इस्लामी संस्कृती विधायकतेकडून विध्वंसाकडे

 विवेक मराठी  13-Nov-2018

भारतासहित अनेक देशांत इस्लामच्या नावाने जो दहशतवादी हिंसाचार अव्याहत सुरू आहे, त्याचा इस्लामशी कसलाही संबंध नाही. त्याचा संबंध आहे तो चौदाव्या शतकापासून इस्लामचा जहाल सनातनी अर्थ लावून जी विद्वेषी आणि हिंसक मानसिकता निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत, त्या विखारी मानसिकतेशी आहे. त्यामुळे या अमानुष हिंसाचाराचा मुकाबला बळाने करावा लागेलच. पण तेवढे पुरेसे नाही. कारण ज्या विखारी विचारप्रणालीच्या आधारे हिंसाचारी मानसिकता तयार करण्यात येते, त्या विचारप्रणालीच्या मुळावरच पर्यायी विचारप्रणालीने घाव घालावे लागतील.

 इ.स. 610मध्ये इस्लामचा जन्म झाला. त्या क्षणापासून नंतरच्या चार-पाच शतकांच्या कालखंडात अरबस्थानातील टोळीवजा समाजात आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक अशा समाजजीवनाच्या तिन्ही पातळयांवर समग्र क्रांती घडून आली. समता, न्याय आणि मानवतावादी दृष्टीकोन ही या क्रांतीची पायाभूत मूल्ये होती. या क्रांतीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे याच काळात ज्यांना ज्ञानसाधनेची कसलीच परंपरा किंवा इतिहास नव्हता, अशा अरबांनी ज्ञान-विज्ञान, साहित्य, कला, वैद्यक, रसायनशास्त्र अशा ज्ञानाच्या विविध क्षेत्रांत एक नवी आणि समृध्द अशी परंपरा निर्माण केली. ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात अरबांचे सर्वात मोठे योगदान कुठले? असा प्रश्न जर कोणी विचारला, तर त्याचे एकच उत्तर देता येण्यासारखे आहे. अरब संशोधकांनी आणि अभ्यासकांनी दहाव्या शतकात (अब्बासी खलिफांच्या काळात) ग्रीक भाषेतील सर्व ज्ञानभांडार अरबी भाषेत अनुवादित करून आपल्याबरोबर आपल्या देशात नेले. तेथून ते पुढे युरोपात गेले. कारण तोपर्यंत या ज्ञानभांडाराची ग्रीक हस्तलिखिते काळाच्या ओघात नष्ट झाली होती.

याच वर्षी पैगंबरांच्या मुखातून कुराणाचा पहिला संदेश प्रकट झाला तो असाच ज्ञानसाधनेचा होता. कुराणाच्या याच श्लोकात लेखणीचाही उल्लेख असून लेखणी हे ज्ञान मिळविण्याचे साधन आहे, त्याचा उपयोग करून ज्ञान मिळवा आणि त्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करा, असा त्याचा व्यापक अर्थ होता. (कुराण 96:1-5)

कुराणाच्या या पहिल्या संदेशाबरोबरच ''ज्ञान मिळविण्यासाठी चीनला जावे लागले तरी जा'' हे त्यांचे वचनही प्रसिध्द आहे. या वचनातून दोन गोष्टी सूचित होतात. एक म्हणजे ज्ञान हे धर्मग्रंथ किंवा धार्मिक परंपरांपुरतेच मर्यादित नसते, तेव्हा ते जिथे जिथे आढळेल तेथून तेथून ते आत्मसात करा, असा संदेश त्यातून मिळतो, तर दुसरीकडे साधनेशिवाय ज्ञान मिळविता येत नाही, असाही अर्थ त्यातून ध्वनित होतो. नंतरच्या काळात अरबांनी ज्ञानाच्या विविध क्षेत्रांत जी विलक्षण प्रगती केली, त्याची प्रेरणा कुराणाच्या पहिल्या संदेशात आणि पैगंबरांच्या उपरोक्त वचनात आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

अशी ही केवळ पाच शतकांच्या काळात सर्वांगांनी विकसित झालेली उदारमतवादी सहिष्णू इस्लामी संस्कृती तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात विघातक आणि विध्वंसक प्रवृत्तींच्या प्रभावामुळे अस्तंगत झाली आणि धार्मिकदृष्टया असहिष्णू आणि आक्रमक आणि सामाजिकदृष्टया संकुचित आणि विद्वेषी प्रवृत्तींनी तिची जागा घेतली. अर्थात हे परिवर्तन सहज किंवा अजाणता झालेले नाही. आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे प्रभुत्व साऱ्या जगभर असावे अशी स्वप्ने पाहणाऱ्यांचा एक वर्ग चौदाव्या शतकापासूनच तयार होऊ लागला होता. त्यांच्या प्रगतीला फक्त एकच अडसर होता, तो म्हणजे सातव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत विकसित झालेली सर्वसमावेशक उदारमतवादी संस्कृती! म्हणून ही संस्कृती नष्ट करणे नव्या जहाल सनातन्यांच्या दृष्टीने आवश्यक होते आणि चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते.

या सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाच्या संदर्भात दोन नावे प्रामुख्याने घेतली जातात. एक म्हणजे तकी अददीन-इब्न-तैमिया (1263-1328) या चौदाव्या शतकातील धर्मपंडिताचे आणि दुसरे महंमद इब्न अब्दुल वाहब (1703-1742) या जहाल सनातनी धर्मपंडिताचे! मात्र इब्न तैमियाचे नाव फार काळजीपूर्वक घेतले पाहिजे. कारण त्याच्या आचार-विचारात जहाल सनातनीपणाचा किंवा विद्वेषी हिंसाचाराचा अंशही आढळत नाही. तरीही 1303मध्ये मार्दिन शहरातून त्याने जो फतवा जाहीर केला, त्या फतव्यात त्याच्या निधनानंतर काही अक्षरांची अवैध उलटापालट करून त्या फतव्यातून हिंसाचाराचे समर्थन करणारा अर्थ निघू शकेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. पण त्याचे जनकत्व मात्र इब्न तैमियाला देऊन त्याला इतिहासात कायमचे बदनाम करून ठेवले आहे. त्याचा तपशील पुढे येणारच आहे.

महंमद इब्न अब्दल वाहबच्या बाबतीत असे काहीही झालेले नाही. त्याने पूर्ण विचार करून आपल्या चळवळीची विचारप्रणाली निश्चित केली आहे. पण विचारप्रणाली निश्चित करून थांबलेला नाही. आपल्या जहाल सनातनी चळवळीसाठी त्याने काही संकल्पना किंवा सिध्दान्तही निर्माण केले - तोहीद म्हणजे एकेश्वरवादाच्या संकल्पनेचा संकुचित आणि दाहक अर्थ लावण्याची प्रथा, पूर्वसुरींचे अंधानुकरण करण्याची नवी भाष्य परंपरा, शिर्क म्हणजे धर्मद्रोहाचा गुन्हा आण्ाि त्याची शिक्षा.

इब्न तैमिया (1263-1328)

मैत्रिपूर्ण सहजीवनाचा प्रणेता

तेराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि चौदाव्या शतकाचा पूर्वार्ध (1263 ते 1328) या काळात इब्न तैमिया नावाचा एक उदारमतवादी कुराण भाष्यकार आणि धर्मपंडित होऊन गेला. तुर्कस्थानातील मार्दिन शहराच्या हरान या उपनगरात 1263 साली त्याचा जन्म झाला. त्याचे वडील आणि आजोबा हंबाली न्यायिक संप्रदायाचे सदस्य होते. त्याचे पूर्ण नाव तकी अददीन इब्न तैमिया असे होते. त्याचे कुटुंबीय हंबाली संप्रदायाचे अनुयायी होते. त्यामुळे इब्न तैमियावरही हंबाली संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव पडणे साहजिक होते. त्याचबरोबर त्याच्यावर सुन्नी पंथाचाही प्रभाव पडला होता.

विरोधाभास असा की, सनातनी विचारांच्या आणि मूल्यांच्या संस्कारातच तो लहानचा मोठा झाला होता, तरी त्याला सुफी आध्यात्मिक परंपरेचीही ओढ होती. बाराव्या शतकातील प्रसिध्द सुफी संत अब्दुल कादीर जिलानी यांनी स्थापन केलेल्या कादरिया संप्रदायाची त्याने दीक्षा घेतली होती. सामाजिक कायदेकानून या विषयीची त्याची भूमिका वास्तववादी आणि पुरोगामी होती. म्हणूनच शरीयतच्या कायद्यातील सैल घटस्फोटाची तरतूद त्याला मान्य नव्हती. त्याने त्याविरुध्द फतवाही जाहीर केला होता, पण त्याचे हे आदर्शवादी विचार तत्कालीन धर्मपंडितांनाच नव्हे, तर सामान्यजनांना आणि शासनकर्त्यांनाही स्वीकारार्ह वाटले नाहीत. या संदर्भात त्याने जो फतवा जाहीर केला, तोही त्यांना मान्य झाला नाही. त्याबद्दल त्याला कारावासही भोगावा लागला.

इब्न तैमियाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण अशी परस्परविरोधी विचारांच्या आणि मूल्यांच्या मिश्रणातून झाली होती. त्यामुळे त्याचा आणि राज्यकर्त्यांचा सूर फारसा कधीच जुळला नाही. त्यामुळे त्याला अनेकदा कारावासही भोगावा लागला. असे असले, तरी जनमानसात मात्र त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. इस्लामी धर्मशास्त्राचा त्याचा व्यसंग, सामाजिक वास्तवाच्या दृष्टीकोनातून त्याने केलेले शरीयतचे विश्लेषण किंवा कुराणाचा अन्वयार्थ लावण्याची त्याची बौध्दिक प्रभल्गता याविषयी सर्वांनाच आदर होता.

