उजनीच्या पाण्याचा अणूबाँब

 विवेक मराठी  20-Dec-2018

 सोलापूर विद्यापीठातल्या संशोधक विद्यार्थ्यांनी उजनीच्या पाण्यावर संशोधन केले आहे. हे पाणी हानिकारक असून लोकांना कोणत्याही क्षणी कर्करोग होण्याची भीती व्यक्त केली आहे, असे असले तरी हे संशोधन फार सखोलपणे झालेले नाही आणि तपासणीसाठी घेतलेले पाण्याचे नमुने शास्त्रीय पध्दतीने घेतले नाहीत असा खुलासा महापिलका आयुक्तांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेविषयी...

 

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/


गेल्या आठवडयात सोलापूर विद्यापीठातल्या संशोधकांनी सोलापूर शहरावर बाँब टाकला. सोलापूरचे नागरिक पितात ते पाणी धोकादायकच आहे असे नाही, तर ते प्यायल्याने कर्करोग होऊ शकतो, असा निष्कर्ष त्यांनी जाहीर केला. सोलापूरचे लोक उजनी धरणातले पाणी पितात. उजनी धरण हे भीमा नदीवर सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांच्या सीमेवरील पुणे जिल्ह्यात असलेल्या उजनी या गावात आहे. पुणे, नगर, उस्मानाबाद आणि सोलापूर या चार जिल्ह्यांना निरनिराळया पध्दतीने या धरणाचा लाभ होतो. मात्र सोलापूर हाच या धरणाचा खरा लाभार्थी जिल्हा आहे. उजनी धरण हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे धरण असून त्याचा कमाल पाणी साठा 120 टी.एम.सी., म्हणजे 120 अब्ज घनफूट एवढा आहे. सर्वसाधारणत: टी.एम.सी. म्हणजे काय हे लोकांना समजत नाही. पण एका तज्ज्ञ व्यक्तीने मला सोप्या भाषेत समजावून सांगितले होते की, एक टी.एम.सी. पाणी नीट जपून वापरले, तर एका जिल्ह्याचे कल्याण होते. एवढे पाणी असलेले हे धरण महाराष्ट्रातले सर्वात मोठे धरण आहे, शिवाय ते देशातल्या पहिल्या दहा धरणांतले एक आहे हे कळल्यावर उजनीचे पाणी हा किती मोठा जिव्हाळयाचा विषय असेल याचा अंदाज येतो.

संशोधन

अशा या धरणावर सोलापूरकर नेहमीच चर्चा करीत असतात. विशेषत: हे सर्वात मोठे धरण राज्यातल्या सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे तर उजनीचे पाणी हा सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वांचा नेहमीचाच चर्चेचा विषय असतो. त्यात आता किती पाणी आहे आणि ते आता किती टक्के भरले आहे, याची आकडेवारी सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना तोंडपाठ असते. म्हणून सोलापूर विद्यापीठातल्या काही संशोधक विद्यार्थ्यांनी या पाण्यावर संशोधन करायचे ठरवले. एवढे मोठे धरण शेजारी असूनही सोलापूर शहराला मात्र चार दिवसांआड आणि काही भागांत पाच दिवसांआड पाणी मिळते, म्हणून या विद्यार्थ्यांनी संशोधन करायचे ठरवले. त्यांनी पाण्याचे काही नमुने घेऊन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासले असता त्यांना या पाण्यात शिशाचा आणि पाऱ्याचाही अंश सापडला. केवळ सापडलाच असे नाही, तर या पाण्यातले या विषारी द्रव्यांचे प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षा कितीतरी जास्त असल्याचेही दिसले. परिणामी त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

