केरळ पुनश्च सरसावला आहे आपुल्या स्वागताला

 विवेक मराठी  27-Nov-2018

 

***प्राजक्ता देवधर ***

केरळवर आलेले अस्मानी संकट सर्वांनीच पाहिले. काही महिन्यांआधी सर्व गमावून बसलेला केरळ फार कमी दिवसांतच पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला आहे. विवेक पर्यटनाने आयोजित केलेल्या 'केरळ' सहलीत पर्यटकांना याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. पर्यटनामध्ये केलेले काटेकोर नियोजन, आयोजकांनी दिलेली सेवा आणि केरळचे निसर्गसौंदर्य यामुळे केरळ पर्यटन सुखद झाले.

''तू केरळला जात आहेस? बघ हं! नुकतंच तिथे काय काय आणि किती किती घडून गेलं आहे. नीट चौकशी कर.''

''काही रोगराई तर पसरली नाही ना? शिवाय हॉटेल्स वगैरे नीट स्थितीत असतील ना?''

''आपण आता स्वत:ला सांभाळून राहावं, हे बरं. गेले चार पैसे वाया तरी चालेल, पण विकतचं दुखणं नको गं बाई या वयात!''

मी केरळला जाणार आहे हे मी मैत्रिणींना जायच्या आधी काही दिवस सांगितले. 'तीन महिन्यांपूर्वीच पैसे भरले होते' हे कळल्यावर वरील प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाल्या. सगळया जणी माझ्या काळजीपोटीच बोलत होत्या. त्याआधी, जेव्हा केरळमध्ये झालेल्या अस्मानी संकटाच्या बातम्या पाहिल्या, वाचल्या होत्या तेव्हा माझ्याही मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आधी एकदा केरळदर्शन रहित करावे लागले होते. पण तेव्हाच मनाशी ठरवले होते. 'बघू काय होते. आपणहोऊन काही रहित करायचे नाही.'

पण समवयस्क मैत्रिणींचे मत ऐकल्यावर, विवेक पर्यटनचा सहल संचालक केदार ठाकूरदेसाई याला फोन केला.

''केदार, केरळ-कन्याकुमारी होणार ना रे आपले? तिकडे काही अडचण?'' इति मी.

''हो काकू. मी सतत त्या लोकांच्या संपर्कात आहे. त्यांनी सांगितले आहे काही काळजी करू नका. आम्ही तयार आहोत.'' केदार उत्तरला.

केदारने दिलेल्या ग्वाहीमुळे मी आश्वस्त झाले आणि नि:शंक मनाने केरळमधील कोची या शहरासाठी रवाना झाले.

पण तरीही, डोळयासमोर, पावसाने भरून वाहणाऱ्या रस्त्यांची, पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळणाऱ्या घरांची, घसरलेल्या दरडींची, वाहून गेलेल्या झाडांची, वाहनांची चित्रे तरळत होती.


 विवेक पर्यटन स्वस्त आणि मस्त

निवृत्तीनंतर 'आता वेळ आहे, आर्थिक गणितही जमणार आहे, इच्छा आहे आणि प्रकृतीसुध्दा साथ देत आहे' हे पाहून आम्ही पर्यटनासंबंधी येणाऱ्या विविध जाहिराती आवर्जून बघू लागलो. आम्ही विवेक साप्ताहिकाचे नियमित वाचक. त्यात त्यांच्या पर्यटन विभागाची हम्पी-हॉस्पेट-पट्टदकल-बदामी या सहलीची जाहिरात पाहिली. हा भाग आधी पाहिला नव्हता आणि या भागात फारसे कोणी सहल काढत नाहीत. त्यामुळे आम्ही ताबडतोब त्या सहलीसाठी नावनोंदणी केली. मनात खात्री होती की विवेक पर्यटनबरोबर येणारे लोक समविचारी असतील. आणि आम्हाला तसाच अनुभव आला. पुढच्या कोस्टल कर्नाटक आणि झाशी, ओरछा, भोपाळ, भेडाघाट, पचमढी या दोन सहलीसुध्दा आम्ही विवेक पर्यटनबरोबर केल्या. आम्हा सगळया वयस्क लोकांना घेऊन जाणारे, त्यांचे मूड सांभाळणारे, कधी काही सूचना केल्या तर त्यावर विचार करून त्या अमलात आणणारे हर्षद पनवेलकर, सुशांत डोके यांचे यासाठी आभार मानावे तितके कमीच आहेत. 

यांच्यामध्ये नव्याने आलेला केदार ठाकूरदेसाई. मागच्या एका सहलीत आम्ही असे म्हटले होते की ''अरे, चार पैसे जास्त घ्या पण सोय उत्तम करा.''

