दिलदार वृत्तीचे आबासाहेब सतारमेकर

 विवेक मराठी  10-Feb-2018

***मदन कौलगुड***

 तंबोरे तयार करणे व ते जुळविणे ही एक उपजत कलाच मानली पाहिजे. तंबोरे जुळविण्यास आबासाहेब सतारमेकर असणे म्हणजे कलाकारांना व प्रेक्षकांना एक पर्वणीच. आबासाहेबांनी आपल्या दिलदार वृत्तीने अनेक संस्थांना तंबोरे देणगीदाखल दिलेले आहेत. यावरून त्यांनी शास्त्रीय संगीतासाठी घेतलेला ध्यास व त्यावरील प्रेम प्रत्ययास येते.

      सुर है तो सिर है।' हे खरे... पण सूर मिळविणे व एखाद्या कलाकाराच्या सुराप्रमाणे तंबोरा जुळविणे आणि तो तंतोतंत जुळविणे हे खऱ्या ज्ञानी माणसाचे काम आहे. तंबोरे तयार करणे व ते जुळविणे ही एक उपजत कलाच मानली पाहिजे. तंबोरे जुळविण्यास आबासाहेब सतारमेकर असणे म्हणजे कलाकारांना व प्रेक्षकांना एक पर्वणीच. मिरजेच्या नवरात्र उत्सवात असे सुरेख तंबोरे जुळविण्याचे काम मिरजेचे आबासाहेब सातत्याने करीत होते. त्यांचा प्रेमळ, मनमिळाऊ स्वभाव, तंबोऱ्याची उत्कृष्ट जव्हारी काढण्याची ख्याती व तंबोरे उत्तम मिळविण्याची शैली या  वैशिष्टयांमुळे पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. प्रभाकर कारेकर, पं. फिरोज दस्तूर, सौ. निर्मला गोगटे, नूतन गंधर्व अप्पासाहेब, कीर्ती शिलेदार यांचे कार्यक्रम, मिरज, सांगली, इचलकरंजी, कराड, कोल्हापूर, सातारा या परिसरात कोठेही असो, आबासाहेबांस पत्र पाठवून बोलावून घेतले जाई.

नवरात्र उत्सवांप्रमाणे हजरत पीर, खाँजा शमना मिरासाहेब यांच्या उरुसाच्या वेळी संगीतरत्न खा. अब्दुल करीम खाँ यांच्या पुण्यतिथीच्या वेळी आबासाहेब गेली 40 ते 45 वर्षे झटत होते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे प्रतिवर्षी कृष्णामाईच्या उत्सवांतही त्यांना आमंत्रित केले. त्यांची एकसष्ठी 1976 साली मिरज दर्ग्यामध्ये गलीफ श्रीफळ देऊन देशमुख महाराज पुणे यांच्या हस्ते सत्कार करून साजरी करण्यात आली. तसेच नवरात्र उत्सवांत राजारामबापू पाटील यांच्या हस्ते रौप्यपदक, श्री देवीची मूर्ती व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कल्याण येथे त्या वेळचे मंत्री मा. घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सुप्रसिध्द साहित्यिक पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रसिध्द गायक सुधीर फडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आबासाहेबांनी आपल्या दिलदार वृत्तीने अनेक संस्थांना तंबोरे देणगीदाखल दिलेले आहेत. यावरून त्यांनी शास्त्रीय संगीतासाठी घेतलेला ध्यास व त्यावरील प्रेम प्रत्ययास येते.

आबासाहेब हे मिरजेतील तंतु वाद्याचे आद्य जनक म. फरीदसाहेब यांचे पणतू होत. म. फरीदसाहेबांनी इ.स. 1850मध्ये 'भारतीय तंतुवाद्य केंद्र' ही संस्था स्थापून मूळ व्यवसायास सुरुवात केली. ती एकमेव जुनी संस्था. आज येथे पांच पिढयांवर चालू आहे. अद्याप आबासाहेब, गुलाबसाहेब व म्हमूलाल व त्यांचे पुतणे ही संस्था चालवीत आहेत. त्यांची ही नावाजलेली तंतुवाद्ये अखिल भारतात व परदेशांतही जातात.