कुराण हा इस्लामचा एकमेव पवित्र ग्रंथ असून त्यात आध्यात्मिक तत्त्वज्ञान, भौतिक जीवनाशी संबंधित विषय यांचे अनेक संदर्भ आलेले आहेत. त्याचा नेमका अर्थ समजावून सांगणे आवश्यक झाले होते. पैगंबरांनी आपल्या हयातीत ही जबाबदारी स्वत:च स्वीकारली होती. कुराणातील विविध विषयांशी संबंधित असलेल्या आयातींचा अन्वयार्थ आपल्या अनुयायांना आणि/किंवा सहकाऱ्यांना समजावून सांगण्याची प्रथा पैगंबरांनी सुरू केली. यातूनच कुराणाची भाष्यपरंपरा जन्मली आणि विकसित झाली. सुरुवातीच्या काळात पैगंबरांच्या सहकाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे कुराण शरीयत किंवा इतर इस्लामी परंपरा यांचा अन्वयार्थ सर्वांना सांगणे पैगंबरांना सहज शक्य होते. पैगंबरांच्या या सहकाऱ्यांना 'सहाबा' म्हटले जाते. या सर्वांना खुद्द पैगंबरांकडून इस्लामविषयीचे हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे पैगंबरांच्या महानिर्वाणानंतर कुराण आणि इतर धार्मिक परंपरा यांचा अन्वयार्थ लावण्याची व ती सर्वांना समजावून सांगण्याची जबाबदारी त्यांच्या या सहकाऱ्यांवरच टाकण्यात आली. कारण पैगंबरांच्या निकट सहवासामुळे त्यांना तो अधिकार प्राप्त झाला आहे, हे सर्वांनीच मान्य केले होते. सहाबांचा हा अधिकार वंशपरंपरागत आहे, हेही सर्वमान्य होते. इस्लामी धर्मशास्त्राचा आणि इतर धार्मिक परंपरांचा अन्वयार्थ लावण्याचा पैगंबरांच्या सहकाऱ्यांना प्राप्त झालेला हा अधिकार इब्न तैमियालाही मान्य होता. परंतु तो वंशपरंपरागत असावा हे मात्र त्याला मान्य नव्हते. कारण पिढी-दर पिढीच्या प्रक्रियेत ज्ञान हस्तांतरित होत असताना काही विषयांचा किंवा संज्ञांचा अर्थ लावताना त्यात चूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकीकडे सहाबांचा अधिकार मान्य करीत असतानाच तो अधिकार त्यांच्या तीन पिढयांपुरताच मर्यादित केला. त्यातील पहिल्या पिढीला सहाबा, पैगंबरांच्या महानिर्वाणानंतरच्या पिढीला (दुसरी पिढी) तबिवून आणि तिसऱ्या पिढीला अल् तबिईन अशी नावे देण्यात आली.

संत-महात्मे आणि त्यांच्या समाध्या

धार्मिक आचरणाबाबत किंवा धर्मांशी संबंधित इतर कुठल्याही विषयाबाबत नव्या प्रथा-परंपरा सुरू (Innovation) करण्यास इब्न तैमियाचा कठोर विरोध होता. संत-महात्म्यांच्या दर्ग्यांना किंवा समाधी स्थळांना भेट देऊन तिथे प्रार्थना करणे हे धर्मविरोधी कृत्य आहे, किंबहुना तो धर्मद्रोह आहे असे तो मानत असे. पण त्याच्या या भूमिकेला त्याच्या समकालीन विचारवंतांचा व अभ्यासकांचा विरोध होता. त्याच्या हयातीत इब्न तैमियाला तो विरोध सहन करावा लागलाच, तसेच त्याच्या निधनानंतरही त्याचे विचार पुसून टाकण्याचे प्रयत्न सतत होत होते. संत-महात्म्यांच्या समाधी स्थळांना भेटी देण्यास विरोध करणे योग्य नव्हे, असे विरोधकांचे म्हणणे होते. पैगंबरांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांना श्रध्दांजली वाहणे व त्यासाठी दूरचा प्रवास करावा लागला तरी तो करणे हे पवित्र कृत्य आहे, अल्लाहसमीप जाण्याचा तो एक मार्ग आहे असा त्या काळी सार्वत्रिक समज होता. हंबाली संप्रदायातील विचारवंत सोडले तर इतर संप्रदायांतील विद्वानांची भूमिका इब्न तैमियाच्या भूमिकेला विरोध करण्याचीच होती. या विरोधकांमध्ये अल-गझाली, अल-नवाबी, मुनावी आणि काझी अय्याद या इब्न तैमियाच्या काही समकालीन विद्वानांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. पैगंबरांच्या समाधीला भेट देणे मुस्लिमांचे कर्तव्य आहे, असे मानण्याबाबत या सर्वांचे एकमत होते.

मध्यस्थ - अल्लाह आणि मानव यांच्यातील सेतू

अल्लाहला जाणून घेण्यासाठी किंवा त्याला शरण जाण्यासाठी संत-महात्म्यांसारखा मध्यस्थ असावा, हा विषयही तेराव्या-चौदाव्या शतकात बराच चर्चेचा झाला होता. या बाबतीतही इब्न तैमियाची स्वत:ची विशिष्ट भूमिका होती. असे संत किंवा महात्मे हयात आहेत, तोपर्यंत ईश्वरभक्ती किंवा इतर धार्मिक बाबींसंबंधी त्याने मार्गदर्शन वा (आध्यात्मिक) मदत घेण्यास इब्न तैमियाचा विरोध नव्हता. पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या समाधी स्थळांना भेट देऊन प्रार्थना करणे, नवससायास करणे किंवा त्यांना साकडे घालणे म्हणजे बहुदैवतवादी श्रध्दाशीलता (Polytheism) आहे, पर्यायाने ती इस्लामच्या एकेश्वरवादी (तौहीदच्या) संकल्पनेच्या विरुध्द जाणारी आहे, इतकेच नव्हे, तर तो इस्लामी धर्मशास्त्रानुसार धर्मद्रोह आहे असे इब्न तैमियाचे ठाम मत होते. किंबहुना त्याने डोळसपणे घेतलेली ती भूमिका होती.

सुफी परंपरा

इब्न तैमिया मूलत: सनातनी प्रवृत्तीचा विचारवंत होता, पण त्याचबरोबर त्याला सुफी परंपरेचेही आकर्षण होते. त्याने या परंपरेतील कादरिया पंथाची दीक्षा घेतली होती. शिवाब या प्रथांचे संस्थापक अब्द अल-कादीर अल-जिलानी यांचा आध्यात्मिक वारसाही त्याला प्राप्त झाला होता. त्याच्या लिखाणतही 'आमचे गुरू' किंवा 'ज्येष्ठ पुढारी' असा त्यांचा आदरपूर्वक उल्लेख केलेला आढळतो. अबू यजीद अल-निस्तामि किंवा अल-जुनैद यासारख्या अनेक सुफी संतांविषयी त्याला नितांत आदर होता.

पण असे असले, तरी सुफी परंपरेतील दोन संकल्पनांना त्याचा विरोध होता. एक म्हणजे 'एकतत्त्व किंवा अद्वैतवाद' (Monotheism) आणि दुसरे म्हणजे शरीयतचे काटेकोर पालन करण्यापेक्षा आध्यात्मिक ज्ञानाला अधिक महत्त्व देणे. या दोन्ही गोष्टी इब्न तैमियाला मान्य नव्हत्या. कारण त्यामुळे पैगंबरांच्या आदेशांचे योग्य पालन होऊ शकत नाही, अशी त्याची धारणा होती.

आधुनिक इस्लामचे स्वरूप

चौदाव्या शतकातील मुस्लीम समाज इस्लामच्या मूलभूत शिकवणीपासून दूर जातोय, असे इब्न तैमियाला ठामपणे वाटत होते. अशा या पदभ्रष्ट झालेल्या इस्लामी समाजाला अल्लाहने दाखविलेल्या योग्य मार्गावर आणण्यासाठी इस्लामचा अन्वयार्थ लावण्याची त्याने स्वत:ची अशी वेगळी भाष्यपरंपरा निर्माण केली व त्याप्रमाणे समाजपरिवर्तन घडवून आणण्यासाठी तत्कालीन समाजाची खालीलप्रमाणे गटवार विभागणी केली.

1) दार अल्-इस्लाम (इस्लामचे वसतिस्थान) - जिथे इस्लामी कायद्याप्रमाणे किंवा शरीयतप्रमाणे राज्यकारभार चालतो, ते स्थान किंवा प्रदेश.

2) दार अल्-कुफ्र(श्रध्दाहीनांचे वसतिस्थान) - जिथे श्रध्दाहीनांच्या कायद्याप्रमाणे राज्यकारभार चालतो ते स्थान.

3) दार अल्-हर्ब (युध्दजन्य परिस्थितीचे स्थान) - हेही श्रध्दाहीनांचेच स्थान असते, पण तिथे सतत युध्दजन्य परिस्थिती असते.

4) दार अल्-अहद (तहनाम्याचा प्रदेश) - म्हणजे जिथे युध्दे होतात तिथे तहनामेही होत असतात आणि या तहनाम्यातील अटी व शर्तींप्रमाणे त्या प्रदेशातील सामाजिक आणि राजकीय कारभार चालत असतो.

जिथे युध्द होतात तिथे तहनामेही होत असतात. या तहनाम्यांमुळे जशी युध्दबंदी होते, तशीच परस्परविरोधी गटांमध्ये शांतिपूर्ण सहजीवनास योग्य अशी परिस्थितीही निर्माण होत असते. हे जाणूनच इब्न तैमियाने 'दार अल-अहद' या आणखी एक गटाची निर्मिती केली. यामागे त्याचा आणखी एक हेतू होता. मंगोल आक्रमकांनी जेव्हा मार्दिन शहराचा ताबा घेतला, तेव्हा तिथे मुस्लीम नागरिकांची वस्तीही बरीच होती. त्यामुळे युध्द पुकारता येत नव्हते. कारण इस्लामी नियमाप्रमाणे एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला मारू शकत नाही. या शृंगापत्तीतून मार्ग काढण्यासाठी त्याने दारअल्-अहद या नावाचा एक वेगळाच गट निर्माण केला.

