'टू पॉइंट ओ'च्या निमित्ताने!

 विवेक मराठी  11-Dec-2018

  रजनीकांतच्या 'टू पॉईंट ओ' या चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरश: जादू केली, चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत यशस्वी ठरला, हा सिनेमा हॉलिवूडच्या तोडीचा आहे, त्याने अमुक दिवसांत तमुक कोटींचा गल्ला जमवला अशा कित्येक बातम्या-चर्चा आतापर्यंत कानावर पडून गेल्या आहेत.(चित्रपटाने बक्कळ पैसे कमावल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी नावीन्यपूर्ण असल्याचं भासवलं असलं, तरी त्यात नवलं काहीच नाही. चित्रपटात असलेली रजनीकांत नामक जिवंत आख्यायिकेची मुख्य भूमिका, आधीच्या सुपरहिट 'रोबोट' चित्रपटाचा सिक्वल, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षयकुमार याने साकारलेली खलनायकाची भूमिका आणि अपरंपार प्रमाणातला 'व्हीएफएक्स' अशी सगळी गणितं आखूनच 'टू पॉइंट ओ' तयार करण्यात आला. तो पैसे कमावणार हे गृहीतच होतं.) या साऱ्यात एक मोठी गल्लत म्हणजे तो चित्रपट हॉलीवूडच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे असा अनेक प्रेक्षकांचा समज आहे. पण मोठया प्रमाणातला व्हीएफएक्स (सोप्या भाषेत स्पेशल इफेक्ट) वापरला म्हणजे हॉलीवूडशी बरोबरी करणारा चित्रपट होतो, हे समीकरण योग्य आहे का? 'टू पॉइंट ओ' चित्रपटाच्या निमित्ताने ही थोडी मल्लिनाथी.

लापूरच्या अकलूजमधील श्रीराम थिएटर. पडद्यावर 'टू पॉइंट ओ' चित्रपट सुरू झाला. आधी रजनीकांतचं निव्वळ नाव आणि त्यानंतर दस्तुरखुद्द सुपरस्टार रजनीकांत पडद्यावर येताच प्रेक्षकांमध्ये कल्ला सुरू झाला. (गावातल्या थेटरांमध्ये असे मास अपील असणारे चित्रपट पाहताना वेगळी मजा असते. पडद्यावर ऍमी जॅक्सन आली, तेव्हादेखील प्रेक्षकांनी तशाच सभ्यपणे तिची एन्ट्री 'ऍप्रीशिएट' केली.) आधी केलेल्या जाहिरातीप्रमाणे चित्रपटात रजनीकांत आणि व्हीएफएक्स अशा दोनच गोष्टी होत्या. मारधाडीने मस्त लगडलेला आणि व्हीएफएक्स ठासून भरलेला तो सिनेमा 'पैसा वसूल' कॅटेगरीतला आहे. ज्या अपेक्षेने प्रेक्षक तिथे जातो, तेच घेऊन माघारी येतो. (पण त्या थेटरातली माणसं नेहमीपेक्षा जरा अधिकच्या गोष्टी घेऊन माघारी आली. पडद्यावर व्हीएफएक्सची दृश्यं आली की त्यांचं मोबाईल शूटिंग सुरू व्हायचं ना!) मी बाहेर पडलो, तेव्हा हातात थ्रीडी गॉगलशिवाय काहीही नव्हतं.


