताने ह्या मुलांना, भारतीला भेटावे. ह्यासाठीच ह्या कोऱ्या जागेचे प्रयोजन...

 भारती ठाकूर नावाच्या एका साध्याशा दिसणाऱ्या, पण व्यक्तिमत्त्वात सात्त्वितेची असीम ताकद आणि त्यावर श्रध्दा असलेल्या स्त्रीच्या एका अमर्याद कुटुंबाची गजबज असलेला हा आश्रम बघताना त्या कुटुंबाचा, त्यातील परस्पर जिव्हाळयाचा एखाद्या क्षणी हेवा वाटल्यावाचून राहत नाही... कसा, ते प्रत्यक्ष अनुभवायलाच हवे.

9960800258,  0253-2363511

भारती ठाकूर- संस्थापक, नर्मदालय - ९५७५७५६१४१