'गांधी तीर्थ' - एक समृध्द विचारशिल्प

 विवेक मराठी  15-Nov-2018

गांधी तीर्थ' - जळगावच्या जैन हिल्सच्या माथ्यावर मोठया कष्टाने, कल्पकतेने आणि दूरदृष्टीतून निर्मिलेले एक आगळे वास्तुशिल्प. खरे तर 'वास्तुशिल्प'पेक्षा त्याला 'विचारशिल्प' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरू शकेल. गांधीविचाराला व जीवनकार्याला नव्या पिढीशी जोडण्याच्या मिशनचे हे एक प्रकारे केंद्रस्थान. भारतभूमीच्या रोमरोमाचा अभ्यासक असलेल्या, भारताची सामाजिक वीण नेमकी कळलेल्या बापूंच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याची आश्वासक जाणीव देणारे हे केंद्रस्थान. पारंपरिक पध्दतीपेक्षा या कार्याचा वेगळया पध्दतीने परिचय करून देण्याचा हा प्रयत्न. बापूंच्या विचारांइतकेच हे वास्तुशिल्प भक्कम... साडेआठ रिश्टरच्या भूकंपातही ताठपणे टिकण्याची हमी देणारे... या उपक्रमशील विचार-संचयाबद्दल...

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज like करावे
https://www.facebook.com/VivekSaptahik/


हिरव्याकंच परिसरातून पावले टाकत आपण गांधी तीर्थाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो. अगदी प्रारंभी एक आगळे शिल्प आपल्यासमोर येते. श्रांतपणे बसलेले बापू आणि त्यांचे पाय धुणाऱ्या कस्तुरबा... भारतीय नारीच्या पतीप्रति समर्पणाची परमावधी म्हणजे 'बा' हे आपण ऐकून असतो, पण त्यांचे हे असे समर्पण आपण बहुधा प्रथमच पाहत असतो. ही काही निव्वळ शिल्पकाराची प्रतिभाशक्ती नव्हे, जानेवारी 1939मध्ये बार्डोलीच्या स्वराज्य आश्रमात हे छायाचित्र टिपण्यात आलेले आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या आजच्या युगात या समर्पण-सेवाभावाला कदाचित प्रतिगामी मानले जाईल, पण हा समर्पणाचा आविष्कार भारतीय परंपरेची आठवण करून देणारा ठरतो.

डाव्या-उजव्या बाजूची नेत्रसुखद हिरवाई पार करीत, आम्रवाटिका पार करीत, डौलाने फडकणारा तिरंगा आणि गांधीजींची भव्य प्रतिमा यांचे दर्शन घेत आपण गांधी तीर्थ संकुलाच्या प्रवेशद्वाराशी येतो. पायऱ्या चढून सज्जात पोहोचलो की आत उजवीकडे, अगदी समोर गांधीजींची ध्यानमग्न मूर्ती दिसते. ऍम्फिथिएटरच्या उतरत्या पायऱ्या, त्यातही हिरवळ जपलेली. या पायऱ्यांच्या अखेरीस एका ओटयावर गांधीजी. डाव्या-उजव्या बाजूंना मोठी दालने, तीत आसनव्यवस्था. गांधीविचाराचे शिक्षण देणारे वर्ग चालविण्यासाठीच्या या पायाभूत सुविधा.

परत येऊन ऍम्फिथिएटरच्या बाजूने पुढे गेलो, तर लागते एक प्रशस्त दालन. 'गांधींचा शोध' (खोज गाँधीजी की) या प्रदर्शनाचा हा आरंभबिंदू. इथे गांधी तीर्थाच्या निर्मितीची प्राथमिक माहिती ऑॅडिओ-व्हिज्युअल पध्दतीने देऊन या 'शोधा'चा श्रीगणेशा होतो. तिथून एक मजला चढून आपण वर जातो. त्यानंतरचे सुमारे दोन-अडीच तास गांधींचे गारूड आपल्या मनावर होत राहते. आपण ऐकलेला, वाचलेला गांधी मनात रेंगाळत असतोच. इथे भेटणारे बापू आणखीच वेगळे असतात. हे नुसते गांधींचा जीवनप्रवास मांडणारे वस्तुरूप प्रदर्शन नसते. इथे गांधी भेटतात, बोलतात, मनाला साद घालतात आणि आपल्याच मनाचा प्रतिसाद ऐकत आपण एक एक पाऊल पुढे टाकत सुमारे 800 मीटरचा प्रवास करून बाहेर पडतो. आत प्रवेश करताना 'काय सांगताहेत ते पाहू तरी...' अशी भूमिका बाहेर पडताना बदललेली असते. आपण विचारमग्न झालेलो असतो. हा शाश्वत विचार समाजात रुजविण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार आपण करू लागलेलो असतो.

