लेन्सच्या पलीकडचं शॉर्टफिल्मचं अंतरंग

 विवेक मराठी  06-Nov-2018

 **किरण क्षीरसागर

 शॉर्टफिल्म या शब्दातील 'शॉर्ट' ही दोन अक्षरं त्या माध्यमाच्या वेळेच्या मर्यादेकडे निर्देश करतात. मात्र शॉर्टफिल्म वेळेची मर्यादा भेदून कथा, अभिनय, चित्रीकरण, संकलन, दिग्दर्शन अशा सगळयाच पातळयांवर मोठया लांबीच्या चित्रपटांइतका, किंबहुना जास्त परिणाम घडवतात. शॉर्टफिल्म्स राष्ट्रीय पुरस्कारांची मोहर मिळवून किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावून गाजण्याचं प्रमाणही मोठं आहे. सामाजिक प्रश्नावर व्यक्त होण्यासाठी, वास्तव परिस्थिती मांडण्यासाठी शॉर्टफिल्म हे वर्तमानातील उत्तम माध्यम समजलं जातं. चित्रपट निर्मितीचं शिक्षण घेतलेली किंवा न घेतलेली सर्व नवी-जुनी मंडळी त्या माध्यमाकडे आकर्षित झालेली आढळतात. हे आकर्षण नेमकं कशातून निर्माण झालं? एवढया मोठया संख्येने शॉर्टफिल्म्स निर्माण होण्यामागचं कारण काय? त्यातून साध्य काय होतं? शॉर्टफिल्मच्या या वाढलेल्या निर्मितीचे बरे-वाईट परिणाम कोणते? अशा विविध प्रश्नांच्या चश्म्यातून 'शॉर्टफिल्म' या विषयाचं अंतरंग आणि त्याचे विविध पैलू जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

एक अंधारलेलं घर. सकाळचा अलार्म वाजतो. निस्तेज चेहऱ्याचा तो मनुष्य उठून बसतो. नव्या दिवसाची नवी सकाळ! मात्र त्याची कोणतीही प्रसन्नता, उत्साह त्याच्या चेहऱ्यावर नाही. तो उभा राहतो. खांदे पाडून चालत दिव्याजवळ जातो. दिवा लावतो. पण दिवा नेहमीसारखा नसतो. दिव्याच्या जागी एक व्यक्ती तोंडावर दिव्याचं आवरण घेऊन उभी असलेली आपल्याला दिसते. चित्रपटाचं शीर्षक दिसतं - 'एल एम्प्लेओ' (द एम्प्लॉयमेंट). (EL EMPLEO / THE EMPLOYMENT.).

'द एम्प्लॉयमेंट' ही 2008 साली प्रदर्शित झालेली ऍनिमेटेड शॉर्टफिल्म. ती तिच्या पहिल्याच दृश्यापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधते. चित्रपटातील मनुष्य दाढी करतो, त्या वेळेस त्याच्या समोर एक व्यक्ती आरसा धरून उभी असलेली दिसते. तो कपडे घालतो. नाश्ता करायला खुर्चीऐवजी ओणवं राहिलेल्या एका व्यक्तीच्या पाठीवर येऊन बसतो. त्याचं नाश्त्याचं टेबल म्हणजेदेखील ओणवी असलेली दोन माणसंच! हे काय चाललंय? पाहणाऱ्याला प्रश्न पडतो. पण फिल्म त्याचं उत्तर न देता पुढे सरकते. आपण प्रत्येक दृश्यामध्ये दिसणाऱ्या तशा विचित्र गोष्टींनी आणखी अस्वस्थ होत जातो.

'द एम्प्लॉयमेंट' ही शॉर्टफिल्म एका सर्ररिअल (अवास्तव) जगात घडते. मात्र त्याचा गाभा आजच्या वास्तवाकडे अत्यंत प्रखरतेने बोट दाखवतो. फिल्म दहा वर्षांनंतरदेखील आजच्या सामाजिक परिस्थितीला चपखल लागू पडते. फिल्ममध्ये कोणतेही संवाद नाहीत. पार्श्वसंगीत नाही. केवळ घडणाऱ्या गोष्टींचे आवाज ऐकू येतात. सगळा अर्थ पडद्यावरच्या साडेसहा मिनिटांच्या चित्रभाषेतून उलगडत जातो. त्या चित्रपटाचा शेवट विलक्षण परिणामकारक आहे. (मुद्दाम सांगत नाही. ती फिल्म यूटयूबवर पाहता येते.) तो शेवट आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व गोष्टींना क्षणार्धात अर्थ बहाल करतो. माणसाच्या वर्तमान आयुष्याबाबत, परिस्थितीबाबत प्रश्न निर्माण करते. फिल्म या माध्यमाची समज असणारा-नसणारा असा प्रत्येक जण अंतर्मुख होतो. निव्वळ साडेसहा मिनिटात ते जे घडतं ना, तीच या माध्यमाची ताकद.

शॉर्टफिल्मची घडामोड

'शॉर्टफिल्म' हे चित्रपटांच्या तुलनेत छोटं माध्यम. मात्र त्याची ताकद अफाट आहे. त्याला असलेली वेळेची मर्यादा हेच त्याचं खरं बलस्थान! कारण लहान किंवा प्रसंगी मोठा आशय खुलवून, खुमारीने, परिणामकारकतेने कमी वेळेत प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं हे कठीण काम. शॉर्टफिल्मला कमी वेळेत प्रेक्षकाचं ध्यान आकर्षून घेणं, कमी अवकाशात पात्र-घटना-समस्या/विषय यांची मांडणी करणं, सुरुवात-मध्य-शेवट किंवा चित्रपटाचा 'थ्री ऍक्ट स्ट्रक्चर' सादर करणं आणि सरतेशेवटी तेवढयाच ताकदीने परिणाम निर्माण करणं अशा अनेक कसरती करायच्या असतात. त्यामुळे शॉर्टफिल्म तयार करणं हे अधिक आव्हानात्मक काम आहे. साहित्यात लघुकथेचं जे स्थान आहे, तेच चित्रपटांच्या बाबतीत शॉर्टफिल्मचं आहे असं म्हणणं अधिक योग्य होईल.

शॉर्टफिल्म हे माध्यम लोकांना परिचित झालेलं आहे. आपण वेगवेगळया विषयांवरच्या शॉर्टफिल्म तयार होताना, पुरस्कार मिळवताना, मोठया चित्रपट महोत्सवांमधून नावाजल्या जाताना वाचत-ऐकत असतो. जगभरात सर्वत्रच शॉर्टफिल्म्समधून नेहमीपेक्षा वेगळा, जो व्यावसायिक चित्रपटांमध्ये दिसत नाही, असा कंटेण्ट, असे विषय सामोरे येऊ लागले. त्यामध्ये टिपिकल प्रेमकहाण्या किंवा तंत्राधिष्ठित चकचकाट यांच्या पलीकडे जाऊन नवं काहीतरी साकारण्याची, जुन्या गोष्टी नव्या तऱ्हेने सादर करण्याची, स्वत:च्या भावविश्वापासून सामाजिक वास्तवापर्यंत बरंच काही मांडण्याची ऊर्मी दिसत होती. ते जगात सर्वत्र घडत होतं. हळूहळू जगभरात त्या चित्रपट प्रकाराची गंभीरतेने दखल घेतली जाऊ लागली. विविध नामवंत पुरस्कार सोहळयांनी 'ऍनिमेटेड शॉर्टफिल्म', 'लाइव्ह ऍक्शन शॉर्टफिल्म' अशा विभागांमध्ये पुरस्कार देण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्टफिल्मचा आधी केवळ स्क्रीनिंगसाठी आणि मग स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला. कालांतराने मोठया चित्रपटांबरोबरच काहींच्या संख्येने दाखवल्या जाणाऱ्या शॉर्टफिल्मसाठी खास फिल्म फेस्टिव्हल आयोजित होऊ लागले. हे सगळं एवढया वेगात घडत जाण्यामागे काही कारणं होती का?

