उपेक्षित राष्ट्रीय सौर दिनदर्शिका (2)भाग - 2

 विवेक मराठी  25-Dec-2018

स्वातंत्र्यानंतर भारतात साधारणत: तीस निरनिराळया प्रकारच्या कालगणना पध्दती प्रचारात होत्या. म्हणून एक समिती नेमून समितीने सर्व देशभरासाठी एकच राष्ट्रीय कॅलेंडर तयार करावे, असे ठरले. त्यानुसार समिती नेमून भारतीय सौर कालदर्शिका तयार करण्यात आली आणि भारत सरकारने तिचा स्वीकार केला. मात्र अद्यापही ही कालगणना व्यवहारात वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे.
गील लेखात आपण पाहिले की भारतात ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी इथे भारतीय कालगणनेनुसार सौर व चांद्र अशी दोन्ही पंचांगे प्रचलित होती. त्यामधील चांद्रपंचांग सर्वसामान्यांच्या दृष्टीने अधिक सोपे होते, कारण दर रात्री चंद्राच्या कलेवरून तिथीचा अंदाज काढता येतो.

मात्र ब्रिटिशांनी ही दोन्ही पंचांगे रद्द ठरवून ब्रिटिश कॅलेंडर लागू केले व ते सुमारे दीडशे वर्षे - म्हणजे सुमारे पाच पिढया लागू होते. जरी त्या काळांत भारतीय पध्दतीने पंचांगे तयार होत राहिली, तरी दर पुढची पिढी त्यातील थोडा थोडा भाग विसरत होती व आधुनिकतेकडे कल असणारी मंडळीदेखील पंचांग म्हणजे वैश्विक गणित हे समीकरण विसरून पंचांग म्हणजे थोतांड असे म्हणण्यात धन्यता मानू लागली होती. तरीही पंचांगांचा अभ्यास करून पुढील वर्षाचे पंचांग बिनचूक तयार करण्यात प्रवीण असणारी मंडळी होती. त्याहीपुढे जाऊन कालमानाप्रमाणे पंचांगाच्या गणितामध्ये घडत असलेल्या सूक्ष्म बदलांचे भान ठेवून त्यामध्ये योग्य त्या सुधारणा करू शकणारे क्षमतावान विद्वानही होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, शंकर बाळकृष्ण दीक्षित, माधवचंद्र चट्टोपाध्याय, पं. मदनमोहन मालवीय, श्री संपूर्णानंद इत्यादींनी कालगणना सुधारणेच्या दृष्टीने भरपूर प्रयत्न केले होते, हा अगदी अलीकडील इतिहास आहे.

1947मध्ये भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि मग पारतंत्र्याची प्रतीके झुगारून देऊन, एक स्वतंत्र देश या नात्याने स्वत:ची अशी राष्ट्रीय प्रतीके निर्माण करण्यास जोमाने सुरुवात झाली. उदा. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत इत्यादी. त्याचबरोबर आपली स्वतंत्र राष्ट्रीय कालगणना असावी असा विचार पुढे आला. तेव्हा भारतात साधारणत: तीस निरनिराळया प्रकारच्या कालगणना पध्दती प्रचारात होत्या. म्हणून एक समिती नेमून समितीने सर्व देशभरासाठी एकच राष्ट्रीय कॅलेंडर तयार करावे, असे ठरले. हे केल्याने संपूर्ण भारतभर एकच राष्ट्रीय कालगणना असेल, जेणेकरून भारतीयांच्या मनातील राष्ट्रीय अस्मितेची व एकात्मतेची भावना वाढीस लागेल, तसेच राष्ट्रीय स्तरांवरील सुट्टया ठरविण्यासाठी अशा दिनदर्शिका उपयोगी ठरतील, हाही विचार झाला.

तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या सल्ल्याने भारताच्या वैज्ञानिक व औद्योगिक मंडळाने नोव्हेंबर 1952मध्ये या विषयाचा अभ्यास करण्यासाठी 'कॅलेंडर रिफॉर्म' कमिटीची स्थापना केली. प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा हे या समितीचे अध्यक्ष होते. यातील अन्य सदस्य

1) प्रा. ए.सी. बॅनर्जी (अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू)

2) डॉ. के.ल. दप्तरी (बी.ए., एल.टी., डी.लिट., नागपूर)

3) ज.स. करंदीकर (संपादक, केसरी, पुणे)

4) डॉ. गोरखप्रसाद (गणित विभागप्रमुख, अलाहाबाद विद्यापीठ)

5) प्रा. आर.व्ही. वैद्य (माधव कॉलेज, अलाहाबाद)

6) एन.सी. लाहिरी (पंचांगकर्ते, कलकत्ता)

असे होते. हे सर्व पंचांगाच्या विभिन्न मुद्दयांशी निगडित विषयांमध्ये तज्ज्ञ असे लोक होते.