रजनीकांतच्या या नव्या चित्रपटाचं 'टू पॉइंट ओ' हे नाव थोडीबहुत तांत्रिक माहिती असलेल्या, नेहमी मोबाइलचं ऍप अपडेट करणाऱ्या लोकांना चटकन कळेल. 'पॉइंट ओ' हे तंत्रज्ञानात सामान्य पातळीवर वापरले जाणारे पारिभाषिक शब्द आहेत. ते सुधारित किंवा अपग्रेडेड अशा अर्थाने शब्द वापरले जातात. आधीच्या चित्रपटात 'चिट्टी' हे रजनीकांतने सादर केलेलं रोबोटचं पात्रं या सिनेमात आधुनिक स्वरूपात अवतरणार आहे, हे ट्रेलरमधूनच स्पष्ट होतं. इथे रजनीकांतचे तीन अवतार दिसतात. रोबोटिक्सचा शास्त्रज्ञ वसिकरन, त्याने तयार केलेला 'चिट्टी' हा आर्टिफिशल इंटेलिजन्स असलेला रोबोट आणि नंतर येणारं त्याचं अपग्रेडेड स्वरूप - 'टू पॉइंट ओ'. फ्रेम्सच्या कानाकोपऱ्यात शोभेची बाहुली म्हणून नीला (ऍमी जॅक्सन) ही रोबोट अधूनमधून दिसते. चित्रपटात अक्षयकुमारने पक्षिराजन हे पात्र साकारलं आहे. मोबाइलमुळे पक्ष्यांना होणाऱ्या त्रासातून आणि पक्ष्यांविषयीच्या कणवेतून खलनायकाचं रूप धारण करतं. पक्षिराजनच्या क्रोधाचा तो मुद्दा इंटरेस्टिंग आहे, मात्र तो साउथच्या बहुसंख्य चित्रपटांप्रमाणे प्रचंड धसमुसळेपणाने लॉजिकच्या सीमारेषा तोडत समोर येतो आणि त्यातलं सत्त्व गमावून बसतो. बस्स! याउपर चित्रपटाबद्दल सांगण्यासारखं काही नाही. त्यानंतर चित्रपटभर चिट्टी-टू पॉइंट ओ आणि पक्षिराजनचं 'फिफ्थ फोर्स' स्वरूपात हलकल्लोळ माजवणारं पात्रं यांचा रणसंग्राम सुरू राहतो.

भारतीय चित्रपटांसाठी परदेशी चित्रपटांप्रमाणे मोठया प्रमाणात व्हीएफएक्स वापरणं ही गोष्ट आतापर्यंत अशक्य होती, कारण ती महागडी बाब आहे. व्हीएफएक्समध्ये थ्रीडी मॉडेल, कंपोझिटिंग, ऍनिमेशन, मॅट पेंटिंग अशा विविध तऱ्हेच्या कित्येक उपशाखा असतात. त्यात हजारो तंत्रज्ञांच्या टीम काम करत असतात. म्हणूनच मोठया प्रमाणात व्हीएफएक्स साकार करण्यासाठी प्रचंड मोठं प्लानिंग आणि तेवढंच मोठं बजेट आवश्यक असतं. 2010 साली आलेल्या 'रोबोट'ने भारतीय चित्रपटात प्रथमच मोठया प्रमाणात व्हीएफएक्स वापरला. त्यासाठी त्याचं फार कौतुक झालं. बाहुबलीने तोच कित्ता गिरवला. तरीदेखील बाहुबलीमध्ये कथेच्या सादरीकरणासाठी व्हीएफएक्सची गरज आणि तो वापरण्याच्या रचनेतला विचार किंचित जास्त होता असं म्हणू! आता 'टू पॉइंट ओ'च्या वाटयाला तेच कौतुक येतंय. मात्र रोबोटपासून आतापर्यंत आलेल्या एकाही चित्रपटाला व्हीएफएक्सच्या वापरातली सहजता प्राप्त करता आलेली नाही. परदेशातल्या मोठया सिनेमांमधील व्हीएफएक्स बेमालूम असतो. आपल्याकडे मात्र चित्रपटांमधला व्हीएफएक्स जाणवण्याइतका स्पष्ट असतो. तो व्हीएफएक्स आहे हे प्रेक्षकांना कळलंच पाहिजे, ही धारणा त्यामागे असावी असा संशय येण्याइतपत स्पष्टता त्यामध्ये असते.

