चळवळीतून साकारलेले चैतन्यशील व्यक्तिमत्त्व

 विवेक मराठी  19-Nov-2018

***जयंत कुलकर्णी****  

 अवघ्या 59व्या वर्षी अनंतकुमारांचे झालेले दु:खद निधन ही चटका लावणारी गोष्ट आहे. स्वतंत्र भारतातील विद्यार्थी चळवळीतून राजकीय नेतृत्वाची जी प्रभावी परंपरा देशात आकाराला आली, त्यात अनंतकुमारांचे नाव अग्रणी होते. पक्षीय सीमा उल्लंघून त्यांनी जोडलेला मित्रपरिवार आणि 'अदम्य चेतना' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कर्नाटकात, विशेषत: बंगळुरू या राजधानीच्या शहरात  विणलेले सामाजिक कामाचे वैशिष्टयपूर्ण जाळे या सर्वावर खास त्यांच्या अशा अत्यंत 'चैतन्यशील' व्यक्तित्वाची छाप होती. 1985 साली आंतरराष्ट्रीय युवा वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन भव्य प्रमाणात साजरे करण्यात आले. नगरहून आम्ही 25-30 कार्यकर्ते त्यात सहभागी होतो. राजघाटासमोरच्या मोकळया मैदानातील तो प्रचंड शामियाना, देशभरातून आलेले दहा हजार प्रतिनिधी याबरोबरच हे अधिवेशन अजूनही आठवते ते पंचविशीतील एका तरुणाच्या 'अधिवेशन नियंत्रक' या कामगिरीमुळे. विद्यार्थी परिषदेच्या कर्नाटक प्रदेशाची जबाबदारी पार पाडून एव्हाना अनंतकुमार राष्ट्रीय पातळीवरील कार्यात सहभागी झाले होते. दिल्लीच्या या अधिवेशनातील त्यांचा उत्साहपूर्ण वावर, त्यांच्याकडून मिळणाऱ्या विविध सूचना आणि योगायोगाने आम्हा काही कार्यकर्त्यांशी झालेला त्यांचा परिचय या सर्व गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

हुबळीमधून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतानाच अनंतकुमार अभाविपच्या संपर्कात आले. कर्नाटक आणि महाराष्ट्र हे दोन्ही प्रांत अभाविपच्या कामाचे तेव्हाही बालेकिल्ले होतेच. संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्याच्या क्षमतेप्रमाणे, आवडीप्रमाणे नेतृत्वाच्या अनेक संधी चळवळीत आपोआपच उपलब्ध होतात. पण तरीही अशा उगवत्या नेतृत्वाला पैलू पाडणारी, त्यांच्या व्यक्तित्वाच्या पूर्ण विकासाचे भान असणारी आणि मुख्य म्हणजे सामाजिक कामाच्या प्रेरणेचा स्रोत हा वैयक्तिक स्वार्थात रूपांतरित न होता मनातील पराकोटीची देशभक्ती हाच राहिला पाहिजे या दृष्टीने दक्षता घेणारी प्राध्यापक कार्यकर्त्यांची एक प्रगल्भ फळी अभाविपमध्ये कायमच कार्यरत असते. मा. बाळासाहेब आपटे, कृष्णभट्टजी, गौरी शंकरजी, सदाशिवराव देवधरजी अशा अनुभवसंपन्न कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा देशभरात अनंतकुमारांसारखे अनेक तरुण विविध प्रांतांतून तयार होत होते. विचारधारेच्या साम्यामुळे असे अनेक  प्रशिक्षित तरुण पुढे स्वाभाविकच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात नेतृत्व करू लागले. भाजपाच्या आजच्या सर्वस्पर्शी कार्यविस्तारामागे आणि प्रभावामागे अनंतकुमारांसारख्या प्रशिक्षित युवा नेतृत्वाचे प्रदेश व देश पातळीवरील अथक परिश्रम आणि समर्पित संघभावनेने केलेले काम यांचे मोठे योगदान आहे. 

भाजपामध्ये प्रांत युवा मोर्चा अध्यक्ष, राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी पार पाडणारे अनंतकुमार 1996मध्ये बंगळुरू (दक्षिण) मतदारसंघातून प्रथमच लोकसभेसाठी उभे राहिले आणि पुढे सतत सहा वेळेस त्याच मतदारसंघातून निवडूनही आले. अनंतकुमारांची आई श्रीमती गिरीजा शास्त्री याही हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या काही काळ महापौर होत्या. पण अनंतकुमारांची राजकीय कारकिर्द ही तशी वारसा हक्काने आलेली नव्हती, तर विद्यार्थी चळवळीतील सक्रिय आणि प्रभावशाली व्यक्तित्वातून निर्माण झाली होती. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी चळवळीतला हा तरुण कार्यकर्ता आणीबाणीविरोधात सत्याग्रह करून 40 दिवसांचा तुरुंगवासही भोगून आला होता.

