'स्थूलत्व निवारण'जगन्नाथाचा रथ

 विवेक मराठी  19-Dec-2018

 

बदलत्या आहारशैलीमुळे स्थूलता आणि मधुमेह हे आजच्या काळातील गंभीर आरोग्य प्रश्न बनले आहेत. या प्रश्नांवर योग्य उत्तर ठरणारा डाएट प्लॅन डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी तयार केला आणि एक मोहीम उघडून त्याचा प्रसारही केला. त्यांच्या या आरोग्य मोहिमेची दखल घेत राज्य शासनानेही स्थूलत्व निवारण उपक्रमासाठी सदिच्छा दूत म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती केली आहे. कोण आहेत डॉ. दीक्षित आणि काय आहे त्यांचा हा अनोखा डाएट प्लॅन? त्याविषयी माहिती देणारा हा लेख.

 पल्याकडील वाढणारे बहुतांश आजार हे जीवनशैलीशी निगडित आहेत व त्यातही आहारविहार याला अधिक महत्त्व आहे. जगभर स्थूलत्व आणि मधुमेह या आजारांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. 2014मध्ये जगात 64.1 कोटी लठ्ठ व्यक्ती होत्या. भारतात 98 लाख पुरुष, तर 2 कोटी स्त्रिया लठ्ठ आहेत. पुरुषांमधील लठ्ठपणात आपल्या देशाचा पाचवा, तर स्त्रियांच्या बाबतीत तिसरा क्रमांक आहे. 1975 साली आपण जगात 19व्या क्रमांकावर होतो. 20 वर्षांपुढील व्यक्तीत आपल्या देशातील मधुमेहाचे प्रमाण 8.7 टक्के आहे. यातील महत्त्वाची बाब अशी की, आपल्याला मधुमेह आहे हे निम्म्या जणांना माहीतच नसते. आपण लठ्ठ आहोत याच्यावर बहुतांश लोक विश्वासच ठेवत नाहीत. उंचीनुसार आपले वजन किती असायला हवे याची माहिती घेण्याची तसदी कोणी घेत नाही.

महिलांमधील वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त आहे. शारीरिक श्रमांचा अभाव, खाण्याची सवय, आनुवंशिक घटक, मद्यपान अशा विविध कारणांनी वजन वाढते. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे व कमी श्रम करणे. यामुळे शरीरात ऊर्जेचा साठा वाढतो व त्यातून वजन वाढते. परिणामी उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, मेंदूत रक्तस्राव, सांधेदुखी असे आजार शरीरात घर करतात.

कडक भुकेच्या वेळा ओळखून दोन वेळाच जेवण घ्या.

जेवणाचा कालावधी 55 मिनिटे ठेवा

कर्बोदके, गोड कमी खा.

सलग 45 मिनिटे व्यायाम करा.

 

प्रेरणा

डॉ. जगन्नाथ दीक्षित हे गेल्या 28 वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकवण्याचे काम करतात. गेल्या चार वर्षांपासून प्राध्यापक म्हणून ते लातूर येथे कार्यरत आहेत. 2012 साली त्यांचे आठ किलो वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांनी विविध उपाय केले होते. मात्र त्यात फारसे यश आले नव्हते. यूटयूबवर दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे व्याख्यान त्यांना ऐकायला मिळाले व त्यांनी त्यानुसार स्वत:वर प्रयोग केले. याची परिणामकारकता लक्षात आल्यानंतर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी 'स्थूलत्व व मधुमेहमुक्त भारत' ही मोहीम सुरू केली. या निमित्ताने ठिकठिकाणी व्याख्याने देण्यास सुरुवात केली.


मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांना 2003 साली मधुमेह झाल्याचे निष्पन्न झाले, तेव्हापासून ते औषध घेत होते. त्यांनी एचबीए 1 सी तपासले. ते 10.33 होते. त्याच दिवशी त्यांच्या मित्राने डॉ. श्रीकांत जिचकार यांची व्हिडिओ क्लिप पाठवली. ती ऐकल्यानंतर त्यांना डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्याबद्दल माहिती मिळाली व तातडीने आहार योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. 12 दिवसांत एचबीए 1 सी 8.9 इतके झाले व 50 दिवसांनी ते 6.7 झाले. सध्या मधुमेहाचे कोणतेही औषध न घेता एचबीए 1 सी 6.5 इतकेच राहिले. गेल्या तीन वर्षांत आपल्याला या आहार योजनेचा अतिशय चांगला लाभ झाला असल्याचे सांगत त्यांनी डॉ. दीक्षित यांच्या आहार योजनेचे कौतुक केले आहे.

