जीवदया आणि अन्य समाजकार्यातील समस्त महाजनचे योगदान

 विवेक मराठी  28-Feb-2018

 

***विजय मराठे****

दिवसेंदिवस भौतिकवादासोबतच पशुहत्येचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. मांसाहाराच्या आणि अन्य कारणांसाठी अनेक मूक जीवांच्या हत्या होताना दिसतात. धावपळीच्या या युगात प्राणिमात्रांची सेवा कशी करता येईल? त्यासाठी प्राणिमात्रांच्या सेवा कार्यासाठी सढळ हस्ते दान करण्याचा पर्याय आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक जिल्ह्यात पशुपालन केंद्रे (पांजरपोळ) आहेत, त्यांना साहाय्य करता येईल. या केंद्रात मुक्या प्राण्यांना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवून त्यांचा सांभाळ केला जातो. अनेक तरुणही या सेवा कार्यात सहभागी असतात. आपला जीव धोक्यात घालून त्या प्राण्यांचे रक्षण करतात. ज्यांना प्रत्यक्षपणे या कार्यात सहभागी होणे शक्य नसेल, त्यांनी अशी केंद्रे चालवणाऱ्यांना सहकार्य केले तरी पुरे!

सेवाभावी देणगीदारांच्या अर्थसाहाय्यातून अनेक केंद्रांची निर्मिती झाली. या दानातून पशूंना चरण्यासाठी कुरणे, तलाव, झाडे, प्राण्यांसाठी शेड्स, चारा, चारा ठेवण्यासाठी गोदाम, कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, पाण्याची सोय, गवत कापण्यासाठी मशीन, कर्मचाऱ्यांच्या पगारासहित अनेक खर्च भागवले जातात. या सर्व गोष्टींसाठी नियमित दानाचा ओघ असणे गरजेचे आहे.

काही केंद्रे अशी आहेत की, त्यांना पुरेसे अर्थसाहाय्य मिळत नाही. दर वर्षी एका प्राण्याच्या पोषणासाठी पांजरपोळात बारा हजार रुपयांचा चारा लागतो. म्हणजे जर 5000 पशू असतील, तर सहा कोटी रुपये फक्त एका वर्षात चाऱ्याठीच खर्च होतात. अशा पशुपालन केंद्रास एखाद्या संस्थेची मदत मिळाल्यास काम करणे सुकर होईल.

या सेवा कार्यात समस्त महाजन ही संस्था अनेक व्यक्ती, संस्था आणि कॉर्पोरेट जगताला जोडून घेण्यासाठी आवाहन करते. आपण ज्या प्रकारे अन्य खर्च आनंदाने करतो, त्याच उत्साहाने हे पवित्र कार्य करावे, ही संस्थेची अपेक्षा असते.

भारतात स्वदेशी वृक्षांची लागवड करून भारतभूमी सुपीक करण्याच्या हेतूने समस्त महाजन संस्थेद्वारे 'महाकोटी वृक्ष अभियान' राबवले जाते. त्या अंतर्गत वड, पिंपळ, लिंबू, जांभूळ, शमी, बेल, आंबा, बकुळ, अंजीर, हरडा-बेहडा, आवळा, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड केली जाते. स्वदेशी झाडांच्या लागवडीमुळे जमीन सुपीक होण्यास मदत होते. या वृक्ष मोहिमेत एका झाडाच्या लागवडीचा खर्च किमान 1000/- रुपये इतका येतो. त्यासाठीही समस्त महाजन मदतीचे आवाहन करते.

शिवाय शिक्षण क्षेत्रातदेखील समस्त महाजन संस्था कार्यरत आहे. आजच्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षण सर्वच जण देतात, परंतु मूल्यशिक्षणाचा अभाव दिसतो. पारंपरिक गुरुकुलम पध्दतीने संस्कारक्षम शिक्षण देण्यावर समस्त महाजनचा भर असतो. मध्य प्रदेशमध्ये बडोदे येथील जैन विद्या मंदिराच्या निर्मितीत समस्त महाजन संस्था सक्रिय होती. एक प्रयोग म्हणून संस्थेने ही शाळा सुरू केली आणि हा प्रयोग इतका यशस्वी झाला की, आज या शाळेत 2300 विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत, शिवाय आसपासच्या वीस गावांतील विद्यार्थी येथे शिकायला येतात.

या शाळेच्या यशाच्या प्रेरणेने समस्त महाजनने अशा प्रकारच्या आणखी शाळांची निर्मिती करण्याचा संकल्प केला आहे. मध्य प्रदेश येथे शाळेच्या कामासाठी जमीन दान म्हणून मिळाली आहे आणि या जमिनीवर शाळेच्या निर्मितीचे काम चालू आहे. अशा स्वरूपाच्या एका शाळेसाठी किमान 10 कोटी रुपये खर्च येतो. यासाठीची देणगी व्यक्तिगत, कॉर्पोरेट किंवा सी.एस.आर. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज) अशा स्तरांवर देता येऊ शकते. पुढील दहा वर्षांत अशा प्रकारच्या दहा शाळांची निर्मिती समस्त महाजनद्वारे व्हावी, असा संस्थेचा मानस आहे आणि संस्थेला विश्वास आहे की हा मानस पूर्ण होण्यासाठी समाज सहकार्य करेल.

समाजात असेही काही लोक आहेत की, ज्यांना कौटुंबिक समस्या, अपंगत्व किंवा अन्य कारणांमुळे एकाकी, निराधार जीवन जगावे लागते. अशा लोकांसाठी अपंगाश्रम, अनाथाश्रम, वृध्दाश्रम इत्यादींचा आश्रय असतो. अशा लोकांसाठी उज्जैन येथे सेवाधाम आहे. समस्त महाजन संस्था या सेवाधामशी संलग्न होऊन सेवाकार्य करत आहे.

समस्त महाजन संस्थेने या दिशेने अधिक काम करण्यासाठी गुजरात येथील दहा आश्रमांचे सर्वेक्षण केले आहे. सेवाधाम समितीसारख्या संस्थांमधील एका किंवा अनेक निराधार व्यक्तींचा आर्थिक भार स्वीकारून आपण या सेवा कार्यात आपला सहभाग देऊ शकता. या योजनेतील एका व्यक्तीचा (सेवा कार्य) खर्च 50000/- रुपये आहे.

समाजातील अशा सेवा कार्यांमध्ये समस्त महाजनबरोबर आपणही सहभागी होऊ शकता. समाजसेवा हे पवित्र कर्म मानणारे लोक आणि संस्था या सेवा कार्यात निश्चितच सहभागी होतील, अशी आशा आहे.

                  9893436951

अनुवाद - पूनम पवार