केरळच्या या सहलीत केदारने ते करून दाखवले. उतरायला चांगली हॉटेल्स, फिरायला एसी बस, प्रत्येक स्थलदर्शनासाठी पुरेसा वेळ. कुठेही तक्रारीला जागाच नव्हती. ही आम्हा पतिपत्नीची विवेक पर्यटनबरोबर चौथी सहल. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते - माझी एक मैत्रीण पुढील महिन्यात याच सहलीला दुसऱ्या आयोजकांबरोबर जाणार आहे. खर्च मात्र दुप्पट असणार. मला माहीत आहे, खाद्यपदार्थांची लयलूट असणार. पण आमच्या वयाची माणसे ते सगळे खाऊ तरी शकणार का? म्हणूनच मी म्हणते - विवेक पर्यटन स्वस्त आणि मस्त.

सुशांत डोके ( विवेक पर्यटन विभाग )  9594961838

 पण जेव्हा आम्ही कोचीला पोहोचलो, तेव्हा हा विमानतळ संपूर्णपणे पाण्याखाली होता यावर विश्वासच बसेना. संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा तो विमानतळ पूर्ववत कार्यरत होता. जलप्रलयाच्या कोणत्याही खुणांचा तेथे मागमूससुध्दा नव्हता. झालेल्या जखमांवर मलमपट्टी करून निव्वळ विमानतळच नव्हे, तर तिथले कर्मचारीसुध्दा कार्यमग् होते.

जी गोष्ट विमानतळाची, तीच गोष्ट कोची ते एर्नाकुलम रस्त्याची. उच्च प्राधान्यतेने बनवलेल्या त्या रस्त्याने तासभर प्रवास करताना वाहनचालक दिलगिरी व्यक्त करीत होता की मध्यंतरी झालेल्या पावसामुळे रस्ता तितका चांगला राहिला नाही. पण 'नेमिची येतो पावसाळा आणि डोंबिवलीच्या रस्त्यांवरील खड्डे' ह्याचा पुरेपूर अनुभव घेणाऱ्या मला तो प्रवास पुष्कळच सुखद वाटला.

'साउथ रिजन्सी' या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथल्या खोल्या पाहून मन प्रसन्न झाले. तिथल्या जेवणाचा आस्वाद घेताना कळले की, या हॉटेलमध्येसुध्दा पाणी भरले होते. परंतु त्या नुकसानीचे नावनिशाण ना त्या हॉटेलवर दिसले, ना त्या व्यवस्थापकाच्या किंवा नोकरवर्गाच्या चेहऱ्यावर. खूपच बारकाईने पाहिल्यावर एखाद्या कोपऱ्यात ओल जाणवत होती. पाण्याचे डाग दिसत होते.

एर्नाकुलमहून मुन्नारला जाताना बराचसा भाग हा दुतर्फा जंगल असलेला होता. डोंगराळ भाग असल्याने पडलेला पाऊस वाहून गेला असणार. क्वचित कुठे एखादा वृक्ष उन्मळून पडलेला दिसला. अधलीमधली प्रेक्षणीय स्थळे बघत आम्ही जवळजवळ सहा तास प्रवास केला. पण रस्ते अत्यंत गुळगुळीत. स्वच्छ. डोंगराचे वक्राकार सांभाळत केलेली चहाची लागवड. त्याची छाटणी झाली असावी. एकसारख्या उंचीची ही झुडपे. वाटत होते, जणू  हिरव्या रंगाच्या ढिगात बोटे फिरवत कोणी नक्षी काढली आहे. मुन्नारहून टेक्कडीला जाताना तर अशा या हिरव्यागार टेकडयांनी भोवताली फेर धरला होता.

टेक्कडीहून अलेप्पीला जाताना जरी वाहनचालकाने रस्ता बदलून नेले, तरी पाच-सहा ठिकाणी तरी भूस्खलन झालेले आहे असे लक्षात आले. मात्र रस्त्याची कामे चालू होती. वाहतूक हळूहळू पण व्यवस्थित चालू होती. चुकीच्या मार्गिकेमध्ये घुसून वाहतूक आखणीनच ठप्प करण्याची बेशिस्त कोठेच आढळली नाही. अलेप्पीला सार्वत जास्त पूर परिस्थिती झाली, नुकसान झाले. कारण मेटापुट्टी धरणाचे पाणी सोडावे लागले होते. पण काही महिन्यांपूर्वी येथे अपरिमित हानी झाली होती, त्याची शोककळा दिसली नाही. अलेप्पीला जाताना अनेक बॅकवॉटर दिसले. विंबनाड लेकमध्ये नौकाविहार करायला आम्ही जाणार होतो. अंदाजे 20 कि.मी. रस्त्याच्या दुतर्फा बॅक वॉटर बघत आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो. बॅकवॉटरच्या प्रवाहाला किंवा तळयाच्या काठाला लागून अनेक घरे होती. पाणी भरल्यावर ही माणसे कुठे, कशी गेली असतील, कशी वाचली असतील, त्यांचे काय राहिले असेल, काय गेले असेल, असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले.

