संस्कृतीचे वैचारिक मंथन

 विवेक मराठी  31-Dec-2018

 


 

***सत्यप्रकाश मिश्रा***

डॉ. राममनोहर लोहिया अवध विद्यापीठाच्या प्रांगणात 15 आणि 16 डिसेंबरला समरसता कुंभ झाला. संपूर्ण भारताच्या वेगवेगळया भागांतून आलेल्या तीन हजार सहभागींच्या साक्षीने वेगवेगळया पंथ-संप्रदायांमधील संत-महात्म्यांनी आणि विद्वानांनी समरसतेवर आपले परखड आणि स्पष्ट विचार सांगितले.

विश्वबंधुत्व आणि वसुधैव कुटुंबकम् यासारख्या उदात्त मंत्रांशी जगाची ओळख करून देणाऱ्या भारतात आजही स्पृश्य आणि अस्पृश्यच्या धारणा खोल जडलेल्या आहेत. जातवादाचे हे विष हिंदू समाजात कधी आणि कसे पसरत गेले आणि त्याने देशाला आणि समाजाला आपल्या विळख्यात घेतले, हा आजही चर्चेचा विषय आहे. पण जेव्हा कुंभाचा विषय येतो, तेव्हा आपल्यासमोर आपल्या समाजाच्या हृदयात श्रध्देचा एक सागर दिसायला लागतो. श्रध्देच्या या प्रवाहात आनंदाने बुडी मारणाऱ्यांना आजपर्यंत कधी कुणी जात विचारली नाही. याच पवित्र कुंभ महापर्वाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने वेगवेगळया ठिकाणी पाच वैचारिक कुंभाचे आयोजन केले आहे. वाराणसीमध्ये पर्यावरण कुंभ, मथुरामध्ये नारी शक्ती कुंभ आणि त्यानंतर तिसरा वैचारिक समरसता कुंभ अयोध्येच्या पवित्र नगरीमध्ये आयोजित केला गेला.

डॉ. राममनोहर लोहिया अवध विद्यापीठाच्या प्रांगणात 15 आणि 16 डिसेंबरला समरसता कुंभ झाला. संपूर्ण भारताच्या वेगवेगळया भागांतून आलेल्या तीन हजार सहभागींच्या साक्षीने वेगवेगळया पंथ-संप्रदायांमधील संत-महात्म्यांनी आणि विद्वानांनी समरसतेवर आपले परखड आणि स्पष्ट विचार सांगितले. दोन दिवसांच्या या समरसता कुंभमध्ये पाच सत्रे झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कुंभाचे उद्धाटन झाले. आपल्या उद्बोधनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की ''भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेला कुंभ हा मानवतेचा जगातला सगळयात मोठा आविष्कार आहे. कुंभने मानवकल्याणाला आणि लोकमुक्तीला मान्यता देऊन भारताच्या सनातन श्रध्देलाच व्यक्त केले आहे. यात प्रत्येक वर्ग, संप्रदाय, प्रांत, भाषा आणि आर्थिक पार्श्वभूमीचे लोक, कुठल्याही आमंत्रणाशिवाय, लाखो-करोडोंच्या संख्येने येऊन गंगेत डुबकी मारतात. इथे कुठलाच भेदभाव नाही. याचे वैचारिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच राज्य सरकारने पाच ठिकाणी वैचारिक महाकुंभांचे आयोजन केले आहे.

वैचारिक कुंभांचा हा उपक्रम सतत चालू राहायला हवा. अनेक शतकांपासून चालत आलेल्या कुंभाच्या या परंपरेत भेदभाव, अस्पृश्यता आणि उच्च-कनिष्ठ यांच्यासाठी कुठलेच स्थान नाही. याचे न कोणी आयोजन करते, न याचा प्रचार होतो. पण कुंभ आला की ज्याच्याकडे ज्या सुविधा किंवा शक्ती असेल, तो तसाच निघतो. ही परंपरा वेदकाळापासून चालत आलेली आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नाने आज कुंभला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केले आहे.''

कुंभच्या आपल्या उद्बोधनात रामजन्मभूमी न्यासाचे महंत नृत्यगोपालदासजी म्हाणाले की ''आपल्याकडे पूजाविधी, मत-पंथ कितीही वेगवेगळे असले, तरी ईश्वर एक आहे. केवळ नावे वेगवेगळी आहेत. धर्म लोक आणि परलोक दोन्हीचा मार्ग मोकळा करतो. धर्माने कधीच कुठला भेदभाव मानला नाही. सीय राममय सब जग जानी - प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक जिवात देव आहे. गांधीजींनी ज्या रामराज्याची कल्पना केली, त्यात न्याय, आनंद, सुख, समरसता आणि सौजन्य यांनाच सर्वात जास्त महत्त्व आहे.''

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह भैयाजींनी आपल्या भाषणात म्हटले की ''कलियुगाची 5120 वर्षे झाली आहेत. हजारो वर्षांपासून हिंदू समाज एकात्मतेची अनुभूती घेतच विकसित होत गेला आहे. यानेच समाजाला उच्च नैतिक मूल्य दिले आहेत. यामुळेच भारत विश्वगुरू होऊ शकला. आपण सगळया जगाला सन्मान दिला. सर्व चराचर सृष्टीत ईश्वराची अनुभूती घेणाऱ्या एका श्रेष्ठ संस्कृतीचा इथे विकास झाला आहे. हिंदू समाज हजारो वर्षांपासून झाडे, वनस्पती, दगड आदींची पूजा करत आला आहे. सर्पालाही आपण दूध पाजतो. अशा समाजात अस्पृश्यतेसारखा कलंक येणे हेच अत्यंत दुःखद आहे. आपल्या संतांनी सांगितले आहे की वेद-उपनिषदे आदींमध्ये कुठेच अस्पृश्यतेचा उल्लेख नाहीये. अस्पृश्यता ही धर्माच्या विरुध्द आहे, मानवतेच्या विरुध्द आहे. पण आपल्या देशात आज ही अस्पृश्यता आहे.