 कर्नाटकात 2008 साली भाजपाने प्रथमच स्वबळावर सरकार स्थापन केले. दक्षिणेकडील राज्यांमध्ये विस्तार करण्याचा हाच शुभारंभ ठरला. या कार्यविस्ताराचे श्रेय येडियुरप्पा आणि अनंतकुमार यांच्या  कुशल 'टीमवर्क'लाच दिले जाते. 1998मध्ये विधानसभेत केवळ 3.88 टक्के मते आणि 2 जागा मिळवणारा हा पक्ष 2018मध्ये 36.3 टक्के मते आणि 103 जागा मिळवतो, याच्यामागे अनंतकुमारांचे भरीव योगदान आहे.

अटलजींच्या मंत्रीमंडळात वयाच्या 37व्या वर्षीच सहभागी झालेला हा सर्वात तरुण मंत्री दिलेल्या प्रत्येक मंत्रालयाची जबाबदारी कुशलतेने पार पाडीत गेला. युवा व क्रीडा, नागरी हवाई वाहतूक, नगरविकास, दारिद्रयनिर्मूलन, पर्यटन आणि आता मोदी सरकारमधील रसायन व खते, संसदीय कामकाज अशा विविध मंत्रालयांमधील कामाचा अनुभव त्यांच्या चौफेर कर्तृत्वाला साजेसाच होता. अनंतकुमार हे कायमच 'अ' गटाचा भाग होते, असे थट्टेने म्हटले जायचे. अटलजी-अडवाणी-अमित शहा आणि अनंतकुमार यांच्या 'अ'पासून सुरू होणाऱ्या अद्याक्षराने असा विनोद काही पत्रकारांमध्ये फिरवला जायचा. पण हा अर्थातच थट्टेचा भाग होता, असे याच पत्रकार मंडळींनी आवर्जून नमूद केले आहे. राजकीय क्षेत्रात स्वत:ची म्हणून काही महत्त्वाकांक्षा असणे तसे काही गैरही नसते. पण संघटनेच्या रचनेला वा संघभावनेला आपल्या कृतीमुळे धक्का लागणार नाही, याचे भान सर्वांना असतेच असे नाही. त्या बाबतीत अनंतकुमार मात्र कायमच सावध आणि खऱ्या अर्थाने पक्षाचे 'सैनिकत्व' स्वीकारलेले होते. आपल्या कर्तृत्वाचे खरे मूल्यमापन आपल्या कामाच्या आधारे करायचे की मिळणाऱ्या पदांच्या आधारे करायचे, याची स्पष्टता असली की आपोआपच 'मी नाही, तर आम्ही' हा भाव निर्माण होत असतो. राजकारणाची प्रासंगिकता माहीत असणाऱ्या अनंतकुमारांनी म्हणूनच 'अदम्य-चेतना' प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या पत्नीच्या सहकार्याने समाजव्यापी कार्याचे मोठे जाळे कर्नाटकात विणले. कै. गिरिजा शास्त्री या आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ सुरू केलेले हे काम अनंतकुमार-डॉ. तेजस्विनी या दांपत्याने आपल्या कल्पनाशक्तीद्वारे आणि कार्यशीलतेमुळे एका वेगळयाच उंचीवर आज नेऊन ठेवले आहे. अन्न, अक्षर आणि आरोग्य या तीन क्षेत्रांत मूलभूत बदल घडवीत नवीन पिढीला आकार देण्याचे मूलगामी कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे. सुमारे दोन लाख मुलांच्या दुपारच्या भोजनाचा प्रश्न दूर करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा  मार्ग प्रशस्त केला जात आहे.

