बहुमुखी प्रतिभावंत

 विवेक मराठी  19-Nov-2018

***प्रा. मिलिंद जोशी**

भाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपांत वावरणारे पु.ल. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातले दु:ख नाहीसे करता येत नाही, पण ते हलके करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते' अशा सगळया गोष्टींचा ध्यास होता. इतरांना फुलवायचे आणि स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा, हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवले नाही. उलट समाजाकडून घेतलेले समाजालाच वाटून टाकले. पुलंची जन्मशताब्दी साजरी करत असताना ही 'पुलकितवृत्ती' अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला, तर ते पुलंचे कृतज्ञ भावनेने केलेले खरे स्मरण ठरेल.

पुलंचे नुसते नाव जरी उच्चारले, तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचे कारंजे सुरू होते. वक्तृत्व, साहित्य, नाटय, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणाऱ्या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला, म्हणून तर आपण पुलंना 'आनंदयात्री' म्हणतो. श्री.म. माटे मास्तर म्हणत, ''माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो.'' महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही, इतके त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गारूड आजही कायम आहे.

पुलं नांदेडच्या नाटयसंमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पुलं देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाडयातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ''काय हे मराठवाडयातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे.'' पुलं भाषणासाठी उभे राहिले. अत्रेंच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ''ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाडयात अत्रे साहेब आपण आहात.'' लोकांनी टाळयांचा अक्षरश: कडकडाट केला. सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ''मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.'' आचार्य अत्र्यांचा शब्द खरा ठरला. अत्र्यांनंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.

पुलंचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी गावदेवी इथल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. त्यांचे वडील बेळगाजवळच्या चंदगड गावचे. त्यांचे घराणे बेळगावजवळच्या जंगमहट्टीचे. घरासमोर गंधर्वगड आणि कलानिधीगड हे दोन गड होते. या दोन गडांचे दर्शन पुलंना रोज घडत होते. त्यांना ललित कलांविषयी आणि बालगंधर्वांविषयी जे आकर्षण वाटत होते, ते कदाचित यामुळेच असेल. पुलंचे आजोबा म्हणजे कारवारचे वामन मंगेश दुभाषी. त्यांनी 'ऋग्वेदी' या टोपण नावाने ग्रंथ लिहिले. त्यांनी 'आर्यांच्या सणाचा इतिहास' हा ग्रंथ लिहिला. टागोरांच्या गीतांजलीचे त्यांनी भाषांतर केले. मुलाने लेखक व्हावे असे आजोबांना वाटत होते आणि गायक व्हावे असे वडिलांना वाटत होते. पुलंनी दोघांनाही नाराज केले नाही. पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांचा गळा गोड होता. त्यांना पेटीवादनाची आवड होती. हे सारे वंशपरंपरेने पुलंमध्ये आले.

शाळकरी वयातच त्यांनी मास्तरांवर विडंबन लिहिले होते. 'आजोबा हरले' नावाचे प्रहसन लिहिले होते. नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजवणे, नाटके लिहिणे, ती बसवणे, त्यात भूमिका करणे अशा अनेक गोष्टींतून पुलंचे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले. 1941 साली वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे पुलंना त्यांचे मुंबईचे बिऱ्हाड आवरून पुण्याला स्थलांतरित व्हावे लागले. 1942 साली त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्या काळात त्यांना चरितार्थासाठी भावगीताचे कार्यक्रमही करावे लागले. 1950 साली सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. त्यानंतर बेळगावच्या राणी पर्वतीदेवी महाविद्यालयात, मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात आणि मालेगाव शिक्षण संस्थेत त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले.

1943 साली बडोद्याच्या अभिरुची मासिकामध्ये पुलंनी लिहिलेले 'अण्णा वडगावकर' हे व्यक्तिचित्र प्रसिध्द झाले. तिथून त्यांची अर्धशतकी लेखकीय कारकिर्द सुरू झाली.

चिंतामणराव कोल्हटकरांच्या ललित कलादर्शनाच्या नाटकानंतर मो.ग. रांगणेकर यांच्या नाटयनिकेतन कंपनीच्या नाटकांमध्ये पुलं काम करीत असत. रांगणेकरांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'कुबेर' या चित्रपटात पुलंनी भूमिका केली. 'जा जा गं सखी, जाऊन सांग मुकुंदा' हे गीत पुलंनी गायले. इथून त्यांची मराठी चित्रपटसुष्टीतली कारकिर्द सुरू झाली. चोवीस मराठी चित्रपटांत कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांत पुलंची कामगिरी घडली.