शिशाचा आणि पाऱ्याचा अंश असलेले पाणी प्यायल्यास कर्करोग होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या या निष्कर्षाचे गांभीर्य वाढले. 'उजनीच्या पाण्यामुळे कर्करोग होण्याची भीती' अशा बातम्या छापून आल्या आणि सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजली. आपण पितो ते पाणी कर्करोगास कारणीभूत ठरते, हे कळल्याने लोक धास्तावले. ही धास्ती एकटया सोलापूर शहरापुरती मर्यादित राहिली नाही. कारण उजनी धरणाचे पाणी काही एकटया सोलापूरला दिले जात नाही. ते या परिसरातल्या 400 गावांना दिले जाते. त्यात बारामती, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, सांगोला आणि शेजारचे जिल्हा ठिकाण म्हणजे उस्मानाबाद यांसह कितीतरी खेडयांचा समावेश आहे. कर्नाटकातलीही अनेक खेडी उजनीचे पाणी पीत असतात. कर्करोगाच्या या निष्कर्षाने एवढया गावांतल्या लोकांना धास्ती बसली. आता आपल्याला कोणत्याही क्षणी कर्करोग होऊ शकतो, या कल्पनेने हे लाखो लोक अस्वस्थ झाले.

खुलासा

या गावांत सोलापूर शहर महत्त्वाचे, कारण सोलापूर ही जवळपास 11 लाख लोकसंख्येची स्मार्ट सिटी आहे. म्हणून या महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी हे संशोधन करणाऱ्या संशोधकांना बोलावून घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. हे संशोधन फार सखोलपणे झालेले नाही आणि तपासणीसाठी घेतलेले पाण्याचे नमुने शास्त्रीय पध्दतीने घेतले नाहीत, शिवाय त्यांनी केलेले परीक्षण धरणाच्या पाण्याचे आहे. लोक काही ते पाणी तसेच पीत नाहीत. पिण्याचे पाणी ज्या शुध्दीकरण केंद्रात शुध्द केले जाते, तिथले नमुने काही असे दूषित असल्याचे दिसलेले नाही. महापालिका पाण्याची सखोल तपासणी करून ते लोकांना देत असते. त्या तपासणीत काही पाऱ्याचा आणि शिशाचा अंश आढळलेला नाही, हे डॉ. ढाकणे यांनी या संशोधकांच्या नजरेस आणून दिले. त्या संशोधकांनी ही बाब मान्य केली. त्यावर असा खुलासा झाला की, धरणाच्या पाण्यात दूषित द्रव्ये आहेत, पण शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात ती नाहीत. तेव्हा शहराला पुरवले जाणारे पिण्याचे आणि धुण्याचे पाणी कर्करोगास कारणीभूत ठरणारे नाही. हा खुलासा झाल्याने लोकांचा जीव थोडा भांडयात पडला.

काही प्रश्न

असो. हे प्रकरण संपले, पण त्यामुळे सोलापूर, उजनी धरण आणि त्याचे पाणी हा विषय राज्यव्यापी चर्चेचा झाला. मुळात उजनी धरणात पारा आणि शिसेच आहे असे नाही. त्यात खूप काही आहे आणि हा मोठाच चर्चेचा विषय आहे. हे पाणी शुध्द करून पुरवले जाते. पण ते मुळात किती अशुध्द असावे याला काही मर्यादा असावी की नाही? याबाबत काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता असे सांगण्यात आले की, उजनी धरणाच्या पाण्यात केवळ कर्करोगालाच नाही, तर इतर अनेक रोगांना कारणीभूत ठरणारे जंतू आहेत आणि त्याबाबत सर्व संबंधित घटक उदासीन आहेत. झोपेत आहेत.

उजनी धरणात पुणे जिल्ह्यातल्या 10 धरणांचे आणि पुणे शहरासह जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रातले पाणी जमा होते. ही धरणे ज्या नद्यांवर आहेत, त्या नद्या सोळा आहेत. या नद्यांच्या खोऱ्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, बारामती आणि एम.आय.डी.सी.च्या अनेक औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतीतले रसायनयुक्त सांडपाणी, मोठया शहरांसह अनेक गावांतले सांडपाणी आणि मैलापाणी या नद्यांत आणि शेवटी उजनी धरणात सोडले जाते. या परिसरात 52 साखर कारखाने आहेत. एकटया सोलापूर जिल्ह्यात 29 साखर कारखाने सुरू असून हा देशातला सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा ठरला आहे. यातले अनेक कारखाने आपली मळी थेट, तर काही कारखाने आडमार्गाने याच धरणात सोडत असतात. एकंदरीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांतल्या आणि इतर अनेक गावांतल्या सांडपाण्यासाठी उजनी धरण हे डंपिंग क्षेत्र झाले आहे. या प्रदूषणामुळे हे पाणी मृत झाले असल्याने काही वेळा त्यातले मासे आपोआप मरून पाण्यावर तरंगताना दिसतात.

