'सॉफ्टवेअर'मधून उकललेली गीता!

 विवेक मराठी  06-Nov-2018

***धनश्री बेडेकर*

एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रदीर्घ अभ्यास करून विश्लेषणाच्या मार्गाने साकारलेले पुस्तक म्हणजे 'गीता-बोध'. उदय करंजकर यांचे हे तब्बल 1600 रुपयांचं 540 रंगीत पानं असलेलं हे इंग्लिश पुस्तक सुमारे 700 घरांचा उंबरठा ओलांडून आता स्थिरावलं!  माणूस आपल्या तळमळीसाठी काय करू शकतो, हे 'गीता बोध' वाचलेल्या लोकांनाच समजू शकेल.

 ''गीतेच्या पुस्तकासाठी 'एक्सेल' शीटमध्ये कुणी सूचना देतं का? उदय करंजकर सरांनी हे जे 'गीता-बोध' पुस्तक लिहिलं आहे, त्याची जवळपास चारशे-पाचशे पानं आहेत. ते कसं संपादित करायचं ह्याच्या सूचना त्यांनी मला एक्सेलमध्ये दिल्या आहेत. ह्याला काही अर्थ आहे का? लेखकानेच संपादकाला सांगायचं का, हे असं संपादित कर म्हणून? मग संपादकाची गरजच काय?'' योगिताचं फणकारून बोलणं थांबतच नव्हतं आणि माझ्या लक्षात आलं - मामला जामच वेगळा आहे! बरं, त्यांच्या मजकुराच्या 'दर्जा'बाबत योगिताचं फारच उत्तम मत होतं. मग घोडं कुठे अडलं होतं? मी करंजकर सरांना फोन केला आणि जमेल त्या शब्दांत त्यांना समजावलं, की योगिता तयार नाही या कामाला. योगिता खरं तर त्यांच्या ज्ञानाला, विद्वत्तेला बावरली होती. त्यातून त्यांच्या अपेक्षासुध्दा फार स्पष्ट होत्या. आणि दुसरीकडे योगिताने पाठवलेला संपादनाचा नमुना तर सरांना खूपच आवडला होता. त्यामुळे ते म्हणाले, ''योगिताच करेल हे काम!'' आता आली पंचाईत! पण कसंबसं योगिताला समजावून हे काम सुरू झालं. दीड वर्ष चाललं. उत्तम पुस्तक जन्माला आलं. त्याचं नाव गीता-बोध! या प्रवासात योगिताबरोबर मीही समृद्ध होत गेले.

पुस्तकाला अडीच वर्षात फारच उत्तम प्रतिसाद मिळाला. तब्बल 1600 रुपयांचं 540 रंगीत पानं असलेलं हे इंग्लिश पुस्तक सुमारे 700 घरांचा उंबरठा ओलांडून आता स्थिरावलं! या पुस्तकाच्या निर्मितीची मी मूक साक्षीदार आहे. ह्या एवढया उत्कृष्ट पुस्तकाची गोष्ट लोकांपर्यंत यावी, असा मोह मला झाला. करंजकर सरांची नव्याने वेगळया वळणावर भेट झाली आणि सॉफ्टवेअरमधल्या गीतेचं कोडं सुटलं.

करंजकरांना भेटेस्तोवर मायक्रोसॉफ्ट एक्सेलबद्दल माझं ज्ञान किती अगाध आहे, याची मला कल्पनासुध्दा नव्हती. मला वाटायचं, एक्सेलचा संबंध आकडयांशी असतो. एक्सेलमध्ये गणिती पध्दतीने डेटा ऍनाजाइज होतो, हे माहीत होतं. पण आख्खी सातशे श्लोकांची गीता या विद्वान गृहस्थाने एक्सेलमध्ये डिकोड केली आहे, हे ऐकल्यावर तोंडाचा 'आ' वासला. हे सगळं काय आहे, हे संशोधन नेमकं कसं केलं, या पुस्तकाचा खटाटोप का केला, पर्सिस्टंट सिस्टिम्स या मोठया सॉफ्टवेअर कंपनीत व्हाइस प्रेसिडेन्ट म्हणून निवृत्त होत असतानो गीता-बोध कसं साकार झालं? अशा पुस्तकाने विक्रीचा इतका उत्तम आकडा गाठला म्हणजे पुस्तकात, पुस्तकाच्या मांडणीत काहीतरी प्रभावी तोडगा असणार. तो काय? असे अनेक प्रश्न घेऊन मी करंजकर सरांशी भेटायची वेळ ठरवली. मला ही संशोधनाची प्रक्रिया जाणून घ्यायची होती. मी प्रश्न विचारायला सुरुवात करणार, तेवढयात त्यांनी माझ्या हातात एक फाइल फोल्डर ठेवलं आणि म्हणाले, ''कसं करू या, तू विचारतेस प्रश्न की मी बोलू?'' एकूण फोल्डरमधील एक्सेल शीटचे शब्द खूप नवीन होते. आणि करंजकर सरांना माझ्या प्रश्नांची लांबी, रुंदी, खोली कळल्याचं थोडयाच वेळात माझ्या लक्षात आलं आणि भगवद्गीतेची रहस्य उलगडायला लागली..