पुलंचे नाटयलेखन 1908 साली सुरू झाले. 'तुका म्हणे आता' हे मंचावर आलेले पुलंचे पहिले नाटक. त्याचा पहिला प्रयोग 1948 साली पुण्यात झाला, पण या नाटकाला यश मिळाले नाही. या नाटकात वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे आणि वसंत सबनीस असे तीन 'वसंत' होते. एक संत आणि तीन वसंत असूनही नाटक चालले नाही, असे पुलं म्हणत. त्यानंतर 'अंमलदार' हे नाटक आले. 'तुका म्हणे आता' हे गंभीर नाटक होते, ते लोकांनी विनोदाच्या अंगाने घेतले. 'अंमलदार' हे विनोदी नाटक आहे, ते लोकांनी गंभीरपणे घेऊ नये असे पुलं म्हणाले. 26 जानेवारी 1957 रोजी 'तुझे आहे तुजपाशी' हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले. ते मराठी नाटयसृष्टीतील मैलाचा दगड मानले जाते. सौंदर्यासक्त काकाजी आणि जीवनविरक्त आचार्य या दोन जीवन प्रवृत्तींमधला संघर्ष पुलंनी या नाटकात मांडला. पुढे आलेल्या 'भाग्यवान', 'सुंदर मी होणार', 'तीन पैशाचा तमाशा', 'एक झुंज वाऱ्याशी', 'ती फुलराणी', 'राजा ओयदीपौस' यासारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला समृध्दी देताना प्रयोगशीलतेचे आणि नावीन्याचे भानही दिले. विशिष्ट विषयाचा आणि मांडणीचा आग्रह नाही, आपल्याला जे आवडते तेच लोकांपर्यंत पोहोचवायचे हा पुलंचा सरळ हेतू होता. पुलं स्वत: उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माते असल्यामुळे रंगमंचावर प्रायोगिक कसे व्हावे याचे प्रगल्भ भान त्यांना होते, म्हणूनच रंगभूमीच्या इतिहासात पुलंनी आपल्या विविधांगी कर्तृत्वाने मानाचे स्थान मिळवले.

1955मध्ये पुलं आकाशवाणीच्या सेवेत पुणे केंद्रावर रुजू झाले. 1951 ते 1961 या काळात भारतातल्या दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून त्यांची दिल्लीतली कारकिर्द संस्मरणीय ठरली. याच काळात 'जनवाणी', 'साधना', 'दीपावली', 'शिरीष', 'विविधवृत्त' वगैरे नियतकालिकांमधून बटाटयाच्या चाळीतल्या गमतीजमती विनोदी शैलीत मांडणारे त्यांचे लेख प्रसिध्द होत होते. ते खूप गाजत होते. 1958 साली मौज प्रकाशन गृहाने 'बटाटयाची चाळ' हे त्यांचे पुस्तक प्रसिध्द केले. पुढे युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास एज्युकेशनचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला गेले. लंडनमधल्या मुक्कामात त्यांनी बटाटयाची चाळमधील निवडक निवडक भागांचे अभिवाचन केले. त्यातूनच 'बटाटयाची चाळ' प्रत्यक्ष अवतरली. पुढे 'वाऱ्यावरची वरात', 'असा मी असामी', 'वटवट', 'हसवणूक' यांच्या माध्यमातून पुलंनी मांडलेल्या खेळाने मराठी माणसांना भरभरून आनंद दिला. 'बटाटयाची चाळ'मधून त्यांनी पन्नास-साठ बिऱ्हाडांचा एक मानस समूह निर्माण केला आणि मध्यमवर्गीयांच्या जगण्याची मार्मिक उलटतपासणी केली. ती लोकांना भावली. पुलंच्या या सर्व प्रयोगांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एका व्यक्तीला चारच तिकिटे मिळतील असा तो सुवर्णकाळ होता. प्रयोगाची वेळ आणि संहिता याबाबत पुलं आणि सुनीताबाई दोघेही खूप दक्ष होते. संहितेतला एक शब्दही बदलला जाता कामा नये याबाबत ते आग्रही होते. कितीही मोठा अधिकारी किंवा पुढारी प्रयोगाला येणार असला, तरी पुलंनी प्रयोगाची वेळ कधी बदलली नाही. रसिकांनी पाच वर्षाखालील मुलांना प्रयोगासाठी आणू नये अशा त्यांना सूचनाच होत्या. नटांचे पाठांतर असलेच पाहिजे. ''पाठांतर नसणे म्हणजे हातात लगाम न घेता घोडयावर बसण्यासारखे आहे'' असे पुलं म्हणत. त्या काळात या प्रयोगाचे पंधरा रुपये तिकीट ठेवले असते, तरी लोक आले असते. पण पुलंनी पाच रुपयेच तिकीट ठेवले. 'बटाटयाची चाळ' फॉर्मात असतानाच पुलंनी 'वाऱ्यावरची वरात'चे प्रयोग सुरू केले. नवे नवे प्रयोग ते सतत करीत राहिले. पुलं थकताहेत, त्यांना दम लागतोय हे लक्षात येताच पुलंनी प्रयोग बंद केले. सद्भिरुची न सोडता प्रेक्षकांपुढे आसू व हसूचे खेळ करून त्यांची करमणूक केली. 'गर्दी खेचण्यासाठी सद्भिरुचीच्या मर्यादा ओलांडण्याची गरज नसते' हे पुलंचे सांगणे आजच्या रसिकांच्या अभिरुचीवर स्वार होणाऱ्या कलावंतांना खूप काही सांगणारे आहे.