व्हीएफएक्स हे तांत्रिक काम. मात्र त्यामागे विचार असला तरच त्या कामाला अर्थपूर्णता किंवा परिणामकारकता येते. 'इनसाइड आउट' (2015) हा लहान मुलांसाठी म्हणावा असा थ्रीडी ऍनिमेशन (कॉम्प्युटर ग्राफिक्सने तयार केलेला) सिनेमा. मात्र त्याला मानसशास्त्रीय बैठक होती. माणसाच्या मनातील दु:ख त्याच्या प्रगतीसाठी कसं आवश्यक असतं, या महत्त्वाच्या मुद्दयावर तो सिनेमा आधारलेला होता. सिनेमाची कथा एका लहान मुलीच्या मनात घडते. त्यात मनातल्या वेगवेगळया भावना, त्यांचं आतलं जग तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच साकार केलं होतं. तिथे तंत्रज्ञान केवळ कथेच्या सादरीकरणासाठी नव्हतं, तर कथेला सिनेमाच्या पातळीवर उंचावतदेखील होतं. लेखकाच्या कथेचा तंत्रज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींनी केलेला सखोल विचार तिथे दिसून येतो. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. 'अनकॅनी' (2015), 2001 स्पेस ओडीसी (1968), इंटरस्टेलर (2014), कॉन्टॅक्ट (1997), हर (2013), प्रोमेथिअस (2012) अशा विविध सिनेमांमधला व्हीएफएक्स हा कथेच्या गरजेच्या पुढे पाऊल टाकत त्याला अर्थपूर्णता प्राप्त करून देताना दिसतो. 2008 साली आलेला 'टाइमक्राइम्स' हा उत्तम सिनेमा वैशिष्टयपूर्ण म्हणून सांगता येईल. मानवी प्रवृत्तीबाबत मूलभूत पातळीवर भाष्य करणारा तो सिनेमा टाइमट्रॅव्हल या संकल्पनेचा आधार घेतो. मात्र सिनेमात कुठेही व्हीएफएक्स वापरलं गेलं नाही. कल्पकता असेल तर गोष्टी कशाही घडवता येतात, याचं हे छान उदाहरण आहे. 'इंटरस्टेलर'बाबत सांगायचं म्हणजे त्या सिनेमामध्ये ब्लॅक होल (कृष्णविवर) पडद्यावर अवतरतं. आतापर्यंतच्या सिनेमांमध्ये ब्लॅक होल दिसले आहेत, ते सारे साधारणपणे एकाच साच्यातील होते. मात्र इंटरस्टेलरचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनने ते ब्लॅक होल तयार करण्यासाठी कीप थोर्न या फिजिसिस्टला पाचारण केलं. नोलनने थोर्नच्या फिजिक्सची समीकरणं आणि नियम याप्रमाणे ब्लॅक होल डिझाइन करू शकेल अशा सॉफ्टवेअरची निर्मिती केली आणि आतापर्यंत कधीही न दिसलेलं असं प्रत्यक्ष गणिताच्या जवळ जाणारं ब्लॅक होल पडद्यावर आलं. त्याच कीप थोर्नला पुढे जाऊन ग्रॅव्हिटेशनल फिजिक्स आणि ऍस्ट्रोफिजिक्समध्ये त्याने केलेल्या कामगिरीबद्दल 2017 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. तांत्रिक म्हणवल्या जाणाऱ्या व्हीएफएक्सच्या क्षेत्रातदेखील लोक अशी जीव ओतून कामं करतात. त्यामुळेच त्यातून साकार होणारी गोष्ट मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कलाकृतीच्या पातळीवर पोहोचते. आपल्याकडे हे असं किती घडतं?

व्हीएफएक्सच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना तंत्रज्ञ म्हटलं जातं. मला मात्र त्यांना कलाकाराचा दर्जा दिला जावा असं फार वाटतं. मॅट पेंटिंग तयार करणारी मंडळी, थ्रीडी मॉडेलच्या चेहऱ्यावर हावभाव निर्माण करणारी माणसं मला चित्रकारासारखी-शिल्पकारासारखी भासतात. ते सारं त्यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे नव्हे, तर त्या कामामागच्या त्यांच्या विचारामुळे. आपल्याकडे बालिश पध्दतीने व्हीएफएक्स वापरले जातात आणि त्याची तुलना थेट परदेशी सिनेमांशी केली जाते, तो प्रकार 'पी हळद आणि हो गोरी' यातला वाटतो. आपण जे तंत्रज्ञान व्हीएफएक्सच्या नावाखाली वापरत आहोत, ते अद्याप विचाराच्या आणि कसोशीच्या अभावामुळे कोरडं आहे. त्यास योग्य विचार किंवा दृष्टीकोन जेव्हा लाभेल, तेव्हा आपण चित्रपटातल्या दृश्यांचा नव्हे, तर त्यामागच्या खऱ्या कलाकारांचा उदोउदो करू. शेवटी चित्रापेक्षा चित्रकाराचं कौतुक करणंच योग्य. आपल्याकडे तसा चित्रकार अद्याप समोर यायचा आहे. तोपर्यंत पॉपकॉर्न चावत 'टू पॉइंट ओ' आणि त्याच्या पुढच्या व्हर्जन्स पाहू या!

[email protected]

किरण क्षीरसागर

9029557767