अनेक मोठ्या लोकांना काही गहन प्रश्न पडतात. तसेच प्रश्न करंजकरांना कॉलेजच्या वयापासून पडत होते. मी कोण आहे? माझ्या अस्तित्वाचा नेमका संदर्भ काय? हे युनिव्हर्स किती मोठं आहे? इतक्या आकाशगंगा त्यात असतील, तर 'मी' अगदी धुळीच्या कणासारखा आहे; मग माझा आणि या युनिव्हर्सचा नेमका संबंध काय? देव खरंच असतो का? असेल तर सगळे सुखी का होत नाहीत? प्रचंड अभ्यासू वृत्ती, गोष्ट उत्तमरित्या विश्लेषण करण्याची हातोटी त्यासाठी प्रचंड श्रम करण्याची चिकाटी आणि संशोधनातून व चिंतनातून सापडलेल्या गोष्टी चित्रांतून आणि शब्दांतून मांडण्याची सर्जनशीलता ही करंजकरांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्य सापडली.

प्रश्न अनेकांना पडतात; पण त्या प्रश्नांचा किती लोक वेध घेऊ शकतात, हाच खरा प्रश्न आहे. हे गृहस्थ बी.ई. करत असताना मनातल्या प्रश्नांची उत्तरं न सापडल्याने व्यथित होत होते. करिअरचा चढता आलेख एकीकडे वर सरकत होता आणि दुसरीकडे मनात एक प्रकारची पोकळी तयार होत होती. या अवस्थेत त्यांनी 'नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इन इंडस्ट्रीअल इंजीनिअरिंग'मध्ये (निटीमध्ये) मुंबईला ऍडमिशन मिळवली. त्याचं कारणही स्वाभाविकच होतं. मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरू यापैकी मुंबईच्या संस्थेत 'ऍनालिसिस' म्हणजे 'विश्लेषणा'वर भर होता. मला वाटून गेलं की, 'विश्लेषण' ही एक जीवनावश्यक गोष्ट आहे, असं जणू यांच्या मेंदूचं ठाम म्हणणं असावं. विश्लेषणाची नवनवीन तंत्र कॉलेजमध्ये शिकायला मिळणार म्हणून ते खूश होते. नवीन कॉलेजमधल्या शिक्षणात मानवी स्वभावांचा अभ्यास असल्याने मानसशास्त्रावरील संकल्पना स्पष्ट होत होत्या. पण मनातील शंकांची उत्तरं मानसशास्त्रात नाहीत, हे कळून आलं. अफाट संख्येने वाचलेल्या पुस्तकांच्या लेखकांशी संपक साधताना, त्यांना एका लेखिकेने तत्त्वज्ञान वाचण्याचा सल्ला दिला. तत्त्वज्ञान वाचताना नेमकी सुरुवात कशी करावी, हा प्रश्न फार पडला नाही. त्या आधीच त्यांच्या हातात 'गीता' पडली!

मूळ गीता आणि गीतेवरच्या टीका म्हणजे कॉमेंट्रीज वाचणं, असा अभ्यास सुरू झाला. स्वामी चिन्मयानंद, योगी अरविंद आणि लोकमान्य टिळक असं वाचून झालं. त्यात त्यांना चिन्मयानंदांची टीका विशेष भावली आणि पुढच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरली. पण तरीही 'गुरू'ची पोकळी जाणवत होती. मग गुरूचा शोध सुरू झाला. एव्हाना शिक्षण संपवून करंजकर टाटा मोटर्समध्ये काम करण्यासाठी पुण्यात स्थलांतरित झाले होते. 'गीता शिकवेल का कुणी गीता' हा पवित्रा घेऊन त्यांनी पुणं पालथं घातलं. कृष्णन् नावाच्या त्यांच्या एका भल्या मित्राने त्यांना स्वामी सत्स्वरूपानंदांबद्दल सांगितलं. ते आठवडयातून दोन दिवस कोथरूडमध्ये गीता शिकवतात, हे कळताच करंजकरांना अत्यानंद झाला. एका मंगळवारी ऑफिस सुटल्यावर गच्च पावसात, काळोखात त्यांचं घर गाठलं. भिजलेल्या करंजकरांकडे पाहून स्वामीजींनी प्रसन्न स्मितहास्य केलं आणि करंजकरांची अस्वस्थता गळून पडली आणि 'गुरू' सापडल्याची खूण मनोमन पटली. स्वामीजींशी बोलणं सुरू झाल्यावर त्यांनाही करंजकरांची गीता शिकण्याची तळमळ जाणवली. सलग साडेतीन वर्षांची कमिटमेंट देणार असशील, तरच गीता शिकवेन, तीही आठवडयातून दोन दिवस! अशी अट त्यांनी घातली. ते साल होतं 1989. त्या वेळी करंजकरांच्या उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमीवर गल्फमधल्या नोकऱ्यांच्या ऑफर्स खिशात खुळखुळत होत्या. त्या वेळी स्वामीजींना ही कमिटमेंट देणं तितकंसं सोपं नव्हतं. पण करंजकरांनी साडेतीनच नव्हे, तर पुढजी तब्बल 27 वर्षं ही कमिटमेंट दिली आणि ते स्वामीजींकडे शिकत राहिले. या सबंध मोठया कालखंडात वडिलांचं गंभीर आजारपण सोडलं, तर त्यांनी कधीच एक दिवसही क्लासला सुट्टी घेतली नाही. पहिली साडेतीन वर्षं तर खूपच झपाटलेली होती. स्वामीजीदेखील अत्यंत तळमळीने त्यांना शिकवत होते, समजावत होते. पहाटे 4ला उठून अभ्यास करायचा, मग 7:30ला ऑफिसची बस पकडायची, परत संध्याकाळी बस पकडून घरी आले की संध्याकाळीसुध्दा अभ्यास करायचा हे चक्र चालू होतं. बसमध्येसुध्दा अनेकदा अभ्यास चाले. साडेतीन वर्षं संपत आली आणि एके दिवशी एक मित्र कुतूहलाने त्यांना म्हणाला, ''तू इतना क्या पढता रहता है, ऐसा क्या है गीतामें?'' यावर कमालीच्या निरागसपणे करंजकर त्यांना म्हणाले, ''तू भी आ जा, साडेतीन बरसमें समझने लगेगा.'' त्यावर तो मित्र म्हणाला, ''नही रे, इतना टाइम नही है मेरे पास. तूही बता.'' हे ऐकल्यावर करंजकरांना जाणवलं की जेथपर्यंत आपण काय शिकलो आहे, ते आपल्याला योग्य शब्दांत, सारांश रूपात मांडता येत नाही, तोपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही. इथेच त्यांच्या संशोधनानं पहिलं वळण घेतलं...

