मोठयांसाठीचा 'मोगली'

 विवेक मराठी  31-Dec-2018

 

'जंगलबुक' 1942 साली सर्वप्रथम पडद्यावर आला, तेव्हापासून आतापर्यंत त्याची सहा ते सात पारायणं झाली. मात्र मोगली या पात्राचं (आणि इतरांचंदेखील) या तऱ्हेचं गंभीर आणि खरंखुरं वाटेल असं सादरीकरण कुणालाच जमलेलं नाही. डिस्नेचा 2016 'जंगलबुक' तांत्रिकदृष्टया परिणामकारक होता. त्याचा भर मोगलीच्या साहसांवर अधिक आहे. मात्र 'नेटफ्लिक्स'वरचा 'मोगली' हा चित्रपट स्वत:च्या नावापासूनच मुख्य पात्रावर असलेला फोकस स्पष्ट  करतो.

रुडीडयार्ड किपलिंगने लिहिलेल्या 'जंगलबुक' या कथेला जगभरातील बालवाचकांच्या हृदयात अविस्मरणीय असं स्थान आहे. 'डिस्ने स्टुडिओ'ने त्यावर ऍनिमेटेड चित्रपट तयार केला. मात्र जपानमधून तयार करण्यात आलेली 'जंगलबुक'ची ऍनिमे शैलीतील आवृत्ती (मूळ नाव - जंगुरू बुक्कू शोनेन मोगुरी) विशेष गाजली. जगभरातील विविध देशांप्रमाणे भारतातदेखील त्या ऍनिमेटेड सिरीजची भाषांतरित आवृत्ती टीव्हीवर प्रदर्शित झाली. (कवी गुलजार यांनी 'चड्डी पहेनके फूल खिला है...' हे शीर्षक गीत लिहिलेली आणि विशाल भारद्वाज यांनी संगीत दिलेली.) ती सिरीज भारतातील एका पिढीच्या बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग ठरली. दोन वर्षांपूर्वी 'डिस्ने'ने 'दी जंगलबुक' नव्या स्वरूपात आणलं. मोगली वगळता बघीरा, बलू, शेरखान, अकीरा, रक्षा अशी सगळी पात्रं ऍनिमेटेड स्वरूपात आणली गेली. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. तरीदेखील त्या चित्रपटानंतर केवळ दोन वर्षांत (2018मध्ये) नेटफ्लिक्सने आणलेला 'मोगली' हा सिनेमा अधिक उजवा ठरतो.

 


'जंगलबुक'ची कथा सर्वपरिचित आहे. माणसाचं जंगलात हरवलेलं पोर (मोगली) बघीरा या चित्त्याला सापडतं. तो त्याला घेऊन लांडग्यांच्या कळपात नेऊन सोडतो. कळपातली रक्षा त्याला स्वत:च्या पोरासारखं वाढवते. बलू (अस्वल) त्याला जंगलात राहण्याचं आणि लांडग्यांशी एकजीव होऊन जाण्याचं शिक्षण देतो. या सर्वांमध्ये शेरखान हा वाघ मोगलीचा घास घेण्यासाठी त्याच्या सतत मागावर असतो. किपलिंगने त्या कथेत अनेक पात्रं सादर केली आहे. कथा मोगलीभोवती फिरत असली, तरी त्यात त्या साऱ्या पात्रांचं अस्तित्व तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्याला 'जंगलबुक' असं सर्वसमावेशक नाव योग्य ठरलं. 'नेटफ्लिक्स'चा 'मोगली' स्वत:च्या नावापासूनच मुख्य पात्रावर असलेला फोकस स्पष्ट करतो. 'जंगलबुक' 1942 साली सर्वप्रथम पडद्यावर आला, तेव्हापासून आतापर्यंत त्याची सहा ते सात पारायणं झाली. मात्र मोगली या पात्राचं (आणि इतरांचंदेखील) या तऱ्हेचं गंभीर आणि खरंखुरं वाटेल असं सादरीकरण कुणालाच जमलेलं नाही. डिस्नेचा 2016 'जंगलबुक' तांत्रिकदृष्टया परिणामकारक होता. त्याचा भर मोगलीच्या साहसांवर अधिक आहे. मात्र 'मोगली' मुख्य पात्राच्या मानसिकतेचा अधिक विचार करतो.