रामानुजाचार्यांनी जात ही शत्रू मानली आणि तसेच आचरणही केले. त्यांनी तथाकथित शूद्राला गुरू मानून त्याच्याकडून दीक्षा घेतली. त्यांनी समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक जातीसाठी मंदिरांची दारे खुली केली. सगळयांच्याच कल्याणासाठी आणि आध्यात्मिक उत्थानासाठी कार्य केले. गौतम बुध्दांनीही अस्पृश्यतेला दूर करण्याचे सांगितले. त्यांनी तथाकथित हलक्या जातीतून असलेल्या साधकांनाही दीक्षा देऊन संन्यासाचा मार्ग दाखवला. हिंदू धर्माने भगवान बुध्दांना दशावतारांपैकी एक मानले आहे. बुध्द मतानुसार सगळेच समान आहेत आणि सगळेच एकसारख्या सन्मानाचे अधिकारी आहेत. आपल्या समाजात प्रत्येक काळात कबीर, ज्ञानेश्वर, हरिदास, रसखान, नाथ संप्रदाय इत्यादींनी सगळयाच वर्गांना समरसतेचा मार्ग दाखवला. त्यांनी अस्पृश्यतेला संपवण्याचा सतत प्रयत्न केला. आपण आपल्या घरी, गावात, शहरांत छोटया जातीच्या लोकांशी कसा व्यवहार करतो, हा आपल्यासमोर एक प्रश्न आहे. आपल्या समाजातला एक वर्ग 2000 वर्षांपासून आजही बदलाच्या प्रतीक्षेत आहे. समरसतेच्या प्रयत्नांमुळेच 1979मध्ये उडुपीला झालेल्या संतांच्या सम्मेलनात संतांनीच हा मंत्र दिला - हिंदव: सोदरा: सर्वे, न हिंदु पतितो भवेत्. मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. श्रीगुरुजींनी या सम्मेलनानंतर एक पत्र लिहिले की संतांनी हिंदूंना समरसतेचा मंत्र दिला आहे आणि हा मंत्र घराघरात पोहोचवण्याची आवश्यकता आहे. पण दु:खाची बाब आहे की आजही हा मंत्र सगळयांपर्यंत नाही पोहोचू शकला. अस्पृश्यता म्हणजे काही मोठा दगड नाही की क्रेन आणली आणि उचलून फेकला. हा एक भाव आहे, जो मनामनातून कायमचा बाहेर फेकला जाण्याची गरज आहे. आपण जर पृथ्वीला आई मानतो, तर आपण सगळेच भावंड झालो.

जर काही ग्रंथांत काही चुकीचे लिहिले आहे, तर ते संतांनी ते बदलायला हवे. त्यांच्याजवळ तो अधिकार आहे.''

पुण्याचे संत पू. गोविंददेव गिरिजी यांनी प्रयागराजला भरणारा कुंभ हे समरसतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की समरसता पाहायची असेल तर कुंभला यावे. इथे संप्रदाय, आर्थिक पातळी, भाषा, प्रांत सगळे एक होऊन जातात. तेच एकात्मतेचे प्रतीक आहे. याच विचारांना समाजात पसरवण्याची गरज आहे. त्यांनी बसून, मिळून मिसळून, विचार करून समस्यांवर तोडगा काढायला हवा. भाषा, प्रांत, वर्ग आणि जाती या सगळयातून उठून जेव्हा समाज समरस आणि एक होईल, तेव्हाच राष्ट्र शक्तिशाली होऊ शकेल. हा भाव ममत्वाने येतो. वेगवेगळया वर्गांना जोडणे ही एक बाब आहे आणि त्यांच्या अंतरंगातून एकात्मता स्थापित करणे ही दुसरी बाब आहे. परमात्मा रसमय आहे आणि त्याच्याशी समरस होणे हीच समरसता आहे. प्रत्येकानी भाव-भूमीच्या स्तरावर येणे हीच समरसता आहे. 

आपण सगळे एकाच भारतमातेचे पुत्र आहोत. आपल्यात एक परमतत्त्व आहे. त्याला पाहता आपल्याला त्याला बाहेरून जोडण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही, त्याला अंतर्मनातून जोडण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मनुष्य कुठल्याही जातीचा असो, प्रत्येक माणसात ईश्वर आहे, म्हणूनच तो आपला बंधू आहे. महाराष्ट्राच्या संतांनी सांगितले की सगळे जगच विष्णुमय आहे, मग भेदासाठी जागाच कुठे आहे?''