ही संशोधनाची अवस्थाही वेगळीच होती. गीतेच्या सातशे श्लोकांचा अर्थ समजून घेण्याचं शिक्षण तर झालंय, पण गीतासार म्हणावं असं समजलेलं नाही. करंजकरांचा गीता अभ्यासाचा प्रवास काही ठरवलेल्या आणि अनेक न ठरवलेल्या वळणांवरून पुढे सरकत होता. बाजारात उपलब्ध असलेल्या गीतासार सांगणाऱ्या पुस्तकांनी त्यांचं समाधान होत नव्हतं.

त्यांच्याशी बोलत असताना मला एक स्पष्टपणे जाणवत होतं की, हे गृहस्थ प्रत्येक गोष्टीला 'का?' असा प्रश्न विचारतात. 'व्हाय?' असं विचारलं की डोकं सुरू होतं आणि मग त्या दिशेचा वेध घेता घेता 'हाऊ', 'व्हेअर', 'व्हेन', 'हाऊ मच' वगैरेंची उत्तर सापडत जातात. ही सापडलेली निरीक्षणे ते सतत कागदावर नोंदवत राहत असावेत! तर, प्रश्न पडला की, का? का आपल्याला गीतेचं सार नेमक्या शब्दात सांगता येत नाही? कारणं अनेक असावीत. पण महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक लोक गीतेबद्दल वेगवेगळं बोलतात. कुणी कर्मयोगाबद्दल, कुणी स्वधर्माबाबत, कुणी आत्मशोधनाबाबत, कुणी स्थितप्रज्ञ अवस्थेबद्दल! तसंच लोकांनी गीतेवर लिहिलेली टीका म्हणजे त्यांची गीतेवरची मतं आहेत. ते गीतासार म्हणता येणार नाही, असं करंजकरांना वाटून गेलं. माणसं गीतासार म्हणजे चिमटीत पकडलेलं अमुक-अमुक तत्त्वज्ञान आहे, हे न सांगता, गीतेतील अनेक संकल्पनांच्या अनुषंगाने मते मांडतात. त्यामुळे वाचकाचा गोंधळ उडू शकतो. बरं, गीता 18 अध्यायात, 700 श्लोकांत विभागली आहे. संख्यात्मक आकडासुध्दा अभ्यासकासाठी छोटा नाही. पण असं असताना पुढं कसं जायचं? हा प्रश्न गंभीर होता.

ह्या विचारात करंजकरांच्या कलात्मक मनाने एक वेगळीच कल्पना मांडली. सबंध गीता सांगून झाल्यावर शेवटी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, ''आता माझे सर्व संभ्रम दूर झाले व स्पष्ट ज्ञानप्राप्ती झाली.'' इथे गीतेचा संवाद संपतो; पण जर यावर श्रीकृष्णाने विचारलं असतं की, ''सांग बरं, तुला नेमकं काय कळलं?'' त्यावर अर्जुनाने 'काहीतरी' उत्तर दिलं असतं. ते ऐकून श्रीकृष्णाने त्याला 100पैकी 100 मार्क्स दिले असते. हे 'काहीतरी' जे काही असेल, ते आपलं 'टार्गेट'! ते आपल्याला शोधून काढायचं. मी ऐकून विलक्षण थक्क झाले. आता मला, योगिताला त्यांनी दिलेल्या एक्सेल शीटमधल्या अपेक्षांचा कागद आठवला. त्या अपेक्षा रास्तच होत्या, याची जाणीव झाली. कुठल्याही कामात ते अत्यंत निर्विकारपणे अपेक्षा मांडतात. संशोधन करण्यासाठी आणि ते मांडण्यासाठी स्वत:ला पूर्ण स्पष्टता आल्याशिवाय ते पुढेच सरकत नाहीत. ..क्या बात है।

