व्यवसाय दिशा सहल

 विवेक मराठी  26-Dec-2018

व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाप्रमाणे पर्यटनाचे, सहलीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. विदर्भातल्या काही तरुणांनी मात्र नुसतेच मनोरंजन, विरंगुळा यापुरता विचार न करता व्यावसायिक दृष्टीने उपयुक्त ठरेल अशी सहल काढली. विदर्भातल्याच औद्योगिक, व्यावसायिकदृष्टया महत्त्वाच्या स्थळांना त्यांनी भेट दिली आणि तेथील माहिती जाणून घेतली. व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा त्यात नवनवे प्रयोग करू पाहणाऱ्यांसाठी हा उपक्रम नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

संतांची भूमी म्हणून प्रसिध्द असलेल्या परभणी जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. गोदामाईच्या स्पर्शाने पावन झालेली काळी कसदार जमीन, येथील कष्टकरी व प्रामाणिक असलेला शेतकरी समाज व वातावरण, देशात सर्व ठिकाणी पोहोचता येईल असे रेल्वे जंक्शन. असे असूनसुध्दा जिल्हा व्यावसायिकदृष्टया मागास का? असा प्रश्न कायम मनात होता. 'व्यावसायिक दिशेचा अभाव' असे उत्तर समोर आले, म्हणून अनेक दिवसांपासून मनात अशा विषयासाठी येथील शेतकरी युवकांना काही ठिकाणी घेऊन जायचे, या कल्पनेचे मूर्त स्वरूप म्हणजे 'व्यवसाय दिशा सहल'.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सहा शेतकरी युवक या दोन दिवसांच्या (11-12 ऑगस्ट) सहलीसाठी निश्चित करून 11 ऑगस्टला शनिवारी परभणीमार्गे अकोल्याला रेल्वेने प्रयाण केले.

अकोला येथील आदर्श गोशाळेने सुरुवात झाली. गोशाळेतील गोमयी प्रसन्न वातावरणात दुपारचे स्वादिष्ट भोजन केल्यानंतर रमाकांतजी भोपळे (मुख्य अधिकारी) यांनी 500 देशी गाईंपासून दैनंदिन वापराचे, तसेच औषधी उत्पादने निर्मिती संदर्भात मार्गदर्शन केले. अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणी या सर्व उत्पादन-विक्रीचे एक भव्य केंद्र आहे, तेथून काही वस्तू खरेदी करून मुक्कामी शेगावला प्रयाण केले.

मुक्कामी असताना तत्काळ करण्याजोगा एक व्यावसायिक विषय सर्वानुमते समोर आला, तो म्हणजे गो-उत्पादन विक्री. हा लेख वाचताना सहलीतील काही युवकांची स्थानिक ठिकाणी विक्री चालू असेल.

6मीण विज्ञान केंद्र (Center of Science for villages), वर्धा या ठिकाणी दुपारी पोहोचल्यावर सोहम पंडया (कार्यकारी संचालक) यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. व्यवसाय विषयातील बारकावे त्यांनी स्पष्ट करून त्यांच्या केंद्रातील प्रयोग समजावून सांगितले. यात कमी खर्चातील वातानुकूलित घर, बेअरिंग असलेली बैलगाडी, मधुमक्षिका सुरक्षा पोशाख, औषधी वनस्पती, लिंबोळी अर्क निर्मिती इ.बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या सर्व विषयांसाठी येथे सशुल्क प्रशिक्षण व्यवस्था आहे. याच ठिकाणी योगायोगाने विदर्भ प्रांत किसान संघ बैठक असल्याने दिनेशजी (अ.भा. संघटन मंत्री) व दादा लाड (महाराष्ट्र प्रदेश स. मंत्री) यांची भेट झाली.  MGIRI  Mahatma Gandhi Institute for Rural Industrialization) या ठिकाणी ग्रामीण भागात करण्यासारख्या विविध उत्पादनांची - दैनंदिन वापरातील सौंदर्यप्रसाधने, बेकरी पदार्थ, पंचगव्य उत्पादने, जैविक खत व विविध अर्क निर्मिती इ.ची - माहिती मिळाली.

मुख्य आकर्षण म्हणजे एलईडी निर्मिती, स्पिरुलिना (उच्च प्रतीची पोषक तत्त्वे असलेली वनस्पती), कापसापासून कपडा (छोटया यंत्राद्वारे प्रक्रिया) या सर्व विषयांचे सशुल्क प्रशिक्षण निवास व्यवस्थेसह, अशी या संस्थेची योजना आहे.

शेवटी नागपूर येथे राजकुमार ऍग्रो इंजीनिअरिंग या कंपनीला भेट दिली. येथे अनेक प्रकारच्या मशीन्स विक्रीस उपलब्ध असलेल्या पाहिल्या. स्वयंपाकघरातील तेल घाणा, विविध प्रकारचे ग्राइंडर्स, पेलेटिंग यंत्र, चारा यंत्र, नर्सरीसाठी लागणारी विविध उत्पादने याची माहिती मिळाली.

संघ स्वयंसेवकांसाठी प्रेरणास्थान असलेले  नागपूर येथील स्मृती मंदिर व मोहित्यांचा वाडा (या ठिकाणी 1925च्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली) येथे भेट देऊन समीरजी क्षीरसागर (प्रचारक, केंद्रीय कार्यालय) यांच्याशी झालेल्या संवादाने सहलीची सांगता झाली.

परतीच्या प्रवासात सर्वांच्या चेहऱ्यांवर समाधान दिसले. जाताना मोबाइलचा वापर मनोरंजनासाठी करणारे सोबती देशभरातील विविध ठिकाणचे ज्वारी, कडबासाठीचे बाजारभाव पाहण्यात दंग होते. व्हॉट्स ऍपवर शुभेच्छा पाठवणारे सहलीमध्ये काय मिळाले हे इतराना सांगत होते. काही जण आपल्या डायरीमध्ये पुढे काय काय करायचे, याचे मुद्दे काढत होते. हे दृश्य पाहिल्यानंतर सहलीचा उद्देश यशस्वी झाल्याने मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती काही वेगळीच होती.

चंद्रशेखर अळनुरे

9552513501