तेलंगणचे मा. रंगराजनजी यांचे प्रवचन खूपच भावस्पर्शी आणि प्रेरक होते. 2700 वर्षांपूर्वी कावेरी नदीच्या किनाऱ्यावर श्रीरंग क्षेत्री श्रीरंगनाथ मंदिरात तथाकथित खालच्या जातीच्या लोकांना प्रवेश निषिध्द होता. एवढेच नव्हे, तर खालच्या जातीच्या संतांनाही मंदिरात प्रवेश नव्हता. रंगनाथजींचे पूर्वज लोकसारंग मुनी आणि अस्पृश्य समाजातून असणारे तिरुपाण अलवार यांची कथा खूपच रंजक, मार्मिक आणि तितकीच प्रेरक आहे. संत अलवार सतत भगवद्भक्तीत लीन असत. देवाची स्तुती करणे हेच त्यांचे एकमेव काम होते. एके दिवशी श्री रंगनाथ मंदिराचे महंत लोकसारंग मुनी रस्त्यातून जात होते आणि अचानक अलवार त्यांच्या रस्त्यात आले. त्यांना भान नव्हते की ते लोकसारंग मुनींच्या रस्त्यात आले आहेत. त्यांना भानावर आणण्यासाठी लोकसारंग मुनींनी एक दगड त्यांच्याकडे फेकला. तो दगड त्यांच्या कपाळावर लागला आणि त्यातून रक्ताची धार वाहू लागली. ते भानावर आले आणि रस्त्यातून बाजूला झाले. जेव्हा लोकसारंग मुनी मंदिराचे दार बंद करत होते, तेव्हा अचानक देव प्रकट झाला. देव म्हणाला, ''आज तू माझ्या परमभक्ताला इजा केली आहेस. तुला त्याला माझ्याजवळ, मंदिरात आणावे लागेल आणि प्रायश्चित्त करावं लागेल.'' लोकसारंग धावत अलवार यांच्याकडे गेले आणि मंदिरात चलण्याचा आग्रह करू लागले. ते म्हणाले, ''मी तर अस्पृश्य आहे. मी मंदिरात पायही ठेवू शकत नाही.'' तेव्हा लोकसारंग मुनी अलवार यांना आपल्या खांद्यावर बसवून मंदिरात घेऊन गेले. अशा प्रकारे एका कुप्रथेचा कायमचा अंत झाला.

रंगराजनजींनी अनुसूचित जाती आरक्षण बचाओ समितीच्या एका कार्यक्रमात लोकांसमोर हा प्रसंग सांगितला. त्यावर एक मुलगा म्हणाला की ''आम्ही या गोष्टीला मानत नाही. तुम्ही स्वत: तरी असे कराल का?'' तेव्हा ते म्हणाले की ''हो, मी तयार आहे.'' घरी जाऊन त्यांनी आपल्या वडलांची परवानगी घेतली आणि अलवार समाजाच्या एका माणसाला समारंभपूर्वक खांद्यावर बसवून मंदिरात नेले. समरसतेच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक घटना आहे. रंगराजनजी म्हणाले की धर्मात समरसता अंगभूत आहे. आवश्यकता आहे केवळ त्याला आपल्या आचरणात आणण्याची.

अयोध्येच्या पू. सुनीता शास्त्री म्हणाल्या की ''भारतात अंगभूत समरसता आहे. वाल्मिकी रामायण पृथ्वीतलावरचे पहिले काव्य आहे. त्याचे ठळक पुरावे आहेत आणि त्यास परदेशी लोकांनीही मान्यता दिली आहे. या आदिकाव्यात समरसतेचे अद्भुत उदाहरण आहे. एका शिकाऱ्याने जेव्हा एका क्रौंच पक्ष्याला मारले, तेव्हा आपसूकच महर्षी वाल्मिकींच्या तोंडून त्यांचे दु:ख व्यक्त करणाऱ्या ज्या ओळी निघाल्या, त्या जागतिक समरसतेचे सगळयात मोठे उदाहरण आहे - 'सर्वे भवंतु सुखिन:' म्हणजेच सगळया जगाचे कल्याण व्हावे ही प्रार्थना करणारा भारत एकमेव देश आहे. समरसतेचा गोड सुगंध इथल्या मातीत खोलवर आहे.'' रामराज्याचे वर्णन करताना सुनीताजी म्हणाल्या की ''तिथे एकदा हाक मारल्यावरही राजा स्वत: मदतीसाठी धावून येत असे. मूल आजारी असो किंवा कुठला सणवार असो, प्रभू श्रीराम सगळीकडे प्रेमाने जात असत. तेव्हाही वर्ण होते, जाती होत्या, पण जातींवरून वाद नव्हते. राजकारणामुळे जातींचा वाद सुरू झाला आहे. आणि जिथे वाद आहे, तिथेच विवादही आहे. जानकीमातेने जंगलातल्या पशुपक्ष्यांना जवळ घेतले, तर प्रभू श्रीरामाने पक्षिराज जटायू, निषाद राज यांना प्रेमाने आलिंगन दिले. संयम, शील आणि एकात्मता भारतीय संस्कृतीचे अंगभूत घटक होते.''


काशीहून आलेले प्रा. भक्तिपुत्र रोहितजी म्हणाले की ''वेदांमध्ये कुठेही भेदभाव लिहिलेला नाही. वेद तर म्हणतात की जशी कल्याणकारक वाणी मी बोललो आहे, तसेच तुम्हीसुध्दा बोला. वेदांनी ज्ञानी लोकांसाठी, शिक्षकांसाठी, प्रशासकांसाठी, शूद्र, कृषक सगळयांसाठीच आपले विचार सांगितले आहेत. जो वेद वाचेल, तो आपल्या कार्यात दक्ष होईल, प्रावीण्य मिळवेल आणि त्यात श्रेष्ठत्व मिळवेल. वेद म्हणतात की मी गुरु-शिष्य दोघांसाठी प्रिय आहे. जो माझे वाचन करेल तो गंभीर होईल, तो माझ्याबद्दल नम्रता ठेवेल. यजुर्वेदाच्या अध्याय 30मध्ये कर्मविभाग सांगितलेला आहे. मनुष्य आपल्या आयुष्यात जगण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकावर अवलंबून आहे. त्याला जगण्यासाठी अन्न पाहिजे, कृषी पाहिजे, घर पाहिजे, वास्तू पाहिजे, घर बनवण्यासाठी वाळू, रेती, विटा, सिमेंट पाहिजे तर कपडे तयार करायला सुई, दोरा. ही सगळी कार्ये एकच मनुष्य करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार आपले कार्य निवडले आणि त्यालाच वाहून घेतले. तो केवळ स्वत:साठी नाही, तर समाजासाठी कार्य करत असतो. सगळयांची कामे वाटलेली असली, तरी मने वाटलेली नाहीत. कुठलेच काम छोटे नाही. कर्म कोणालाच छोटा करत नाही. जेव्हा सगळे आपल्या धर्माचे पालन करतात तेव्हा समाज मोठा होतो आणि समाज मोठा झाला की देश मोठा होतो.''

