हुंकार राष्ट्रीय अस्मितेचा

 विवेक मराठी  01-Dec-2018

6 डिसेंबर 1992ला परदास्याचे बर्बर प्रतीक असणारा बाबरी ढाचा भुईसपाट झाला. श्रीरामजन्मभूमी मुक्त झाली. ते केवळ एका इमारतीचे पडणे नव्हते. ती एक युगप्रवर्तक घटना होती. निद्रिस्त राष्ट्रपुरुषाला आलेली ती जाग होती. तो हुंकार म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचा पांचजन्य होता. राष्ट्रीय स्वाभिमानाची ती गर्जना होती. लाखो हिंदूंनी आपल्या स्वजीवनाची समिधा अर्पण करून प्रज्वलित ठेवलेल्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या यज्ञाची पूर्णाहुती भव्य मंदिर निर्मितीने करण्यास केंद्र सरकारने आता पुढे यावे, हाच या हुंकार सभांचा संदेश आहे.

न जन के मनमे राम रमे, हर प्राण प्राण मे सीता है।

कंकर कंकर शंकर इसका, हर सांस सांस मे गीता है।

जीवन की धडकन रामायण,  पग पग पर बनी पूनिता है।

यदी राम नही है सासो मे, तो प्राणो का घट रीता है।

नरनाहर श्री पुरुषोत्तमका, हम मंदिर वही बनायेंगे।

सौगंध राम की खाते है, हम मंदिर भव्य बनायेंगे॥

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात लाखो कारसेवकांच्या अंत:करणात संघर्षाचा, विजिगीषुतेचा प्राण फुंकणाऱ्या या गीताचा हुंकार पुन्हा एकदा नागपूरच्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या आसमंतात निनादत होता. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून स्वयंस्फूर्तीने तिथे जमलेल्या विराट जनसमुदायाच्या अंत:करणात या ऐतिहासिक आंदोलनाच्या अनेक स्मृती या हुंकार सभेच्या निमित्ताने उचंबळून येत होत्या.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचा पांचजन्य फुंकणारी दिल्लीच्या विज्ञान भवनातील पाहिली धर्मसंसद.. त्यानंतर देशातील प्रत्येक गावात झालेले ऐतिहासिक श्रीरामशिलापूजन.. दिवाळीला प्रत्येक घरात प्रज्वलित झालेल्या श्रीरामज्योती.. राममय झालेले राष्ट्र.. एका दलित बंधूंच्या हस्ते झालेला मंदिर निर्माण कार्याचा - नव्हे, सामाजिक समरसतेचा शिलान्यास.. त्यानंतर कारसेवेसाठी झालेले अभूतपूर्व जनआंदोलन.. मुलायम सरकारची पाशवी बर्बरता.. 2 नोव्हेंबर 1990ला कोठारी बंधूंसह शेकडो कारसेवकांचे घडलेले बलिदान.. 6 डिसेंबर 1992ला गीता प्रबोधन एकादशीला वर्षानुवर्षांच्या मुस्लीम अनुयायांच्या घृणित राजकारणाविरोधात हिंदू समाजाचा उफाणलेला उद्रेक... त्या उत्स्फूर्त आणि अद्भुत पौरुष प्रकटनातून झालेला बाबरी ढाच्याचा, परदास्याच्या कलंकाचा कायमचा विध्वंस.. आणि त्यानंतर केलेली न्यायालयीन निर्णयाची तब्बल सत्तावीस वर्षांची मौन प्रतीक्षा!

