चांद बोधले यांची उपेक्षित समाधी

 विवेक मराठी  21-Nov-2018

देवगिरी किल्ल्याजवळील चांद बोधले यांची समाधी त्यांचे शिष्य संत जनार्दन स्वामींनी बांधली. चांद बोधले यांनी सुफी संप्रदाय स्वीकारला होता. त्यामुळे त्यांची समाधी म्हणजे दर्गा समजला जातो. भारतातीलच नव्हे, तर जगातील हा हिंदू संताचा एकमेव दर्गा आहे. आज या समाधीची अवस्था अतिशय वाईट आहे. समाधीस्थळी जाण्यास चांगला रस्ता नाही. समाधीचे तीन कमानींचे भक्कम बांधकाम आता ढासळायला लागले आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले पाहिजे.

औरंगाबादजवळचा देवगिरीचा किल्ला देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून संत एकनाथांचे गुरू संत जनार्दन स्वामी यांनी काम पाहिले होते. ज्ञानेश्वरीतील योगदुर्ग म्हणून जे वर्णन आलेले आहे, ते याच किल्ल्याला पूर्णत: लागू पडते. या जनार्दन स्वामी यांचे गुरू चांद बोधले हे होते. या चांद बोधले यांचे दुसरे शिष्य म्हणजे  मुस्लीम संतकवी शेख महंमद.

देवगिरी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच्या बाजूस आज जो मुख्य रस्ता आहे, त्याच्या उजव्या बाजूस पूर्वेला संत जनार्दन स्वामी यांनी आपल्या या गुरूंची समाधी बांधली आहे. या समाधीपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. हमामखान्याची एक दुर्लक्षित छोटी इमारत आहे. तिच्या बाजूने या समाधीचा रस्ता जातो. हमामखान्याची इमारत काहीशा पडक्या स्थितीत आहे. पण आतून भक्कम आणि उत्तम नक्षीकाम केलेल्या कमानींची आहे.

चांद बोधले यांनी कादरी परंपरेतील सुफी संप्रदायाचा स्वीकार केला. त्यांचे गुरू म्हणजे ग्वाल्हेर येथील सुफी संत राजे महंमद. याच राजे महंमद यांचे चिरंजीव म्हणजे शेख महंमद. राजे महंमदांनी आपल्या शिष्यालाच आपल्या मुलाचे गुरुपद स्वीकारण्याची आज्ञा दिली आणि अशा प्रकारे शेख महंमद हे चांद बोधलेंचे शिष्य झाले.

चांद बोधले यांनी शेख महंमद यांना ज्ञानेश्वरीची एक प्रत दिली आणि त्या प्रभावातून त्यांनी आपली ग्रंथरचना केली. दुसरे शिष्य जनार्दन स्वामी यांनाही चांद बोधलेंनी अनुग्रह दिला. डॉ. रा.चिं. ढेरे यांनी आपल्या 'मुसलमान मराठी संतकवी' (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) या पुस्तकात शेख महंमदांवर लिहिताना चांद बोधले यांच्यावर ही माहिती दिली आहे. डॉ. यु.म.पठाण यांच्या 'मुसलमान (सुफी) संतांचे मराठी साहित्य' या पुस्तकांतही चांद बोधले यांच्याबाबत माहिती दिली आहे. (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे)

जनार्दन स्वामींचे गुरू श्रीदत्तात्रेय समजले जातात. पण हे दत्तात्रेय म्हणजेच चांद बोधले आहेत. दत्तात्रेयांनी मलंग वेषात जनार्दन स्वामींना दर्शन दिले, याचाच अन्वयार्थ मलंग वेषातील चांद बोधल्यांनी दर्शन दिले, असा अभ्यासक लावतात.

शेख महंमद यांचा 'योगसंग्राम' हा ग्रंथ सुप्रसिध्द आहे. या ग्रंथात त्यांनी

ॐ नमो जी श्री सद्गुरू चांद बोधले।

त्यांनी जानोपंता अंगीकारले।

जनोबाने एका उपदेशिले । दास्यत्वगुणे॥ (योगसंग्राम 15.1)

असे स्पष्ट लिहून ठेवले आहे.