ज्या काळात जागतिकीकरणामुळे भारतात विविध क्षेत्रांवर दूरगामी परिणाम होत होते, त्याच वेळी जगभरातील चित्रपट क्षेत्रातदेखील क्रांती घडत होती. किंबहुना असं म्हणणं अधिक योग्य ठरेल, की जगामध्ये मोठया प्रमाणात जी उलथापालथ घडत होती त्याचं प्रतिबिंब चित्रपट माध्यमात दिसून येत होतं. गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात पाश्चात्त्य जीवनात टी.व्ही. मागे पडून संगणक बऱ्यापैकी रुळला होता, भारतात त्या बदलाची पहाट होऊ पाहत होती, इंटरनेट जगात सर्वसामान्यांना नुकतंच खुलं झालं होतं, ईमेलचा प्रचार होत होता, टी.व्ही.-मोबाइल यांनी जग जवळ आणलं होतं (लवकरच ते विधान इंटरनेट हिरावून घेणार होतं), 'जग एक खेडं' ही कल्पना सर्वदूर प्रचितीला येत होती, जग जवळ येण्याचा वेग स्थानिक संस्कृतीवर परिणाम करताना दिसत होता, नवे प्रश्न निर्माण होत होते, लोक कुटुंबव्यवस्थेच्या रूढ मार्गांना नवे पर्याय शोधू पाहत होते, जगातील पहिली टेस्ट टयूब बेबी तारुण्यात पदार्पण करत असतानाच माणसाने पहिली क्लोन मेंढी तयार केली होती, माणसाच्या खाद्यान्नापासून पेहरावापर्यंत अनेक बदल होत होते, वाढत्या व्यापारीकरणामुळे ते बदल विविध प्रांतात प्रसृतदेखील होत होते, जगभरच्या हवेत वाढता कार्बन इथपासून ध्रुवांवर वितळत चाललेला बर्फ इथपर्यंत पर्यावरणाच्या अनेक चिंता भेडसावू लागल्या होत्या. हे सारं त्या त्या काळच्या, प्रदेशाच्या आणि जॉनरच्या चित्रपटांमधून कमी-अधिक फरकाने उमटत होतं. उत्सुक मंडळी फिल्मच्या आणि शॉर्टफिल्मच्या माध्यमातून त्या स्थितींचा, प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होती.

 

त्याचबरोबर जगात तंत्रज्ञानाचा स्फोट होत होता. इतर क्षेत्रांप्रमाणे चित्रपटाच्या क्षेत्रातदेखील नवनव्या तऱ्हेचं तंत्रज्ञान अवतीर्ण होत होतं. प्रसंगी चित्रपटांच्या निर्मितीसाठी खास तंत्रज्ञानाची निर्मिती केली जात होती. त्याच काळाच्या आसपास डिजिटल फिल्ममेकिंगची पध्दत जगभरात रुळत गेली. आधी चित्रपट तयार करण्यासाठी रिळं वापरली जात. तो प्रकार महागडा होता. म्हणूनच त्या काळात चित्रपट तयार करणं हे फार मोठं आणि खर्चीक काम भासे. डिजिटल क्रांती घडली आणि रिळं कालबाह्य ठरली. डिजिटल कॅमेऱ्यांनी, इतर साधनांनी त्यांची जागा पटकावली. ती पंधरा वर्षांमागे भारतात स्थिरावू लागली. तरीसुध्दा डिजिटल टेक्नीक सर्वसामान्यांच्या हातात येण्यास थोडा वेळ गेला. पण जेव्हा डीएसएलआर आणि तत्सम इतर कॅमेरे आले, तेव्हा चित्रपट बनवणं ही सामान्य व्यक्तीसाठी अगदीच आवाक्यातील गोष्ट ठरून गेली. चित्रपटाची साधनं कमी खर्चात सहज उपलब्ध होऊ लागली. पूर्वी चित्रपट शूट करण्यापासून त्याचं संकलन (एडिटिंग), ध्वनिसंयोजन (साउंड डिझायनिंग), कलर करेक्शन अशा कित्येक गोष्टी करण्यास मोठी मेहनत घ्यावी लागे. त्याला वेळही जास्त लागे. बदललेल्या तंत्रज्ञानाने ते सारं काही सोपं करून टाकलं. लोक मोबाइलवरून सिनेमा शूट करू लागले. कोणत्याही संगणकावर, लॅपटॉपवर तो एडिटदेखील करता येऊ लागला. दुसरीकडे चित्रपट निर्मितीचं शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था उदयाला आल्या होत्या. चित्रपट निर्मितीचं शिक्षण मिळणंही सहज शक्य झालं. शॉर्टफिल्मला पहिल्यापासूनच चित्रपट माध्यमाचं ग्लॅमर होतं. म्हणून सहज उपलब्धता आणि कमी खर्च यामुळे उत्सुक-धडपडया व्यक्तींसाठी ते माध्यम आकर्षण न ठरतं तर नवल! चित्रपटाचं माध्यम लोकांना व्यक्त होण्यासाठी खुणावू लागलं. जगभरात सर्व वयोगटातील, स्तरांतील मंडळी हिरिरीने शॉर्टफिल्म्स तयार करू लागली. त्यामध्ये विविध दृष्टीकोन येत गेले. विविध प्रांत आणि प्रदेश यांमधून निर्माण होणाऱ्या फिल्म्स आपापला 'लोकल फ्लेव्हर' घेऊन येऊ लागल्या. ठिकठिकाणच्या संस्कृती, तेथील सामाजिक-राजकीय रचना, कल्पना, साहित्य, कला अशा बहुविध गोष्टी, ज्या तोपर्यंत जागतिक चित्रपटांमधून प्रत्ययाला येत असत, आता शॉर्टफिल्मच्या माध्यमातून सामोऱ्या येऊ लागल्या. लोक आपापल्या दृष्टीतून चित्रपट माध्यमाकडे पाहू लागले. त्यात प्रयोग करू लागले. शॉर्टफिल्मच्या माध्यमाचा वेगवेगळया तऱ्हेने शोध घेतला जाऊ लागला. थोडक्यात, चित्रपट माध्यमाचं लोकशाहीकरण झालं होतं.

चित्रपट माध्यमात झालेले बदल आणि त्याचा वाढलेला प्रसार यासाठी कारणीभूत असलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट. यूटयूब-विमिओ यासारख्या ऑनलाइन प्लॅटफर्ॉम्समुळे फिल्म आणि शॉर्टफिल्म यांचा मोठा प्रसार-प्रचार झाला. हौशी मंडळींनी कॅमेरा वापरण्यापासून स्पेशल इफेक्ट्स-कॉम्प्युटर ग्राफिक्स तयार करण्यापर्यंतचे धडे ऑनलाइन आणले. प्रेक्षकांसाठी शॉर्टफिल्म पाहण्याची मोठी सोय झाली. हौशी-उत्सुक मंडळी शॉर्टफिल्म तयार करण्याचे ऑनलाइन धडे गिरवू लागली. फिल्ममेकर्सच्या मुलाखती, चित्रपटांवरील चर्चा अशा कित्येक गोष्टींमुळे 'फिल्म' या विषयाचं अंतरंग आणि त्याची घडण समजून घेण्याची सोय झाली. पण सर्वात मोठी मदत झाली ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचवण्याची!