संघ, अभाविप अशा चळवळींमध्ये थेट जमिनीवरील काम केल्यामुळे अनंतकुमारांच्या व्यक्तित्वात एक वेगळीच खुमास होती. 2000 साली अभाविपच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली. पुण्यात या निमित्ताने गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात एक मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि तेव्हा अटलजींच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले अनंतकुमार प्रमुख अतिथी म्हणून दिल्लीहून या कार्यक्रमासाठी आले होते. साधारण सहा वाजता सुरू झालेला कार्यक्रम आठ-साडेआठ वाजता संपला. अनंतकुमार आता त्वरित बाहेर पडतील अशा अपेक्षेने आम्ही तयारी केली होती. विद्यार्थी चळवळीत ऐंशीच्या दशकामध्ये काम केलेले अनेक सहकारी अनंतकुमारांना या कार्यक्रमात भेटले व तेथेच खाली खर्ुच्यांवर बसून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. साधारण दहा वाजता सभागृह बंद करायचे म्हणून सर्वांबरोबर तेही बाहेर व्हरांडयात आले व गप्पांचा दुसरा फड तेथेही सुरू झाला. अखेरीस अर्ध्या-एक तासाने ते आम्हा त्या वेळेस प्रमुखपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे वळले. 'चलो, परिषद में कार्यक्रम के बाद कमसे कम दो घंटे जो बिना काम रुकते हैं वो ही प्रमुख कार्यकर्ता होते हैं .. मुझे तो आपसे ही मिलना था...' त्यांच्या या गुगलीने आम्ही अक्षरश: गार पडलो. ते थेट आमच्या गटात येऊन उभे राहिले होते व आता 'चहा प्यायला जाऊ  या' असा आग्रह करीत होते. केंद्रीय सरकारमधील एक मंत्री, रात्रीचे दहा वाजलेले, आम्ही पंधरा-वीस कार्यकर्ते आणि मंत्रीमहोदयांचा चहाचा आग्रह! त्यांच्याबरोबर काम केलेली अंजलीताई (डॉ. अंजली देशपांडे) तेथेच उभी होती. अनंतकुमार म्हणाले, ''चलो, अब अंजलीके घर चलते हैं.. आप किसीके घर जायेंगे, तो चाय नही बल्की डांट जरूर मिलेगी..''  एव्हाना एवढा उशीर झाल्याने त्यांची गाडी व ड्रायव्हर यांच्या बाबतीत काही तरी गोंधळ झाल्याचे लक्षात आले. गाडीचा पत्ताच नव्हता. आमची पुन्हा चलबिचल सुरू होताच दुसरा धक्का मिळाला, ''क्यूँ भाई, स्कूटरसे जायेंगे! पेट्रोल है क्या नहीं देखो। परिषद की स्कूटर में पेट्रोल की ग्यारंटी कभी भी नही होती..।'' मंत्रीमहोदय आता थेट कार्यकर्ते झाले होते. चक्क आमच्यापैकी एकाच्या स्कूटरवर मागे अनंतकुमारांना घेऊन आम्ही सर्व सहकारनगरमध्ये पोहोचलो. तेथून पुढील दीड-एक तास अंजलीताईच्या घरातील त्या गप्पा म्हणजे आमची आयुष्यभराची पुंजी ठरली. परिषदेतील कामाचे आपले आग्रह, त्यातून निर्माण होणारा मूल्यविवेक, त्याचा समाजजीवनातील उपयोग अशा अनेक विषयांवर अनंतकुमार बोलत होते आणि आम्हालाही बोलते करीत होते. आपले तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्याबरोबर स्वत: अनंतकुमार नुकत्याच एका परदेश दौऱ्यावर जाऊन आले होते. त्या प्रवासात त्यांच्या मनावर बिंबलेली राष्ट्रपतींची विद्वत्ता, त्यांचा नम्र स्वभाव या सर्व गोष्टींचे वर्णन त्यांनी या गप्पांमध्ये केले. आपण तुम्हा सर्वांशी गप्पा न मारता तसेच दिल्लीला गेलो असतो, तर परिषदेच्या कार्यक्रमाला हजर राहिलो असे वाटलेच नसते हे त्यांनी शेवटी आवर्जून सांगितले. ''सच ये हैं की, हमारी कार्यपध्दती में एक दुसरे के साथ रहने का, समूह में बातें करने का और एक साथ चाय पीनेका भी अपना एक अर्थ हैं.. में तो उसीके लिये यहाँ आया था..'' ही त्यांची वाक्ये अगदी आजही स्मरणात आहेत.

लोकसभेत दुसऱ्या रांगेत कायमच सजगतेने संसदीय कामाचा वेध घेणारी, दैनंदिन कामात व्यत्यय येऊ  नये म्हणून धावपळ करणारी, विरोधी पक्ष नेत्यांशी संवाद साधणारी व सदैव सस्मित मुद्रेने आजूबाजूच्या घटनांना प्रतिसाद देणारी 'अनंतकुमार' ही चैतन्यशील व्यक्ती आता पुन्हा कधीच दिसणार नाही. त्यांचे अकाली निधन ही केवळ एका कुटुंबाची, संस्थेची वा पक्षाचीच हानी नाही, तर राष्ट्र म्हणून आपणा सर्वांचीच हानी झाली आहे.

जयंत कुलकर्णी

9989395570