ऍंडी सर्कीस

 

'मोगली'ची कथा सुरू होते ती शेरखानने मोगलीच्या (रोहन चंद) आईवडिलांची हत्या केली त्या घटनेने. त्यानंतर मोगलीचा बघीराच्या निमित्ताने कळपात झालेला प्रवेश, त्याचं शिक्षण असा परिचित भाग सुरू होतो. मोगलीला कळपातील त्याच्या अस्तित्वाची, शारीर पातळीवर तो इतर लांडग्यांपासून वेगळा असण्याच्या गोष्टींची चिंता आहे. कळपप्रमुख अकीराच्या आदेशामुळे मोगली स्वीकारला गेला असला, तरी त्याला सुप्त विरोध आहेच. त्याकरता स्वत:ला सिध्द करण्याचं आव्हान मोगलीने स्वीकारलं आहे. चित्रपटात बघीराने अत्यंत स्पष्टपणे मोगलीच्या 'गॉडफादर'ची भूमिका स्वीकारली आहे. चित्रपटभरातील त्याचे संवाद आणि त्याचे निर्णय यांमुळे ती अधिक ठळक होते. जशी बघीराला मोगलीची, त्याच्या जिवाची चिंता आहे, तशीच मोगलीला कळपात स्वीकारलं जाईल की नाही याची बलूला काळजी आहे. मोगलीच्या भल्यासाठी असलेले ते दोन दृष्टीकोन एका टप्प्यावर परस्परांशी भिडतातदेखील. अकीरा म्हातारा झाल्यानंतर नियमाप्रमाणे कळपातले इतर लांडगे त्याला आव्हान देतात. तेव्हा मोगली जंगलाजवळच्या गावातून (माणसाचं शस्त्र समजली जाणारी) आग आणून सर्वांशी लढू पाहतो. मात्र तत्त्वनिष्ठ अकीला मोगलीने माणसाचं शस्त्र वापरून नियमभंग केला म्हणून त्याला कळपापासून दूर करतो. हे असे सारे घटनाक्रम मोगलीबरोबरच इतर प्राणी पात्रांना उंची आणि अर्थ देत जातात. चित्रपटातील 'का' हे अजगराचं पात्रंदेखील तसंच. (ते मूळ पुरुषपात्र. मात्र 'दि जंगलबुक' आणि 'मोगली' या दोन्ही चित्रपटात ते स्त्रीरूपात समोर येतं.) त्या पात्राला आदिम देवतेप्रमाणे वलय लाभल्यामुळे त्याच्या अस्तित्वाला वेगळी धार आल्यासारखी भासते.


त्यानंतरचा टप्पा मोगलीचा माणसांच्या सहवासातला आहे. मोगली माणसांच्या हाती सापडतो. ते त्याचा प्राणिसदृश आवेश पाहून त्याला पिंजऱ्यात बंद करतात. तो शांत झाल्यानंतर त्याची काळजीही घेतात. मोगली काही काळासाठी त्या माणसांचा, त्यांच्या संस्कृतीचा भाग होतो. मात्र मोगलीच्या मनात सततची एक द्विधा मन:स्थिती आहे, ती म्हणजे तो नेमका कोण आहे? लांडगा की माणूस? चित्रपटातील मोठा भाग जंगलात आणि काही भाग माणसांच्या गावात घडताना ते पात्र स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेऊ पाहतं, ही त्यातली महत्त्वाची बाब आहे. चित्रपटाला तो रोख देण्याचं काम पटकथाकार कॅली क्लोव्ह हिने उत्तमपणे निभावलं आहे.

