'उमर'भर स्वरसाधना करणारे उमरसाहेब मिरजकर

 विवेक मराठी  03-Feb-2018

***मुबिन मिरजकर***

उमरसाहेब मिरजकर यांनी जन्हारदार वाजवणारे तानपुरे कसे बनवावेत यासाठी आयुष्यभर संगीताची साधना केली. यासाठी उस्ताद घम्मनखाँ या गुरूंचे गंडाबंद शागिर्दही झाले. स्व. उमरसाहेबांच्या गायकीने प्रभावित होऊन ओडियन या कंपनीने त्यांच्या ठुमरी, दादरा, कव्वालीच्या ध्वनिमुद्रिका काढल्या होत्या. वाद्यनिर्मिती व हार्मोनियमचे टयूनिंग या कामात त्यांचा हातखंडा झाला. उमरसाहेब मिरजकर यांनी वाद्यनिर्मितीचा प्रचार व प्रसार करून मिरजेच्या नावलौकिकात भर घातली.

    पिढीजात तंतुवाद्य निर्मिती असलेल्या व पुरोगामी विचारसरणीचा वारसा असलेल्या घराण्यामध्ये स्व. उमरसाहेबांचा जन्म झाला. जन्हारदार वाजवणारे तानपुरे कसे बनवावेत यासाठी आयुष्यभर संगीताची साधना केली. यासाठी उस्ताद घम्मनखाँ या गुरूंचे गंडाबंद शागीर्दही झाले. स्व. उमरसाहेब मिरजकर यांचे वडील पै. अहमदसाहेब हेही पुरोगामी विचारसरणीचे होते. स्वातंत्र्यसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. शेवटपर्यंत ते खादी परिधान करत असत. त्यांच्याकडून उमरसाहेबांना सांगीतिक व सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. उमरसाहेबांनी प्रारंभीच्या काळात सांगली येथे दुकान सुरू केले. त्या वेळी मा. दीनानाथ व मा. अविनाश उर्फ गणतराव मोहिते यांचा सहवास त्यांना लाभला. पुढे कराड व नंतर पुणे येथे त्यांनी दुकान चालू केले. पुण्यात त्या वेळी उ. अहमदजान थिरकवा व पं. सुरेशबाबू माने या दिग्गजांसमवेत राहून त्यांनी गायन-वादनाच्या मैफली रंगवल्या. स्व. उमरसाहेबांच्या गायकीने प्रभावित होऊन ओडियन या कंपनीने त्यांच्या ठुमरी, दादरा, कव्वालीच्या ध्वनिमुद्रिका काढल्या होत्या. 'ख्वाँजा के कलस पे वारी जाड में' या ध्वनिमुद्रिकेने त्यांचे बरेच नाव झाले. त्यांचा पुण्यातील कार्यकाळ फारच सुखाचा गेला. बालगंधर्वांशी व प्रभात फिल्म कंपनीशी त्यांचे स्नेह जुळले. त्यातून दोन्ही कंपन्यांच्या सर्व वाद्यांच्या दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर आली. दिग्गज कलाकारांच्या सहवासामुळे त्यांच्या संगीतविषयक ज्ञानात भर पडत गेली. त्यातूनच वाद्यनिर्मिती व हार्मोनियमचे टयूनिंग या कामात त्यांचा हातखंडा झाला. पुढे घरगुती अडचणींमुळे व लहान बंधूंच्या आजारपणामुळे ते मिरजेस परत आले. मिरजेत 

1950 साली 'इंडियन म्युझिकल शॉप' या दुकानाची पुन:स्थापना केली. व्यवसायामध्ये सतत नावीन्याचा शोध घेत त्यांनी सतारीत व तंबोऱ्यात बऱ्याच सुधारणा केल्या. चल-अचल थाटाची सतार, तरफेच्या तारा इत्यादी सतारीमध्ये बदल केला. चार तारांचा पारंपरिक तानपुरा असताना नव्याने पाच तारी तानपुऱ्याच्या निर्मितीचा प्रयत्न यशस्वी केला. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्यासाठी हा तंबोरा बनविला व हिराबाई टाइपचा तानपुरा असे त्याचे नामकरण केले. त्याचप्रमाणे उस्ताद अमीर खाँसाहेबांसाठी सहा तारांचा तानपुरा बनवून नवीन संशोधन यशस्वी केले. जव्हारीमध्ये खुली जव्हारी, बंद जव्हारी इत्यादी प्रयोग करून या कामात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. इतकेच करून न थांबता त्यांनी आपल्या समव्यावसायिकांना जव्हारीचे ज्ञान करून देऊन अनेक शिष्य तयार केले. सतार निर्मितीबरोबरच वादनातही गती असल्याने त्यांनी अनेक शिष्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून दिला. मिरजेचे सतारवादक मुस्तफा मुतवल्ली व पं. राहुल सारीपुत्र हे उमरसाहेबांचे शिष्य होत. पं. सदाशिवराव जाधव, पं. तिप्पाण्णा मुळे, बासरी वादक पं. हरिचंद्र कोकरे हेही उमरसाहेब मिरजकर यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. व्यवसायातील अडीअडचणी सोडविण्यासाठी समव्यवसायिकांना एकत्र करून 'भारतीय संगीत कला व औद्योगिक सहकारी संस्थे'ची स्थापना करून त्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला केला. मिरजेतील मिरासाहेब दर्गा येथे साजरी होणारी खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांची पुण्यातिथी व श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव या संस्थांच्या स्थापनेपासून त्यांचा सहभाग होता. पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पंडिता गंगूबाई हनगल, पं. बसवराज राजगुरू, श्रीमती सरस्वती राणे, श्रीमती प्रभा अत्रे, पं. भीमसेन जोशी या दिग्गजांनी त्यांच्या हातून बनविलेल्या सतार-तंबोऱ्याच्या वापर केला, तसेच अनेक नवोदित विद्यार्थ्यांना वाद्ये बनवून देऊन त्यांनी संगीत क्षेत्राची सेवा केली. शासनाच्या अनेक प्रदर्शनांत सहभाग घेऊन मिरजेच्या वाद्यनिर्मितीचा प्रचार व प्रसार करून मिरजेच्या नावलौकिकात भर घातली. या कार्याबद्दल शिल्पी केंद्रातर्फे त्यांचा गौरवही करण्यात आला होता. अशा या थोर कलाकाराची पुढची पिढी या तंतुवाद्यनिर्मितीच्या क्षेत्रात कार्य करत असून त्यांचे कार्य पुढे नेत आहे.

9762409726