'दुसरी मेरी कोम होणे नाही'

 विवेक मराठी  01-Dec-2018


35व्या वर्षी मेरी कोमकडे 6 जगज्जेतेपदं आहेत, ऑॅलिम्पिक कास्यपदक आहे, आशियाई खेळांमध्ये जिंकलेलं सुवर्ण आहे, राष्ट्रकुल सुवर्ण आहे, जोडीला राज्यसभेची खासदार म्हणून मणिपूरचे प्रश्न सरकारसमोर आणि लोकांसमोर मांडण्याची जबाबदारी (तिने स्वत: उचललेली) आहे. मेरी फोकस्ड आहे आणि शिवाय मणिपूर या आपल्या छोटयाशा राज्याला समर्पित आहे. बॉक्सिंग रिंगच्या बाहेरही नजरेत भरतात त्या तिच्या चपळ हालचाली आणि चेहऱ्यावरचे शांत, तेवढेच फोकस्ड भाव. मेरीची खासियत ही की रिंगच्या आतही ती अशीच असते. मेरीचं बॉक्सिंग कंटाळवाणं तर नाहीच, उलट रोमांचकारक आणि प्रेरणादायक आहे.

मागच्या शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या बॉक्सिंग विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने विक्रमी सहाव्यांदा जगज्जेतेपद पटकावलं, त्यानंतर स्वत: मेरी कोमचे हे उद्गार आहेत. यात कसलाही आविर्भाव नव्हता. तिचं ते प्रांजळ, पण खरं मत होतं. मेरीचा स्वभावही तसाच आहे - प्रांजळ आणि खरा.

आज 35व्या वर्षी मेरी कोमकडे 6 जगज्जेतेपदं आहेत, ऑॅलिम्पिक कास्यपदक आहे, आशियाई खेळांमध्ये जिंकलेलं सुवर्ण आहे, राष्ट्रकुल सुवर्ण आहे, जोडीला राज्यसभेची खासदार म्हणून मणिपूरचे प्रश्न सरकारसमोर आणि लोकांसमोर मांडण्याची जबाबदारी (तिने स्वत: उचललेली) आहे. आणि हे सगळं कमावण्यासाठी घेतलेल्या कष्टांची कल्पना असल्यामुळेच मेरीने हे वक्तव्य केलं असावं.

मेरीचं वजन जेमतेम 48 किलो आहे. उंची 5 फूट 2 इंच. वजनाला शोभेल अशी बेतास बात चण आहे. चेहऱ्यावर कायम एक मनमोकळं पण जिज्ञासू हास्य असतं. जगज्जेत्या खेळाडूला साजेल असं हे वर्णन नाहीच आहे मुळी. जगज्जेता कसा करारी हवा. त्याच्या देहयष्टीत जरब आणि नजरेत विजयाचा उन्माद हवा. शेवटी आपण बॉक्सिंगमधल्या जगज्जेत्याबद्दल बोलतोय! यातलं काही मेरीकडे नाही. पण बॉक्सिंग रिंगच्या बाहेरही नजरेत भरतात त्या तिच्या चपळ हालचाली आणि चेहऱ्यावरचे शांत, तेवढेच फोकस्ड भाव. मेरीची खासियत ही की रिंगच्या आतही ती अशीच असते.

रिंगच्या आत आणि बाहेर एका ठरावीक वेळेपर्यंत तुमचे कोच, सपोर्ट टीम आणि कुटुंबीय तुमच्या मदतीला असतात. पुढची 9 मिनिटांची लढाई तुम्हाला एकटयालाच लढायची असते, असं मेरी वारंवार स्वत:ला बजावत असते. म्हणूनच स्वत:वर आणि खेळावर ती अविश्रांत मेहनत घेते. जिंकण्यासाठी शरीराला आणि मनाला घडवते आणि नवनवीन तंत्रं हुशारीने आत्मसात करते. स्वत:च्या कच्च्या दुव्यांचा आणि प्रतिसर््पध्याच्या ताकदीचा अभ्यास करते आणि आपल्या खेळात त्याचा स्मार्ट वापर करते.