 डॉ. राजन वेळूकर

 

डाएट प्लॅन अर्थात् आहार नियोजन

ज्याला वजन कमी करायचे आहे, पोट कमी करायचे आहे, टाईप 2 मधुमेह टाळायचा आहे अशा मंडळींनी शरीरातील इन्श्युलीनची पातळी कमी करणे आवश्यक आहे. यासाठी कमी खाण्याची नाही, तर कमी वेळा खाण्याची गरज आहे. 'एकदा खातो तो योगी, दोनदा खातो तो भोगी व तीनदा खातो तो रोगी' असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. दिवसभरातील कडक भूक लागण्याच्या प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळया असू शकतात. त्या ओळखायच्या व त्या दोन वेळेसच जेवण घ्यायचे. जेवणाचा कालावधी 55 मिनिटे असावा. या कालावधीत खाणे संपायला हवे.  दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नये. सर्वांनीच जेवताना शक्यतो गोड कमी खावे अथवा टाळावे. जेवणात प्रथिनांचे प्रमाण अधिक असायला हवे. कर्बोदके कमी खायला हवीत. दोन जेवणांच्या मध्ये पाणी, घरी बनवलेले पातळ ताक, ग्रीन टी, ब्लॅक टी व 25 टक्के दूध, 75 टक्के पाण्याचा बिनसाखरेचा चहा (यात शुगर फ्रीचा वापरही नको.) नारळ पाणी किंवा टोमॅटोच्या एक, दोन फोडी दिवसभरात घेता येतील. मध्ये काहीही न खाणे सर्वात चांगले. या आहार योजनेबरोबरच प्रत्येकानेच व्यायाम करणे आवश्यक आहे. हृदयगती वाढवण्यासाठी चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे असा कोणताही व्यायाम सलग 45 मिनिटे करायला हवा. 45 मिनिटांत किमान 4.5 किलोमीटर चालणे व्हायला हवे. सकाळी व संध्याकाळी मिळूनची बेरीज उपयोगाची नाही. एकाच वेळी सलग चालणे आवश्यक आहे, तरच त्याचा योग्य परिणाम होतो. शारीरिक कष्ट वेगळे व व्यायाम वेगळा, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे.

आपल्या मित्राकडून हेमंत चतुर यांना एप्रिल 2018मध्ये डॉ. दीक्षित यांच्या आहारशास्त्राविषयी माहिती मिळाली. 12 एप्रिल 2018 रोजी त्यांचे एचबीए 1 सी 12.60 इतके होते. 13 ऑक्टोबर 2018 रोजी ते 6.8 इतके आले. वजन 78 किलोवरून 65 किलोपर्यंत आले. या कालावधीत कोणत्याही पध्दतीचे औषध चतुर यांनी घेतले नाही. केवळ आहार योजनेवर विश्वास ठेवत त्यांनी यश मिळविले.

 हेमंत चतुर

 

37 देशांतील 45 हजार लोकांचा सहभाग

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी स्वत: हा साधा उपाय अमलात आणला व त्यानंतर सुरू केलेल्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळणे सुरू झाले. आज या मोहिमेचा प्रसार करणारे 202 व्हॉट्स ऍप ग्रूप आहेत, एक फेसबुक पेज व एक फेसबुक ग्रूप यांच्या माध्यमातून 37 देशांतील 45 हजार लोक या मोहिमेत गुंतलेले आहेत. 63 समन्वयक या मोहिमेत सेवाभावी वृत्तीने काम करतात. या विषयावर आतापर्यंत तीनशे ठिकाणी व्याख्याने झाली आहेत. यूटयूबवरील डॉ. दीक्षित यांची व्याख्याने किमान 25 लाख लोकांनी पाहिली आहेत. त्यामुळे वजन कमी करणे सहज शक्य आहे असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. कोणतेही औषध न घेता व कसलाही खर्च न करता केलेल्या या उपायाचे अतिशय आश्चर्यकारक परिणाम आले आहेत.