फिल्म तयार झाली तरी लोकांपर्यंत पोहोचवणं, डिस्ट्रिब्यूट करणं हा महत्त्वाचा आणि खर्र्चीक भाग असतो. शॉर्टफिल्मची निर्मिती ही हौसेखातर अधिकतर होत असते. लोकांना सर्जनाची ओढ असते. काही प्रसंगी लोकांना त्यांनी घेतलेलं चित्रपट निर्मितीचं शिक्षण प्रत्यक्षात वापरून पाहण्याची, एखादा प्रयोग करण्याची ऊर्मी असते किंवा मोठया लांबीचे चित्रपट तयार करण्याआधी त्या माध्यमावर पकड बसावी असा शॉर्टफिल्म तयार करण्यामागचा उद्देश असतो. त्यातच, भारतात शॉर्टफिल्म या प्रकाराला ग्लॅमर मिळालं असलं, तरी त्याची आर्थिक बाजारपेठ निर्माण झालेली नाही. जगभरात थोडयाफार फरकाने हेच चित्र आहे. त्यामुळे फिल्मच्या वितरणातून पैसे निर्माण करणं हा मुद्दा शॉर्टफिल्म निर्मितीच्या गणितातून आपोआप वगळला गेला. त्यामुळे शॉर्टफिल्मकर्ते यूटयूब, विमिओ यासारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या फिल्म्स प्रसिध्द करू लागले. त्यांना फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम अशा विविध सोशल मीडियाची जोड मिळाली. आकर्षक कल्पनांच्या, उत्तम रितीने तयार करण्यात आलेल्या शॉर्टफिल्म लोकांच्या पसंतीस पडू लागल्या. काही वेगाने 'व्हायरल' होऊ लागल्या. लोकांची पसंती-प्रतिक्रिया शॉर्टफिल्मकर्त्यांना चटकन आणि तेदेखील आकडयांच्या हिशोबात कळू लागल्या. आपली कलाकृती लोकांपर्यंत (जवळजवळ फुकटात) पोहोचवण्याचा आनंद चित्रपटकर्त्यांना मिळू लागला. शॉर्टफिल्म हे अभिव्यक्तीचं माध्यम होण्यामागे आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्या इंटरनेटसारख्या कोणत्याही सेन्सॉरपासून मुक्त असलेल्या व्यासपीठावर सादर होत आहेत. त्यामुळे शॉर्टफिल्म हे जे लिहून बोलता येत नाही किंवा मोठया फिल्म्समध्ये मांडता येत नाही, अशा गोष्टी मुक्तपणे, स्वत:ला हव्या तशा रितीने सांगण्या-मांडण्याचं माध्यम बनून गेलं. पण या साऱ्या घडामोडीचे काही दुष्परिणामदेखील होते.

प्रसिध्द चित्रपट समीक्षक-लेखक गणेश मतकरी म्हणतात, ''पूर्वी मूठभर लोकांच्या हाती असलेलं चित्रपटाचं माध्यम लोकांचं होऊन गेलं. त्यामुळे फिल्म्स निर्माण होण्याची संख्या वाढली. मात्र त्यात चांगल्याबरोबरच वाईटही तितकंच होतं. 'सहज प्राप्त होतंय' म्हणून त्या माध्यमाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनही 'कॅज्युअल' होऊन गेला. त्याला पूर्वीची गंभीरता राहिली नाही. पूर्वी खर्चीक असल्यामुळे का होईना मात्र प्रत्येक शॉट शूट करण्यापूर्वी दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, अभिनेते असे सगळेच 'काय शूट करायचं आहे?' याचा बारकाईने विचार करत. त्यांच्या कृतीला असलेल्या विचारांच्या जोडणीमुळे फिल्म्सना विशिष्ट दर्जा असे. डिजिटल कॅमेऱ्यांनी 'स्वस्ताई' आणली. त्यामुळे मनात आलं की शूट केलं असं होऊन गेलं आहे. त्यामुळे शूटिंगच्या वेळेस फार विचार न करता शूट करण्याकडे कल वाढत चाललला आहे. स्क्रिप्टमध्ये नसलेलं पण आयत्या वेळी मनात आलेलं शूट केलं जातं. जर आपण लिहिताना एका वाक्याऐवजी पंचवीस वाक्य लिहू लागलो, तर किती किती फापटपसारा निर्माण होईल? सिनेमाच्या शूटमध्ये तसं होतंय. सारं काही सिनेमाच्या एडिट टेबलवर पाहून घेण्याच्या वृत्तीमुळे सिनेमा एडिट होण्याचा कालावधीसुध्दा वाढतो.''

एखादी गोष्ट घडवताना मेहनत करावी लागली की व्यक्तीवर, त्यांच्या मनावर आणि बुध्दीवर त्याचा एक वेगळा संस्कार होत असतो. मात्र तंत्रज्ञानाने गोष्टी सोप्या करून टाकल्या आणि त्या मेहनतीला बऱ्याच अंशी पूर्णविराम मिळाला. त्याबरोबर पूर्वी होत असलेला कामाचा संस्कार लोप पावला. या माध्यमाकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टीकोनदेखील बदलत गेला. या बदलांमध्ये 'चित्रपट करणं हे सोपं काम आहे' अशी जी भावना निर्माण झाली आहे, ती जेवढी चांगली तेवढीच वाईटदेखील आहे. कारण एखाद्या प्रोसेसमधला विचार संपणं हे त्या कलेच्या, क्षेत्राच्या ऱ्हासाचंदेखील कारण असू शकतं. सध्या कॅमेरा घेऊन एखादी कथा किंवा प्रसंग चित्रित केला आणि तो संकलित करून त्याला चित्रपटाचं रूप दिलं की आपण फिल्ममेकर्स झालो अशी तरुण मंडळींची भावना झालेली दिसते. मात्र चित्रपट हे त्या तांत्रिकतेच्या पलीकडचं रूप असतं. त्यामध्ये विचार असतो. चित्रपट माध्यमाची स्वत:ची वैशिष्टयं असतात. सिनेमाचं माध्यम घडत असताना त्याचं स्वत:चं तंत्र, व्याकरण घडत गेलं होतं. चित्रपट निर्मितीचं शिक्षण घेताना त्या साऱ्या गोष्टींचा अभ्यास होतो, मात्र सहजसाध्य झालेल्या तंत्रामुळे बहुतांश मंडळींनी त्या अभ्यासाला ऑप्शनला टाकण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसतो. त्यामुळे त्यांच्याकडून तयार होणाऱ्या शॉर्टफिल्मचा दर्जादेखील तसाच सुमार राहिलेला आहे. इंटरनेटवर ढिगाने शॉर्टफिल्म्स उपलब्ध असल्या, तरी त्यामध्ये कमी दर्जाच्या फिल्म्सची संख्या जास्त आहे. पण तरीदेखील अंगभूत कौशल्याच्या, उपजत सर्जनाच्या गुणांच्या आधारावर किंवा रीतसर शिक्षण घेऊन चांगल्या फिल्म्स तयार करण्याचं प्रमाण लक्षणीय आहे.


 

आपल्याकडचा छोटा सिनेमा

आपल्याकडे शॉर्टफिल्म कळतात ते त्यांना एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर. शॉर्टफिल्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात पुरस्कारांचा चांगला वाटा आहे. भारतातील शॉर्टफिल्म्सना थोडंफार ग्लॅमर प्राप्त झालं ते कदाचित त्यांच्यावर राष्ट्रीय पुरस्कारांची मोहर उठू लागली तेव्हापासून. शॉर्टफिल्मला पुरस्कार जाहीर झाले की तिचं नाव माध्यमांमधून चर्चिलं जातं आणि मग लोक ती शोधून पाहतात. तीसुध्दा ऑनलाइन पाहण्याचा ओढा अधिक असतो. आपल्याकडे मुळातच फिल्म या माध्यमाबद्दलच्या जाणिवा बोथट आहेत. आपल्याकडे त्या माध्यमाचं जे प्रस्थ आहे, ते व्यावसायिक पातळीवरील मनोरंजनाच्या पातळीवर आधारलेलं आहे. उत्तम चित्रपट प्रदर्शित झाले, तरी लोक ते पाहण्यास जातीलच असं नाही. मात्र गल्लाभरू पध्दतीचे, नाचगाणी असलेले, ठरावीक स्टार्स असलेले चित्रपट हमखास चांगली कमाई करतात. एखाद्या गोष्टीला, कलेला तिच्या अंगभूत क्षमतेनुसार ओळखण्याची, तिला तिचा सन्मान देण्याची गरज सर्वसामान्य प्रेक्षकाला वाटत नाही. मराठी किंवा कोणताही प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित झाला, तर तो चित्रपटगृहात पाहायला जाणं ही प्रेक्षकांची जबाबदारी असते, हा विचार प्रेक्षकांच्या मनात येत नाही. आपल्या प्रेक्षकाची घडण त्या दिशेने कधीच होत नाही. त्याला त्याच्या लहानपणापासून चित्रपट या कलेची जी ओळख होते, ती 'ग्लॅमर, पैसा, मनोरंजन' अशा रितीने. त्यामुळे तो त्याच वाटेवरून विचार करतो आणि त्याच दिशेने घडत जातो, हे साहजिक आहे. प्रेक्षकाची अशी स्थिती असल्यामुळे शॉर्टफिल्मसारखा तुलनेने वेगळा चित्रप्रकार फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध असला किंवा त्यांचं खास स्क्रीनिंग आयोजित केलं असलं, तरी प्रेक्षक त्या पाहायला जात नाहीत हे वास्तव आहे. शॉर्टफिल्म पाहायला जाणारी मंडळी एकतर फिल्मशी, फिल्म सोसायटीशी निगडित असतात किंवा फिल्म या विषयाचे अभ्यासक तरी असतात. त्यामुळे फिल्म्सना मिळणारं पुरस्कारांचं कोंदण त्या फिल्मचा प्रसार सर्वसामान्यांमध्ये करण्यासाठी बरंच उपयोगी ठरतं. त्यायोगे लोकांचं लक्ष त्याकडे वेधलं जातं, हे महत्त्वाचं.