समरसता कुंभमध्ये मार्गदर्शन करताना मुंबईचे भंते राहुल बोधिजी म्हणाले की ''आज जागतिकीकरणाच्या युगात भारताला पुढे नेण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आज शेतकऱ्याची स्थिती हलाखीची आहे. जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो, तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. आज अस्पृश्यता आणि कुप्रथा यांमुळे आपण हतबल झालो आहोत. भारत कमजोर झाला आहे.'' त्यांनी नालंदा आणि तक्षशिलाचा उल्लेख करून सांगितले की दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या या विद्यापीठांमध्ये एकत्रितपणे 10,000 विद्यार्थी शिकत असत. आपण एवढे पुढारलेले होतो, पण आज आपल्या या कमतरतांमुळेच आपण मागे पडलो. लोकांमध्ये धन, जात आणि शिक्षणाचा अहंकार आला. मोठया-छोटयाचे भेद करत-करत आपण कुठे होतो आणि कुठपर्यंत आलो. त्यांनी भारताचे भौगोलिक आणि नैसर्गिक महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की भारतमाता किती पवित्र आणि विशाल आहे. इथेच एकाच वेळी अनेक ॠतू असतात. म्हणूनच, आपण मत, पंथ, संप्रदाय आणि जातीच्या पुढे जाऊन विचार करणे आज खूप आवश्यक आहे. आपल्यात जर मैत्री असेल, तरच आपली प्रगती होऊ शकेल. द्वेष केल्याने तर केवळ विनाशच होतो. प्रेम, करुणा आणि सेवेचा भाव पुस्तकांनी नाही, तर हृदयातून निघतो. बुध्दांनी सांगितले - आपल्या मनाचे राजा बना. धर्म हा निसर्गाचा नियम आहे. त्यांनी सांगितले की जाती तर केवळ पशु-पक्ष्यांमध्ये असते. मानवात दोनच जाती आहेत - पुरुष आणि स्त्री. आणि आध्यात्मिक पातळी गाठल्यावर तर हा दैहिक भेदही संपतो. तिथे सगळे एकच दिसतात.

बीएचयूचे कुलगुरू कौशल किशोर मिश्र म्हणाले की भारतात अपार शक्ती आहे. आपल्या देशात रामजन्मभूमी आंदोलनाने थोडी शक्ती आली, तर आपण जातीसारख्या क्षुल्लक विचारांमुळे विभक्त झालो. आपल्या राजकारणातसुध्दा जातीच्या आधारावर उमेदवार निवडले जाऊ लागले, त्याने देशाचे नुकसान झाले. कुंभ म्हणजे भारताच्या समरसतेचा आत्मा आहे. राम आमच्या समरसतेचे विराट पुरुष आहेत. आपली भारतीय संस्कृती म्हणजे समरसतेचे प्रतीक आहे, पण आपल्या शिक्षणातून आपण वेदांना काढून टाकले. रामायण आणि महाभारताला काढले. आपण अरस्तु आणि प्लेटो शिकवले, जे हेच सांगत आले की मानव हा नैसर्गिकरीत्या विभक्त आहे. तसेच मा. पंडित मदन मोहन मालवीयांचे उदाहरण देताना ते म्हणाले की मालवीयजींनी विद्यापीठ बनवण्यासाठी ब्राह्मणेतर लोकांसमोर हात पसरले. हे विद्यापीठ दुर्बल आणि उपेक्षित लोकांचे उत्थान करण्याच्या उद्दिष्टाने तयार केले होते. त्यांना राज्य नको होते, तर त्यांच्या मनात कल्याणाचा भाव होता.

 इंदूरच्या परागजींनी डॉ. आंबेडकर यांचा थोडक्यात जीवनपट लोकांसमोर मांडला. ते म्हणाले की आंबेडकरजींना लहानपणापासूनच उपेक्षेला आणि तिरस्काराला सामोरे जावे लागले. पण ते हतबल झाले नाहीत आणि संघर्ष करत राहिले. मग शाळेत माठातून पाणी घेताना त्यांना रोखले गेल्याचा प्रसंग असो किंवा त्या ब्लॅक बोर्डला - ज्याला लागून उच्चवर्णीय मुलांचे खाण्याचे डबे ठेवलेले होते, त्याला शिवू न देण्याचा प्रसंग असो, प्रत्येक परिस्थितीशी डॉ. आंबेडकर झुंजत राहिले. त्यांनी संकल्प सोडला की मी आपल्या समाजात पसरलेल्या कुप्रथांना दूर करेन. त्यांनी 'शिका, वाचा आणि संघर्ष करा'चा मंत्र देऊन समाजात प्राण आणण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर आंबेडकरांची धर्मावर श्रध्दा होती. म्हणूनच तर त्यांनी काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह केला. जेव्हा धर्म परिवर्तनाचा विषय आला, तेव्हा आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारला. कारण तो धर्म भारतात जन्माला आलेला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार कुठलीही वस्तू धर्महीन होऊ शकत नाही. मानवाचा धर्म आहे करुणा, मैत्री भाव, प्रज्ञेने व्यवहार करणे.

