संघव्रतस्थ आबा

 विवेक मराठी  22-Nov-2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि महाराष्ट्र प्रांताचे माजी कार्यालय प्रमुख आणि पुण्यातील संघकामाचा चालता-बोलता व्यवहार कोश असलेले लक्ष्मण काशिनाथ उर्फ आबा अभ्यंकर यांचे सोमवारी 12 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी पुण्यातील दीनदयाळ रुग्णालयात वयाच्या 88व्या वर्षी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या कार्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 रुग्णालयातून सकाळी साडेसात वाजताच आबा अभ्यंकरांचा पुतण्या मयुरेशचा 'आबा गेले' असा फोन आला आणि 1998पासून आजपर्यंत त्यांच्या सहज, प्रेमळ आणि प्रसंगी कठोर प्रसंगांच्या आठवणींचा पट समोर उलगडत गेला.

विद्यार्थी परिषदेचे काम म्हणून माझ्याकडे कार्यालय प्रमुख म्हणून जबाबदारी आल्यानंतर '1525, मंगलभुवन, सदाशिव पेठ'मध्ये कार्यालयीन कामासाठी नियमित जायचो. या कामातलाच एक भाग म्हणजे रेल्वे-एस.टी. बसचे आरक्षण करणे. प्रांत आणि अखिल भारतीय स्तरावर परिषदेच्या कामासाठी प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाडीचे आरक्षण करायचे. यामध्ये प्रा. अनिरुध्द देशपांडे, सदाशिवराव देवधर, गीताताई गुंडे, चंद्रकांतदादा पाटील यांची प्रवासाची तिकिटे काढत असे. एकदा सदाशिवराव देवधरांना भेटायला मोतीबागेत गेलो, तिथे पहिल्यांदा आबांची भेट झाली. अंगात पांढरा स्वच्छ सदरा, दुटांगी धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी. मोतीबागेत आत प्रवेश केल्यानंतर लगेचच आबांची कार्यालयाची खोली. फोनवर खणखणीत आवाजात बोलत असलेले आबा  दिसले. 'मी विद्यार्थी परिषदेतून आलो आहे' असे म्हटल्यावर कोण, कुठला, काय करतो, शिक्षण, परिषदेत काय जबाबदारी? असे एकामागून एक प्रश्न आणि त्यांना मिळालेल्या त्यांच्या उत्तरांमुळे माझा तिथला प्रवेश सुखकर झाला. नंतर तो दृढ होत गेला समरसता मंचाच्या कामामुळे.

नुकतीच जनता बँकेत नोकरी सुरू झाली होती. विद्यार्थी परिषदेचे काम थांबवून समरसता मंचाचे काम करायचे आहे, असे प्रा. अनिरुध्द देशपांडे यांनी सांगितल्यामुळे मोतीबागेत जाणे सुरू झाले. मंचाच्या कार्यालयाची जबाबदारी आल्यामुळे आणि मंचाचा प्रांत कार्यालयाचा पत्ता मोतीबागेचा असल्यामुळे दररोज बँकेतून दुपारच्या सुट्टीत कामानिमित्त कार्यालयात जायला लागलो. त्यामुळेच आबांचा परिचय वाढत गेला.

कोणताही कार्यक्रम ठरला तर मोतीबागेत बैठक, तिथून दूरध्वनी करून सगळे पक्के व्हायचे. त्या वेळी कुणाचे फोन पाहिजे असतील तर आबांना विचारायचे की लगेच 'घे लिहून' असे म्हणत ते क्रमांक सांगायचे. आश्चर्य म्हणजे त्यांचे 500पेक्षा अधिक दूरध्वनी क्रमांक मुखोद्गत होते. मोतीबागेतली कोणतीही गोष्ट, वस्तू लागली आणि ती आबांना सांगितली की ताबडतोब आबा ती द्यायचे, त्यात कार्यालयीन साहित्य असो की  रात्रीच्या मुक्कामाला आलेल्या एखाद्या नवख्या कार्यकर्त्याला कांबळे द्यायचे असो. आबांच्या शब्दकोशात 'नाही' हा शब्द कधीच नव्हता.