पुरस्कार आवश्यक असल्यामुळे शॉर्टफिल्म तयार केल्यानंतर त्या मोठया लांबीच्या चित्रपटांप्रमाणे आधी फेस्टिव्हल्समध्ये दाखवण्याची प्रथा रूढ झाली आहे. तिकडून मिळालेल्या कौतुकाच्या, पुरस्कारांच्या जोरावर त्यांचा आपापल्या देशात प्रसार करणं हा फिल्ममेकर्सचा उद्देश दिसून येतो. तर पुरस्कार मिळवणं अशीच शॉर्टफिल्म तयार करण्याची अनेकदा मूळ प्रेरणा असते. मात्र त्यामुळे एक वेगळा घोळ निर्माण होताना दिसतो. नागराज मंजुळे यांच्या 'पिस्तुल्या' या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामध्ये दिसणारं सामाजिक वास्तव दाहक किंवा विचारमग्न होण्यास प्रवृत्त करणारं होतं. 'पिस्तुल्या' हे तर केवळ उदाहरण, मात्र राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या शॉर्टफिल्मची यादी आणि त्यांचे विषय पाहिले, तर असं लक्षात येतं की सामाजिक वास्तव किंवा प्रश्न अशा मुद्दयांवर तयार झालेल्या शॉर्टफिल्म्सना पुरस्कारांमध्ये प्राधान्य मिळालेलं आहे. आधीच आपल्याकडे सिनेमाची जाण कमी. त्यात पूर्वीपासून 'सामाजिक संदेश देणारा सिनेमा म्हणजे चांगला सिनेमा' असा एक विचित्र समज प्रचलित आहे. अशा परिस्थितीत सामाजिक स्थिती मांडणाऱ्या किंवा संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्म्सना पुरस्कार मिळतो किंवा निदान त्यांचं कौतुक होतं, असा नवा समज प्रचलित झाला आहे. त्यातच नागराज मंजुळेच्या 'सैराट'ला मिळालेलं यश आणि त्यावर बोललं-लिहिलं गेलेल्याचा आवाका पाहून प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी या तऱ्हेचे विषय निवडणं चांगलं असल्याचे अंदाज बांधले गेले. शॉर्टफिल्ममधून पैसे मिळत नाहीत, पण निदान कौतुक मिळावं अशी भावना फिल्ममेकर्समध्ये असणं साहजिक आहे. त्यामुळे शहरी असो वा ग्रामीण, वेगवेगळया प्रांतातून निर्माण होणाऱ्या शॉर्टफिल्म्सनी सामाजिक संदेशांची तळी उचललेली दिसते किंवा सामाजिक प्रश्नांचा मुलामा चढवलेला दिसतो. जातविषयक होणारी घुसमट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा विषयांवर मोठया लांबीचे अनेक चित्रपट आणि बक्कळ शॉर्टफिल्म्स येऊन गेल्या आहेत. म्हणून फिल्ममेकर्सनी तो विषय हाताळू नये असं नाही. अनेक मंडळी तेच विषय वेगळया दृष्टीकोनातूनदेखील मांडत असतात. मात्र केवळ पुरस्कार किंवा दखल या दोन मुद्दयांपायी नव्या फिल्ममेकर्सनी स्वत:ला अमुक एका तऱ्हेच्या विषयाला बांधून घेणं योग्य नाही. त्यामुळे विषयांच्या मांडणीच्या बाबतीत त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येतात. आणि प्रत्यक्षात तेच होताना दिसतं.

मात्र सगळयाचं शॉर्टफिल्म रूढ परिघात फिरतात असं नाही. 'सिसक' ही दिग्दर्शक फराझ अरीफ अन्सारी याने 2017 साली तयार केलेली भारतातील पहिली सायलेन्ट LGBTQ शॉर्टफिल्म होती. (LGBTQ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्श्युअल, ट्रान्सजेन्डर.) 'सिसक'ने देश-विदेशातील तब्बल 34 पुरस्कार मिळवले. तेवढं मोठं यश संपादन करणारी ती भारतातील कदाचित एकमेव शॉर्टफिल्म असावी. 'सिसक'मध्ये मुंबईच्या लोकलमध्ये रात्री गाठ पडणाऱ्या दोन तरुणांची कथा संवादाशिवाय आकाराला येते. प्रसिध्द जपानी लेखक हारूकी मुराकामीच्या 'अपूर्ण प्रेमा'च्या कल्पनेवर ती कथा बेतलेली आहे. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून चार लाख रुपयांत 'सिसक'ची निर्मिती झाली होती. विशेष म्हणजे, त्या शॉर्टफिल्मच्या निर्मितीसाठी LGBTQ कम्युनिटीत नसलेल्या शंभराहून अधिक व्यक्तींनी पैसे पुरवले होते. (यंदाच्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' 2018च्या 'शॉर्टफिल्म कॉर्नर' विभागात दिनकर राव यांनी तयार केलेली 'अस्थी' ही फिल्म निवडण्यात आली. मीरा तिच्या आईच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जित करण्यासाठी येते. मात्र तिच्या कानात (शास्त्रीय गायिका असलेल्या) आईचा आवाज घुमत राहतो. मीरा त्या अस्थींशी संवाद साधू लगाते. ती त्या अस्थी विसर्जित करत नाही. आई-मुलीचा वास्तवाच्या पलीकडे जाणारा संवाद हे त्या चित्रपटाचं कथासूत्र. तत्पूर्वी 2014 साली प्रभाकर मीना भास्कर पंत याने दिग्दर्शित केलेली 'दॅट संडे' ही थ्रिलर शॉर्टफिल्म किंवा उमेश बगाडेची 'चौकट' या शॉर्टफिल्म्सदेखील 'कान्स फेस्टिव्हल'साठी निवडण्यात आल्या होत्या.)

विषयातील किंवा सादरीकरणातील वेगळेपण हे शॉर्टफिल्मचं वैशिष्टय असलं, तरी भारतातील, महाराष्ट्रातील शॉर्टफिल्मच्या विषयांना एक मर्यादा जाणवते. आपल्याकडे तयार होणाऱ्या शॉर्टफिल्म अधिकतर समाजभिमुख विषयांना अनुसरून आहेत किंवा मग त्या रोमान्स कॅटेगरीमध्ये तयार होतात. थ्रिलर कॅटेगरीमध्ये त्या क्वचितच तयार केल्या जात असताना दिसतात. मात्र त्यापलीकडचं चित्रपटाचं जॉनर तपासताना, हाताळताना त्या दिसत नाहीत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्या सामाजिक विषयांवर का तयार होतात हे वर विस्ताराने आलंच आहे. आपल्याकडचा व्यवसायिक चित्रपट हा प्रेम या विषयाला टाळून पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे त्याचा प्रभाव शॉर्टफिल्म्सवर दिसून येतो. मात्र त्यापलीकडचे विषय किंवा जॉनर - उदाहरणार्थ हॉरर, सायन्स फिक्शन, रहस्यपट किंवा फॅण्टसी शॉर्टफिल्ममध्ये जवळपास अजिबातच दिसून येत नाही. याचं कारण त्या गोष्टी आम्हा भारतीयांच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे त्या साहित्यात प्रतिबिंबित होत नाहीत आणि त्या वाचक-प्रेक्षकांच्या कल्पनेच्या विश्वातदेखील प्रवेश करत नाहीत. भारतात हॉरर किंवा रहस्यप्रथान लेखनाला दुय्यम मानण्याची परंपरा आहे. त्यामुळेच आपल्याकडे त्या प्रकारांमध्ये चांगलं लेखन निर्माण होऊ शकलं नाही. जे झालं, त्याला सन्मान मिळाला नाही आणि परिणामी त्यावर 'बी ग्रेड' असा शिक्का बसला. त्यामुळे ना ते प्रकार सिनेमात आले आणि ना शॉर्टफिल्ममध्ये. त्यातला दुसरा भाग असा की आपल्याकडे कमी पैशात तयार होणाऱ्या शॉर्टफिल्मची संख्या अधिक आहे. कारण शॉर्टफिल्मसाठी पैसे उभे करणं हा मोठा प्रश्न आहे. शॉर्टफिल्ममधून अर्थप्राप्ती होत नसल्याने त्यासाठी चांगले निर्माते आणि चांगले पैसे मिळणं कठीण असतं. त्यामुळे हॉरर, रहस्य किंवा सायन्स फिक्शन अशा तुलनेने खर्चीक प्रकारांपेक्षा इतर चित्रप्रकार जवळ करणं हे सोपं आहे.

