विवेकच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

 विवेक मराठी  05-Nov-2018

मोरेश्वर जोशी - विद्याधर ताठे यांना कै. राजाभाऊ नेने पुरस्कार प्रदान 

 

पुणे : हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे दिला जाणारा कै. राजाभाऊ नेने पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर जोशी (२०१७साठी) आणि विद्याधर ताठे (२०१८साठी) यांना प्रदान करण्यात आला. स्वा.  सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र येथे रविवारी लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक उपाख्य काका कुकडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात साप्ताहिक विवेकच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. कुकडे व डॉ. मोरे यांच्यासह राजाभाऊ नेने पुरस्काराचे मानकरी तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे क्षेत्राचे सरव्यवस्थापक म.गो. महाबळेश्वरकर, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे आणि साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कुकडे यांनी विवेकच्या प्रसारमाध्यमातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले,"लेखनातून वाचकांवर चांगले संस्कार घडवताना आणि सात्त्विक आनंद देताना, आवश्यक तेथे प्रहार करण्याचे काम विवेकने केले आहे. सकारात्मक पत्रकारितेत जे करणे अपेक्षित असते, ते विवेकच्या माध्यमातून होत आहे." राजाभाऊ नेने पुरस्कारांसाठी ज्यांची निवड केली तेही याच विचारांचे वारसदार आहेत असे सांगून डॉ. कुकडे यांनी जोशी आणि ताठे यांचे अभिनंदन केले. डाॅ. सदानंद मोरे यांनी साप्ताहिक विवेकच्या दिवाळी अंकाचे अंतरंग उलगडून दाखवले. विवेकच्या दिवाळी अंकातील रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर आणि अब्दुल मुकादम कादर यांच्या लेखांबद्दल कौतुकोद्गार काढले. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ या तीनही काळांचा वेध घेणारे लेखन दिवाळी अंकाच्या माध्यमातून झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पुरस्कारप्राप्त मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तर महाबळेश्वरकर यांनी विवेकच्या कामाची प्रशंसा करत बँक म्हणून यापुढेही विवेकला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.. 

रमेश पतंगे यांनी प्रास्ताविकात राजाभाऊ नेने यांच्या विवेकमधील योगदानाची माहिती दिली. तर अश्विनी मयेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणा-या विवेकच्या प्रतिनिधींचा महाबळेश्वरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लेखक, वाचक आणि हितचिंतक यांची कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

पसायदानाने या रंगतदार कार्यक्रमाची सांगता झाली.