अभ्यासू व उमदा नेता - प्रा. ना.स. फरांदे

 विवेक मराठी  01-Feb-2018

महाराष्ट्राचे विधान परिषदेचे माजी सभापती व एक अभ्यासू राजकीय नेते प्रा. ना. स. फरांदे यांचे 16 जानेवारी रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

तो 1978चा काळ असेल. अणीबाणी उठलेली होती. जनता पार्टीची सत्ता झाली होती. आपले मतभेद थोडे दूर सारून जरी विरोधी पक्ष एकत्र आलेले होते, तरी विचारांमध्ये टोकाचे अंतर असल्यामुळे पूर्वीचे समाजवादी युवा जनता आणि जनसंघवाले जनता युवा मोर्चा या युवक संघटना चालवायचे. नगर जनता युवा मोर्चाच्या एका युवकांच्या मेळाव्यासाठी मला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलावले होते. योगायोगाने त्याच दिवशी नगर जिल्हा जनता पार्टीचीही बैठक होती. जिल्ह्यातील नेत्यांचा परिचय व्हावा या दृष्टीने ऍड. राजाभाऊ झरकरांनी मला त्या बैठकीच्या ठिकाणी नेले. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा बैठक  सुरू व्हायची होती. चहा पिताना राजकीय नेत्याचा विषय निघाला. बबनराव ढाकणे, सूर्यभानजी वहाडणे, कुमार सप्तर्षी वगैरे नेत्यांबरोबर बसलेले 35-40 वर्षांचे एक गृहस्थ म्हणाले, ''अहो, राजकीय नेत्यांना कुठंही गेलो तरी आपण सेंटर ऑफ फोकस असावेसे वाटते. सभा, मेळावे, मोर्चा, मिरवणुका यात तर ते व्यासपीठावर किंवा आघाडीवर सर्वात पुढे राहण्याचा प्रयत्न तर करतातच, पण अगदी अंत्ययात्रेतही आपणच तिरडीवर का नाही असा प्रश्न त्यांच्या मनात येत असावा.'' हास्याचे फवारे उडाले.

गप्पांची ती मैफल रंगवणारे ते गृहस्थ होते प्राध्यापक नारायण सदाशिव फरांदे! ही त्यांची-माझी पहिली ओळख आणि पुढे ती वाढत जाऊन कायमची घट्ट झाली.

'सर' म्हणून सर्वदूर परिचित असलेले ना.स. फरांदे हे मूळचे ओझर्डे या सातारा जिल्ह्यातील छोटयाशा गावचे! एका गरीब कुटुंबात त्यांचे बालपण गेले. त्यांना अखिल भारतीय क्षत्रिय माळी समाजाने वार्षिक शंभर रुपयांची शिष्यवृत्ती दिली. त्यांच्या सहाही भावांचे शिक्षण याच शिष्यवृत्तीमध्ये झाले आणि सर्व जण शिकून चांगल्या पदांवर गेले. सरांचे प्राथमिक शिक्षण ओझर्डे गावात झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते वाईला आले. त्यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सोलापूरला घेतले. तिथल्या संगमेश्वर कॉलेजमध्ये त्यांच्या वर्गात सुशीलकुमार शिंदे होते. या वर्गमित्रांनी एकदा सांगितले की सोलापुरात वा इतरत्रही होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत आम्ही दोघेही भाग घ्यायचो आणि गंमत म्हणजे पहिला किंवा दुसरा क्रमांक आमच्यापैकीच कुणाला तरी मिळायचा. फरांदे सर पहिल्यापासूनच हुशार व अभ्यासू होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते सुवर्णपदक विजेते होते.

उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही दिवस धुळे व मुंबई येथे प्राध्यापकाची नोकरी केली. पुढे कोपरगावला मराठी विषयाची प्राध्यापकी करत असतानाच तिथल्या बराटेंची कन्या मंगल हिच्याशी त्यांचा विवाह झाला आणि ते कोपरगावचे जावई झाले.