नुकत्याच दिल्लीत जिंकलेल्या जगज्जेतेपदानंतर मेरीनेच आपला फिटनेस आणि बॉक्सिंग मंत्र सांगितला. 'प्रत्यक्ष बॉक्सिंगचा फक्त 2 तासांचा सरावही पुरेसा आहे. पण त्यात शिस्त हवी' असं मेरीचं म्हणणं आहे. फिटनेस आणि डाएटच्या बाबतीतही ती भरपूर नियम घालून घेण्यापेक्षा संतुलित राहण्यावर भर देते. घरचं मणिपुरी जेवण तिला आवडतं. भात, भाज्या आणि त्याच्याबरोबर शिजलेलं मांस असा आहार ती घेते. आणि त्याचबरोबर आवडत्या आइसक्रीमवरही जमेल तसा ताव मारते.

तिच्या सरावाच्या दिनचर्येत कुठलाही अघोरी प्रकार नाही. स्मार्टनेस मात्र पुरेपूर आहे. 35व्या वर्षी जगज्जेतेपद जिंकण्यासाठी तो हवाच, असा मेरीचा विश्वास आहे. आपण शारीरिक मेहनत सुरुवातीपासूनच घेतो. पण वयाच्या या वळणावर शारीरिक श्रमानंतर पुन्हा पूर्ववत व्हायला शरीर वेळ घेतं. थोडक्यात, थकवा जास्त वेळ जाणवतो. म्हणून मग खेळाच्या शैलीत बदल करायला हवेत. मेरीने ते बदल केले. 2012पर्यंतची मेरी आणि अलीकडच्या दोन वर्षांतली मेरी यांच्या शैलीत एक मोठा बदल आहे. पूर्वी रेफरीने शीळ वाजवताच ठोशांवर ठोसे लगावणारी मेरी आपल्याला दिसायची. आताच्या मेरीला अनुभवाने शिकवलंय की सतत आक्रमण करण्याची गरज नाही. प्रतिसर््पध्याला जोखत योग्य वेळी वार करण्याचं कसब तिला साधलंय.

मेरीच्याच शब्दात सांगायचं, तर ''2001मध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली, तेव्हा कौशल्यापेक्षा ताकद आणि स्टॅमिना यावर माझा भरवसा होता. आता मी अनुभवाच्या जोरावर खेळते. उगीच स्वत:ला दमवत नाही. जास्त मार न खाता जिंकण्याचा माझा प्रयत्न असतो. यंदाच्या स्पर्धेत तो यशस्वी झाला.''

स्पर्धांची निवडही ती हुशारीने करते. 2016च्या रिओ ऑॅलिम्पिकसाठी ती पात्र होऊ शकली नव्हती. हरवलेला फॉर्म आणि वाढतं वय यामुळे मीडियाने 'मेरी आता निवृत्त होणार का?' असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. या टीकेचं आणि सततच्या चर्चेचं दडपण नक्कीच होतं. पण त्यातून पुन्हा फोकस्ड राहण्याचा धडा ती नव्याने शिकली आणि खेळाच्या शैलीत बदल करण्याचंही तिने तेव्हाच ठरवलं.

ऑॅलिम्पिक, आशियाई क्रीडास्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धा प्रतिष्ठेच्या आहेत. पण त्यात महिला बॉक्सिंगमध्ये 48 किलो वजनी गटाचा समावेश नाही. मेरीसाठी उपलब्ध पर्याय आहे तो 51 किलोंचा. त्यामुळे मेरीसमोर आव्हान असतं ते वजनाने, शरीराने आणि ताकदीने वरचढ असलेल्या बॉक्सरशी दोन हात करण्याचं. कझाकिस्तान आणि इतर युरोपीय देशातल्या बॉक्सर्सशी स्पर्धा करणं नक्कीच सोपं नाही आहे. शिवाय वजन कृत्रीमरित्या वाढवण्यासाठी करायच्या तांत्रिक गोष्टी. 2018च्या एप्रिलमध्ये तिने राष्ट्रकुल सुवर्ण जिंकलं ते 51 किलो गटात. आणि पाठोपाठ दोन महिन्यांनी आशियाई स्पर्धाही होणार होत्या. पण स्मार्ट मेरीने जगज्जेतेपद हे उद्दिष्ट ठेवलं आणि त्यासाठी आशियाई स्पर्धा ती खेळली नाही. आता मिळालेल्या सुवर्णपदकाने तिचा हा निर्णय योग्य ठरवला आहे.

''दोन्ही स्पर्धा वेगळया आहेत. शिवाय वर्षभरात सारखं 48 आणि 51 अशा दोन गटांत आत-बाहेर करणं सोपं नाही. शेवटी मी माणूस आहे. माझ्यावर याचा परिणाम होतो. 51 किलो गटात बॉक्सर माझ्यापेक्षा उंचीने मोठया असतात. त्यांना आक्रमण करताना त्याचा नैसर्गिक फायदा मिळतो. मला दोन्ही स्पर्धांची वेगळी तयारी करावी लागते.'' ज्यांना बॉक्सिंग खेळ किती आव्हानात्मक आहे याची कल्पना आहे, त्यांना मेरीचं म्हणणं नेमकं कळेल.

