जरतारी हे वस्त्र मानवा

 विवेक मराठी  02-Nov-2018

म्हटले तर कालानुरूप बदलत गेलेले, म्हटले तर परंपरेशी नाळ जोडून असणारे, पण ह्या ना त्या स्वरूपात भारतात हजारो वर्षे सातत्याने वापरात राहिलेले, चिरतरुण असे वस्त्र म्हणजेच साडी. आजही देशातल्या निमशहरी आणि ग्रामीण भागात बहुसंख्य स्त्रिया साडीच नेसतात. एका समृध्द वसनपरंपरेची, संस्कृतीची पाईक आणि आजकालच्या युगातही 'ट्रेंडी' असलेली साडी म्हणजे भारतीय स्त्रीचा अभिमान आहे.

 


सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

साडी, शारी, लुगडे, कापड, चीर, पोडवई, सेलै आदी अनेक नावांनी भारतभर ओळखला जाणारा साडी हा भारतीय स्त्रियांचा खास पारंपरिक, वैशिष्टयपूर्ण वस्त्रप्रकार. ह्या ना त्या स्वरूपात साडी भारतात गेली हजारो वर्षे टिकून आहे. स्त्रीचे शरीर शालीनपणे झाकूनदेखील स्त्रीदेहाचे सौंदर्य खुलवणारी, परंपरेचा वसा सांभाळतानाच काळाच्या प्रवाहाबरोबर बदलत गेलेली साडी म्हणजे भारतीय स्त्रीची जणू ओळख. आज मी जगात कुठेही फिरले, तरी माझ्या साडीवरून लोक मला ओळखतात की मी भारतीय आहे आणि आवर्जून माझ्याशी बोलायला येतात. साडीचे गारूडच आहे तसे.

माझे साडयांचे वेड बरेच जुने. अगदी लहानपणापासूनचे. माझी आई महिन्यातून एकदा तरी तिचे साडयांचे कपाट आवरायची. तिच्या आगेमागे लुडबुडायला मला भारी आवडायचे. तिच्या ठेवणीतल्या रेशमी साडयांचा तो नाकात भरून ठेवावासा वाटणारा वास, त्यांचा मऊ, मुलायम स्पर्श, ओल्या मायेने उजळून निघालेला आईचा सात्त्वि, सुंदर चेहरा, सगळेच कसे छान, हवेहवेसे वाटायचे. आई तिचे कपाट आवरायची ती वेळ खास आम्हा माय-लेकींचीच असायची. तिच्या साडयांनी वेढलेल्या त्या रंगीत, रेशमी, मऊ, ऊबदार कोषात आम्हा दोघींशिवाय तिसऱ्या कुणाला प्रवेश नव्हता.

माझी पहिली साडी मी विकत घेतली ती माझ्या चुलत भावाच्या लग्नात. मी अठरा-एकोणीस वर्षांची असताना. हातमागावर विणलेली ती निळया रंगाची झुळझुळीत चंदेरी आजही माझ्या कपाटात आहे आणि आजही मी ती वापरते. गेल्या वीस वर्षांत फॅशनचे अनेक ट्रेंड आले आणि गेले, काळानुरूप माझे इतर कपडे बदलत गेले, पण अठरा वर्षांपूर्वी घेतलेली ती साडी तेव्हाही सुंदर दिसायची आणि आताही सुंदर दिसते. मी अठरा वर्षांची असताना जी साडी मला शोभून दिसायची, तीच साडी मला आजही तितकीच शोभून दिसते, माझ्या शरीरयष्टीत कितीही चांगले-वाईट बदल झाले असले तरीही. मला वाटते की साडीचा कालातीतपणा हेच साडी ह्या वस्त्रप्रकाराच्या दीर्घायुष्याचे रहस्य असावे.