टार्गेट तर ठरलं! आता पुढे काय? आता ही 700 श्लोकांची महाकाय गीता यांना कसं विश्वरूप प्रकट करून दाखवणार? ही माझी उत्सुकता वाढायला लागली. गीता ही 4 आंधळे आणि हत्तीसारखी आहे, असं स्वरूप वरकरणी आपल्याला दिसतं; पण तसं नाही. ती आपल्याला 'समष्टी' ह्या संकल्पनेतून पाहता आलीच पाहिजे. त्यासाठी त्यांनी तीन दृष्टीकोन ठरवले. एकतर गीतेवर संपूर्ण श्रध्दा हवी. गीतेतील जे मला कळत नाही, अथवा पटत नाही ते माझ्या अज्ञानामुळे. त्यासाठी मी परत परत अभ्यास व प्रयत्न करीन. दुसरा दृष्टीकोन म्हणजे गीतेमध्ये विरोधाभास नाही हे मान्य करणं; कारण असं वाटणं म्हणजे नीट संदर्भ न समजणं. आणि तिसरं म्हणजे, दर वेळी काहीतरी नवीन समजत जाईल हा भाबडा दृष्टीकोन न बाळगणं. ह्याचा अर्थ म्हणजे आपल्याला गीता पूर्ण अर्थाने कळली नाही. हे तिन्ही दृष्टीकोन एकून मला प्रश्न पडला की, जे पटणार नाही असं वाटलं, ते श्रध्दा ठेवून कसं शोधत राहायचं? असं कसं करता येईल? माझ्या या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तराने मी आउटच झाले आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे अशा संकल्पनांना छेद मिळाला. ते म्हणाले, ''शाळेत पायथागोरस शिकलीस. न्यूटनचे नियम शिकलीस. तेव्हा म्हणालीस का, हे पटत नाही. न्यूटनला म्हणाली असती का, तुमचा लॉ ऑफ मोशन पटतो; पण लॉ ऑफ ग्रॅव्हिटी नाही पटत. तर तो म्हणाला असता, जा मग उडी मार उंचावरून. मग पटेल... सरळ आहे! विज्ञान तुम्ही स्वीकारणार आणि गीता का नाही?''

अरे देवा... हे इतकं सरळ असतं का कधी? माझ्या मनातलं विचारचक्र आपलं चालूच! ते म्हणाले, ''गीतेतील संकल्पना आपल्याला पटत नाहीत. कारण ते आपलं अज्ञान आहे आणि ते जर अज्ञान असेल, तर ते दूर करण्यासाठी शोध घ्यायला हवा. टीका करून नाही चालणार! स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट तुला माहीत असेल. एकदा देवाच्या अस्तित्वाविषयी गहन चर्चा चालू होती. बऱ्याच वेळाने लोक म्हणाले, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्हाला पटलं की देव आहे! यावर तरीही एक संभ्रमित माणूस त्यांना म्हणाला, 'स्वामीजी देव आहे, यावर खरोखरच तुमचा विश्वास आहे का? त्यावर स्वामीजी चक्क नाही म्हणाले. झालं, एकच गोंधळ उडाला. त्यावर ते उत्तरले, ''माझा विश्वास नाहीये, मला माहीत आहे की देव आहे. आय डोन्ट बिलीव्ह... आय नो ही इज देअर! श्रद्धेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. परंतु ज्ञान मिळवणं हा श्रद्धेचा हेतू आहे.'' करंजकरांनी नेमका हाच श्रद्धापूर्वक दृष्टीकोन बाळगून गीतेच्या डोहात उडी मारलेली होती!

करंजकरांनी भारतीय तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे प्रस्थानत्रयीचा - म्हणजे ज्ञानाच्या तीन प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास केला. पहिली गीता, दुसरी उपनिषदं आणि तिसरी ब्रह्मसूत्रं, जे महर्षी व्यासांनी लिहिलंय. तुम्ही प्राथमिक पातळीवर अभ्यास करत असाल तर गीता अभ्यास प्रथम. उपनिषदांमध्ये गृहीत धरलेलं आहे की, हे तुम्हाला येतंच. गीतेमधील योगशास्त्रात ही 'मेथडॉलॉजी' आहे, ती उपनिषदांमध्ये नाही, कारण त्यात त्याची गरजच नाही. गीता ही तुम्ही-आम्ही शिकायची गोष्ट आहे आणि ती एक संपूर्ण मोक्षशास्त्र आहे. श्रीकृष्ण म्हणतात की गीतेमध्ये आत्मज्ञान तर आहेच, तसंच प्रत्येक मनुष्याला त्यासाठी लागणाऱ्या पात्रतेपर्यंत प्रयत्नपूर्वक जाता येतं.