*****

कुठल्याही प्रदर्शनाच्या रिवाजाप्रमाणे गांधीजींचे पोरबंदर येथील बालपण, त्यांच्या घरची संपन्नता, आईचे संस्कार, बालपणी त्यांनी अनुभवलेल्या काही वाईट सवयी अशी एक जंत्री समोर येते. कानाला लावलेल्या हेडफोनमधून तुम्हाला हव्या त्या भाषेत तुम्ही हे ऐकत असता. हळूहळू त्यांचे शिक्षण, परदेशगमन, तिकडे जाण्याआधी त्यांनी मांस-मदिरा व अभक्ष्य-भक्षण आणि परस्त्रीगमन न करण्याचे असे तीन गोष्टींचे आईला दिलेले वचन, परतल्यानंतरचा बुजरेपणा, दक्षिण आफ्रिकेतील कार्य, तेथून भारतात परतल्यानंतर आलेले अनुभव, त्यांनी केलेले देशभ्रमण आणि त्यातून कळलेला भारत, स्वातंत्र्यचळवळीत त्यांच्या अहिंसात्मक आंदोलनाची वाटचाल, त्यांची विविध आंदोलने, स्वातंत्र्येतिहासातील काही भीषण घटनांचे उल्लेख असे करत हे प्रदर्शन आपल्याला आधी भारतीय स्वातंत्र्यापर्यंत आणते. अर्थात हा सारा स्वातंत्रलढयातील अहिंसक आंदोलनाचाच भाग असतो.

इथून पुढचा प्रवास असतो तो गांधीविचारांचा. गांधीविचारातून देशाच्या विविध भागांत उभी असलेली समाजसुधारणेची कामे, त्यांचे नायक-नायिका यांच्याशी प्रत्यक्ष संवादातून हे प्रदर्शन अखेरच्या टप्प्यात उलगडत जाते. कुठलेही अप्रिय प्रश्न किंवा प्रसंग न मांडता केवळ आणि केवळ सकारात्मकतेचा हा शोध आपल्याला विचारमग्न आणि कार्यप्रवणतेची प्रेरणा देत संपतो.

संपूर्ण प्रदर्शनाची रचना, त्यासाठी वापरलेली छायाचित्रे, फलकांवरील संहिता, दृक्-श्राव्य संहिता व त्याचे सादरीकरण, आत वापरलेली शिल्पे, त्यांची रचना, प्रकाशयोजना, तीन मजले उतरून येत असताना कुठेही न जाणवणारे चढउतार... प्रत्येक गोष्टीचा प्रभाव नकळत पण खोलवर रुतत असतो. आपण भारावून जात एक एक पाऊल पुढे जात असतो. गांधीजींना मिळालेली विविध पदके, त्यांचे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या हस्तांक्षरांच्या मूळ प्रती या गोष्टी या प्रदर्शनाला जिवंतपणा देतात.

'म्युझियम म्हणजे विविध वस्तूंचा संग्रह' अशी सोपी सुटसुटीत व्याख्या करता येऊ  शकते. पण काही ठिकाणी वेगळे प्रयोग केले जातात. असाच हा वेगळा प्रयोग. इथे विचारांना प्रवाहित केले जाते. प्रदर्शनात काय हवे यापेक्षाही काय नको यावर आधी विचार करण्यात आला आणि नेमकेपणाने परिपूर्ण आणि सकारात्मक गांधीविचार मांडणारे हे प्रदर्शन साकारले. संवादी शैलीतील हे प्रदर्शन त्यामुळे आगळेवेगळे ठरले.

****

प्रदर्शन संपवून आपण बाहेर पडतो आणि तिथून खऱ्या गांधी तीर्थाचा प्रारंभ होतो. आत जे काही पाहिले, त्याचे सार आपल्याला 'गांधी रिसर्च फाउंडेशन'च्या विविध उपक्रमांतून समजून घ्यायचे असते. कारण हाच या साऱ्या उपक्रमाचा खरा गाभा आहे...

