दीपस्तंभ

 विवेक मराठी  05-Dec-2018

सहा डिसेंबर, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब हे काळाच्या पुढे पाहणारे नेते होते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तिन्ही पातळयांवरील भावी प्रगतीचा मापदंड बाबासाहेबांना कळला होता. मानवी मूल्यांचा अंगीकार, विद्वेष-हिंसेचा धिक्कार आणि राष्ट्रीय एकात्मेला, अखंडतेला प्राधान्य या मार्गाने पुढे जात आपण आपला आणि आपल्या राष्ट्राचा भविष्यकाळ घडवला पाहिजे, असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून मिळत असे आणि आजच्या संदर्भातही तो लागू आहे.

काही काही व्यक्ती या काळाची पावले ओळखणाऱ्या किंवा दूरदृष्टी लाभलेल्या असतात. आसपासचे वास्तव किंवा भूत-वर्तमानाच्या अनुभवावर त्या भविष्याचा अंदाज बांधू शकत असतात. यामध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप वरचा क्रमांक लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवनानुभव बाजूला ठेवून राष्ट्राचा, पर्यायाने समाजाचा विचार केला होता. गत आयुष्यात भोगलेली अवहेलना, अपमान आणि मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी केलेला संघर्ष लक्षात घेतला, तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन किती अलौकिक होते याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सार्वजनिक जीवन केवळ छत्तीस वर्षांचे आहे. एवढया कमी काळात बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदर्श उभा केला, तो हिमालयाच्या उंचीचा आहे. त्यांनी एका बाजूला वंचित, उपेक्षित समाजात आत्मभान निर्माण केले आणि दुसऱ्या बाजूस या समाजाला इतरांप्रमाणे जगण्यासाठी मानवी मूल्य प्रस्थापित करणारा समतेचा लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक कृतीमागे, विचारामागे निश्चित असा कार्यकारणभाव होता आणि त्यामुळे त्यांच्या विचाराला, कृतीला तात्कालिकता प्राप्त झाली नाही. आजच्या संदर्भातही ते विचार आणि कृती मार्गदर्शक ठरू शकतात. मात्र त्यामध्ये एकच पथ्य पाळण्याची गरज असते, ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये, त्यांनी केलेल्या कृतीमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करता कामा नये. आज अनेक जण आपल्या कुवतीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मांडणी करतात आणि त्यांना हवा तसा अर्थ काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असेच म्हणायचे आहे असे ठामपणे सांगत राहतात; एवढेच नाही, तर सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जो मार्ग मान्य नव्हता, तोच मार्ग आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असे छातीठोकपणे सांगतात, तेव्हा खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आजच्या संदर्भात समजून घेण्याची गरज निर्माण होते.

 ''जेव्हा आपण समाजाविषयी बोलतो, तेव्हा त्याविषयी आपल्या मनात एकत्वाची धारणा असते. सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा, सार्वजनिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही समाज या एककाची गुणवैशिष्टये असतात.''

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आजचे वास्तव

आज आपला महाराष्ट्र अस्मितांच्या वणव्यात होरपळत आहे आणि या वणव्याची धग सर्वच समाजघटकांना जाणवत आहे. या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे सामाजिक तणाव निर्माण झाला. त्यानंतर महाराष्ट्रभर दंगलसदृश चित्र निर्माण झाले. पुढच्या काळातल्या घटनाक्रमाचा आपण बारकाईने अभ्यास केला, तर असे लक्षात येईल की कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने काही समाजगटांच्या अस्मिता चेतवून सामाजिक दुफळी निर्माण करण्याचा आणि नक्षलवादी कारवाया करत देशात अराजक निर्माण करण्याचा काही मंडळींचा डाव होता. हे करत असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे चुकीचे अर्थ लावून  समाजात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हिंसेचा धिक्कार करणाऱ्या डॉ. बाबासाहेबांचे तोडमोड केलेले वाक्य कोरेगाव-भीमा येथे वाटण्यात आलेल्या पत्रकावर छापले होते आणि रक्तरंजित संघर्ष करण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरच प्रेरणा आहेत असा आभास निर्माण केला गेला होता.

