लावणी सम्राट राम कदम

 विवेक मराठी  10-Feb-2018

*** डॉ. सुमेधा ज्ञानेश रानडे***

 राम कदम यांचा जन्म मिरज गावचा. मिरजेच्या संगीत परंपरेत अभिमानाने समाविष्ट करावे असे नाव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द संगीतकार रामभाई कदम! मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणावे असे 60चे दशक गाजविलेल्या लोकांमध्ये रामभाऊ कदम यांचा समावेश होतो. इतका मोठा प्रसिध्द कलाकार असूनही राम कदम यांनी आपल्या जन्मगावाशी व आपल्या गुरूंशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.

मिरजेच्या संगीत परंपरेत अभिमानाने समाविष्ट करावे असे नाव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द संगीतकार रामभाई कदम! मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणावे असे 60चे दशक गाजविलेल्या लोकांमध्ये रामभाऊ कदम यांचा समावेश होतो.

रामभाऊ यांचा जन्म मिरज गावचा. त्यांच्या वडिलांची खानावळ होती. पण ती फार काळ चालली नाही. दारिद्रयाची घनदाट छाया रामभाऊंच्या कुटुंबावर पसरू लागली. त्यामुळे रामभाऊंना शिक्षण अर्धवट ठेवून नोकरी पत्करावी लागली. मिरजेतीलच जनरल ब्रास कंपनीचे मालक चंदूलाल यांनी स्वतःच्या बँड पथकात छोटया रामना 'ट्रँगल' वाजविण्याचे काम देऊ केले. रामना ते काम आवडे, कारण संगीताची उपजत आवड त्यांच्या ठायी होतीच. पण हे काम करून पुरेसा पैसा मिळत नव्हता, त्यामुळे ही नोकरी सोडून रामभाऊंनी इचलकरंजीला हातमागावर कामाला जायला सुरुवात केली.

बिकट परिस्थिती असूनही कलेवर जिवापाड प्रेम करणारा तो खरा कलाकार, याची प्रचिती रामभाऊंना पाहून येते. त्या काळी ते मिरज-हातकणंगले रेल्वेने जात असत, आणि हातकणंगले-इचलकरंजी हा 4-5 मैलांचा प्रवास ते चक्क रोज पायी करत असत. कारण त्यांना पैसे वाचवायचे होते. हे पैसे वाचवून त्यांनी एक 'क्लॅरिओनेट' विकत घेतला. त्यानंतर पुनश्च ते मिरजेला मा. चंदूलाल यांच्या बँड कंपनीत 'क्लॅरिओनेट वादक' म्हणून दाखल झाले. पुढे याच मा. चंदूलाल यांच्या सल्ल्याने राम कदम यांना संगीत सम्राट अब्दुल करीम खाँ यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेण्याचे भाग्य लाभले.

दरम्यान मूळचे मिरजेचे छायाचित्रकार इ. महंमद यांच्यामुळे त्या काळच्या मराठीतील प्रसिध्द 'प्रभात' कंपनीत रामभाऊंचा चंचुप्रवेश झाला, तो 'ऑफिस बॉय' म्हणून संगीत विभागात झाडलोट करण्यासाठी. पण इथेही राम कदम यांच्यातील कलाकार त्यांना गप्प बसू देत नव्हता. तिथे काम करता करता ते विविध वाद्ये हाताळायला शिकले. केशवराव भोळे,
मा. कृष्णराव, वसंत देसाई अशा दिग्गजांच्या सहवासात वेळ घालवू लागले. अशा रितीने वाटचाल सुरू असताना रामभाऊंना हळूहळू यशाचा कवडसा दिसू लागला.