गीतेच्या अभ्यासाचे हे शास्त्रशुध्द दृष्टीकोन ठरवून झाल्यावर त्यांनी गीतेच्या विश्लेषणाला सुरुवात केली. आता त्यांना त्यांच्या करिअरमधल्या शिकलेल्या विश्लेषणाच्या पद्धती अवलंबायच्या होत्या. त्यांच्या गुरूंचे गुरू स्वामी दयानंदजींनी त्यांना एक विचार सांगितला. ते म्हणाले, ''गीता ही तुकडयातुकडयात शिकायची गोष्ट नाही. ती समग्र शिकायची गोष्ट आहे. आणि समग्र कळण्यासाठी तुकडयातुकडयांशिवाय ती शिकताच येणार नाही.'' अनेक गीता अभ्यासकांची नेमकी हीच अडचण झालीय. यावर करंजकरांनी एक अभिनव पद्धत स्वीकारली. प्रथम सबंध गीतेतील 700 श्लोकांच्या चिठ्ठया केल्या आणि त्या खोलीभर पसरल्या. तासन्तास त्या चिठ्ठया ते पाहत बसायचे. अनेक दिवस, कित्येक महिने हा अभ्यास चालला. मग त्यांच्या लक्षात आलं, की गीतेचे श्लोक दोन मुख्य समूहात विभागले आहेत. कुठल्यातरी गोष्टीबद्दलचं ज्ञान देणारा एक समूह व मनुष्याने काय करावं, हे सांगणारा एक समूह. नंतर लक्षात आलं की, गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी सांगितलं आहे की, गीतेत ब्रह्मविद्या व योगशास्त्र आहे. हेच ते दोन समूह! याला ते 'ऍफिनिटी ऍनालिसिस पद्धत' म्हणतात.

मग करंजकरांनी हे 700 श्लोक मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये लिहिले. प्रत्येक श्लोकाचं वर्गीकरण या दोन समूहांमध्ये लिहिलं. ब्रह्मविद्येवरील श्लोकांना 'B' कोड दिला आणि योगशास्त्रावरील श्लोकांना 'Y' कोड दिला. ब्रह्मविद्येवरील श्लोक 'जगाचं/संसारा'चं व अंतिम सत्याचं ज्ञान देतात आणि योगशास्त्रावरील श्लोक 'काय करावं' अशा स्पष्ट सूचना देतात. या सूचना भगवंतांनी दिल्या आहेत. ब्रह्मविद्या कळल्याशिवाय योगशास्त्र कळणारच नाही.

मग फक्त ब्रह्मविद्येचे श्लोक घेऊन परत हीच प्रक्रिया केली. या श्लोकांच्या चिठ्ठया पसरून अभ्यास केल्यावर लक्षात आलं की, त्याचं 5 संकल्पनांमध्ये विभाजन करता येतं. जीव, जगत्, जगदीश (ईश्वर), आत्मा आणि ब्रह्मन्! मग या विभागांना उपनाव दिलं व एक्सेलमध्ये सबकोड दिले. हीच प्रक्रिया करत नेली व मूळ मुद्दयांपर्यंत पोहोचले. योगशास्त्रांच्या श्लोकांवर अशीच प्रक्रिया केली व त्या मूळ मुद्दयांपर्यंत पोहोचले. हे सर्व करताना एक्सेलमध्ये अनेक वेळा उलटसुलट सॉर्ट करून तपासून पाहत राहिले. अशी आवर्तनं अनेक वेळा करून अनेक वर्षांनी मग मुद्दे, त्यांची रचना व त्यांचे गीतेतील संबंधित श्लोक यांचं गणित स्पष्ट होत गेलं व स्थिरावलं.

हे संशोधन चालू असताना ते त्यांच्या गुरूंना अनेक अडचणी, शंका विचारत होते आणि त्यातून उत्तम संशोधनाचे निष्कर्ष हाती लागत होते. प्रश्न पडणं, ते विचारणं हा भाव संशोधनात अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्याचा हेतू संकल्पना समजून घेणं असायला हवा. टीका करण्यासाठी नव्हे. त्यामुळे करंजकरांनी प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य घेतलेलं दिसलं, पण त्याचा हेतू खूपच शुध्द असलेला जाणवला.

