ख्यातनाम हार्मोनियम वादक गोपाळराव आळतेकर

 विवेक मराठी  10-Feb-2018

*** मदन गोपाळराव आळतेकर***

गोपाळराव हरिभाऊ आळतेकर यांचे मिरजेच्या संगीत परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. गोपाळरावांना, वडील कीर्तनकार व प्रवचनकार हरिभाऊ केशव आळतेकर यांच्याकडून संगीताचा वारसा मिळाला. त्यांनी गीत रामायणाचे असंख्य कार्यक्रम केले. त्यामुळे गीत रामायण गायक म्हणून लवकरच मिरजेबाहेरही त्यांची ओळख झाली. आजही ज्या वेळी हार्मोनियम व गीत रामायणाचे नाव निघते, त्या वेळी गोपाळरावांचे नाव आदराने घेतले जाते. गोपाळराव आळतेकर यांचे वैशिष्टय म्हणजे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता त्यांनी आपल्या आयुष्यात संगीताची सेवा केली.

    सिध्द हार्मोनियमवादक, भावगीत व गीत रामायण गायक गोपाळराव हरिभाऊ आळतेकर यांचे मिरजेच्या संगीत परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. दि. 26 सप्टेंबर 1928 रोजी जन्मलेल्या गोपाळरावांना, वडील कीर्तनकार व प्रवचनकार हरिभाऊ केशव आळतेकर यांच्याकडून संगीताचा वारसा मिळाला. वयाच्या अवघ्या सात वर्षांपासून त्यांनी आपल्या वडिलांच्या कीर्तनाला हार्मोनियमची साथ देण्यास सुरुवात केली. उपजतच गोड गळा लाभलेल्या गोपाळरावांनी हळूहळू कीर्तनाला गायनाची साथ करण्यास सुरुवात केली. गायनाच्या शास्त्रोक्त माहितीसाठी त्यांनी मिरजेमधीलच शापित गंधर्व म्हणून ओळखले जाणारे पंडित वामनबुवा चाफेकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. तरुण वयातच गणेशोत्सव, मेळे यामध्ये आपल्या गायनाचा व हार्मोनियम वादनाचा ठसा त्यांनी उमटवला. कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेजमध्ये होणाऱ्या नाटकाच्या संगीताची धुरा त्यांच्याकडे असायची. पुढे स्वत:ची नोकरी सांभाळत त्यांनी भावगीत, गीत रामायणाचे असंख्य कार्यक्रम केले. त्यामुळे गीत रामायण गायक म्हणून लवकरच मिरजेबाहेरही त्यांची ओळख झाली. वैशिष्टय म्हणजे मिरजेतील तुळशीराम मंदिर येथे त्यांनी सलग 25 वर्षे रामनवमीच्या दिवशी गीत रामायणाचा कार्यक्रम सादर करून मिरजेच्या रसिकांचे कान तृप्त केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे यासाठी कोणतेही निमंत्रण वा जाहिरात नसताना रामनवमीच्या दिवशी गीत रामायण ऐकण्यासाठी असंख्य श्रोतृवर्ग न चुकता हजर राहत असे. मिरजेत होणाऱ्या कोणत्याही कीर्तनाला हार्मोनियमची साथ ही गोपाळरावांचीच असायची. त्यांच्या उत्कृष्ट हार्मोनियम साथीमुळे त्यांना गोव्यापर्यंत कीर्तनाच्या साथीला आग्रहाचे निमंत्रण असायचे. गोव्यातील प्रसिध्द श्री शांतादुर्गा देवस्थानच्या नवरात्रोत्सवामध्ये त्यांनी 25 वर्षांपेक्षा जास्त काळ हार्मोनियमची साथ केली. नृसिंहवाडीच्या कृष्णाबाई महोत्सवात, तसेच मिरजेतील प्रसिध्द श्री अंबाबाई नवरात्रोत्सवात त्यांनी अनेक नामवंत गायकांबरोबर हार्मोनियमची साथ करून वाहवा मिळविली. सांगली आकाशवाणीवरही त्यांना हार्मोनियमसाठी आवर्जून निमंत्रण येत असे. मिरजेतील प्रसिध्द निरूपणकार गुरुवर्य हरेरामपंत बोडस यांच्याबरोबर त्यांनी 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षे हार्मोनियमची साथ केली. मिरजेचे प्रसिध्द गायक मिरजभूषण पं. हृषीकेश बोडस, सांगलीच्या श्रीमती मंगलाताई जोशी हे आवर्जून त्यांच्या गायनाच्या साथीला गोपाळरावांना घेत असत.