औद्योगिकीकरणांमुळे पाणी दूषित होते

 

 
जलतज्ज्ञ व संघटना काय म्हणतात..

सुप्रसिध्द जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी या धरणाला भेट दिली होती आणि या समस्येची चर्चा केली होती. त्यांना देण्यात आलेली माहिती ऐकून ते अवाक झाले आणि संतापून त्यांनी सोलापूरच्या लोकांची कानउघाडणी केली. ''सोलापूरचे लोक पुण्यातल्या आणि पिंपरी-चिंचवडच्या लोकांचे मलमूत्र पीत असतात'' असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. या पाण्यामुळे सोलापूर शहरात अनेक प्रकारच्या साथी पसरत असतात. स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण या शहरात नेहमीच आढळतात. कोणत्याही क्षणी या शहरात काविळीची साथ पसरण्याची शक्यता आहे. या दूषित पाण्यामुळे सोलापुरात चार-दोन घरांमागे एका घरात मूतखडा असलेला एक तरी रुग्ण आढळतो.

पुण्यातील समृध्द नदी परिवार या संघटनेचे संस्थापक सुनीलभाई जोशी यांनी भीमा नदीकाठच्या काही गावात प्रत्यक्ष जाऊन या पाण्याच्या दुष्परिणामांची पाहणी केली आहे. त्यांना लोकांत अनेक विकार पसरत असल्याचे दिसले. लोकांच्या रोगप्रतिकारशक्तीचा मोठया प्रमाणात ऱ्हास होत आहे, असे त्यांना दिसून आले. विशेषत: या भागात लोकांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे, असे सुनील जोशी यांनी सांगितले. ग्रामीण भागात विवाह होऊन एखादे वर्ष होताच पाळणा हलला नाही, तर चर्चा सुरू होते. पण अनेक कुटुंबांत चार चार वर्षे झाली, तरी पाळणा हलत नाही. आता कृत्रिम गर्भधारणेने अपत्यप्राप्ती होते, हे अशा लोकांना माहीत झाले आहे. परिणामी अशा डॉक्टरांची प्रॅक्टिस जोरात सुरू आहे.

सोलापुरात आणि पुण्यात हा धंदा तेजीत आहे. वृत्तपत्रात या फर्टिलिटी सेंटरच्या जाहिराती मोठया प्रमाणावर येत असतात. स्थानिक वृत्तवाहिन्यांवरही सातत्याने या लोकांचे स्क्रोल फिरत असतात. सोलापुरात 10 वर्षांत एखाद्या दवाखान्यात टेस्ट टयूब बालकाचा जन्म झाला, तर ती मोठी बातमी ठरायची; पण आता माझ्याच माहितीतल्या डॉक्टराने त्याच्या फर्टिलिटी सेंटरमध्ये वर्षभरात 180 टेस्ट टयूब बालके जन्माला आल्याचे सांगितले. केवळ माणसाच्याच नाही, तर जनावरांच्याही प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला असल्याने दूध धंदाही तोटयात आला आहे.

उजनी धरणाचे पाणी पिणारा सारा परिसर आता अनेक रोगांच्या शक्यतांच्या ज्वालामुखीवर वसलेला आहे. यातल्या कोणत्याही गावात किंवा विशेषत: सोलापूर शहरात कोणत्याही क्षणी कावीळ किंवा हेपाटायटिस बी अशा रोगाची मोठी आणि विनाशकारक साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा सुनीलभाई जोशी यांनी दिला.

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते? असा प्रश्न निर्माण होतो. हा वेगळया लेखाचा विषय आहे. पण मंडळ नेमके काय करते? हा प्रश्न आपल्यालाच पडला आहे असे नाही, तर खुद्द या मंडळालाही आपण नेमके काय करतो हा प्रश्न पडला आहे.

अरविंद जोशी

9370408926