सनातनी परंपरेची सुरुवात - ऐतिहासिक पार्श्वभूमी

इ.स. 1260 ते 1312 या अर्धशतकाच्या कालखंडात मंगोल शासकांनी सीरिया आणि आजूबाजूच्या प्रदेशावर सहा आक्रमणे केली. यापैकी दोन युध्दांमध्ये त्यांना अल्पसे यश मिळाले. या यशामुळे इ.स.1260मध्ये त्यांना काही काळ सीरियावर राज्य करता आले. या काळात मंगोल आक्रमकांनी जिंकलेल्या प्रदेशावर राजकीय सत्ताच मिळविली असे नाही, तर स्वत:ची पारंपरिक राज्यकारभार व प्रशासन व्यवस्थाही सुरू केली. त्यामुळे सीरियात कायमस्वरूपी साम्राज्य स्थापन करण्याचा त्यांचा मानस स्पष्ट झाला होता. पण तसे झाले नाही. कारण सप्टेंबर 1260मधील मंगोल सुलतान हलाकूच्या नेतृत्वाखालील पहिले आक्रमण मामलुक सुलतान कुलुज आणि त्याचा अमीर (वजीर) बेबर यांनी मोडून काढले. या पराभवामुळे मंगोल आक्रमक पूर्णत: पराभूत झाले नव्हते, परंतु या दोन्ही शत्रुपक्षांत अलिखित सत्तावाटप मात्र झाले. सीरिया आणि आजूबाजूच्या प्रदेशावर मामलुक सुलतानांची सत्ता होती, तर सीरियन वाळवंटाच्या पलीकडील मेसोपोटेमिया, इराणच्या पठारी प्रदेशात मंगोलांनी सत्ता स्थापन केली होती. अर्थात या सत्तावाटपाला लिखित तहनाम्याचे स्वरूप मात्र देण्यात आले नव्हते. परिणामत: या दोन्ही पक्षांत काही वेळा शीतयुध्दाची परिस्थिती निर्माण होत असे, तर काही वेळा लहान-मोठया चकमकी होत असत. 1281मध्ये हलाकूचा उत्तराधिकारी अबाका (1265-1282) याने नवीन हल्ल्याची तयारी करून मामलुक सुलतानाचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरविले. परंतु अल्-मन्सूर कलाऊन (1279-1299) याने हिम इथे त्याला गाठून त्याचा पराभव केला. साहजिकच साम्राज्य वाढविण्याचा मंगोलांचा हेतू सफल होऊ शकला नाही. मंगोलांच्या झालेल्या या पराभवामुळे युध्दसमाप्ती झाली, तरी युध्दजन्य परिस्थिती संपली नाही. हलाकू सुलतानाने इस्लामचा स्वीकार केला, तरी दोन्ही पक्षांत समझोता घडवून आणण्याचे प्रयत्न सफल होऊ शकले नाहीत. मंगोल सुलतान गझनखान याने गादीवर बसण्यापूर्वीच (1275-1304) इस्लामचा स्वीकार केला, तरीही त्याने सीरियावर तीन हल्ले केले होते. यापैकी पहिला हल्ला 1299-1300मध्ये व दुसरा 1300-1301मध्ये. या दोन्ही प्रयत्नांत त्याला अपयश आले, तरी 1303मध्ये त्याने तिसरा हल्ला केला. पण याही युध्दात गझनखानला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मामलुकांची भूमी जिंकण्याचा गझनखानचा हा प्रयत्नही फसला. अशा सततच्या पराभवामुळे जिंकलेल्या प्रदेशात तो स्थैर्य आणि शांतता निर्माण करू शकला नाही. असे असतानाही 1295मध्ये इस्लामचा स्वीकार केल्यानंतर लगेचच त्याने स्वत:ला इस्लामी जगताचे संरक्षक किंवा 'पादशहा अल् इस्लाम' अशी उपाधी लावून साऱ्या इस्लामी जगताचे आपण नेते आहोत असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण तोही फसला. इतकेच नव्हे, तर 1299मधील बिलाद अल्-शामवरील (सीरियावरील) हल्ला म्हणजे धर्मयुध्द होते, हे दाखवून देण्यासाठी त्याने धर्मशास्त्राचा आधारही शोधून काढला. त्याही पलीकडे जाऊन मामलुक सुलतानांनी आमच्या भूमीवर आक्रमण केले असल्यामुळे आम्ही स्वसंरक्षणात्मक प्रतियुध्दे केली, त्यामुळे ती धर्मयुध्दे होती, असा उलटा दावा केला.

इब्न तैमियाचे ऐतिहासिक फतवे

इब्न तैमियाच्या ऐतिहासिक फतव्यांची ही पार्श्वभूमी होती. कुठल्याही सामाजिक समस्येची सोडवणूक करायची असल्यास किंवा राजकीय प्रश्नावर तोडगा काढायचा असल्यास त्या समस्येचा किंवा निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वांगीण अभ्यास करणे किंवा त्याचे सर्व पैलू विचारात घेऊन निष्कर्ष काढणे हा त्याचा पिंड असल्यामुळे सीरियावरील (बिलाद अल्-शामवरील) आक्रमणाचा या प्रदेशावर झालेला परिणाम आणि भविष्यात त्यांच्याकडून निर्माण होणारे धोके या सर्वांचा त्याने अभ्यास केला होता. त्याही पलीकडे जाऊन शिया किंवा इतर उपपंथ हे मूळ सुन्नी इस्लाममधून विभक्त झालेल्या फुटीरतावादी जाती आहेत, अशीही सैध्दान्तिक मांडणी त्याने केली होती.

इब्न तैमियाने त्या काळी एकूण तीन फतवे प्रसिध्द केले होते. परंतु त्यांच्या हस्तलिखितांची चिकित्सक प्रत उपलब्ध नव्हती किंवा सापडत नव्हती. रियाद (मक्का) येथून 1961-1967 या काळात अब्द अल्-रेहमान इब्न महंमद कासीम अल-नज्दी या अरब धर्मपंडिताने संपादित केलेली प्रत तीस खंडांत 'किताब अल्-जिहाद' या नावाने उपलब्ध आहे. पण तीसुध्दा चिकित्सक नाही. या आवृतीच्या अठ्ठाविसाव्या खंडात इब्न तैमियाचे तीन फतवे तपशीलवार देण्यात आले आहेत. यातील पहिला फतवा सात पृष्ठांचा, दुसरा 35 पृष्ठांचा, तर तिसरा 8 पृष्ठांचा आहे.

आक्रमणाचे स्वरूप आणि फतवे

इब्न तैमियाच्या फतव्यांना तेराव्या शतकाच्या शेवटी आणि चौदाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मामलुक शासक आणि मंगोल आक्रमक यांच्यात झालेल्या युध्दांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्या युध्दांसंबंधी फतवे प्रसिध्द करण्यापूर्वी मंगोल आक्रमकांच्या सैन्याविषयी - विशेषत: त्या सैन्यात असलेल्या सैनिकांची धार्मिक, वांशिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी काय होती, हे जाणून घेणे इब्न तैमियाला आवश्यक वाटले. 1260 साली हलाकू या मंगोल आक्रमकाने सीरिया जिंकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रदेश जिंकून साम्राज्य वाढविणे हेच त्याचे उद्दिष्ट होते. त्यामागे धार्मिक प्रेरणा किंवा हेतू नव्हता. पण श्रध्दाहीनांनी दार अल्-इस्लाम म्हणजेच इस्लामी भूमीवर केलेले ते आक्रमण होते. म्हणून त्याचा प्रतिकार करून ते मोडून काढणे धर्मशास्त्रदृष्टया अनुज्ञेय होते आणि म्हणून ते धार्मिक कर्तव्य होते, अशी सर्वांचीच भूमिका होती. पण 1299-1300 या दोन वर्षांच्या काळात मंगोल सुलतान गझनखान याने सीरियावर हल्ला केला, तेव्हा त्याने आणि त्यांच्या बहुसंख्य सैनिकांनी इस्लामचा स्वीकार केला होता. त्यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली होती. कारण मुसलमान आपल्या धर्मबांधवांबरोबर लढू शकत नाहीत, अशी धर्माज्ञा आहे. अशा परिस्थितीत काय करायचे, कोणत्या मार्गाने जायचे, हे जाणून घेण्यासाठी मार्दिन शहरातील काही मान्यवर नागरिकांनी इब्न तैमियाची भेट घेतली व त्यांनी मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती केली.

मार्दिन शहरवासीयांना या कठीण परिस्थितीत मार्गदर्शन करणे आवश्यक तर होतेच, पण ते सोपे नव्हते. कारण वरील परिस्थिती आणखी एका कारणास्तव अधिक गुंतागुंतीची झाली होती. गझनखानाच्या लष्करात मंगोल सैनिकांबरोबरच मामलुक युध्दकैदी होते. गझनखानच्या दबाबामुळे त्यांना त्यांच्या मुस्लीम बांधवांच्या विरोधात लढावे लागत होते. त्यांच्याबरोबर तार्तर मुसलमानही त्या लष्करात होते. त्यांनी गझनखानच्या बाजूने लढावे असा त्यंच्यावरही दबाब होता. पण आपल्या धर्मबांधवांविरुध्द लढण्यास त्यांनी नकार दिला. मामलुक युध्दकैदी स्वखुषीने किंवा नाइलाजाने आपल्या धर्मबांधवांच्या विरोधात लढू लागले, तर त्यांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकत होते आणि त्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होऊ लागली होती.

गझनखानच्या हल्ल्यामुळे आणखी एक धोका निर्माण होणार होता. कारण सीरिया, नज्दपासून मार्दिन आणि आजूबाजूच्या प्रदेशातील सामान्यजनांच्या मनात गझनखानाविषयी आदर आणि आस्था असणाऱ्यांची संख्याही बरीच होती. सुलतान होण्यापूर्वी त्याने अधिकृतरीत्या सुन्नी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. पर्शियाचा शासक म्हणून त्याने आपल्या प्रजेला चांगली वागणूक दिली होती. निदान जनसामान्यांचा तसा समज होता. त्यामुळे त्यांना त्यांच्याविषयी आदर होता. शिवाय सीरियातील इतर लढाऊ गटांच्या जुलमातून तेथील जनतेला मुक्त करण्यासाठी तो येत असताना खलिफा मामलुक त्याच्याविरुध्द युध्द का पुकारत आहे, हे त्या सामान्यजनांना कळत नव्हते.

इब्न तैमियाला मात्र या परिस्थितीची आणि त्यातील गुंतागुंतीची पूर्ण जाणीव होती. गझनखानने व त्याच्या सैनिकांनी अधिकृतरीत्या इस्लामचा स्वीकार केला होता, तरी त्यांनी इस्लामी शरीयत मात्र स्वीकारली नव्हती. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या पारंपरिक 'या सा' या कायद्याची बांधिलकीच मान्य केली होती व त्यानुसारच त्यांचे सामाजिक व इतर व्यवहार होत असत. इब्न तैमियाच्या मते हे नवधर्मांतरित खऱ्या अर्थाने श्रध्दावान नव्हते. त्यामुळे ते धार्मिक आणि सामाजिकदृष्टया अज्ञान (जाहिलीयतच्या) युगात राहणाऱ्या अरबांसारखे होते, असे इब्न तैमियाचे मत होते. त्यामुळेच त्याने मंगोलांबरोबर लढणे धार्मिकदृष्टया केवळ अनिवार्य आहे असे नव्हे, तर श्रध्दाहीनांच्या विरुध्दचा तो जिहाद आहे, असाच त्याचा निष्कर्ष होता.

इब्न तैमियाचा ऐतिहासिक फतवा

तेराव्या शतकाच्या मध्यापासून मंगोल आक्रमकांनी अनेक आक्रमणे करून सीरियापासून मार्दिनपर्यंतचे मुस्लीम प्रदेश जिंकून आपल्या आधिपत्याखाली आणले होते. पण राज्यकारभार करण्याची त्यांची पध्दत अन्याय-अत्याचाराची होती. या भयग्रस्त अवस्थेतून केवळ इब्न तैमियाच मार्ग काढू शकेल, या आशेने मार्दिनवासीयांनी त्याला विनंती केली. त्यापूर्वीच्या काही वर्षांपासून इब्न तैमिया या भयग्रस्त परिस्थितीचा आणि त्यामुळे सर्वांसमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानाचा वेध घेत होता. तेराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात सीरिया आणि मार्दिन या प्रदेशात गझनखानाने अनेक आक्रमणे केली. इब्न तैमिया हा या आक्रमणांचा आणि मंगोलांच्या अन्याय-अत्याचारांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. मंगोल आक्रमकांनी याच काळात इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण त्यांचे हे धर्मांतर पूर्ण श्रध्देने झालेले नव्हते. कारण इस्लामचा अविभाज्य घटक असलेल्या शरीयतचे ते पालन करीत नव्हते. त्याऐवजी 'या सा' या त्यांच्या पारंपरिक कायद्याप्रमाणेच त्यांचे सर्व व्यवहार चालत असत. मार्दिनवासीयांना याची कल्पना होती. म्हणून मार्दिन हे 'दार अल्-हर्ब' (युध्दजन्य प्रदेश/धाम) आहे की 'दार अल्-अमन' (शांतिधाम) आहे? असा प्रश्न त्यांनी इब्न तैमियाला विचारला. त्याला या परिस्थितीची जाणीव होती, म्हणून त्या सर्व गोष्टी विचारात घेऊन 1303मध्ये आपल्या फतव्याचा मसुदा तयार केला.