या संशोधनाचं पुढचं पाऊल पडलं, म्हणजे त्यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या वेगवेगळया सुमारे 100 संकल्पना शोधल्या. हे सगळं संशोधन चालू असताना त्यांनी एक्सेलचा मोठया प्रमाणात उपयोग केला. विश्लेषणाच्या काही पध्दती ते आधीपासूनच शिकले होते, जे त्यांच्या करिअरमध्ये ते वापरत होते आणि काही पध्दती त्यांनी आत्मसात केल्या, काही स्वत: विकसित केल्या. ऍफिनिटी ऍनालिसिस, मेनी टू मेनी मॅपिंग, हायरार्की लेअर्ड कन्सेप्ट, रूट कॉज ऍनालिसिस, स्टेक होल्डर्स ऍनालिसिस, एन्टिटी रिलेशनशिप डायग्राम, लाइफ सायकल डायग्राम, स्टेट डायग्राम, फ्लो चार्ट, क्लस्टर ऍनालिसिस अशा तब्बल 18 प्रकारची तंत्रं आणि संकल्पना वापरून ह्या 700 श्लोकांची उकल केली. प्रत्येक टप्प्यावर निष्कर्ष पुढे सरकत होते. असं करत करत 'गीता-बोध' या पुस्तकाची पार्श्वभूमी तयार झाली. या संशोधनात तयार झालेले निष्कर्ष सॉफ्टवेअर टेस्टिंगसारखे तपासून बघितले जात होते. वेगवेगळया निकषांवर हे निष्कर्ष बरोबर आहेत ना, याची प्रचंड घुसळण झाली. या प्रवासात त्यांना गीतेमध्ये माणसांचं वर्गीकरण केलेलं सापडलं. ते फारच रंजक आहे. ब्रह्मविद्येमध्ये 'काय आहे' यावर भर आहे, तर योगशास्त्रात 'काय करावं' यावर भर आहे. दोन्ही गीतेचेच भाग; पण कोणी, कधी, काय करावं आणि तसं केल्याने काय घडेल हे कळण्यासाठी माणसांचा अभ्यास उपयोगी ठरला. नेमक्या ह्या वळणावर अनेकदा अभ्यासकांचा गोंधळ उडतो. वरवर पाहता भगवंत गीतेमध्ये परस्परविरोधी अनेक विधानं करतात. एकदा म्हणतात, मी सर्व सृष्टी चालवतो. नंतर म्हणतात, मी काहीच करत नाही. अशा अनेक गोंधळांना करंजकर सामोरे गेले. त्यांनी हायरार्की लेअर्ड टेक्निकने जेव्हा श्लोकांचं विश्लेषण केलं, तेव्हा त्यांना रहस्य कळलं. मी सृष्टी चालवतो असं म्हणणारे भगवंत ईश्वराच्या रूपात आहेत. मी काहीच करत नाही, असं सांगणारे भगवंत ब्रह्मन् स्वरूपात आहे. परित्राणाय साधूनाम म्हणणारे भगवंत हे अवतार स्वरूपात आहेत. पण मग ईश्वर कधी, ब्रह्मन् कधी, अवतार कधी, हे कळण्यासाठी त्यांनी काही शास्त्रशुध्द तंत्र वापरून या सगळयांचं वर्गीकरण केलं. त्यातले संदर्भ शोधले. तसंच गीतेमध्ये भगवंत एकदा म्हणतात की ज्ञान महत्त्वाचं, तर कधी म्हणतात कर्म कर. हा गोंधळ कसा सोडवायचा? विश्लेषण केल्यावर लक्षात आलं की, गीतेमध्ये सहा प्रकारची माणसं किंवा चार प्रकारचे भक्त दिलेले आहेत. ह्या माणसांच्या अवस्था आहेत. या अवस्था सापेक्ष आहेत. एक माणूस एका अवस्थेमध्ये कायमस्वरूपी नसतो. पहिली अवस्था 'असुर', दुसरी 'आर्त', तिसरी 'अर्थार्थी', चौथी 'जिज्ञासू', पाचवी 'ज्ञानी' आणि सहावी 'जीवनमुक्त'! यातील पहिल्या व शेवटच्या दोन अवस्थांमधील माणसं श्रीकृष्णाचे भक्त नाहीत. कारण पहिला ब्रह्मन् मानतच नाही किंवा समजून घेत नाही आणि शेवटचा ब्रह्ममध्ये सामावून गेलेला आहे. सर्व सूचना या योग्य त्या अवस्थेसमोर मांडल्यावर कोडे उलगडले व गोंधळ संपून सुयोग्य योगशास्त्र स्पष्ट झाले. आता 'असुर' अवस्थेतील माणसाला काय सूचना आहेत, तर 50 प्रकारच्या नीतीमत्तेच्या संकल्पना त्याने आत्मसात केल्या, तर त्याची पुढची अवस्था येऊ शकेल. त्या 50 संकल्पनांना गीतेमध्ये 'धर्माचरण' असं नाव दिलं आहे. असुराला धर्माचरण, आर्ताला विवेक, अर्थार्थीला कर्मयोग, जिज्ञासूला ज्ञानयोग आणि ज्ञानीला ध्यानयोग सांगितला आहे. प्रत्येक अवस्थेत, त्या त्या सूचनांचं आचरण केल्यास पुढच्या अवस्थेसाठी लागणारी पात्रता निर्माण होते. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने उत्कर्ष करत मनुष्य मोक्षापर्यंत पध्दतशीरपणे जातो. हे शोधताना त्यांनी फ्लो चार्ट, स्टेट डायग्राम वापरून त्याची मांडणी निर्दोष केली आणि या संपूर्ण प्रवासालाच भक्तियोग म्हटलं आहे, हे निदर्शनास आलं. मुळात ईश्वर आणि ब्रह्मन् या संपूर्ण वेगळया गोष्टी आहेत. सगुण साकार आहे किंवा सगुण निराकार आहे तो ईश्वर आणि निर्गुण निराकार आहे तो ब्रह्मन्! करंजकरांनी सॉफ्टवेअर ऍनालिसिस टेक्निकच्या मदतीने श्लोकांचा अभ्यास करताना माझा ईश्वराशी, ईश्वराचा सृष्टीशी आणि सृष्टीचा माझ्याशी काय संबंध आहे, हे शोधून काढलं. त्यासाठी त्यांनी 'एन्टिटी रिलेशनशिप डायग्राम' हे तंत्र वापरलं. हा अभ्यास करताना त्यांनी कर्माचा सिध्दान्त (लॉ ऑफ कर्मा) आणि संस्काराचा सिध्दान्त (लॉ ऑफ संस्कारा) यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. बरेच लोक कर्म व कर्मफळावर बोलतात; पण एखादं कर्म आपण का करतो, हे कुणी सांगत नाही. त्यासाठी संस्काराचा सिध्दान्त शिकायला हवा. प्रारब्ध, पूर्वसंचित आणि कर्मफळ यांचा परस्पर संबंध दाखवणारी आकृती हे त्यांच्या संशोधनाचं विशेष आकर्षण आहे. 'वैराग्य' या संकल्पनेचाही नेमका अर्थ त्यांना सापडला. एवढंच काय, संपूर्ण गीतासार त्यांनी 'गीता बोध' या पुस्तकात शेवटच्या पानावर केवळ एका आकृतीच्या साहाय्याने सांगितलं आहे.