म्हटले तर कालानुरूप बदलत गेलेले, म्हटले तर परंपरेशी नाळ जोडून असणारे, पण ह्या ना त्या स्वरूपात भारतात हजारो वर्षे सातत्याने वापरात राहिलेले, चिरतरुण असे वस्त्र म्हणजेच साडी. तसे पाहिले, तर जगातल्या सगळयाच पुरातन संस्कृतींमध्ये न शिवलेली वस्त्रे नेसायची परंपरा होती, मग ती ग्रीक संस्कृती असो वा रोमन, चिनी संस्कृती असो व दक्षिण अमेरिकेतली इन्का संस्कृती. पण काळाच्या ओघात ह्या सर्व देशांनी बिन शिवलेली वस्त्रे मागे टाकून शिवलेल्या वस्त्रांचा स्वीकार केला. भारत हा असा एकच देश आहे, जिथे साडी, धोतर, लुंगी, सारोंग ह्यासारखी न शिवलेली वस्त्रे वापरायची परंपरा अजून टिकून राहिली आहे. त्यातही साडी मानाचे स्थान पटकावून आहे. आजही देशातल्या निमशहरी आणि ग्रामीण भागात बहुसंख्य स्त्रिया साडीच नेसतात. भारतीय स्त्रीच्या या सखीचा, साडीचा इतिहास मोठा रोचक आहे.

साडी हे नाव संस्कृत 'शाटिका' किंवा 'शाटी पट्ट' म्हणजेच कापडाची लांब, न शिवलेली पट्टी या शब्दावरून आलेले आहे. सिंधू-सरस्वती संस्कृतीमध्ये सापडलेल्या काही मूर्ती आणि इतर अवशेषांवरून दिसून येते की आपल्या पूर्वजांना कापसापासून तलम सूत कातायची, हातमाग वापरून त्या सुताचे कापड विणायची आणि तऱ्हेतऱ्हेचे वनस्पती आणि खनिजजन्य रंग वापरून ते वस्त्र रंगवायची कला अवगत होती. गुजरातमध्ये असलेले लोथल हे जगातले सर्वात प्राचीन बंदर. त्या बंदरातून सिंधू-सरस्वती संस्कृतीतल्या लोकांचा इतर देशांशी व्यापार चालायचा. असे म्हणतात की भारतात विणले गेलेले सुती वस्त्र इतके तलम आणि सुंदर असायचे की प्राचीन रोमन लोक त्या वस्त्राला 'व्हेंती नेब्युला' म्हणजे 'विणलेला वारा' म्हणूनच ओळखायचे. किंबहुना लॅटिन भाषेत कापसासाठी असलेला कॉर्बसीनो हा शब्द संस्कृतमधल्या कार्पास ह्या शब्दावरून आलेला आहे, असे भाषातज्ज्ञांचे म्हणणे आहे.


सिंधू-सरस्वती संस्कृतीत स्त्री-पुरुष न शिवलेले एक वस्त्र कमरेभोवती गुंडाळायचे आणि दुसरे वस्त्र उजव्या खांद्यावरून आजच्या शालीसारखे ओढून घ्यायचे, असे तिथे सापडलेल्या पुराव्यांवरून दिसते. मोहेंजोदडोमध्ये सापडलेली 'पुरोहित राजाची' अर्धप्रतिमा फुलाफुलांचे वस्त्र खांद्यावरून पांघरलेली अशी आहे. पुढे वेदकाळात स्त्री आणि पुरुष दोघेही कमरेखाली अंतरीय आणि कमरेच्या वर उत्तरीय असे कपडे वापरायला लागले. श्रीमंत घरातल्या स्त्रिया छाती झाकण्यासाठी 'स्तनपट्ट' नावाचा न शिवलेला कपडा वापरत, ज्याला पाठीवर घट्ट गाठ मारलेली असे. ह्या कपडयाचेच पुढे शिवलेल्या चोळीत किंवा कंचुकीत रूपांतर झाले. ह्याच काळात झाडांच्या सालीपासून वल्कले विणली जाऊ लागली.

