एकनिष्ठ सेवक बनलो, यात मोक्ष सारा

 विवेक मराठी  18-Dec-2018

माझे आतापर्यंतचे संपूर्ण आयुष्य संघ स्वयंसेवकांसमवेत, संघपरिवारात व्यतीत झाल्यामुळे संघ जातीयतेबाबत जसे सांगतो तसेच स्वयंसेवकांचे वर्तन असते. माझे मित्र सुरेश कारंजे यांच्या, तसेच केवळराम यांच्या घरी सतत ये-जा असे. वर्षानुवर्षे एवढे जवळ असूनही कोणीच कोणाच्या जातीची चौकशी केल्याचे आठवत नाही.

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/ मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 1966-67नंतर मी शाखेवर चांगलाच रुळलो होतो. मला शाखेचा अतिशय छान असा छंदच जडला होता. दररोज केव्हा एकदा सायंशाखेची वेळ होते आणि हाफपँट घालून दंड घेऊन शाखेवर जातोय, या विचाराने अस्वस्थ व्हावयाचो! उपेक्षित वस्तीतून ब्राह्मण गल्लीतील हनुमान मंदिरात भरणाऱ्या सायंशाखेत नित्य जात असे. औसा शहरात ही हनुमान शाखा फुललेली असायची व अन्य शाखासुध्दा तशाच असायच्या. सर्व शाखांतून सर्व प्रकारचे कार्यक्रम - शारीरिक, बौध्दिक, निरनिराळे खेळ, कबड्डी, खो-खो, दंडाचे कार्यक्रम आणि पद्यही व्हायचे. संघशिक्षा वर्गाची तयारी म्हणून योगचाप आणि दंडाच्या नऊ-नऊ क्रमिका घेतल्या जात होत्या. त्याचे एवढे आकर्षण वाटत असे की, शाखेच्या वेळेव्यतिरिक्तही मी घरी आमच्या अंगणात क्रमिकांचा अभ्यास करत असे. शाखेवर घेतली जाणारी पद्ये सतत गुणगुणण्याची सवयच झाली होती (जी आजही कायम आहे). 'अमुचे जग गाईल जयगान', 'हिंदू आम्ही भीती कुणाची जगती आम्हाला', 'आम्ही डोंगराचे राहणार..' ही त्यातील काही पद्ये. मी त्या वेळी 15-16 वर्षांचा किशोर तरुण होतो. संघाच्या या मंतरलेल्या वातावरणाची इतकी मोहिनी पडलेली होती की अन्य कशाचेच आकर्षण वाटत नसे. त्या वेळचे चित्रपट, बिनाका गीतमाला, क्रिकेट इ.चे समवयस्कांमध्ये मोठे फॅड होते. पण मी सुदैवाने त्यापासून खूपच अलिप्त होतो. माझ्या शाळेत शिकणारे अनेक जण माझे मित्र होते, पण ते शाखेत येत नसत. उनाडक्या करणे, पैशावर जुगार खेळणे इ. गोष्टीतच त्यांचा दिवस जात असे.

मी नित्य शाखेत जात होतो, रमत होतो, तसा अनेकांचा सहवास लाभत होता. नवीन स्वयंसेवकांच्या ओळखी होत होत्या. संघाच्या सर्व बैठकांनाही मी हजेरी लावत होतो. औसा शहराचे भूषण, आमच्या शाळेतील विद्यार्थी, प्रिय शिक्षक जळकोटे गुरुजींचा सहवास शाखेत हवाहवासा वाटायचा. या हव्यासापोटी मला गुरुजींचे भरभरून प्रेम मिळाले. त्या बाबतीत मी स्वतःला खरोखरीच भाग्यवान मानतो. तेव्हाचे प्रचारक मा. बाळासाहेब दीक्षित, मा. संभाजीराव भिडे, मा. दत्ताजी ओलतीकर यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, दिलेले निर्व्याज प्रेम, जिव्हाळा कसा विसरला जाईल? मा. मधुभाई कुलकर्णी यांनी औरंगाबाद येथे प्रचारक असताना माझ्या सोडविलेल्या शैक्षणिक अडचणी व जालना येथे माझी लावलेली व्यवस्था मी अद्याप विसरलो नाही. पुढील कालावधीत सुरेशराव केतकर, मधुकरराव जोशी, डॉ. गजाननराव पटवर्धन, शरदराव मायदेव यांचे मिळालेले प्रेम आजही स्मरणात आहे. सोमनाथजी खेडकर, प्रमोदराव कुलकर्णी या सर्वांच्या सहवासाने माझे भावविश्व समृध्द झाले.

माझे आतापर्यंतचे संपूर्ण आयुष्य संघ स्वयंसेवकांसमवेत, संघपरिवारात व्यतीत झाल्यामुळे संघ जातीयतेबाबत जसे सांगतो तसेच स्वयंसेवकांचे वर्तन असते. माझे मित्र सुरेश कारंजे यांच्या, तसेच केवळराम यांच्या घरी सतत ये-जा असे. वर्षानुवर्षे एवढे जवळ असूनही कोणीच कोणाच्या जातीची चौकशी केल्याचे आठवत नाही. संघ हिंदुत्ववादी आहे असे सांगत टीकाकार नेहमीच संघाला जातीयवादी म्हणत असतात, जे ऐकून मला हसू येते आणि करमणूकही होते. अशा टीकाकारांची कीवही येते. कारण जातीयवादी ते स्वतः असतात. माझ्यासारख्या मागासवर्गीय स्वयंसेवकाला 40-50 वर्षे संघाच्या नित्य संपर्कात असूनही जातीयतेचे दर्शन झाले नाही, आणि या काठावर बसलेल्यांना संघात जातीयवाद कसा काय दिसला?

संघशिक्षा वर्ग प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे शिक्षण घेताना मी आवर्जून प.पू. श्रीगुरुजींसह किंवा कधी समोरच्या पंगतीमध्ये बसून जेवण घेतले आहे. ती तीन वर्षे अनुक्रमे 1968, 1969 आणि 1970 ही होत. नागपूरच्या संघकार्यालयात मी जेव्हा थांबलो होतो, तेव्हा प.पू. बाळासाहेब देवरस यांच्यासह दररोज चहापान करण्याचा योग चार-पाच दिवस आला होता. शीर्षस्थ नेत्यांच्या नावाचा उल्लेख मुद्दामच केला आहे. संघ जातीयवादापासून कसा दूर आहे, हेच यातून विदित होते. संघ स्वयंसेवक घरात येतात, त्यांच्या घरीही बोलावतात, मांडीला मांडी लावून एकाच पंगतीत जेवायला बसतात, पण कधीच कोणीही कोणाची जात विचारत नाही. एवढे सर्व होऊनही संघाला जातीयवादी म्हणून हिणवले जाते... असो.

अशा या जातीयवादाला गाडून टाकून संघ उत्कर्षाला निश्चितपणे पोहोचणार आहे. 'दिसू लागला जवळी मंगळ, देशाचा वैभवकाळ' या पद्याच्या पंक्ती प्रत्यक्षात लवकरच उतरतील हा विश्वास आहेच.

ऍड. विश्वनाथ जाधव

9860936883