 

समरसता कुंभामध्ये पारित झालेला प्रस्ताव

समरसतेची प्रतिमूर्ती असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्यानगरीत एकत्र जमलेले आपण सर्व जण एकात्म भारताचे पुत्र-पुत्री असून हजारो सालांपासून चालत आलेल्या समरसता प्रयासांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करीत आहोत. अनेक ॠषी, मुनी, संतमहात्मे, राजेमहाराजे, समाजसुधारक यांच्या प्रयत्नांतून आपण सर्व सामाजिक न्याय, समावेशीकरण याच्या मार्गावरील एका टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. भारतीय राज्यघटनेनेसुध्दा या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या टप्प्यावर समाजातील सर्व घटकांना आगामी दिशेच्या बाबतीत गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.

भारतातील प्रत्येक नागरिकाला आपले व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक जीवन, रितीरिवाज, सवयी, आपली मनोधारणा, या भूमीतील समरसतेचे व एकात्मतेचे मूलभूत विचार आणि सिध्दान्त यांना अनुकूल बनवावे लागणार आहे. कालौघात या सर्वांच्या विपरीत असलेल्या काही गोष्टी आणि विसंगती निर्माण झालेल्या आहेत. त्या कालबाह्य गोष्टींना तिलांजली देणे आवश्यक आहे. खानपान, सामाजिक व्यवहार, विवाह समारंभ इत्यादी आपले सर्व व्यवहार सर्वसमावेशक झाले पाहिजेत, या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

काळाच्या ओघात आपले जे बांधव मागास बनले आहेत, त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक सबलीकरणाची जबाबदारी समाज आणि सरकार यांना एकत्रितपणेच पार पाडावी लागणार आहे. विभिन्न योजनांची सुयोग्य अंमलबजावणी, आवश्यक प्रमाणात आर्थिक तरतूद इत्यादी माध्यमांतून शासनाने राष्ट्रनिर्माणामध्ये सर्व वर्गांचा सहभाग मिळविणे अत्यंत आवश्यक आहे.

नवीन बदललेल्या वातावरणात समाजासाठी कालानुरूप आणि परिवर्तनशील आचरण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची प्रार्थना आम्ही समाजाला नित्य मार्गदर्शन करणाऱ्या साधुसंतांच्या पायाशी करीत आहोत.

समान संधी, हक्क आणि सन्मान याचे वातावरण निर्माण करून संस्कृतीचे व राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करत गतिशील समाजव्यवस्थेची निर्मिती करण्याचा संकल्प समाजातील सर्व घटकांनी करावा, असा आमचा आग्रह आहे. या कामात आमचे संपूर्ण योगदान देण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत.

 

 

 

डॉ. रमेश पांडवजींनी डॉ. हेडगेवार यांच्या सामाजिक समरसतेचे पैलू विशद करताना सांगितले की डॉक्टरसाहेबांनी स्थापित केलेल्या रा.स्व. संघाने सामाजिक समरसतेवर सतत कार्य केले आणि समरसतेच्या कार्याला काळाराम मंदिरापासून आणखी पुढे नेले. 2005मध्ये मंदिराच्या पुजाऱ्याच्या नातवाने तथाकथित मागास म्हटल्या गेलेल्या बंधूंचे मंदिरात स्वत: स्वागत केले. समरसतेचे महत्त्व डॉक्टर हेडगेवार यांनी जाणले होते. त्यांनी सावरकर, टिळक आणि मुंजे यांच्यासह कार्य करत असताना भरपूर मनन-चिंतन केले. वर्णभेद, उच्चनीचता, असमानता या समस्येला ओळखले. पण इतक्या विषमता असतानासुध्दा आपल्या समाजामध्ये टिकून राहण्याचे सामार्थ्य आहे. ते म्हणाले की सात हजार जाती असलेला हिंदू समाज जेव्हा जागृत होतो, तेव्हा शत्रू पराजित होतो. सामाजिक समरसतेचे श्रेष्ठ ज्ञान हिंदू धर्मात आहे. प्रश्न केवळ या ज्ञानाला व्यवहारात आणण्याचा आहे. संघाच्या शाखांच्या माध्यमातून आज समरसतेचे हे कार्य आपल्या देशातच नाही, तर 40 देशांमध्ये चालले आहे. जेव्हा 1925मध्ये संघाचे पहिले शिबिर होते, तेव्हा काही स्वयंसेवकांनी छोटया जातीच्या बंधूंसह जेवण्यास नकार दिला. तेव्हा डॉक्टर हेडगेवार त्यांना रागावलेही नाही किंवा त्यांना शिबिरातून निघून जायलाही सांगितले नाही. त्यांनी त्या स्वयंसेवकांना वेगळे बसून जेवू दिले व ते स्वत: दलित बंधूंसह जेवायला बसले. दुसऱ्या दिवशी त्या उच्चवर्णीय स्वयंसेवकांच्या चूक लक्षात आली व त्यांनी डॉक्टर हेडगेवारांची क्षमा मागितली. त्यानंतर संघात कधीही अशी घटना नाही घडली. रमेश पांडवजी म्हणाले की आज संघात प्रत्येक जातीचे लोक आहेत. म्हणूनच ही हिंदू संघटना आहे. पण विरोधाभास पाहा की जातीच्या आधारावर बनलेल्या संघटना आणि पक्ष संघाला जातवादी म्हणतात. आत्मविस्मृतीत हरवलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्याच्या कार्यात लागलेले डॉ. आंबेडकर स्वत: 1939 साली संघाच्या शिबिरात आले.