हे सगळं ऐकताना माझी थक्क होण्याची परिसीमा होत होती. मुळात गीता ही श्लोकांनी नाही, तर संकल्पना उमजून शिकण्याची गोष्ट आहे हेच तर 'गीता बोध' या संशोधनावर आधारित पुस्तकाचं खरं स्वरूप आहे हे मनोमनी पटलं. या संकल्पना समजावताना पुस्तकातील भाषेमध्ये किंवा माझ्याशी बोलतानाही करंजकरांच्या डोळयात कुठेही अहंकार, अहमहमिका दिसली नाही... आहे ते विलक्षण समाधान... उकल केल्याचं! पुस्तकातही करंजकरांची मतं नाहीत. गीतेचा निष्कर्ष आहे.

''ही जी सगळी आपली जगण्याची धडपड चालली आहे, त्याचं नेमकं 'टार्गेट' काय?'' मला वाटलं, आता हे म्हणणार की, ''पैसा दुय्यम आहे आणि अध्यात्म कसं स्वत:चा शोध घ्यायला सांगतं'' वगैरे वगैरे. पण करंजकर 21 अपेक्षित गाइडसारखी उत्तरं आपल्याला देतच नाहीत. बोलता बोलता म्हणाले, 'तर... जगण्याचं ध्येय हे सत्चिदानंद आहे.' हे वाक्य मी पूर्वी एक-दोनदा वाचलं होतं, पण अर्थ आज कळला. माणूस आयुष्यभर तीन गोष्टींच्या मागे असतो. एक म्हणजे आनंदी असण्यासाठीची धडपड, अमरत्व मिळवण्यासाठी खटपट आणि आपल्याला सर्व ज्ञान मिळावं हे ध्येय! जन्माला येणारा प्रत्येक माणूस नकळत या तीन गोष्टींसाठी धडपड करत असतो. बाकी सगळया गोष्टी या तीन गोष्टींच्या पोटात आहे. विचार करायला लागल्यावर हे मला तंतोतंत पटत होतं. हे शिकवताना करंजकर बाबा नेमके विश्लेषक आहेत का अभ्यासक आहेत, आध्यात्मिक गुरू आहेत हेच कळेनासं होतं. पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी मी अभ्यासक आहे गुरू नाही, हे नम्रपणे स्पष्ट केलेलं आहे.