त्यांच्या शिफारशींनुसार व त्यांनी तयार केलेल्या भारतीय सौर कालदर्शिकेचा स्वीकार करून भारत सरकारने 28 मार्च 1957 या दिनांकापासून, म्हणजेच 1 चैत्र 1879 या भारतीय सौर दिनांकापासून ते लागू केले. सर्व शासकीय राजपत्रांमध्ये व राजकीय पत्रव्यवहारात सौर दिनांकाचा उल्लेख असेल, तरच ती कागदपत्रे वैध ठरतात. खासकरून परराष्ट्रांशी जे करार ठरतात, त्यावर आवर्जून भारतीय सौर दिनांक लिहावाच लागतो. सर्व बँकांनी सौर दिनांकाचा अंगीकार करावा, असे रिझर्व्ह बँकेनेदेखील आदेश काढले असल्याने बँक व्यवहारात आपण सौर दिनांक असा उल्लेख करीत हा दिनांक लिहिला, तर बँक ते कागदपत्र नाकारू शकत नाही. पूर्वी काही बँकांनी नकार दिल्यावरून रिझर्व्ह बँकेने त्यांना दंड ठोठावल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

आता राष्ट्रीय दिनदर्शिका तयार करताना समितीने काय सूत्र वापरले, ते आपण पाहू या. देशात त्या वेळी वापरात असणाऱ्या सर्व पंचांगांची तपासणी करून संपूर्ण भारतासाठी शास्त्रीय पध्दतीवर आधारलेली, बिनचूक दिनदर्शिका तयार करण्याचे काम समितीवर होते. समितीने देशातील विविध पंचांगकर्त्यांना व जनतेला आपली मते कळविण्याचे आवाहन केले. त्यातून समितीला एकूण 60 पंचांगे प्राप्त झाली. त्या सर्वांचा अभ्यास करून, भारताची अधिकृत दिनदर्शिका म्हणून 'भारतीय सौर दिनदर्शिके'ची रचना करण्यात आली.

 

भारतातील चांद्रपंचांगानुसार चैत्र प्रतिपदेला, म्हणजेच गुढीपाडव्याला वर्षारंभ होतो, जो 22 मार्चच्या जवळपास असतो, तर सौर कालगणनेत वसंतसंपात अर्थात 22 मार्च अधिक महत्त्वाचा आहे. सबब राष्ट्रीय दिनदर्शिकेसाठी 22 मार्च हाच वर्षारंभ ठरविण्यात आला. 22 मार्च हा विषुवदिन आहे. सूर्य दररोज सरासरी 1 अंश पूर्वेकडे सरकतो आणि सुमारे 365 दिवसांत आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्याच्या या भासमान मार्गास 'आयनिक वृत्त' असे म्हणतात. आयनिक वृत्त व विषुववृत्त दोन ठिकाणी एकामेकांस छेदतात. या बिंदूपाशी सूर्य आला असता पृथ्वीवर प्रत्येकी 12-12 तासांचे, म्हणजेच समसमान लांबीचे दिवस व रात्र असतात. 22 मार्च आणि 23 सप्टेंबर हे ते दिवस. यापैकी 22 मार्च रोजी सूर्य वसंतसंपातबिंदूवर असतो. या दिवसात वसंत ॠतू सुरू असतो. 22 मार्च रोजी विषुववृत्तावर असणारा सूर्य आयनिक वृत्तावर उत्तरेकडे जात जात 22 जूनला उत्तरतम अंतरावर (कर्कवृत्तासमोर) येतो. त्या दिवसापर्यंत उत्तरायण चालू असते. पण 22 जूनला ते संपून सूर्याचे दक्षिणायन (दक्षिणेकडे वाटचाल) सुरू होते. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी पुन्हा सूर्य विषुववृत्तासमोर असल्याने दिवस व रात्र समसमान असतात. सूर्याचा हा दक्षिणाभिमुख प्रवास 22 डिसेंबर रोजी थांबतो. या दिवशी सूर्य दक्षिणतम अंतरावर (मकरवृत्तासमोर) येतो व परत उत्तरेकडे वाटचाल सुरू करतो.