सभेतील प्रत्येकाच्या मनश्चक्षूंसमोर रामजन्मभूमी आंदोलनाचा हा धगधगता इतिहास पुन्हा जिवंत होत होता. त्या वेळी या आंदोलनाच्या विविध टप्प्यांवर सामील झालेली मंडळी सभेपूर्वी आणि नंतर त्या आंदोलनातील चित्तथरारक आठवणींमध्ये रंगून गेली होती. नवतरुणांना त्या आठवणी सांगत होती. ते मंतरलेले दिवस पुन्हा एकदा या सभेत सजीव झाले होते. नव्या संघर्षाची प्रेरणा आणि उमेद देत होते. 'रामलला हम आयेंगे' या मंचावरील घोषणेला गगनभेदी आवाजात आवेगाने वज्रनिर्धारी प्रतिसाद मिळत होता 'मंदिर भव्य बनायेंगे'! मात्र या वज्रनिर्धाराबरोबरच या सभेतील प्रत्येक प्रक्षुब्ध रामभक्ताच्या मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न होता - हिंदू माणसाने आणखी किती दिवस अशीच प्रतीक्षा करायची?

अयोध्या, नागपूर आणि बंगळुरूमधील 25 नोव्हेंबरच्या ऐतिहासिक सभांमधून प्रगटलेला हा हुंकार म्हणजे एका निर्णायक लढाईचा शंखनाद होता. या सभांमध्ये आलेली माणसे एका उत्कट स्फूर्तीने एकत्र आलेली होती. नागपूरचे सारे रस्ते रामभक्तांनी फुलून गेले होते. रामजन्मभूमी आंदोलन आता गतार्थ झाले आहे, असे म्हणणाऱ्यांना ही प्रचंड सभा एक सणसणीत चपराक होती. आमच्या अंतर्मनातील सल आमच्या अंगभूत सहिष्णुतेमुळे सहन करीत असलो, तरी ती आजही आमच्या मनाला तीव्र वेदना देते आहे. मनामनातील भावनांचा हा कल्लोळ गगनभेदी घोषणातून आपला अस्वस्थ स्वर व्यक्त करीत होता. त्यात रामजन्मभूमी आंदोलनात हयात घालवलेली वयस्क, वृध्द मंडळी होती, तशीच ऐन विशीच्या उंबरठयावरील तरुण तुर्कही होते. देवभोळी भाविक मंडळी होती, तशीच प्रत्येक प्रश्नाचे तर्काने उत्तर मागणारी उच्चविद्याविभूषित मंडळीही त्यात होती. कष्टकरी कामकरी बंधू त्यात होते, तसेच ज्यांचे पूर्ण आयुष्यच डिजिटल टेक्नॉलॉजीने भारून गेले आहे अशी अत्याधुनिक जीवनशैलीची मंडळीही होती. साऱ्या जाती-पंथ-संप्रदायाची, सर्व स्तरांची हिंदू शक्ती आपल्या रामललासाठी निर्णायक शंखनाद करायला या सभेत एकत्र आली होती.

कुठलाही शंखनाद हा मंगलकारकच असतो. आसमंतातील अशुभाची, आपदांची वायुमंडले नष्ट करून शुभंकराचे, विजयाचे अवगाहन करण्याची अद्भुत शक्ती त्यात असते. हिंदू माणसाचा हा हुंकारही शुभंकरासाठीच होता. श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण हेच ते शुभंकर. जन्मभूमीवरील भव्य आणि वैभवशाली राममंदिर हे केवळ एक मंदिर नाही; या राष्ट्राचा कारक असलेल्या हिंदू समाजात सामर्थ्य, एकात्मता आणि समरसता निर्माण करणारे ते शुभंकर आहे. हिंदू समाजात राष्ट्रीय चेतना पालविण्याची, जात-पात-प्रांत-भाषा या सगळया भेदांवर मात करून एकराष्ट्रीयत्वाचा अलख जागविण्याची अलौकिक क्षमता 'श्रीराम' या तीन अक्षरी मंत्रात सामावली आहे. श्रीराम हे केवळ हिंदू समाजाच्या श्रध्देचा, आस्थेचाच तेवढा विषय नाही. श्रीराम ही या राष्ट्राची ओळख आहे. राजकारणाचा पडदा बाजूला सारून निखळ मनाने या देशाच्या इतिहासात डोकावले, तर या सत्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.