नव्यांचा छोटा सिनेमा

हिरवळीचा मागमूस नसलेलं उन्हात होरपळणारं विस्तीर्ण माळरान. धुळीने माखलेली दूर पसरत गेलेली वाट. त्यावरून तीन शाळकरी मुलं चालत येत आहेत. तेवढयात आकाशातून विमान उडत गेल्याचा आवाज होतो. ती वर पाहतात. काहीच दिसत नाही.

''कुणाचं इमान असंल रं?''

''असंल कुणा मंत्र्या-बिंत्र्याचं.''

''कशावरनं?''

''ती पोरं म्हनत होती ना दुष्काळ भागाची इमानातून पाहनी करणारेत ते.''

''एवढया लांबनं आभाळातनं कसं दिसत असंल रं?''

''दुर्बिनीतून बघत असत्याल.''

'दिसाड दिस' (दिवसाआड दिवस) या शॉर्टफिल्मच्या सुरुवातीला असणारं हे साधं दृश्य आणि त्यातील साधे सहज संवाद नेमकेपणाने एका विशिष्ट परिसरातील परिस्थितीचं सूचन करतात. ती सारी फिल्म उलगडते ती त्या मुलांच्या दृष्टीकोनातून. ती शॉर्टफिल्म त्या तिघांची मैत्री, जगणं, घर, शाळा, गावात घडत असलेले बदल अशा अनेक गोष्टी कोणताही आव न आणता, भडकपणा टाळत मांडते. दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांच्यावर अनेक फिल्म येऊन गेलेल्या असताना त्या पार्श्वभूमीवर तीन लहान मुलांच्या भावविश्वात घडणारा बदल टिपणारी ती शॉर्टफिल्म तिच्या ऍप्रोचमुळे वेगळी वाटते. भावते. भारतासह परदेशातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्या फिल्मचं कौतुक झालं. बॉस्नियातील हर्जेगोविना येथे भरलेल्या 'व्हिवा फिल्म फेस्टिव्हल 2017'मध्ये 'दिसाड दिस'ला 'गोल्डन बटरफ्लाय ऍवॉर्ड' देऊन गौरवण्यात आलं. त्या फेस्टिव्हलच्या अंतिम फेरीत जगभरातून आलेल्या सोळाशे प्रवेशिकांमधून पंचेचाळीस देशांच्या एकोणनव्वद शॉर्टफिल्म्स पोहोचल्या होत्या.

'दिसाड दिस'चा लेखक-दिग्दर्शक नागराज खरात. तो सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मोटेगावचा राहणारा. ('फँड्री', 'सैराट' या चित्रपटांचा कर्ता नागराज मंजुळे हा मोटेगावपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्याचा राहणारा.) नागराज खरातला चांगले चित्रपट पाहण्याचा नाद होता. त्याच वेळी तो सभोवतालची परिस्थिती पाहत होता. त्यानं त्यासंबंधी केलेलं लेखन केलं. ते मित्रांना आवडलं. ते म्हणाले, आपण शूट करू या. नागराजला फिल्म कशी बनवतात ते ठाऊक नव्हतं. जवळ पैसे नव्हते. त्याने थोडेफार उसने पैसे जमवले आणि मोबाइलवर फिल्म शूट करायचं ठरवलं. गावातील तीन लहान मुलं घेऊन त्याने फिल्म शूट केली. एका मित्राला हाताशी धरून त्याने त्याला वाटली-जमली तशी फिल्म एडिट केली. नागराज म्हणतो, ''मला कविता करायला आवडतात. त्यामुळे फिल्म एडिट करताना त्यात काव्यात्मक भाग निर्माण व्हावा असा माझा प्रयत्न राहिला.'' विविध देशांतील महोत्सवांप्रमाणे महाराष्ट्रातील वेगवेगळया महाविद्यालयांतून नागराजची फिल्म दाखवली गेली.

महाराष्ट्राच्या तालुक्यांमधून भटकंती करताना सहज चौकशी केली, तरी प्रत्येक तालुक्यातून काही संख्येने शॉर्टफिल्म (क्वचित प्रसंगी शॉर्ट डॉक्युमेंट्री) तयार केल्या जातात असं लक्षात येईल. त्यामध्ये तरुण वर्ग मोठया संख्येने ऍक्टिव्ह आहे. नागराज खरातसारखी काही निवडक उदाहरणं जरूर सापडतात. विक्रांत बदरखे हे त्यातलंच एक उदाहरण. मूळचा अकोल्याचा असलेला विक्रांत पुण्यात आला तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी. मात्र तिथे तो नाटकाशी जोडला गेला. मग त्याला कळलं की त्याला चित्रपट बनवण्यात अधिक रस आहे. तो नाटकं करू लागला. काही मालिकांसाठी लिहू लागला. त्या काळात त्याने 'द ड्रेनेज' नावाची शॉर्टफिल्म लिहिली होती. मात्र त्याला त्यासाठी निर्माता मिळत नव्हता. तेव्हा त्याला अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि मुकेश छाब्रा (बॉलिवूडमधील आघाडीचा कास्टिंग डायरेक्टर) यांनी आयोजित केलेल्या 'बोलती खिडकियाँ' नावाच्या स्पर्धेबद्दल कळलं. त्यानं त्या स्पर्धेत स्वत:चं स्क्रिप्ट पाठवून दिलं. देशभरातून आलेल्या शेकडो स्क्रिप्ट्समधून विक्रांतचं स्क्रिप्ट निवडलं गेलं. त्याला ती शॉर्टफिल्म शूट करण्यासाठी पैसे तर मिळालेच, त्याचबरोबर इम्तियाज अली, तिग्मांशू धुलिया आणि अनुराग कश्यप यांसारख्या मातब्बरांकडून शिकायलाही मिळालं. विक्रांतची 'द ड्रेनेज' ही शॉर्टफिल्म मोबाइलमुळे माणसाचं समाजापासून तुटणं आणि एकटं होत जाणं याची कथा सांगते. एक गावात राहणारा मनुष्य (नंदू माधव) शहरात त्याचा पहिला स्मार्टफोन विकत घेण्यासाठी येतो. मात्र मोबाइल घेऊन घरी परतताना तो मोबाइल एका मोकळया गटारात, ड्रेनेजमध्ये पडतो. मग पुढील चोवीस तास तो मोबाइल बाहेर काढण्यासाठी त्या माणसाने केलेली धडपड म्हणजे 'द ड्रेनेज' ही शॉर्टफिल्म होय. पंधरा मिनिटांच्या त्या शॉर्टफिल्ममध्ये विक्रांतने अस्वस्थ करणारा अनुभव चितारला आहे. त्यामध्ये ड्रेनेज हे रूपक म्हणून वापरलं आहे. त्या फिल्मचा शेवटदेखील तेवढाच बोलका आणि परिणामकारक आहे. विक्रांतची ती शॉर्टफिल्म अनेक चित्रपट महोत्सवांमधून गाजली.