ह्याच काळात रेशमाचे किडे पाळण्याची आणि त्यांच्या कोषापासून धागे काढून वस्त्र विणण्याची कला भारतात विकसित झाली. पट्ट या संस्कृत शब्दापासून रेशमाला आजही आसामी व बंगाली भाषांत पाट व तामिळ भाषेत पट्टू म्हणतात. कोषा ह्या शब्दापासून कोसा हे नाव आले, जे आजही छत्तीसगड आणि बिहारमध्ये रेशमासाठी वापरले जाते. वेदकाळातच सुवर्ण आणि रौप्य ह्या धातूपासून तंतू बनवून जरतारी वस्त्रे विणण्याची कला भारतात विकसित झाली. ॠग्वेदात व यजुर्वेदात 'पेशस' या नावाने जरीच्या वस्त्रांचा उल्लेख आढळतो, असा केतकरांच्या ज्ञानकोशात उल्लेख आहे. आपल्याकडे ज्या चौदा विद्या आणि चौसष्ट कला आहेत, त्या कलांमध्ये विणकाम, भरतकाम आणि जरनिर्मितीची कला अशा तिन्ही कला अंतर्भूत आहेत. जरतारी वस्त्रांचे विणकाम आपल्याकडे अगदी वेदकालापासून चालत आलेले आहे. आजही शुध्द जरीचे विणकाम ही पैठणी, बनारसी शालू, कांजीवरम आणि थिरुभुवनम साडयांची खासियत मानली जाते.

पण त्यातही फरक आहे. कांजीवरम साडीमध्ये पदर आणि काठाचा ताणा-बाणा रेशमाचा असतो आणि वरचे नक्षीकाम जरीच्या धाग्याने केले जाते. तर बनारसी आणि पैठणीच्या काठपदराचा ताणा-बाणा जरीचा असतो आणि त्यावरचे नक्षीकाम रंगीबेरंगी रेशमाच्या धाग्यांनी केले जाते. जरीच्या धाग्याने विणलेल्या आणि वर रेशमाचे नक्षीकाम केलेल्या वस्त्राला 'किनख्वाब' असे मूळ पर्शियन भाषेतून आलेले नाव आहे. मराठीत 'किनखापी कापड' म्हणतात ते ह्याच प्रकारच्या वस्त्राला.

वेदकाळानंतर पुढे नंद वंशांच्या काळी स्त्रियांनी साडी परिधान करण्याच्या व पायघोळ निऱ्या काढण्याच्या वेगवेगळया पद्धती विकसित झाल्या. 'हस्तशौंडिक' म्हणजे हत्तीच्या सोंडेसारख्या खाली निमुळत्या होत जाणाऱ्या निऱ्या, 'मत्स्यवालक' म्हणजे माशाच्या शेपटासारख्या टोकाला डौलदारपणे प्रसारण पावलेल्या निऱ्या वगैरे प्रकार ह्याच काळात सुरू झाले. भारतात इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातल्या ज्या काही शिल्पकृती उपलब्ध आहेत, त्या शिल्पकृतींमध्ये हरितीसारख्या स्त्री प्रतिमांनी नेसलेली वस्त्रे थेट आजच्या नऊवारी साडीप्रमाणे आहेत. महाभारतात द्रौपदीच्या चीरहरणाचा उल्लेख आहे. चीर म्हणजे न शिवलेले एकच लांब वस्त्र. अगदी आजही तेलगू भाषेत साडीला चीर किंवा चीरे असे नाव आहे. रामायणामध्येदेखील राम-सीता वनवासाला जायची तयारी करतात, तेव्हा त्यांना अंगावरची रेशमी वस्त्रे उतरवून जाडीभरडी वल्कले धारण करावी लागतात असे उल्लेख आहेत.