चौदाव्या शतकापासून इस्लामी जगतात काही गंभीर बदल होऊ लागले होते. कुराणाची उदारमतवादी भाष्यपरंपरा संपली व तिच्या जागी नवी उग्रवादी भाष्यपरंपरा सुरू झाली. आक्रमक सनातनीपणा व हिंसाचाराचे समर्थन करणारी नवी प्रथा समाजजीवनात सुरू झाली. परिणमत: इस्लामच्या समाजजीवनातील अंगभूत गतिशीलता (Inherent Dynamism) संपून त्याला कुंठितावस्था प्राप्त झाली. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इब्न तैमियाच्या आचारविचारात कर्मठ सनातनीपणाचा मागमूस नव्हता, तरीही या नव्या विघातक परंपरेचे बीज इब्न तैमियाच्या त्या फतव्यात आहे असे मानून नव्या स्थित्यंतराचे जनकत्व त्याला बहाल केले गेले.

 

मार्दिन फतव्याचे स्वरूप आणि उद्दिष्ट

इब्न तैमियाच्या फतव्यातील काही महत्त्वाची कलमे -

1) मुसलमान मार्दिनमध्ये राहत असोत किंवा इतरत्र, त्यांचे जीवन आणि मालमत्ता कुठल्याही हिंसाचारापासून मुक्त असली पाहिजे. तसेच इस्लामविरोधी हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला किंवा गटाला कुणी मदत करत असेल, तर त्याचे ते कृत्य बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे मानले जाईल, मग ती व्यक्ती मार्दिनमध्ये राहणारी असो किंवा बाहेरून आलेली असो.

मार्दिनमध्ये राहणाऱ्या मुसलमानांना त्यांच्या धर्मपरंपरांप्रमाणे वागता येत नसेल, तर त्यांनी स्थलांतर केले पाहिजे. पण परिस्थिती तशी नसेल, तर त्यांना स्थलांतर करण्याची गरज नाही. पण मुसलमानांच्या शत्रूला मदत करण्याचे कृत्य मात्र गुन्हा मानला जाईल.

2) मार्दिनची भूमी युध्दभूमी मानायची की शांतिधाम? (दार अल्-हर्ब की दार अल्-अमन?) असा प्रश्न कुणी विचारला, तर तेथील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीतील विविधतेची दखल घेऊनच त्याचे उत्तर दिले पाहिजे, अशी इब्न तैमियाची भूमिका होती. जिथे इस्लामी कायद्याची अंमलबजावणी केली जाते आणि जिथे लष्करातील सैनिक इस्लामधर्मीय आहेत, त्या प्रदेशाला शांतिधाम म्हणता येणार नाही. तसेच ज्या प्रदेशातील रहिवासी श्रध्दाहीन किंवा बिगरमुस्लीम असले, तरी त्या भूमीला युध्दभूमी किंवा दार अल्-हर्ब म्हणता येणार नाही. कारण तेथील परिस्थिती या दोन्हीहून वेगळी आहे. तिला तिसरी श्रेणी मानूनच तिचा विचार केला पाहिजे. म्हणजेच तिथे राहत असलेल्या मुसलमानांना त्यांच्या परंपरेप्रमाणे वागता आले पाहिजे व त्यांच्या अधिकारांचा उपभोग घेता आला पाहिजे. या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे इस्लामी कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्यांना त्यांच्या परंपरेप्रमाणे वागता आले पाहिजे व त्यांचे अधिकारही त्यांना उपभोगता आले पाहिजेत.

3) संपूर्ण जगाची, मुस्लीम आणि बिगरमुस्लीम अशी सरधोपट विभागणी योग्य होणार नाही. मार्दिनमधील भिन्न धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक विविधता विचारात घेऊनच या समस्येची उकल केली पाहिजे. तरच या मिश्र समाजात सहजीवन आणि पर्यायाने एकात्मता निर्माण होऊ शकेल.

4) जोपर्यंत मुसलमानांना कुठल्याही मिश्र समाजात त्यांच्या धार्मिक परंपराचे मुक्त पालन करता येईल व त्यांच्या इतर अधिकारांचा उपभोग घेता येईल, तोपर्यंत त्यांना स्थलांतर करण्याची गरज नाही. त्याचबरोबर त्यांनी आपल्या धर्मबांधवांच्या अधिकारांचा आणि जे इस्लामी कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत त्यांनाही त्यांचे स्वत:चे असे अधिकार आहेत याची जाण ठेवून सर्वांनी त्या अधिकारांचा आदर केला पाहिजे.

इब्न तैमियाच्या क्रांतिकारक फतव्याचे सर्वसाधारण स्वरूप असे होते. तेराव्या-चौदाव्या शतकात सीरियापासून तुर्कस्थानातील मार्दिन शहर आणि आजूबाजूच्या प्रदेशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची वस्तुनिष्ठ दखल घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा इब्न तैमियाने प्रयत्न केला. त्यासाठी त्याने सर्वसमावेशकता, उदारमतवाद, परस्परांच्या अधिकारांची जाणीव व मैत्रिपूर्ण सहजीवनाची संकल्पना व याला पूरक अशा मानवी मूल्यांची आणि सिध्दान्ताची जोड देऊन त्याने आपल्या क्रांतिकारक फतव्याची मांडणी केली. आज जगातील बहुसंख्य देशांत भिन्न तऱ्हेची विविधता असलेली आढळते आणि त्या देशांत अनेक तऱ्हेचे अल्पसंख्य समाजही असलेले आढळतात. म्हणूनच या देशांत विविधतेतून एकात्मता निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. भारत तर प्रयत्नातील अग्रेसर देश आहे. विविधतेतून एकात्मता निर्माण करण्याच्या या प्रयत्नांचे बीजारोपण चौदाव्या शतकाच्या पहिल्याच दशकात इब्न तैमियाने प्रसारित केलेल्या त्याच्या मार्दिन फतव्यात आढळते.

आजच्या काळातही ज्या देशात किंवा समाजात विविधता आहे आणि त्यातून एकात्मता निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, त्या सर्वांना सर्वसमावेशकता, सहिष्णुता, समता आणि न्याय यासारख्या मूल्यांच्या पायावरच ही इमारत उभी करणे शक्य होणार आहे. त्याला दुसरा मार्ग नाही. त्या अर्थाने इब्न तैमिया हा 'विविधतेतून एकात्मकता' या सूत्राचा आद्य प्रणेता ठरतो. पण या बाबतीत मात्र तो पूर्णत: कमनशिबी ठरला. वास्तविक त्याने प्रथम हे सूत्र मांडले, तेव्हा त्याचे श्रेय त्याला मिळायला हवे होते. पण तसे झाले नाही. उलट शतकभराच्या काळातच एकूण इस्लामी जगतात आक्रमक सनातनीपणा, पूर्वसुरींचे अंधानुकरण करून कुराणचा व हदीसचा संकुचित अर्थ लावणारी तकलीदची परंपरा, हिंसाचाराचे समर्थन, विरोधकांना इस्लामद्रोही ठरवून त्यांना ठार मारण्याची तकफीरची प्रथा या सर्व विघातक परंपरांचे मूळ इब्न तैमियाच्या मार्दिन फतव्यात आहे, अशी मांडणी करून या सर्व परंपरांचे जनकत्व त्याला बहाल करण्यात आले, इतकेच नव्हे, तर ओसामा बिन लादेनच्या अल्-कायदा या दहशतवादी संघटनेपासून लष्कर-ए-तोयबा व इतर सर्व दहशतवादी संघटनांनी इब्न तैमिया हा आमचा प्रेरणास्रोत आहे असे जाहीरपणे म्हटले आहे आणि आता तर ते सर्वमान्य झाले आहे.

वास्तविक इब्न तैमियाच्या फतव्याच्या मूळ मजकुरात किंवा त्याच्या कुठल्याही लिखाणात आक्रमक सनातनीपणा, हिंसेचे समर्थन करणारी वैचारिक मांडणी किंवा कुठल्याही तऱ्हेचा विघातक विचार अपवादानेही आढळत नाही. मग इस्लामच्या नावाने हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या परंपरांचे जनकत्व मात्र इब्न तैमियाकडे कसे गेले? असा प्रश्न पंधराव्या शतकाच्या नंतरच्या काळात इस्लामच्या अभ्यासकांना आणि संशोधकांना पडला. त्या दिशेने जेव्हा संशोधन सुरू झाले, तेव्हा सर्वांना चकित करणारे एक 'असत्य' बाहेर आले.

इब्न तैमियाच्या फतव्यातील अवैध फेरफार

इब्न तैमियाच्या सामाजिक जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्याची वैचारिक भूमिका काहीशी सनातनी वृत्तीची होती. पण नंतरच्या काळात त्याच्या भूमिकेत बदल होत गेला. तो हंबाली संप्रदायाच्या अनुयायी होता. पण या संप्रदायाचा सनातनीपणा त्याने पूर्णपणे स्वीकारला नव्हता. उलट नंतरच्या काळात तत्कालीन सामाजिक समस्यांकडे त्याचे लक्ष गेले व त्यांचा अभ्यास करण्यास त्याने सुरुवात केली. त्याच्या या अभ्यासातून त्याला दोन सूत्रे गवसली. एक म्हणजे मार्दिनमध्ये मुस्लीम आणि मंगोल असे दोन भिन्न समाज राहत होते, हे वास्तव आणि त्यांच्यामध्ये मैत्रिपूर्ण सहजीवन असण्याची गरज आणि त्याच्या पुढचे पाऊल म्हणजे त्या विविधतेतून एकात्मता निर्माण करण्याचे प्रयत्न त्यानंतरच्या काळात त्याच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विचारांची मार्गदर्शक तत्त्वे राहिली आहेत. चौदाव्या शतकाच्या पहिल्या दशकात त्याने प्रसिध्द केलेल्या मार्दिन फतव्याच्या मूळ मजकुरात त्याच्या या तत्त्वज्ञानाचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले दिसते. विरोधाभास असा की त्याच्या निधनानंतरच्या काळात इस्लामी जगतात ज्या विघातक आणि हिंसक प्रथा सुरू झाल्या होत्या, त्यांच्या समर्थनार्थ याच फतव्याचा सररास वापर केला जात होता. या फतव्याचा बारकाईने अभ्यास केला की त्यात उदारमतवाद, सहिष्णुता आणि मैत्रिपूर्ण सहजीवन या मूल्यांना अग्रक्रमाचे स्थान देण्यात आले होते, उलट हिंसेचे समर्थन करणाऱ्यासाठी या फतव्याच्या वापर करणाऱ्याला या मूल्यांचाच अडथळा होत होता. म्हणून त्यांना पूर्णपणे फाटा देऊन हिंसाचाराचे समर्थन होऊ शकेल असे अवैध फेरफार त्या फतव्याच्या मूळ मजकुरात करण्यात आले. दुर्दैवाची बाब म्हणजे या फेरफाराशी इब्न तैमियाचा काडीमात्र संबंध नसताना त्या विध्वंसक फेरफाराचे जनकत्व मात्र त्याला बहाल करण्यात आले. एक उदारमतवादी प्रगल्भ विचारवंत व संशोधक हीच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. पण मूळ फतव्यात हिंसाचाराचे समर्थन करता येईल असे अवैध व विघातक फेरफार करणे हे त्याच्यावर अन्याय करणारे तर होतेच, तसेच तो धर्मद्रोहही होता. कारण ते असत्य तर होतेच, त्याचबरोबर ते धर्मविरोधीही होते.