 

'औषध' ही शॉर्टफिल्म तयार करणाऱ्या फलटणच्या अमोल देशमुख यांनी स्वत:ला आलेला अनुभव त्या फिल्ममधून मांडला आहे. ती घटना 2003 सालची. देशमुख यांना सिनेमाचे वेड, पण त्यांचा उद्योग मेडिकल स्टोअर चालवण्याचा. एकदा ते त्यांच्या साहाय्यकावर दुकानाची जबाबदारी टाकून बाहेर गेले. माघारी आल्यानंतर विकलेल्या औषधांची नोंद करताना त्यांच्या लक्षात आलं की एका म्हातारीला चुकून ब्लडप्रेशरच्या गोळया दिल्या गेल्या आहेत. त्या गोळयांमुळे तिच्या जिवाला अपाय होईल, या काळजीने देशमुख यांनी त्या म्हातारीचा ठावठिकाणा शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना बत्तीस किलोमीटरवर असलेलं एक गाव कळलं. देशमुख यांनी धावपळ करून त्या म्हातारीला शोधून काढलं आणि तिला योग्य त्या गोळया पोचत्या केल्या. देशमुख यांनी लाख रुपये खर्च करून 'औषध'ची निर्मिती केली. माणसातला चांगुलपणा व्यक्त करणाऱ्या त्या फिल्मला 2015 सालचा शॉर्टफिल्मसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. डॉ. सुयश शिंदे यांनी तयार केलेल्या 'मयत'ला यंदाचा सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याव्यतिरीक्त चाफा (मानसी देवधर), गल्ली (संतोष राम), आई शप्पथ (गौतम वझे), गोची (प्रियशंकर घोष) अशा कितीतरी मंडळींनी तयार केलेल्या शॉर्टफिल्म्स उल्लेखनीय आहेत.

शॉर्टफिल्म किंवा फिल्म तयार करण्यासाठी उत्सुक असलेल्या मंडळींसाठी ठिकठिकाणी एक दिवसाच्या किंवा दोन ते चार दिवसांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जात असतात. मात्र तो बराच कामचलाऊ मामला असतो. त्यातून सहभागींना सघन स्वरूपाचं असं काही मिळत असेल याविषयी शंका आहे. एफटीआय, प्रभात यांसारख्या संस्था फिल्म ऍप्रीसिएशनसाठी अनेक चांगली सेमिनार्स घडवतात. मात्र महाराष्ट्रात एफटीआयसारख्या संस्था वगळता चित्रपट निर्मितीच्या पातळीवर दिशादर्शक किंवा प्रशिक्षणात्मक काम करणाऱ्या संस्था-गट जवळपास अस्तित्वात नाहीत. त्यात चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या 'आरभाट' या संस्थेने चालवलेली 'शूट अ शॉट' ही कार्यशाळा उल्लेखनीय काम करते. वर उल्लेखलेल्या चाफा किंवा औषध या माहितीपटांचे कर्ते 'शूट अ शॉट'मधून तयार झालेल्या मंडळींपैकी एक आहेत.

शॉर्टफिल्म तयार करणाऱ्यांमध्ये दोन ते तीन प्रकारची मंडळी पाहण्यास मिळतात. एक तर अशी मंडळी ज्यांना शॉर्टफिल्म तयार करण्याचं कसलंच ज्ञान नसतं. त्यामध्ये नागराज खरातसारखी मंडळी चमक दाखवून जातातसुध्दा, मात्र इतर थातूरमातूर पध्दतीने जमतील तशा कथांना चित्रपटाचं रूप देण्याचा प्रयत्न करतात. दुसरा गट असतो तो चित्रपट निर्मितीचं रीतसर शिक्षण घेतलेल्या लोकांचा. ती मंडळी एकतर व्यावसायिक पध्दतीने चित्रपट-शॉर्टफिल्म बनवतात किंवा मग अगदीच दुर्बोध पध्दतीच्या फिल्मची निर्मिती करतात. तिसरा गट आहे तो चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा. अशी मंडळी एखादा दिग्दर्शक-निर्माता यांच्याकडे काम करत असतात. त्यांच्याकडे चित्रपट निर्माण करण्याचा बऱ्यापैकी अनुभव असतो. चांगली साधनसामग्री असते. त्यामुळे यांच्या फिल्म्स तांत्रिक पातळीवरदेखील इतरांपेक्षा वरचढ ठरतात.

सर्व तऱ्हेच्या वयोगटातील मंडळी शॉर्टफिल्म तयार करायला लागल्यानंतर विविध महोत्सवांनी जशी त्यांची दखल घेतली, तसे शॉर्टफिल्मसाठी खास असे फिल्म फेस्टिव्हलदेखील सुरू झाले. केरळमध्ये 'साइन्स' नावाचा केवळ शॉर्टफिल्मसाठीचा फेस्टिव्हल आयोजित केला जातो. औरंगाबादमध्ये विनय जोशी हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून शॉर्टफिल्मला वाहिलेला 'क्लॅप' नावाचा फिल्म फेस्टिव्हल यशस्वीपणे चालवतो. मुंबईतही 'मामि' आणि 'माय मुंबई' या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्टफिल्मचं मोठया संख्येने स्क्रीनिंग होतं. त्यातही 'मामि' फिल्म फेस्टिव्हलची 'डिमेन्शन मुंबई' ही शॉर्टफिल्मसाठीची स्पर्धा विशेष प्रसिध्दीस पावली आहे. ठिकठिकाणी सुरू असलेले फिल्म क्लब किंवा फिल्म सोसायटी यांमधून शॉर्टफिल्म दाखवल्या जात असतात. परभणीचे रवी पाठक चालवत असलेल्या फिल्म क्लबमध्ये दर महिन्याला शॉर्टफिल्मचं स्क्रीनिंग केलं जातं आणि त्या फिल्मच्या दिग्दर्शकाशी संवाददेखील साधला जातो. प्रभातकडून आयोजित करण्यात येणारा 'थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल', किंवा 'यशवंत चित्रपट महोत्सव' अथवा पुण्याचा 'पिप्फ' असे फेस्टिव्हल्स म्हणजे शॉर्टफिल्म तयार करणाऱ्यांसाठी, पाहू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी असतात. त्याबरोबरच जयपूर, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता अशा देशातील जवळपास प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये सुरू झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्टफिल्मला स्थान मिळालं आहे.

मोठयांचा छोटा सिनेमा

बहुतांशी मोठया चित्रपट दिग्दर्शकांची, अभिनेत्यांची सुरुवात शॉर्टफिल्मने झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. जगप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 'ऍम्ब्लिन' या रोमँटिक शॉर्टफिल्मने झाली होती. पुढे स्पिलबर्गने स्वत:च्या चित्रपट संस्थेचं नाव 'ऍम्ब्लिन' असं ठेवलं. रॉबर्ट रॉड्रिग्ज (एल मारियाची), ख्रिस्तोफर नोलन (डूडलबर्ग), टॉम ट्वायकर (एपिलॉग) अशा हॉलिवूडमधील मोठया दिग्दर्शकांची सुरुवात शॉर्टफिल्म्सने झाली होती. आपल्याकडे मोठया चित्रपटांआधी तशी प्रथा फारशी रुळलेली नाही, तरीदेखील नागराज मंजुळे (पिस्तुल्या), उमेश कुलकर्णी (गिरणी) अशी काही निवडक उदाहरणं सांगता येतात. मात्र मजेदार गोष्ट अशी की अनेक मंडळी मोठया लांबीचे चित्रपट करून विशिष्ट स्थानावर स्थिरावलेली असतानादेखील त्यांना शॉर्टफिल्मचं माध्यम खुणावतं आहे. म्हणूनच अनुराग कश्यपने 'द डे आफ्टर एव्हरीडे' ही शॉर्टफिल्म तयार केली. 'मसान' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या निरज घयवान याने शेफाली शाहला घेऊन 'ज्यूस' ही शॉर्टफिल्म तयार केली. तिला सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मचा फिल्मफेअरदेखील मिळाला. फरहान अख्तरने तयार केलेली 'एड्स'बाबत भाष्य करणारी 'पॉझिटिव्ह', सुजॉय घोषची 'अहल्या' अशा अनेक शॉर्टफिल्म सांगता येतात. अभिनयाच्या पातळीवर शॉर्टफिल्म ही निश्चित आव्हानात्मक आहे. म्हणूनच राधिका आपटे, तापसी पन्नू, संजय मिश्रा, शेफाली शाह, अनुपम खेर, नवाझुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, सोनाली कुलकर्णी, तनिष्ठा चॅटर्जी, मंजिरी फडणीस, गिरीश कुलकर्णी, स्वरा भास्कर, रणवीर शौरी अशा कित्येक अभिनेत्यांनी शॉर्टफिल्ममध्ये काम करण्यास पसंती दिलेली आहे.

