नारी शक्तीचा जागर

 विवेक मराठी  24-Dec-2018

 

9 डिसेंबर 2018 रोजी अक्षयपात्र वृंदावन-मथुरा येथे नारी शक्ती कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन महिलांसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा तसेच मार्गदर्शन यांच्या माध्यमातून त्यांच्यासमोर असणाऱ्या निरनिराळया आव्हानांवर व समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी विचारविमर्श करावा, नारी शक्ती जागृत व्हावी, असा या कुंभाच्या आयोजनामागचा हेतू होता.


आपल्या देशात प्राचीन काळापासून अलाहाबाद, हरिद्वार, नाशिक-महाराष्ट्र आणि उज्जैन येथे कुंभमेळयाचे आयोजन केले जाते. पुढील वर्षी, म्हणजेच जानेवारी 2019मध्ये प्रयागराज-अलाहाबाद येथे कुंभमेळा होणार आहे. पूर्वी कुंभमेळयाचे महत्त्व हिंदू धर्मीयांसाठी केवळ धार्मिक कारणांपुरते मर्यादित नव्हते, तर कुंभमेळयांच्या निमित्ताने संपूर्ण भारतातून आलेले साधुसंत देशातील त्या त्या वेळच्या परिस्थितीचा परामर्श घेऊन वैचारिक मंथनातून समाजास जीवनव्यवहारासंदर्भात योग्य दिशा देण्याचे काम करीत असत. याचाच आधार घेऊन डॉ. भीमराव आंबेडकर विश्वविद्यालय आग्रा, तसेच पर्यटन विभाग उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 9 डिसेंबर 2018, मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया, रविवार विक्रम संवत 2075ला अक्षयपात्र वृंदावन-मथुरा येथे नारी शक्ती कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 1 व 2 डिसेंबर 2018 रोजी वाराणसी येथे पर्यावरण कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय युवा, समरसता या विषयांवरील कुंभदेखील आयोजित करण्यात आले आहेत.

वेदांमध्ये स्त्रीला अत्यंत महत्त्वपूर्ण, आदरयुक्त, उच्च स्थान दिलेले आहे. त्या स्त्रियांचे शिक्षण, दीक्षा, शील, गुण, कर्तव्य, अधिकार आणि सामाजिक भूमिका यांचे जे सुंदर वर्णन आहे, ते जगातील कुठल्याही धर्मग्रंथात नाही. त्यामुळे महिलांनी युगानुकूल बनून त्यांना आजच्या आव्हानांच्या वातावरणात सुखी-समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने या कुंभाची गरज होती. परन्धिर्योषा जिष्णु रथेष्ठा: - आधार राष्ट्र की हो नारी सुभग सदा ही (यजुर्वेद 22/22) या वैदिक मंत्राचा आधार घेऊन नारी शक्ती कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कुंभामध्ये संपूर्ण देशातील विविध क्षेत्रांतून आलेल्या प्रसिध्द, प्रबुध्द, सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन महिलांसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा तसेच मार्गदर्शन यांच्या माध्यमातून त्यांच्यासमोर असणाऱ्या निरनिराळया आव्हानांवर व समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी विचारविमर्श करावा, नारी शक्ती जागृत व्हावी, असा या कुंभाच्या आयोजनामागचा हेतू होता.

कुंभाच्या आदल्या दिवशी, म्हणजेच दि. 8 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 6.00 वाजता 'नारित्व का तेजोवलय' या चित्रकला प्रदर्शनाचे उद्धाटन झाले. या प्रदर्शनात वेदकालीन स्त्रियांपासून ते आजपर्यंतच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, युध्दनिपुण, कला, क्रीडा, गायन अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेल्या महान स्त्रियांची 60 चित्रे त्यांच्या संक्षिप्त माहितीसह ठेवण्यात आली होती. याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता 'आदिशक्ती नारी' ही नाटिका सादर करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी दि. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता उद्धाटन सत्र सुरू झाले. या उद्धाटन सत्राचा विषय 'भारतीय चिंतन एवं महिला' असा होता. उद्धाटन सत्रात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, उत्तर प्रदेशाचे राज्यपाल मा. राम नाईक, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, मथुरेच्या खासदार हेमामालिनी, अखिल भारतीय महिला समन्वय संयोजिका गीताताई गुंडे, पद्मश्री निवेदिताताई भिडे, उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा, पर्यटन मंत्री रीता बहुगुणा जोशी, शिक्षण राज्यमंत्री अनुपमा जयस्वाल व आग्रा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरविंद दीक्षित उपस्थित होते.