विचाराने समाजवादी असणाऱ्या, प्रख्यात विचारवंत डॉ. राम मनोहर लोहियांना याच सत्याचा साक्षात्कार झाला. केवळ रामच नव्हे, तर राम, कृष्ण आणि शिव या तीन देवतांचा भारताच्या राष्ट्रीय जीवनाशी असणारा अनुबंध डॉ. लोहियांना अतिशय उत्कट शब्दात मांडला आहे.

नागपूरच्या हुंकार सभेतील वक्त्यांची भाषणे याच चिरंतन सत्याला पुन्हा उजाळा देत होती.

ह.भ.प. बाबूराव महाराज लंके, ज्ञानेश्वर महाराज वाघ, गुरुदेव सेवा मंडळाचे जनार्दन पंत बोथ, विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार या मान्यवरांच्या भाषणातून या आंदोलनाची ही सैध्दान्तिक भूमिका उपस्थितांच्या मनात पुन्हा एकदा पक्की होत होती.

रामजन्मभूमीचा लढा हा एका विटा-मातीच्या इमारतीसाठीचा संघर्ष नाही. या देशातील प्रत्येक नागरिकाला जीवन कसे जगावे, आदर्श जीवनमूल्य म्हणजे काय याचा वस्तुपाठ देणाऱ्या एका राष्ट्रीय आदर्शाच्या गौरवाचा तो विषय आहे. तो या देशाच्या राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. या आदर्शावर घाला घालणाऱ्या परकीय आक्रमणाचा कलंक कायमचा पुसून टाकायचा की षंढासारखा मिरवायचा, हा जळजळीत प्रश्न उपस्थित करणारा विषय आहे.

जगभरात असे परदास्याचे कलंक मिटवून टाकणारी शेकडो उदाहरणे आहेत.

असे कलंक केवळ जमिनीचे वाद नसतात. जेत्यांनी जितांचे केलेले ते मानसिक खच्चीकरण असते. एकदा असे खच्चीकरण झाले की मनातील विजयाची आकांक्षा समूळ नष्ट होऊन  परदास्याच्या शृंखलेलाच वैजयंती मानणाऱ्या पिढया पैदा होतात. या खच्चीकरणासाठीच श्रीरामजन्मभूमी असो, काशी विश्वनाथ असो की कृष्णजन्मभूमी, या साऱ्या राष्ट्रीय मानबिंदूंवर विदेशी आक्रमणकर्त्यांनी नृशंस आघात केले. श्रीरामजन्मभूमीवरील आक्रमणाचा इतिहास तर इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकातील ग्रीक सेनानी मिनांडरपासून सुरू होतो.

इसवीसन 1526मध्ये मुघल आक्रमक बाबर भारतावर चाल करून आला. भारतीय संस्कृती, मंदिरे यांची अक्षरशः धूळधाण करीत 1528मध्ये अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बाबराचा वरवंटा फिरला. इतिहासकार कनींघम याने लिहून ठेवले आहे की बाबराचा सेनापती मीर बाकी याने श्रीरामजन्मभूमीवर तोफगोळे डागून भारतीय अस्मितेचा मानभंग केला. सुमारे 15 दिवस सतत चाललेल्या या धर्मांध धुमाकुळाने अयोध्येत 1 लाख 74 हजार हिंदू साधुसंत, बैरागी आणि सामान्य नागरिक यांची कत्तल घडवली गेली. त्यानंतर तब्बल पाचशे वर्षे हिंदू समाज त्या जागेसाठी लढतो आहे. आणखी किती दिवस लढायचे? कशासाठी आणि किती याचना आता करायची? आपण ऊबदार घरांमध्ये निवास करताना आपला राष्ट्रनायक प्रभू श्रीराम मात्र गेल्या 27 वर्षांपासून अस्थायी तंबूत निवासी आहे, हे प्रत्येक हिंदूसाठी लज्जास्पद नाही का? असा घणाघाती सवाल देवनाथ पीठाचे पीठाधीश पूज्य जितेंद्रनाथ महाराज, शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी उपस्थित केला.