शॉर्टफिल्म आता अभिव्यक्तीचं माध्यम या शब्दांच्या पलीकडे जाऊ पाहत आहे. त्या फॉरमॅटचा वापर जाहिरातीच्या क्षेत्रात होऊ लागला आहे. स्वत:चं प्रॉडक्ट काही सेकंदात मांडणाऱ्या कंपन्या आता जाणीवपूर्वक दोन किंवा पाच मिनिटांच्या जाहिराती तयार करू लागल्या आहेत. तशा खास जाहिरातींमध्ये 'स्टोरीटेलिंग' हा सर्वांत महत्त्वाचा घटक दिसून येतो. मग ती पाकिस्तानमध्ये तयार झालेली आणि आपल्याकडे व्हायरल झालेली सर्फ एक्सेलची जाहिरात असो, स्वत:मधलं सौदर्य शोधण्याचा हळुवार सल्ला देणारी 'डव्ह' साबणाची जाहिरात असो, किंवा अनुराग कश्यप, सुरवीन चावला आणि तिस्ता चोप्रा अभिनित 'छुरी' ही मजेदार शॉर्टफिल्म (जी प्रत्यक्षात एका गाडीची जाहिरात करते) असो. शॉर्टफिल्मला मिळणारं 'लोकांचं अटेन्शन' तिला जाहिरातीच्या क्षेत्रात घेऊन आलं, यातच या माध्यमाची वाढती क्रेझ प्रत्ययाला यावी. यामुळे एक चांगली गोष्ट झाली ती अशी की होतकरू आणि कल्पक चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांना त्यांच्या शॉर्टफिल्मसाठी पैसे उभे राहण्याचा नवा मार्ग खुला झाला. केवळ जाहिरातच नाही, तर चित्रपटांमध्येही शॉर्टफिल्मचा पॅटर्न वापरला जाऊ लागला आहे. परदेशांमध्ये 'पॅरिस आय लव्ह यू' आणि 'न्यूयॉर्क आय लव्ह यू' असे एका विषयाशी संलग्न असलेल्या विविध शॉर्टफिल्म्सचं संकलन असलेले काही चित्रपट तयार करण्यात आले. (त्यातील 'पॅरिस आय लव्ह यू' या चित्रपटातली एक शॉर्टफिल्म मीरा नायर यांनी दिग्दर्शित केली आहे. त्यात इरफान खान यांची भूमिका आहे.) त्याच पध्दतीने आपल्याकडे 'नेटफ्लिक्स'वरील 'लव्ह स्टोरीज' किंवा संजय गुप्ताचा 'दस कहानियाँ' किंवा रवी जाधव आणि तीन दिग्दर्शकांनी मिळून केलेला 'बायोस्कोप' असे काही प्रयत्न झाले आहेत.

 

ग्रामीण भागातील शॉर्टफिल्ममेकर्स

सध्या ग्रामीण पातळीवरील तरुण शॉर्टफिल्मच्या क्षेत्रात मोठया प्रमाणात कार्यरत असलेले दिसतात. यूटयूबवर 'Marathi Short Film' असं सर्च केलं, तरी येणाऱ्या रिझल्टच्या संख्येवरून ते प्रमाण किती मोठं आहे याचा अंदाज येईल. त्या शॉर्टफिल्म तयार करणाऱ्यांमध्ये चित्रपट निर्मितीचं रीतसर शिक्षण न घेतलेल्या मंडळींची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातून आलेल्या शॉर्टफिल्म पाहिल्या, तर चटकन लक्षात येतात ते त्यांचे विषय! ते सारे वास्तवाशी निगडित आहेत. त्यांमध्ये समस्यांची मांडणी आहे. तेथील लोकांना, विशिष्ट समाजांना भोगावं लागणारं दु:ख किंवा विवंचना आहे. त्या शॉर्टफिल्म्समध्ये हे साम्य का? असा मी शोध घेतला. शॉर्टफिल्म तयार करणाऱ्या काही उत्साही तरुणांशी बोललो. तेव्हा असं लक्षात आलं, की शॉर्टफिल्म तयार करणं हा त्यांच्या ऊर्मीचा आणि व्यक्त होण्याचा भाग आहे. त्यातच शॉर्टफिल्मला सध्या मिळत असलेलं (चित्रपटाच्या तुलनेत लहान, पण) ग्लॅमर हा एक आकर्षणाचा विषय आहे. त्या तरुणांचा सभोवतालच त्यांना शॉर्टफिल्मला लागणारे विषय पुरवतो. त्यांनी तेथील जमिनीचे, पाण्याचे, दुष्काळाचे, शेतीचे, बलुतेदारीचे असे अनेक प्रश्न अनुभवलेले असतात. संबंधित घटना पाहिलेल्या असतात. त्या गोष्टी त्यांच्या नेहमीच्या जगण्यातल्या. त्यामुळे त्या मांडणं त्यांना सोपं वाटतं. सोलापूरचे प्रणीत देशमुख हे हळदुगे गावच्या प्राथमिक शाळेचे तरुण प्राचार्य. त्यांनी 'सर' नावाची विनाअनुदानित शिक्षकांचं दु:ख मांडणारी शॉर्टफिल्म तयार केली. प्रणीत म्हणतात की ''मी पेशाने शिक्षक. मी माझ्या आवतीभोवती विनाअनुदानित शिक्षकांची होणारी ससेहोलपट पाहत होतो. त्यामुळे शॉर्टफिल्म तयार करताना मला इतर विषय सुचलाच नाही.'' बार्शीच्याच अमर देवकरने 'म्होरक्या' नावाची शॉर्टफिल्म तयार केली. त्यामध्ये ग्रामीण भागातील चौदा वर्षाच्या एका मुलाची कथा आहे. गावात मेंढया राखणारा एक मुलगा शाळेसमोरून जातो. त्या वेळेस 26 जानेवारीनिमित्त एका मुलाच्या नेतृत्वाखाली पंचवीस मुलांचं संचलन सुरू असतं. मेंढया राखणारा मुलगा त्या नेतृत्व करणाऱ्या मुलाच्या जागी स्वत:ला आणि इतर पंचवीस मुलांच्या ठिकाणी मेंढयांना पाहत जातो. त्यातूनच भारतीय लोकशाहीच्या विविध क्षेत्रांतील नेतृत्वाच्या तत्त्वज्ञानावर दिग्दर्शकाने भाष्य केलं आहे. (त्या फिल्मला '65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा'त विशेष उल्लेखनीय कामगिरी व उत्कृष्ट बालचित्रपट गटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.) कोल्हापूर परिसरातून तयार करण्यात एका शॉर्टफिल्ममध्ये बलुतेदारी हा विषय वेगळया अंगाने हाती घेण्यात आला होता. त्यामध्ये एका न्हाव्याची पत्नी पतीच्या मृत्यूनंतर घर चालवण्यासाठी गावात घरोघरी फिरून न्हावीकाम करण्याचा कसा प्रयत्न करते आणि तिला कोणत्या अडचणी येतात, याचं चित्रण आहे. हे असे सारे विषय त्या त्या तरुणांच्या सामाजिक परिस्थितीतून जन्माला येतात आणि पडद्यावर साकार होतात.