कुंभाच्या उद्धाटन सत्रात नारी शक्ती कुंभाच्या संयोजिका तसेच महिला समन्वयाच्या राष्ट्रीय संयोजिका माननीय गीताताई गुंडे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात ''नारी शक्ती कुंभाच्या आयोजनामागचा उद्देश विशद करताना सांगितले की देशातील महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. इतिहासात धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात महिलांनी आपला सहभाग नोंदविल्याचे पुरावे आहेत. परंतु गेल्या काही दशकांपासून समाजोत्थानासाठी महिलांचा सहभाग कमी झाल्याचे दिसून येते. ही स्थिती आपण सुधारण्याची गरज आहे. नारी शक्ती कुंभसारख्या कार्यक्रमांच्या आयोजनामुळे महिलांमध्ये नवीन ऊर्जेचा संचार होईल आणि त्या समाजोत्थानासाठी आपले योगदान देण्यास पुनश्च प्रवृत्त होतील,'' असे विचार मांडले.

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी समाजोत्थानासाठी महिलांच्या योगदानाबाबत आपले विचार मांडले. परराष्ट्रमंत्री सुषमाजी स्वराज यांनी ''भारतीय समााजात गेली अनेक वर्षे महिलांना अबला, असाहाय्य अशा शब्दांनी संबोधिले जाते. आपल्याला समाजाची ही मानसिकता बदलायची आवश्यकता आहे. ज्या देशात झाशीची राणी लक्ष्मीबाईसारखी लढवय्यी स्त्री आणि शिवाला छत्रपती शिवाजी बनवणारी जिजाबाईसारखी माता आहे, त्या देशात महिलांना असाहाय्य म्हणणे अन्यायकारक आहे. स्त्रियांनी आपली ताकद ओळखावी, आपल्या मुलींनादेखील कणखर बनवावे. मुलगा-मुलगी भेद न करता मुलांप्रमाणेच मुलीलाही सर्व क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी मदत करावी, त्यासाठी वेळप्रसंगी समाजमन बदलण्यासाठी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहावे'' असे विचार मांडले.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल मा. राम नाईक यांनी ''महिलांची शक्ती वाढली की देशाची ताकद वाढेल. महिलांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वत: आणि आपल्या मुलींना सुशिक्षित केले पाहिजे. असे म्हणतात की मुलगा शिकला की एक मुलगा शिक्षित होतो, परंतु जर एक मुलगी शिकली तर दोन कुटुंबे शिक्षित होतात. महिला आता सर्व क्षेत्रांत पुढे येत आहेत ही चांगली गोष्ट असून आता तर महिलांनी लढाईसाठी वापरण्यात येणाऱ्या विमानांचे चालक व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत'' असे विचार मांडले.

उत्तर प्रदेशच्या शिक्षण राज्यमंत्री अनुपमा जयस्वाल यांनी ''काही कुप्रथांनी महिलांची स्थिती दयनीय करून ठेवली आहे, अशा कुप्रथा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांच्या सशक्तीकरणामुळे श्रेष्ठ समाजाची कल्पना साकार होऊ  शकते. स्त्रियांनी आपली शक्ती ओळखावी. नारी शक्ती कुंभ नारी शक्तीच्या स्वप्नांची सुरुवात आहे'' असे विचार मांडले.

पर्यटनमंत्री रीता बहुगुणा जोशी यांनी वैदिक काळातील महिलांना मिळत असलेल्या सन्मानाचा उल्लेख करून तद्नंतरच्या काळात परकीय आक्रमणांमुळे स्त्रियांना समाजाकडून मिळणारी सापत्न वागणूक याचा आढावा घेतला. महिलांना पुन्हा एकदा तसाच सन्मान मिळवून देण्यासाठी समाजोत्थानात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज त्यांनी उद्धृत केली.