मोगली वगळता चित्रपटातील सर्व पात्रं डिजिटली (थ्रीडी-ऍनिमेशनने) तयार करण्यात आली आहेत. 'डिस्ने'चा 'दि जंगलबुक' पाहिला, तर त्यातील पात्रं भारदस्त आणि आकर्षक दिसण्याचा आग्रह जाणवतो. मोगलीमध्ये ती पात्रं त्यांच्या मूळ रूप आणि वृत्ती यांनुसार निर्माण करण्यात आल्याचं दिसतं. म्हणूनच मोगलीतला बलू हा लोभसवाणा अस्वल नाही. तो थोडासा अनाकर्षक, ज्याला 'रॉ' असं म्हणतात त्या तऱ्हेचा आहे. इथला शेरखानदेखील राजबिंडा वगैरे नाही. त्याचा चेहरा उग्र आहे. त्याला पाहताचा तो नरभक्षक असावा असं भय चटकन वाटून जातं. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे त्या सर्व पात्रांना लाभलेले आवाज दिग्गजांचे आहेत. शेरखानसाठी बेनेडिक्ट कंबरबॅच या उत्तम ब्रिटिश अभिनेत्याने आवाज दिला आहे. बेनेडिक्टचा आवाज देणगी असल्याप्रमाणे आहे. त्याचं आवाजावर विलक्षण प्रभुत्व आहे. (जर तुम्ही पीटर जॅक्सनची हॉबिट ही चित्रपट मालिका पाहिली असेल, तर त्यातील महाकाय ड्रॅगनला आवाज देऊन त्याचं अतिविशाल आणि भयकारक अस्तित्व निर्माण केलं ते बेनेडिक्ट कंबरबॅच यानेच!) बघीरा पात्रासाठी क़ि्रश्चन बेल याने, तर 'का' या पात्रासाठी केट ब्लँचेट हिने आवाज दिला आहे. पण चित्रपटाच्या मानावळीत सर्वांत महत्त्वाचं नाव आहे ते दिग्दर्शक ऍंडी सर्कीस याचं. चित्रपटाच्या कथेपासून व्हीएफक्सपर्यंतचा विचार ज्या डोक्यातून उपजला, ते डोकं ऍंडी सर्कीस याचंच. सर्कीसचं नाव चिरपरिचित झालं ते 'लॉर्ड ऑफ दी रिंग्ज' या महाकाव्यपर चित्रपटातील गॉलम या पात्रामुळे. ते पात्र डिजिटली साकारलं असलं, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या मोशन कॅप्चर या व्हीएफएक्स तंत्रासाठी ऍंडी सर्कीसने अभिनय केला आणि गॉलमचं पात्र अजरामर झालं. सर्कीसने पुढे 'प्लॅनेट ऑफ दि एप्स' या चित्रपट मालिकेसाठी पुन्हा त्याच तंत्राप्रमाणे अभिनय करत सिझर हे पात्र साकारलं. ती सारी डिजिटल पात्रं खऱ्याखुऱ्या अभिनेत्यांइतकीच गंभीरतेने साकारलेली पात्रं आहेत. आता तर सर्कीस हा त्या तऱ्हेची पात्रं साकारण्यासाठीचा एकमात्र उत्तम अभिनेता समजला जातो, यातच त्याचं यश सामावलं आहे. सर्कीसने 'मोगली' दिग्दर्शित करताना प्रथमपासूनच त्याचं लहानांसाठीचं आवरण भेदलं आणि त्याला अधिक गडद रूप दिलं. म्हणूनच चित्रपटातील हिंसा असो वा पात्रांची रचना, सर्वत्र खऱ्या-गहिऱ्या भावनांचा स्पर्श जाणवतो. त्याने बलू या पात्रासाठी आवाजही दिलेला आहे. (म्हणूनच त्या पात्राला यापूर्वीच्या पात्रांप्रमाणे विनोदाऐवजी गंभीरतेचा बाज आहे.) सर्कीसने मोगलीप्रमाणे इतर पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाच्या छटा बदलण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. किपलिंगच्या कथेप्रमाणे मोगलीच्या जंगलाचा परिसर हा भारतातील आहे. ती बाब यापूर्वी सिनेमांमध्ये दिसत नाही. दिसलीच तर त्याची केवळ छटा दिसते, तीदेखील अगदीच नाइलाजामुळे आल्यासारखी. सर्कीसच्या या चित्रपटात प्रथमपासूनच भारतीय वाद्यांचा, विशेषत: बासरीचा उपयोग करून संगीतरचना केलेली आढळते. (संगीतकार नितीन सोहनी). त्यामुळे त्याचं भारतीयत्व अधोरेखित होत राहतं. गोष्टीच्या रूट्सचा तो मूळ धागा इतर चित्रपटकर्त्यांना का टाळावासा वाटला, ते कळत नाही. मोगलीचं गावातील वास्तव्यदेखील तिथल्या ग्रामसंस्कृतीच्या हलक्या छटांनी खुलून येतं. मोगलीची आतापर्यंतची शेरखानशी लढाई त्याचं साहस म्हणूनच समोर आली आहे. 'मोगली'मध्ये त्या प्रसंगाची रचना साहसापेक्षा त्याने कळपाचा आणि पर्यायाने जंगलाचा प्रमुख होण्याच्या अनुषंगाने केलेली आहे. त्यामुळे तो संग्राम लॉजिकली खरा वाटतो. चित्रपताच्या सुरुवातीलपासून 'मी कोण?' या वैश्विक प्रश्नाचा शोध घेणारा मोगली त्या प्रश्नाचं उत्तरदेखील शोधून काढतो. उत्तम पटकथा, दिग्दर्शन, जमेची तांत्रिक बाजू यांमुळे 'मोगली'चा अनुभव अधिक सच्चा झाला आहे.

रीमेक आपल्याकडेही होतात. त्यामध्ये जुनी कथा जशीच्या तशी छापण्याकडे किंवा जुन्या चित्रपटातील प्रसिध्द प्रसंग तसेच्या तसे सादर करण्याकडे कल असतो. मात्र रीमेक करताना कथेला योग्य दृष्टीकोनांची आणि विचारांची जोड दिली, तर ती निर्मिती अनुभवाच्या आणि अर्थाच्या पातळीवर अधिक उंचीवर पोहोचू शकते, याचं 'मोगली' हा चित्रपट उत्तम उदाहरण आहे.

किरण क्षीरसागर

[email protected]