गोपाळराव आळतेकर यांचे वैशिष्टय म्हणजे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता त्यांनी आपल्या आयुष्यात संगीताची सेवा केली. प्रकृती साथ देत नसतानाही केवळ संगीतामध्ये मिळणाऱ्या आनंदासाठी त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत संगीताची साथ सोडली नाही. त्यांनी मिरजेमध्ये महिलांचे संगीत भजन चाळीस ते पन्नास वर्षे उत्तम शिकवून चालविले होते. त्यामुळे आजही ज्या वेळी हार्मोनियम व गीत रामायणाचे नाव निघते, त्या वेळी गोपाळरावांचे नाव आदराने घेतले जाते.

प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. रामचंद्रबुवा कराडकर (श्रीमद् शंकराचार्य करवीरपीठ), दत्तदास घागबुवा, शेवडेबुवा, राहिलकरबुवा, हाटेबुवा, कोपरकरबुवा अशा अनेक कलावंतांनी त्यांची संगत नावाजली होती.

28 डिसेंबर 2005मध्ये वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

 

जयपूर घराण्याची परंपरा जपणारे पेटकरबुवा - गायत्री ढवळीकर

मिरजेतील शास्त्रीय संगीताचा इतिहास सर्वज्ञात आहेच. शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याची गायकी वृध्दिंगत करणारे मिरजेतील गुरुवर्य मुरलीधर दत्तात्रेय पेटकरबुवा हे त्यापैकी एक. त्यांचा जन्म 19 मे 1917 रोजी कोल्हापूर येथे झाला. जन्माला येण्यापूर्वीच त्यांचे पितृछत्र हरवले होते.

वडील दत्तोपंत पेटकर हे गंधर्व कंपनीत गायक-नट म्हणून काम करत. बालगंधर्वांबरोबर 'संगीत सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'स्वयंवर', 'मानापमान' अशा अनेक संगीत नाटकांतून त्यांनी गायन-अभिनयाचेही काम केले.

कोणताही आर्थिक व मानसिक आधार नसल्याने बुवांच्या आई सुंदराबाई यांनी अपमान सोसून, खूप कष्टाने नातेवाइकांच्या आश्रयाला राहून कोल्हापूर येथेच त्यांचे शालेय शिक्षण केले. पण बुवांचा कल रक्तातून आलेल्या संगीताकडेच होता.

वयाच्या 12व्या वर्षीच कोल्हापुरात त्यांनी (सुधीर फडकेंचे गुरू) पाध्येबुवांकडे 4-5 वर्षे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचा गंडा बांधून त्यांच्याकडे 22-23 वर्षे संगीताची खूप सखोल तालीम घेतली. याच दरम्यान 'संगीत अलंकार' ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.

संपूर्ण भारतभर फिरून उस्ताद बडे गुलाम अली खाँ, अल्लादिया खाँ, मोगूबाई, नथ्थन खाँ, विलायत हुसेन खाँ, अब्दुल करीम खाँ अशा अनेक दिग्गजांच्या मैफली ऐकल्या. बालगंधर्वांचा बराच सहवास लाभल्यामुळे त्यांच्या गायकीतील विविधता अभ्यासता आली. पुढे बुवा मिरज मुक्कामी वास्तव्यास आले. वृध्द आई, पत्नी, पाच मुली व एक मुलगा असा मोठा प्रपंच चालवण्यासाठी त्यांनी दुसरा कोणताच मार्ग न पत्करता शास्त्रीय संगीत शिकवणेच पसंत केले.

पेटकरबुवांचा स्वत:चा आवाज गोड व सुरेल होता. गायन अतिशय भावपूर्ण असे. उस्ताद बडे गुलाम अली खाँ व बालगंधर्व यांच्या गायकीचा प्रभाव बुवांच्या गायनातून दिसून येई. ते बालगंधर्वांची नाटयपदे खूप छान सादर करत.

संगीत शिकवताना स्वर कसा लावावा, गाण्यातील रंजकता, आलापतानांची सहजता, रागांचा विस्तार असे सुरेख मार्गदर्शन शिकणाऱ्यांना मिळत असे. यमन संपूर्ण कळला की इतर दहा रागांची मांडणी करता येते, असे त्यांचे मत होते. जिद्द, चिकाटी व कष्ट घेण्याची तयारी असेल तरच संगीत शिका असे ते निक्षून सांगत.

संगीत हाच त्यांचा आत्मा होता. संगीतसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून त्यांनी आयुष्यभर संगीताची पूजा केली. यासाठी पैसा, प्रसिध्दी कशी मिळेल याचा कधीच विचार केला नाही. त्यांचे सुपुत्र गुरुप्रसाद हेही तसाच प्रयत्न करत आहेत.

9860282832