केरळहून आलेल्या स्मिताजींनी केरळचे महान समाजसेवक श्री नारायण गुरू यांच्याबद्दल आपले विचार सांगितले. अस्पृश्यतेच्या अंधारात आकंठ बुडालेला हिंदू समाज धर्मांतरणाच्या मार्गावर निघाला होता. अशा वेळी श्री नारायण गुरू यांचा जन्म झाला. लहानपणी नाणू नावाने प्रसिध्द असलेले नारायण गुरू यांना कधीच अलौकिक जीवनाची इच्छा नव्हती. ओबीसीत गणल्या जाणाऱ्या समाजातून येणाऱ्या नाणूने एकदा एका दलिताच्या घरी उकळत्या तांदळाची पातेली उचलून खाली ठेवली. आई नको-नको म्हणत असतानाही त्यांनी हे केले. उच्च जातीचे असलेले चट्टाभी स्वामी, खालच्या जातीचे डॉ. पल्पू आणि नारायण गुरू यांच्या त्रिमूर्तीने केरळमध्ये अस्पृश्योध्दाराची जी चळवळ उभी केली, ती एकमेवाद्वितीय आहे. खऱ्या अर्थाने अद्वैताचा प्रचार श्री नारायण गुरू यांनीच केला. 1888मध्ये अरवीपुरम जिल्ह्यात त्यांनी स्वत:च्या हातांनी शिवलिंग स्थापित केले, तर समाजात एकच हाहाकार माजला. तेव्हा ते म्हणाले की मी तर इलवा जातीच्या महादेवाची स्थापना केली आहे. माणूस कुठलाही असो. त्याचे चारित्र्य चांगले असले पाहिजे.

डॉ. राममनोहर लोहिया यांच्या कर्तृत्वावर आपले विचार मांडत डॉ. शैलेंद्र नाथ कपूर म्हणाले की डॉ. लोहिया यांच्या मतानुसार श्रीरामाने भारताला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत एका सूत्रात बांधले, तर श्रीकृष्णाने पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत भारताला एकसूत्र केले. अशा प्रकारे त्या दोघांनी भारतात एकता प्रस्थापित केली.. भगवान श्रीराम यांनी रामेश्वरला जाऊन महादेवाची आराधना केली. दक्षिणेत कावेरीला गंगा म्हटले जाते. लोहीयाजींच्या मनात सर्व नद्यांबद्दल नितांत प्रेम होते. त्यांच्या मतानुसार नद्यांची पावित्र्य राखून ठेवणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. नद्यांमध्ये सांडपाणी मिसळू देऊ  नका असे ते म्हणत. सांडपाण्याची अशी काही व्यवस्था असायला हवी की त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतांना देता येईल. 

उज्जैनहून आलेले सुरेशनाथजी महाराज, महर्षी वाल्मिकींबद्दल बोलताना म्हणाले की रघुकुलाचे खरे संरक्षण तर वाल्मिकींनीच केले. जेव्हा सीतामातेला तमसा नदीच्या किनाऱ्यावर लक्ष्मण सोडून गेले, तेव्हा महर्षी वाल्मिकींनीच त्यांना अभय दिले आणि त्यांच्या आश्रमातच लव आणि कुश यांचा जन्म झाला. वाल्मिकी रचित रामायण हे भारतीय संस्कृतीचा अर्क आहे. ते म्हणाले की समाजात समरसतेची सुरुवात मन, वचन आणि कर्मानेच होऊ  शकेल. समाज भ्रमित आहे. म्हणूनच रामाने शबरी, निषाद यांना जवळ केले, ही बाब पुन्हा-पुन्हा आठवण्याची गरज आहे. समाजातील वंचित आणि दबलेल्या वर्गाला जवळ करण्याची गरज आहे. जेव्हा सगळे संन्यासी मिळून समरसतेचा संदेश देतील, तेव्हाच समरसता परिपूर्ण होऊ शकेल.

लखनऊचे भंते शांतिमित्रजींनी सांगितले की संपूर्ण सृष्टीचा एकच धर्म आहे. आपण फक्त वेगवेगळया पंथांच्या माध्यमातून त्याच एका ईश्वरापर्यंत जातो. आज आपण छोटया-छोटया गोष्टींना धर्म मानून बसलो आहे. निंदेच्या, द्वेषाच्या दरीला आणखी खोल करत जात आहोत. आपल्याला सगळयांना मिळून मानवीय मूल्यांनी परिपूर्ण असा समाज बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख करत भंते शांतिमित्रजी म्हणाले की कुठलीही वस्तू किंवा प्राणी धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. त्यापेक्षा पंथनिरपेक्ष असणे जास्त गरजेचे आहे. पंथनिरपेक्ष आणि धर्मसापेक्ष असायला हवे. त्यांनी सांगितले की संपूर्ण सृष्टीत एक प्रकारची समरसता आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्यात समरसता आहे. आपण ते ओळखले नाहीये. आपण सगळे मिळून पुढे जाऊ, तेव्हाच एक चारित्र्यसंपन्न समाजाचा निर्माण होऊ शकेल. धर्माच्या मार्गदर्शनाने शासन चालेल, तेव्हाच देश पुढे जाईल. आज आवश्यकता आहे नवीन मार्गावर, नवी गीते गात पुढे जाण्याची. समरसतेला व्यवहारात आणण्याची.