हे केलेलं सगळं संशोधन अचूक ठरावं, यासाठी त्यांनी शेकडो वेळा उलटसुलट प्रयोग करून ते तपासले आहेत. त्यांना त्यांच्या गुरूंचं उत्तम मार्गदर्शन मिळालं आहे. हे संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांनी दीड वर्षांत ते पुस्तकरूपात शब्दबध्द केलं. ते शब्दबध्द करताना त्यांची भूमिका स्पष्ट होती. 'गीता' ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी. ती आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या प्रश्नांवर आपल्याला मार्गदर्शन करतेच; पण ती समजून घेण्याची गोष्ट आहे. वाचण्याची आणि फक्त पाठ करण्याची नव्हे! तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे गीता शिकण्यासाठी वय नाही. अगदी 13-14 वर्षांच्या मुलापासून ते वृध्द माणसांपर्यंत कोणीही गीता शिकू शकतं. आपलं पुस्तक सर्वसमावेशक व्हावं, यासाठी त्यांनी पराकाष्ठा केली. हे पुस्तक लिहून झाल्यावर त्यांनी अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवले, पण प्रकाशक आणि करंजकर ह्यांच्या एकमेकांसोबतच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांनी हे पुस्तक स्वत:च प्रकाशित करायचं ठरवलं. पुस्तक तयार झाल्यावर वेगवेगळया क्षेत्रातल्या, वेगवेगळया वयोगटाच्या, तसंच वेगवेगळया धर्माच्याही तब्बल 60 लोकांना हे पुस्तक अवलोकनासाठी दिलं! त्या सर्व सूचना व टीपा यांचा वापर करून पुस्तक अंतिम स्वरूपात तयार झालं. हे पुस्तक लिहिताना त्यांनी स्वत:च्या लेखनाबद्दलच्या कठोर अपेक्षा एक्सेल शीटमध्ये लिहिल्या होत्या. त्या संपादित करताना अशाच कठोर अपेक्षा संपादकासाठीसुध्दा दिल्या. यावर कडी म्हणजे हे हाडाचे संशोधक गृहस्थ उत्तम चित्रकारही आहेत. पुस्तक वाचकासाठी दिसायला सुंदर व प्रसन्नता देणारं व देखणं कसं होईल, यासाठी खोलवर विचार केला. याप्रमाणे पुस्तकातील संकल्पना सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी त्यांनी राहुल देशपांडे या उत्तम चित्रकाराकडून चित्रं काढून घेतली आणि प्रणव संत याच्याकडून उत्तम लेआउट करून घेतला. विभाकर वैद्य या पुण्याच्या कसलेल्या प्रिंटरने करंजकरांच्या अपेक्षा पूर्ण करणारं उत्तम प्रिंटिंग केलं. हे सगळं घडत असताना मी मूक साक्षीदार होते, याचा मला अभिमान वाटतो.

सॉफ्टवेअरमधले लोक एखादी व्यावहारिक पातळीवरची सिस्टिम डिझाइन करताना इतका खल करतात. इथे तर आपलं आयुष्य आहे, जे गीता शिकल्याने बदलू शकतं. ह्या अभ्यासात सॉफ्टवेअर विश्लेषण पध्दती वापरण्याचं एक विशिष्ट कारण होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी गीता शिकण्याची पध्दत वेगळी असणार. प्रचंड गोष्टी लक्षात ठेवून करायचा हा अभ्यास आहे. आजकाल आपले पाढेही पाठ होत नाहीत. मग गीता कधी लक्षात ठेवणार? तसेच, अनेक प्रकारचे ऍनालिसिस टेक्निक्स वापरून काही महत्त्वाचे उद्देश साध्य झाले. गीतेतील गूढ व सहज न कळणारं ज्ञान उकलण्यास व स्पष्टपणे प्रकट करण्यास मदत झाली. तसंच, निघालेले निष्कर्ष हे शास्त्रशुध्द व वैयक्तिक मतांच्या पलीकडे आहेत, हेही साध्य झालं. तसंच, मिळालेले निष्कर्ष एकसंध व परिपूर्ण आहेत, त्यात काही त्रुटी नाहीत, हेही साध्य झालं. हे गीतेतील ज्ञान शेवटच्या माणसापर्यंत सखोल, पूर्णपणे पण सहज पोहोचावं, यासाठी हा खटाटोप! हा सगळा खटाटोप करताना त्यांनी भगवद्गीतेमधील अनेक कोडी उलगडली. पुस्तकाबद्दल अनेकांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अनेक वयोगटाचे, अनेक क्षेत्रातील, अनेक धर्माचे वाचक व अभ्यासक आहेत. तसेच, अनेक अधिकारी व्यक्तींनाही हे पुस्तक आवडलं आहे. त्यात त्यांचे सद्गुरू तर आहेतच, तसेच श्री श्री रविशंकर, रामकृष्ण मिशनचे आत्मविकासानंद यांच्यासारखे अधिकारी लोकही आहेत.

गीताबोध हे इंग्लिशमधील पुस्तक लोकांच्या घरात ऍमेझॉनमार्फत व परदेशातही बुकगंगामार्फत पोहोचतं आहे. www.gitabodh.org या नावाने त्याचं संकेतस्थळही उपलब्ध आहे. आता निवृत्त झालेले करंजकर लोकांना गीता शिकवण्याच्या तळमळीने पूर्णपणे मोफत गीता शिकवतात. त्यासाठी त्यांनी त्यांच्या खास स्टाइलने फक्त 10 तासांचा एक कोर्सही आखलेला आहे. तो देशात व परदेशातही लोकांना खूप भावतो.

गेल्या 30-32 वर्षांच्या या गीता अभ्यासात त्यांची पत्नी त्यांना संवादिनीसारखी साथ करते आहे. माणूस आपल्या तळमळीसाठी काय करू शकतो, हे गीताबोध वाचलेल्या लोकांनाच समजू शकेल. गीतेची यशस्वी उकल करणाऱ्या या 'सर्जन'शील अभियंत्याला विनम्र अभिवादन!

 

कम्युनिकेशन कन्सलटंट,

बीज कन्सल्टन्सी ऍंड सर्व्हिसेस

8308841271

[email protected]