****

तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 25 मार्च 2012 रोजी हे गांधी तीर्थ 'विश्वकल्याण आणि मानवतेला अर्पण' करण्यात आले. जवळजवळ 81 हजार चौरस फुटांत, खास जोधपूर दगडात कोरलेले हे शिल्प उभे आहे. संपूर्ण इमारतीचे आर्किटेक्चर इतके वैशिष्टयपूर्ण की त्यातील भव्यता आणि कलाकुसर पदोपदी जाणवावी. त्याहून वैशिष्टय असे की हे आर्किटेक्चर कुणा एकाच्या आराखडयानुसार बनलेले नाही. अगदी लॅरी बेकर्स यांच्यासह अनेक मान्यवर आर्किटेक्ट्सचा विचार यात सामावलेला आहे. स्वत: भंवरलालजी जैन आणि जैन परिवारातील अन्य मान्यवर, गांधी तीर्थाच्या उभारणीत समरस झालेले अनेक सहकारी देशभर फिरले. गांधीजींवरील कामे जिथे कुठे उभी आहेत, ते सारे प्रकल्प अभ्यासले गेले. त्यातून या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. केवळ प्रदर्शनापेक्षा वेगळे काय करता येईल, गांधीजींच्या विविध संकल्पना देशभरात रुजविण्यासाठी कुठले उपक्रम राबविता येतील, त्यासाठी कुठल्या पायाभूत सोयीसुविधा लागतील या सर्वांचा अभ्यास करून आराखडा आखला गेला. 'अनुभूती स्कूल'च्या अनोख्या वास्तुशिल्पाच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी बांधून केवळ 16 महिने 20 दिवसांत हे भव्य शिल्प उभारले गेले.

हा सारा विस्तार भव्य आहेच, तसाच तो पर्यावरणस्नेहीही आहे. म्हणूनच त्याला 'ग्रिहा'चे पंचतारांकित मानांकन, तर 'लीड इंडिया'चे प्लॅटिनम मानांकन मिळालेले आहे. अशी मानांकने मिळविणारे हे भारतातील पहिलेच प्रदर्शन आहे! लोकार्पण झाल्यापासून 2018पर्यंतच्या साधारण 6 वर्षांत चार लाखांहून अधिक जणांनी या स्थळाला भेट दिलेली आहे.

****

'गांधी तीर्थ' हा देशाची 'कृषिपंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन हिल्सचा एक भाग आहे. 'गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव' ही कलम 25अंतर्गत स्थापित कंपनी आहे... हे कळते, तेव्हा सलामीलाच आपली विकेट पडलेली असते. आतापर्यंत आपण याकडे 'जैन ग्रूप'चा उपक्रम म्हणून पाहत असतो. हे त्यापलीकडे भव्य आणि उदात्त असल्याचे स्पष्ट होऊ  लागते. कलम 25अंतर्गत कंपनी याचा अर्थ ही ना नफा तत्त्वावर चालणारी, पारदर्शक व्यवहार असणारी, नियमित ऑॅडिट होणारी सेवाभावी संस्था. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी या कंपनीचे चेअरमन आहेत आणि या संचालक मंडळात डॉ. अनिल काकोडकर, डॉ. डी.आर. मेहता, डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्यासह जैन परिवारातील सदस्यांबरोबरच अन्य मान्यवरांचा समावेश आहे, ही माहिती या उपक्रमाविषयी आपल्या आशा अधिक पल्लवित करणारी ठरते.