काशीहून आलेले रविदास मंदिराचे श्री भारत भूषणजी महाराज यांनी सांगितले की आपल्या धर्मग्रंथांत कुठेच जातीचा उल्लेख नाही. आज समरसतेच्या दृष्टीने अद्भुत क्रांती झाली आहे. हाच भाव सतत राहिला, तर समाजात समरसता आल्याशिवाय राहणार नाही. संत रविदासजींनी सांगितले होते की मन चंगा तो कठौती में गंगा. जर आपले मन पवित्र नाही, तर समाज तर दूर, आपण आपल्या भावालाही जोडून ठेवू शकत नाही. माणूस जर मनातला वाईटपणा काढून स्वत:ला घडवील, तर एक दिवस नक्की समरसता येईल.

16 डिसेंबरच्या चौथ्या सत्रात साध्वी हेमलता म्हणाल्या की कबीर, नानक, तुलसीदाससकट सगळया संतांनी रामाच्या चेतनेला ओळखले होते. रामाला शबरीचे आनंदाश्रू समजले. पक्षिराज जटायू आणि निषाद राज यांनाही त्यांनी प्रेम दिले आणि जवळ केले. सामाजिक समरसता किती सहज आपल्या समाजात दिसत होती, याचे उदाहरण देताना त्यांनी हुतात्माश्रेष्ठ भगतसिंग यांची कथा सांगितली. भगतसिंग जेलमध्ये साफसफाई करणाऱ्या भंगिणीला बेबे (आई) म्हणत असत. एकदा जेलरने विचारले, तेव्हा भगतसिंग म्हणाले की या माउलीचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या आईसारखीच ही मलमूत्र स्वच्छ करते आणि स्वच्छता करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीच नाही. आपल्याला समाजाच्या उत्थानासाठी एक व्हावेच लागेल. मातीवर प्रेम करावे लागेल. आपल्या शक्तीमध्ये प्रखरता तेव्हाच येऊ शकेल, जेव्हा आपण सगळे मतभेद विसरून एक होऊ.

आगराचे खासदार श्री रामशंकर कठेरिया यांनी सांविधानिक व्यवस्थेबद्दल बोलताना सांगितले की भारताचे स्वाभाविक विचार हे समरसतेला अनुसरूनच आहेत. हीच भावना खालपर्यंत पोहोचायला हवी, म्हणूनच घटनेमध्येदेखील याकडे पूर्ण लक्ष दिले गेले. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या डॉ. आंबेडकरांशिवाय घटनेची निर्मिती कोण करू शकला असता? घटनेच्या प्रस्ताविकातच सामाजिक, न्यायिक आणि आर्थिक व्यवस्थेची स्पष्ट कल्पना दिली आहे. घटनेच्या कलम 17मध्ये म्हटले आहे की समाजात कुठल्याही प्रकारची अस्पृश्यता मान्य नाहीये. भेदभाव करणाऱ्यासाठी शिक्षा आहे. उद्योग, नोकऱ्यांमध्ये असमानता दूर करण्यासाठी कलम 15 दिले गेले आहे, तर राजकीय न्याय आणि प्रतिनिधित्व याबद्दल कलम 330मध्ये लिहिलेले आहे. बाळासाहेब देवरसांचा उल्लेख करत कठेरियाजी म्हणाले की बाळासाहेब म्हणाले होते की जर अस्पृश्यता पाप नसेल, तर जगात काहीच पाप नाहीये.

डॉ. आंबेडकर विद्यापीठ, लखनऊचे डॉ. प्रकाश बरतुनिया म्हणाले की आज आपल्या देशाचे राजकारण प्रतीकात्मक झाले आहे. लोक आज दलिताच्या घरी जेवण तर करतात, पण ते कोणाच्या खूप दिवस लक्षात राहत नाही. पण आज हजारो वर्षांनंतरही लोकांना रामाने खाल्लेली शबरीची उष्टी बोरे लक्षात आहेत. कारण त्यात हृदयात खोलवर प्रेमभाव होता. ते म्हणाले की रामानंदाचार्य यांनी प्रत्येक जातीच्या लोकांना दीक्षा दिली. राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्याचे रक्षण करणारी झलकारी ही तथाकथित छोटया जातीची होती. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना अस्पृश्योध्दाराच्या कामात एका ब्राह्मणानेच मदत केली. अलीकडेच दलित समाजाचे संन्यासी कन्हैया प्रभू गिरी यांना जुना आखाडयाचे महामंडलेश्वर नियुक्त केले आहे. त्रावणकोरमध्ये दलित जातीच्या 23 पुजाऱ्यांना प्रशिक्षण देऊन मंदिरांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. आज समरसतेचे वारे वाहू लागले आहे. गरज आहे त्याला मोठया प्रमाणात राबविण्याची.