2018मध्ये विजेतेपद पटकावल्यावर मेरी कोमला आनंदाश्रू आवरले नाहीत. तिने भावनांना वाट मोकळी करून दिली. घरच्या प्रेक्षकांसमोर जिंकल्याचा हा आनंद होता का? की सहाव्या विक्रमी सुवर्णपदकाने तिला भावुक बनवलं होतं? कारण, 10 स्पर्धांमध्ये 6 सुवर्ण जिंकून मेरी आता सगळयात यशस्वी हौशी बॉक्सर बनली आहे. अंतिम सामन्यानंतर भावुक झालेली मेरी आता सावरलीय. पण तिचे डोळे आताही बोलतात. ''2006मध्ये मी दिल्लीत सुवर्ण जिंकलंय. तेव्हा मीही नवखी होते आणि खेळही देशात फारसा चर्चेत नव्हता. पण आता स्पर्धेची एवढी जाहिरात झाली होती. मला बघायला स्टेडिअममध्ये गर्दी झाली होती. माझ्याकडून त्यांना अपेक्षा होत्या. अंतिम सामन्यात माझ्यावर या सगळयाचा परिणाम झाला. मी स्वत:ला थांबवू शकले नाही.'' मेरीने मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं.

चांगला खेळाडू कधी पराभवाची कारणं देत नाही. पण 2016च्या रिओ ऑॅलिम्पिकसाठी पात्र न होणं मेरीला झोंबलं होतं. तिने निवृत्त व्हावं का अशी चर्चाही तिला नको होती. त्यामुळे पुढची दोन वर्षं तिच्यासाठी आव्हानात्मक होती. मोठया स्पर्धा तिला पुन्हा जिंकायच्या होत्या. जगज्जेत्या खेळाडूंना आव्हानं आवडतात आणि आताही तिला टोकियो ऑॅलिम्पिकचं आव्हान खुणावतंय. 2020मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पुन्हा एकदा तिला 51 किलो गटात खेळावं लागेल. त्यासाठी 2019च्या काही पात्रता स्पर्धांवर आता मेरी लक्ष केंद्रित करणार आहे. प्रेक्षक आणि खेळाचे फॅन म्हणून मेरीचं खेळत राहणं आपल्यालाही सुखावणारं आहे. कारण मेरीचं बॉक्सिंग कंटाळवाणं तर नाहीच, उलट रोमांचकारक आणि प्रेरणादायक आहे.

मेरी फोकस्ड आहे आणि शिवाय मणिपूर या आपल्या छोटयाशा राज्याला समर्पित आहे. 2016मध्ये राष्ट्रपतींनी राज्यसभेच्या खासदारपदासाठी तिला नामनिर्देशित केलं, तेव्हापासून ती मणिपूरच्या प्रश्नांच्या बाबतीत सजग झाली आहे. ती भारतात असताना तिने राज्यसभेचं एकही अधिवेशन चुकवलेलं नाही आणि अधिवेशनाच्या वेळाही पाळल्या आहेत. दिल्लीतल्या हुमायून रस्त्यावरच्या तिच्या सरकारी निवासस्थानात ती आपल्या लोकांच्या भेटीही नियमितपणे घेते.

दुसरीकडे वयाबरोबरच आपला अनुभव इतरांमध्ये वाटण्याची ऊर्मीही मेरीला आहे. म्हणूनच मणिपूर सरकारने दिलेल्या 3 एकर जागेवर तिने बॉक्सिंग आणि फिटनेस संकुल उभं केलं आहे, तिथे तिला खासकरून उगवत्या महिला बॉक्सर्सवर मेहनत घ्यायची आहे. मेरीच्या मूळ गावाच्या पायथ्याशी हे संकुल आहे. आताही 40 ते 45 बॉक्सर्स तिथे प्रशिक्षण घेत आहेत. तिला स्वत:ला कोचिंग करायचं आहे. पण आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपल्यावरच ती त्यात पडणार आहे. एका वेळी एकच गोष्ट, पण ती झोकून देऊन करायला तिला आवडतं. जगज्जेत्या मेरी कोमच्या पुढच्या प्रवासासाठी आपणही तिला शुभेच्छा देऊ या.