1989 साली महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश यात्रेची तयारी सुरू होती. यात्रेचे वाहन सुशोभित करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत होतो. त्या सर्वांचे भोजन झाले की नाही, कोणी राहिला तर नाही ना? याची देखभाल घरातल्या कर्त्या माणसाच्या काळजीने आबा घ्यायचे. मोतीबागेत बैठक वा अन्य व्यवस्था, प्रवासी कार्यकर्ते आले तर ते विन्मुख जाणार नाहीत याची ते दक्षता घ्यायचे.

पुण्यात संघकाम, संघाच्या संस्थांचा पसारा वाढला तोच मुळी अपार कष्ट करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांच्या कामामुळे. आबा आणि पुण्यातले संघकाम, एक गतिमान शृंखला पाहायला मिळते. खरे तर आबा मूळचे अलिबागजवळच्या सासवणे गावचे. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी एका खाजगी कंपनीत नोकरीही केली. ती मध्येच सोडून 1959 साली संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून पाच वर्षे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा इथे काम केले. त्या वेळचे प्रांत प्रचारक असलेले मोरोपंत पिंगळे यांनी आबांना मोतीबाग संघकार्यालयाची जबाबदारी सोपवली. मोरोपंतांचा आणि आबांचा स्नेह जुळला तो मोरोपंतांच्या अखेरच्या क्षणापर्यंत.

जनता सहकारी बँकेच्या सुरुवातीच्या काळात आणि नंतरही आबांनी केलेल्या प्रयत्नांची, कृतिशीलतेची धडपड ऐकली की थक्क व्हायला लागायचे. एकदा बँकेचे तत्कालीन कार्यकारी संचालक दत्तोपंत जमदग्नी यांचा सकाळीच आबांना फोन गेला. ''आबा, उद्या रिझर्व्ह बँकेचे अधिकारी बँकेत येणार आहेत, त्यांना परवान्यासाठी तीस हजार रुपये फी म्हणून भरायचे आहेत.'' आबांनी ''ठीक आहे'' म्हणून फोन ठेवला. ताबडतोब मोरोपंतांशी बोलून चके्र फिरली. त्या दिवशी दोघांनी दिवसभर पुण्यात संघस्वयंसेवकांच्या घरी जाऊन, बँकेची गरज सांगून, पायपीट करून ठरलेली रक्कम जमवली. दुसऱ्या दिवशी बँक सुरू झाल्यानंतर मोरोपंतांच्या सांगण्याप्रमाणे तीस हजार रुपये जमदग्नी साहेबांकडे सुपुर्द करून आबा बाहेर पडले.

संपदा सहकारी बँकेच्या वाढीसाठी मोठया रकमेची आवश्यकता भासल्याने आबा आणि अप्पा सोहोनी यांनी केलेली धडपड आणि प्रयत्न मी पाहिले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपली गरज भासेल किंवा आपल्याला जिथे जिथे मदत, सहकार्य करणे शक्य आहे असे वाटते, तिथे आबा 'दत्त' म्हणून उभे राहिले आणि त्यात जास्तीत जास्त चांगला प्रयत्न कसा करता येईल याचा सतत विचार आबांच्या मनात चालू असायचा, त्याप्रमाणे ते करत राहायचे कोणतीही वाच्यता न करता.

