आबा अभ्यंकर - पुणे संघपरिवाराचा महान विस्तारक

 विवेक मराठी  17-Dec-2018

ज्येष्ठ संघप्रचारक आबा अभ्यंकर यांचे 12 नोव्हेंबर 2018 रोजी निधन झाले. आबांनी मोतीबाग कार्यालयाचे कार्यालयप्रमुख म्हणून दीर्घकाळ काम केले. प्रचारक म्हणून असंख्य स्वयंसेवकांशी हृदयापासून नाते निर्माण करणाऱ्या आबांविषयी काही स्वयंसेवकांची, कार्यकर्त्यांची मनोगते.

 साधारणत: 1989च्या ऑक्टोबरमधील घटना आहे. त्या वेळचे पुण्याचे प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अण्णासाहेब बेहेरे, नाशिकचे विनायकराव पाटील, प्रसिध्द ऑफसेट प्रिंटर्स पर्शराम रेडीज व मी असे वनराईच्या सभेसाठी मोहन उर्फ अण्णा धारिया (माजी केंद्रीय मंत्री) यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे तेव्हा कोणीतरी विशेष पाहुणे आले असल्याने आम्ही थोडा वेळ स्वागत कक्षात बसलो. तोच स्वत: धारियासाहेब, खडीवाले दादा वैद्य, आबा अभ्यंकर यांना घेऊन बाहेर आले आणि त्यांनी या दोघांचा आमच्याशी परिचय करून दिला. अर्थात, खडीवाले वैद्य यांना सर्वच ओळखत होते, पण अभ्यंकरांची नव्याने ओळख होत होती. कॉर्पोरेटर गोविंदराव मालशे यांच्यासह अभ्यंकरांना माझ्या कार्यालयात आल्याचे आपणास आठवत असल्याचे बेहेरे यांनी सांगितले. मला एकूण आश्चर्यच वाटले. संघाचे मोतीबाग कार्यालय प्रमुख व प्रचारक आबा अभ्यंकर मोहन धारियांकडे! मी तिथेच विचारणा केली की, यांचे येण्याचे नेमके कारण काय? त्यावर अण्णा धारिया म्हणाले, ''आपण जानेवारीत पुण्यात वनराईतर्फे दोन दिवसांचे शिबिर घेणार आहोत, त्या संबंधात माहिती घेण्यासाठी आपण यांना बोलावून घेतले.'' तरीही माझे समाधान झाले नाही. पण पुढे धारियासाहेबांनीच खुलासा करून सांगितले की, हे अभ्यंकर पुण्यातील विविध सामाजिक संस्थांची माहिती - खासकरून त्यात कार्य करणाऱ्या व्यक्तींची नावे देण्यासाठी आणि दादा वैद्य शिबिरातील एकूण होणाऱ्या सत्रांविषयी चर्चा करण्यासाठी आले होते. वनौषधी, पर्यावरण, जंगलात मिळणाऱ्या गुणकारी वनस्पती इ.विषयी त्यांनी माहिती दिली. बरेच दिवस आमचे भेटायचे ठरले होते, तो योग आज आल्याचे अण्णा धारिया म्हणाले. मी तेव्हा वनराई ट्रस्टवर एक संचालक म्हणून काम पाहत होतो. माझ्याकडे कोकणची जबाबदारी होती. श्रमदानातून वसंत बंधारे व वनराई बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा अशी मोहीम तेव्हा वनराईने हाती घेतली होती. त्याला मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे पूर्ण सहकार्य लाभले होते.

