कार्य पूर्णत्त्वास जाईल

 विवेक मराठी  10-Feb-2018

 

'मी डॉक्टरांच्या पुढे केव्हा समर्पित झालो, हे मला कळलेदेखील नाही.' अशा आशयाचे गुरूजींचे वाक्य आहे. श्रीरामकृष्ण परमहंसाच्या परंपरेत श्रीगुरूजी दीक्षित संन्यासी होते. आध्यात्मिक क्षेत्रात एक गुरू असताना आणि त्याला जीवन समर्पित केले असताना अन्य कोणाला शिष्य समर्पित होत नाही. श्रीगुरूजी झाले, हा एक चमत्कारच आहे.

 श्रीरामकृष्ण परमहंसाच्या परंपरेत श्रीगुरूजी दीक्षित संन्यासी होते. विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंद हे श्रीगुरूजींचे गुरू. स्वामी अखंडानंदांच्या निर्वाणानंतर श्रीगुरूजी पुन्हा नागपूरला आले. स्वामी अखंडानंदांनी आपल्या अन्य सर्व शिष्यांना आश्रमाच्या वेगवेगळया जबाबदाऱ्या दिल्या, परंतु सर्वात लाडका शिष्य मधुला कोणतीही जबाबदारी दिली नाही, का?

कारण मधु उर्फ श्रीगुरूजी यांचे जीवीतकार्य वेगळे होते. सारगाछीवरून आल्यावर ते हळूहळू डॉ. हेडगेवारांच्या संपर्कात येत गेले. 'मी डॉक्टरांच्या पुढे केव्हा समर्पित झालो, हे मला कळलेदेखील नाही.' अशा आशयाचे गुरूजींचे वाक्य आहे. आध्यात्मिक क्षेत्रात एक गुरू असताना आणि त्याला जीवन समर्पित केले असताना अन्य कोणाला शिष्य समर्पित होत नाही. श्रीगुरूजी झाले, हा एक चमत्कारच आहे.

श्रीगुरूजींचा जन्म 1906 सालचा. विवेकानंदाचा मृत्यू 1902 साली झाला. हिंदू संघटित व्हावा, मातृभूमीला समर्पित असावा, बलसंपन्न आणि चारित्र्यसंपन्न असावा, सर्व जगाला वेदान्ताची शिकवण देण्याइतका समर्थ व्हावा, ही विवेकानंदांची महत्त्वाकांक्षा होती. श्रीगुरूजींनी 1940 ते 1973 या काळात विवेकानंदांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या रूपाने स्वामी विवेकानंदांनीच आपले राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी जन्म घेतला का?

श्रीगुरूजींना समजून घेणे, वाटते तितके सोपे काम नाही. एकाच वेळी ते लहान बालकात लहान होत आणि तत्त्वज्ञानी भेटला की तत्त्वज्ञानी होत. गृहस्थी स्वयंसेवकापुढे ते गृहस्थी असत आणि संन्याश्यापुढे ते आदर्श संन्यासी असत. राष्ट्रहिताचा विचार करताना कोणाचा कसलाही मुलाहिजा न ठेवता अत्यंत स्पष्ट शब्दात ते विचार मांडत. स्पष्टता पचविणे फार कठीण असते. त्यांचे शब्द उचलून अनेकांनी त्यांना हिंसाचारी, फॅसिस्ट विचार करणारे, हिंदुत्वाचा सर्वसमावेशक अर्थ नाकारणारे ठरवून टाकले. 'व्हाय आय ऍम अ हिंदू' हे शशी थरूर यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे. ही सर्व विशेषणे थरूर यांनी श्रीगुरूजींना लावलेली आहेत. श्रीगुरूजी शशी थरूर यांच्या डोक्यावरून गेले. डोक्यात सेक्युलॅरिझम घुसला की, हे राष्ट्र हिंदूंचे आहे हा विचार शिरण्याचे सर्व मार्ग बंद होतात.