पुण्यात फार पूर्वीपासून नव्या-जुन्या स्वयंसेवकांची आठवडयातून एकदा दर शुक्रवारी मोतीबागेत शाखा असायची.  त्यात बाळासाहेब वझे, अनंतराव देवकुळे, भास्करराव गद्रे, रायाकाका पटवर्धन, बाळासाहेब चितळे, किशाभाऊ पटवर्धन, अप्पासाहेब वज्रम, काका कानिटकर, भय्याराव गौतम, बंडोपंत परचुरे, वसंतराव गीत, नाना क्षीरसागर, अनंतराव गोगटे अशी पुण्यातील संघ सुरू झाल्यापासूनच्या काळातील ते संघ परिवारातील विविध संस्थांचे कार्यकर्ते या शाखेत येत असत. प्रवासातून पुण्यात असले तर श्रीपती शास्त्री, दामूअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर यांची भेट होत असे. आबांचा या सर्व मंडळींशी अतिशय अकृत्रिम स्नेह होता, चांगला संवाद होता. त्यांना संघसंबंधित माहिती, कार्यकर्ता संपर्क, त्यांचे पत्ते, कार्यक्रम, गाठी-भेटी या आबांशी बोलून, त्यांच्याकडून माहिती घेऊन पूर्ण होत असत. यातील कुणालाही काही लागले, कुणाकडे जायचे झाले तर आबा लगेच तयार होऊन त्यांची चकाचक दुचाकी काढून ते भेटी घेत असत. शुक्रवार शाखा संपल्यानंतर ही सर्व मंडळी हॉटेल गंधर्वमध्ये कॉफी पिण्यासाठी एकत्र जमत आणि तिथे चर्चा, गप्पांचा फड जमत असे. त्यात संघाबद्दल काही बरे-वाईट छापून आले, कुणा कार्यकर्त्याने नावीन्यपूर्ण, वेगळेपण जपत काही उपक्रम, प्रकल्प केला असेल, कुणी जुना कार्यकर्ता आजारी आहे, यावर सर्वांच्या सहभागातून चर्चेची देवाणघेवाण चालत असे. हे चालू असताना आबा शांत राहून ती ऐकत. मग त्यांचे काम सुरू होई. आजारी असलेल्यांना ते घरी किंवा रुग्णालयात भेटायला जात. तिथली गरज काय आहे याची माहिती घेऊन ती पूर्ण करण्याकडे आबांचे बारकाईने लक्ष असे. जगन्नाथराव जोशी, दत्तोपंत ठेंगडी, किशाभाऊ पटवर्धन, विनायकराव साठे, नामदेवराव घाडगे अशा कित्येकांच्या सेवा-शुश्रुषांबाबत आबांनी केलेली व्यवस्था आणि धावपळ विसरू शकत नाही.

आबा चारचाकी, दुचाकी अतिशय शिस्तीत चालवायचे. कुणी वाहन वेडेवाकडे चालवत असेल, तर त्याला पुणेरी भाषेत सुनावत असत. आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून आबांनी चारचाकीने संघकामासाठी देशभर प्रवास केला. यामध्ये त्यांचा डॉ. सुब्रह्मण्यम स्वामींशी चांगला परिचय झाला. त्यानंतरही ते पुण्यात आले की मोतीबागेत आबांची आवर्जून भेट घेत. नरेंद्र मोदी प्रचारक असल्यापासून ते मुख्यमंत्री झाल्यानंतरही आबांशी संपर्कात होते.

'हॉटेल श्रेयस'च्या कॉन्फरन्स हॉलमध्ये खूप वर्षांपासून दर शनिवारी सकाळी साडेआठ ते पावणेदहा या वेळेत जुने स्वयंसेवक - पत्रकार, अभ्यासक, प्राध्यापक, लेखक, माजी सरकारी अधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमतात. यामध्ये विविध विषयांवर चर्चा, लेख, पुस्तके, ग्रंथ यांच्या माहितीचे आदानप्रदान होत असते, पण या सर्वांचा केंद्रबिंदू असतो ते संघकाम. यामध्येही आबांचा सहभाग. संघकामाबाबत वाचलेली एखादी बातमी, लेख इ.च्या प्रती काढून त्या आलेल्या सर्वांना वाटून त्याच्यावर चर्चा असे कित्येकदा घडत असे.