****

विचार हा या प्रदर्शनाचा पाया. हा गांधीविचार एका छताखाली संकलित करणे हे मोठे आव्हान असते. 'गांधी तीर्थ हे एक असे स्थळ आहे, जिथे महात्मा गांधी या विषयावरील देशातील आणि कदाचित जगभरातीलही सर्वात मोठे संकलन आहे' असे धाडसी विधान मी करू शकतो, कारण त्याची अनुभूती मी स्वत: घेतली आहे. देशभरात गांधीविचार मांडणाऱ्या हजारो संस्था आहेत. या सर्व संस्थांतून उपलब्ध ग्रंथधन गांधी तीर्थात उपलब्ध आहे. गांधीजींनी लिहिलेली आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली सुमोर 11 हजार पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. त्यात अनेक दुर्मीळ पुस्तकांचाही समावेश आहे. अनेक हस्तलिखिते आहेत. नेमकेपणाने सांगायचे तर सुमारे पावणेचार लाख डिजिटल पृष्ठांचे संकलन इथे आहे. गांधीजींनी संपादित केलेल्या किंवा प्रकाशित केलेल्या पाच हजाराहून अधिक पत्र-पत्रिका, त्यांच्या आवाजात 152 भाषणे, 85 चित्रफिती आणि विनोबा भावे यांच्या आवाजातली 350 भाषणे इथे आहेत. गांधीजींची 5 हजार, विनोबांची सव्वाचार हजार आणि स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित सुमारे पावणेसहा हजार छायाचित्रांचा ठेवा इथे आहे. विविध वस्तू आहेत. पण हे केवळ जमवून ठेवणे इतकाच याचा अर्थ नाही.

****

इथे आठवतात मोठे भाऊ... म्हणजे भंवरलालजी जैन. त्यांच्या आंतरिक इच्छेतून, समाजाचे देणे देण्याच्या उदात्त विचारातून हा प्रकल्प साकारला. स्वत: भाऊ  देशभर फिरले. असंख्य कामे स्वत: पाहिली. समजून घेतली. शाश्वत विचार तेवढयाच शाश्वत पध्दतीने टिकला पाहिजे, या हेतूने या साऱ्या साहित्याचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजघडीला जर्मन तंत्रज्ञानाची प्रगत डिजिटायझेशन व्यवस्था इथे कार्यरत आहे. सारी पुस्तके, सारा डेटा 'सर्चेबल मोड'मध्ये उपलब्ध आहे. पीडीएफमध्ये पुस्तके उपलब्ध आहेतच, तसेच विशेषत: इंग्लिश पुस्तकांसाठी ओसीआर वापरून शब्दांचे सर्चही होऊ  शकतात. पुस्तके, लेख असोत की छायाचित्रे... तुम्हाला हवी ती नेमकी गोष्ट 10 मिनिटांत ग्रंथालयात उपलब्ध होते. इतकेच नाही, तर काही दुर्मीळ पुस्तके तुमच्या मागणीनुसार तुमच्या हाती डिजिटल कॉपीच्या स्वरूपात येतात. यासाठी 72 टेराबाइटच्या सर्व्हरवर हा सारा डेटा सुरक्षित आहे. उदय महाजन आणि त्यांची टीम संपूर्ण देशभर फिरून हे सर्व कार्य करत असते.

 

सुरक्षिततेबरोबरच सातत्यपूर्ण सुधारणा हा आणखी एक भाग. कधीकधी 'प्रिंटिंग मिस्टेक'मुळे अर्थाचा अनर्थ होत असतो. काही पुस्तकांच्या पुनर्मुद्रणात असे घोटाळेही झालेले आहेत. मूळ साहित्य, मूळ शब्द जसे आहेत ते त्याच स्वरूपात असणे हे खरे जतन. यासाठी इथे सर्व जुनी ग्रंथसंपदा स्कॅन करून जतन केलेली आहे. हा साठा असलेला इथला 'अर्काइव्ह्ज' विभाग हा आणखी एक महत्त्वाकांक्षी विषय. जुन्या, ऐतिहासिक मूळ प्रती इथे सुरक्षित आहेत. हा जुना कागद जीर्ण होतो, हाताळताना त्याचे तुकडे पडतात. तसे होऊ नये, म्हणून विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करून त्यांचे जतन केले गेले आहे. हे सगळीकडेच होते. इथली खासियत म्हणजे, ही सारी सामग्री नियंत्रित तापमानात सुरक्षित आहे. हेही सरकारी संग्रहालयांत होते... मग इथले वेगळेपण काय? हा संग्रह एका मिनिटाचाही खंड पडू न देता नियंत्रित तापमानात ठेवला जातो. संध्याकाळी घरी जाताना ही यंत्रणा बंद करण्याचा प्रकार इथे होत नाही. त्या प्रकारामुळे कागदपत्रे अधिक लवकर खराब होत असतात. ही खास काळजी तर घेतली गेली आहेच, तसेच इथे उगाच कुणालाही प्रवेश देण्याचा अगोचरपणाही टाळण्यात आला आहे. त्यामुळे हे तापमान नियंत्रणात ठेवण्यात, कागदपत्रांची अकारण हाताळणी थांबते आणि त्यांचे आयुष्य वाढते! या सर्व उपक्रमांसाठी त्यांनी तज्ज्ञ मनुष्यबळ विकसित केले आहे. इथे 'मिळविले आहे' असा शब्द वापरलेला नाही. महाजन विनोदाने सांगतात, ''आम्ही इथे मुद्दामच आयटीमधील तज्ज्ञ घेतलेले नाहीत. त्यांची अपेक्षा मोठी असते आणि ते लवकर लवकर नोकऱ्या बदलतात. आम्ही इथलीच अर्धशिक्षित, अल्पशिक्षित मुले मिळविली, त्यांना प्रशिक्षित केले आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी काही मोजके तज्ज्ञ आणले. हा विभाग विनाअडथळा, उत्तम प्रकारे कार्यरत आहे. अपेक्षित 'रिझल्ट' देतो आहे.''

