चीनमधील सांस्कृतिक दुवे

 विवेक मराठी  17-Dec-2018

चीन हा आपला शेजारी देश आहे. चीनचा पहिला उल्लेख रामायणात व महाभारतात येतो. या देशाशी प्राचीन काळापासून आपले सहसंबंध राहिले आहेत. ते संबंध कसे होते. यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

India conquered and dominated China culturally for 20 centuries without ever having to send a single soldier across her border. - Hu Shih, former Ambassador of China to USA.

भारताने सीमेपलीकडे एकही सैनिक न पाठवता, चीनवर वीस शतके सांस्कृतिक वर्चस्व गाजवले. - हू शीह, चीनचे अमेरिकेतील राजदूत.

नचा पहिला उल्लेख रामायणात व महाभारतात येतो. श्रीकृष्ण शिष्टाई प्रसंगी कृष्णाला 'चीनांशुक' हे वस्त्र देऊन त्याचा सत्कार केला, असा महाभारताच्या उद्योग पर्वात उल्लेख आला आहे. चीनांशुक म्हणजे चीनचे प्रसिध्द सिल्क! इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापासून रेशमी वस्त्र चीनमधून भारतात सररास आयात होत असे. इ.स. पूर्व पहिल्या शतकात 'वू ती' राजाच्या कारकिर्दीत रेशीम मार्गाने चीन-भारत-पर्शिया-इजिप्त-रोम असा व्यापार सुरू झाला. हा व्यापारी मार्ग जवळजवळ 14व्या शतकातील मिंग घराण्यापर्यंत चालू राहिला. त्यानंतर या मार्गाने झालेली इस्लामी आक्रमणे, बळजबरी धर्मांतरण, वातावरणातील बदल, रेशीम मार्गावरील दुष्काळी परिस्थिती इत्यादी कारणांनी हा व्यापार संपुष्टात आला.

व्यापारानिमित्त रेशीम मार्गाने व्यापाऱ्यांचे तांडे येत-जात असत. त्याबरोबर संस्कृती, चालीरिती, धर्म, भाषा, कला, तंत्रज्ञान यांचीदेखील देवघेव झाली. भारतातून अनेक पंडित, बौध्द भिक्षू, धर्म, ग्रंथ, साहित्य चीनमध्ये पोहोचले, तर चीनमधून अनेक बौध्द यात्रेकरू, रेशीम, कागद, फटाके आदी भारतात आले. 

इ.स. पहिल्या शतकात 'मिंग ती' राजाला स्वप्नात सुवर्णप्रकाशात एका महापुरुषाचे दर्शन झाले. पण ती व्यक्ती कोण हे त्या राजाला कळेना. त्याने पंडितांना विचारून ती व्यक्ती म्हणजे गौतम बुध्द असावी असे ताडले. बुध्दाची अधिक माहिती करून घेण्याकरिता त्याने भारतातून बौध्द भिक्षूंना पाचारण केले. त्या वेळी गांधार प्रांतातून महायान पंथाचे काही भिक्षू चीनला गेले. त्यानंतर काश्यप मातंग, धर्मरत्न, कुमारजीव, बुध्दयशस अशा अनेक भारतीय भिक्षूंनी चीनमध्ये राहून शेकडो बौध्द ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले.

चौथ्या शतकापर्यंत बौध्द धर्म चीनमध्ये स्थिरावला होता. चीनमधील बौध्दांना भारताविषयी, बुध्दाच्या भूमीविषयी प्रचंड आकर्षण होते. बुध्दाच्या ओढीने अतिशय खडतर प्रवास करून अनेक चिनी प्रवासी भारतात आले. त्यांनी भारतातील बौध्द स्थळांना भेटी दिल्या. संस्कृत शिकले आणि परत जाताना शेकडो ग्रंथ घेऊन गेले. यापैकी प्रसिध्द प्रवासी आहेत फाहियान, शुआनझांग व इत्सिंग. यांनी आपल्या यात्रेबद्दल तपशीलवार माहिती लिहून ठेवली, जी आज भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे स्रोत आहेत.  

सातव्या शतकापासून चीनमध्ये भारतीय राजदूतांचा व व्यापाऱ्यांचा उल्लेख मिळतो. सातव्या शतकातील चिनी सम्राट आपल्या राजाज्ञेत म्हणतो - उत्तर भारतातून व दक्षिण भारतातून आलेल्या दूतांची 6 महिने राहण्याची सोय करावी. अकराव्या शतकात चोल राजाचे राजदूत चीनमध्ये नेमले जात असल्याचे कळते. पल्लव राजा नरसिंहवर्मन याने तामिळनाडूमध्ये आलेल्या चिनी व्यापाऱ्यांसाठी मंदिर बांधले होते, तर तामिळनाडूमधील शैव व वैष्णव हिंदू व्यापाऱ्यांनी चीनमध्ये मंदिरे बांधली होती. त्या मंदिरांचे काही अवशेष पाहायला मिळतात. Quanzhou येथे तीन शिव मंदिरे मिळाली आहेत. विष्णूची 3 फूट उंच एक मूर्ती मिळाली आहे.

भारतातील बौध्द गुंफांप्रमाणे चीनमध्ये अनेक बौध्द गुंफा पाहायला मिळतात. तिसऱ्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत चीनमध्ये गुंफा कोरल्या गेल्या. Dunhuang येथील Mogao Caves, Datong येथील Yungang Grottoes, Luoyang  Longmenमधील Grottoes and Tianshui येथील Maijishan Grottoes या सर्व बौध्द गुहा युनेस्कोच्या World Heritage Sites आहेत.

गान्सू प्रांतातील Dun Huang येथे Caves of Thousand Buddha कोरल्या आहेत. अनेक गुहा पुरात वाहून गेल्या असून, इथे आता जवळपास 500 बौध्द गुहा आहेत. या गुहांमधून बुध्दाच्या जीवनावर आधारित 2000हून अधिक चित्रे आहेत. 

बौध्द गुहांबरोबरच बुध्दाच्या अनेक मूर्ती चीनमध्ये कोरल्या गेल्या. आठव्या शतकातील Leshan Giant Buddhaची मूर्ती 233 फूट उंच आहे. आसनस्थ मैत्रेयाची ही मूर्ती दोन नद्यांच्या संगमावर पर्वतावर कोरली आहे. या मूर्तीच्या भोवती लहान लहान गुहा असून पर्वतातून प्रदक्षिणा मार्ग आहे.

2001मध्ये अफगाणिस्तानमधील बामियान बुध्दाच्या मूर्ती फोडल्या गेल्या, त्याच वर्षी चीनने सर्वात उंच बुध्द मूर्ती तयार करायचा संकल्प जाहीर केला. Spring Temple Buddha ही 420 फूट उंच बुध्द मूर्ती लुशान येथे बांधली. 

बौध्द धर्माबरोबर संस्कृत भाषेचा व व्याकरणाचा चिनी भाषेवर परिणाम झाला. चिनी भाषेने काही संस्कृत शब्द आत्मसात केले, तसेच हिंदू देवदेवता - मुख्यत: सरस्वती, रामायण, हरिवंश, योग, ध्यान पध्दती यादेखील चीनमध्ये पोहोचल्या. त्याबद्दल पुढे पाहू.

संदर्भ -

  1. The Influence of Buddhist Sanskrit on Chinese - Xiangdong Shi
  2. EMERGENCE OF PALI CANONICAL AND NON-CANONICAL LITERATURE AND BUDDHIST SANSKRIT LITERATURE IN GENERAL.
  3. Top 10 Buddhist Grottoes & Caves in China - Discover China