इ.स.1909मध्ये इजिप्तमधील मूळचा इंजीनियर, पण नंतर धर्मपंडित झालेल्या महंमद अब्द अल्-सलाम फराज याने त्याच्या अल् फरीदा अल् गैहबा या ग्रंथात इब्न तैमियाच्या फतव्यातील फेरफाराचा आधार घेऊन इस्लामी श्रध्देच्या पाच स्तंभांमध्ये सहावा स्तंभ म्हणून 'जिहाद'ला अंतर्भूत केले. यावरून हा विकृत फतवा किती प्रभावी झाला होता, याची कल्पना येऊ शकते.

अल्-सलाम याच्या या ग्रंथामुळे विकृत व म्हणून विनाशकारक झालेला हा फतवा इस्लामी जगताच्या कोनाकोपऱ्यात पोहोचला. इतकेच नव्हे, तर अल्-कायदा, लष्करे तोयबा, जमातुद दावा, इसिल (Islamic State of Iraq and Lavent) यासारख्या यच्चयावत दहशतवादी संघटनांनी 'आपला अधिकृत जाहीरनामा' (Manifesto) म्हणून या विकृत फेरफारामुळे हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या फतव्याचा स्वीकार केला. ओसामा बिन लादेन याने त्यापलीकडे जाऊन, इब्न तैमिया हा आपला पूर्वज आहे असे जाहीर करून टाकले.

इथे प्रश्न असा उपस्थित होतो की इब्न तैमियाच्या फतव्याच्या मूळ मजकुरात असा काय फेरफार झाला, ज्यामुळे तो मूलतत्त्ववादी हिंसाचाराचा प्रेरणास्रोत झाला? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी इब्न तैमियाच्या फतव्याचे मूळ हस्तलिखित मिळविणे हा एकमेव मार्ग होता आणि ते तर सापडत नव्हते.

अशा परिस्थितीतही आशेचा एक किरण दिसला. रियाद (सौदी अरेबिया) येथील अल्-इमाम विद्यापीठातील माजी प्राध्यापक शेख-अब्द अल-तुरैरी यांनी दमास्कस येथील अल्-अहद या लायब्ररीतील पुराभिलेख विभागात या फतव्याचे मूळ हस्तलिखित असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे संशोधक-अभ्यासकांनी शोध घेतला असता अल्-अहद लायब्ररीतील, झईरिया हस्तलिखित विभागात असलेली त्या फतव्याची एकमेव हस्तलिखित प्रत सापडली. (नोंदणी क्र.2757).

इब्न तैमियाच्या फतव्याचे मूळ हस्तलिखित सापडल्यामुळे त्या फतव्यातील अवैध व धोकादायक फेरफाराचा पुरावा तर सापडलाच, तसेच त्याला पूरक असे इतरही काही संदर्भ सापडले. त्याचा शिष्य इब्न मुफलीह् याने त्याच्या 'अदब अल्-शरीया' या ग्रंथात दिलेला संदर्भही मूळ फतव्यातील मजकुराशी तंतोतंत जुळणारा आहे. इजिप्तमधील धर्मशास्त्रज्ञ मुहमद रशीद रीदा (1855-1935) यानेही इब्न तैमियाच्या फतव्यातील मूळ मजकुराचाच संदर्भ दिला आहे.

इब्न तैमियाच्या फतव्याचे मूळ हस्तलिखित व त्यातील मजकुराला पूरक असे वरील संदर्भ सापडल्यामुळे त्याच्या फतव्यात प्रत्यक्षात काय फेरफार करण्यात आले, याची शहानिशा करणे शक्य झाले. ही शहानिशा करताना इब्न तैमियाच्या राजकीय आणि सामाजिक तत्त्वज्ञानाचे पुढील सारभूत मुद्दयांचाही आधार घेण्यात आला होता -

* मार्दिन आणि आजूबाजूचा प्रदेश मंगोल आक्रमकांच्या आधिपत्याखाली आला होता. म्हणून तो प्रदेश पूर्णत: मुस्लीम जगत होऊ शकत नव्हता. त्याचप्रमाणे तेथील बहुसंख्य लोक मुस्लीम असल्यामुळे तो बिगरमुस्लीम प्रदेशही होऊ शकत नव्हता. हे वास्तव स्वीकारून इब्न तैमियाने, 'हा या दोन्ही समाजगटांचा संमिश्र प्रदेश आहे' अशी मांडणी केली आणि विविधता, मैत्रिपूर्ण सहजीवन आणि विविधतेतून एकात्मता या संकल्पनांची पायाभरणी केली.

* मार्दिनमध्ये राहणारे मुस्लीम इस्लामी कायद्याच्या (शरीयतच्या) अधिकारकक्षेत येतात व त्याप्रमाणे त्यांना अधिकार प्राप्त झाले आहेत. या अधिकारांचा वापर करून त्यांना जीवन जगता आले पाहिजे किंवा त्या अधिकारांचा उपभोग घेता आला पाहिजे.

* त्याचप्रमाणे इस्लामी कायद्याच्या अधिकारकक्षेबाहेर असलेल्या बिगरमुस्लिमांना त्यांच्या अधिकारांप्रमाणे जगता आले पाहिजे किंवा त्या अधिकारांचा उपभोग घेता आला पाहिजे.

ही सूत्रे इब्न तैमियाच्या मार्दिन फतव्याचा गाभा आहेत आणि त्यातच मैत्रिपूर्ण सहजीवनाचे बीज आहे. असे असतानाही त्यातून हिंसाचाराचे समर्थन होईल असे फेरफार त्यात करण्यात आले. या फेरफारामुळेच केवळ इस्लामी जगतातच नव्हे, तर इतर अनेक देशांत इस्लामच्या नावे हिंसाचाराचा धुमाकूळ घातला जात आहे.

 

मार्दिन फतव्यातील 'ध'चा 'मा'

या फतव्याच्या मजकुरातील मूळ शब्द 'युअमल' म्हणजे वागवावे असा आहे आणि एकाच प्रदेशात राहणाऱ्या दोन समाजघटकांनी एकमेकांच्या अधिकारांचा आदर करून मैत्रिपूर्ण जीवन जगावे, असा त्याच्या व्यापक अर्थ आहे. पण युअमल या शब्दातील अ आणि म ही दोन अक्षरे बदलून त्या ऐवजी 'क' आणि 'त' या दोन अक्षरांचा वापर करून 'युकतल' म्हणजे लढावे, आणि/किंवा मारावे अशा अर्थाचा शब्द तयार करण्यात आला. अर्थात हा शब्द इस्लामी कायद्याच्या अधिकारकक्षेबाहेर असणाऱ्या, म्हणजेच बिगरमुसलमानांसाठी - पर्यायाने हिंसाचाराचे समर्थन करण्यासाठी तयार करण्यात आला, हे स्पष्टच आहे. हा फेरफार कधी आणि कुणी केला, हे अजून स्पष्ट झाले नसले तरी गेली अनेक शतके इस्लामच्या नावाने होणाऱ्या हिंसाचाराचे समर्थन करण्यासाठी या फतव्याचा वापर होत आहे.

दहशतवादी हिंसाचार हा सुसंघटित संघटनांकडून होत असतो व त्यासाठी आधुनिक शस्त्रांचा वापरही करण्यात येत असतो. तेव्हा बळाचा वापर करून त्याचा बिमोड करणे आवश्यक आहेच. पण असा हिंसाचार घडवून आणण्यासाठी पध्दतशीरपणे विशिष्ट अशी मानसिकताही तयार करावी लागते. गेल्या काही वर्षांत अशी मानसिकता तयार करण्यासाठी अवैध मार्गाने हिंसाचाराचे समर्थन करणारा इब्न तैमियाचा मार्दिन फतवा सररास वापरला जात होता. पण या फतव्याचे मूळ हस्तलिखित सापडल्यामुळे त्यात अवैध मार्गाने झालेल्या फेरफारांचे रहस्य आता पूर्णपणे उलगडले आहे. परिणामत: हिंसाचाराचे समर्थन करण्याची त्याची शक्तीच नष्ट झाली आहे. उलट मार्दिन फतव्याची मूळ प्रत आता उपलब्ध झाल्यामुळे इस्लामच्या नावाने होणाऱ्या हिंसाचाराविरुध्द लढण्याचे एक प्रभावी साधन आता उपलब्ध झाले आहे.

वहाबी इस्लाम

सोळाव्या शतकापासूनच्या पुढच्या काळात अरबस्थान, सीरिया आणि आजूबाजूच्या प्रदेशावर ऑटोमन (तुर्कस्थानी) साम्राज्यवाद्यांची सर्वंकष सत्ता प्रस्थापित झाली होती. कैरो, बगदाद, जेरुसलेम, दमास्कस यासारखी इस्लामी जगतातील महत्त्वाची शहरे 'तुर्की अरब शहरे' म्हणून ओळखली जाऊ लागली. अरेबियातील मूळची टोळीवजा समाजव्यवस्था लोप पावली होती. उंटांच्या काबिल्यांमधील होणारा अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संपुष्टात आला होता. व्यापार हेच तेथील लोकांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन होते. त्यामुळे स्थानिकांच्या गरजा भागविण्यापुरता तो मर्यादित होता. प्रवासाचे साधन म्हणून उंटांचे काफिले अस्तित्वात होते. पण मक्का, मदिना आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या यात्रेस येणाऱ्या यात्रेकरूंकडूनच त्यांचा उपयोग होत होता. या यात्रेकरूंच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था व त्यांची सुरक्षा हा काही स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय झाला होता. पण तोही बराच मर्यादित होता.

या सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीमुळे इस्लामी आचारसंहितेची (शरीयतची) चौकट बरीच सैल झाली होती. समाजजीवनामध्ये काही नव्या प्रथांची, कर्मकांडांची भरही पडली होती. बाराव्या-तेराव्या शतकापासून गतिशील झालेल्या सुफी आध्यात्मिक परंपरेचा प्रकारही वाढला होता. सुफी संतांच्या आश्रमात नियमितपणे जाणे, तेथे प्रार्थना, नवससायास करणे, त्या संतांच्या निधनांनंतर त्यांच्या कबरींवर मकबरे-दर्गा बांधणे, तेथे दैनंदिन प्रार्थना करणे, नवससायास करणे असले प्रकार मोठया प्रमाणात वाढले होते. सुफी आध्यात्मिक परंपरा व संत यांच्याविषयी आदर बाळगून हे म्हणावे लागते की हा अंधश्रध्देचाच आविष्कार होता. इस्लामी श्रध्देच्या दृष्टीने हे सारे प्रकार गैर आहेत हे समजणारे लोक समाजात होते, अशा तऱ्हेचा गैरइस्लामी प्रथा-परंपरांच्या आहारी गेलेल्या लोकांनी मुसलमान असण्याचा हक्क गमावला आहे का, असे प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केले जात होते, कारण अशा वर्तनामुळे एकेश्वरवादाची संकल्पना (तौहिद) आणि त्यावरील निष्ठा कलंकित होते आणि ही बाब फार गंभीर मानली जाते.

अठराव्या शतकात सुरू झालेल्या सुधारणावादी व पुनरुज्जीवनवादी चळवळींना ही सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती कारणीभूत होती आणि उनैन या हिरवळी बेटावरील (ओऍसिसमधील) उचेन्ना या गावात 1703 साली जन्मलेल्या महंमद इब्न अब्दुल वाहब (1703-1742) या धर्मपंडिताकडे त्यांचे जनकत्व जाते. आजही ही चळवळ त्याच्याच नावाने - म्हणजे 'वहाबी इस्लाम' किंवा 'वहाबिझम' या नावाने ओळखली जाते. इब्न वाहबचे वडील इब्न अब्दुल वाहब हे त्या गावातले धर्मपंडित होते. गावातील लोकांची धार्मिक कर्मकांडे व इतर कार्ये करणे आणि मुलांना धार्मिक शिक्षण देणे हे त्यांचे काम होते. त्याचे वडील इब्न अब्दुल वाहब सनातनी वृत्तीचे होते. साहजिकच त्यांच्या मुलावर त्यांनी याच सनातनी विचारांचे संस्कार केले.

या संस्कारांमुळे महंमद इब्न वाहब सनातनी वृत्तीचा तर झालाच, तसेच खुद्द पैगंबरांच्या उपासना/आराधनांना विरोध करणे यासारख्या चौकटीबाहेरच्या सनातनी परंपरा निर्माण करणे आणि त्यांचा आग्रह धरणे हा त्याचा श्वास होता.

साधुसंतांच्या समाधींवर जाऊन प्रार्थना करणे, मृत व्यक्तींच्या दफनस्थळावर कबरी किंवा मकबरे बांधणे यासारख्या प्रथा इस्लामविरोधी असल्यामुळे त्याविरुध्द प्रचार करणे आणि प्रत्यक्षात त्या बंद करणे, हा त्याच्या जीवितकार्याचा (मिशनचा) एक महत्त्वाचा घटक होता. सगुण पण निराकार अल्लाहशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रतीकाची उपासना किंवा आराधना करणे इब्न वाहबला अजिबात मान्य नव्हते. तसे पाहिले गेले तर अशा विशुध्दतेच्या संकल्पनेपासून तत्कालीन इस्लामी जगत अनभिज्ञ होते, असे म्हणता येणार नाही, किंबहुना विशुध्द एकेश्वरवादावर श्रध्दा ठेवणे हे इस्लामी श्रध्देचे व्यवच्छेदक लक्षण होते. त्यामुळे इब्न वाहबच्या विशुध्द एकेश्वरवादाला कुणाचा विरोध असण्याचे कारण नव्हते.

एकेश्वरवादाचा असा आग्रही प्रचार करतानाच इब्न वाहबने या नाण्याची दुसरी बाजू म्हणून चोरीच्या गुन्ह्याला हात तोडण्याची, व्यभिचाराला दगडाने ठेचून मारण्याची, शर्क (धर्मद्रोह)च्या गुन्ह्याला मृत्युदंडाची आणि इतर लहान-मोठया गुन्ह्यांना जाहीर चौकात चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा, अशा कठोर इस्लामी (हुदूदच्या) शिक्षांचा आग्रह धरण्यास सुरुवात केली. या कठोर शिक्षांचा उल्लेख इस्लामी न्यायशास्त्रात आहे. पण त्याची अंमलबजावणी कटाक्षाने होत नव्हती. (भारतात शरीयतवर आधारित मुस्लीम व्यक्तिगत कायदा अस्तित्वात असला, तरी हुदूदच्या शिक्षा मात्र रद्द करण्यात आल्या आहेत.) इब्न वाहबने जेव्हा या शिक्षांचा आग्रह धरण्यास सुरुवात केली, तेव्हा सामान्यजनांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. या अस्वस्थतेचा स्फोट कधी होईल ते सांगता येत नव्हते. ही स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन, उचेन्नाच्या अमीराने 1740मध्ये इब्न वाहबला आपल्या राज्यातून हद्दपार केले.

अमीराच्या आदेशाप्रमाणे इब्न वाहबने उचेन्ना शहर सोडले. त्यानंतरची चार वषर्े आजूबाजूच्या प्रदेशात भ्रमंती करण्यात घालविली. या काळात त्याने बसरा व दमास्कस या शहरांनाही भेटी दिल्या. इब्न वाहबची ही भ्रमंती त्याच्या दृष्टीने खूपच फलदायी ठरली. त्या काळात हा प्रदेश ऑटोमन (तुर्क) साम्राज्याचा भाग होता. त्यावर राज्य करणे व महसूल मिळविणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. तेथील लोकांचे सामान्य जीवन किंवा त्यांच्या धार्मिक आण्ाि सांस्कृतिक परंपरा याच्याशी त्यांचे काही एक देणे-घेणे नव्हते. अशा या सैल वातावरणात धर्मपरंपरेची बंधनेही सैल होतात आणि धर्मपालन एक उपचार होऊन बसतो.

दमास्कस, बसरा आणि आजूबाजूच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची अवस्था तशीच झाली होती. इब्न वाहबला या परिस्थितीची जाणीव झाली होती. ईश्वराने दाखविलेल्या योग्य मार्गापासून दूर गेलेल्या या लोकांना योग्य मार्गावर आणणे आपले कर्तव्य आहे, असे मानून तो कामाला लागला. अनेक स्थानिक धर्मपंडितानाही इब्न वाहबची ही पुनरुज्जीवनवादी भूमिका मान्य होती. त्यामुळे इब्न वाहबच्या चळवळीला बरेच बळ प्राप्त झाले होते.

इब्न वाहबच्या पुनरुज्जीवनवादी चळवळीचा प्रचार आणि प्रसार वेगाने सुरू झाला होता.

1744मध्ये इब्न वाहबच्या जीवनाला आणि जीवनकार्याला वेगळे वळण लावणारी एक घटना घडली. या वर्षी तो अरबस्थानातील नज्द प्रांतातील दरैया या शहरात आला होता. खजुरांच्या बागा आणि नज्द प्रांताचा राजा महंमद इब्न सौद याची जुलमी राजवट यासाठी हे शहर प्रसिध्द होते. उचेन्ना येथील महंमद इब्न अब्दुल वाहब या धर्मपंडिताला तेथील अमीराने हद्दपार केल्याचे व सध्या तो दरैया शहरात राहत असल्याची बातमी त्याच्या कानावर आली. ही बातमी त्याला उत्साहित करणारी होती. कारण इब्न सौदच्या राजकारणाला धार्मिकदृष्टया समर्थन देणाऱ्या इब्न वाहबसारख्या धर्मपंडिताची आणि प्रचारकाची गरज होती. इब्न वहाब ही गरज भागवू शकेल याची इब्न सौदला खात्री वाटत होते.

इस्लाममध्ये राजा आणि राजेशाही या संकल्पनांना आणि/किंवा संस्थांना काहीही स्थान नव्हते. कुराणात त्याविषयी कसलाही आदेश नाही किंवा राजा आणि राजेशाही या संकल्पनाही विशद करून सांगण्यात आलेल्या नाहीत, कारण 'न्याय्य समाज निर्माण करणे' हे पैगंबरांच्या जीवितकार्याचे एकमेव उद्दिष्ट होते. म्हणूनच इस्लाममध्ये अशा राजकीय व्यवस्थेला स्थान नव्हते. इस्लामचे अभ्यासक व विचारवंत संशोधक डॉ. ताहा हुसेन यांनी त्यांच्या एका ग्रंथात असे म्हटले आहे की, 'पैगंबरांच्या राज्याची संकल्पना धर्मसत्ताक (Theocratic) कधीच नव्हती. म्हणून कुठल्याही मुस्लीम देशात इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे राज्यसत्ता किंवा राजकीय व्यवस्था अस्तित्वात येऊ शकत नाही, राजसंस्था आणि राजकारण याविषयीची इस्लामी धर्मशास्त्राची भूमिका अशी स्पष्ट असतानासुध्दा महंमद इब्न सौद याने नज्द आणि आजूबाजूचा प्रदेश जिंकून तिथे आपला एकछत्री अंमल सुरू केला. इतकेच नव्हे, तर स्वत:ला सर्वसत्ताधीश 'राजा' म्हणून घोषित केले.

इब्न सौदचा हा निर्णय व कृती शरीयतविरोधी आहे, हे जाणणारे विचारवंत व सामान्यजन इब्न सौदच्या राज्यात होते. त्यांच्या शंकांचे समाधान करण्याचे साधन इब्न सौदपाशी नव्हते. पण इब्न वाहब हा मूलतत्त्ववादी धर्मपंडित आपली ही गरज भागवू शकेल, असे त्याला मनोमत वाटत होते.

असा सगळा सारासार विचार करून इब्न सौदने इब्न वाहबला बोलावून घेतले व त्याच्यासमोर आपला प्रस्ताव ठेवला. इब्न वाहबने इब्न सौदच्या प्रत्येक राजकीय कृतीला आणि वैचारिक भूमिकेला शरीयतचे आणि/किंवा धर्मशास्त्राचे समर्थन मिळवून द्यावे व त्याच्या मोबदल्यात इब्न वाहबला, राजकारणात हस्तक्षेप न करण्याच्या अटीवर धर्माचा आणि त्याच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य असेल, असे इब्न सौदने मान्य केले.

राजे इब्न सौद आणि महंमद इब्न अब्दुल वाहब यांच्यातील समझोत्याचे हे प्राथमिक स्वरूप होते. त्याचबरोबर आतापर्यंत पूर्णपणे धार्मिक असलेल्या इब्न वाहबच्या पुनरुज्जीवनवादी चळवळीची वाटचाल राजकारणाच्या दिशेने वेगाने सुरू झाली. अर्थात या चळवळीचे सुकाणू मात्र राजे इब्न सौद याचाच हाती होते.