सांची स्तूपाच्या प्रसिध्द तोरणावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत, ज्यामध्ये स्त्रियांच्या अंगावर भरपूर, पायघोळ निऱ्या काढलेली, दोन पायांच्या मधून काष्टा काढून नेसलेली साडी स्पष्टपणे दिसून येते. पुढे गुप्तकाळातल्या शिल्पांमधून साडी अधिक विकसित स्वरूपात दिसते. ह्या काळात श्रीमंत स्त्रिया हातमागावर विणलेल्या गर्भरेशमी साडया वापरायच्या, तर सामान्य स्त्रिया वनस्पतिजन्य रंगांनी रंगवलेली सुती वस्त्रे वापरायच्या. चौथ्या-पाचव्या शतकाच्या दरम्यान कधीतरी भारतात आधी धाग्याला गाठी मारून हव्या त्या डिझाइनप्रमाणे रंग द्यायची आणि मग त्या धाग्याने वस्त्र विणायची - म्हणजेच इकतची परंपरा सुरू झाली. अजंठयाच्या लेणींमधली भित्तिचित्रे ही भारतीय वस्त्रसंस्कृतीचा उत्तम पुरावा आहेत. सहाव्या शतकात रंगवलेल्या ह्या चित्रांमधून 'पसापल्ली इकत' म्हणजे चौकडयांचे इकत वस्त्र आपल्याला दिसते. अगदी हुबेहुब तशीच चौकडयांची वस्त्रे ओडिशा, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये आजही हातमागावर विणली जातात. 

इकतमध्येही दोन प्रकार असतात - एकामध्ये फक्त ताणा किंवा बाणा ह्यापैकी ह्यापैकी एकच कुठला तरी धागा हव्या असलेल्या नक्षीनुसार सुताच्या गाठी बांधून रंगवला जातो. रंगवून वाळवल्यानंतर बांधलेल्या गाठी हलक्या हाताने सोडवल्या जातात. जिथे गाठ बांधलेली असते, तिथे धागा रंग पकडत नाही. जर एकाहून रंगछटा हव्या असतील, तर जितके रंग पाहिजेत तितक्या वेळा गाठी बांधाव्या आणि सोडाव्या लागतात आणि कापड त्या त्या रंगात रंगवावे लागते. आधी फिके रंग आणि मग गडद रंग ह्या क्रमाने हे रंगकाम चालते. हे संपूर्ण काम अतिशय मेहनतीचे, वेळखाऊ आणि खर्चीक असते. अशा तऱ्हेने रंगवून तयार झालेला धागा मग मागावर चढवला जातो आणि कापड विणले जाते. इकतचे कापड विणताना विणकराला अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागते. बाण्याचा प्रत्येक धागा मागावर नीट डिझाइनप्रमाणे जुळवून घेऊन मगच हातमागाचे पेडल फिरवले जाते. ह्या वेळी जराही गडबड झाली, तरी डिझाइन हलते आणि धूसर होते. 

इकतचा दुसरा प्रकार म्हणजे डबल इकत, ज्यामध्ये ताणा आणि बाणा ह्या दोन्हींचे धागे हव्या त्या डिझाइनबरहुकूम गाठी बांधून पाळीपाळीने रंगवले जातात आणि मग हातमागावर दोन्ही धागे हवे तसे जुळवून कापड विणले जाते. गुजरातमधली प्रसिध्द पटोला साडी ही ह्या डबल इकत प्रकारातली. पटोला पध्दतीचे विणकाम भारतात फार प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. ह्या रेशमी रंगीबेरंगी साडीचे आद्यरूप प्राचीन भारतात 'विचित्र पटोलक' या नावाने ओळखले जाई. डबल इकतचे काम आज भारतात फक्त ओडिशा, गुजरात आणि आंध्र प्रदेश ह्या तीनच राज्यांमधून आढळते. डबल इकतचे विणकाम सध्या जगात फक्त भारत, इंडोनेशियामधील बाली बेट आणि जपानमधील ओकिनावा बेट ह्या तीनच ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यातही ओडिशाचे इकत अजूनही जुन्या परंपरांशी इमान राखून आहे. मी स्वत: बघितलेल्या ओडिशामधील संबलपूर येथील काही नवीन विणलेल्या साडया अगदी हुबेहूब अजंठा येथील गुंफांमधल्या भित्तिचित्रात दिसणाऱ्या कपडयांसारख्या आहेत. 1500 वर्षांची ही आपली जिवंत, वाहती परंपरा आहे.