या गप्पा सुरू असतानाच 'जैन'मधील अधिकारी, सध्या 'बा-बापू 150' या ग्रामविकास प्रकल्पात कार्यरत असलेले विनोद रापतवार आले. बोलता बोलता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. आजकाल फोटोशॉपच्या आणि विरोधकांना कुठल्याही थराला जाऊन बदनाम करण्याच्या जगात डिजिटल फोर्जरी हा एक महत्त्वाचा भाग ठरतो आहे. कुणी कुठल्या नेत्याचा फोटो विकृत स्वरूपात सादर करतो आणि तो फॉरवर्ड होत राहतो. त्यातील अस्सलपण कसे शोधायचे? किमान गांधीजींपुरता तरी हा विषय इथे सुटला आहे. या विषयातील कुठल्याही फोटोचे अस्सलपण शोधण्यासाठीची इमेज बँक इथे सर्च ऑॅप्शनसह कार्यरत आहे. हे काम तर 2004पासून इथे सुरू आहे.

*****

तर, 'गांधी रिसर्च फाउंडेशन' या शिखर संस्थेच्या नेतृत्वाखाली देश-विदेशात गांधीविचारांचा आणि संस्कारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित होत असतात. शिक्षण, समाजकार्य, संशोधन अशा विविध क्षेत्रांतून हे योगदान होत असते आणि जगभरातील अनेक नामवंत यामध्ये सहभागी होत असतात. देश-विदेशांतील विविध संस्थांशी 'जीआरएफ'चा समन्वय करार झालेला असतो. उद्देश एकच - शाश्वत गांधीविचार सर्वदूर पसरविणे. त्यातून शांतीचा संदेश जगाला देणे. गांधीविचार आणि शांतीविचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू!

हा विचार पोहोचविण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'गांधीविचार संस्कार परीक्षा'. यासाठी एक स्वतंत्र विभाग आणि तज्ज्ञ सहकारी कार्यरत आहेत. गांधीजींवरील ठरावीक पुस्तकांपैकी एक पुस्तक निवडायचे. ते विकत घ्यायचे. या पुस्तकाचे मूल्य हेच या परीक्षेचे शुल्क. खूप साधा-सरळ विषय. पुस्तक घेऊन घरी जायचे. ते आत्मसात करायचे. त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा विश्वास आला की केंद्राशी संपर्क साधायचा. तुमची ऑॅनलाइन किंवा ऑॅफलाइन परीक्षा घेतली जाते आणि उत्तीर्ण झालात की प्रमाणपत्र दिले जाते. सहभागी शाळांतील शिक्षक यासाठी मदत करतात, पुढाकार घेतात. इतिहासाचे अभ्यासक, अनेक संशोधन ग्रंथांचे लेखक भुजंग बोबडे हे या विषयाचे प्रमुख. ते स्वत: इतिहास संशोधकही आहेत आणि मोडी लिपीचे अभ्यासकही. 'आधाराविण बोलू नये' या वचनाला जागून कुठल्याही ऐतिहासिक गोष्टीचा आधार शोधणारे, गांधीविचार समर्पित उमदे व्यक्तिमत्त्व. सन 2008मध्ये जळगाव परिसरातील साधारण 4000 मुलांपर्यंत हा विषय पोहोचवून गांधी रिसर्च फाउंडेशनने या उपक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतरच्या 10 वर्षांत आजवर 15 लाख जणांनी ही परीक्षा दिली आहे. दर वर्षी ही संख्या वाढतेच आहे. चालू वर्षात सुमारे 2 लाख जणांनी ही परीक्षा दिली. अनेक प्रशासकीय अधिकारी, शासकीय, खासगी कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, तुरुंगांतील बंदीजन... विविध क्षेत्रांतील, वयोगटांतील लोक ही परीक्षा देतात. गांधीविचारांचा शोध घेतात. बरे, ही पुस्तके केवळ 'थिअरॉटिकल' नाहीत. 'आरोग्य की कुंजी', 'हमारे गाँव का पुनर्निर्माण' यासारख्या पुस्तकांना खासा प्रायोगिक आधारही आहे. अशा प्रकारच्या अभ्यासातून तयार झालेली माणसे तो विचार जमिनीवर उतरविण्यासाठी सज्ज होतात. कार्यरत होतात. हा विचार एक पाऊल पुढे सरकतो.

