प्रश्न श्रध्देचा आहे

 विवेक मराठी  19-Nov-2018

समाजजीवनात, राष्ट्रजीवनात जर-तरची भाषा फार काळ टिकत नाही. कारण समाजाला ठोस भूमिका हवी असते. आपल्या श्रध्दा, परंपरा याबाबत समाजाच्या ठाम धारणा असतात. आपल्या श्रध्दाकेंद्रांकडे पाहून समाज आपला पुरुषार्थ जगतो. परंपरांचे वहन करत तो पुरुषार्थाला प्रकट करतो आपली मुळे कुठे रुजली आहेत, कोणत्या सांस्कृतिक संचितावर आपले भरणपोषण झाले यांचे स्मरण करून देण्यासाठी कोणत्या नेत्यांची गरज नसते. तो आपल्या श्रध्दा आणि परंपरा जपत असतो, आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित होत असतो. कारण त्या श्रध्दाकेंद्रातूनच समाजाचा पुरुषार्थ जागृत ठेवला जातो. उदाहरण द्यायचे, तर श्रीरामचंद्रांचे देता येईल. श्रीराम हे संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रध्देचे केंद्र आहे. प्रभू रामचंद्रांसारखे आदर्श जीवन आपण जगले पाहिजे हा इथल्या मातीचा संस्कार आहे. त्यामुळेच आपल्या आदर्शाचे भव्यदिव्य मंदिर निर्माण झाले पाहिजे, ही नैसर्गिक भावना प्रत्येक हिंदूच्या मनात असणे स्वाभाविक आहे आणि हिंदू समाज त्याच्या स्वभावाप्रमाणे दीर्घकाळ प्रतीक्षा करत आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण भारतात संतमंडळी या विषयाची जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरतील. लवकरच भव्य मंदिर निर्माणाचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयातून मोकळा होईल आणि हिंदू समाजाचे श्रध्दाकेंद्र असणारे मंदिर निर्माण होईल. या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ असणारे प्रकाश आंबेडकर मात्र जर-तरची भाषा बोलू लागले आहेत. ''श्रीराम मंदिर बांधून जर पोटाचा प्रश्न सुटणार असेल तर आमचा पाठिंबा असेल'' असे हमखास टाळया मिळणारे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच केले आहे. आमच्या दृष्टीने हे वक्तव्य म्हणजे विचारल्याशिवाय दिलेला सल्ला आहे. कारण राम मंदिराच्या उभारणीने देशातील गरिबी आणि उपासमारी संपेल अशा प्रकारचा कोणीही दावा केला नाही. पण गरिबीवर आणि उपासमारीवर मात अशी करायची आणि सन्मानपूर्ण जीवन कसे जगायचे, यांची प्रेरणा मात्र नक्की मिळेल. मात्र माक्र्स आणि त्याच्या अफूच्या गोळीचा सिध्दान्त कालबाह्य झाल्यानंतरही काही लोक अस्मितेच्या विषयाला भाकरीचा प्रश्न जोडू पाहतात, तेव्हा आश्चर्य वाटते.

अयोध्येतील श्रीराम मंदिर हा हिंदू समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो त्याच पातळीवर सोडवला पाहिजे. त्याला जर-तरच्या भाषेशी जोडता कामा नये, असे आमचे ठाम मत आहे. पण आपल्या देशाचे दुर्दैव असे की केवळ श्रीराम मंदिराबाबतच नाही, तर आपल्या देशाला ज्याच्याकडून प्रेरणा मिळते किंवा ज्या केवळ नामोच्चाराने जगण्यासाठी हजारो हत्तींचे बळ मिळते, त्या महापुरुषांबाबत अशा प्रकारची कुजबुज याआधी झाली आहे. अगदी अलीकडचे उदारहरण म्हणजे गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या भव्य पुतळयाविषयी चर्चा झाली होती. इतका मोठा पुतळा उभा करण्यापेक्षा गावाचा विकास का केला नाही? येथपासून ते या स्मारकातून राज्याला, देशाला काय फायदा होणार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतही अशाच प्रकारची कुजबूज सातत्याने चालू असते आणि त्याचा अप्रत्यक्षपणे जातीचा रंग उजळ होत जातो. गेल्या दहा-बारा वर्षांत जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा विषय ऐरणीवर आला, तेव्हा तेव्हा काही व्यक्ती भाकरी आणि विकासाला या स्मारकाच्या खर्चाशी जोडण्याचा प्रयत्न करताना किंवा काही व्यक्ती या विषयात सोईस्कररीत्या मौन पाळताना दिसतात. समुद्रात स्मारक बांधून पर्यावरणीय प्रश्न निर्माण करण्यापेक्षा गडकोटांचे संवर्धन करा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधण्यापेक्षा अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करा अशाही सूचना सोशल मीडियावर प्रकाशित होतात. या दोन्हीही सूचना अगदी योग्य आहेत. त्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. पण त्या सूचना स्मारकाला पर्याय नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे.

प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकाच चिरंतन संस्कृतीचे वाहक आहेत. आणि त्यामुळेच ते संपूर्ण हिंदू समाजाचे आदर्श आहेत, श्रध्दाकेंद्र आहेत. या तिन्ही महापुरुषांच्या जीवनाला आपला आदर्श मानून आपला पुरुषार्थ जागवण्याचा अनेकांनी यशस्वी प्रयत्न केला आहे.  आणि ही पुरुषार्थ जागृतीची परंपरा प्रवाही ठेवण्यासाठी स्मारकांची, श्रध्दाकेंद्राची गरज आहे. भाकरीचा प्रश्न, विकासाचा प्रश्न मांडून ती गरज नाकारता येणार नाही. आपल्या देशात जे जे महापुरुष जन्माला आले, ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनातून समाजाला दिशादर्शन केले, अशा सर्वच महापुरुषांचा उचित गौरव करणे हे आपले परमकर्तव्य आहे हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे ज्यांना ज्यांना जर-तरची भाषा करण्याची हौस आहे, त्यांनी आपला वारसा तपासून घ्यायला हवा. समाजाला सातत्याने प्रवाही राहण्यासाठी आदर्शांची, श्रध्दाकेंद्रांची गरज असते. अयोध्येतील राम मंदिर ही हिंदू समाजाची भावनिक गरज आहे आणि ती सध्यातरी भाकरीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणारा हा विषय लवकरात लवकर मार्गी लागावा, अशीच हिंदू समाजाची इच्छा आहे. मात्र हिंदू समाजाने त्यासाठी कोणत्याही असंसदीय मार्गाने जाऊ नये. जर-तरची भाषा करून या विषयाचे राजकारण करू पाहत आहेत, त्यांनाही समाजाने त्यांची योग्य ती जागा दाखवून द्यावी.