इंग्लंडमधल्या वास्तव्यावर, एकूण प्रवासावर आधारलेले 'अपूर्वाई' हे पुलंचे प्रवासवर्णन किर्लोस्कर मासिकात क्रमश: प्रसिध्द झाले. 1960मध्ये ते पुस्तकरूपाने प्रसिध्द झाले. त्यानंतर आलेल्या 'पूर्वरंग', 'जावे त्यांच्या देशा', 'वंग-चित्रे' या प्रवासवर्णनांतून पुलंनी मराठी माणसाला जगाचे दर्शन घडवले आणि त्यांच्या जाणिवांचा परिघ विस्तारला.

रेखाचित्र - ज्योत्स्ना फडके

पुलं गुणग्राहक होते. चांगले काम करणाऱ्या सर्व क्षेत्रांतील माणसांविषयी त्यांना कमालीची आस्था होती. त्यांचा गुणगौरव करण्यासाठी पुलंनी व्यक्तिचित्रे लिहिली. ती 'व्यक्ती आणि वल्ली', 'गणगोत', 'गुण गाईन आवडी' आणि 'मैत्री' या पुस्तकांत संग्रहित झाली आहेत. पुलंची ही व्यक्तिचित्रे शब्दशिल्पेच आहेत.

''माझे पहिले प्रेम संगीतावर आहे'' हे पुलंनी अनेकदा सांगितले. ''संगीतात जो कैवल्यात्मक आनंद मिळतो, त्याची सर दुसऱ्या कशालाही नाही'' असे पुलं म्हणत. दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत पुलं म्हणाले, ''माझ्या लेखी शंभरपैकी साठ गुण संगीताला आहेत. संगीताकडे पुरेसे लक्ष देता आले नाही याची खंत या जन्मात आहे. पुढच्या जन्मी ही चूक नक्की सुधारेन. माझ्या समाधीवर 'याने कुमार गंधर्वाचे गाणे ऐकले आहे' एवढेच लिहा.''

पुलंच्या वाढदिवसाला किशोरी आमोणकरांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. किशोरीताई म्हणाल्या, ''पुलं तुमच्यासाठी काय करू?'' पुलं म्हणाले, ''गा.'' किशोरीताई फोनवर खंबावती गुणगुणल्या.

पुलं म्हणत, ''कालचक्राबरोबर फिरणारे ध्वनिचक्र माझ्या मनात नेमके राहते. माझ्या आवाजाच्या दुनियेत जास्त रंग भरला असेल तर तो संगीताने! ज्या वयात लहान मुलांचे प्रसादाच्या खिरापतीकडे लक्ष असायचे, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमध्ये अभंग, श्लोक, आर्या यांच्या गाण्यामध्ये असायचे.''