रामजन्मभूमीवर भव्य मंदिराच्या निर्मितीची प्रतीक्षा हिंदूंनी कुठपर्यंत करायची? कधी न्यायालयीन निर्णयाचा गुंता, तर कधी अल्पसंख्य समुदायाच्या अनुनयापोटी हिंदू जनभावना पायदळी तुडवण्याचा खेळ राजकारणी खेळत राहिले. हा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. हिंदू मानस आज प्रक्षुब्ध नाही, पण प्रज्वलंत आहे. त्याच्यावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाचा उद्रेकच 6 डिसेंबर 1992ला झाला. त्याच्या पुरुषार्थाच्या पराक़्रमी प्रकटीकरणाने शतकानुशतके राष्ट्रजीवनाला लागलेला कलंक त्याने उद्ध्वस्त केले. परदास्याचे बर्बर प्रतीक असणारा बाबरी ढाचा भुईसपाट झाला. श्रीरामजन्मभूमी मुक्त झाली. ते केवळ एका इमारतीचे पडणे नव्हते. ती एक युगप्रवर्तक घटना होती. निद्रिस्त राष्ट्रपुरुषाला आलेली ती जाग होती. तो हुंकार म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचा पांचजन्य होता. राष्ट्रीय स्वाभिमानाची ती गर्जना होती.

  हिंदू समाज कधीच एक राहू नये, तो कायम शबल, परभृत राहावा असे ज्यांना वाटत होते, त्यांना बसलेली ती चपराक होती. निद्रिस्त भारतवर्षाला आलेली आत्मजागृतीची पहाट होती. या साऱ्या ऐतिहासिक घटनाक्रमाला उजळणी देणाऱ्या आपल्या घणाघाती भाषणातून साध्वी ऋतंभरा देवींनी आता निर्णायक संघर्षासाठी सज्ज होण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

सर्वात महत्त्वाचे उद्बोधन झाले ते परम पूजनीय सरसंघचालकांचे. सध्याची एकूण राजकीय परिस्थिती, केंद्रातील भाजपा सरकारचे या विषयावरील मौन, सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकललेली अयोध्या प्रकरणाची सुनावणी, हा प्राधान्य विषय नसल्याची केलेली टिप्पणी, संतसमुदायाने दिलेला निर्वाणीचा इशारा या साऱ्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक काय बोलतात याकडे साऱ्याच भारताचे लक्ष लागले होते.

मी पाहिल्यांदा रामजन्मभूमी संदर्भातील सभेला गेलो होतो, त्याला आता 30 वर्षे पूर्ण झाली आहेत हे सुरुवातीलाच नमूद करून मोहनजींनी या अतिसंवेदनशील प्रश्नावर चाललेल्या कालापव्ययाकडे लक्ष वेधले. ''आम्ही ही मागणी करतो आहोत, कारण आम्ही स्वतंत्र आहोत आणि आमचा स्व कोणता आहे? भारताच्या 'स्व'चा आधार राम आहे. त्या रामाची जन्मभूमी अयोध्या. सोमनाथ हा स्वातंत्र्यानंतर या 'स्व'ची संस्थापना करण्याचा पहिला प्रयत्न होता. विदेशी आक़्रमक असलेल्या बाबराचे या देशाशी नाते काय? तो हिंदूंचाच नव्हे, मुसलमानांचाही शत्रू होता. नानकदेवांच्या साहित्यात त्याचे दाखले मिळतात'' असे नमूद करून मोहनजी पुढे म्हणाले,

''जे रामाला देवता मानत नाहीत तेही त्याला आदर्श पुरुष मानतात. हिंदू समाज सहिष्णू, कायद्याला मानणारा आहे. शांततेच्या मार्गाचे सर्व प्रयत्न झाले आहेत. केवळ कालापव्यय सुरू आहे. अर्ज, विनंती, द्विपक्षीय चर्चा, न्यायालय सारे प्रयत्न झाले. रज्जूभय्या सरसंघचालक असताना अविवादित जागेवर कारसेवेची अनुमती द्या अशी विनंती त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह रावना केली होती. पण निर्णय पुढे ढकलला. न्याय पुढे ढकलण्याचीच प्रतिक़ि्रया गीता प्रबोधिनी एकादशीला उमटली.