सध्या जगात हातमागावर विणल्या जाणाऱ्या कापडामधील नव्वद टक्के कापड भारतात तयार होते. त्यातही साडीचे प्रमाण लक्षणीय आहे. आज भारतभरात जवळजवळ चाळीस लाखाहून अधिक लोक त्यांच्या पोटापाण्यासाठी हातमाग क्षेत्रावर अवलंबून आहेत, त्यातले स्त्रियांचे प्रमाण सत्तर टक्क्यांहून अधिक आहे. कापड विणणे हा ह्या क्षेत्रातला शेवटचा टप्पा आहे. कापड आणि रेशमापासून सूत कातणे, टकळीवर त्याचे पेळू बनवणे, धागा रंगवणे, रंगवलेला धागा विणताना तुटू नये म्हणून त्याला खळ लावून त्याचे साइझिंग करणे, असा तयार धागा मोठमोठया ड्रम्सवर फिरवून त्याचा योग्य लांबीचा ताणा बनवणे, तसेच बाण्यासाठी छोटे शटल तयार करणे, धागा मागावर चढवणे इत्यादी अनेक कामे ह्या क्षेत्राशी निगडित आहेत. ही कामे करणारी माणसे वेगवेगळी आहेत आणि त्यांचा सगळयांचाच उदरनिर्वाह ह्या उद्योगावर अवलंबून आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

भारतात अनेक वेगवेगळया पध्दतींचे हातमाग अजूनही दिसून येतात. काही अगदीच पारंपरिक हातमाग आहेत. हे अवजड नसल्यामुळे एका जागेपासून दुसऱ्या जागी सहज नेता येतात. विणताना बाण्याचा धागा हातानेच ओढतात. अतिशय साधी रचना व वापरण्यात सोपेपणा असल्यामुळेच असे माग भारतात आजतागायत टिकून आहेत. आसामपासून पुढची भारताची ईशान्येकडील राज्ये, मध्य प्रदेश, बिहार व ओडिशा या राज्यांतील आदिवासी भाग आणि सिक्कीम, लडाख यासारखे हिमालयाच्या कुशीतले प्रदेश ह्या प्रदेशांमधून अजूनही अशाच मागांवर विणकाम होते. अशा प्रकारच्या हातमागांमधला एक प्रमुख प्रकार म्हणजे लॉइन स्ट्रॅप माग. अगदी पाठीवरच्या पिशवीत घालून हवे तिथे नेण्याइतका हा मग हलका आणि साधा असतो. हा माग विशेषतः मणिपूर, त्रिपुरा, नागालँड व आसामचा ह्या ईशान्येकडील राज्यांमधून वापरला जातो. स्त्रिया हा माग जास्त वापरतात. माग वापरायला आवश्यक असणारा ताण विणकर मागाचे एक टोक स्वत:च्या कमरेला अडकवून निर्माण करतो, म्हणून ह्या प्रकारच्या मागाला लॉइन स्ट्रॅप माग असे म्हणतात. भारताखेरीज कंबोडिया, व्हिएतनाम, म्यानमार इत्यादी दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधून आणि दक्षिण अमेरिकेतील पेरू, ग्वातेमाला ह्या देशांमधून अजूनही हा माग वापरला जातो आणि अतिशय उत्तम प्रतीचे कापड या मागावर तयार होते. आसाममधले साडीचे लोभस स्वरूप, 'मेखेला सादोर' ह्याच पध्दतीच्या हातमागावर विणले जाते. लॉइन स्ट्रॅप मागावरील कापड कमी रुंदीचे असते, म्हणून साडीचे काठ वेगळे विणून मुख्य साडीला शिवले जातात.

भारतात प्रचलित असलेला दुसरा जुन्या पध्दतीचा माग म्हणजे पिट लूम. पिट लूम म्हणजे खड्डयात बसवलेला हातमाग. विणकर खड्डयाच्या काठाला बसून पाय खड्डयात सोडतो व कापड विणतो. हे माग बनवायला तसे सोपे असतात व वापरायलाही गुंतागुंतीचे नसतात. पिट लूमवर बारीक सुताचे चांगले विणकाम होते. आजही आंध्र प्रदेशमधल्या मंगलगिरी ह्या सुंदर, तलमी सुती साडया पिट लूमवर विणल्या जातात. पैठणीचेही विणकाम काही ठिकाणी पिट लूमवर होते. पण विणकाम करणाऱ्या कारागीरावर ह्या प्रकारच्या मागामुळे जास्त ताण येतो. त्यामुळे हळूहळू अशा प्रकारचे माग लुप्त होत आहेत आणि त्यांची जागा चौकटीच्या फ्लाय शटल लूमने घेतली आहे. जॅकार्ड कार्ड पंचिंग पध्दतीमुळे पदर व काठावरचे बुट्टे विणणे आता सोपे झाले आहे. 

