कुमारांची 'पोपटपंची'

 विवेक मराठी  07-Dec-2018

पिंजऱ्यातील पोपट बोलू लागतो, तेव्हा त्याला दोन कारणे असतात. एक म्हणजे त्याला जे शिकवलेले असते ते बोलून आपल्या मालकाप्रति निष्ठा व्यक्त करण्यासाठी तो बोलतो. दुसरे म्हणजे आपल्याकडे इतरांचे लक्ष जावे आणि लाभाचे चार दाणे आपल्या पुढेही टाकले जावेत, अशी अपेक्षा ठेवून पोपटपंची चालू असते.  अशा पाळीव पोपटाकडे पाहून बऱ्याच वेळा त्याच्या बुध्दिमत्तेचे, शोधक वृत्तीचे किंवा भविष्यातील घटनांच्या आकलनाचे कौतुक करणारे आपल्या समाजात असतात. आपण त्रिकालज्ञानी झालो आहोत आणि तरी आपल्या पोपटपंचीवर जनता जाम खूश आहे असा त्या पोपटांना भ्रम झालेला असतो आणि मग 'उचलली जीभ लावली टाळयाला' या म्हणीचा समाजाला अनुभव देण्याची जबाबदारी केवळ आपल्याच खांद्यावर आहे अशा थाटात ते बोलू लागतात.

महाराष्ट्रातील दोन 'कुमारां'ची अशीच काहीशी स्थिती झाली आहे. फरक फक्त इतका आहे की पिंजऱ्यातील पोपट हे पोटासाठी पोपटपंची करतात. हे दोन कुमार मात्र द्वेषाच्या तडक्यावर स्वार्थाची पोळी भाजत असतात. एका कुमाराने आपल्या दिव्य शोधपत्रकारितेला पणाला लावून अवघ्या जगताला धक्का बसेल अशा रहस्यमय कटाचा शोध लावला. हे कुमार केवळ शोधपत्रकार नाहीत, तर भविष्यवेत्तेही आहेत. 1975 साली एक आंतरराष्ट्रीय कट झाला, त्याचा परिणाम म्हणून 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले अशा प्रकारचा रहस्यभेद करून आपण खूप मोठी राजकीय खळबळ निर्माण करत असल्याचा आव या कुमारांनी आणला होता. जी व्यक्ती 2002 साली एका राज्याची मुख्यमंत्री होते, 2014 साली पंतप्रधान होते, त्या व्यक्तीचे 1975 साली राजकीय अस्तित्व काय असेल? असा प्रश्न कुमारांना पडला नाही की त्याच्या पाठीराख्यांनी त्यांना तो विचारला नाही. आंतरराष्ट्रीय कटामुळे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी 2019 साली निवडून येणार नाहीत, आले तर 2024 साली देशात निवडणुका होणार नाहीत अशी भविष्यवाणीही या कुमारांनी केली आहे. एकाच वाक्यात आपण दोन परस्परविरोधी विधाने करतो आहोत, याचेही भान या कुमारांना राहिले नाही. कारण त्यांना मालक जे बोलायला सांगेल किंवा मालकाला खूश करण्यासाठी जे बोलणे आवश्यक आहे, अशा पोपटाच्या गटातील ते असल्यामुळे कुमार अशाच स्वरूपाची शोधपत्रकारिता करत राहणार, हे वेगळे सांगायला नको. पुढील काळात ते असे अनेक रहस्यस्फोट करून आपल्याला मिळालेल्या बिदागीचा पुरेपूर फायदा आपल्या मालकाला झाला पाहिजे याची काळजी घेत राहतील.

एका कुमाराने असा आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आणल्यावर दुसरा कुमार शांत कसा बसेल? आपले अस्तित्व दाखवण्याची हीच नामी संधी आहे, हे त्यांच्या पुरोगामी बुध्दीला कळायला वेळ लागला नाही आणि पुरोगामित्वाची झूल पांघरलेल्या या कुमारांनी भविष्यवाणी केली - 2019 साली मोदी सरकार निवडून येणार नाही. कुमार जेव्हा अशी भविष्यवाणी करत होते, तेव्हा त्या व्यासपीठावर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा महत्त्वाचा पदाधिकारी उपस्थित होता. कुमारांच्या या भविष्यकथनाला अंधश्रध्दा म्हणून विरोध करण्याऐवजी त्यानेही टाळया वाजवून कुमारांच्या भविष्यकथनाला अनुमोदन दिल्याचे ऐकण्यात आले. एका बाजूला  आम्ही पुरोगामी आहोत असा डांगोरा पिटायचा आणि दुसऱ्या बाजूला 2019ची भविष्यवाणी करायची असा दुट्टपीपणा कुमारांच्या लौकिकाला अनुरूप असला, तरीही ज्यांचे अस्तित्वच संपले आहे, त्यांनी 2019च्या निकालाच्या उठाठेवी कशासाठी करायला हव्यात? हा खरा प्रश्न आहे. जे मोदी आणि त्यांची विचारधारा 2019मध्ये सत्तेत येणार नाही अशी भविष्यवाणी कुमार करत आहेत, त्याच विचारधारेच्या कार्यकर्त्यांच्या बळावर कधीकाळी कुमार आमदार झाले होते, हे ते सोईस्कररीत्या विसरतात. संपलेले राजकीय, संघटनात्मक जीवन जर मोदीद्वेषाने पुन्हा तग धरणार असेल तर कुमार तरी काय करणार? मोदीद्वेष ज्यांना आपल्या जगण्याची संजीवनी वाटत असते, त्यामध्ये हे कुमार पहिल्या पंगतीचे मानकरी असल्याचे त्यांनी सिध्द करून दाखवले आहे. मात्र मोदीद्वेषाची लागण झालेल्या या कुमारांनी आपल्या भाषणात मोदीचा प्रचार सुरू केला. ते म्हणाले, ''नवे रस्ते तयार करणे यापलीकडे देशात विकासाची कुठलीही कामे सुरू नाहीत.'' याचाच अर्थ मोदींच्या नेतृत्वाखाली देशात प्रगतीची अनेक कामे चालू आहेत. कारण कोणत्याही विकास योजनेची सुरुवात दळणवळणाच्या साधनांतूच होत असते. जेथे जेथे रस्ते पोहोचतील, तेथे तेथे विकास पोहोचतोच हे वेगळे सांगायला नको. पण ज्यांना मोदीद्वेषाची कावीळ झाली आहे, त्यांना हा विकासमार्ग कसा दिसणार?

जसजशा निवडणुका जवळ येत जातील, तसतशी कुमारांची पोपटपंची बहरात येत जाईल. मात्र त्यांच्या या पोपटपंचीचा समाजावर आणि त्याहीपेक्षा मतदानावर किती परिणाम होईल, हे सांगण्यासाठी आम्हाला कोणत्याही कुडमुडया भविष्यवेत्त्याची गरज वाटत नाही. जनतेच्या मनात आपल्याबाबत विश्वासार्हता असावी लागते, तरच जनता आपल्या वक्तव्यावर, कृतीवर विश्वास ठेवते आणि पाठिंबा देते. असे असेल, तर या दोन्ही कुमारांची महाराष्ट्रात विश्वासार्हता आहे का? गेल्या तीस-चाळीस वर्षांत या दोन्ही कुमारांनी माध्यम क्षेत्र आणि राजकारण यांचे साटेलोटे करून आपली तुंबडी भरण्याचाच प्रयत्न केला आहे, हे अवघा महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे कुमारांची पोपटपंची म्हणजे राजकीय द्वेषाची उबळ आहे, यापलीकडे त्याला काडीचीही किंमत नाही.