जाणीवजागृती

एरवी एखादा किलोमीटर चालण्याचा कंटाळा करणारी मंडळीही या मोहिमेत सहभागी झाल्यानंतर आता मॅरेथॉन रेसमध्ये भाग घेऊ लागली आहेत. मधुमेह झाला म्हणजे आपल्या आयुष्यातील चांगले दिवस संपले व आता आपले काही खरे नाही, अशी अनेकांची निराशाजनक मनःस्थिती होती. मात्र या पध्दतीमुळे औषधाविना निरोगी आयुष्य जगता येते असा विश्वास रुग्णांच्या मनात निर्माण झाला आहे. या मोहिमेत विविध प्रकारची मंडळी सहभागी आहेत. या वर्षी नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला असून तेथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांनी जिल्ह्यातील 2 लाख विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी शीतपेयापासून दूर राहणे, जास्त गोड खाणे टाळणे व दररोज किमान एक तास मैदानावर खेळले पाहिजे याची जाणीव या जागृती मोहिमेतून निर्माण केली जात आहे.

14 सप्टेंबर हा डॉ. श्रीकांत जिचकार यांचा जन्मदिन. याचे औचित्य साधत, त्याच दिवशी नागपूर येथे मधुमेह मुक्ती केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर सोलापूर येथेही असेच केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रामधील डॉक्टर मोफत मार्गदर्शन करतात. या मोहिमेत अनेक जण सहभागी होत आहेत व मोहिमेचे महत्त्व अनेक तज्ज्ञ मंडळींना पटू लागले आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयातील डॉ. तुषार बंडगर यांनी दीक्षित आहार योजना ही अतिशय योग्य असून यामागील नेमके शास्त्र काय आहे याचा शोध घेऊन ते लोकांसमोर मांडण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे सांगितले आहे.
एलआयसी एजंट म्हणून काम करणारे चंद्रशेखर मुंजे गेल्या 15 वर्षांपासून मधुमेहग्रस्त आहेत. त्यांना मधुमेह प्रतिबंधासाठी इन्श्युलीन दररोज घ्यावे लागत असे. त्यांना दीक्षित यांच्या आहारासंबंधी जुलै 2018मध्ये माहिती मिळाली. 18 जुलै 18 रोजी त्यांचे एचबीए 1 सी 8.1 होते. 18 ऑक्टोबर 18 रोजी ते 6.7 इतके कमी झाले. दीक्षित यांच्या आहार योजनेमुळेच आपण मधुमेहमुक्तीकडे वाटचाल करू शकतो, असा विश्वास निर्माण झाल्याचे मुंजे सांगतात.

चंद्रशेखर मुंजे

 

 

तज्ज्ञ डॉक्टरांचे बोल

औरंगाबाद येथील मधुमेह डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजीव इंदूरकर यांनी सांगितले की ''आपल्या देशात लठ्ठपणाचे प्रमाण वाढते आहे व प्रत्येक व्यक्तीस रुग्णालयात जाणे, औषधोपचार घेणे परवडतेच असे नाही. त्यातही त्याची परिणामकारकता किती? यावरही प्रश्नचिन्ह आहे.'' डॉ. दीक्षित यांची उपचार पध्दती बिनखर्चाची असून त्याचा चांगला लाभ होत असल्याचे म्हटले आहे.

लातूर येथील मधुमेहतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर आष्टेकर यांनी ''आपण गेल्या वीस वर्षांपासून लातुरात मधुमेहग्रस्त रुग्णांवर उपचार करतो आहोत, मात्र रुग्णांच्या आहार पध्दतीत बदल होत नसल्यामुळे व केवळ गोळया खाऊन आपली प्रकृती नीट व्हावी या मानसिकतेमुळे रुग्णात बदल होत नव्हते. डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान आयोजित केल्यापासून आपल्या रुग्णांना आपण हीच आहार पध्दती सुचवतो.'' असे सांगितले. आपल्याकडील येणारे रुग्ण कमी व्हावेत या जिद्दीने आपण यात सहभागी होत असल्याचे डॉ. आष्टेकर म्हणाले.