त्याच दिवशी सायंकाळी मी पुण्यातील संघाच्या मोतीबाग कार्यालयात गेलो. आबाची भेट घेतली. त्याला ''तू धारियांकडे कसा?'' हे विचारले. तो म्हणाला, ''त्यांचा मला व दादा वैद्यांना भेटून जाण्याचा निरोप होता. म्हणून गेलो होतो.'' असाच एक प्रसंग 1992च्या सुमारास घडलेला आठवतो. राष्ट्रसेवा दलाचे तेव्हाचे पुण्याचे धडाडीचे कार्यकर्ते, समाजवादी युवजन सभेचे कार्यवाह, प्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्याकडे मी आबांना भेटलो. अभिजित हे समाजवादी नेते भाई वैद्यांचे चिरंजीव. संघाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सर्वज्ञात होती. डॉ. अभिजित, डॉ. कुमार सप्तर्षी, अतुल देऊळगावकर, प्रा. ग.प्र. प्रधान असे सर्व समाजवादी कार्यकर्ते रमाकांत आर्ते (मातृमंदिर देवरूखचे संचालक), विलास वैद्य, नागेश शेटये इ.सह गेलो होतो. माझा भाईचा व प्रधानसरांचा मिसाबंदी असताना येरवडा कारागृहातील परिचय व मैत्री. यामुळे ते मला काही वेळा बोलावूनही घेत. विषय होता माध्यमिक शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुट्टीत स्थानोस्थानी प्रबोधन वर्ग घेऊन त्यांना आपला परिसर साफ, स्वच्छ ठेवून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी काही स्थानी कॅम्प्स भरविण्याचा. आता या मोहिमेत लक्ष्मण काशिनाथ उर्फ आबा अभ्यंकरांचे नेमके काम काय? मला त्यांचे तेथे येणेही तितकेसे बरे वाटले नाही. नंतर भेटीत मी आबांना हा प्रश्न केला, तेव्हा ते म्हणाले, ''असे आहे, चांगल्या कामाचा आपण पुरस्कार करतो. त्याला योग्य ती साथ देतो.'' तेव्हा पुणे जिल्ह्यातील - त्यातही भोर, मावळ परिसरातील शाळांमध्ये असे कार्यक्रम घडवून आणण्याच्या दृष्टीने शिक्षक संघटनेने ठरविले असल्याने त्यांचे काम करणारे सर्वश्री चंद्रकांत जोशी, तुकाराम माताडे (तेव्हा विधान परिषद सदस्य होते) प्रा. शरद वाघ यांच्यासह मी गेलो होतो. शिवाय डॉ. अभिजित माझ्या चांगले परिचयाचे असल्याने त्यांनीच मला बोलावून घेतले. पुणे कार्यालयात राहून आबांनी नुसता स्वागत कक्ष सांभाळला नाही, तर येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून विविध प्रकारची माहिती घेतल्याची प्रचिती मला या निमित्ताने आली. परिसरातील एखादे गाव, तेथील संघाची प्रमुख व्यक्ती, आपल्या विचाराचे शिक्षण, धार्मिक-सांस्कृतिक संस्था इ. बरेच आबांना माहीत असायचे.

आबांचे मूळचे गाव अलिबागजवळील सासवणे. अष्टागरातील हे महत्त्वाचे गाव. शिल्पकार करमरकर याच गावचे. तेथे त्यांच्या शिल्पकृतीचे कायमस्वरूपी उभे केलेले प्रदर्शन दालन सर्वांना पाहायला मिळते. त्यांचे वडील काशिनाथराव हे कल्याणला चतुर्मासात चुलत बंधूंकडे राहायला येत. थोडीफार भिक्षुकीही करीत. आबा माध्यमिक शिक्षणासाठी कल्याणला आले. जेमतेम मॅटि्रक केल्यावर तेथेच रेऑन फॅक्टरीत नोकरीस लागले. त्यांना दोन बहिणी. एक भगिनी कल्याणलाच दातारांकडे दिली होती. तिकडेच आबा असायचे. लहानपणापासून नित्य शाखेत जात असल्याने 1954मध्ये पुण्यात संघाचा ओटीसी कॅम्पही त्यांनी केला होता. आम्हाला बालशाखेवर ते शिक्षक होते. त्या वेळी कल्याणात संघाचे प्रभावी काम होते. शाखेवर बाल-तरुणांची चांगली उपस्थिती असायची. मी कल्याणचाच असल्याने लहानपणापासूनच नानाराव ढोबळे, दामूअण्णा टोकेकर, दादा चोळकर, मुकुंदराव वझे, भाऊराव सबनीस या ज्येष्ठ प्रचारक कार्यकर्त्यांना अगदी जवळून पाहिले आहे. त्यांचे यथार्थ मार्गदर्शनही मिळत गेले. म्हणूनच मी काही वर्षे संघाचे प्रचारक म्हणून यशस्वीपणे कार्य करू शकलो.