दुसऱ्या बाजूला श्रीगुरूजी म्हणजे कारूण्याचा वाहता झरा, शुध्द सात्विक प्रेमाचा पुतळा, सर्व समाजावर निहर्ेतूक प्रेम करणारा महात्मा, कोटयवधी बांधवांना एक वेळचे जेवणही मिळत नाही, म्हणून रात्रीचे जेवण सोडणारा, खरा अद्वैतवादी, घराबाहेरील भिकारी निधन पावल्यानंतर त्याच्यासाठी शोक करणारा पुण्यात्मा, हेदेखील श्रीगुरूजींचे रूप आहे. आपल्या जीवनातील क्षण आणि कण भारतमातेच्या सेवेत अर्पण करणारा भारतमातेचा महान पुत्र ही त्यांची ओळख स्वयंसेवकांच्या मनात अमृतकुंभासारखी असते. ती त्याला कार्याची निरंतर प्रेरणा देते. यश आणि अपयशापासून चित्त विचलित न करण्याची शक्ती देते.

महात्मा गांधीजींनी आपल्या हयातीत आपल्या शुध्द सात्विक जीवनाच्या आधारे कार्यकर्त्यांची फौज उभी केली. 1948साली गांधीजी गेले. कार्यकर्त्यांची फौज उभी करणारी गंगोत्री आटली. आज देशात गांधीजींच्या नावाने कामे आहेत, पण नवीन कार्यकर्ते नाहीत. श्रीगुरूजींनी आपले नाव पुसून टाकले आणि भविष्यात हजारो, लाखो गुरूजी उभे राहतील, अशी यंत्रणा उभी केली. 'मी नाही, तूच' हा मंत्र ते जीवनभर जगले. संघाच्या एका गीताची ओळ अशा अर्थाची होती की संघकार्याची जोपासणी माधव, माळी करीत आहे. गीत हिंदीत आहे, त्याची ओळ आहे - सिंच रहा माधव, माली । गुरूजींच्या उपस्थितीत हे गीत गायले जात होते. गाणारा स्वयंसेवक जेव्हा या कडव्याकडे अाला, तेव्हा गुरूजी हळूहळू पुटपूटु लागले, 'सिंच रहे है, अगनित माली' आणि काय आश्चर्य गीत पाठ असलेला स्वयंसेवक हीच ओळ म्हणून गेला. गुरूजी हे खरोखच चमत्कारच होते.

श्रीगुरूजींनी हिंदू या शब्दाला देशात प्रंचड प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. एक काळ असा होता की, भले भले लोक म्हणत, मला गाढव म्हणा, पण हिंदू म्हणू नका. कुणी म्हणत मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. गुरूजी म्हणत की,'मी हिंदू आहे, याचा मला अभिमान आहे. मी हिंदू आहे म्हणजे अखिल मानवजातीशी चैतन्यरूपाने जोडला गेलेलो आहे. जे माझ्यात ते विश्वात आणि जे विश्वात ते माझ्यात.' या हिंदूला प्रतिष्ठा देण्यासाठी शुध्द हिंदू जीवन जगले पाहिजे. त्याला अन्य पर्याय नाही. कुठलाही अन्य मार्ग नाही. गुरूजी तसे जगले, तसे जगणाऱ्या पिढया उभ्या राहतील, अशी कार्यपध्दती त्यांनी सशक्त केली. म्हणूनच शशी थरूरसारखा सेक्युलॅरिझमच्या भांगेत वाढलेलादेखील आपल्या पुस्तकात म्हणतो, 'होय, मी हिंदू आहे आणि याचा मला अभिमान आहे.'

हिंदुत्वाची वैश्विक अनुभूती ही या पुढच्या काळाची पायरी आहे. त्याची मांडणी श्रीगुरूजींनी 'हिंदू संघटनेचा वैश्विक दृष्टीकोन' या बौध्दीक वर्गातून केली आहे. गर्व से कहो हिंदू है, हे अनेकांना म्हणायला 60-70 वर्षे लागली, पण वैश्विक हिंदू व्हायला पुढील 20-25 वर्षे पुरे होतील. विवेकानंदांचे अपुरे कार्य पूर्ण होईल आणि श्रीगुरूजींचे अवतार कार्यदेखील पूर्णत्वास जाईल.

 -  रमेश पतंगे