पुलं समर्थ पेटीवादक होते. लहान वयातच बालगंधर्वांच्या समोर त्यांचीच गाणी वाजवून पुलंनी त्यांची शाबासकी मिळवली होती. पुलं म्हणत, ''माझ्या हातात प्रथम पेटी पडली, त्याऐवजी सतार पडली असती, तर माझी संगीतातली वाटचाल वेगळी झाली असती. रागवादन, आलापी, घरंदाज ख्याल, गायकी या दिशांनी झाली असती.'' पेटीवाले गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्काराला पुलं प्रमुख पाहुणे होते. भाषणात पुलं म्हणाले, ''मी इथे अध्यक्ष म्हणून आलो नाही. पेटीवाला म्हणून आलोय.''

गीत रामायणात व्हायोलीन वाजवणाऱ्या प्रभाकर जोग यांचा पुलंच्या हस्ते सन्मान झाला, तेव्हा पुलं म्हणाले, ''माणसं पराधीन असतात हे गदिमांच्या गीत रामायणात ऐकलं होतं, पण इतकी स्वराधीन असतात हे जोगांचं व्हायोलीन ऐकल्यानंतर समजलं!'' संगीत क्षेत्रातील कलावंतांविषयी पुलंना किती आस्था आणि आपुलकी होती, हे यातून दिसून येते.

पुलंची संगीत दिग्दर्शनाची कामगिरी दोन स्तरांवरील आहे. एक भावगीतासाठी संगीत दिग्दर्शन आणि दुसरे चित्रपट गीतासाठीचे. पुलंनी बोलपटातील 88 गाण्यांना चाली दिल्याची नोंद आहे. संगीतकार जेव्हा साहित्यातून संगीताकडे येतो, तेव्हा सूर, त्यांना वाहणारे शब्द व त्यामागील अर्थ यांचे परस्पर संबंध घट्ट होतात. अर्थ, भावना सुरांवर तरंगतात, त्यात बुडून जात नाहीत, म्हणूनच ते संगीत हृदयाला अधिक भिडते हे पुलंच्या संगीताचे वैशिष्टय आहे.

पुलंच्या सर्व आविष्कारांमध्ये विनोदाची सुखद पखरण आहे. त्यांच्या विनोदाचे आणि विनोदबुध्दीचे मर्म प्रसिध्द लेखिका मंगला गोडबोले यांनी नेमकेपणाने उलगडले आहे. त्या सांगतात, ''पुलंची कल्पनाशक्ती अव्वल दर्जाची होती. पुलं स्वत:च्या संवेदना स्वत:वर उधळणारे साहित्यिक होते. म्हणून ते कलेच्या विविध प्रांतात सहजपणे वावरले आणि रमले. पुलंची दृकसंवेदना, नाटयसंवेदना, अर्थसंवेदना, रससंवेदना, श्रोतृसंवेदना अतिशय तल्लख आणि सजग होती. ती संवेदना एकांगी आणि सामान्य पातळीवरची नव्हती, तर ती अनेकांची आणि असामान्य पातळीवरची होती, म्हणूनच त्यांचे साहित्य अनुभवसमृध्द आहे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भाषेवर विलक्षण प्रभुत्व, उपहास, उपरोध, विडंबन यांचा सहज वापर, विविध क्षेत्रांतील संदर्भांची समृध्दी, सहजता आणि तारतम्याचे भान यामुळे पुलंचा विनोद सहजसुंदर आणि निर्विष झाला. जगातल्या दोन महायुध्दांनी हादरलेली, देशाच्या पारतंत्र्याने पिचलेली, महागाई, टंचाई, कुचंबणा, कोतेपणा यांनी गांजलेली, वेळोवेळी येणाऱ्या साम्यवाद, समाजवाद, स्त्रीवाद या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेली, जीवनाचा उपभोग घेताना अपराधगंडाने पछाडलेली माणसे पुलंचे लक्ष्य होती. त्यांना पुलंनी मोकळेढाकळे केले. जीवनोन्मुख केले. 'खोगीरभरती', 'नस्ती उठाठेव', 'गोळाबेरीज', 'हसवणूक', 'खिल्ली', 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' ह्या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. पुलंनी विनोद लिहिला. अभिनित केला. उत्तम वक्तृत्वाने तो लोकांपर्यत पोहोचवला. सिनेमा-नाटकातून तो दाखवला. इतका दीर्घकाळ मुक्तहस्ताने विनोदाची चौफेर उधळण करणारा दुसरा विनोदकार मराठी समाजाला मिळाला नाही. अपार करुणा आणि आयुष्याविषयीची खोल समज यामुळे पुलंनी जे काही निर्माण केले, ते रसिक मनांचा ठाव घेणारे ठरले.