प्राध्यापक असताना आपल्या स्वभावामुळे आणि शिकवण्याच्या हातोटीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते. आपला व्यवसाय करता करताच ते हळूहळू सामाजिक कार्यात रस घेऊ लागले. शिक्षण क्षेत्रातच असल्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण होती. त्यामुळे 'पुक्टो' या शिक्षकांच्या संघटनेच्या स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. या संघटनेचे ते नगर जिल्हा अध्यक्ष झाले. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांचे वेतन, सेवाशर्ती, सेवेत कायम करणे वगैरे अनेक प्रश्नांसाठी मोर्चे, धरणे, सत्याग्रह वगैरे मार्गांनी केलेल्या आंदोलनामध्ये नेतृत्व केले आणि ते प्रश्न धसाला लावण्यासाठी प्रयत्न केले.

देशामध्ये अणीबाणी लादली गेल्यानंतर हुकूमशाहीचा वरवंटा फिरताना त्यांनी पाहिला आणि ते अस्वस्थ झाले. ही हुकूमशाही दूर करण्यासाठी स्थापन झालेल्या जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे राजकीय नेत्यांचा त्यांच्याशी परिचय झाला. त्यातही राजाभाऊ झरकर, सूर्यभानजी वहाडणे, वसंतराव भागवत, रामभाऊ म्हाळगी यांच्याशी त्यांच्या चांगल्या तारा जुळल्या. त्यामुळे जनता पार्टी फुटल्यानंतर स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीत ते आले. त्यांचे काम पाहून पक्षाने त्यांच्यावर नगर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्हाभर प्रवास करून त्यांनी अनेक माणसे पक्षाला जोडली आणि पक्षाचे काम वाढवायला सुरुवात केली.

पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला सर्व जिल्हाध्यक्षांनी निमंत्रण असते. त्यामुळे ते प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहू लागले. या बैठकांना नियमितपणे येऊन विविध विषयांवरील ठरावांवर ते उपयुक्त सूचना करीत. आपले विचार स्पष्टपणाने व परखडपणे ते मांडीत असत. जिल्ह्यातील कार्यातल्या आणि प्रदेश बैठकीतल्या त्यांच्या या सहभागामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. महाराष्ट्रभर प्रवास करून त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काही ठिकाणी निर्माण झालेले पक्षांतर्गत मतभेद त्यांनी कौशल्याने चर्चा करून ते मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उत्तम वक्तृत्वामुळे आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना ठिकठिकाणी विविध विषय मांडण्यासाठी पाचारण केले जाई. अवघड व क्लिष्ट विषय अगदी सोप्या भाषेत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मांडण्याची त्यांची हातोटी होती. भाजपाची पंचनिष्ठा, पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला पक्षाचा पायाभूत विचार 'एकात्म मानव दर्शन' अशा मूलभूत विषयांचा अभ्यास करून ते अवघड वाटणारे विषय ते सहजपणाने सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये उतरवीत असत.

1986च्या नगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली. पुक्टोच्या स्थापनेपासूनचा सहभाग, नोकरीनिमित्त धुळयातील संपर्क, नगरमधील रहिवास व प्रदेश कार्यकारिणीमुळे कार्यकर्त्यांशी आलेला संबंध यामुळे ही निवडणूक त्यांना अवघड गेली नाही. कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणीपासूनच मोठया उत्साहाने काम केल्यामुळे ते निवडून आले. दोन वेळा ते या विधान परिषद पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले. विधान परिषद आमदार म्हणून साईबाबा संस्थान शिर्डीचे विश्वस्त, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी सदस्य, राज्य रोजगार हमी योजना समितीचे सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यांची सभागृहातली अनेक भाषणे गाजली. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे त्यांना विधान परिषदेवर पुन्हा विधानसभेतून पाठवण्यात आले. ते विधान परिषदेचे आधी उपसभापती आणि नंतर सभापतीही झाले.

वि.स. पागे, जयंतराव टिळक यांसारख्या दिग्गजांची परंपरा असलेले विधान परिषद सभापतिपद त्यांनी समर्थपणे हाताळले. अनेकदा विविध विषयांवर सभागृहातले वातावरण तापते. अशा वेळी कधी हेडमास्तरांचा कडक आविर्भाव घेऊन, तर कधी आपल्या मिश्कील स्वभावानुसार काही कोटीक्रम करून ते सभागृहातील वातावरण शांत करीत असत. देशातल्या विविध राज्यांमधील विधान परिषद सभापती फोरमचे ते काही काळ अध्यक्षही होते. त्या काळात त्यांनी या सभापतीचे फोरमतर्फे संमेलनही भरवले होते. मराठीवर त्यांचे आत्यंतिक प्रेम होते. भाषेच्या शुध्दलेखनाबाबत ते अत्यंत आग्रही असत. कोणत्याही ठरावातील अथवा सरकारी परिपत्रकातील मराठी भाषेच्या शुध्दलेखनातील चुका त्यांना अजिबात खपत नसत. साहित्य व कलेत त्यांना विशेष रस होता.