इब्न वाहबने राजे सौदला, त्याच्या प्रत्येक राजकीय कृतीला धार्मिक समर्थन मिळवून देण्याचे मान्य केल्यामुळे राजे इब्न सौदने आपल्या महत्त्वाकांक्षी राजकारणाची घोडदौड सुरू केली. कायमस्वरूपी जिहादचे निमित्त सांगून त्याने मुस्लीम वसाहतींची व शहरांची लूट करणे, खलिफांची सत्ता न जुमानणे, प्रजेला न पेलणारे धार्मिक शिस्तीचे ओझे प्रजेवर टाकणे, शेजारच्या टोळयांवर आपली सत्ता लादणे यासारख्या जुलमी कृत्यांचा त्यात अंतर्भाव करावा लागेल. इब्न सौदच्या राजकारणात हस्तक्षेप न करण्याची अट मान्य केल्यामुळे इब्न वाहबला अन्याय, त्याच्या डोळयांसमोर घडत असलेल्या या सर्व घटना उघडया डोळयांनी पाहाव्या लागत होत्या, तेही प्रत्यक्षात करार होण्यापूर्वी.

काहीही असो, पण या दोघांमध्ये झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर कराराचा अंतिम मसुदा तयार झाला. पण इथेही मुत्सद्देगिरीत राजे इब्न सौद श्रेष्ठ ठरले. याच करारातील पुढील दोन अटी याची साक्ष देऊ शकतील -

* राजे इब्न सौद यांची आध्यात्मिकता किंवा धार्मिकता त्याच्या राजकीय उद्दिष्टांच्या परिपूर्ततेच्या आड येणार नाही. पण इब्न वाहबच्या धार्मिक प्रचारासंदर्भात मात्र करारात कसलीही विशेष तरतूद नाही.

* इब्न वाहब कुठल्याही परिस्थितीत आपले आध्यात्मिक आणि धर्मशास्त्रीय ज्ञान व अनुभव त्या प्रदेशातील इतर कोणत्याही अमीराला किंवा शासकाला मार्गदर्शन करण्यासाठी वापरणार नाही.

इब्न वाहब यांच्या विचारांविषयी अनेकांचे अनेक मतभेद होऊ शकतात, पण ज्या श्रध्देने आणि बांधिलकीने आपल्या विचारांचा आणि चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची मोहीम सुरू केली होती, त्याला मात्र इब्न सौदबरोबरच्या करारामुळे मर्यादा पडल्या होत्या आणि तरिही इब्न सौदबरोबर झालेल्या करारामध्ये त्याला काही तडजोडींना मान्यता द्यावी लागली.

या कराराचे आणखी एक वैशिष्टय होते. या कराराची मुदत व अंमलबजावणी राजे इब्न सौद आणि इब्न वाहब यांच्या हयातीपुरती मर्यादित राहणार नव्हती. त्यांच्यानंतर त्यांच्या भावी पिढयांनाही या कराराची अंमलबजावणी करण्याचा अधिकार वारसा हक्काने प्राप्त होणार होता. करारातील या जगावेगळया अटीमुळे सौदी अरेबियातील सौदी घराण्याची राजसत्ता आणि इब्न वाहबची सनातनी मूलतत्त्ववादी चळवळ या दोहोंचा प्रभाव अजूनही टिकून आहे, याचे रहस्य या करारातील उपरोक्त तरतुदीत आहे.

यथावकाश करारावर दोन्ही पक्षकारांच्या सह्या झाल्या. त्याहीपुढे जाऊन इब्न वाहबने इब्न सौदला आपली मुलगी देऊन त्याला आपला जावई करून घेतले. एक प्रकारे महंमद इब्न अब्दुल वाहबने त्या करारावर शिक्कामोर्तब केले.

या सर्व घडामोडींत राजकारणाने धार्मिकतेवर मात केली, हे मात्र कुणालाही नाकारता येणार नाही.

तौहिद - इब्न वाहबच्या नजरेतून

'तौहिद' म्हणजे सर्वंकष एकेश्वरवाद अशी या संज्ञेची व्याख्या केली जाते. ही संज्ञा इस्लामी श्रध्देचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी या संज्ञेचा अर्थ उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. महंमद इब्न अब्दुल वाहब हा त्यापैकीच एक. परंतु कुराण, हदीस आणि इतर धर्मशास्त्रीय सिध्दान्त आणि संकल्पना यांचा अर्थ लावण्याची इब्न वाहबची पध्दत जहाल सनातनी असल्यामुळे याबाबतचे त्याचे विश्लेषण इतर भाष्यकारांपेक्षा वेगळे झाले आहे.

इब्न वाहबने 'तौहिदची' संकल्पना त्याच्या किताब अल् तौहिद या ग्रंथात तपशिलाने मांडली आहे. 'There is no god But The God' या इस्लामी श्रध्देच्या मध्यवर्ती सूत्रापासून त्याने आपल्या विश्लेषणाची सुरुवात केली असली, तरी त्याच्या मूळ प्रवृत्तीप्रमाणे या विषयाचा अर्थही त्याने संकुचित आणि काहीसा आक्रमक लावला आहे. तौहिदच्या म्हणजेच सर्वंकष एकेश्वरवादाच्या (Absolute Monotheismच्या) संकल्पनेशी इतर कुणालाही किंवा प्रतीकाला जोडणे किंवा तिच्याशी तुलना करणे म्हणजे धर्मद्रोह आहे, असे तो मानत असे. ज्यू धर्मीय त्यांच्या साधुसंतांची आणि महात्म्यांची तुलना ईश्वराबरोबर करतात, तर ख्र्रिश्चन जीझसला ईश्वराचा पुत्र मानतात, म्हणून त्यांचा एकेश्वरवाद विशुध्द आहे, असे इब्न वाहबला वाटत नव्हते. साहजिकच इस्लाम हाच असा एक धर्म आहे, जो सर्वंकष एकेश्वरवादाच्या अटींची व नियमांची पूर्तता करतो अशी इब्न वाहबची धारणा होती. या सर्वश्रेष्ठतेच्या भावनेतूनच अहंगंड निर्माण होतो आणि अशा अहंगंडामुळेच भारतासारख्या मिश्र समाजात मुसलमानांना बिगर मुसलमानांबरोबर समपातळीवरचे संबंध निर्माण करणे किंवा टिकविणे कठीण जाते.

तौहिदचे घटक

इब्न वाहबने तौहिदच्या संकल्पनेचे महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे सांगितले आहेत -

1) अल्लाहची उपासना करताना फक्त त्याचेच स्तवन करावे, कारण सर्व स्तुतीस केवळ तोच पात्र आहे.

2) अव्यंग सहमती व विशुध्द असामान्यत्व म्हणजेच सर्वंकष एकेश्वरवाद,

3) अशा एकेश्वरवादाच्या संकल्पनेवर श्रध्दा ठेवणे हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे. रोजची पाच वेळची नमाज किंवा इतर कुठल्याही धार्मिक कर्तव्यापेक्षा हे कर्तव्य अधिक महत्त्वाचे आहे, याची सतत जाणीव ठेवली पाहिजे.

4) अल्लाह सर्व चराचर सृष्टीचा निर्मिक, नियंता किंवा पोशिंदा, प्रशासक आणि मार्गदर्शक आहे, याचे सतत भान ठेवणे आवश्यक आहे.

5) अल्लाहची सेवा करता यावी, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची निर्मिती अल्लाहनेच केली आहे व यातच त्याचे असामान्यत्व आहे, याची सतत जाणीव ठेवावी.

इब्न वाहबने तौहिदच्या संकल्पनेशी - म्हणजेच सर्वंकष एकेश्वरवादाशी आराधना, सेवा आणि आज्ञाधारकत्व यांची सांगड घातली आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, आराधना आणि सेवा फक्त अल्लाहची करायची असते. अल्लाहशिवाय इतर कुठल्याही प्रतिमांची किंवा प्रतीकांची उपासना करणे हा इस्लामच्या एकेश्वरवादी श्रध्देचा भंग आहे व श्रध्देचा असा भंग होण किंवा करणे हा गंभीर गुन्हा आहे.

या विचारप्रणालीचा प्रसार आणि प्रचार करून इब्न वाहबने मुसलमान पुन्हा मूर्तिपूजेकडे वळण्याची शक्यताच संपवून टाकली.

पण एका बाबतीत मात्र मुसलमानांनी इब्न वाहबच्या विचारप्रणालीचा पराभव केला. इब्न वाहबपासून आजपर्यंतच्या सर्वच सनातनी धर्मपंडितांनी इस्लाममधील सुफी आध्यात्मिक परंपरेला व सुफी संतांना सतत विरोध केला आहे. या परंपरांतील प्रत्येक गोष्ट इस्लामी श्रध्देचा भंग करणारी आहे, म्हणून ती त्याज्य आहे ही सर्वच सनातन्यांची आजपर्यंतची भूमिका राहिली आहे. पण त्याकडे फारसे कुणीच लक्ष दिलेले नाही.

या बाबतीत इब्न तैमियाची भूमिका तर्कशुध्द व प्रगल्भ वाटते. त्याला सुफी परंपरेविषयी आदर आणि आस्था होती. त्याने स्वत: सुफी परंपरेतील कादरिया संप्रदायाचे संस्थापक हजरत अब्दुल कादिर जिलानी या सुफी संताकडून सुफी अध्यात्माची दीक्षा घेतली होती. त्याचे म्हणणे इतकेच होते की असे संत-महात्मे हयात असेपर्यंत त्यांचे दर्शन घेणे किंवा कुठल्याही धार्मिक वा आध्यात्मिक बाबतीत त्यांचे मार्गदर्शन घेणे यात काही गैर नाही. पण त्यांच्या निधनानंतर मात्र त्यांच्या कबरींवर वा मकबऱ्यात जाऊन प्रार्थना करणे, नवससायास करणे योग्य नव्हे. कारण त्यामुळे इस्लामी श्रध्देचा भंग होतो. यात काही तथ्य आहे असे म्हणता येईल, पण त्याचा अर्थ संपूर्ण सुफी आध्यात्मिक परंपरा त्याज्य आहे असे म्हणणे योग्य होणार नाही. या अर्थाने इब्न तैमियाची या विषयासंबंधीची भूमिका तर्कशुध्द आणि प्रगल्भ आहे, असे म्हणता येईल.

शर्क म्हणजे धर्मद्रोह (Blasphemy)

तौहिदचा - म्हणजे सर्वंकष एकेश्वरवादाचा उल्लेख वर आला आहे. शर्क म्हणजे या नाण्याची दुसरी बाजू. एकेश्वरवादाशी अल्लाहच्या संकल्पनेशी किंवा त्याच्या गुणधर्माशी इतर कुठल्याही प्रतिमेची/प्रतीकांची तुलना केली की अल्लाहवरील म्हणजेच सर्वंकष एकेश्वरवादावरील श्रध्देचा भंग होतो. यालाच शर्क म्हणजे धर्मद्रोह म्हटले जाते. इब्न वाहबच्या दृष्टीने धर्मद्रोहाचा हा गुन्हा गंभीर समजला जातो व त्याला देहदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते.

