कुष्ठरुग्णांच्या सेवेचा नंदादीप पद्मश्रीने तेजाळला

 विवेक मराठी  27-Feb-2018

 

***जयवंत नागेश फडके**** 

एके दिवशी बापटजी सदाशिव कात्रे यांच्याकडे आले व ''संस्थेकरिता मी काही योगदान देऊ शकतो का?' अशी विचारण केली. त्यांच्या होकारानंतर कुष्ठरुग्णांची सेवा करणे सुरू केले. बापटजींनी दुर्गम प्रदेशात संस्थारूपी नंदनवन अक्षरश: उभे केले आहे. एवढयावरच न थांबता बस्तर भागातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात कुपोषणाचे बळी ठरणाऱ्या लहान बालकांसाठीही एक उपक्रम सुरू केला आहे. बापटजींच्या कार्यकर्तृत्वाची ही एक छोटीशी झलक.

भारतीय कुष्ठनिवारक संघाचे पूर्व सचिव माननीय दामोदर गणेश बापट यांना या वर्षीचा प्रतिष्ठेचा असा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करून भारत सरकारने सन्मानित केले आहे. महाराष्ट्राबाहेर आपल्या कार्यश्रेत्रात राहून हा पुरस्कार प्राप्त करणारी मराठी माणसे विरळ असतील. आम्ही त्यांना 'बापटजी' म्हणून संबोधित करतो. याबाबतची थोडीशी पार्श्वभूमी सांगणे सयुक्तिक ठरेल.

1962 साली सदाशिव गोविंद कात्रे हे रेल्वे कर्मचारी निवृत्त झाल्यावर स्वत:ला कुष्ठरोगाची बाधा झाल्यामुळे त्या वेळच्या मध्य प्रदेशातील चांपा या ठिकाणी असलेल्या ख्रिश्चन मिशनरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. मिशनरींच्या सेवाभावी वृत्तीच्या मागे असलेला धर्मांतराचा कुटिल डाव लक्षात येऊन याबाबत दाद मागण्यासाठी कात्रे म.प्र.चे त्या वेळचे राज्यपाल हरिभाऊ पाटसकर यांना भेटले. राज्यपालांनी त्यांना असे सांगितले की, ''हजारो मैलांवरून येऊन मिशनरी इथे सेवा देत आहेत. तुमचा उद्देश साध्य होण्यासाठी तुम्हीच का नाही एखादी 'आपली' संस्था सुरू करत?'' कात्रेजी या सल्ल्याने अस्वस्थ झाले व त्यांनी त्या वेळचे सरसंघचालक प.पू. श्री. गोळवळकर गुरुजी यांच्या पाठिंब्याने अशी संस्था उभी करण्याचा निर्णय घेतला व कात्रेजी आपल्याबरोबर एका झोपडीवजा घरात आणखी 4-5 कुष्ठरुग्ण घेऊन राहू लागले व त्यांची सेवा करू लागले.

कात्रेजी आता थकत चालले होते. एवढयात एके दिवशी बापटजी त्यांचेकडे आले व ''संस्थेकरिता मी काही योगदान देऊ शकतो का?'' असे विचारले असता कात्रेजींनी त्यांना 'शुभं करोति...' हा श्लोक सांगून बापटजींना या कार्यात येण्यास सांगितले. समोरच श्रीगुरुजींचा एक फोटो लावलेला होता व त्याखाली एक वाक्य लिहिलेले होते, ते असे -