राष्ट्र प्रथम 

या साऱ्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज, लोकशाही आणि संविधानाला विरोध करणारे लोक यांच्याबद्दलचे विचार वाचले की ते किती उच्च प्रतीचे राष्ट्रनिष्ठ होते यांची प्रचिती येते. लोकशाहीच्या आणि संविधानाच्या विरोधात असणाऱ्या मंडळींबाबत ते म्हणतात, ''साम्यवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष या दोन घटकांकडून संविधानावर मोठया प्रमाणात नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. ते संविधानाच्या प्रती नापसंती का व्यक्त करतात? खरोखर संविधान वाईट आहे म्हणून ते नापसंती व्यक्त करतात का? निश्चितपणे नाही असे म्हणतो. साम्यवादी पक्षाला कामगारांच्या हुकूमशाही तत्त्वावर आधारलेले संविधान हवे आहे. हे संविधान संसदीय लोकशाहीवर आधारित असल्यामुळे ते संविधानाचा निषेध करतात. साम्यवाद्यांना दोन गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट त्यांना हवी, ती अशी की संविधानातील मूलभूत अधिकार निरपेक्ष आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय असावेत, जेणेकरून त्यांच्या पक्षाला सत्ता प्राप्त करण्यात अपयश आले, तर केवळ अनिर्बंध टीका करण्याचे नव्हे, तर राज्य उलथून पाडण्याचेही स्वातंत्र्य त्यांना हवे आहे.'' आज नक्षलवादाचे समर्थन करणारे लोक याच मानसिकतेचे आहेत. त्यांना इथली सत्ता उलथून लावायची आहे. त्यासाठी ते रक्तरंजित क्रांती करू इच्छितात. इतके दिवस दुर्गम भागात आपल्या कारवाया करणारे हे नक्षलवादी आता नागरी वस्त्यांत आपले बस्तान बसवू पाहत आहेत. त्यांना जनाधार मिळावा यासाठी कोरेगाव-भीमासारख्या घटनांचे भांडवल केले जात आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपली विचारधारा, तत्त्वज्ञान हेच महत्त्वाचे आणि इतर विचार चूक ही भूमिका घेणारे अप्रत्यक्षपणे आपल्या लोकशाहीसमोर आव्हान उभे करतात. अशा प्रकारच्या विचारधारा आपल्या देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्य कशा प्रकारे धोक्यात आणू शकतात, याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ''भारतीय लोक आपल्या तत्त्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्त्वप्रणालीला मोठे मानतील? मला माहीत नाही. परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे घालविले जाईल.'' प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय म्हणून स्वतःला गौरवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार वाचताना आपण समकालीन वास्तवाचा विचार करायला हवा. आज देश आणि संविधान यापेक्षा आपला विचार, तत्त्वज्ञान श्रेष्ठ समजणाऱ्या मंडळींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नव्याने समजावून सांगायला हवेत.

मार्ग बाबासाहेबांचा

आजचे समाजवास्तव आणि त्या वास्तवाचा राजकीय फायदा घेण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतात, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुन्हा नव्याने समजावून सांगण्याची आज गरज निर्माण झाली आहे. कारण आपल्याला आपला देश कशा प्रकारे उभा करायचा आहे याचे त्यांनी दिशादर्शन केले आहे आणि त्याच मार्गाने जाण्यात आपले भले आहे. तो मार्ग आहे संविधानाचा. भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासमोरची आव्हाने आणि देशासमोरचे धोके अनेक वेळा अधोरेखित केले आहेत ते त्यांच्या दूरदृष्टीमुळेच. बाबासाहेबांच्या या दूरदृष्टीला आधार मानून आपण आपला व्यवहार कसा करणार आहोत, हा आजच्या काळातील महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या संविधानाने आपल्याचा जसे मूलभूत हक्क दिले, तशीच काही कर्तव्येही सांगितली आहेत. ही कर्तव्ये जगणे म्हणजेच संविधान जगणे होय. आज आपल्या समाजजीवनात किंवा राष्ट्रजीवनात ज्या वावटळी उठत असतात, त्यांना थोपवण्याची शक्ती आपल्याला संविधानातून मिळते. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेली दिशा आणि संविधानाचे आचरण ही पूर्वअट असणार आहे. आपल्याला आपला देश आणि समाज सबळ, समर्थ करायचा आहे आणि त्या वाटचालीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहेत.