''प्रेरणादायक पुस्तिका'' - यशवंतराव पाटील

 विवेक मराठी  28-Nov-2018

''संघयात्री' या पुस्तिकेने संघ आठवणींना उजाळा मिळाला आहे. खरं तर मी खूप उशिरा संघात आलो, त्यामुळे माझ्यासारख्या अनेक संघस्वयंसेवकांसाठी ही पुस्तिका खऱ्या अर्थाने मार्गदर्शक, प्रेरणादायक ठरली आहे'' असे प्रतिपादन रायगडचे विभाग संघचालक यशवंतराव पाटील यांनी केले.

अलिबागचे संघस्वयंसेवक गणेश गोखले यांच्या 'संघयात्री' पुस्तिकेच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. रविवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी अलिबाग येथील राममंदिरात हा प्रकाशन सोहळा पार पडला. संघ कसा वाढला, रुजला याविषयी आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावी, हा उद्देश डोळयासमोर ठेवून गणेश गोखले यांनी ही पुस्तिका लिहिली आहे. जिल्हा संघचालक राघोजी आंग्रे, राममंदिराचे व्यवस्थापक नातूकाका हेदेखील या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यशवंत पाटील पुढे म्हणाले की, ''आज इथे जसे संघाचे अनुभव सांगणारी पुस्तिका प्रकाशित झाली, त्याचप्रमाणे समाजजागृती करणारी पुस्तकेही प्रकाशित झाली पाहिजेत. कारण आज संपूर्ण देशभर हिंदूविरोधी वातावरण भडकविण्याचे काम जोरात चालू आहे. हा धोका वेळीच ओळखून कासवाप्रमाणे बचावात्मक भूमिका न घेता, आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे.

समाजमाध्यमे, कलाक्षेत्र, वृत्तपत्र यांच्या माध्यमांतून देशभर समाजमन दूषित करण्याचे, असहिष्णुता पसरविण्याचे षड्यंत्र चालू आहे. या सर्व प्रकारांमुळे तुमच्या-आमच्यासारख्या सज्जन माणसांची द्विधा मन:स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे काय खरे, काय खोटे याचा सारासार विचार करूनच कृती केली पाहिजे.''

तसेच ''नजर उघडी ठेवून समाज दूषित करणाऱ्यांना आपण वेळीच रोखले पाहिजे. तरच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपली संस्कृती, आपली कुटुंबसंस्था, आपली धर्मपरंपरा योग्य त्या पध्दतीत पोहोचेल. यासाठी आपण वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि मनन-चिंतन केले पाहिजे'' असे मत मा. राघोजी आंग्रे यांनी व्यक्त केले.

यावेळी विवेक परिवाराची माहिती आणि पुस्तिकेमागची भूमिका पुस्तक विभाग प्रमुख शीतल खोत यांनी मांडली, तर गणेश गोखले यांनी आपल्या पुस्तिकेमागची भूमिका व्यक्त केली. तसेच नातूकाका यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कोकण प्रांत बौध्दिक प्रमुख उदय शेवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अविनाश धाट यांनी आभारप्रदर्शन केले. वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.