आरत्या आणि देवे

 विवेक मराठी  24-Feb-2018

 

शतकानुशतकं तेच शब्द, कदाचित तीच चाल, तेच घालीन लोटांगण आणि तेच देवे. मी धरून पंचाण्णव टक्के लोकांना त्याचा अर्थ माहीत नाही. एखादं सुंदर गाणं ऐकताना मजा येते, कारण सगळं कसं बेतशीर, तालात असतं. आरतीचा प्रकार नेमका उलट आहे. झांजा वाजवणारे कधीच तालात नसतात (मला तर कधीच येत नाही). एखादा वाजवत असेल लयीत, तर तो अपक्ष असल्यासारखा नाइलाजाने बहुमतवाल्यांच्या मागे जातो. हात दुखू लागले की टाळयांचा आवाज हळूहळू कमी होतो. परंतु देव काही रागावत नाही हेही आहे. भाव महत्त्वाचा!

काही काही गोष्टींना उपजत लय असते. सगळया आरत्यांच्या चाली सारख्या का? हा प्रश्न कधी पडलाच नाही. शतकानुशतकं तेच शब्द, कदाचित तीच चाल, तेच घालीन लोटांगण आणि तेच देवे. मी धरून पंचाण्णव टक्के लोकांना त्याचा अर्थ माहीत नाही. तरीही कळायला लागल्यापासून मी ते म्हणत आलोय आणि आहे तोवर म्हणेनही. मंगेशकरांनी लावलेली चाल सुंदर आहे, पण ती घाईच्या वेळेत म्हणायच्या उपयोगाची नाही. ती मंडळात रेकॉर्ड लावून, कारण तिथे कुणाला आरती तोंडपाठ येत नाही म्हणून.

एखादं सुंदर गाणं ऐकताना मजा येते, कारण सगळं कसं बेतशीर, तालात असतं. आरतीचा प्रकार नेमका उलट आहे. झांजा वाजवणारे कधीच तालात नसतात (मला तर कधीच येत नाही). एखादा वाजवत असेल लयीत, तर तो अपक्ष असल्यासारखा नाइलाजाने बहुमतवाल्यांच्या मागे जातो. हात दुखू लागले की टाळयांचा आवाज हळूहळू कमी होतो. लोक कडवी उलट सुलट करतात, गाळतात. मध्येच, लग्नात भटजी आणि मुलीकडची एखादी स्वरकोकिळा एकाच वेळी वेगवेगळी मंगलाष्टकं चालू करतात, त्याप्रमाणे दोघे जण दोन आरत्या चालू करतात. ज्याचा आवाज मोठा, त्याची आरती तग धरते. ज्याची मागे पडली, तो आरतीच्या शेवटच्या ओळीवर उकिडवा बसून सावज पकडायला तयारीत असतो आणि क्षेपणास्त्र सोडावं तशी त्याची आरती चालू करतो. ती आरती पूर्ण होईपर्यंत त्याचा जेत्याचा चेहरा बघावा.

'सत्राणे उड्डाणे' ही ब्रह्मचाऱ्याची असल्यामुळे असेल, पण एकदम आटोपशीर आरती, चटचट संपते. मला ती हिंदी 'शेंदूर लाल चढायो' त्याच्या भाषांतरित 'नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्रे'पेक्षा जास्त आवडते. एकतर ती बऱ्याच लोकांना माहीत नसते किंवा पाठ नसते. त्यामुळे भाव खाता येतो हा एक भाग आणि 'धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता' या ओळीतला खरेपणा. सिक्स पॅक नाहीत, पोट सुटलंय, एक दात पडलाय, सोंड असे सगळे प्रकार असलेली ही मूर्ती 'मेरा मन रमता' असं का वाटतं, माहीत नाही. त्याचे डोळे काय सुंदर दिसतात! ते काढणाऱ्या कलाकारांचे हात एकदा हातात घ्यावेसे वाटतात. तिरळा गणपती मी आजपर्यंत पाहिलेला नाही.

खरं तर लोक आरत्या किती चुकीच्या म्हणतात. संकष्टी पावावे(?), उद्या देव 'संकटात'ऐवजी संकष्टीच्या उपवासाला पावला आणि पुण्यांची एन्ट्री वेगळया खात्यात जमा झाली, तर दोष मात्र चित्रगुप्ताला जाईल. चालीत बसायला पाहिजे म्हणून 'सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची'ऐवजी 'सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची' आणि मग 'नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची' म्हणतात. नुरवी पुरवी म्हणायला मात्र मस्त नादमय वाटतं. 'देवे' अशुध्द म्हणतात, तरी देव काही रागावत नाही हेही आहे. भाव महत्त्वाचा! उगाच रागवायला, चुका काढून वेगळे अर्थ काढायला तो काही माणूस नाही. म्हणून अशा सर्वसमावेशक, सगळयांना समजून घेणाऱ्या, चुका पोटात घालून माफ करणाऱ्या माणसाला 'देव'माणूस असं म्हणत असावेत.

हल्ली लोक चोरून गणपती आणल्यासारखा नवरा, बायको, मुलगा/मुलगी यातच आरतीचा सोपस्कार पार पाडतात. आरती कशी छप्परतोड, गोंगाटातच हवी. दरवाजा सताड उघडा ठेवावा. डोकावणारा ओळखीचा असो-नसो, त्याला घरातल्या चारपाच लोकांनी ''या आरतीला'' म्हणावं, उदबत्ती-धूप-कापराच्या वासाने आणि धुराने खोली भरलेली असावी, आवाज बसेपर्यंत आरत्या म्हणाव्यात, झांजा बडवाव्यात, 'एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात' आणि नंतरचे श्लोक म्हणेपर्यंत घसा शाबूत असावा, नंतर प्रसाद एकदा पुरेसा दिला असला तरी डबल मागून खावा आणि घडयाळ न बघता, मोबाइलकडे लक्ष न देता पुढच्या घरात जावं.

रस्त्यावरचा गणपती सोडा, घरातला गणपती अजून शिल्लक आहे तो जपायला हवाय. लहान असताना चाळीत प्रत्येक घरात आरतीला जावंच लागायचं, कारण आरत्या आणि देवे यायचे. इतकी घरं की प्रसादानेच पोट भरायचं. चव काही असो, नमस्कार करायचा आणि तळहातावर जे आहे ते पोटात पोहोचवायचं, एवढंच कळायचं. आरत्या आणि देवे म्हटले म्हणून म्हातारी माणसं कौतुकाने बघायचे, आशीर्वाद पुटपुटायचे. आता लक्षात येतं, उद्याच्या जेवणाचा प्रश्न असलेले लोक कर्ज काढून खर्च करायचे, सजावट करायचे, हौसेने आईला बोलावून पदार्थ करायचे, वाटायचे, दहा दिवस आनंदी व्हायचे. बरं, मागणं काय फार नसायचं - 'सुखी ठेव' एवढंच मोजकं. गणपतराव तरी किती लोकांना पुरे पडणार? सुखी होण्याची वाट बघणारे संख्येत आहेत. वाट बघून जे 'सुटले' ते 'सुखी' झाले. बाकी आपण आपलं विसर्जन होईपर्यंत त्याच्या विसर्जनाच्या रांगेत आहोतच.

9823318980