अत्यंत साध्या वेषातील, सदोदित अर्धी विजार व त्यावर शर्ट खोचलेला, कंबरेवर पट्टा व पायात गावठी वहाणा, त्याला बहुधा खाली नाळ मारलेली, पिळदार देहयष्टीची, गव्हाळ रंगाची थोडी ठेंगू व्यक्ती आजही आमच्यासमोर येते. चपलांचा करकर आवाज करीत अत्यंत धारदार व आटोपशीर बोलणाऱ्या या व्यक्तीची शिस्त कडक होती. संघस्थानावर कडक वागणारे, पण शाखेनंतर अत्यंत स्नेहपूर्ण वर्तनाचे आबा हास्यविनोद करीत आम्हाला चणे, फुटाणे, शेंगदाणे असे काहीतरी देत असत.

1957-58मध्ये आबा प्रचारक म्हणून बाहेर पडण्याचे ठरले. तेव्हा कल्याणच्या नमस्कार मंडळात रात्री त्यांना निरोप समारंभ झाला. माननीय संघचाक भाऊ चोळकर, कार्यवाह शंकरराव लेले, भाऊराव सबनीस, मुकुंदराव वझे, बापूराव फडणीस आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे तेव्हा बोलणे झाले. आम्हा सर्व बालस्वयंसेवकांना वाईट वाटले, कारण आमचा शिक्षक उद्यापासून दिसणार नव्हता. आबा सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथे डॉ. गोखले यांच्याकडे गेले. तेथे दोन वर्षे प्रचारक राहिले. तेथून ते एक वर्ष पुणे जिल्ह्यात दत्तोपंत म्हसकरांसह कामाला होते आणि लगेचच संघाच्या मोतीबाग कार्यालयात वास्तव्यास आले. 1960पासून कार्यालय प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. हिंदुस्थान साहित्याचे बापूराव दात्ये, प्रचारक बाळासाहेब साठये, तात्या बापट, श्रीकृष्ण भिडे, तसेच मा. प्रांतसंघचालक बाबाराव भिडे यांच्या समर्थ मार्गदर्शनाने आबांनी महाराष्ट्र प्रांताचे हे प्रमुख कार्यालय पुढे 35 वर्षे सांभाळले. पूजनीय श्रीगुरुजी, मा. बाळासाहेब देवरस, मा. मोरोपंत पिंगळे, मा. काशिनाथपंत लिमये, भाऊराव अभ्यंकर, विनायकराव आपटे यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या अखिल भारतीय प्रांताच्या स्तरावरच्या ज्येष्ठ प्रचारक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची ऊठबस, एवढेच नव्हे, तर त्यांना पुणे स्टेशनवरून घेऊन येणे-सोडणे, सामानाची बांधाबांध, वाटेत भोजनाचा डबा, औषधपाणी इ. सर्व काळजी आबा घेत असत. दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटलमध्ये आणि पुण्यातील अन्यही हॉस्पिटलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांवर औषधोपचार चालू असेल तर आबा स्वत: जातीने जाऊन आवश्यक ती मदत करीत असत. पुण्यातील कार्यकर्त्यांना निवडून त्यांच्याकडे असे काम नेमून देत असत. रामभाऊ गोडबोले, मोरोपंत पिंगळे, दामूअण्णा दाते, नानाराव पालकर अशा संघाच्या ज्येष्ठांच्या चरित्रलेखनासाठी अगदी सामग्री एकत्रित करण्यापासून प्रकाशन, वितरण व्यवस्थेपर्यंत ते सहकार्य करीत. खडीवाले दादा वैद्य, प्रसादचे बापूराव जोशी, लाटकर प्रकाशन संस्था, पुरंदरे प्रकाशन अशा व्यक्तिगत वा साहित्यक्षेत्रातील संस्थांसाठी आवश्यक ते साहाय्य मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

पुण्यातील अनेक संघकार्यकर्त्यांच्या तीन-तीन पिढयांशी आबांचा संबंध होता. एखादा युवक कार्यकर्ता मोतीबागेत गेला की, त्याच्याकडे त्याच्या आजोबा-आजीपासून सर्वांची चौकशी करीत. घराघरात आबा पोहोचले होते. गणपती, नवरात्र, दिवाळी, संक्रांत सणाला ते मोतीबागेत क्वचितच असत. कार्यकर्त्यांच्या घरी अल्पोपाहारापासून ते भोजनाचा आस्वाद घेण्यापर्यंत त्यांचा मुक्त संचार असे. समन्वय साधून देण्याची त्यांची वेगळीच खुबी होती. मग अगदी शिशुविहारामध्ये लहानग्याचा प्रवेश असो वा महाविद्यालयात - हॉस्टेलला जागा मिळवून देण्याची वेळ असो. आनंदाने आबा हे काम करीत. बाहेरून आलेल्या स्वयंसेवकांचा गावातील कार्यकर्त्यांशी परिचय करून देऊन ती व्यक्ती संघस्थानाशी जोडण्याचे कसब त्यांच्याकडे होते. पहाटे 4पासून त्यांचा दिनक्रम सुरू होई. स्वत: सर्व वास्तू ते झाडीत. पाणी भरून घेत. भांडाराचे साहित्य लावण्यासाठी बाबा सरदेशपांडे, प्रभाकर भट यांना मदत करीत भोजनालयाची रोजची व्यवस्था पाहात.