आबांनी कार्यालयाच्या व्यवस्थेबरोबरच काही गोष्टींचा ध्यासच घेतला असे म्हणता येईल. त्यांचे समकालीन रामदासजी कळसकर कर्करोगाने आजारी असताना त्यांच्याही अखेरच्या काळात सख्ख्या भावाप्रमाणे आबा झटले. त्यांचा इतका स्नेह होता की, रामदासजींचे निधन झाल्यानंतर काही वर्षांतच अप्पासाहेब वज्रम, यशवंतराव लेले, शरदराव भिडे या मित्रत्रयीने त्यांच्या नावाने स्मृती समिती स्थापन करून, त्यासाठी मोठी रक्कम उभी करून त्यातून संघसंबंधित संस्था-संघटना, कार्यकर्ते यांना त्यांच्या कार्यासाठी लागणाऱ्या निधीची व्यवस्था केली जात असे. नंतर त्या समितीचे एका नोंदणीकृत विश्वस्त निधीमध्ये रूपांतर करून त्यात मी, प्रा. आनंद लेले आणि राजेश भिडे इ.ना विश्वस्त म्हणून सामील करून घेतले.

संघकार्यकर्ते, अन्य संस्था, बँका इ.च्या माध्यमातून निधी उभारला गेला. खरे तर 25 वर्षांच्या कालावधीत सुमारे 25 लाखांचा निधी जमवला तो केवळ आणि केवळ आबांनी. सर्वांशी असलेली त्यांची मैत्री, त्यांच्याबद्दल इतरांच्या मनात असलेला आदर यातूनच एवढा मोठा निधी त्यांनी जमवला. दर वर्षी कळसकर स्मृतिदिनी डॉ. भीमराव गस्ती, त्यांच्या पत्नी कमलाबाई गस्ती, गिरीश प्रभुणेंपासून ते संत नारायणगुरू अभ्यासिकेपर्यंत आणि मुख्यमंत्री निधीपासून ते पंतप्रधान साहायता निधी इ.ना निधी दिला गेला.

या विश्वस्त निधीला 25 वर्षे पूर्ण झाली, म्हणून चारच वर्षांपूर्वी शिल्लक राहिलेली सुमारे 3 लाखाची रक्कम ही कै. कळसकर 'एकता' मासिकाचे संपादक होते म्हणून मासिकाच्या संपादक मंडळाकडे सुपुर्द करून शेवटचा कार्यक्रम आबांनीच घडवून आणला.

भटके विमुक्त विकास परिषदेचे काम सुरू झाल्यानंतर यमगरवाडीचे कित्येक कार्यकर्ते, महिला यांचे मोतीबागेत येणे-जाणे चालू होते. त्यांच्या बैठका, गाठी-भेटी यांतून आबांचा सर्वांशी परिचय होत होता आणि गिरीश प्रभुणेंमुळे आबा भटके विमुक्तांच्या कामाशी नकळत जोडले गेले. त्यासाठी आबांनी 7-8 लाखांपेक्षाही अधिक निधी उभारून 'संघ तुमच्या पाठीशी आहे' असा कृतिशील आधार दिला. यमगरवाडीच्या मुलांसाठी कपडे तसेच महिलांसाठी साडया ते आठवणीने पाठवत. कित्येकदा त्यांच्या खोलीसमोर नीटनेटके बांधलेले चांगल्या स्थितीतले कपडयांचे मोठाले ढीग पाहायला मिळायचे. नंतर ते यमगरवाडीला पाठवायचे.

गेल्या सुमारे 30 वर्षांच्या कालावधीतल्या सर्व दिवाळीमध्ये ठाणे जिल्ह्यातल्या देवबांधमधल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रकल्पासाठी साडी-चोळी आबांनी पाठवल्या. दिवाळीत त्यांना फराळ घेऊन गेलो एखाददुसरी साडी बरोबर न्यावी लागे. यंदा त्यांच्या आजारपणामुळे पहिल्यांदा त्यात खंड पडला असेल. पूजनीय श्रीगुरुजींच्या गावीही गोळवलीच्या प्रकल्पासाठीही आबा काही ना काही मदत करत असत.