पाचव्या, म्हणजेच समाप्तीच्या सत्रात बिहार विधान परिषदचे सदस्य श्री संजय पासवान यांनी समरसतेचा ठराव सगळयांसमोर ठेवला. या ठरावाचा सभेत हजर असलेल्या सर्वांनीच ओम्चे उच्चारण करून समर्थन व्यक्त केले. सद्य परिस्थितीबद्दल भाष्य करत ते म्हणाले की समाजातील त्रुटी दूर करण्याचे सतत प्रयत्न चाललेले आहेत आणि भेदभाव कमी होत आहे. ब्लेम करणे सोपे आहे, पण क्लेम करणे कठीण आहे. वाल्मिकी, व्यास, कबीर आणि रविदास हे समरसतेचे चार प्रमुख स्तंभ आहेत हे लक्षात घेता समाजाने दंभाचा पूर्णपणे त्याग करण्याची आवश्यकता आहे. कालबाह्य गोष्टींचा त्याग करत असताना समाजाने एकत्र बसणे, जेवण करणे आणि एकत्र विचारविनिमय करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

काशीहून आलेल्या डॉ. मंजू यांनी राणी झालीदेवी यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला. जेव्हा झालीदेवी यांना संन्यास घ्यावासा वाटला, तेव्हा त्यांनी रविदास यांच्याकडून दीक्षा घेतली, आणि परत येताना त्यांना आपल्या महालात येण्याचे आमंत्रण दिले. एक दिवस राणीच्या आमंत्रणाला अनुसरून रविदासजी त्यांच्या महालात आले. जेवणाच्या वेळी पंगतीत ब्राह्मणांनी त्यांच्याबरोबर बसायला नकार दिला. तेव्हा रविदासजी ''नंतर जेवतो'' असे म्हणाले. पण आश्चर्य असे झाले की प्रत्येक ब्राह्मणाला जेवत असताना त्याच्या शेजारी रविदासजी बसलेले दिसू लागले. डॉ. मंजू यांनी प्राचीन विदुषींपैकी गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांचे स्मरण केले. आजही रविदासजींच्या गावात फक्त दोन ब्राह्मण, दोन क्षत्रिय आणि दोन वाणी कुटुंब राहतात. पण ब्राह्मण आधी रविदासजींच्या मंदिरात नेवैद्य दाखवून मगच जेवण करतात. आजही डोमराजाच्या घरी ब्राह्मण खिचडी खातात. ही समरसतेची मोठी शृंखला आहे आणि ती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचायला हवी आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपालजी म्हणाले की कुंभमध्ये संत, ॠषी आणि विद्वान एकत्र बसून विचार करत होते आणि तिथून निघालेल्या विचारमंथनेचे सार लोक देशाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवीत असत. कालांतराने या व्यवस्थेत खंड पडला. पण आता याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न होत आहे. ते म्हणाले की भारतात अनेक मत-पंथ-संप्रदाय आहेत, पण परमात्मा एक आहे. समाजात अध्यात्माचे प्रकटीकरण भ्रातृभावानेच व्हायला हवे. आपण रुग्ण आणि दरिद्री लोकांत नारायण पाहणारे आहोत. आणि म्हणूनच आपण त्यांची सेवा करतो.

चिमणीपासून मुंगीपर्यंत सगळयात परमात्मा आहे, असे आपला समाज मानतो. पण आपला व्यवहार हळूहळू बिघडत चालला. समाजव्यवस्थेची घडी विस्कटली, तेव्हा भगवान बुध्दांनी क्रांती केली. समता, समानता आणि बंधुत्वाचा संदेश सांगितला. त्यांनी प्रत्येक वर्णाच्या आणि जातीच्या लोकांना आपले शिष्य केले. शाक्य, पाल, पासवान सगळयांनाच त्यांनी दीक्षा दिली. मग गुरू नानक आणि कबीरही आले. समाजाला दिशा देण्याचे काम संतांनी सतत केले. आर्य समाजाने वेदांच्या ॠचा सगळया समाजाला शिकवल्या. सगळयांना यज्ञ शिकवले. गांधीजींनी समाजातली घाण स्वच्छ करायला सुरुवात केली. ते म्हणाले की काशी हिंदू विश्वविद्यालयामध्ये शिकणाऱ्या जगजीवन राम यांची उष्टी भांडी घासायला तेथील कर्मचाऱ्याने नकार दिला, तेव्हा स्वत: मालवीयजींनी ती भांडी धुतली. त्यांनी सांगितले की संघाच्या शाखेत सर्वत्र समरसता नांदते. माता भूमि:, पुत्रोहम पृथिव्या - आपण सर्व भारताचे लोक एक आहोत, त्यात कसला भेद! ग्रंथांमध्ये व्यक्त केलेले भाव आचरणात आणले जातील, तेव्हाच आपल्या घटनेत लिहिलेले वाक्य - 'आम्ही, भारताचे लोक' सार्थक होऊ शकेल. आपल्याला हे पाहावे लागेल की आपल्या गावात, आपल्या क्षेत्रात मंदिर, विहीर, स्मशान एकच असावे. केवळ पाणी भरण्याच्या घटनेवरून मीनाक्षीपुरममध्ये धर्मांतर झाले होते. आज समाज वेगाने बदलत आहे. एक वेळ होती, जेव्हा डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारला गेला होता. पण आज पुजाऱ्याने प्रायश्चित्त करून सर्व दलित बंधूंना मंदिरात आमंत्रित केले आहे.

केंद्रीय सहकार मंत्री थावरचंद गेहलोत यांनी समारोपाचे भाषण करताना म्हटले की सर्वे भवंतु सुखिन: हे आपण म्हणतो, पण आचरणात आणत नाही. आपण कुटुंबापुरता विचार करत आहोत, म्हणून आपल्या समाजात विकृती आलेल्या आहेत. त्यांनी एकात्म मानव दर्शनाची आठवण करून देत सांगितले की आपण सगळे समरसतेच्या सूत्रात एकमेकांशी बांधलेले राहू, तरच समाजाला पुढे घेऊन जाऊ शकू.

मराठी अनुवाद - अमोल दामले, पुणे

9730070023

[email protected]