संघटनेचे कार्य उत्तम प्रकारे व्हायचे असेल, तर त्याचे कार्यालय सक्षम असावे लागते. ज्येष्ठ नेते दत्तोपंत ठेंगडी नेहमी असे म्हणत. मजदूर संघाच्या कामासाठी कोठेही गेले की, ते कार्यालय व्यवस्था, कार्यालय प्रमुख याविषयी अधिक माहिती घेत असत आणि ते सत्यही आहे. संघाच्या प्रारंभापासून नागपूर कार्यालय कृष्णराव मोहरील सांभाळत. आता अलीकडे रामभाऊ बोंडाळे काम पाहतात. चमनलाल व वीरजी (दिल्ली), श्रीकृष्ण अरोडा (अमृतसर), बाळासाहेब देवळे (लखनऊ), केशवराव दीक्षित (कोलकत्ता), हरिहरनजी (कटक), रामभाऊ हळदेकर व रामभाऊ साठे (हैदराबाद), दत्ता वझे व वसंत साठे (मुंबई), शिवरामपंत जोगळेकर (चेन्नई) अशी प्रत्येक प्रांताच्या प्रमुख नगरातील कार्यालय प्रमुखांची नावे देता येतील. ही परंपरा अक्षुण्णपणे चालत आली आहे. संघप्रचारक केवळ कार्यालयीन कामात व्यग्र असे घडत असल्यानेच संघ आणि त्याचा शाखा विस्तार नियोजनबध्द होत आला आहे. हजारो कार्यकर्ते संघाला जोडले गेले, त्यात आबा अभ्यंकरांसारख्या अहर्निश काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. आबाने केवळ वास्तूची दखल, वस्तूंची काळजी न वाहता येथे वावरणाऱ्या सर्वांशीस स्नेहपूर्ण व्यवहार केला. सदैव हसतमुख राहून, स्वत:ची विशेष दखल न घेणारा अनेक वर्षे मोतीबागेच्या स्वागत कक्षातील आतल्या 8 # 3च्या बोळकंडीत अनेक वर्षे राहणाराहा सच्चा कार्यकर्ता सर्वच पुणेकरांच्या कायम स्मरणात राहील.

प्रकृतीच्या कारणाने अलीकडे 15 वर्षे रोजच्या कार्यालयीन कामापासून आबा दूर होते, पण निवास तेथेच असल्याने नवीन इमारतीच्या बांधकामापासून, बैठका-समारंभापर्यंत सर्व सुनियोजित घडवून आणण्यासाठी त्यांचे सर्वांना मार्गदर्शन लाभत असे. अलीकडे त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू होत्या. अखेरचे 10 दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. तेथेच सोमवार दि. 12 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 87व्या वर्षी लक्ष्मण उर्फ आबांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला.

- सुरेश द. साठे

9822823653

 ------------------------------------------------------------

ध्येयनिष्ठ स्वयंसेवक हरपला

ध्येयनिष्ठ व समाजशील स्वयंसेवक आबा अभ्यंकर ह्यांच्या देहावसानाची दुःखद वार्ता ऐकून असंख्य जण हळहळले. त्यांच्या निधनाने पुणे संघशाखेचा चालताबोलता इतिहास, ज्ञानकोशच गेला. अफाट जनसंपर्क, त्याग, समाजकार्य, साहाय्य-सहकार्यवृत्ती अशी त्यांची कितीतरी वैशिष्टये सांगता येतील. प.पू. श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जूभैय्या, सुदर्शनजी, मोहनराव भागवत, एवढेच नव्हे, तर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, सुब्रह्मण्यमजी, नानाजी देशमुख ह्यांच्याशीही त्यांचा उत्तम परिचय होता.

सहा वर्षांपूर्वीच त्यांची प्रकृती अत्यंत अस्वस्थ झालेली होती, पण खडीवाले ह्यांच्या कुशल उपचारांमुळे आणखी सहा वर्षे ते आपल्याला मिळाले. लवकरच मी त्यांच्याकडे जाऊन संपूर्ण इतिहास, आठवणी ध्वनिमुद्रित करून घेणार होतो, पण योग नव्हता.

शिवपुण्यतिथीची रायगडची वारी त्यांनी वर्षानुवर्षे केली. ते 87 वर्षांचे स्वयंसेवक होते. खरेच, इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही माणसे इतका काळ कार्य कशी करू शकतात, ह्याचे अवश्य चिंतन केले पाहिजे. संघप्रार्थनाकार प्रा. न.ना. भिडे ह्यांचे चरित्र संपादण्यात खडीवाले वैद्य, शरदराव भिडे ह्यांच्यासह आबांचा फार मोठा वाटा होता.

75च्या आणीबाणीतील त्यांच्याविषयीची एक आठवण अशी - सर्वत्र संशयाचे, दहशतीचे, भयाचे वातावरण होते आणि वॉरंट असूनही खा. सुब्रह्मण्यम स्वामी लोकसभेत उपस्थित राहून भूमिगत झालेले. त्यांच्यामागे गुप्तहेरांचा सुळसुळाट. अशा स्थितीत ते पुण्यात आले. त्यांना लखनौपर्यंत मोटारीने पोहोचवण्याचे अत्यंत कठीण नि जोखमीचे काम, दायित्व आबांकडे आले. पदोपदी धोका होता. जॉर्ज फर्नांडिसही सापडले होते, इतका गुप्तहेरांचा व पोलिसांचा कडक पहारा, बंदोबस्त आणि ही जोखमीची कामगिरी आबांकडे आली. त्यांनी मोठया हिमतीने ही जबाबदारी निभावली. स्वामी पुण्यात आले की आबांना भेटून जात. अशा या निष्ठावान, ध्येयनिष्ठ स्वयंसेवकास भावपूर्ण श्रध्दांजली.

- सु.ह. जोशी, बेडफर्ड, अमेरिका

 -------------------------------------------------------------

'कार्यालय डॉक्टरेट' - आबा अभ्यंकर

नेहमीप्रमाणे दि. 13 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी वृत्तपत्र वाचावयास घेतले व त्यात दि. 12 रोजी आबा अभ्यंकर यांना देवाज्ञा झाल्याची दु:खद बातमी वाचली. त्या क्षणी 1989पासून म्हणजे गेल्या 30 वर्षांतील आबांचा परिचय झाल्यापासूनचा आठवणींचा चित्रपट डोळयांसमोरून सरकू लागला.

लहानपणापासून संघसंस्कार झाल्याने आयुष्यात संघकामासाठी पाच वर्षे काम करण्याच्या विचाराला अनुकूल काळ पाहून रेल्वेतील नोकरी सोडण्याचा निश्चय केला. नोकरीमुळे संघशाखेचा नित्य संपर्क तुटला; परंतु 'मध्ये रेल्वे कर्मचारी संघ', 'सहकार भारती' अशा संस्थांत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुढील पाच वर्षे कोणत्या क्षेत्रात काम करावे यासाठी कै. आदरणीय दामूअण्णा दाते यांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन निश्चित करण्याचे ठरल्याने, पुण्याला मोतीबागेत त्यांना भेटण्यासाठी गेलो.

मोतीबागेतील व्यवस्थेप्रमाणे, प्रवेशद्वाराशीच कार्यालय. कार्यालयात गेलो ते समोर धोतर, सदरा, डोक्यावर पांढरी टोपी, दणकट शरीरयष्टी, करारी मुद्रा, ठणठणीत आवाज पण आदबशीर वागणारी व्यक्ती भेटली. ती व्यक्ती म्हणजे आबा अभ्यंकर. ती आमची पहिली भेट. मी माझा परिचय दिला व कशासाठी आलो हे सांगितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अजूनही आठवतात. तत्काळ उठून मला दामूअण्णांच्या खोलीत घेऊन गेले. दामूअण्णांच्या आदेशाप्रमाणे सहकार भारती पुणे विभागात काम करण्याचे ठरल्याने मुक्काम पुण्यात व कामानिमित्त वरचेवर मोतीबागेत जाणे-येणे सुरू झाले. त्यामुळे आबांचा सहवास वाढला व त्यांचे कार्यालयीन काम, परिस्थितीनुसार काम करण्याची हातोटी, काम लहान असो अगर मोठे, ते करण्याची वृत्ती, समोर आलेल्याला त्याच्या स्वभावानुसार कसे हाताळावे इ. अनेक गुणदर्शन बघावयास मिळाले.