एकूणच तंत्रज्ञान मदतीला आल्यामुळे चंदेरी, बनारसी, कांचीपुरम, पैठणी, माहेश्वरी इत्यादी सर्वच प्रकारच्या साडयांमध्ये आजकाल भरपूर प्रयोग होताना दिसत आहेत. त्या त्या ठिकाणच्या साडीच्या पारंपरिक रंगछटांपासून वेगळे रंग वापरणे, अगदी सूर्यनमस्काराच्या 12 वेगवेगवेगळया पोझेसपासून ते रविवर्मांची चित्रे विणकामात आणणे, इतर ठिकाणच्या साडयांचे काठाचे डिझाइन विणकामात वापरणे इत्यादी नवीन डिझाइन इंटरव्हेन्शनमुळे साडी आजही भारतीय स्त्रीमानसात पूर्वीइतकीच लोकप्रिय दिसतेय.

रिटा कपूर चिश्ती ह्या साडी ह्या विषयातल्या जाणकार व्यक्तीच्या मते भारतात नेसण्याचे 80 विविध प्रकार आजही अस्तित्वात आहेत. साडेचार मीटरपासून ते साडेसात मीटरपर्यंतच्या साडया आजही भारताच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत आणि आजही साडया ह्या विविध पध्दतीने नेसल्या जातात. पण देशभर सध्या लोकप्रिय असलेली विकच्छ म्हणजे निवी पध्दत शोधून काढली ती कवी रवींद्रनाथ टागोर ह्यांची वहिनी ज्ञाननंदिनीदेवी ह्यांनी. त्यांचे पती सत्येंद्रनाथ टागोर हे ब्रिटिश सरकारमध्ये मोठया हुद्दयावर होते आणि ज्ञाननंदिनीदेवी ह्यांना त्यांच्याबरोबर इंग्रजांच्या पाटर्यांना जावे लागे. अशाच एका पार्टीला चोळी व परकर न घालता बंगाली पध्दतीने साडी नेसून गेलेल्या ज्ञाननंदिनीदेवींना प्रवेश नाकारला गेला, तेव्हा त्यांनी इंग्रज बायकांच्या बॉडीस आणि अंडरस्कर्टचे अनुकरण करत शिवलेला ब्लाउज आणि परकरासकट साडी नेसायला सुरुवात केली. हळूहळू सर्व देशभर हीच पध्दत लोकप्रिय झाली. 

आज भारतातल्या सर्व प्रांतातल्या स्त्रिया बहुतेक ह्याच पध्दतीने साडया नेसतात. अशा प्रकारे चापून-चोपून पदराला नीट पिन लावून नेसलेली साडी सध्या कॉर्पोरेट जगतात पॉवर ड्रेसिंग म्हणूनही लोकप्रिय आहे. अशी ही भारतीय स्त्रीची हजारो वर्षांपासूनची सखी, साडी. काळाबरोबर बदलत जाऊनही परंपरेशी जवळीक सांगणारी. मी लहान असताना माझी आई, मी आणि तिच्या साडया हे एक वेगळेच विश्व होते. आजकाल मी माझ्या साडया आवरते, तेव्हा माझी लेक माझ्याशेजारी येऊन बसते आणि ती, मी आणि माझ्या साडया असे आमचे एक वेगळे विश्व असते. अशी ही साडी पारंपरिक असली तरी जुनाट नाही, ट्रेंडी असली तरी उठवळ नाही. एका समृध्द वसनपरंपरेची, संस्कृतीची पाईक, आणि आजकालच्या युगातही 'ट्रेंडी' असलेली साडी म्हणजे भारतीय स्त्रीचा अभिमान आहे.