'दिवस सुगीचे सुरू जाहले'

 विवेक मराठी  21-Dec-2018

 

हंगाम तोंडावर आला की सुगी सुरू होते आणि मग कंबर कसून कामाला लागावे लागते, तरच सुगीचा फायदा पदरात पाडून घेता येतो. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात सुगीची धावपळ काय असते ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट असली, तरी सांप्रतकाळात आपल्या देशात निवडणुका हाच मोठा हंगाम झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर निवडणुका घोषित होण्याच्या आधी सर्वच राजकीय पक्ष हातघाईवर येऊन कामाला भिडतात, कारण त्यांना निवडणूक जिंकायची असते. मात्र आम्ही राजकारण करत नाही, राजकारणनिरपेक्ष आहोत अशी दवंडी पिटणारी मंडळी जेव्हा निवडणुकीचा हंगाम लक्षात घेऊन बोलू लागतात, तेव्हा त्यांच्याकडे विशेषकरून लक्ष देण्याची गरज निर्माण होते.

साधारणपणे 2013च्या मध्यावर काही लोकांना या देशात असुरक्षित वाटायला लागले होते आणि त्यांचे हे वाटणे त्यांनी विविध माध्यमांतून खूप कळकळीने मांडले होते. काही मंडळींनी तर हा देश सोडून जाण्याची घोषणा केली होती. सर्वांचा आक्षेप हा सत्तेच्या राजकारणात होऊ घातलेल्या हिंदुत्वाच्या प्रवेशावर होता. देशात हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आला, तर आपण सुरक्षित राहणार नाही अशी ठाम खात्री असणारी मंडळी 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर अचानक अज्ञातवासात गेली. मध्येच कधीतरी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी थोडी हालचाल झाली. बिहार निवडणुकीच्या तोंडावर कोण्या अभिनेत्याच्या बायकोला हा देश असुरक्षित वाटू लागला आणि ही असुरक्षितता प्रसारमाध्यमातून तत्काळ व्यक्त केली गेली. निवडणूक संपली आणि पुन्हा सारे चिडीचूप झाले. या साऱ्या गोष्टीचा एवढया विस्ताराने विचार करण्याचे कारण एकच, की आता पुन्हा निवडणुकीचा हंगाम सुरू होत आहे आणि असुरक्षित वाटण्याची सुगीही सुरू झाली आहे. या हंगामात आपण किती असुरक्षित आहोत, देशात कसे अराजक माजले आहे हे उच्चरवात सांगितले, तरच सुगीचा फायदा उठवता येतो हे चांगल्या प्रकारे माहीत असलेल्या मंडळींनी पुन्हा एकदा आपल्या कंबरा कसल्या आहेत आणि ते मैदानात उतरले आहेत. आणि या सुगीची सुरुवात नसीरुद्दीन शहा यांनी केली आहे.

नसीरुद्दीन शहा यांनी हा देश असुरक्षित वाटू लागला असून आपला मुलगा कसा जगेल याची त्यांना काळजी लागून राहिली आहे. जमावाने आपल्या मुलावर हल्ला केला तर? अशी भीती त्यांना वाटू लागली असून त्यांनी ती माध्यमांतून व्यक्त केली आहे. तीन डिसेंबर रोजी बुलंद शहरात घडलेल्या घटनेमुळे नसीरुद्दीन शहा अस्वस्थ झाले आणि त्यांनी ती अस्वस्थता माध्यमांसमोर मांडली असे जरी वरवरचे चित्र असले, तरी ते खरे आहे असे मानण्यास आमचे मन तयार होत नाही. कारण नसीरुद्दीन शहा एक संवेदनशील कलाकार आहेत, तर मग बुलंद शहरात घडलेल्या घटनेवरची त्यांची प्रतिक्रिया इतक्या उशिरा का आली? कोणत्याही व्यक्तीची हत्या वाईटच. तिचा निषेध केला पाहिजे. पण अशा हत्येचे भांडवल करून संपूर्ण देशातील सामाजिक वातावरणावर, सामाजिक एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? बुलंद शहरात घडलेल्या घटनेचा तपासयंत्रणा पाठपुरावा करत आहेत. संबंधित आरोपींना योग्य ती शिक्षा होईल. पण त्या घटनेच्या आधाराने संपूर्ण देशात तशीच स्थिती असल्याचे चित्र उभे करण्यामागे कोणते हेतू आहेत? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहेत. पण नसीरुद्दीन शहाची लोकप्रियता आणि तथाकथित पुरोगाम्यांनी त्याला दिलेली साथ पाहता अशा प्रश्नाची उत्तरे कोण शोधण्याचा प्रयत्न करणार ?

आता नसीरुद्दीन शहा मैदानात उतरले आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी माध्यमांतून होड लागलीच आहे. अनेक तथाकथित पुरोगामी हा विषय उचलून धरतील आणि देशात असुरक्षितता  निर्माण झाल्याचा गलका करतील आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत असुरक्षितता, कट्टरवाद, मुस्लिमांचे अंधकारमय जीवन अशा वेगवेगळया विषयांवर पुरोगामी मंडळी बोलत राहतील. काही जण पुन्हा एकदा हा देश सोडण्याची घोषणा करतील, मात्र ते हा देश सोडून पाकिस्तानात जाणार की सीरियात, हे सांगणार नाहीत. एकूणच काय, तर लोकसभा निवडणूक होईपर्यंत हिंदुत्ववादी पक्षांना आणि संघटनांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मुस्लीम तुष्टीकरण करण्याचा नेहमीचा डाव सुरू झाला आहे. या सुगीत आपण जितकी महत्त्वाची कामगिरी बजावू, तितका आपण जास्त मोबदला मिळवू शकतो हे माहीत असल्यामुळे भावनिक आवाहनापासून ते वैचारिक आवाहनापर्यंत साऱ्याच पातळयांवर अनेक जण आपली पत्करलेली जबाबदारी पार पाडतील. नसीरुद्दीन शहा यांनी त्याला सुरुवात केली आहे.

एका बाजूला नसीरुद्दीन शहा यांनी देशाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला असताना पाकिस्तानच्या कैदेत सहा वर्षे खितपत पडलेला हमीद अन्सारी केंद्र शासनाच्या प्रयत्नामुळे भारतात परत आला आहे. भारताच्या सीमारेषेवर परत आल्यावर, आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला, ''मी मायदेशी परत आलो याचा मला खूप आनंद झाला आहे.'' नसीरुद्दीन शहा आणि त्यांच्या पाठीराख्यांनी हमीदच्या व्यक्तव्याची गंभीरपणे दखल घ्यायला हवी. कारण हमीद हा मुसलमान असूनही त्याला याच देशात आनंद वाटतो आहे. त्याचे देशाबाहेरच्या उपकृत करणाऱ्या कोणत्याही शक्तीकडे डोळे लागले नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यात असे असंख्य हमीद आहेत, जे या देशात जगतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटत नाही, कारण ते या देशावर प्रेम करतात, त्याला आपला मानतात. नसीरुद्दीन शहा आणि त्यांच्या पाठीराख्यांनी हे वास्तव समजून घेतले पाहिजे. पण ते तसे करणार नाहीत, कारण  आता त्यांच्या सुगीचा काळ सुरू झाला आहे. या सुगीचा पुरेपूर फायदा घेतल्याशिवाय
ते शांत होणार नाहीत.