जीवनातील विसंगती आणि विकृती यांकडे त्या बुध्दीने पाहणाऱ्या पुलंच्या विनोदाचे वैशिष्टय म्हणजे त्या विनोदाने कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारले नाही आणि रक्तही काढले नाही. पुलंच्या विनोदाने मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेने चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीने जावे, तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत, याची अनेक उत्तम उदाहरणे आपल्याकडे आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपे पुलंवर प्रसन्न होती.

बोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंज्यातल्या पाण्याच्या धारेप्रमाणे सहज उसळून येत असे. त्यांच्या लहानपणापासूनच याचा प्रत्यय येत होता. पुलं दहा-अकरा वर्षाचे होते, तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळक मंदिरात साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांचे 'गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट' या विषयावर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर शंकानिरसनासाठी प्रश्नोत्तरे सुरू झाली. पुलं म्हणाले, ''फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का?'' पुलंकडे पाहत केळकर म्हणाले, ''बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.'' त्यावर पुलं म्हणाले, ''सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे?'' त्यावर न.चिं. केळकर यांनाही हसू आवरले नाही.

पुलंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले होते. एक मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ''यांचे मन वकिलीत रमले नाही.'' त्यावर पुलं म्हणाले, ''माझे मन वकिलीत रमले नाही असे म्हणण्यापेक्षा आशिलाचे मन माझ्यात रमले नाही असे म्हटले तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात, त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो. मी वकिली केली असती तर...''

पुलं आणि सुनीताबाईंनी बा.भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा.सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचे वाचन पुलं आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडेसे काहीतरी खायला लागायचे. त्यांनी संयोजकांना तशा सूचना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी इतके पदार्थ आणले होते की ते पाहून पुलं म्हणाले, ''लोक ''मर्ढेकर' ऐकायला आले आहेत, 'ढेकर' नाही.''

विजापूरला शाळेत पुलंचे भाषण होते. टेबलावर पाणी नव्हते. पुलंना ते हवे होते. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं म्हणाले, ''पाणी प्यायला हवंय. आंघोळीला नकोय.''

जालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ''येऊ द्या तिला, महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.''

पुलंच्या लेखनाकडे आणि भाषणाकडे गांभीर्याने पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते - भाषा या वस्तूवरच पुलंचे प्रेम आहे. म्हणूनच पुलंच्या शैलीविषयी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत लिहिलेल्या लेखात स.ह. देशपांडे म्हणतात, ''पुलंचे भाषेवर प्रेम आहे, तसा त्यांना भाषेचा अभिमानही आहे. पुलं इंग्लंडला गेले. वर्डस्वर्थच्या स्मारकाजवळ जगातल्या इतर अनेक भाषांतले माहिती देणारे फलक होते. पण मराठीला एकही फलक नव्हता. पुलंना ही गोष्ट खटकली. त्यांनी व्यवस्थापकाला विनंती करून परवानगी मिळवली. मराठीत फलक स्वत: लिहिला. पुलंनी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली. मानवेतर गोष्टींचे मानवीकरण हे पुलंच्या शैलीचे वैशिष्टय होते.''

समाजात ज्या वेळी कसोटीचे प्रसंग येतात, तेव्हा समाज विचारवंताच्या भूमिकेकडे मोठया आशेने पाहत असतो. अशा काळात विचारवंतांचे सत्त्व पणाला लागलेले असते. आज कोणतीही भूमिका न घेणे एवढीच एक भूमिका समाजातील विचारवंत घेत असतात. पुलंच्या बाबतीत मात्र असे घडले नाही. त्यांनी गरज असेल तेव्हा नेहमीच ठाम भूमिका घेतली.