मोतीबागेत दुपारच्या जेवणाच्या वेळी 2-3 वेळा गेलो असता, आबानी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्याबरोबर जेवणासाठी घेऊन गेले. त्यामुळे मोतीबागेतील साध्या पण चविष्ट जेवणाचा योग आला. आबा जवळ नेहमी खडीसाखर ठेवत व आलेल्याला हातावर 2-3 खडे देत, हा अनुभव मी बरेच वेळा घेतलेला आहे. तो अनुभव बरेच दिवसांनी नव्हे, वर्षांनी सप्टेंबर 2018च्या तिसऱ्या बुधवारी मोतीबागेत बैठकीसाठी गेलो असता शेवटचा ठरला.

आबांच्या दु:खद निधनाने एखाद्या संस्थेच्या कार्यालयीन व्यवस्थापनेतील 'डॉक्टरेट'च आपल्याला सोडून गेला असे वाटते. त्याचबरोबर 'अमूर्त मूर्त मूर्तिमंत...' या संघगीताची आठवण झाली.

आबांच्या मृतात्म्यास शांती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

- माधव यशवंत वर्तक

9420150779

 -------------------------------------------------------------

आमचा आधार गेला

आबा अभ्यंकर मूळचे सासवण्याचे. शिक्षणासाठी त्यांच्या आत्यांकडे ते राहायला आले.

त्यांनी सुभेदारवाडा हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. त्याच काळाच आम्हा समवयस्कांच्या गटात इतके रमले की, ते सासवण्याचे होते हे आम्ही पूर्ण विसरलो. तब्येतीने सुदृढ, व्यायाम, नमस्कार यांचा छंद. संघशाखेत येऊ लागले आणि संघमय झाले.

त्याच सुमारास कल्याणजवळील नॅशनल रेयॉन कंपनीत ते नोकरीस लागले. पण त्यांचे मन नोकरीत रमत नव्हते. आम्ही सगळे माधवराव काणे यांच्या ओटीवर रात्री जमत असू. आबा रात्री 11ला कामावरून सुटत, ते थेट ओटीवर हजर. तिथे सगळेच निशाचर. सामाजिक कार्याचे नवनवीन उपक्रम उत्साहाने होत होते.

पण आम्हा कोणालाही पत्ता लागू न देता आबा संघप्रचारक म्हणून घरदार सोडून निघाले. कुठे कुठे फिरले याचा आम्हाला पत्ता नाही.

शेवटी शोध लागला. आबा पुण्याच्या मोतीबाग कार्यालयाचे व्यवस्थापन पाहत होते. आमच्या प्रत्येक पुणे भेटीत आबांकडे गेलो नाही असे झाले नाही. आबा तिथे मोठे कार्यकर्ते झाले होते. 'माहेरची माणसं' अशी आमची टिंगल व्हायची, पण आबा आमच्या दिमतीला राहत.

कधी, कशी ठाऊक नाही... आजारी प्रचारकांची देखभाल ते करत. त्याकरिता अगदी वनस्पती जमवून काढे करत. मोरोपंत पिंगळे, नाना ढोबळे यांच्यावर ते उपचार करीत. त्याकरता किती कष्ट घेत त्याला सीमा नसे. स्कूटरवर दिवसभर फिरत. रुग्णसेवा त्यांच्या स्वभावात भिनली होती.

आता इतके मोठे झाले याची आम्हाला जाणीव नव्हती. आम्ही जमलो की टिंगलटवाळी चालू.

पण अतिश्रमाने त्यांना काही विकार जडले. शेवटी ते कौशिकाश्रमात होते. आता ते रुग्ण होते. सेवक नव्हते. शेवटपर्यंत शांतपणे सेवा कार्य करत गेल्या आठवडयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. पुण्याचा आमचा आधार गेला.

- गो.वा. टोकेकर, ठाणे