आता तर पुरातत्त्वीय संशोधनाचे सारे निष्कर्ष उपलब्ध झाले आहेत. त्याच आधारावर तिथे राम मंदिर होते हे न्यायालयानेही मान्य केले आहे. मात्र त्रिभाजनाच्या मुद्दयावर प्रकरण पुन्हा न्यायप्रविष्ट झाले. त्या निर्णयाचीही प्रदीर्घ वाट बघितली. आणखी किती बघायची? न्यायाचा निर्णयच होणार नसेल, तर जस्टिस डीलेड इज जस्टिस डिनाइड हे तरी शिकवणे बंद करा.

विषय राजकीय नाही. कोणाला सत्तेवर बसवणे वा उतरवणे यासाठीही नाही.

जर त्या स्थानी मंदिर होते असे सिध्द झाले, तर मंदिर उभारू असे अभिवचन केंद्र सरकारने मागेच दिले होते. आता ते सिध्द झाले आहे.

श्रीराम तिथेच जन्मले ही करोडो हिंदूची श्रध्दा आहे. म्हणून आता सरकारने कायदा करून मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त करावा'' असे सुस्पष्ट आवाहन करून सरसंघचालक पुढे म्हणाले की ''आज संघर्षाची गरज नाही, पण संघर्ष नाही तरी दृढनिश्चय हवाच. लडना तो नही पर अडना है। जनजागृती, दबाव उभा करावाच लागेल. कोणतेही सरकार अखेर जनभावनांपुढेच झुकते. संपूर्ण भारताला उभे करावे लागेल. 80च्या दशकापासून जे मानचित्र डोळयासमोर आहे, तसेच मंदिर हवे. त्यासाठी हनुमानाचे गुण धृती दृष्टी मती आणि दक्षम बनवण्याची गरज आहे. या आंदोलनाची दृष्टी ही राष्ट्राचे पुनर्निर्माण हीच आहे.''

या सभेचा एकूण 'नूर' श्रीरामजन्मभूमी आंदोलन आता शेवटच्या निर्णायक टप्प्यावर आले आहे हेच स्पष्ट करणारा होता. आता हिंदू अधिक प्रतीक्षा सहन करणार नाही हा इशारा देणारा होता. न्यायालयाचा वेळकाढूपणा आणि एकूणच न्यायप्रक़ि्रयेतील मर्यादा लक्षात घेता ज्या पध्दतीने सोमनाथवरील कलंक कायदा करून दूर करण्यात आला, तसेच श्रीरामजन्मभूमीबद्दल व्हायला हवे हीच सामान्य माणसाच्या मनातील इच्छा आहे, यावर या सभेतील अलोट गर्दीने शिक्कामोर्तब केले. नव्वदीच्या दशकातला मंदिर निर्माणाला असणारा विरोध आज काही मोजके इस्लामी कट्टरतावादी वगळता जवळपास मावळला आहे. त्या स्थानी पुन्हा बाबरी ढाचा उभा करा अशी मागणी करण्याची हिंमत आता कोणी करू शकणार नाही, इतकी ताकद आज हिंदुजागृतीने उभी केली आहे. 'कायदा करून राम मंदिर उभारल्यास आमचा मुळीच आक्षेप राहणार नाही' हे या प्रकरणातील मुस्लीम पक्षकार इकबाल अन्सारी यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण ताजे विधान बदलत्या मुस्लीम मानसिकतेची चुणूक दाखवणारे आहे. गेली पाचशे वर्षे हिंदू समाजाने दिलेल्या प्रदीर्घ लढयाचा तो परिणाम आहे. आता प्रतीक्षा आहे ती केंद्र सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाची. लाखो हिंदूंनी आपल्या स्वजीवनाची समिधा अर्पण करून प्रज्वलित ठेवलेल्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या यज्ञाची पूर्णाहुती भव्य मंदिर निर्मितीने करण्यास केंद्र सरकारने आता पुढे यावे, हाच हुंकार सभांचा संदेश आहे.

आशुतोष अडोणी

9370319789