पृथ्वीवरून दिसणारे सूर्याचे हे भासमान भ्रमण नियमितपणे व अखंडितपणे चालू असते. त्यावरच आधारित कालगणना डॉ. साहा यांच्या समितीने सुचविली. 'भासमान भ्रमण' असा शब्दप्रयोग करण्याचे कारण म्हणजे, वास्तवात सूर्य हा स्थिर आहे. पृथ्वी ही स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे आपल्याला सूर्य उगवला, मावळला असे वाटते. त्याचबरोबर आकाशात निरनिराळया राशींमधूनदेखील पृथ्वी फिरत असते. आपण पृथ्वीवर असल्याकारणाने आपल्याला पृथ्वी स्थिर व सूर्य चल असल्याचा भास होतो. म्हणून याला सूर्याची भासमान गती असे म्हणतात.

समितीने भासमान भ्रमणाशी निगडित चारही दिवस हे दर तिमाहीसाठी प्रारंभदिन ठरवून या दिनदर्शिकेची व खगोलीय घटनांची सांगड घातली. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ..... ही नावे भारतात सर्वत्र प्रचलित असल्याने सर्व महिन्यांची नावे तीच ठेवण्यात आली आहे.  मार्गशीर्ष महिन्याचे अग्रहायण हे नाव भारतात बहुसंख्येने प्रचलित आहे, तेच समितीने घेतले.

या दिनदर्शिकेनुसार महत्त्वाचे दिवस -

  1. चैत्र - 22 मार्च - वसंतसंपातबिंदू
  2. आषाढ - 22 जून - दक्षिणायन प्रारंभबिंदू
  3. आश्विन - 23 सप्टेंबर - शरदसंपातबिंदू
  4. पौष - 22 डिसेंबर - उत्तरायण प्रारंभबिंदू

ॠतुचक्र व महिने यांचे नाते असे राहील - फाल्गुन व चैत्र - वसंत ॠतू, वैशाख-ज्येष्ठ - ग्रीष्म ॠतू, आषाढ-श्रावण - वर्षा ॠतू, भाद्रपद-अश्विन - शरद ॠतू, कार्तिक-मार्गशीर्ष - हेमंत ॠतू व पौष-माघ - शिशिर ॠतू.

365 दिवसांची महिनावार विभागणी करताना वैशाख ते भाद्रपद हे सलग पाच महिने प्रत्येकी 31 दिवसांचे, तर आश्विन ते फाल्गुन हे सलग सहा महिने प्रत्येकी 30 दिवसांचे केले आहेत. चैत्र महिन्यात सामान्य वर्षात 30, तर वृध्दिवर्षात (लीप वर्षात) 31 दिवस असतील. या विभागणीमागेही शास्त्रीय कारण आहे. पृथ्वी सूर्याभोवती शुध्द गोलाकार मार्गाने न फिरता विवृत्ताकार मार्गाने फिरते. विवृत्तास दोन केंद्रबिंदू (नाभीय बिंदू) असतात. ते विवृत्ताच्या मध्यापासून काही ठरावीक अंतरावर असतात. सूर्य यांपैकी एका बिंदूवर असतो. त्यामुळे पृथ्वीची कक्षेची एक बाजू सूर्यापासून जवळ, तर दुसरी बाजू सूर्यापासून दूर असते. ज्या वेळी पृथ्वी उपसूर्य म्हणजेच सूर्यापासून जवळ असणाऱ्या कक्षेच्या भागात असते, त्या वेळी सूर्याची भासमान गती जास्त असते, तर जेव्हा पृथ्वी अपसूर्य भागात (सूर्यापासून दूर) असते, तेव्हा सूर्याची भासमान गती कमी असते. त्यामुळे वसंतसंपातापासून शरदसंपातापर्यंतच्या प्रवासात सूर्याला 185 दिवस लागतात, तर शरदसंपातापासून वसंतसंपातापर्यंतच्या प्रवासाला 180 दिवस पुरतात. त्यामुळे सूर्याचा मेष ते कन्या राशीत असण्याचा काळ हा तूळ ते मीन राशीत असण्याच्या काळापेक्षा जास्त आहे. म्हणून वैशाख ते भाद्रपद हे महिने 31 दिवसांचे, तर आश्विन ते फाल्गुन हे महिने 30 दिवसांचे असतात. 1 चैत्र या दिवशी सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो. 1 वैशाख या दिवशी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो. अशा प्रकारे 12 महिने एकेका राशीशी निगडित आहेत.

'कॅलेंडर रिफॉर्म कमिटी'ने तयार केलेली ही नवी कालगणना शासनाने 1 चैत्र 1879 (22 मार्च 1957) या दिवसापासून स्वीकारली व पुढीलप्रमाणे निर्णय घेतला.