जीवन का फासा बेधडक फेक दो चाहे गिरे वैसा

आत्मसमर्पण की इस श्रेष्ठ भावना का यह भगवा ध्वज आव्हान करता है।

बापटजींच्याच शब्दात सांगायचे, तर क्षणभर श्रीगुरुजी प्रत्यक्ष मला हे सांगताहेत असे भासले. बापटजी त्या क्षणापासून संस्थेचे झाले व संस्था त्यांची झाली. बापटजी हे जशपूर येथील वनवासी कल्याण आश्रमाचे ब्रह्मचारी प्रचारक, त्या वेळचे बी.ए., बी.कॉम. कात्रेजींच्या निधनानंतर बापटजींनी संस्थेच्या कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. समाजात कुष्ठरोगाबद्दलचे अज्ञान - जो संसर्गजन्य नाही, तो औषधोपचारांनी पूर्ण बरा होऊ शकतो किंवा कुष्ठरुग्णाबद्दलची घृणा व अनास्था या भागात भरपूर होती. संस्थेत कुष्ठरुग्णांच्या राहण्या-जेवण्याची सोय होऊ लागली. ज्यांचे हात वा पाय चांगले असतील, त्यांना करता येईल असा रोजगार - सतरंज्या विणणे, खडू बनविणे, चपला तयार करणे, शेती, गोशाळा व इतर कामात मदत होऊ लागली व त्यांच्या सन्माननीय जीवनास सुरुवात झाली.

संस्थेचे कार्य दिवसेंदिवस वाढू लागल्यावर तेथील दानशूर लोकांनी जमीन दान दिली व आज सत्तर एकर जागेवर संस्थेचे निरनिराळे उपक्रम चालू आहेत.

अगदी सुरुवातीच्या काळात संस्थेतील एखादा कुष्ठरोगी वार्धक्याने मरण पावला की त्याच्या नातेवाइकांना कळविले जाई व त्यांनी नकार दिल्यास तेथील जवळच्याच हसदो नदीच्या तीरावर पूर्ण सन्मानाने त्याचा अंत्यविधी केला जाई. ज्यांनी जीवनभर उपेक्षा, हेटाळणी, अवहेलना सोसली, त्यांचा अंत्यविधीही सगळयांनी मिळून करावा ही भावना असे.

बापटजींच्या दूरदृष्टीने हे जाणले की, कुष्ठरोगी आश्रमात आला की त्याची मुलेबाळे उघडयावर पडणार. त्यासाठी त्यांनी या मुलांसाठी वसतिगृह व शाळा यांची व्यवस्था केली व 'सुशील बालकागृह' या नावाने आज ही शाळा निवासी वा बाहेरून येणाऱ्या शेकडो मुलांना शिक्षणाची सुविधा देत आहे.

बापटजींशी अनेकदा बोलताना त्यांनी याची पार्श्वभूमी सांगितली की, ''भारतात काम करणाऱ्या मिशनरींपैकी दोन तृतीयांश मिशनरी हे कुष्ठरुग्णांची मुलांतील अनाथ व निराधार मुले आहेत.''

भारतीय कुष्ठनिवारक संघाच्या या कार्यामुळे त्या भागातील सेवा माध्यमातून होणाऱ्या धर्मांतरास आळा बसला आहे.

पाण्याच्या स्वयंपूर्णतेसाठी संस्थेने 'माधव सागर' हा तलाव बांधून काढला व मत्स्यशेतीही सुरू केली. त्यामुळे संस्था स्वयंपूर्ण तर झालीच, त्याचबरोबर इतर लोकांनाही या पाण्याचा लाभ होऊ लागला. यामागची कल्पना व दृष्टी बापटजींची.

बापटजींच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या संकल्पसिध्दी म्हणजे 1) कुष्ठरोग्यांसाठी वा इतर ठिकाणांहून येणाऱ्या गरीब रुग्णांसाठी अद्ययावत असे हॉस्पिटल संस्थेच्या आवारातच उभारले आहे व सुमारे दोन लाख लोकसंख्येस त्याचा लाभ होतो आहे.
2) गणेशमंदिर - एक भव्य असे गणेशमंदिर संस्थेने उभारले आहे व त्यामुळे आसपासच्या गावांमधील सर्वांचे ते एक श्रध्दास्थान व एकत्रीकरणाचे साधन झाले आहे. अनेक धार्मिक, सामाजिक उपक्रम तेथे नियमित होत असतात.

या मंदिराच्या वेळची एक घटना बापटजी सांगतात की, महाराष्ट्रातील बदलापूर येथे श्री गणेशमूर्ती तयार करण्यास सांगितली होती व तिचे काम पूर्ण होऊन ती चांपा येथे नेण्यासाठी बापटजींनी टेम्पोची व्यवस्था केली. पण रिकामा टेम्पो बदलापूरला नेण्यापेक्षा संस्थेतच तयार झालेला काही पोती तांदूळ ते डोंबिवली येथील नागालँडच्या मुलांच्या वसतिगृहासाठी घेऊन आले. बापटजींची यामागची योजना व सम्यक हितासाठीचे समर्पण या गोष्टी खरोखरच स्तिमित करणाऱ्या आहेत. बापटजींच्या कार्यकर्तृत्वाबद्दल पुष्कळ काही लिहिता येईल, परंतु त्यातील एक किस्सा त्यांच्याकडून ऐकला होता, तो असा -

संस्थेच्या चांपा आश्रमापाशी स्थानिक बससेवेचा थांबा आहे. बापटजी काही कामासाठी तेथे थांबले की, त्यांना पाहिल्यावर बस चालक बस न थांबवता पुढे जात असे. बापटजी कुष्ठरुग्ण आहेत या गैरसमजुतीने 'नको ही ब्याद' असे त्याला वाटत असेल. पण संस्थेच्या व बापटजींच्या कार्याचा बोलबाला जसा सगळीकडे होऊ लागला, तसे एके दिवशी बस थांब्यावर थांबली. बापटजी बसमध्ये चढले. 2 कि.मी. गेल्यावर, जी महत्त्वाची काही कागदपत्रे घ्यायला हवीत ती संस्थेतच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी चालकाला बस थांबविण्याची विनंती केली व चालकाला कारण कळल्यावर तो म्हणाला,''इतनी सी तो बात है ना? हम बस बापट संस्था के पास लेते है और आप अपने कागज लेके आईये। हम इतना भी नही कर सकते है क्या आपके लिये?''

बापटजींनी या अशा प्रदेशात संस्थारूपी नंदनवन अक्षरश: उभे केले आहे. एवढयावरच न थांबता बस्तर भागातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात कुपोषणाचे बळी ठरणाऱ्या लहान बालकांसाठीही एक उपक्रम सुरू केला आहे. त्यालाही आता 20 वर्षे होत आली. Sical Cell या रोगाने ग्रस्त अशा या भागातील अनेकांसाठी उपचारासाठी दंतेवाडा जिल्ह्यातील नकुळनार/हल्लारास येथे एक केंद्र सुरू केले आहे व त्यांच्या पत्नी हे कार्य करीत आहेत.

बापटजींना त्यांच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल अनेक सन्मान यापूर्वी मिळाले आहेत. मध्य प्रदेश सरकारचा प्रतिष्ठेचा सेवाव्रती पुरस्कार, पुण्याच्या स्व-रूपवर्धिनीतर्फे तसेच डोंबिवली तेथील टिळकनगर शिक्षण मंडळाचा 'तेजस पुरस्कार' हे यातील काही आहेत. बापटजींना आता 83वे वर्षे सुरू आहे. प्रकृती वयाच्या मानाने साथ देत नाही. प्रवासही आता कमी झाला आहे, पण संस्थेबद्दलच्या विचारांचा चालणारा अखंड नंदादीप मात्र अजूनही तेजाळत आहे.

बापटजींच्या कार्यकर्तृत्वाची ही एक छोटीशी झलक. वास्तविक पद्मश्री पुरस्काराचाच हा सन्मान होय असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

बापटजींना या निमित्ताने आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा देतो व आम्हा कार्यकर्ते/हितचिंतक यांना असेच मार्गदर्शन यापुढेही लाभत राहो, अशी प्रार्थना करतो.

9881557821

 

बापटजींचा पत्ता

दामोदर गणेश बापट

द्वारा भारतीय कुष्ठनिवारक संघ

ऍट पोस्ट चांपा (कर्वेनगर), जांजगीर तहसील,

छत्तीसगड - 495671

7970225872, 07819-201256/201740