यूएईमधील श्रीमंत भारतीयांच्या यादीत डॉ. धनंजय दातार

 विवेक मराठी  03-Dec-2018

 

यूएईमधील श्रीमंत भारतीयांच्या यादीत डॉ. धनंजय दातार

मुंबई :  दुबईस्थित 'अल अदिल ट्रेडिंग'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना 'अरेबियन बिझनेस'तर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (यूएईमधील) 2018 या वर्षासाठीच्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या सूचीत 18वे मानांकन देऊन गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे 'मसाला किंग' या नावाने ओळखले जाणारे डॉ. दातार हे या सूचीतील एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत.

येथवरच्या प्रवासात, मुंबईच्या उपनगरी भागात दारोदारी फिरून फिनाइल, साबण यांसारख्या वस्तू विकण्यापासून ते दुबईत वडिलांच्याच छोटयाशा किराणा दुकानात मदतनीस म्हणून काम करण्यापर्यंत अनेक खडतर अनुभव डॉ. दातार यांनी घेतले आहेत. वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाचे त्यांनी मोठया उद्योगात रूपांतर केले. त्यांचा 'अल अदिल' हा ब्रँड आज जगभरात प्रसिध्द आहे. 40 सुपर स्टोअर्सची साखळी, मसाले उत्पादनाच्या दोन कंपन्या आणि 2 फ्लोअर मिल्स असा या समूहाचा पसारा आखाती देशांमध्ये पसरला आहे. 12.7 लाख डॉलर्स इतकी त्यांची संपत्ती असल्याचे 'अरेबियन बिझनेस'ने म्हटले आहे.

''अरेबियन बिझनेस' हे जगातील अत्यंत विश्वसनीय प्रसारमाध्यमांपैकी एक असून, त्यांनी आखाती प्रदेशातील प्रगतीसाठी माझ्या योगदानाची दखल घेऊन मला मानांकन दिले आहे. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. शक्तिशाली आणि प्रभावी भारतीय नेतृत्वाचा गौरव करणे हा या मानांकनाचा हेतू आहे. या कर्तृत्ववान भारतीय उद्योजकांनी दूरदृष्टी, सचोटी व नेतृत्व यांच्या आधारे आपल्या भागधारकांसाठी, तसेच अर्थव्यवस्थांसाठी भांडवलनिर्मिती करून पश्चिम आशियात अत्यंत यशस्वी कंपन्या स्थापन केल्या आहेत'' अशी प्रतिक्रिया डॉ. दातार यांनी व्यक्त केली.

डॉ. दातार म्हणाले, ''पुरस्कारांमुळे आपल्या कार्याची जबाबदारी वाढते. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून ग्राहकांना वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करत राहू. हा सन्मान आमच्या संपूर्ण संघटनेच्या समर्पित सांघिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आमच्या प्रयत्नांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीच्या शासकांचाही मी आभारी आहे.''