रामभाऊ कदम यांना त्या काळचे सुप्रसिध्द संगीतकार सुधीर फडके यांनी आपला संगीत साहाय्यक म्हणून काम दिले. नंतर मग 1949 साली पहिल्यांदा 'गावगुंड' या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी रामभाऊंकडे आली. पण अजून म्हणावे तितके यश मिळत नव्हते. 1959 साल उजाडले. अनंत माने यांनी 'सांगत्ये ऐका' हा चित्रपट करायला घेतला होता. या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी वसंत पवार यांच्याकडे होती. ग.दि. माडगूळकरांनी लिहून दिलेल्या गीतात 'बुगडी माझी सांडली गं' ही एक लावणी होती. वसंत पवार यांनी या लावणीस लावलेली चाल काही केल्या अनंत मानेंच्या मनासच येत नव्हती. शेवटी रामभाऊंवर ही जबाबदारी आली आणि पुढे त्या लावणीला राम कदमांनी चाल लावून तिचे कसे सोने झाले, हा इतिहास सर्वांना ठाऊक आहेच. या लावणीच्या चालीसंबंधी रामभाऊ एक गमतीशीर किस्सा सांगायचे, तो असा - रामभाऊ एकदा एका खेडयात गेले होते, तेथे एका मयतप्रसंगी महिला रडत होत्या, ते 'सूर' त्यांनी कानात साठवले होते. 'बुगडी माझी सांडली गं'च्या सुरुवातीच्या संगीतात त्यांनी त्या स्वरांचा वापर केला.

'बुगडी....'ने रामभाऊंना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. राम कदमांचा वनवास खऱ्या अर्थाने संपत आला होता. पुढे व्ही. शांताराम यांच्या 'पिंजरा' या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन रामभाऊंनी केले व मराठी चित्रसृष्टीत इतिहास रचला. रसिकांनी रामभाऊ कदम यांना 'लावणी सम्राट' हा किताब बहाल केला. त्यानंतर एकापेक्षा एक सरस रचनांनी रामभाऊंनी रसिकांना अक्षरशः तृप्त केले. 'केला इशारा जाता जाता', 'एक गाव बारा भानगडी', 'मुक्काम पोस्ट ढेबेवाडी', 'रंगपंचमी', 'वैभव' 60च्या दशकातील हे रामभाऊंचे काही गाजलेले चित्रपट.

रामभाऊ हे अस्सल मातीतील संगीतकार होते. त्यांनी आपल्या संगीतात लावणी, गण-गौळण, सवाल-जबाब, झगडे, भावगीत-भक्तिगीत, भूपाळी, भारूड, विराणी, लग्नाची, मंगळागौरीची, कोळयाची, धनगराची, वासुदेवाची, पोतराजाची अशी अस्सल मराठी संस्कृतीची गाणी दिली.

तब्बल 120 मराठी चित्रपटांना स्व. राम कदम यांनी संगीत दिले. सुमारे 114 गायक-गायिकांकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली. संगीत दिग्दर्शनाबरोबरच निर्मिती, पटकथा लेखन, संवाद लेखन, दिग्दर्शन ही क्षेत्रेही हाताळली. संपूर्ण कारकिर्दीत रामभाऊंना 13 फिल्मफेअर ऍवॉर्ड्स मिळाली.

इतका मोठा प्रसिध्द कलाकार असूनही राम कदम यांनी आपल्या जन्मगावाशी व आपल्या गुरूंशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. गुरू संगीत सम्राट अब्दुल करीम खाँ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिरजेतील उरुसात गलेफ वाहण्याच्या सोहळयाच्या वेळी रस्त्यावर स्वतः राम कदम बँडबरोबर क्लेरिओनेट वादन करीत जात असत. या महान संगीतकाराने एक-दोन नाही, तर तब्बल 50 वर्षे अशी सेवा केली. ''आम्ही कदम, आमच्या नावातच दम आहे'' असे रामभाऊ गमतीने म्हणायचे.

19 फेब्रुवारी 1997 रोजी रामभाऊ कायमचे काळाच्या पडद्याआड गेले. मिरजेच्या सांगीतिक इतिहासातील 'राम कदम' नावाचे सुवर्णपान हे पिढयान्पिढयांना आनंद, आदर्श देत राहील यात शंका नाही.

9423537317