गावागावांपर्यंत 'गांधी' पोहोचविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे फिरती प्रदर्शने. 'मोहन से महात्मा' हे प्रदर्शन एका खास वाहनातून गावोगावी प्रवास करते. शाळा-महाविद्यालयांतून या प्रदर्शनांचे आयोजन होते आणि जळगावपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या लक्षावधी लोकांपर्यंत हा विचार पोहोचविला जातो.

****

शैक्षणिक उपक्रमांचा परीघ मोठा असतो. 'पीजी डिप्लोमा इन गांधियन सोशल वर्क' असा एक खास अभ्यासक्रमच यासाठी तयार झाला आहे. डॉ. जॉन चेल्लादुराई या विभागाचे अधिष्ठाता आहेत. गांधीजींनी स्थापन केलेले गुजरात विद्यापीठ, मेक्सिकोतील सायरस युनिव्हर्सिटी, इटलीतील इंटरनॅशनल पीस सेंटर यांच्याशी जीआरएफचा समन्वय करार झालेला आहे. भारतीय संस्कृतीचे प्रसिध्द अभ्यासक धर्मपाल यांची कन्या आणि हेडलबर्ग युनिव्हर्सिटीतील आशियाई अभ्यास विभागाच्या प्रमुख गीता धर्मपाल यासुध्दा नजीकच्या भविष्यात इथे रुजू होत आहेत.

***

हे झाले विविध प्रकारचे उपक्रम. पण एक भाग अत्यंत महत्त्वाचा आणि राष्ट्रव्यापी ठरणारा आहे. त्याची माहिती करून घेणे आवश्यकच. हा विषय आहे ग्रामविकासाच्या उपक्र्रमांचा.

गांधी आणि ग्रामविकास हेही अद्वैत. 'खेडयाकडे चला' ही गांधीजींची मूळ संकल्पना. पण कालमानानुसार त्यात काही व्यवहार्य बदल करून ग्रामीण भागातील तरुणांचा मोठया शहरांकडे वाढणारा लोंढा नियंत्रित करायचा असेल, तर तालुका-जिल्हा स्तरापर्यंतच्या निमशहरी भागांत काही कामे उभी केली पाहिजेत, ही जाणीव आता दृढ होत आहे. बापूंच्या 150व्या जयंतीनिमित्त जीआरएफने आखलेल्या आगळया उपक्रमाची, 'बा-बापू 150' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उद्धोषणा अनिलभाऊ  जैन यांनी केली.

'हम चले ग्रामस्वराज की ओर' ही या मोहिमेची टॅगलाइन. गांधीजींचे नाव घेऊन स्वतंत्र भारतात अनेक योजना आल्या. बऱ्याचशा फसल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळाच्या प्रारंभापासूनच महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता मोहिमेचे सूर छेडले. त्याला देशभरात मिळणारा प्रतिसाद लक्षणीय दिसतो आहे. एखादी गोष्ट मनापासून स्वीकारली आणि त्यात समाजहिताची कळकळ असेल, तर हा समाजपुरुष त्याला भरभरून प्रतिसाद देतो, हा इथला इतिहास आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनने हाच विषय नव्याने आणि अधिक विस्ताराने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचे नेतृत्व करताहेत जैन परिवारातील नवपरिणित स्नुषा अंबिका अथांग जैन. भंवरलालजी जैन यांच्या समाजसेवी वृत्तीचा वसा नव्या पिढीने तर उचलला आहेच, त्याचबरोबर परिवाराबाहेरून येऊन आता या परिवाराचा भाग बनलेली नवी पिढीही तो वारसा समर्थपणे पुढे चालविण्यास सज्ज झाली आहे.