कुंभाच्या उद्धाटन सत्राच्या प्रमुख वक्त्या पद्मश्री निवेदिताताई भिडे यांनी हिंदू महिला चिंतन काय आहे यावर विचार केला पाहिजे हे सांगत असताना त्या पुढे म्हणाल्या की, ''शक्ती हे दुधारी अस्त्र आहे, त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. व्यक्तीचे मोठे स्वरूप कुटुंब, कुटुंबाचे मोठे स्वरूप एकात्मता आहे आणि एकात्मता हाच जीवनाचा मुख्य आधार आहे. जीवनाचे प्रयोजन 1) ईश्वरप्राप्ती, 2) कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवविकास इ.चा उत्कर्ष होण्यासाठी प्रयत्न करणे, 3) आत्मविकासाचा अनुभव घेणे असे असले पाहिजे. स्पर्धा न करता समाजोत्थानासाठी काम करावे. एकात्मतेमध्ये समानता नाही आत्मीयता आहे. मानव मुक्ती आंदोलनाबद्दल आपण विचार केला पाहिजे, स्त्रीमुक्तीबद्दल नाही. स्त्री शक्ती आहे. ती निर्माण आणि विनाश दोन्हीही करू शकते. महिला स्वत:चा विकास करू शकतील असे त्यांचे जीवन आपल्याला बनवायचे आहे. स्त्रीचे सौंदर्य तिच्या आत्म्यात आहे. भारतीय स्त्रीचे आंतरिक सौंदर्य तिच्या चेहऱ्यावरील तेजातून प्रकट होते. त्यामुळे स्त्रीने आपल्या आंतरिक सौंदर्याला ओळखले पाहिजे. एकात्म मानव भावाची जाणीव ठेवून एकमेकींना साहाय्य केले पाहिजे. आपणच आपल्या उत्थानासाठी प्रयत्न करायला हवेत'' असे विचार मांडले.

उद्धाटन समारंभानंतर चार समानांतर सत्रांचे आयोजन केले गेले होते. त्यात 'राष्ट्रोत्थानमे महिलाओंकी भूमिका', 'समर्थ परिवार - समर्थ भारत', 'वर्तमान चुनौतियां एवं समाधान' आणि 'समाज परिवर्तन मे प्रयोगशील महिला' हे चार विषय मुख्यत्वेकरून होते. या चारही सत्रांमध्ये त्या त्या विषयातील तज्ज्ञ व अभ्यासू महिलांनी मार्गदर्शन केले. 

दुपारी 3.30 वाजता सांगता सत्र सुरू झाले. या सत्रासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, मथुरेच्या खासदार हेमामालिनी उपस्थित होत्या. त्याचबरोबर देशातील विविध क्षेत्रांत विशेष कार्य केलेल्या महिलांचा सन्मान निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आला. यात मुख्यतः उत्तराखंडच्या महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून देऊन आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. किरण नेगी, उघडयावर शौच मुक्ती मोहीम चालविणाऱ्या कमलेशकुमारी, वयाच्या 17व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करणारी शिवांगी पाठक, नागालँडमधील आदिवासी स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारी तासील इन जिलाग, देशाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नेतृत्व करणारी अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस, जोधपूर येथे अनुबंध वृध्दकुटिर स्थापन करून वृध्दांना आनंददायक आयुष्य मिळवून देणाऱ्या अनुराधा अडवाणी, मदर ऑॅन व्हील्स संस्थेची स्थापना करून भारतातून लंडनपर्यंत कारने प्रवास करत 22 देशांना भेट देणाऱ्या माधुरी सहस्रबुध्दे, डॉ. शीतल पांडे आणि डॉ. उर्मिला जोशी इ. कर्तृत्ववान महिलांचा समावेश होता. संध्याकाळी 6.00 वाजता वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

वृंदावनमध्ये वर्षभर श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते. परंतु नारी शक्ती कुंभाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून सामाजिक कार्य करणाऱ्या, विविध रंगरूप, वेशभूषा केलेल्या हजारो महिलांची उपस्थिती हा वृंदावनवासीयांसाठी आणि आलेल्या भक्तांसाठी एक कुतूहलाचा विषय होता. या कुंभात देशभरातून 4675 महिला सहभागी झाल्या होत्या. या कुंभातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्यातील शक्तीचा खरोखरच वापर केला पाहिजे, एकमेकींना पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, समाजोत्थानासाठी आपण खरोखरच योगदान देऊ शकतो, अशी प्रेरणा मिळाली. या कुंभामुळे अक्षयपात्रच्या विस्तीर्ण परिसरात देशभरातील महिलांना एकमेकींशी ओळख करून घेण्याची संधी मिळाली. देशाच्या विविध प्रदेशांतील स्त्रियांची परिस्थिती समजण्यास मदत झाली. देशाची संस्कृती मजबूत व्हायला अशा कुंभाची आवश्यकता आहे, हे अधोरेखित झाले. एकंदरीतच आपल्यापुढील आव्हानांना सामारे जाण्यासाठी लागणारी ऊर्जा, प्रेरणा 'नारी शक्ती कुंभ - एक वैचारिक मंथन' या अतिशय सुंदर कार्यक्रमामुळे प्राप्त झाली.

नीलिमा चिमोटे

9869228697

केंद्रीय कार्यसमिती सदस्य

भारतीय मजदूर संघ व कोकण प्रांत महिला समन्वय सदस्य