शर्कचा गुन्हा कुणाच्याही हातून घडू नये म्हणून इब्न वाहबने आपल्या अनुयायांना अशी शिकवण दिली की 'अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्याची अखंडित सेवा करणे हे सर्व मुसलमानांचे कर्तव्य आहे आणि शर्कच्या संकल्पनेचा पूर्णत: त्याग करूनच मानव त्यांचे हे कर्तव्य यथोचितरीत्या पार पाडू शकतात. शर्कच्या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप विचारात घेऊनच इब्न वाहबने कुठल्या कृतीला शर्कचा किंवा धर्मद्रोहाचा गुन्हा समजता येईल हे तशा कृत्यांची यादी करून स्पष्ट केले आहे. या यादीत इब्न वाहबने धर्मद्रोही बाबी म्हणून खालील काही बाबींचा आवर्जून समावेश केला.

* अल्लाहव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रतीकाची किंवा प्रतिमेची उपासना करणे

* काही ईप्सित साध्य करण्यासाठी प्राण्यांचा बळी देणे किंवा कुर्बानी करणे

* अल्लाहशिवाय इतर कुणालाही किंवा कशालाही सर्वशक्तिमान समजणे अथवा त्याच्यापाशी दैवी किंवा ईश्वरी शक्ती आहे असे मानून त्याची उपासना किंवा आराधना करणे

* अल्लाहचा कृपाप्रसाद मिळावा म्हणून अशा अवलियांना मध्यस्थ म्हणून अल्लाहकडे रदबदली करण्यास सांगणे

* धर्मपंडित, विचारवंत, उलेमा, पुरोहित यांच्या लिखाणाला किंवा ग्रंथांना पवित्र कुराणासारखे दैवी ग्रंथ किंवा संदेश मानणे व त्यांचा तसा प्रचार आणि प्रसार करणे.

 इब्न वाहब आणि त्याची जिहादची संकल्पना

इस्लामच्या सामाजिक आणि राजकीय विचारात 'जिहादची' संकल्पना जितकी महत्त्वाची समजली जाते, तितकीच अर्थाच्या दृष्टीने ती वादग्रस्त आणि विकृतही समजली जाते. याचे कारण असे आहे की चौदाव्या शतकानंतरच्या काळात इस्लामी अध्यात्म, समाजकारण, राजकारण अशा सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांत आक्रमक सनातनी परंपरा सुरू झाल्यामुळे अनेक इस्लामी संकल्पनांचा संकुचित आणि विकृत अर्थ लावण्याचे प्रयत्न सुरू झाले. इब्न तैमियाच्या विचारात अशी विकृती आढळून न आल्यामुळे त्याच्या चौदाव्या शतकातील ऐतिहासिक फतव्यात हिंसाचाराचे प्रच्छन्न समर्थन करणारा अर्थ काढता यावा, म्हणून त्याच्या मूळ फतव्यात काही अक्षरांची उलटापालट करण्यात आली. हे फेरफार अवैध तर होतेच, तसेच ते इब्न तैमियावर अन्याय करणारे होते. या उलट महंमद इब्न अब्दल वाहब यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडणच सनातनी आक्रमकपणाच्या आणि हिंसाचारी प्रवृत्तीच्या संस्कारातच झालेली असल्यामुळे इस्लाममधील अनेक सिध्दान्तांचा अन्वयार्थ लावताना हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या संकल्पनांचा त्याने सतत आधार घेतला. याला जिहादचाही अपवाद नाही. वास्तविक कुराणात 'जिहाद' हा शब्द युध्द या अर्थाने कुठेही आलेला नाही. युध्द या अर्थाने कुराणात 'कित्ल' हा शब्द आला आहे. (यावरूनच मराठीत कत्तल हा शब्द आला.) असे असताना इब्न वाहबने जिहाद म्हणजे धर्मयुध्द अशी जिहादची व्याख्या करून जिहादच्या संकल्पनेशी हिंसाचाराची सांगड घातली व त्याला धर्ममान्यता असल्याचे जाहीर केले. याला इब्न वाहबचे स्वतःचे विशिष्ट असे कारण होते. इस्लामचा जहाल सनातनी आणि हिंसाचाराचे प्रच्छन्न समर्थन करणारा अर्थ लावून तो लोकांच्या गळी उतरविला. त्याचबरोबर जिहादच्या हिंसक अर्थाला पूरक असे नियमही त्याने बनविले. त्यातले काही नियम पुढीलप्रमाणे आहेत. पण त्याचबरोबर कुठल्या परिस्थितीत किंवा कुठल्या कारणास्तव जिहाद घोषित करता येतो, याचे काही नियम इब्न वाहबने सांगितले आहेत.

* जर दोन परस्परविरोधी पक्ष एकमेकांसमोर सशस्त्र संघर्षाच्या पवित्र्यात उभे असतील, तर शत्रुपक्षाने माघार घेतल्याशिवाय तो संघर्ष थांबू शकत नाही.

* जेव्हा तुमच्यासमोर लष्कर उभे राहते आणि त्याच्याबरोबर युध्द करणे अनिवार्य होते, तेव्हा ते युध्द तुमचे सर्वस्व पणाला लावून लढा. रणांगणातून कधीही पळ काढू नका.

* फक्त इमामच जिहाद जाहीर करू शकतात. कुठल्याही राष्ट्राच्या शासकाला किंवा राज्यकर्त्याला हा अधिकार नसतो.

इब्न वाहबने इस्लामचा जहाल सनातनी आणि हिंसक अर्थ लावून जनसामान्यांना त्याप्रमाणे धर्माचरण करण्यास भाग पाडले. त्याने आपल्या हयातीत आपली ही चळवळ निष्ठेने क्रियाशील ठेवली, इतकेच नव्हे तर त्याच्या पश्चात त्याच्या शिष्यांनी आणि अनुयायांनी ती आजपर्यंत ठेवली आहे. आज जगभर इस्लामच्या नावाने चालू असलेल्या हिंसाचाराचे रहस्य इब्न वाहबच्या या वहाबी चळवळीत दडलेले आहे.

त्यासाठी इब्न वाहबने तकलीद (पूर्वसुरींचे अंधानुकरण करणे), तकफीर म्हणजे कुणालाही धर्मद्रोही ठरवून, त्याला कठोर शिक्षा करणे, शिर्क - धर्मद्रोहाच्या गुन्हा, जिहाद अशा संकल्पनांच्या माध्यमांतून सर्व समाजावर आपला वचक ठेवला.

मग प्रश्न असा निर्माण होतो की, जिहादचा नेमका अर्थ कोणता आणि इब्न वाहबने किंवा त्याच्यासारख्या इतर सनातनी धर्मपंडितांनी लावलेल्या या संज्ञेचा अर्थ चुकीचा का समजायचा? दोन्ही प्रश्न आपापल्या परीने महत्त्वाचे आहेत. पण त्यांची उत्तरे देणे काही कठीण नाही.

इब्न वाहबने पुनरुज्जीवनवादी चळवळ सुरू केली. ते त्याचे उद्दिष्ट होते व ते साध्य होईल असाच इस्लामी संज्ञांचा आणि सिध्दान्तांचा अर्थ लावणे त्याच्या दृष्टीने आवश्यक होते. पण अर्थ लावण्याची ही पध्दत व्यक्तिनिष्ठ असते. म्हणून अशा पध्दतीने लावलेला अर्थ चुकीचा होऊ शकतो. या उलट वस्तुनिष्ठ निकष स्वीकारून अन्वयार्थ लावण्याची पध्दत शास्त्रशुध्द असते. मुंबईतील इन्स्टिटयूट ऑफ इस्लामिक स्टडीज या संस्थेतर्फे झालेल्या संशोधनात जिहादचा अर्थ लावण्यासाठी दोन निकष स्वीकारले होते. एक म्हणजे जिहादचा शब्दकोशातील अर्थ आणि दुसरा म्हणजे कुराणात हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे, त्याचा संदर्भ.

इमाम रगीब या मान्यवर कोशकाराने मुफरादल अल कुराण हा कुराणातील शब्दांचा कोश प्रसिध्द केला आहे. (शेख मुहंमद अब्दुह फिरोज, पुरी, लाहोर, याने त्याचे उर्दू भाषांतरही प्रसिध्द केले आहे.) या शब्दकोशात 'जिहाद हा शब्द जहद या धातूपासून तयार झाला असून, प्रगल्भ आकलन शक्ती, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य आणि त्या आधारे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याची तयारी असा अर्थ सांगितला आहे. मौलवी चिराग अली या आणखी एका कोशकाराने 'जिहाद' या शब्दाचे खालीलप्रमाणे अनेक अर्थ दिले आहेत.

जिहाद म्हणजे युध्द या अर्थाने मात्र जिहाद शब्दाचा वापर कुठेच झालेला नाही. पण अप्रत्यक्षपणे तो येतो. अन्यायाचे परिमार्जन, स्वसंरक्षण आणि आक्रमणाचे पारिपत्य यापैकी कुठल्याही कारणास्तव युध्द अपरिहार्य असेल, तर मात्र मुसलमान हातात शस्त्र घेऊ शकतात आणि ते युध्दसुध्दा त्याच बांधिलकीने व आपल्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर करून लढायचे असते. वरील विवेचनातून एक निष्कर्ष निश्चितच काढता येतो. गेल्या अनेक वर्षांपासून भारतासहित अनेक देशांत इस्लामच्या नावाने जो दहशतवादी हिंसाचार अव्याहत सुरू आहे, त्याचा इस्लामशी कसलाही संबंध नाही. त्याचा संबंध आहे तो चौदाव्या शतकापासून इस्लामचा जहाल सनातनी अर्थ लावून जी विद्वेषी आणि हिंसक मानसिकता निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत, त्या विखारी मानसिकतेशी आहे. त्यामुळे या अमानुष हिंसाचाराचा मुकाबला बळाने करावा लागेलच. पण तेवढे पुरेसे नाही. कारण ज्या विखारी विचारप्रणालीच्या आधारे हिंसाचारी मानसिकता तयार करण्यात येते, त्या विचारप्रणालीच्या मुळावरच पर्यायी विचारप्रणालीने घाव घालावे लागतील.

इथे आणखी एक शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा सांगणे आवश्यक आहे. महंमद पैगंबरांचे महानिर्वाण इ.स. 632मध्ये झाले, तर इस्लामच्या नावाने सुरू झालेली हिंसाचाराची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरू झाली. त्यामुळे, अशी काही कारवाई केल्यामुळे आमच्या धर्मात हस्तक्षेप होत आहे किंवा आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असा संरक्षणात्मक पवित्रा कुणालाही घेता येणार नाही, हेही इथे लक्षात ठेवले पाहिजे.

अब्दुल कादर मुकादम