या चांद बोधल्यांची समाधी संत जनार्दन स्वामींनी बांधली. पण यात एक अडचण अशी की चांद बोधले यांनी सुफी संप्रदाय स्वीकारला होता. त्यामुळे त्यांची समाधी म्हणजे दर्गा समजला जातो. रमजानच्या पवित्र महिन्यात या दर्ग्याचा उरूस भरतो. या निमित्ताने जो संदल (मिरवणूक) निघतो, त्या वेळी वारकरी संप्रदायातील लोक भजने म्हणतात आणि सुफी कव्वाल्या गायल्या जातात. भारतातीलच नव्हे, तर जगातील हा हिंदू संताचा एकमेव दर्गा आहे.

आज या समाधीची अवस्था अतिशय वाईट आहे. समाधीस्थळी जाण्यास चांगला रस्ता नाही. समाधीचे तीन कमानींचे भक्कम बांधकाम आता ढासळायला झाले आहे. या कमानींचे खांब कर्नाटकातील बेलूर हळेबिडू हिंदू मंदिरांतील खांबांसारखे आहेत. बाजूच्या जिन्यावर पानाफुलांची सुंदर नक्षी कोरलेली आहे. ते दगड आता ढासळत आहेत. समाधी मंदिर हिंदू परंपरेप्रमाणे पूर्वेला तोंड करून आहे. या समाधीवर कायमस्वरूपी दिवा तेवत ठेवलेला असतो.

समाधीला लागूनच नमाज पढण्यासाठी एक छोटी सुंदर नक्षीकाम असलेली मशीद आहे. तिचेही बांधकाम आता ढासळत आहे. मलिक अंबरच्या सर्व बांधकामांवर त्याचे बोधचिन्ह असलेले साखळया आणि अधोमुखी कमळ या मशिदीवर जरा वेगळया पध्दतीने कोरलेले आहे. यात साखळया तशाच असून कमळ अधोमुखी नसून फुललेले आहे. याचा अर्थ निजामशाहने स्वतःने ही मशीद बांधलेली असावी. जनार्दन स्वामी याच निजामशाहीत किल्लेदार होते, तेव्हा त्यांनीच हे बांधकाम केले असावे असा कयास लावता येतो.

चांद बोधले यांनी शेख महंमद या शिष्यास जो अध्यात्माचा धडा दिला, त्यातून पुढे चालून शेख महंमद यांनी एक समन्वयवादी मांडणी केली. शेख महंमदांनी आपल्या या शिकवणीचा उल्लेख करून ठेवला आहे -

अविंध यातीस निपजलो।

कुराण पुरोण बोलो लागलो।

वल्ली साधुसिध्दांस मानलो।

स्वतिपरहिता गुणे॥ (योगसंग्राम 16.66)

चांद बोधलेंचे शिष्य शेख महंमद यांचा गुरुमंत्र शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी घेतला. या शेख महंमद यांना श्रीगोंदा (तेव्हाचे नाव चांभार गोंदा) येथे मठ बांधून दिला. त्या मठासाठी जमीन इनाम दिली. इथून पुढे मूळचे बीड जिल्ह्यातील धारूर येथे जन्मलेले शेख महंमद श्रीगोंदा येथे मठ स्थापून राहू लागले.

अशा या सिध्दपुरुषाची समाधी हा एक मोठा आध्यात्मिक, सामाजिक व ऐतिहासिक वारसा आहे. पण तो जतन करण्याकडे आपले लक्ष जात नाही. आज तिथल्या स्थानिक भक्तांनी आपल्या परीने समाधीची व देखभाल दुरुस्ती केली आहे. नियमित स्वरूपात तिथे आराधना केली जाते.

