बह्लिक देश

 विवेक मराठी  26-Nov-2018

 

भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे

बह्लिक देशाचा उल्लेख वैदिक साहित्यात, रामायणात, महाभारतात व पुराणातदेखील येतो. त्यामधून बह्लिक देश, तिथे वाहणारी वक्षु नदी व तेथील राज्ये यांची माहिती मिळते. बह्लिक प्रदेशात आजचे उत्तर अफगाणिस्तान, दक्षिण उझबेकिस्तान व दक्षिण तजिकिस्तान हा प्रदेश येतो.

बह्लिक देशाचा उल्लेख वैदिक साहित्यात, रामायणात, महाभारतात व पुराणातदेखील येतो. त्यामधून बह्लिक देश, तिथे वाहणारी वक्षु नदी व तेथील राज्ये यांची माहिती मिळते. या साहित्यातून कळते की उत्तर पर्शियाचे शक अर्थात Scythian, यवन म्हणजे Ionian Greeks व कंबोज हे बह्लिक देशाचे शेजारी होते. कंबोज हा गिलगीटच्या उत्तरेकडचा भाग मानला जातो. बह्लिक प्रदेशाला ग्रीक 'बाक्ट्रिया' म्हणत. आज अफगाणिस्तानच्या उत्तरेतला प्रांत बाल्ख (Balkh) या नावाने ओळखला जातो. तर वक्षु नदीला ग्रीकांनी Oxus म्हटले. ही नदी अमु-दर्या या नावानेसुध्दा ओळखली जाते. या भागात मोठया नदीला सिंधू / समुद्र म्हणायची परंपरा असावी, कारण येथील मोठया नद्यांना पर्शियन भाषेतील 'दर्या' म्हणजे समुद्र अशा नावाने संबोधले जाते.

महाभारतात हस्तिनापूरच्या प्रतीप राजाला तीन मुलगे होते - देवापि, शंतनू आणि बह्लिक. यापैकी देवापिने वेदाभ्यास करण्यासाठी राज्यत्याग केला. त्यावर मधला मुलगा शंतनू हस्तिनापूरचा राजा झाला. पुढे कधीतरी शंतनूच्या राज्यात जेव्हा दुष्काळ पडला होता, तेव्हा पाऊस पडावा म्हणून शंतनूने यज्ञ केला. त्या यज्ञाचे पौरोहित्य देवापिने केले. देवापिने शंतनूच्या राज्यात पाऊस पडावा म्हणून केलेली पर्जन्याची प्रार्थना ॠग्वेदात (10.48) आहे. प्रतीप राजाचा धाकटा मुलगा बह्लिक हा बह्लिक देशाधिपती झाला. शंतनूचे नातू धृतराष्ट्र व पंडy नंतर प्रसिध्दीस आले. पंडुपुत्र युधिष्ठिराने इंद्रप्रस्थ येथे राजसूय यज्ञ केला, तेव्हा बह्लिकच्या राजाने युधिष्ठिराला आहेर म्हणून चार घोडे जुंपता येतील असा सुवर्णरथ दिला होता, असा उल्लेख महाभारताच्या सभा पर्वात आहे.

बह्लिक प्रदेशात सापडलेला हा सोन्याचा रथ, महाभारतातील बल्हिक राजाच्या आहेराची आठवण करून देतो. चार अश्व जुंपलेला सुवर्णाचा रथ, रथात एक सारथी आहे आणि एक योध्दा अथवा राजा रथात आरूढ आहे. हा इ.स.पूर्व 5व्या शतकातील रथ आता लंडन येथील संग्रहालयात पाहायला मिळतो. 

बह्लिक प्रदेशात आजचे उत्तर अफगाणिस्तान, दक्षिण उझबेकिस्तान व दक्षिण तजिकिस्तान हा प्रदेश येतो. दक्षिण उझबेकिस्तानमध्ये अमु-दर्याच्या काठावर तर्मेझ नावाचे प्राचीन शहर आहे. Silk Roadवरचे हे एक प्रमुख नगर. तर्मेझमधील काराटेपे येथे साधारण 17 एकर जागेत पसरलेले एक मोठे बौध्द केंद्र होते. इसवीसनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकातील अनेक बौध्द मंदिरे, गुंफा व विहार यांचे अवशेष इथे आहेत. यामधून अनेक दगडी व मातीची बौध्द शिल्पे मिळाली आहेत. येथील भिंती रंगीत चित्रांनी सुशोभित केली होत्या. खरोष्ठी व ब्राह्मी लिपीमधून लिहिलेले 150हून अधिक लेख येथे आहेत. तर्मेझपासून जवळ असलेल्या फायझ टेपे येथील टेकडीवर आणखी एका बौध्द केंद्राचे अवशेष सापडले आहेत. येथे एक मोठा स्तूप होता. त्याशिवाय बुध्दाच्या सुरेख मूर्ती मिळाल्या आहेत. तर्मेझच्या पश्चिमेला झुरमला येथे 40 फूट उंच बौध्द स्तूप मिळाला आहे. उझबेकिस्तानमधील ऐरतम, झरटेपे, दाल्वेर्झिन टेपे, काम्पीर टेपे ही आणखी काही प्रमुख बौध्द केंद्रे होती.

तजिकिस्तानच्या अजिना टेपे येथे एका बौध्द विहाराचे अवशेष मिळाले. दोन मोठया आवारांच्या भोवताली असलेल्या लहान खोल्या व मंदिरे अशी या विहाराची रचना आहे. या खोल्यांमधून भिक्षूंची राहायची व्यवस्था व काही खोल्यांमधून बुध्दाच्या लहान-मोठया मूर्ती होत्या. इथे अनेक दगडी शिल्पे व भिंतींवर रंगीत चित्रे होती. या अवशेषांमध्ये एक 40 फूट लांब बुध्दमूर्ती मिळाली. ही मूर्ती आता तेथील राष्ट्रीय संग्रहालयात पाहायला मिळते.

बह्लिक प्रदेशात पारसी धर्माचेदेखील प्राबल्य होते. हे लोक झरतुष्ट्र, अग्नी व सूर्य यांचे उपासक होते. झरतुष्ट्रचा जन्म बह्लिक देशात झाला होता असे मानले जाते. पौरुषस्प व दुग्धोवा यांच्या पोटी जन्मलेला झरतुष्ट्र ग्रीक भाषेत Zoroaster म्हणून ओळखला गेला. झरतुष्ट्रला या प्रदेशाने अनेक अनुयायी दिले. त्यापैकी एक होता राजा विश्तास्प. हा झरतुष्ट्रचा शिष्य झाल्यावर त्याच्या शिकवणीचा प्रचार झाला. तसेच या प्रांतात अग्नी उपासकांची अग्निमंदिरे व अनेक अग्निकुंड पाहायला मिळतात. उझबेकिस्तानमध्ये एका पारसी सूर्य मंदिराचे अवशेषदेखील मिळाले आहेत. बौध्द व पारसी लोकांशिवाय ग्रीक देवतांच्या उपासकांची व ज्यू धर्मीयांचीसुध्दा बह्लिकमध्ये वस्ती होती.

इस्लामचे आक्रमण झाल्यावर 6व्या-7व्या शतकात बह्लिक देशातील अनेक बौध्द संघ काश्मीरच्या हिंदू राज्यात आश्रयासाठी आले. या काळानंतर बह्लिक देशातील बौध्द व इतर धर्मांच्या अस्तास सुरुवात झाली.

संदर्भ -

  1. Central Asia in Pre-Islamic times - Richard N. Frye; Encyclopædia Iranica
  2. The Mahabharata - Kisari Mohan Ganguli