मात्र सरसकट सगळयांच्याच फिल्म्समध्ये हे सामाजिक विषय का? असा प्रश्न विचारल्यानंतर लक्षात आलं की, शॉर्टफिल्म तयार करणारी मंडळी बहुतांशी चित्रपट महोत्सवांमध्ये किंवा स्पर्धांमध्ये पाठवण्याच्या उद्देशाने शॉर्टफिल्म तयार करतात. त्यामुळे शॉर्टफिल्मचे विषय ज्वलंत असावेत असा एक मोठा समज ग्रामीण भागात आहे. एका तरुण फिल्ममेकरने मला म्हटलं की, ''काल्पनिक विषयांवर तयार केलेल्या शॉर्टफिल्म परीक्षकांना अपील होत नाहीत.'' का अपील होत नाहीत? याचं तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.

वास्तवाची मांडणी करणारे विषय निवडण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पैसा. बार्शीचा अमोल लोहार म्हणतो की, ''वास्तवावर आधारित फिल्म असली की त्यासाठी लागणारी स्थिती (दृश्यात्मक पार्श्वभूमी) गावाकडे रेडीमेड मिळते. त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. मात्र तेच जर काल्पनिक, फॅण्टसी प्रकारात मोडणारा विषय असेल तर तो साकार करण्यासाठी खर्च करावा लागतो.'' आणि हे काही प्रमाणात खरंदेखील आहे. कारण जवळपास सगळीच मंडळी स्वत:च्या खिशातील पैसे टाकून शॉर्टफिल्म तयार करत असतात. त्यामुळे तशा फिल्मच्या वाटयाला चांगलं कौतुक किंवा पुरस्कार यावा असं वाटणं ही साहजिक भावना आहे. मग आपसूक वास्तव, ज्वलंत, प्रश्न अशा शब्दांची आवरणं चढलेले विषय निवडले जातात. तो सोपा मार्ग ठरतो. खरं तर फॅण्टसी, हॉरर, सायन्स फिक्शन असे विषय कल्पकतेने कमी पैशात मांडणं शक्य आहे. मात्र तसा विचार करताना कुणी दिसत नाही. प्रत्यक्षात दंतकथा, कर्णोपकर्णी पसरणाऱ्या कहाण्या, मंदिर-देवता यांच्या आख्यायिका, गावाचे इतिहास, अगदीच नाही तरी निदान भुताखेतांच्या कथा असे शॉर्टफिल्मचे विषय होऊ  शकतील. अशा कित्येक गोष्टी ग्रामीण परिसरात मोठया प्रमाणात आढळतात. मात्र तेथून निर्माण होणाऱ्या शॉर्टफिल्ममध्ये त्यांचं प्रतिबिंब दिसत नाही, असं एक व्यस्त प्रमाण जरूर जाणवतं.

ग्रामीण परिसरातील नवोदित फिल्ममेकर्सना विषय, निर्मिती, लेखन अशा वेगवेगळया पातळयांवर फार कमी एक्स्पोजर आहे, असं लक्षात येतं. शॉर्टफिल्मला लाभणारं कौतुक हे अधिकतर करून विषयाची निवड या पातळीवर आहे, जो मराठी सिनेमाच्या बाबतीतलाही समान भाग आहे. आपल्याकडे साहित्य किंवा लेखन हा भाग नेहमीच प्रभावी ठरला आहे (मराठी चित्रपटांचे विषय आठवून पाहा! ते बहुतांशी इंटरेस्टिंग असतातच.) मात्र त्यांना चित्रपटाचं, दृश्य माध्यमाचं रूप येण्यातला भाग कमी पडतो. त्यामुळे ग्रामीण परिसरातील शॉर्टफिल्मचे विषय पाहिलेत (जरी ते सामाजिक जाणिवेने भारलेले, एकसुरी असले तरीदेखील) तर विषय चांगला मात्र निर्मिती फारशी प्रभावी नाही असं एक सर्वसामान्य चित्र नक्की दिसतं. त्याचं एक कारण म्हणजे या तरुणांना मार्गदर्शनाच्या पातळीवर पर्याय उपलब्ध नाहीत. तेथे ठिकठिकाणी होणाऱ्या दोन-तीन दिवसांच्या शॉर्टफिल्मच्या कार्यशाळेत सहभाग घेतलेल्या काही मंडळींशी बोललो, तेव्हा त्यांना 'ते एका दिवसातच शॉर्टफिल्म कशी तयार करायची याची संपूर्ण माहिती देतात' असं ठामपणे सांगितलं. मात्र थोडं अधिक खोदून पाहिलं, तर ते सारं जुजबी ज्ञान आहे असं समजलं. अकलूजचा अक्षय इंडिकर, ज्याने 'उदाहरणार्थ नेमाडी'सारखी फिल्म तयार केली, किंवा फलटणचा अमोल देशमुख (राष्ट्रीय पुरस्कार विजेती शॉर्टफिल्म - 'औषध'), अकोल्याचा विक्रांत बदरखे (द ड्रेनेज), बार्शीचा अमर देवकर (म्होरक्या) अशी कित्येक मंडळी वेगळया तऱ्हेने विषय घेऊन शॉर्टफिल्म तयार करताना दिसतात. (मात्र अशा मंडळींची संख्या तुरळक आहे.) या तरुणांच्या प्रवासाकडे पाहिलं, तर यातील जवळपास प्रत्येकाला फिल्म या विषयाची व्यवस्थित ओळख झाली असल्याचं लक्षात येतं. ही मंडळी पुण्या-मुंबईत शिकलेली आहेत. काहींनी सातत्याने उत्तम चित्रपट पाहिले आहेत. काहींनी चित्रपट निर्मितीचं शिक्षण घेतलं आहे, तर काहींनी त्या क्षेत्रात थोडंफार कामदेखील केलं आहे. त्या एक्स्पोजरच्या आधारे ही मंडळी चांगल्या शॉर्टफिल्म तयार करू शकली आहेत. मात्र ग्रामीण भागातील बहुसंख्य तरुण एकदिवसीय कार्यशाळेच्या किंवा यूटयूबच्या माध्यमातून स्वशिक्षण असे मार्ग अनुसरून शॉर्टफिल्म तयार करतात. त्यात उत्साह मोठा असला, तरी आकलन कमी आहे. आणि आताच्या ग्रामीण शॉर्टफिल्ममेकर्सना सर्वाधिक आवश्यकता आहे ती या माध्यमाचं व्यवस्थित आकलन करून घेण्याची!

आपल्या देशापुरतं बोलायचं झालं, तर शॉर्टफिल्म हे अजूनही आपल्या प्रेक्षकांसाठी आणि चित्रपटकर्त्यांसाठी नवं माध्यम आहे. त्यातली प्रगती समाधानकारक वाटत असली, तरी अद्याप खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. हे यासाठी, कारण या क्षेत्रात अद्याप कितीतरी प्रयत्न व्हायचे आहेत. शॉर्टफिल्म तयार करण्यासाठी धडपडणाऱ्या मंडळींना काही नवे चित्रप्रकार हाताळून पाहायचे आहेत. पैसा, धारणा, समज अशा काही गोष्टींचे उंबरे ओलांडायचे आहेत. त्या समस्त माध्यमाची आर्थिक मिळकतीची घडी बसायची आहे. आज शॉर्टफिल्म पाहणारा आणि तयार करणारा असे दोन्ही घटक उत्साही दिसत असले, तरी त्यांच्यामध्ये त्या माध्यमाची समज येणं अत्यावश्यक आहे. अनुराग कश्यप म्हणतो की ''शॉर्टफिल्म भारतीय चित्रपटाच्या वाटचालीची दिशा ठरवत आहेत.'' (लक्षात घ्या, ठरवतील असं म्हटलेलं नाही हां!) हे माध्यम चित्रपटाइतकंच सशक्त आणि कदाचित चित्रपटातेक्षाही अधिक सहजतेने लोकांपर्यंत पोहोचणारं आहे. आपली तरुण पिढी, आपले इतर कलावंत आताशी कुठे या माध्यमाचा वेध घेऊ लागले आहेत. त्या माध्यमाची बलस्थानं आणि छुप्या क्षमता येणाऱ्या काळात अधिकाधिक स्पष्ट होत जाणाऱ्या आहेत. म्हणूनच म्हणतो, की ही केवळ सुरुवात आहे. There is more to come.

9029557767

[email protected]