 राजीव सुभेदार

हैदराबाद येथील राजीव सुभेदार हे गेल्या आठ वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त आहेत. ते एका कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात. 20 ऑगस्ट 2017 रोजी त्यांचे एचबीए 1 सी 7.9 होते. ते केवळ 90 दिवसात 6.5 इतके कमी झाले. वजन 4 किलो कमी झाले. त्यातून त्यांना आपण मधुमेहापासून कायमची मुक्ती मिळवू असा विश्वास निर्माण झाला व त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.
--------------------------------------------------

सुमंत घैसास

मुंबईच्या सिध्दिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुमंत घैसास हेही मधुमेहाने त्रस्त होते. प्रारंभी या आजाराकडे ते फारसे लक्ष देत नव्हते. डॉ. आशिष लिमये यांनी त्यांना 20 जून 2018 रोजी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या आहार योजनेबद्दलची माहिती दिली व त्याची अंमलबजावणी सुरू झाली. 21 जून रोजी एचबीए 1 सी 10.1 होते. 20 ऑक्टोबर 2018 रोजी ते 6.2 इतके झाले.

 

नाशिक येथील मधुमेहतज्ज्ञ डॉ. नितीन घैसास यांनी डॉ. दीक्षित यांच्या आहार पध्दतीमुळे रुग्णांमध्ये झालेल्या बदलाची शास्त्रोक्त माहिती कोणालाही पाहण्यासाठी उपलब्ध आहे, तिची परिणामकारकता चांगली असल्यामुळे ही आहार पध्दती वापरण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

अकलूजच्या डॉ. वंदना गांधी, नंदुरबारचे डॉ. नूतनभाई शहा, चाळीसगावचे डॉ. मुकुंद करंबेळकर, नागपूरच्या डॉ. वैदेही मराठे यांनीही डॉ. दीक्षित यांच्या उपचार पध्दतीचे कौतुक केले आहे. मूळच्या मुंबईच्या व सध्या दुबई येथे असलेल्या आहारतज्ज्ञ आदिती अमेय हाते यांनी ''आपण आहार विषयातील तज्ज्ञ आहोत, मात्र लोकांना कितीही सांगितले तरी ते ऐकत नाहीत व अंमलबजावणी करत नसल्यामुळे तेच ते त्यांना वारंवार सांगावे लागते. अशासाठी आपण पैसे कसे काय घ्यायचे? असे मला वाटत होते. डॉ. जगन्नाथ दीक्षित हेच खरे आहारतज्ज्ञ आहेत. कारण त्यांनी सांगितलेल्या आहार योजनेचा वापर करून रोगमुक्ती मिळवण्याचे प्रमाण प्रचंड आहे.'' असे सांगितले. त्यामुळेच स्वत: आचरण करून त्यांच्या मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

काही मंडळी दीक्षित यांची आहार योजना चुकीची असल्याचे मत व्यक्त करतात. याला शास्त्रीय आधार नाही असे सांगतात. कदाचित त्यामुळे आपल्या व्यवसायावर गदा येईल अशी शंका त्यांच्या मनात असावी. डॉ. दीक्षित यांच्या आहार योजनेमुळे झालेल्या बदलांची शेकडो - नव्हे, हजारो उदाहरणे आहेत. आपल्या रुग्णाला दिलेल्या औषधामुळे त्यांच्यात बदल झाला व औषधी द्यावी लागत नाहीत, असे किती डॉक्टर सांगतात? डॉ. दीक्षित यांची मोहीम व्यक्तिकेंद्रित नसून लोककेंद्रित आहे. म्हणूनच राज्य शासनाने स्थूलत्व निवारणासाठी सदिच्छा दूत म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती केली आहे. यामुळे या मोहिमेला अधिक गती येईल. शहर व ग्रामीण अशा सर्व पातळयांवर आहाराच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती निर्माण होऊन लोक आजारमुक्तीच्या दिशेने वाटचाल करोत, ही शुभकामना.

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा सुरू असलेला जगन्नाथाचा रथ आगामी काळातही चालूच राहायला हवा. या रथाला गावोगावच्या मंडळींनी साथ दिली पाहिजे, तरच यशात वाढ होईल.

[email protected]

प्रदीप नणंदकर

9422071666