त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही प्रश्नाचा ते बारकाईने अभ्यास करीत. पुक्टोच्या माध्यमातून काम केल्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच माहिती होती. या प्रश्नांसाठी आपल्या पदाच्या अधिकारात त्यांनी संबंधित मंत्री महोदयांना आपल्या कक्षामध्ये बोलावून ''हे प्रश्न तडीस न लावल्यास तुम्हाला सभागृहात याची उत्तरे द्यावी लागतील'' अशा स्पष्ट शब्दात समज देऊन त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नाला न्याय दिला.

मी नगरसेवक असताना पुण्यातील गंजपेठेतील महात्मा फुलेंच्या वाडयाचे स्मारक करण्याचा विषय आला. त्या वॉर्डातील माझ्या सहकारी नगरसेविका ज्योती पवार यांच्यासह आम्ही 'भव्य स्मारक तर झालेच पाहिजे, पण त्याबरोबरच विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसनही झाले पाहिजे' असा आग्रह धरला. पुढे स्मारक झाले, मी आमदार झालो, तरी विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळलेलाच होता. मग आम्ही विस्थापितांचे शिष्टमंडळ घेऊन सरांना भेटलो. त्यांनी प्रश्न समजावून घेऊन आपल्या पदाचा संपूर्ण अधिकार वापरून सतत पाठपुरावा केला. अगदी 5#10च्या छोटयाशा घरात राहून विडया वळून उपजीविका करणाऱ्या विस्थापित गरिबांना त्यामुळे स्वत:ची हक्काची घरे मिळाली. याबद्दलचे अनुभव विस्थापितांपैकी बालकिसन येमगुल याने पुस्तकरूपाने नंतर प्रसिध्दही केले आहेत. अशी कितीतरी कामे त्यांनी केली.

सर अत्यंत शिस्तप्रिय होते. भेटीगाठी, दौरे, ठरलेले कार्यक्रम हे सर्व वेळेवर व्हावेत असा त्यांचा आग्रह असे. राजकीय नेता असूनही सर्व कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित राहणे हे त्यांचे निश्चितच वेगळेपण होते. अर्थात कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून ते संयोजकावर रागवायचे नाहीत. लोकांनाच वेळेवर यायची सवय नसते हे त्यांना माहीत होते आणि कार्यकर्त्यांवर त्यांचे प्रेम असायचे. कित्येक कार्यकर्त्यांना त्यांनी अडल्यावेळी मदत केली. त्याचा स्वीय साहाय्यक सुभाष वाडयेची हृदयावरील शस्त्रक्रिया असताना त्याला त्यांनी रूटीनमधली शासकीय मदत तर केलीच, त्याशिवाय शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनशी बोलून 84 हजार रुपयांची सवलतही मिळवून दिली. शिवाय ऑपरेशन झाल्यावर विश्रांतीसाठी सर्किट हाउसमध्ये त्यांची सोय केली.

राजकीय नेत्यांचे अनेकदा आपल्या घराकडे दुर्लक्ष होते. सरांचे कुटुंब संख्येने मोठे होते, त्यामुळे कधीकधी प्रश्नही निर्माण होते. पण राजकारणातल्या धकाधकीतून व विविध जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते कौटुंबिक प्रश्नही मनापासून लक्ष घालून सोडवीत असत. त्यांच्या वागण्यात एक सहजपणा होता. त्यामुळे सर्वच पक्षांमधील नेत्यांशी त्यांचे मधुर संबंध होते. अशा एका हुशार, अभ्यासू, शिस्तप्रिय, समाजावर अकृत्रिम प्रेम करणाऱ्या नेत्याच्या निधनामुळे सरांच्या कुटुंबाचीच नव्हे, पक्षाचीच नव्हे, तर समाजाचीही मोठी हानी झाली आहे. 

विश्वास गांगुर्डे 

 

9422323264