1) भारताच्या गॅझेटवर इंग्लिश दिनांक नंबराबरोबर नवीन भारतीय दिनांक छापण्यात येईल.

2) आकाशवाणीवरून (तसेच साध्या दूरदर्शनवरून) निरनिराळया प्रादेशिक भाषांत वार्ता सांगताना इंग्लिश तारखांबरोबर नवीन भारतीय दिनांक सांगण्यात येईल.

3) सरकरी कॅलेंडरवर इंग्लिश तारखांच्या जोडीने नवे भारतीय दिनांकही दाखविण्यात येतील.

अशा प्रकारे केलेली दिनदर्शिका लागू होऊन आज 52 वर्षे उलटून गेली, तरी या दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार झालेला नाही. त्यामुळे ही दिनदर्शिका तयार करण्यामागचा जो हेतू होता, तो साधला गेला नाही. भारतीय पंचांगातील नक्षत्रे, महिने, वार या शास्त्रीय पायावर आधारित गोष्टींचा पुरस्कार न करता अशास्त्रीय अशा ग्रेगोरियन कॅलेंडरचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने लोक तोच वापरत राहिले. राष्ट्रीय सौर कॅलेंडरचा स्वीकार संसदेने केला, तरी लोकजीवनात उतरण्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

डॉ. साहा समितीने संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून ही दिनदर्शिका जागतिका स्तरावर पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला होता. त्याऐवजी ती आठवणीत मागे पडत गेल्याचे दिसून येते. फक्त शासकीय औपचारिक राजपत्रांमध्ये व नैमित्तिक पत्रव्यवहारात, तसेच इतर राष्ट्रांशी करारपत्र करताना, भारतीय सौर दिनांकाचा उल्लेख केला जातो.

खरे तर आपल्यापैकी प्रत्येकाने सौर दिनदर्शिका वापरण्याचे ठरविले तरच ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. पण तसे न घडण्यामागे अस्मितेची जाणीव नसण्याबरोबरच एक व्यावहारिक समस्या आहे, असे मला वाटते, म्हणून तोही ऊहापोह इथे करीत आहे.

पूर्वीदेखील भारतात 'परशुराम शक' या नावाने एक सौर कालगणना प्रचारात होती. आजही केरळमध्ये तिचे अस्तित्व टिकून आहे. शिवाय, संपूर्ण जगभर ग्रेगोरियन पध्दत असताना आपले वेगळे कॅलेंडर कशाला? असा प्रश्न काहींना पडतो. परंतु, आपल्यापैकी किती जण प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय व्यवहार करतात? तर लोकसंख्येपैकी फक्त 1 टक्का लोकांचे परकीयांशी प्रत्यक्ष व्यवहार चालतात. मग उरलेल्या 99 कोटी लोकांना ही दिनदर्शिका स्वीकारण्यास काहीच अडचण नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या चलनात केलेले बदल स्वीकारले गेले. त्याचबरोबर वजन-मापांकरिता नव्याने प्रचारात आणली गेलेली मेट्रिक पध्दत तर बहुसंख्य जनता अशिक्षित असणाऱ्या भारताने इतर प्रगत देशांपेक्षाही सहजतेने अंगीकारली. आजही अमेरिका, इंग्लंडसारख्या काही प्रगत देशांमधील सर्वसामान्य जनता मेट्रिक (दशमान) पध्दतीस फारशी सरावलेली नाही. याउलट भारतात मात्र आज सर्व दैनंदिन व्यवहार याच पध्दतीने होतात. त्यामुळे राजकीय व सामाजिक इच्छाशक्तीच्या बळावर कालगणना पध्दतीतील परिवर्तनदेखील खचितच शक्य आहे. आणि भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 1/6 आहे. त्यामुळे परकीयांची अशास्त्रीय तपशील असलेली कालगणना झुगारून देऊन स्वदेशी व त्याचबरोबर संपूर्णत: विज्ञाननिष्ठ अशी भारतीय राष्ट्रीय कालगणना वापरात आणून तिचा प्रसार करण्याचा संकल्प जर प्रत्येक भारतीय करेल, तर निश्चितच ही कालगणना वैश्विक वैज्ञानिक कालगणना म्हणूनही जगमान्यता प्राप्त करेल, यात शंकाच नाही.

(आभार प्रकटन - या लेखातील काही भाग जनता सहकारी बँकेकडून दर वर्षी छापल्या जाणाऱ्या सौर कॅलेंडराबाबत माहितीवरून घेतला आहे.)

समाप्त

लीना मेहेंदळे

[email protected]

9869039054