आणीबाणीच्या काळात दुर्गाबाई भागवत वगळता अन्य साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही असा अपप्रचार जाणीवपूर्वक काही मंडळींनी केला, पण त्यात तथ्य नव्हते. जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद पुलं करत होते. त्याचा पक्का मसुदा सुनीताबाई करत. या कामासाठी पूर्ण वेळ देता यावा, म्हणून ते सभा, सत्याग्रह यात सहभागी झाले नाहीत. पुलंनी आणि सुनीताबाईंनी या गोष्टीची कधीही जाहिरात केली नाही.

आणीबाणीनंतरच्या निवडणुकात इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. महाराष्टाचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले, ''ही वीस अध्यायांची गीता आहे.'' त्याचा समाचार घेताना पुलं भाषणात म्हणाले, ''ही गीता आहे हे बरोबरच आहे, कारण सुरुवातीला संजय उवाच आहे.'' त्यावर एक राजकीय नेता म्हणाला, ''यांना आता कंठ फुटला आहे.'' पुलं म्हणाले, ''गळा यांनीच दाबला होता, मग कंठ कसा फुटणार?''

पुलंनी नेहमीच स्पष्टपणे आपली ठाम भूमिका मांडली. आणीबाणीनंतरच्या निवडणुकात जनता पक्षाचा विजय झाला. एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होती. पुलंना न विचारताच त्यांचे नाव वक्ता म्हणून बोलणाऱ्यांच्या यादी टाकण्यात आले होते. पुलंनी लोकाग्रहाला बळी पडू नये, असे सुनीताबाईंना वाटत होते. पुलंनाही ते पटले. स्वत: न जाता पुलंनी त्यांच्या भाषणाची कॅसेट या सभेसाठी पाठवली.

जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर ज्यांनी निवडणुकात मदत केली होती, अशा लोकांना सरकारी खर्चाने शपथविधी समारंभासाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण होते. सुनीताबाईंनी पुलंना जाऊ दिले नाही.

समाजाला गरज असताना आवश्यक त्या चळवळीत उतरणे आणि त्या चळवळीची गरज संपताच त्यापासून दूर जात आपल्या कामात रममाण होणे हे फार कमी लोकांना जमते. पुलंना ते जमले.

साहित्य आणि समाज यांच्या संबंध केवळ लेखक आणि वाचक इतकाच मर्यादित नसतो. त्याच्या पलीकडे जाऊन साहित्यिकांनी समाजासाठी विधायक असे काही केले पाहिजे, हे पुलंनी कृतीतून दाखवून दिले. त्याच उद्देशातून 1966 साली पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानची स्थापना झाली. जिथे उत्तम काम सुरू आहे, पण पैशाची अडचण आहे अशा ठिकाणी पुलंनी आणि सुनीताबाईंनी कसलाही गाजावाजा न करता ही आर्थिक मदत पोहोचवली. बाबा आमटयांचे 'आनंदवन', अनिल अवचटांचे 'मुक्तांगण' या संस्थांशी पुलं आणि सुनीताबाईंचा असणारा स्नेह सर्वश्रुत आहे. ज्या संस्थांची फारशी नावेही कुणाला माहीत नाहीत, अशा चांगले काम करणाऱ्या अनेक संस्थांना पुलंनी अर्थसाहाय्य केले. पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांना थोडीथोडकी नव्हे, तर एक कोटी रुपयांची मदत पुलंनी त्यांच्या हयातीत केली. ही सामाजिक जाणीव साहित्य क्षेत्रात अपवादानेच प्रत्ययाला येते. पुलंना समाजाने भरभरून दिले, ते त्यांनी तितक्याच कृतज्ञतेने समाजाला परत केले.

पुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हे त्यांच्या चाहत्यांचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. पुलं लोकप्रियतेच्या आणि लोकमान्यतेच्या शिखरावर होते. जनमानसात त्यांची एक प्रतिमा होती. पती म्हणून पुलंचे सुनीताबाईंना आलेले अनुभव वेगळे होते. ते आपण मांडले तर चाहत्यांच्या मनातील पुलंच्या प्रतिमेला धक्का बसेल का? असा विचार दुसऱ्या कोणीतरी निश्चितच केला असता. जे घडून जायचे ते घडून गेले आहे. त्याचे चर्वितचर्वण कशाला? असा विचारही मनात आला असता, पण तो सुनीताबाईंच्या मनात आला नाही. पुलंच्या अलौकिक प्रतिभेविषयी, माणसे जोडण्याच्या त्यांच्या कलेविषयी, त्यांच्या हजरजबाबीपणाविषयी सुनीताबाईंना नितांत आदर होता. प्रतिभावंत म्हणून घडणारे पुलंचे दर्शन आणि पती म्हणून घडणारे पुलंचे दर्शन या दोन्हीची अतिशय सुरेख मांडणी 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात सुनीताबाईंनी केली. अनेकदा पतीच्या प्रतिभेच्या, प्रसिध्दीच्या, मोठेपणाच्या तेजात त्याच्या पत्नीचे तेज लुप्त होऊन जाते. मग त्या तेजाचे लुप्त होणे हा कौतुकाचा विषय होतो. 'पुलंचे मोठेपण निर्विवाद आहे, पण माझी म्हणून स्वतंत्र ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. इतर कुणी ती जपावी अशी अपेक्षा नाही, मात्र मी ती प्राणपणाने जपेन' या भूमिकेतून सुनीताबाई स्वत्वाची आणि सत्त्वाची जपणूक कशा करीत राहिल्या. ते या पुस्तकात वाचायला मिळते. पुलंकडे अलौकिक प्रतिभा होती. सुनीताबाईंकडे व्यवहारदृष्टी होती. प्रतिभेचे लेणे त्यांच्याकडेही होते. पुलंचे यश घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, हे मात्र निर्विवाद.

पुण्यात 2002 साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले, त्यात ज्येष्ठ लेखिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुनीताबाईंनी हा सत्कार स्वीकारावा यासाठी संयोजकांनी प्रयत्न केला होता. सुनीताबाईंनी हे निमंत्रण नाकारले. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी तसेच स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका, वत्सल कुटुंबिनी तसेच कर्तव्यकठोर विश्वस्त, काव्यप्रेमी रसिक तसेच परखड समाज हितचिंतक असे सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. आधुनिक महाराष्ट्रातल्या स्पष्ट, निर्भय, तेजस्वी आणि बुध्दिमान व्यक्तिमत्त्वांमध्ये सुनीताबाईंचे स्थान अगदी वरचे आहे. पुलंच्या उत्साहाला आणि अफाट सर्जन ऊर्जेला विधायक वळण देत सुनीताबाईंनी जे पुलंसाठी केले, त्याबद्दल मराठी माणसे नक्कीच त्यांच्या ऋणात राहतील, कारण त्यांच्यामुळेच पुलंच्या निर्मितीचा आनंद रसिकांना भरभरून घेता आला. पुलं आणि सुनीताबाईंनी केवळ भांडयाकुंडयांचा संसार केला नाही. त्यांनी संसार केला तो सर्जनाचा. त्यामुळेच मराठी माणसांची सांस्कृतिक श्रीमंती वाढली. पुलंची जन्मशताब्दी साजरी होत असताना सुनीताबाईंचे स्मरण केले नाही, तर ती कृतघ्नता ठरेल.

पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवले आणि भरभरून आनंद दिला, त्याचबरोबर निखळ जीवनदृष्टी दिली. विनोदकाराबरोबरच विचारवंत आणि कलावंत म्हणूनही पुलंचे स्थान महत्त्वाचे आहे. 'विनोदबुध्दीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचे चिलखत घातले की जीवनातल्या सगळया संकटांना नामोहरम करता येते' हे जीवनतत्त्व त्यांनी मराठीजनांना हसतखेळत सांगितले.

भाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपांत वावरणारे पु.ल. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातले दु:ख नाहीसे करता येत नाही, पण ते हलके करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते' अशा सगळया गोष्टींचा ध्यास होता. इतरांना फुलवायचे आणि स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा, हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवले नाही. उलट समाजाकडून घेतलेले समाजालाच वाटून टाकले. पुलंची जन्मशताब्दी साजरी करत असताना ही 'पुलकितवृत्ती' अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला, तर ते पुलंचे कृतज्ञ भावनेने केलेले खरे स्मरण ठरेल.

9850270823