'बा-बापू 15'अंतर्गत देशभरातील 150 गावांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील 70, मध्य प्रदेशातील आणि राजस्थानातील प्रत्येकी 15 आणि गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतून प्रत्येकी 10 गावांतून ही मोहीम पोहोचणार आहे. अशा तब्बल 150 गावांतून परिवर्तनाची नवी पहाट उगवण्याची प्रसादचिन्हे यातून दिसताहेत.

करण्यासारखे खूप काही आहे, पण यात सहा पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

1) ग्राम आरोग्य

2) प्राथमिक शिक्षण

3) शुध्द पेयजल, ग्रामसफाई व स्वच्छतागृहे

4) पाणलोट विकास आणि व्यवस्थापन

5) शेती

6) सहकार आणि संस्थ

व्याप्ती खूप मोठी आहे. त्यासाठी आवश्यक ती तरतूदही केली आहे. पण पैसे उचलून देणे आणि काम करून घेणे हा प्रकार त्यांना करायचा नाही, हा धडा या ग्रूपने खूप पूर्वी घेतला आहे. भंवरलालजी जैन यांनी आपल्या वाकोद गावी एकेकाळी समाजसुधारणेसाठी मोठा खर्च करून काही कामे केली होती. भारतात सीएसआरचा कायदा येण्याच्या अनेक वर्षे आधी त्यांनी आपल्या नफ्याचा मोठा वाटा आपल्या गावातील विकासकामांसाठी खर्च केला होता. पण त्यांच्या लक्षात असे आले की झालेल्या कामांशी समाजाची बांधिलकी उरलेली नाही. लोकसहभाग नसल्यामुळे येणारी उदासीनता तेथे त्यांना दिसली. तेव्हापासून त्यांनी लोकसहभागाचा आग्रह धरला. 'बा बापू 150'मध्येही तेच तत्त्व अंगीकारण्यात येत आहे.

जनजागृती, ज्ञान आणि कौशल्य विकास, साधनसंपत्तीचे संकलन, लोकसंस्थांची निर्मिती आणि त्यातून भौतिक सुविधांची निर्मिती असा हा प्रवास 2018 ते 2023 या दरम्यान होऊ घातला आहे. देशातील प्रत्येक तालुक्यापर्यंत जैन समूहाचे जाळे विणलेले आहे. त्या जाळयाच्या माध्यमातूनच त्यांनी या 150 गावांची निवड केली आहे आणि तेथे हे पथदर्शक प्रकल्प आकाराला येणार आहेत. 2023मध्ये आपल्या पायावर उभी राहिलेली, इतरांना मार्गदर्शक ठरणारी ही 150 गावे उर्वरित देशासाठी आदर्श ठरतील. भंवरलालजींनंतर जैन समूहाचे समर्थ नेतृत्व करणाऱ्या अशोकभाऊंच्या, म्हणजेच अशोक जैन यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने उचललेले हे समर्थ आणि दिशादर्शक पाऊल.

हे काम केवळ आपण एकटयानेच करायचे आहे, असेही त्यांनी गृहीत धरलेले नाही. समाजाचे सर्व घटक, शेतकरी-तरुण-महिला यांचा सहभाग यात अपेक्षित आहे. शासकीय यंत्रणांना ते लक्ष्य करीत आहेत. बँका, समाजसेवी संस्था या सर्वांचे योगदान त्यांना हवे आहे. यातून स्वयंपूर्ण गावांची गांधीजींची संकल्पना प्रत्यक्षात उतरेल. लोकसंख्येचा स्फोट आणि वाढती बेरोजगारी यांच्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नांत हा उपक्रम खूप मोलाचा ठरेल, हे निश्चित.

