उद्योगबोधची चुकू न दे वारी - नरेंद्र बगाडे

 विवेक मराठी  04-Dec-2018

मराठी माणसाला उद्योगधंदा जमत नाही असं म्हणण्याचे दिवस आता इतिहास जमा झाले आहेत. आज मोठया प्रमाणावर मराठी तरुण नोकरी न करता उद्योगधंद्याकडे वळला आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही मराठी उद्योजकांच्या उत्कर्षासाठी आणि विकासासाठी झटणारी संस्था. सुमारे 18 वर्षांपूर्वी इंजी. स्व. माधवराव भिडे या अभियंत्याने हाताच्या बोटावर मोजण्याइक्या सदस्यांसह ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही संस्था उभी केली. आज या बीजाचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे. 2200च्यावर उद्योजक संस्थेचे सदस्य असून संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या 51 शाखा आहेत. या संस्थेतर्फे दर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषद आयोजित केली जाते. 'उद्योगबोध' असं या परिषदेचं नाव. मराठी उद्योग जगतातील पंढरीची वारी असं काहीसं या परिषदेविषयी म्हटलं जातं. ही उद्योजकीय वारी नेमकी कशी आहे आणि कोणते उद्योजक वारकरी तिकडे येतात, याविषयी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सेक्रेटरी जनरल नरेंद्र हनुमंत बगाडे यांनी केलेलं विश्लेषण.

द्योगबोध म्हणजे नेमकं काय? आगामी उद्योगबोध कधी आहे?

मराठी उद्योगविश्वातील मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन एकमेकांना भेटावं, परिचय करून घ्यावा, त्यातून एकमेकांना संदर्भ देऊन व्यवसायाची देवाणघेवाण व्हावी, त्याचबरोबर उद्योगविश्वातील तज्ज्ञ मंडळींचे अमृततुल्य विचार ग्रहण करावेत, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योगाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधी कशा मिळवाव्यात या सगळयांचा बोध म्हणजे 'उद्योगबोध'. इंजी. स्व. माधवराव भिडे साहेबांनी सन 2000 साली सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची स्थापना केल्यानंतर अशा प्रकारे आंतराराष्ट्रीय स्तरावरील मराठी उद्योजकांची ही परिषद सुरू झाली. सुरुवातीला ही परिषद दर वर्षी व्हायची. मात्र उद्योजकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद आणि परिषद उभारण्यास अपुरा पडणारा वेळ यामुळे ही परिषद नंतर दोन वर्षांतून एकदा होऊ लागली. 13 व 14 फेब्रुवारी 2019ला नवी मुंबई येथील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे ही परिषद होणार आहे.

 

संपर्क : नरेंद्र हनुमंत बगाडे

भ्रमणध्वनी:9892339667, [email protected] 

यंदाच्या उद्योगबोधचं वैशिष्टय काय?

यंदाच्या उद्योगबोधची अनेक वैशिष्टयं सांगता येतील. पण या वेळी आपण नवीन उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना त्यांच्या उद्योगात समर्थपणे पाय रोवून उभे राहता येईल यासाठी 'इन्क्युबेशन फंडिंग सपोर्ट' सुरू करणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 2000पेक्षा जास्त उद्योजक या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. या उद्योजकांमध्ये आपापसांत 50 हजार संदर्भ व्यवसायांची देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे. हा एक प्रकारे विश्वविक्रम असल्याने, लिम्का बुक ऑॅफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे.

 आपण आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषद अर्थात उद्योगबोध असं म्हणता, मग आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही देशांचे उद्योजक वा त्या देशांचे प्रतिनिधी यामध्ये सामील होणार आहेत का?

हो, निश्चितच. ही आंतरराष्ट्रीय स्तरावरचीच उद्योजकीय परिषद आहे. या परिषदेस किमान 5 देशांचे राजदूत, प्रतिनिधी वा उद्योजक सामील होणार आहेत. आतापर्यंत त्यांनी तशा स्वरूपाची पुष्टी दिली आहे. यामध्ये रशिया, स्पेन, ऑॅस्ट्रेलिया, ओमान, सौदी अरेबिया, टांझानिया या देशांकडून परिषदेस उपस्थित राहण्याबाबत संमती मिळालेली आहे. उद्योगबोधमध्ये आणखीही काही देश सामील होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील व्यवसायाच्या संधी आणि व्यवसायवृध्दीसाठी काय करावं यासंबंधी एका चर्चासत्राचं आयोजनदेखील करण्यात आलेलं आहे.

सॅटर्डे क्लबसह इतर काही संस्थादेखील या परिषदेच्या आयोजनात सहभागी आहेत काय?

ही उद्योजकीय परिषद निव्वळ सॅटर्डे क्लबमधील उद्योजकांचीच नसून ती समस्त मराठी उद्योजकांची परिषद आहे. त्यामुळे उद्योगबोध यशस्वी करण्यासाठी उद्योगविश्वातील बलाढय अशा संस्था झटत आहेत. यामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर, महाराष्ट्र चेंबर ऑॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍंड ऍग्रीकल्चर, इंडियन मर्चंट्स चेंबर्स, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम, गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण, विनर्स ट्रेनिंग ऍकॅडमी आणि विवेक प्रकाशन अशा मातबर संस्थांचा यात समावेश आहे.

उद्योगबोधमध्ये सामील होणाऱ्या उद्योजकांचा काय लाभ होईल?

उद्योगबोधमध्ये संपूर्ण देशांतून 2500हून अधिक महाराष्ट्रीय उद्योजक सामील होणार आहेत. पहिल्यांदाच एवढया भव्य-दिव्य स्वरूपात अशा प्रकारची उद्योजकीय परिषद होणार आहे. यामध्ये सामील होणाऱ्या उद्योजकास एकाच छताखाली उद्योगास आवश्यक सर्व बाबी उपलब्ध होणार आहेत. मार्केटिंग फंडे, उद्योग विस्ताराची माहिती, उद्योग विस्तारासाठी आवश्यक असणारी दृष्टी हे सर्व काही एकाच छताखाली मिळणार आहे.

उद्योगबोधसाठी कोणकोणते मान्यवर येणार आहेत?

उद्योगबोधसाठी विविध क्षेत्रांतील आणि स्तरांवरील मान्यवरांची मांदियाळी असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उद्योगबोधचं उद्घाटन होणार असून या सोहळयास शिक्षणमंत्री विनोदजी तावडे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्योगमंत्री सुभाषजी देसाई यांच्या हस्ते समारोप होणार असून मुख्य अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे असणार आहेत. तसंच या वर्षी उद्योग क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या गुणी उद्योजकांना 'इंजी. स्व. माधवराव भिडे आदर्श उद्योजक पुरस्कारा'ने आपण पहिल्या दिवशी सन्मानित करणार आहोत, तर दुसऱ्या दिवशी सुप्रसिध्द उद्योजक आणि भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी, गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर, संशोधक आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, डॉ. सिध्देश्वर स्वामी, डॉ. जगत शाह असे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. खऱ्या अर्थाने ही मराठी उद्योग जगतातील चुकवू नये अशी वारी आहे. तेव्हा प्रत्येक मराठी उद्योजकाने या वारीत सामील व्हावं, असं समस्त मराठी उद्योजकांना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट परिवारातर्फे मी आवाहन करतो.

  

मुलाखतकार

प्रमोद सावंत

8108105232