 

मिशनरी, संघ परिवार अशा सामाजिक संस्थांनी मदतीसाठी तिकडे धाव घेतली. सरकारनेही वेगवान हालचाली करत जनजीवन सुरळीत केले. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे केरळमधील साक्षरतेचे प्रमाण. तिथल्या लोकांनी आपले बलस्थान ओळखले आहे आणि प्रवाशांना योग्य ते समाधान देण्यासाठी ते कटिबध्द झाले आहेत. जो निसर्ग आघात करतो, जो निसर्ग थैमान घालतो, जो निसर्ग माणसांची परीक्षा बघतो, तोच निसर्ग मानवाला लढण्याचे, परिस्थितीवर मात करून उभे राहण्याचे बळ देतो.

मला आठवण होत आहे कुसुमाग्रजांच्या 'कणा' कवितेची. पुरात सर्वस्व गमावलेला तरुण म्हणतो, 'पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा'. केरळमधील आपल्या देशबांधवांच्या पाठीवर आपण असाच हात ठेवू या. केरळच्या पर्यटन व्यवसायाला आधार देऊ या. केरळ स्वागताला सज्ज आहेच.

  

केरळ दर्शन

25 ऑक्टोबरला संध्याकाळी आम्ही सगळे एर्नाकुलमला पोहचलो. रात्री सगळयांची व्यवस्थित विश्रांती झाली आणि दुसऱ्या दिवशी आमचे स्थलदर्शन सुरू झाले. 1557 साली बांदलेल्या डच पॅलेसमध्ये म्युझियम पाहायला आम्ही गेलो. राजवाडयात राजाचे जडजवाहिर, सोन्याचा मुकुट, चांदीची विविध भांडी, चांदीची खुर्ची, सिंहासन, दरबारातील मान्यवरांसाठी असलेल्या खर्ुच्या, शस्त्रे, काही शिल्पकृती, अनेक राजांचे पोट्रेट्स, विविध बग्ग्या अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या.

दुसऱ्या दिवशी मुन्नारला जाताना चहाचे मळे भुरळ घालत होतेच. शिवाय वाटेत दोन कल्चरल शो पाहिले. एक म्हणजे केरळचे प्रसिध्द कथकली नृत्य. कलाकारांनी त्या नृत्याची व्यवस्थित ओळख करून दिली. एवढा जड पोशाख घालून ते नृत्य करणे किती अवघड असेल! दुसरा होता कलारिपट्टू. स्वसंरक्षणाची किंवा लढाईची पूर्वापार चालत आलेली ही पध्दत. कराटेची आठवण करून देणारी. ढाल-तलवार, भाला घेऊन लढणे, एखादा मोठा रुमाल हातात घेऊन प्रतिकार करणे, हातात अगदी छोटा रुमाल नसतानासुध्दा प्रतिकार करणे याची प्रात्याक्षिके कलाकारांनी उत्तमरीत्या दाखवली.
नीलकुंजरी ही अकरा वर्षांनी फुलणारी झुडपे. या वर्षी त्यांचे फुलायचे वर्ष होते. एका टेकडीवर ही फुले फुलतात. अती पावसामुळे ती त्या प्रमाणात फुलली नाहीत. पण आम्ही भाग्यवान. आम्हाला काही झुडपे तरी पाहायला मिळाली फुलांनी डवरलेली. या येकडीवर एर्वीकुलम नॅशनल पार्क आता विकसित होत आहे. येथे नीलगायी आढळतात. आम्ही टी फॅक्टरी, मेटापुट्टी धरण, जंगलविभागाने विकसित केलेली पुष्पवाटिका या गोष्टीही पाहिल्या.

अलेप्पीला जाताना अनेक बॅकवॉटर्स दिसले. विंबनाड लेकमध्ये आम्ही बोटिंगचा आनंद लुटला. विवेकानंद केंद्र पाहिले. तिथल्या उत्तम, शिस्तशीर सोईंचा, सामाजिक कामाचा अनुभव घेतला. कन्याकुमारीच्या लाघवी मूर्तीचे दर्शन घेतले. परतीच्या वाटेवर श्रीकृष्ण मंदिर, पद्मनाभ मंदिर पाहिले. 'परतीच्या प्रवासात त्रिवेंद्रमजवळ आम्ही सुचिंद्रम हे कृष्णाचे मंदिर पाहिले. तसेच वर्मा घराण्याच्या राजांनी बांधलेला लाकडी राजवाडा पाहिला. अनेक दालने असलेला, अत्यंत सुस्थितीत ठेवलेला हा राजवाडा आशियातील सर्वात मोठा लाकडी राजवाडा आहे. याची देखभाल केरळ आणि तामिळनाडू ही दोन्ही राज्ये मिळून करतात. प्रत्येक ठिकाणी देखरेख करायला माणसे असल्याने त्या राजवाडयाच्या सौंदर्यात कुठलीही बाधा आलेली नाही. सुखद स्मृतींसह परतीच्या प्रवासाला लागलो.