आबांकडे कुणी आले आणि त्याचे काम झाले नाही असे क्वचितच घडले असेल. त्यांचा सर्वांशी असलेला सदोदित संपर्क, कधी प्रेमाने तर कधी डाफरून पण अधिकारवाणीने साधलेला संवाद यामुळे त्यांना कोणी टाळत नसे. संघात कोणीही, कशासाठी येवो, तो आपलाच आहे, त्याचे काम झाले पाहिजे.

अतिशय कळकळीने आपले स्वत:चेच काम असल्याच्या भावनेने ते मनापासून करत. त्यांच्याकडे मुलाच्या, नातवाच्या शिशू गटाच्या प्रवेशापासून ते एखाद्याला ससून हॉस्पिटलसारख्या ठिकाणी मोफत उपचार करून घेण्यासाठी कोणीतरी कार्यकर्ते ओळखीसाठी आबांची चिठ्ठी घेण्यासाठी आलेले. त्या सर्वांना आबांचा आधार वाटायचा. त्यांनी एखादे काम सांगितले आणि ते काही कारणाने झाले नाही, तर ते गंभीर व्हायचे. त्याला आबांची शिक्षा व्हायची ती कॉफी पिण्याची किंवा त्याला पाजण्याची.

साप्ताहिक विवेक, एकता मासिक, सांस्कृतिक वार्तापत्र, पांचजन्य अशा संघसृष्टीतील, बौध्दिक खाद्यासाठी प्रकाशित होणारे विशेषांक असोत की नैमित्तिक ग्रंथ असोत, त्यांच्या विशेष नोंदणीसाठी, सदस्यत्वासाठी आबा विशेष प्रयत्न करायचे. प्रसंगी पदरचे पैसे घालून ते अंक/ग्रंथ विकत घेत.

वयाच्या 88व्या वर्षीपर्यंत आणि शेवटच्या आजारपणातील 15-20 दिवसांपर्यंत आबांची संघाची प्रार्थना चुकली नाही. त्यांना मोतीबागेत खाली पायऱ्या उतरून जाता येत नसे. पण पहिल्या मजल्यावरील खोलीच्या दरवाजाबाहेर मैदानातील प्रल्हाद सायम शाखेवरील भगव्या ध्वजाला प्रणाम करून ते प्रार्थना म्हणायचे. शाखा संपली की सर्व बाल त्यांच्याकडे खडीसाखर घ्यायला यायचे. त्या सगळयांच्या हातावर खडीसाखर ठेवली की ते सर्व खूश होऊन 'धन्यवाद आजोबा' म्हणून आनंदाने घरी जात. त्यांना भेटायला गेलो तर खडीसाखर देत, तसेच ''घरी बायकोला आणि मुलींनाही दे'' म्हणून हातावर ठेवत. 6-7 वर्षे वयाच्या बालांपासून ते 91 वर्षांच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आबा जवळचे वाटत.

असे आबा अभ्यंकर, आयुष्यभर संघाचे प्रचारकी जीवन 'की हे व्रत न घेतले आम्ही अंधतेने' अशा भूमिकेतून आपल्या श्वासात, चालण्या-बोलण्यात, कृतीत आणि संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या सुखदु:खात समरस होत, प्रेमाचे, आपुलकीचे, आनंदाचे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचे चांदणे शिंपीत राहिले. 'सेवा है यज्ञकुंड, समिधासम हम जलें' या काव्यपंक्तींचा कृतिशील साक्षात्कार घडवणारे आबा गेल्याने घरातली मायेची व्यक्ती गेल्याची भावना मनात दाटली आहे.

डॉ. सुनील भंडगे

& 9960500827