****

'गांधी रिसर्च फाउंडेशन' सन 2007पासून कार्यरत आहे. सन 2012मध्ये गांधी तीर्थचे लोकार्पण झाले, त्या निमित्ताने त्या पाच-सहा वर्षांतील वाटचालींचे, विचारमंथनाचे संकलन 'खोज गांधीजी की' या एका विशेषांकाच्या स्वरूपात प्रकाशित झाले आहे. त्यानंतर आजतागायत याच नावाने एक त्रैमासिक प्रकाशित होत आलेले आहे. त्यातून जीआरएफच्या उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचते.

या विशेषांकात भंवरलालजींनी या उपक्रमाविषयी आपले मूलभूत चिंतन मांडले आहे. या उपक्रमामागील प्रेरणा, भावना आणि आर्थिक रचना यांचा ऊहापोह करून झाल्यानंतर आपल्या मनोगताच्या समारोपात ते सांगतात, 'जगात हिंसा, हुकूमशाही, स्वार्थलोलुपता आणि चंगळवादाकडे जाण्याचा वेग वाढेल, त्याच वेळी त्यापेक्षा अधिक वेगाने, प्रभावाने गांधीजींचे विचार, त्यांचे कार्य तरुण पिढीला आकर्षित करेल, साद घालेल याच विश्वासातून एका विश्वस्तरीय स्मारकाच्या निर्मितीचे बीज माझ्या मनात रुजले. गांधी तीर्थ हे त्याचेच फळ आहे. गांधीजींच्या प्रेरणा आपल्या सर्वांच्या मदतीने मी समाजातील सर्व गरजूंपर्यंत पोहोचवू इच्छितो. हीच माझी भावना आहे. माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी माझी हीच मनस्वी भावना आहे...'

 या समूहाचे विद्यमान अध्यक्ष अशोकभाऊ भंवरलालजींच्या याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. गांधीविचार कालातीत आहे. तो प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा. विशेषत: हा देश ज्या नव्या पिढीच्या हातात आहे, त्यांना या विचारांनी प्रेरित करण्याची आवश्यकता अशोक जैन यांनी ओळखलेली आहे. त्यामुळेच, हा विषय आपल्या घरातील नव्या सूनबाईंच्या हाती विश्वासाने सोपवितानाच या सर्व उपक्रमांत देशभरातील तरुण पिढी जोडण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गांधी तीर्थ येथे सातत्याने तरुणांचे उद्बोधन व प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, त्यातून गांधीप्रेरित नवी पिढी निर्माण करणे आणि त्या आधारे राष्ट्रनिर्माणाची पायाभरणी करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.

अशोक जैन सांगतात, ''अहिंसा आणि प्रामाणिक व्यवहार आमच्या रक्तात भिनलेला आहे. आमचा उद्योग उभारताना अगदी प्रारंभीच्या काळात स्व. भाऊंकडे परवान्यासाठी खूप मोठया रकमेची मागणी करण्यात आली होती. आम्हाला प्रामाणिकपणे व्यवहार करत गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्माण करायची होती. आम्ही ती लाच देणे नाकारले. परिणामी आम्हाला परवाना मिळण्यास उशीर झाला आणि या काळात आम्ही जी पाचपट प्रगती करू शकणार होतो ती खुंटली. असे झाले, तरी आम्ही आमचे सामाजिक उत्तरदायित्व विसरलो नाही. अगदी प्रारंभीच्या काळापासून आजपर्यंत आम्ही आमच्या संपत्तीतील न्याय्य वाटा समाजहितासाठी खर्च करत आलो आहोत. यापुढेही तोच वारसा कायम राहील. संपत्तीच्या निर्मितीचा उपयोग राष्ट्रकार्याच्या निर्माणासाठी करण्याचा बापूजींचा आदर्श आम्ही या माध्यमातून ठेवलेला आहे. 'गांधी तीर्थ' हे इतर कुठल्याही धार्मिक तीर्थाइतकेच पवित्र आणि सर्वांसाठी खुले आहे. यातून प्रेरणा घेऊन तरुण पिढीने राष्ट्रनिर्माणासाठी कटिबध्द व्हावे, इतकीच आम्हा सर्वांची, जैन उद्योग समूहाची अपेक्षा आहे.''

'गांधी तीर्थ'विषयी आणि गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विविध उपक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी hhttp://www.gandhifoundation.net या संकेतस्थळाला भेट द्या.

दत्ता जोशी

9422252550