आपण या सांस्कृतिक वारशाची जाणीव ठेवत नाही, ही मोठी खंत आहे. मुख्य रस्त्यापासून जेमतेम दोनचारशे फूट अंतरावर असलेले हे ठिकाण. त्यासाठी जो कच्चा रस्ता आहे, तो दुरुस्त करणे, त्या भागातील साफसफाई करणे ही कामे सहज करता येणे शक्य आहे. जवळ असलेला हमामखाना हे संरक्षित स्मारक म्हणून शासनाने घोषित केले आहे. त्यासाठी एका चौकीदाराची नेमणूकही केली आहे. त्याबरोबरच या समाधीस्थळाची देखभाल व दुरुस्ती करता येणे शक्य आहे.

या वास्तूची रचनादेखील वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय आहे. याच्या वैशिष्टयपूर्ण खांबांसारखे खांब दुसऱ्या दर्ग्यांमध्ये आढळत नाहीत. यांची रचना ज्या काळात केली गेली, तो काळ शोधून त्याप्रमाणे कर्नाटकातील बेलूर-हळेबिडू येथील काळाशी कसा जुळतो, हे सर्व संशोधन व्हायला पाहिजे. तसेच तेथे आढळणाऱ्या पानाफुलांच्या नक्षीकामाचेही संदर्भ शोधले पाहिजेत. दक्षिण भारतातील मुसलमानी राजवटींच्या ठायी हिंदूंबद्दल द्वेष नव्हता. उलट हिंदूंच्या कितीतरी चालीरिती या भागातील सुफी संतांनी कळत-नकळत अंगीकारल्या होत्या, याचे कित्येक पुरावे जागोजागी आढळून येतात. उलट इस्लामचे कट्टरपंथी अनुयायी या सुफींचा मोठा द्वेष करतात.

पिराला नवस बोलण्याची परंपरा ही पूर्णत: हिंदू परंपरा आहे. याच चांद बोधलेंच्या समाधीजवळ खुलताबादहून वेरूळला जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला दरीच्या पलीकडील डोंगरावर एक दर्गा आहे. या दर्ग्यात डोके टेकवून तेथील साखर चाटली, तर मूल बोलायला लागते अशी श्रध्दा आहे. 'शक्कर चटाने की दर्गा' असेच नाव या दर्ग्याला आहे. आता या श्रध्दा पसरल्या कशा? हे सुफी संत निजामुद्दीन औलिया यांच्या काळातील चिश्ती परंपरेतील संत होते, असे मानले जाते. देवगिरी-खुलताबाद परिसरात अशा भरपूर ऐतिहासिक वास्तू आहेत. विखुरलेली काही जुनी बांधकामे आहेत. याच दर्ग्याच्या मागच्या बाजूस निजामाच्या राजकन्येच्या नावाने पॅगोडा पध्दतीने बांधलेली एक सुंदर कबर आहे. पण तिचे पाकिस्तानात निधन झाले. तिला परत इकडे आणले गेलेच नाही. आता ही कबर नसलेली जागा पडीक आहे. अतिशय सुंदर अशा कमानी, वरच्या घुमटाला जाळीची नक्षी जी कुठेच आढळत नाही, उंचच उंच कमानी दरवाजा असे बांधकाम आहे. मोठया भव्य चौथऱ्यावर ही इमारत आजही शाबूत आहे. या कबरीच्या आतील अष्टकोनी रचना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने मोठी देखणी आहे. अष्टकोनी रचना या हिंदू वास्तुशास्त्राच्या प्रभावातून आल्याचे मानले जाते. हे सगळे त्या विषयातील तज्ज्ञांनी अभ्यासून मांडले पाहिजे. यावर लिहिले गेले पाहिजे.   

देवगिरीच्या किल्ल्याच्या प्रचंड मोठया संरक्षक भिंतीच्या सगळया परिसरातील अतिक्रमणे हटवून तो परिसर स्वच्छ करण्याची व तेथे बगिचा विकसित करण्याची गरज आहे. या भिंतीमध्ये सुंदर बलदंड बुरूज आहेत. देखणे दरवाजे आहेत. हा सगळा परिसर म्हणजेच ऐतिहासिक ठेवा आहे. यांच्याबद्दल आपण अनास्था ठेवणार असू, तर पुढच्या पिढया आपल्याला माफ करणार नाहीत.   

           जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद